॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ युद्धकाण्ड ॥

॥ एकादशः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



राम-रावण-संग्राम आणि रावणाचा वध


इत्युक्‍त्वा वचनं प्रेम्णा राज्ञीं मन्दोदरीं तदा ।
रावणः प्रययौ योद्धुं रामेण सह संयुगे ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, अशा प्रकारे त्या वेळी महाराणी मंदोदरीला प्रेमपूर्वक सांगून, रावण रामांबरोबर युद्ध करण्यास रणभूमीकडे निघून गेला. (१)

दृढं स्यन्दनमास्थाय वृतो घोरैनिशाचरैः ।
चक्रैः षोडशभिर्युक्तं सवरूथं सकूबरम् ॥ २ ॥
पिशाचवदनैर्घोरैः खरैर्युक्तं भयावहम् ।
सर्वास्त्रशस्त्रसहितं सर्वोपस्करसंयुतम् ॥ ३ ॥
निश्चक्रामाथ सहसा रावणो भीषणाकृतिः ।
आयान्तं रावणं दृष्ट्वा भीषणं रणकर्कशम् ॥ ४ ॥
संत्रस्ताभूत्तदा सेना वानरी रामपालिता ॥ ५ ॥
भयंकर राक्षसांनी वेढलेला तो रावण एका बळकट रथावर चढला. सोळा चाकांनी युक्त असणाऱ्या त्या रथाला वरूथ आणि कूबर होते; पिशांचासारखी तोंडे असणारी भयानक गाढवे त्याला जोडली होती, तो रथ भय निर्माण करणारा होता; तो सर्व प्रकारच्या अस्त्रांनी आणि शस्त्रांनी सुसज्ज होता; तसेच अन्य प्रकारच्या सर्व युद्धसामग्रीने भरलेला होता. अशा रथात आरोहण करून भयानक रूप असणारा रावण त्वेषाने लंकेतून बाहेर पडला. रणांगणात कठोर असणारा भयानक रावण येत आहे, हे पाहून रामांनी रक्षिलेली ती वानरसेना तेव्हा अतिशय भयभीत झाली. (२-५)

हनूमानथ चोत्प्लुत्य रावणं योद्धुमाययौ ।
आगत्य हनुमान् रक्षो वक्षस्यतुलविक्रमः ॥ ६ ॥
मुष्टिबन्धं दृढं बद्‍ध्वा ताडयामास वेगतः ।
तेन मुष्टिप्रहारेण जानुभ्यामपतत् रथे ॥ ७ ॥
त्या वेळी हनुमान उडी मारून रावणाशी युद्ध करण्यास आला. आल्याबरोबर अतुलनीय पराक्रम असणाऱ्या हनुमानाने हाताची मूठ घट्ट आवळून वेगाने रावणाच्या वक्षःस्थळावर प्रहार केला. त्या मुष्टीच्या प्रहाराने रावण रथातच गुडघ्यांवर पडला. (६-७)

मूर्छितोऽथ मुहूर्तेन रावणः पुनरुत्थितः ।
उवाच च हनूमन्तं शूरोऽसि मम सम्मतः ॥ ८ ॥
नंतर मूर्च्छित झालेला रावण थोड्या वेळाने पुनः सावध होऊन उठला आणि हनुमंताला म्हणाला, "तू शूर आहेस, हे मला मान्य आहे." (८)

हनूमानाह तं धिङ्‌मां यस्त्वं जीवसि रावण ।
त्वं तावन्मुष्टिना वक्षो मम ताडय रावण ॥ ९ ॥
तेव्हा हनुमान त्याला म्हणाला, "अरे रावणा, माझा धिक्कार असो. कारण माझा मुष्टिप्रहार लागूनही तू जिवंत राहिला आहेस. आता हे रावणा, तू तुझ्या मुठीने माझ्या वक्षःस्थळावर प्रहार कर. (९)

पश्चान्मया हतः प्राणान् मोक्ष्यसे नात्र संशयः ।
तथेति मुष्टिना वक्षो रावणेनापि ताडितः ॥ १० ॥
त्यानं तर मी पुनः प्रहार केल्यावर तू प्राण सोडशील यात संशय नाही." "ठीक आहे," असे म्हणून रावणानेसुद्धा (हनुमानाच्या) छातीवर मुष्टीचा प्रहार केला. (१०)

विघूर्णमाननयनः किञ्चित् कश्मलमाययौ ।
संज्ञामवाप्य कपिराड् रावणं हन्तुमुद्यतः ॥ ११ ॥
रावणाचा ठोसा लागताच मारुतीचे डोळे गरगरू लागले आणि तो काही काळ बेशुद्ध पड्या. नंतर शुद्धीवर आल्यावर हनुमान रावणाला मारण्यास सिद्ध झाला. (११)

