श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ त्रयोदशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
रावणेन निर्मापिते शयनागारे कुम्भकर्णस्य शयनं, रावणस्यात्याचारः कुबेरेण दूतं प्रेष्य तस्य प्रबोधनं, क्रुद्धेन रावणेन दूतस्य वधश्च -
रावण द्वारा बनविल्या गेलेल्या शयनागारात कुंभकर्णाचे झोपणे, रावणाचे अत्याचार, कुबेराचे दूत पाठवून त्यास समजाविणे, तसेच कुपित झालेल्या रावणाचे त्या दूताला ठार मारणे -
अथ लोकेश्वरोत्सृष्टा तत्र कालेन केनचित् ।
निद्रा समभवत् तीव्रा कुम्भकर्णस्य रूपिणी ॥ १ ॥
(अगस्त्य म्हणतात - रघुनंदना !) त्यानंतर काही काळ गेल्यानंतर लोकेश्वर ब्रह्मदेवांनी धाडलेली निद्रा जांभई आदिच्या रूपाने मूर्तिमंत होऊन कुंभकर्णाच्या ठिकाणी तीव्र वेगाने प्रकट झाली. ॥१॥
ततो भ्रातरमासीनं कुम्भकर्णोऽब्रवीद् वचः ।
निद्रा मां बाधते राजन् कारयस्व ममालयम् ॥ २ ॥
तेव्हा कुंभकर्णाने जवळच बसलेला आपला भाऊ रावण यास म्हटले - राजन्‌ ! मला झोप सतावीत आहे म्हणून माझ्यासाठी शयन करण्यायोग्य घर बनवून दे. ॥२॥
विनियुक्तास्ततो राज्ञा शिल्पिनो विश्वकर्मवत् ।
विस्तीर्णं योजनं स्निग्धं ततो द्विगुणमायतम् ॥ ३ ॥

दर्शनीयं निराबाधं कुम्भकर्णस्य चक्रिरे ।
स्फाटिकैः काञ्चनैश्चित्रैः स्तम्भैः सर्वत्र शोभितम् ॥ ४ ॥
हे ऐकून राक्षसराजाने विश्वकर्म्याप्रमाणे सुयोग्य शिल्पिंना महाल बनविण्यासाठी आज्ञा केली. त्या शिल्पींनी दोन योजन लांब आणि एक योजन रूंद स्निग्ध घर बनविले, जे पहाण्यासारखे होते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधेचा अनुभव येत नव्हता. त्यात सर्वत्र स्फटिकमणि तसेच सुवर्णाचे बनविलेले खांब उभारलेले होते, जे त्या भवनाची शोभा वाढवत होते. ॥२-४॥
वैदूर्यकृतसोपानं किङ्‌किणीजालकं तथा ।
दान्ततोरणविन्यस्तं वज्रस्फटिकवेदिकम् ॥ ५ ॥