ततोऽन्यत्र गतो भीत्या रावणो राक्षसाधिपः ।
हनूमानङ्‌गदश्चैव नलो नीलस्तथैव च ॥ १२ ॥
चत्वारः समवेत्याग्रे दृष्ट्वा राक्षसपुङ्‌गवान् ।
अग्निवर्णं तथा सर्प-रोमाणं खड्‌गरोमकम् ॥ १३ ॥
तथा वृश्चिकरोमाणं निर्जघ्नुः क्रमशोऽसुरान् ।
चत्वारश्चतुरो हत्वा राक्षसान् भीमविक्रमान् ।
सिंहनादं पृथक् कृत्वा रामपार्श्वमुपागताः ॥ १४ ॥
तेव्हा राक्षसराज रावण भीतीने दुसरीकडे निघून गेला. तितक्यात हनुमान, अंगद, नल तसेच नील हे चौघेजण एकत्र आले. त्यांना आपल्यापुढे उभे असलेले अग्निवर्ण, सर्परोमा, खड्गरोमा तसेच वृश्चिकरोमा असे चार राक्षसश्रेष्ठ दिसले. तेव्हा त्या चार वानरवीरांनी महापराक्रमी असणाऱ्या त्या चार राक्षसांना क्रमाने ठार केले, आणि वेगवेगळे सिंहनाद करीत ते चौघे रामांजवळ आले. (१२-१४)

ततो क्रुद्धो दशग्रीवः सन्दश्य दशनच्छदम् ॥ १५ ॥
विवृत्य नयने क्रूरो राममेवान्वधावत ।
दशग्रीवो रथस्थस्तु रामं वज्रोपमैः शरैः ॥ १६ ॥
आजघान महाघोरैः धाराभिरिव तोयदः ।
रामस्य पुरतः सर्वान्वानरानपि विव्यथे ॥ १७ ॥
नंतर क्रूर रावण रागावला, आणि दातओठ खात डोळे वटारून तो रामांकडेच धावला. मेघ ज्या प्रमाणे महाभयंकर पाण्याच्या धारांनी तडाखे देतो, त्या प्रमाणे रथस्थ रावणाने वज्राप्रमाणे असणाऱ्या बाणांनी रामांवर प्रहार केले, आणि रामांच्यापुढे उभे असणाऱ्या सर्व वानरांनासुद्धा त्याने विद्ध केले. (१५-१७)

ततः पावकसङ्‌काशैः शरैः काञ्चनभूषणैः ।
अभ्यवर्षद् रणे रामो दशग्रीवं समाहितः ॥ १८ ॥
तेव्हा रामांनी अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि सोन्याने भूषित अशा बाणांनी रावणावर वर्षाव केला. (१८)

रथस्थं रावणं दृष्ट्वा भूमिष्ठं रघुनन्दनम् ।
आहूय मातलिं शक्रो वचनं चेदमब्रवीत् ॥ १९ ॥
रावण रथात बसलेला आहे आणि राम जमिनीवर उभे आहेत, हे पाहून इकडे स्वर्गात इंद्राने मातली नावाच्या सारख्याला बोलावून घेऊन सांगितले. (१९)

रथेन मम भूमिष्ठं शीघ्रं याहि रघूत्तमम् ।
त्वरितं भूतलं गत्वा कुरु कार्यं ममानघ ॥ २० ॥
"हे मातले, माझा रथ घेऊन तू ताबडतोब जमिनीवर उम्या असणाऱ्या रघूत्तमाकडे जा. झट्दिशी पृथ्वीतलावर जाऊन तू माझे हे काम कर." (२०)

एवमुक्तोऽथ तं नत्वा मातलिर्देवसारथिः ।
ततो हयैश्च संयोज्य हरितैः स्यन्दनोत्तमम् ॥ २१ ॥
स्वर्गाज्जयार्थं रामस्य ह्युपचक्राम मातलिः ।
प्राञ्जलिर्देवराजेन प्रेषितोऽस्मि रघूत्तम ॥ २२ ॥
इंद्राने असे सांगितल्यानंतर, त्याला नमस्कार करून, देवसारथी मातलीने आपल्या उत्तम रथाला हिरव्या रंगाचे घोडे जोडले आणि रामांच्या जयासाठी तो स्वर्गातून निघून रामांजवळ आला आणि श्रीरामामुळे हात जोडून उभे राहून तो म्हणाला, "हे रघूत्तमा, देवराज इंद्राने मला तुमच्याकडे पाठविले आहे. (२१-२२)

रथोऽयं देवराजस्य विजयाय तव प्रभो ।
प्रेषिताश्च महाराज धनुरैन्द्रं च भूषितम् ॥ २३ ॥
अभेद्यं कवचं खड्गं दिव्यतूणीयुगं तथा ।
आरुह्य च रथं राम रावणं जहि राक्षसम् ॥ २४ ॥
मया सारथिना देव वृत्रं देवपतिर्यथा ।
इत्युक्तस्तं परिक्रम्य नमस्कृत्य रथोत्तमम् ॥ २५ ॥
आरुरोह रथं रामो लोकाँल्लक्ष्म्या नियोजनम् ।
ततोऽभवन्महायुद्धं भैरवं रोमहर्षणम् ॥ २६ ॥
महात्मनो राघवस्य रावणस्य च धीमतः ।
आग्नेयेन च आग्नेयं दैवं दैवेन राघवः ॥ २७ ॥
अस्त्रं राक्षसराजस्य जघान परमास्त्रवित् ।
ततस्तु ससृजे घोरं राक्षसं चास्त्रमस्त्रवित् ।
क्रोधेन महताविष्टो रामस्योपरि रावणः ॥ २८ ॥
हे प्रभो, हा देवराज इंद्राचा रथ तुम्हांला विजय मिळावा म्हणून पाठविला आहे. तसेच हे महाराज, अतिशय शोभिवंत असे ऐंद्र धनुष्य, अभेद्य कवच, खड्‌ग आणि दिव्य भात्यांची जोडी हेही इंद्राने पाठविले आहेत. तेव्हा हे रामा, मी सारथी असताना ज्या प्रमाणे इंद्राने वृत्रासुराला ठार केले, त्या प्रमाणे तुम्ही या रथावर आरूढ होऊन राक्षस रावणाचा वध करा." मातलीने असे म्हटल्यावर, त्या उत्तम रथाला प्रदक्षिणा घालून व त्याला नमस्कार करून, लोकांना आनंद देत, राम त्या रथावर आरूढ झाले. त्यानंतर महात्मा राघव आणि बुद्धिमान रावण यांच्यामध्ये अतिशय भीषण व रोमांचकारी महायुद्ध सुरू झाले. त्या श्रेष्ठ अस्त्रवेत्या राघवाने रावणाच्या आग्नेयास्त्राला आग्नेयास्त्राने आणि दैवास्त्राअला दैवास्त्राने तोडून टाकले. तेव्हा अतिशय क्रोधाने पछाडलेल्या त्या अस्त्रवेत्या रावणाने रामांवर एक भयानक राक्षस-अस्त्र सोडले. (२३-२८)

रावणस्य धनुर्मुक्ताः सर्पा भूत्वा महाविषाः ।
शराः काञ्चनपुङ्‌खाभा राघवं परितोऽपतन् ॥ २९ ॥
ज्यांचे पुंख (मागील भाग) सोन्याप्रमाणे चमकत होते, असे रावणाच्या धनुष्यातून सुटलेले बाण भयंकर विष असणारे साप होऊन, रामांच्या सर्व बाजूंना पडू लागले. (२९)

तैः शरैः सर्पवदनैः वमद्‌भिः अनलं मुखैः ।
दिशश्च विदिशश्चैव व्याप्तास्तत्र तदाभवन् ॥ ३० ॥
त्या वेळी तोंडातून आग ओकणाऱ्या त्या सर्पमुखी बाणांनी तेथे सर्व दिशा- उपदिशा व्यापून गेल्या. (३०)

रामः सर्पांस्ततो दृष्ट्वा समन्तात् परिपूरितान् ।
सौपर्णमस्त्रं तद्‍घोरं पुरः प्रावर्तयत् रणे ॥ ३१ ॥
तेव्हा सर्व बाजू या सापांनी भरून गेल्या आहेत, हे पाहिल्यावर रामांनी रणांगणावर पुढील बाजूस भयानक गरुड अस्त्र सोडले. (३१)

रामेण मुक्तास्ते बाणा भूत्वा गरुडरूपिणः ।
चिच्छिदुः सर्पबाणांस्तान् समन्तात्सर्पशत्रवः ॥ ३२ ॥
रामांनी सोडलेले आणि सापांचे शत्रू असणारे ते बाण गरुड रूप धारण करून सर्वत्र भरून गेलेल्या त्या सर्पबाणांना तोडून टाकू लागले. (३२)

अस्त्रे प्रतिहते युद्धे रामेण दशकन्धरः ।
अभ्यवर्षत्ततो रामं घोराभिः शरवृष्टिभिः ॥ ३३ ॥
अशा प्रकारे युद्धामध्ये आपले अस्त्र रामांकडून निरुपयोगी झालेले पाहिल्यानंतर रावणाने रामांवर भयानक शरवृष्टी केली. (३३)

ततः पुनः शरानीकै राममक्लिष्टकारिणम् ।
अर्दयित्वा रथोपस्थे रथकेतुं च काञ्चनम् ॥ ३४ ॥
त्या शरवृष्टीचा विनासायास प्रतिकार करणाऱ्या रामांना नंतर पुन्हा शरांच्या समूहांनी पीडा देऊन रावणाने मातलीला घायाळ केले. (३४)