त्यांत वैडूर्याच्या पायर्‍या बनविलेल्या होत्या. सर्व बाजूस किंकिणी (घुंगरू) लावलेल्या झालरी लावल्या होत्या. त्याचे महाद्वार हस्तीदंताचे बनविलेले होते आणि हिरे आणि स्फटिकमण्यांच्या बनविलेल्या वेदी आणि चबूतरे शोभा प्राप्त करून देत होते. ॥५॥
मनोहरं सर्वसुखं कारयामास राक्षसः ।
सर्वत्र सुखदं नित्यं मेरोः पुण्यां गुहामिव ॥ ६ ॥
ते भवन सर्व प्रकारांनी सुखद आणि मनोहर होते. मेरूच्या पुण्यमयी गुहेप्रमाणे सदा सर्वत्र सुख प्रदान करणारे होते. राक्षसराज रावणाने कुंभकर्णासाठी असे सुंदर आणि सुविधाजनक शयनागार बनविले. ॥६॥
तत्र निद्रां समाविष्टः कुम्भकर्णो महाबलः ।
बहून्यब्दसहस्राणि शयानो न प्रबुद्ध्यते ॥ ७ ॥
महाबली कुंभकर्ण त्या घरात जाऊन निद्रेला वश होऊन कित्येक हजार वर्षांपर्यंत झोपून राहिला होता. जागा होऊ शकत नव्हता. ॥७॥
निद्राभिभूते तु तदा कुम्भकर्णे दशाननः ।
देवर्षियक्षगन्धर्वान् संजघ्ने हि निरङ्‌कुशः ॥ ८ ॥
जेव्हा कुंभकर्ण निद्रेने अभिभूत होऊन झोपला, तेव्हा दशमुख रावण उच्छृङ्‌खल होऊन देवता, ऋषि, यक्ष आणि गंधर्वांच्या समूहांना मारू आणि पीडा देऊ लागला. ॥८॥
उद्यानानि च चित्राणि नन्दनादीनि यानि च ।
तानि गत्वा सुसङक्रुद्धो भिनत्ति स्म दशाननः ॥ ९ ॥
देवतांचे नंदनवन आदि जी विचित्र उद्याने होती त्यांच्यात जाऊन दशानन अत्यंत कुपित होऊन त्या सर्वांना उजाडून टाकत होता. ॥९॥
नदीं गज इव क्रीडन् वृक्षान् वायुरिव क्षिपन् ।
नगान् व्रज्र इवोत्सृष्टो विध्वंसयति राक्षसः ॥ १० ॥
तो राक्षस नदीमध्ये हत्तीप्रमाणे क्रीडा करीत तिच्या धारांना छिन्न-भिन्न करून टाकत होता. वायुप्रमाणे वृक्षांना उन्मळून टाकत होता आणि पर्वतांना इंद्राच्या हातून सुटलेल्या वज्राप्रमाणे तोडून-फोडून टाकत होता. ॥१०॥
तथावृत्तं तु विज्ञाय दशग्रीवं धनेश्वरः ।
कुलानुरूपं धर्मज्ञो वृत्तं संस्मृत्य चात्मनः ॥ ११ ॥