पातयित्वा रथोपस्थे रथकेतुं च काञ्चनम्
ऐन्द्रानश्वानभ्यहनत् रावणः क्रोधमूर्छितः ॥ ३५ ॥
तसेच क्रोधाने बेभान झालेल्या रावणाने रामांच्या रथावरील सुवर्णध्वज तोडून टाकून तो रथाच्या मागील बाजूस पाडला आणि इंद्राच्या घोड्यांना जर्जर केले. (३५)

विषेदुर्देवगन्धर्वाः चारणाः पितरस्तथा ।
आर्त्ताकारं हरिं दृष्ट्वा व्यथिताश्च महर्षयः ॥ ३६ ॥
रामांना व्यथित झालेले पाहून देव, गंधर्व, चारण तसेच पितर आणि महर्षी दु खी झाले. (३६)

व्यथिता वानरेन्द्राश्च बभूवुः सविभीषणाः ।
दशास्यो विंशतिभुजः प्रगृहीतशरासनः ॥ ३७ ॥
ददृशे रावणस्तत्र मैनाक इव पर्वतः ।
रामस्तु भ्रुकुटिं बद्‍ध्वा क्रोधसंरक्तलोचनः ॥ ३८ ॥
कोपं चकार सदृशं निर्दहन्निव राक्षसम् ।
धनुरादाय देवेन्द्र धनुराकारमद्‌भुतम् ॥ ३९ ॥
गृहीत्वा पाणिना बाणं कालानलसमप्रभम् ।
निर्दहन्निव चक्षुर्भ्यां ददृशे रिपुमन्तिके ॥ ४० ॥
तसेच बिभीषणासकट सर्व वानरश्रेष्ठ व्यथित झाले. त्या वेळी दहा तोंडे, वीस बाहू असणारा आणि हातात धनुष्य बाण घेऊन बसलेला रावण तेथे मैनाक पर्वताप्रमाणे दिसत होता. रागाने डोळे लाल झालेल्या रामांनी आपल्या भुवया चढविल्या आणि राक्षस रावणाला जणू जाळून टाकेल असा क्रोध धारण केला. नंतर इंद्राच्या धनुष्याच्या आकाराचे दुसरे एक अद्‌भुत धनुष्य घेऊन आणि कालाग्रीप्रमाणे प्रभा असणारा एक बाण हातात घेऊन, जवळ असणाऱ्या शत्रूला जणू डोळ्यांनीच जाळीत रामांनी रावणाकडे पाहिले. (३७-४०)

पराक्रमं दर्शयितुं तेजसा प्रज्वलन्निव ।
प्रचक्रमे कालरूपी सर्वलोकस्य पश्यतः ॥ ४१ ॥
त्यानंतर सर्व लोकांच्या देखत तेजाने जणू प्रज्वलित झालेल्या अशा त्या कालरूपी रामांनी आपला पराक्रम दाखविण्यास प्रारंभ केला. (४१)

विकृष्य चापं रामस्तु रावणं प्रतिविध्य च ।
हर्षयन् वानरानीकं कालान्तक इवाबभौ ॥ ४२ ॥
धनुष्याची दोरी खेचून रामांनी रावणाला विद्ध केले. त्या वेळी वानरसैन्याला आनंदित करणारे श्रीराम कालांतकासारखे शोधू लागले. (४२)

क्रुद्धं रामस्य वदनं दृष्ट्वा शत्रुं प्रधावतः ।
तत्रसुः सर्वभूतानि चचाल च वसुन्धरा ॥ ४३ ॥
शत्रूवर चाल करून जाणाऱ्या रामांचे रागावलेले मुख पाहून सर्व प्राणी भयाने त्रस्त झाले आणि पृथ्वी कंप पावू लागली. (४३)

रामं दृष्ट्वा महारौद्रं उत्पातांश्च सुदारुणान् ।
त्रस्तानि सर्वभूतानि रावणं चाविशद्‌भयम् ॥ ४४ ॥
अती रौद्ररूप धारण केलेल्या रामांना पाहून तसेच त्या वेळी होणारे अतिशय दारूण उत्पात पाहून सर्व प्राणी त्रस्त झाले आणि रावणाचे मन भयभीत झाले. (४४)

विमानस्था सुरगणाः सिद्धगन्धर्वकिन्नराः ।
ददृशुः सुमहायुद्धं लोकसंवर्तकोपमम् ।
ऐन्द्रमस्त्रं समादाय रावणस्य शिरोऽच्छिनत् ॥ ४५ ॥
त्या वेळी विमानांत बसून देवांचे समूह सिद्ध, गंधर्व, किन्नर हे जगाच्या प्रलयासारखे ते राम- रावणांचे फार प्रचंड युद्ध पाहात होते. रामांनी ऐंद्र अस्त्र सोडून रावणाचे शिर तोडून टाकले. (४५)

मूर्धानो रावणस्याथ बहवो रुधिरोक्षिताः ।
गगनात् प्रपतन्ति स्म तालादिव फलानि हि ॥ ४६ ॥
तेव्हा ज्या प्रमाणे एखाद्या तालवृक्षावरून फळे खाली पडावीत त्या प्रमाणे रक्ताने बरबटलेली रावणाची मस्तके आकाशातून खाली पडली. (४६)

न दिनं न च वै रात्रिः न सन्ध्यां न दिशोऽपि वा ।
प्रकाशन्ते न तद्‌रूपं दृश्यते तत्र सङ्‌गरे ॥ ४७ ॥
त्या वेळी ना दिवस, ना रात्र, ना संध्याकाळ, ना दिशा काहीच कळेनासे झाले. रणांगणावर त्या रावणाचे रूपही नीट दिसेनासे झाले. (असे कित्येक दिवस चालू राहिले.) (४७)

ततो रामो बभूवाथ विस्मयाविष्टमानसः ।
शतमेकोत्तरं छिन्नं शिरसां चैकवर्चसाम् ॥ ४८ ॥
तेव्हा मात्र रामांचे मन विस्मयाने भरून गेले. ते स्वतःशी म्हणाले, 'समान तेज असणारी रावणाची एकशे एक शिरे मी तोडून टाकली. (४८)

न चैव रावणः शान्तो दृश्यते जीवितक्षयात् ।
ततः सर्वास्त्रविद्धिरः कौसल्यानन्दवर्धनः ॥ ४९ ॥
अस्त्रैश्च बहुभिर्युक्तः चिन्तयामास राघवः ।
यैर्यैर्बाणैर्हता दैत्या महासत्त्वपराक्रमाः ॥ ५० ॥
ते एते निष्फलं याता रावणस्य निपातने ।
इति चिन्ताकुले रामे समीपस्थो विभीषणः ॥ ५१ ॥
उवाच राघवं वाक्यं ब्रह्मदत्तवरो ह्यसौ ।
विच्छिन्ना बाहवोऽप्यस्य विच्छिन्ननि शिरांसि च ॥ ५२ ॥
उत्पत्स्यन्ति पुनः शीघ्रं इत्याह भगवानजः ।
नाभिदेशेऽमृतं तस्य कुण्डलाकारसंस्थितम् ॥ ५३ ॥
तरीसुद्धा प्राणनाश होऊन हा रावण मृत झालेला दिसत नाही.' त्या वेळी सर्व अस्त्रे जाणणारे, धीर कौसल्यानंदन राम पुष्कळ अस्त्रांनी युक्त असूनही विचार करू लागले की, ज्या ज्या माझ्या बाणांनी प्रचंड सामर्थ्य व पराक्रम असणारे दैत्य मारले गेले होते, ते सर्व बाण रावणाचा वध करण्यास कसे निष्फळ ठरले ? अशा प्रकारे राम चिंताकुल झाले असताना जवळच असणारा बिभीषण रामांना म्हणाला की, "ब्रह्मदेवाने या रावणाला एक वर दिला आहेः जरी याचे बाहू तोडले गेले आणि जरी याची मस्तके तोडली गेली तरी तीच चटदिशी पुनः उत्पन्न होतील, त्याचे कारण असे की त्या रावणाच्या नाभिप्रदेशात अमृत- कलश ठेवलेला आहे. (४९-५३)

तच्छोषय अनलास्त्रेन तस्य मृत्युस्ततो भवेत् ।
विभीषणवचः श्रुत्वा रामः शीघ्रपराक्रमः ॥ ५४ ॥
पावकास्त्रेण संयोज्य नाभिं विव्याध रक्षसः ।
अनन्तरं च चिच्छेद शिरांसि च महाबलः ॥ ५५ ॥
बाहूनपि च संरब्धो रावणस्य रघूत्तमः ।
ततो घोरां महाशक्तिं आदाय दशकन्धरः ॥ ५६ ॥
विभीषणवधार्थाय चिक्षेप क्रोधविह्वलः ।
चिच्छेद राघवो बाणैः तां शितैर्हेमभूषितैः ॥ ५७ ॥
आग्नेय अस्त्राने ते अमृत तुम्ही शुष्क करा. तरच त्याचा मृत्यू होईल." बिभीषणाचे वचन ऐकल्यावर, शीघ्र पराक्रमी रामांनी आपल्या धनुष्यावर अग्नी-अस्त्राची योजना करून त्या राक्षसाची नाभी विद्ध केली आणि त्यानंतर क्षुब्ध झालेल्या महाबलवान रघूत्तमांनी रावणाची शिरे तोडली. तसेच बाहूसुद्धा तोडून टाकले. (तरी रावणाचे एक मुख शिल्लक राहिले होते.) तेव्हा क्रोधाने संतप्त झालेल्या रावणाने एक महाभयंकर महाशक्ती घेतली आणि बिभीषणाचा वध करण्यास ती फेकली. तेव्हा राघवांनी सुवर्णमंडित तीक्ष्ण बाणांनी ती शक्ती तोडून टाकली. (५४-५७)

दशग्रीवशिरच्छेदात् तदा तेजोविनिर्गतम् ।
म्लानरूपो बभूवाथ छिन्नैः शीर्षैर्भयङ्‌करैः ॥ ५८ ॥
त्या वेळी रावणाची मस्तके तुटून गेल्यामुळे त्याचे तेज निघून गेले होते आणि त्यामुळे ती शिरे तुटल्यामुळे तो विद्रूप झाला होता. (५८)

एकेन मुख्यशिरसा बाहुभ्यां रावणौ बभौ ।
रावणस्तु पुनः क्रुद्धो नानाशस्त्रास्त्रवृष्टिभिः ॥ ५९ ॥
ववर्ष रामं तं रामः तथा बाणैर्ववर्ष च ।
ततो युद्धं अभूद्‍घोरं तुमुलं लोमहर्षणम् ॥ ६० ॥
तेव्हा रावणाचे एक मुख्य मस्तक आणि दोन बाहू राहिले. त्यानंतर पुनः रागावून रावणाने नाना प्रकारच्या शस्त्र आणि अस्त्र यांचा रामांवर वर्षाव केला. रामांनीसुद्धा त्या प्रमाणेच रावणावर बाणांचा वर्षाव केला. अशा प्रकारे त्यानंतर पुनः त्या दोघांचे तुंबळ रोमांचकारी युद्ध सुरू झाले. (५९-६०)

अथ संस्मारयामास मातली राघवं तदा ।
विसृजास्त्रं वधायास्य ब्राह्मं शीघ्रं रघूत्तम ॥ ६१ ॥
त्या वेळी मातलीने राघवांना स्मरण करून दिले. तो म्हणाला, "हे रघूतमा, या रावणाच्या वधासाठी शीघ ब्रह्मास्त्र सोडा. (६१)

विनाशकालः प्रथितो यः सुरैः सोऽद्य वर्तते ।
उत्तमाङ्‌गं न चैतस्य छेत्तव्यं राघव त्वया ॥ ६२ ॥
नैव शीर्ष्णि प्रभो वध्यो वध्य एव हि मर्मणि ।
ततः संस्मारितो रामः तेन वाक्येन मातलेः ॥ ६३ ॥
जग्राह स शरं दीप्तं निःश्वसंतं इवोरगम् ।
यस्य पार्श्वे तु पवनः फले भास्करपावकौ ॥ ६४ ॥
शरीरमाकाशमयं गौरवे मेरुमन्दरौ ।
पर्वस्वपि च विन्यस्ता लोकपाला महौजसः ॥ ६५ ॥
जाज्वल्यमानं वपुषा भातं भास्करवर्चसा ।
तमुग्रमस्त्रं लोकानां भयनाशनमद्‌भुतम् ॥ ६६ ॥
अभिमंत्र्य ततो रामः तं महेषुं महाभुजः ।
वेदप्रोक्तेन विधिना सन्दधे कार्मुके बली ॥ ६७ ॥
या रावणाच्या विनाशाचा जो काळ देवांनी निश्चित केला आहे, तो आज आत्ता आलेला आहे. हे राघवा, या रावणाचे मस्तक तुम्ही तोडू नका; कारण, हे प्रभो, मस्तक तोडल्याने हा मरणार नाही, तर याच्या मर्मावर आघात केल्यामुळे हा मरणार आहे." अशा प्रकारे मातलीच्या वाक्याने स्मरण करून दिल्यावर रामांनी फुत्कार टाकणाऱ्या सापाप्रमाणे असणारा एक तेजस्वी बाण घेतला. त्या बाणाच्या पार्श्वभागी वायू होता, त्याच्या फाळावर (पुढील भागी) सूर्य आणि अग्नी होते; जडपणात तो मेरू व मंदार होता; त्याच्या पर्व- भागावर महातेजस्वी लोकपाल ठेवलेले होते, त्याचे शरीर आकाशमय होते; त्याचे शरीर देदीप्यमान असून तो सूर्याप्रमाणे तेजस्वी होता आणि मग लोकांची भीती नष्ट करणारे ते भयंकर अस्त्र महाबाहू रामांनी वेदोक्त विधीने अभिमंत्रित करून धनुष्याला जोडले. (६२-६७)

तस्मिन्सन्धीयमाने तु राघवेण शरोत्तमे ।
सर्वभूतानि वित्रेसुः चचाल च वसुन्धरा ॥ ६८ ॥
जेव्हा राम तो उत्तम बाण जोडत होते, तेव्हा सर्व प्राणी संत्रस्त झाले आणि पृथ्वी कंप पावू लागली. (६८)

स रावणाय सङ्‌क्रुद्धो भृशमानम्य कार्मुकम् ।
चिक्षेप परमायत्तः तमस्त्रं मर्मघातिनम् ॥ ६९ ॥
त्यानंतर रागावलेल्या रामांनी आपले धनुष्य खूप वाकविले आणि अतिशय काळजीपूर्वक मर्माचा घात करणारे ते अस्त्र रावणावर सोडले. (६९)

स वज्र एव दुर्धर्षो वज्रपाणिविसर्जितः ।
कृतान्त इव घोरास्यो न्यपतत् रावणोरसि ॥ ७० ॥
आणि इंद्राने सोडलेल्या बद्धाप्रमाणे अतिशय असह्य असणारा आणि कृतांतकालाप्रमाणे भयंकर मुख असणारा तो बाण रावणाच्या वक्षः स्थळावर पडला. (७०)

स निमग्नो महाघोरः शरीरान्तकरः परः ।
बिभेद हृदयं तूर्णं रावणस्य महात्मनः ॥ ७१ ॥
शरीराचा नाश करणारा, अतिशय महाभयंकर असा तो बाण रावणाच्या हृदयात घुसला आणि त्याने तत्काळ महासमर्थ रावणाचे हृदय फाडून टाकले. (७१)

रावणस्याहरत्प्राणान् विवेश धरणितले ।
स शरो रावणं हत्वा रामतूणीरमाविशत् ॥ ७२ ॥
त्या बाणाने रावणाचे प्राण हरण केले आणि तो पृथ्वीतलात घुसला. नंतर रावणाचा वध करून तो बाण पुनः परत रामांच्या भात्यात येऊन स्थिर झाला. (७२)

तस्य हस्तात्पपाताशु सशरं कार्मुकं महत् ।
गतासुर्भ्रमिवेगेन राक्षसेन्द्रोऽपतद्‌भुवि ॥ ७३ ॥
(रामांचा बाण लागल्यानंतर) रावणाच्या हातातून बाणासकट भलेमोठे धनुष्य लगेच खाली पडले आणि तो भोवळ येऊन वेगाने गतप्राण होऊन जमिनीवर पडला. (७३)

तं दृष्ट्वा पतितं भूमौ हतशेषाश्च राक्षसाः ।
हतनाथा भयत्रस्ता दुद्रुवुः सर्वतोदिशम् ॥ ७४ ॥
त्याला जमिनीवर पडलेला पाहून, उरलेले राक्षस स्वामी मेल्याने अनाथ होऊन भयभीत झाले आणि सर्व दिशांना पळून गेले. (७४)

दशग्रीवस्य निधनं विजयं राघवस्य च ।
ततो विनेदुः संहृष्टा वानरा जितकाशिनः ॥ ७५ ॥
वदन्तो रामविजयं रावणस्य च तद्वधम् ।
अथान्तरिक्षे व्यनदत् सौम्यस्त्रिदशदुन्दुभिः ॥ ७६ ॥
तेव्हा आनंदित झालेले जयशाली वानर 'रामांचा विजय झाला आणि रावणाचा वध झाला' असे शब्द उच्चारीत मोठा घोष करू लागले. तितक्यात अंतरिक्षामध्ये देवांच्या दुंदुभीचा गंभीर नाद होऊ लागला. (७५-७६)

पपात पुष्पवृष्टिश्च समन्ताद् राघवोपरि ।
तुष्टुवुर्मुनयः सिद्धाः चारणाश्च दिवौकसः ॥ ७७ ॥
सर्व बाजूंनी राघवांवर पुष्पांची वृष्टी होऊ लागली. मुनी, सिद्ध, चारण आणि स्वर्गात राहाणारे देव रामांची स्तुती करू लागले. (७७)

अथान्तरिक्षे ननृतुः सर्वतोऽप्सरो मुदा ।
रावणस्य च देहोत्थं ज्योतिरादित्यवत्स्फुरत् ॥ ७८ ॥
प्रविवेश रघुश्रेष्ठं देवानां पश्यतां सताम् ।
देवा ऊचुरहो भाग्यं रावणस्य महात्मनः ॥ ७९ ॥
वयं तु सात्त्विका देवा विष्णोः कारुण्यभाजनाः ।
भयदुःखादिभिर्व्याप्ताः संसाते परिवर्तिनः ॥ ८० ॥
अयं तु राक्षसः क्रूरो ब्रह्महातीव तामसः ।
परदारारतो विष्णु-द्वेषी तापसहिंसकः ॥ ८१ ॥
त्याच वेळी आकाशात सर्वत्र अप्सरा आनंदाने नाचू लागल्या. इकडे सूर्याप्रमाणे चमकणारी एक तेजस्वी ज्योत रावणाच्या देहातून बाहेर पडून ती सर्व देवांच्या देखत श्रीरामांत प्रविष्ट झाली. ते पाहून देव म्हणू लागले, "या महात्म्या रावणाचे काय मोठे भाग्य आहे हो- ! विष्णूच्या दयेला पात्र असणारे आम्ही सात्त्विक देव भय, दुःख इत्यादींनी व्याप्त होऊन, या संसारात फिरत असतो. या उलट हा रावण राक्षस, क्रूर, ब्रह्मघाती, अतिशय तामस स्वभावाचा, परस्त्रीच्या ठिकाणी रत, विष्णूचा द्वेष करणारा, आणि तापसांची हिंसा करणारा होता. (७८-८१)

पश्यत्सु सर्वभूतेषु राममेव प्रविष्टवान् ।
एवं ब्रुवत्सु देवेषु नारदः प्राह सुस्मितः ॥ ८२ ॥
असे असूनही सर्व प्राण्यांच्या देखत तो रामांमध्ये प्रविष्ट झाला." देव अशा प्रकारे बोलत असताना, हसत हसत नारद म्हणाले. (८२)

शृणुतात्र सुरा यूयं धर्मतत्त्वविचक्षणाः ।
रावणो राघवद्वेषाद् अनिशं हृदि भावयन् ॥ ८३ ॥
भृत्यैः सह सदा राम-चरितं द्वेषसंयुतः ।
श्रुत्वा रामात्स्वनिधनं भयात्सर्वत्र राघवम् ॥ ८४ ॥
पश्यन् अनुदिनं स्वप्ने राममेवानुपश्यति ।
क्रोधोऽपि रावणस्याशु गुरुबोधाधिकोऽभवत् ॥ ८५ ॥
"हे देवांनो, तुम्ही धर्माचे तत्त्व जाणणारे आहात. तर ऐका. द्वेषामुळे हा रावण रात्रंदिवस आपल्या मनात रामांचे चिंतन करीत असे. द्वेषाने युक्त असणारा तो सतत सेवकांकडून रामांचे चरित्र ऐकत असे. रामांचे हातून आपले मरण आहे हे ऐकल्यावर, भीतीमुळे सर्वत्र आणि स्वप्नातसुद्धा दररोज रामांनाच पाहात असे. अशा प्रकारे रावणाचा द्वेषसुद्धा त्याला गुरूच्या उपदेशापेक्षा अधिक उपयोगी पडला. (८३-८५)

रामेण निहतश्चान्ते निर्धूताशेषकल्मषः ।
रामसायुज्यमेवाप रावणो मुक्तबन्धनः ॥ ८६ ॥
शेवटी रावण हा रामांकडून ठार मारला गेला. त्याची सर्व पापे धुऊन गेली. तो बंधनातून सुटला आणि त्याला रामांच्या ठिकाणी सायुज्य मुक्तीच प्राप्त झाली. (८६)

पापिष्ठो वा दुरात्मा परधनपरदारेषु सक्तो यदि स्यात्-
नित्यं स्नेहाद्‌भयाद्वा रघुकुलतिलकं भावयन् संपरेतः ।
भूत्वा शुद्धातरङ्‌गो भवशतजनितानेकदोषैर्विमुक्तः
सद्यो रामस्य विष्णोः सुरवरविनुतं याति वैकुण्ठमाद्यम् ॥ ८७ ॥
एखादा माणूस जरी जास्तीत जास्त पापी, दुष्ट मनाचा, परधन आणि परस्त्री यांचे ठिकाणी रत असूनही, जर तो प्रेमाने किंवा भयाने नित्य रामांचे चिंतन करीत मरण पावला तर तो शुद्ध अंतःकरणाचा होऊन, पूर्वीच्या शेकडो जन्मात उत्पन्न झालेल्या अनेक दोषांतून मुक्त होतो आणि तो तत्काळ देवश्रेष्ठांनी स्तुती केलेल्या अशा विष्णूरूपी रामांच्या वैकुंठ नावाच्या आद्यस्थानी जाऊन पोचतो. (८७)

हत्वा युद्धे दशास्यं त्रिभुवनविषमं वामहस्तेन चापं
भुमौ विष्टभ्य तिष्ठन् इतरकरधृतं भ्रामयन्बाणमेकम् ।
आरक्तोपान्तनेत्रः शरदलितवपुः सूर्यकोटिप्रकाशो
वीरश्रीबन्धुराङ्‌गस्त्रिदशपतिनुतः पातु मां वीररामः ॥ ८८ ॥
तिन्ही जगांना कंटकभूत अशा रावणाचा युद्धात वध केल्यावर जे श्रीराम डाव्या हाताने धरलेले धनुष्य जमिनीवर टेकवून उभे आहेत आणि उजव्या हातात धरलेला एक बाण फिरवीत आहेत, ज्यांच्या डोळ्यांच्या कडा लाल आहेत, ज्यांचे शरीर बाणांनी जखमी झाले आहे, ज्यांची अंगकांती ही कोटी सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे, ज्यांचे शरीर वीरश्रीमुळे सुंदर दिसत आहे आणि जे इंद्रादी देवतांकडून स्तविले जात आहेत, असे ते वीर राम माझे रक्षण करोत." (८८)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
युद्धकाण्डे एकादशः सर्गः ॥ ११ ॥
इति श्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे एकादशः सर्गः ॥ ११ ॥


GO TOP