सौभ्रात्रदर्शनार्थं तु दूतं वैश्रवणस्तदा ।
लङ्‌कां सम्प्रेषयामास दशग्रीवस्य वै हितम् ॥ १२ ॥
दशग्रीवाच्या त्या निरंकुश वर्तनाचा समाचार मिळून धनाचे स्वामी धर्मज्ञ कुबेरांनी आपल्या कुळास अनुरूप आचार व्यवहाराचा विचार करून उत्तम भातृप्रेमाचा परिचय देण्यासाठी लंकेमध्ये एक दूत धाडला. त्यांचा उद्देश हा होता की मी रावणाला त्याच्या हिताची गोष्ट सांगून योग्य मार्गावर आणावे. ॥११-१२॥
स गत्वा नगरीं लङ्‌कां आससाद विभीषणम् ।
मानितस्तेन धर्मेण पृष्टश्चागमनं प्रति ॥ १३ ॥
तो दूत लंकापुरीत जाऊन प्रथम विभीषणास भेटला. विभीषणाने धर्मास अनुसरून त्याचा सत्कार केला आणि लंकेत येण्याचे कारण विचारले. ॥१३॥
पृष्ट्‍वा च कुशलं राज्ञो ज्ञातीनां च बिभीषणः ।
सभायां दर्शयामास तमासीनं दशाननम् ॥ १४ ॥
नंतर बंधु-बांधवांचा कुशल समाचार विचारून विभीषणाने त्या दूताला घेऊन जाऊन राजसभेत बसलेल्या रावणाची भेट करून दिली. ॥१४॥
स दृष्ट्‍वा तत्र राजानं दीप्यमानं स्वतेजसा ।
जयेति वाचा सम्पूज्य तूष्णीं समभिवर्तत ॥ १५ ॥
राजा रावण सभेमध्ये आपल्या तेजाने उद्दीप्त होत होता. त्याला पाहून दूतानी महाराजांचा जय होवो असे म्हणून वाणीद्वारा त्याचा सत्कार केला आणि नंतर तो काही काळपर्यंत गुपचुप उभा राहिला. ॥१५॥
तं तत्रोत्तमपर्यङ्‌के वरास्तरणशोभिते ।
उपविष्टं दशग्रीवं दूतो वाक्यमथाब्रवीत् ॥ १६ ॥
त्यानंतर उत्तम चादरीने सुशोभित एका श्रेष्ठ पलंगावर बसलेल्या दशग्रीवाला त्या दूताने याप्रकारे म्हटले - ॥१६॥
राजन् वदामि ते सर्वं भ्राता तव यदब्रवीत् ।
उभयोः सदृशं वीर वृत्तस्य च कुलस्य च ॥ १७ ॥
वीर महाराज ! आपले बंधु धनाध्यक्ष कुबेर यांनी आपल्यापाशी जो संदेश धाडला आहे तो माता-पिता दोघांच्याही कुळास आणि सदाचारास अनुरूप आहे. मी तो पूर्णरूपाने आपल्याला सांगतो, ऐकावे - ॥१७॥
साधु पर्याप्तमेतावत् कृतश्चारित्रसंग्रहः ।
साधु धर्मे व्यवस्थानं क्रियतां यदि शक्यते ॥ १८ ॥
दशग्रीव ! तू आतापर्यंत जी काही कुकृत्ये केली आहेस, तितकीच पुरेशी आहेत. आता तर तू उत्तमप्रकारे सदाचाराचा संग्रह करायला हवा. जर शक्य असेल तर धर्माच्या मार्गावर स्थित रहा, हेच तुझ्यासाठी चांगले होईल. ॥१८॥
दृष्टं मे नन्दनं भग्नं ऋषयो निहताः श्रुताः ।
देवतानां समुद्योगः त्वत्तो राजन् मया श्रुतः ॥ १९ ॥
तू नंदनवन उजाडून टाकलेस - हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. तुझ्या द्वारा बर्‍याचशा ऋषिंचा वध झाला आहे, हेही माझ्या ऐकण्यात आले आहे. राजन्‌ ! (यामुळे त्रस्त होऊन देवता तुझा बदला घेऊ इच्छित आहेत.) मी ऐकले आहे की तुझ्या विरूद्ध देवतांनी उद्योगास आरंभ केला आहे. ॥१९॥
निराकृतश्च बहुशः त्वयाऽहं राक्षसाधिप ।
अपराधोऽपि बालो हि रक्षितव्यः स्वबान्धवैः ॥ २० ॥
राक्षसराज ! तू कित्येक वेळा माझाही तिरस्कार केला आहेस, तथापि जर बालक अपराध करत असेल तरीही आपल्या बंधुबांधवांनी तर त्याचे रक्षणच करायला पाहिजे. (म्हणून तुला हितकारक सल्ला देत आहे.) ॥२०॥
अहं तु हिमवत्पृष्ठं गतो धर्ममुपासितुम् ।
रौद्रं व्रतं समास्थाय नियतो नियतेन्द्रियः ॥ २१ ॥
मी शौच-संतोषादि नियमांचे पालन आणि इंद्रियसंयमपूर्वक रौद्रव्रता चा आश्रय घेऊन धर्माचे अनुष्ठान करण्यासाठी हिमालयाच्या एका शिखरावर गेलो होतो. ॥२१॥
तत्र देवो मया दृष्ट उमया सहितः प्रभुः ।
सव्यं चक्षुर्मया दैवात् तत्र देव्यां निपातितम् ॥ २२ ॥

का न्वेषेति महाराज न खल्वन्येन हेतुना ।
रूपं ह्यनुपमं कृत्वा रुद्राणी तत्र तिष्ठति ॥ २३ ॥
तेथे मला उमेसहित भगवान्‌ महादेवांचे दर्शन झाले. महाराज ! त्या समयी केवळ पाहू या तरी हे कोण आहेत हे जाणण्यासाठी पार्वतीवर डावी दृष्टि टाकली होती. निश्चितच मी दुसर्‍या कोठल्याही हेतुने (विकारयुक्त भावनेने) त्यांचेकडे पाहिले नव्हते. त्या वेळी देवी रूद्राणी अनुपम रूप धारण करून तेथे उभी होती. ॥२२-२३॥
देव्या दिव्यप्रभावेण दग्धं सव्यं ममेक्षणम् ।
रेणुध्वस्तमिव ज्योतिः पिङ्‌गुलत्वं उपागतम् ॥ २४ ॥
देवीच्या दिव्य प्रभावाने त्यासमयी माझा डोळा जळून गेला आणि दुसरा (उजवा) ही धूळीने भरल्या सारखा होऊन पिङ्‌गल वर्णाचा झाला. ॥२४॥
ततोऽहमन्यद् विस्तीर्णं गत्वा तस्य गिरेस्तटम् ।
तूष्णीं वर्षशतान्यष्टौ समाधारं महाव्रतम् ॥ २५ ॥
त्यानंतर मी पर्वताच्या दुसर्‍या विस्तृत तटावर जाऊन आठशे वर्षे पर्यंत मौनभावाने ते महान्‌ व्रत धारण केले. ॥२५॥
समाप्ते नियते तस्मिन् तत्र देवो महेश्वरः ।
प्रीतः प्रीतेन मनसा प्राह वाक्यमिदं प्रभुः ॥ २६ ॥
तो नियम समाप्त झाल्यावर भगवान्‌ महेश्वर देवाने मला दर्शन दिले आणि प्रसन्न मनाने म्हटले - ॥२६॥
प्रीतोऽस्मि तव धर्मज्ञ तपसा नेन सुव्रत ।
मया चैतद् व्रतं चीर्णं त्वया चैव धनाधिप ॥ २७ ॥
उत्तम व्रताचे पालन करणार्‍या धर्मज्ञ धनेश्वरा ! मी तुझ्या या तपस्येने खूप संतुष्ट झालो आहे. एक तर मी या व्रताचे आचरण केले आहे आणि दुसरे तू. ॥२७॥
तृतीयः पुरुषो नास्ति यश्चरेद् व्रतमीदृशम् ।
व्रतं सुनिश्चयं ह्येतन् मया ह्युत्पादितं पुरा ॥ २८ ॥
तिसरा कोणी पुरुष असा नाही, की जो या कठोर व्रताचे पालन करू शकेल. या अत्यंत दुष्कर व्रताला पूर्वकाळी मीच प्रकट केले होते. ॥२८॥
तत्सखित्वं मया सौम्य रोचयस्व धनेश्वर ।
तपसा निर्जितश्चैव सखा भव ममानघ ॥ २९ ॥
म्हणून सौम्य धनेश्वरा ! आता तू माझ्याबरोबर मैत्रीचे संबंध स्थापित कर; हा संबंध तुला पसंत आला पाहिजे. अनघा ! तू आपल्या तपाने मला जिंकले आहेस, म्हणून माझा मित्र बनून रहा. ॥२९॥
देव्या दग्धं प्रभावेण यच्च सव्यं तवेक्षणम् ।
पैंगल्यं यदवाप्तं हि देव्या रूपनिरीक्षणात् ॥ ३० ॥

एकाक्षपिङ्‌गलेत्येव नाम स्थास्यति शाश्वतम् ।
एवं तेन सखित्वं च प्राप्यानुज्ञां च शंकरात् ॥ ३१ ॥

आगतेन मया चैवं श्रुतस्ते पापनिश्चयः ।
देवी पार्वतींच्या रूपावर दृष्टिपात केल्याने देवीच्या प्रभावाने तुझा डावा नेत्र जो जळून गेला आहे आणि दुसरा नेत्रही पिङ्‌गल वर्णाचा झाला आहे. यामुळे सदा स्थिर राहाणारे तुझे एकाक्ष पिङ्‌गली हे नाव चिरस्थायी होईल. याप्रकारे भगवान्‌ शंकारांशी मैत्री स्थापित करून त्यांची आज्ञा घेऊन मी घरी परत आलो आहे आणि तेव्हां मी तुझ्या पापपूर्ण निश्चयासंबंधीची गोष्ट ऐकली. ॥३०-३१ १/२॥
तदधर्मिष्ठसंयोगान् निवर्त कुलदूषणात् ॥ ३२ ॥

चिन्त्यते हि वधोपायः सर्षिसङ्‌घैः सुरैस्तव ।
म्हणून आता तू आपल्या कुळाला कलंक लावणार्‍या पापकर्माच्या संसर्गापासून दूर सर, कारण ऋषि-समुदायासहित देवता तुझ्या वधाच्या उपायासंबंधी विचार करीत आहेत. ॥३२ १/२॥
एवमुक्तो दशग्रीवः क्रुद्धसंरक्तलोचनः ॥ ३३ ॥

हस्तौ दन्तांश्च सम्पीष्य वाक्यमेतदुवाच ह ।
दूताच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून दशग्रीव रावणाचे नेत्र क्रोधाने लाल झाले. तो हात चोळत, दात-ओठ चावत बोलला - ॥३३ १/२॥
विज्ञातं ते मया दूत वाक्यं यत् त्वं प्रभाषसे ॥ ३४ ॥

नैव त्वमसि नैवासौ भ्रात्रा येनासि चोदितः ।
दूता ! तू जे सांगत आहेस त्याचा अभिप्राय मी समजलो आहे. आता तूही जिवंत राहू शकत नाहीस आणि ज्याने तुला येथे धाडले आहे तो माझा भाऊही जिवंत राहू शकत नाही. ॥३४ १/२॥
हितं नैष ममैतद्धि ब्रवीति धनरक्षकः ॥ ३५ ॥

महेश्वरसखित्वं तु मूढ श्रावयते किल ।
धनरक्षक कुबेराने जो संदेश दिला आहे तो माझ्यासाठी हितकर नाही. तो मूढ मला घाबरविण्यासाठी महादेवांशी आपली मैत्री झाल्याची कथा ऐकवीत आहे. ॥३५ १/२॥
नैवेदं क्षमणीयं मे यदेतद्‌ भाषितं त्वया ॥ ३६ ॥

यदेतावन्मया कालं दूत तस्य तु मर्षितम् ।
न हन्तव्यो गुरुर्ज्येष्ठो मयाऽयमिति मन्यते ॥ ३७ ॥
दूता ! तू जी गोष्ट सांगितली आहेस ती माझ्यासाठी सहन करण्यायोग्य नाही. कुबेर माझा मोठा भाऊ आहे म्हणून त्याचा वध करणे उचित नाही - असे समजूनच मी आजपर्यंत त्यांना क्षमा केली आहे. ॥३६-३७॥
तस्य त्विदानीं श्रुत्वा मे वाक्यमेषा कृता मतिः ।
त्रीँल्लोकानपि जेष्यामि बाहुवीर्यमुपाश्रितः ॥ ३८ ॥
परंतु या समयी त्यांचे वचन ऐकून मी हा निश्चय केला आहे की मी आपल्या बाहुबलाचा भरवसा धरून तीन्ही लोकांना जिंकीन. ॥३८॥
एतन्मुहूर्तमेवाहं तस्यैकस्य तु वै कृते ।
चतुरो लोकपालांस्तान् नयिष्यामि यमक्षयम् ॥ ३९ ॥
याच मुहूर्तामध्ये मी एकाच्याच अपराधासाठी त्या चारही लोकपालांना यमलोकात पोहोंचवून देईन. ॥३९॥
एवमुक्त्वा तु लङ्‌केशो दूतं खड्गेन जघ्निवान् ।
ददौ भक्षयितुं ह्येनं राक्षसानां दुरात्मनाम् ॥ ४० ॥
असे म्हणून लंकेश रावणाने तलवारीने त्या दूताचे दोन तुकडे करून टाकले आणि त्याचे प्रेत त्याने दुरात्मा राक्षसांना खाण्यासाठी देऊन टाकले. ॥४०॥
एवं कृतस्वस्त्ययनो रथमारुह्य रावणः ।
त्रैलोक्यविजयाकाङ्‌क्षी ययौ यत्र धनेश्वरः ॥ ४१ ॥
त्यानंतर स्वास्तिवाचन करून रावण रथावर चढला आणि तीन्ही लोकांवर विजय मिळविण्याच्या इच्छेने, जेथे धनपति कुबेर राहात होते त्या स्थानावर गेला. ॥४१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे त्रयोदशः सर्गः ॥ १३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा तेरावा सर्ग पूरा झाला. ॥१३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP