[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। त्र्यधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामादीनां विलापः, तैः पित्रे जलाञ्जलिदानं पिण्डदानं रोदनं च -
श्रीराम आदिंचा विलाप, पित्यासाठी जलांजली दान, पिण्डदान आणि रोदन -
तां श्रुत्वा करुणां वाचं पितुर्मरणसंहिताम् ।
राघवो भरतेनोक्तां बभूव गतचेतनः ॥ १ ॥
भरतांनी सांगितलेली पित्याच्या मृत्युशी संबंधित करणाजनक हकिकत ऐकल्यावर राघव श्रीराम दुःखामुळे चेतनारहित झाले. ॥ १ ॥
तं तु वज्रमिवोत्सृष्टमाहवे दानवारिणा ।
वाग्वज्रं भरतेनोक्तममनोज्ञं परंतपः ॥ २ ॥

प्रगृह्य रामो बाहू वै पुष्पिताङ्‌ग इव द्रुमः ।
वने परशुना कृत्तस्तथा भुवि पपात ह ॥ ३ ॥
भरतांच्या मुखातून निघालेले ते वचन त्यांना जणु दानवशत्रु इंद्रांनी युद्धात वज्राचा प्रहार करावा त्याप्रमाणे लागले. मनाला अप्रिय वाटणारे ते वाग्‌वज्र ऐकून परंतप रामांनी दोन्ही भुजा वर उचलून, एखाद्या फुलानी डंवरलेल्या फांद्यांनी युक्त असलेल्या वृक्षाला वनात कुर्‍हाडीने कुणी तोडला असतां तो जसा जमिनीवर कोसळतो त्याचप्रमाणे पृथ्वीवर कोसळले. (भरताच्या दर्शनाने रामांना हर्ष झाला होता. पित्याच्या मृत्यूच्या समाचाराने दुःख झाले म्हणून इथे प्रफुल्लित आणि तोडलेल्या वृक्षाची उपमा दिली आहे). ॥ २-३ ॥
तथा हि पतितं रामं जगत्यां जगतीपतिम् ।
कूलघातपरिश्रान्तं प्रसुप्तमिव कुञ्जरम् ॥ ४ ॥

भ्रातरस्ते महेष्वासं सर्वतः शोककर्शितम् ।
रुदन्तः सह वैदेह्या सिषिचुः सलिलेन वै ॥ ५ ॥
पृथ्वीपति राम याप्रकारे पृथ्वीवर पडल्यावर, नदीच्या तटाला दातांनी विदीर्ण करण्याच्या परिश्रमाने थकून पृथ्वीवर झोपलेल्या हत्ती समान प्रतीत होत होते. शोकामुळे दुर्बल झालेल्या त्या महाधनुर्धर श्रीरामांना सर्व बाजूनी घेरून सीतेसहित रडत असणारे ते तिन्ही भाऊ अश्रुंच्या जलाने भिजवून टाकू लागले. ॥ ४-५ ॥
स तु संज्ञां पुनर्लब्ध्वा नेत्राभ्यामश्रुमुत्सृजन् ।
उपाक्रामत काकुत्स्थः कृपणं बहु भाषितुम् ॥ ६ ॥
थोड्या वेळानंतर परत शुद्धीवर आल्यावर नेत्रांनी अश्रुंची वृष्टि करीत काकुत्स्थ श्रीरामांनी अत्यंत दीन वाणीने विलाप करण्यास आरंभ केला. ॥ ६ ॥
स रामः स्वर्गतं श्रुत्वा पितरं पृथिवीपतिम् ।
उवाच भरतं वाक्यं धर्मात्मा धर्मसंहितम् ॥ ७ ॥
पृथ्वीपति दशरथ महाराज स्वर्गवासी झाल्याचे ऐकून धर्मात्मा रामांनी भरतास ही धर्मयुक्त गोष्ट सांगितली - ॥ ७ ॥
किं करिष्याम्ययोध्यायां ताते दिष्टां गतिं गते ।
कस्तां राजवराद्धीनामयोध्यां पालयिष्यति ॥ ८ ॥
’बंधु ! जर पिता परलोकवासी झाले आहेत तर अयोध्येत येऊन आता मी काय करू ? त्या राजशिरोमणि पित्याच्या विरहित झालेल्या त्या अयोध्येचे आता कोण पालन करील ? ॥ ८ ॥
किं नु तस्य मया कार्यं दुर्जातेन महात्मनः ।
यो मृतो मम शोकेन स मया न च संस्कृतः ॥ ९ ॥
’हाय ! जे माझे वडील माझ्याच शोकामुळे मरण पावले आहेत त्यांचा दाह-संस्कार सुद्धा मी करू शकलो नाही. माझ्या सारख्या व्यर्थ जन्म घेतलेल्या पुत्रामुळे त्या महात्मा पित्याचे कोणते कार्य सिद्ध झाले आहे ? ॥ ९ ॥
अहो भरत सिद्धार्थो येन राजा त्वयाऽनघ ।
शत्रुघ्नेन च सर्वेषु प्रेतकृत्येषु सत्कृतः ॥ १० ॥
’निष्पाप भरत ! तुम्ही कृतार्थ आहात. तुमचे अहो भाग्य आहे, ज्यामुळे तुम्ही आणि शत्रुघ्नांनी सर्व प्रेतकार्यांत (पारलौकिक कृत्यामध्ये) संस्कार कर्माच्या द्वारे महाराजांचे पूजन केले आहे. ॥ १० ॥
निष्प्रधानामनेकाग्रां नरेन्द्रेण विना कृताम् ।
निवृत्तवनवासोऽपि नायोध्यां गन्तुमुत्सहे ॥ ११ ॥
’महाराज दशरथाशिवाय (हीन झालेली) अयोध्या आता प्रधान शासकरहित होऊन अस्वस्थ आणि व्याकुळ होऊन गेली आहे. म्हणून वनवासांतून परतल्यावरही माझ्या मनात अयोध्येस जाण्याचा उत्साह राहिलेला नाही. ॥ ११ ॥
समाप्तवनवासं मामयोध्यायां परंतप ।
कोऽनुशासिष्यति पुनस्ताते लोकान्तरं गते ॥ १२ ॥
परंतप भरता ! वनवासाचा अवधि समाप्त करून जरी मी अयोध्येत जाईन तरी मला कोण माझ्या कर्तव्याचा उपदेश देईल (कारण पिता तर परलोकवासी झाले आहेत). ॥ १२ ॥
पुरा प्रेक्ष्य सुवृत्तं मां पिता यान्याह सान्त्वयन् ।
वाक्यानि तानि श्रोष्यामि कुतः कर्ण सुखान्यहम् ॥ १३ ॥
’पूर्वी मी जेव्हां त्यांच्या कुठल्याही आज्ञेचे पालन करीत असे तेव्हां ते माझा सद्‌व्यवहार पाहून माझा उत्साह वाढविण्यासाठी ज्या ज्या गोष्टी बोलत असत, कानांना सुख पोहोंचविण्यार्‍या त्या गोष्टी मी आता कुणाच्या मुखाने ऐकेन !’॥ १३ ॥
एवमुक्त्वाथ भरतं भार्यामभ्येत्य राघवः ।
उवाच शोकसंतप्तः पूर्णचन्द्रनिभाननाम् ॥ १४ ॥
भरताला असे म्हणून शोकसंतप्त राघव पूर्ण चंद्रासारखे मनोहर मुख असणार्‍या आपल्या पत्‍नीजवळ जाऊन म्हणाले - ॥ १४ ॥
सीते मृतस्ते श्वशुरः पितृहीनोऽसि लक्ष्मण ।
भरतो दुःखमाचष्टे स्वर्गतिं पृथिवीपतेः ॥ १५ ॥
सीते ! तुझे श्वशुर मृत झाले आहेत ! लक्ष्मणा ! तू पितृहीन झाला आहेस ! भरत पृथ्वीपति दशरथ महाराजांच्या स्वर्गलोकाचा दुःखदायक समाचार ऐकवित आहेत. ॥ १५ ॥
ततो बहुगुणं तेषां बाष्पं नेत्रेष्वजायत ।
तथा ब्रुवति काकुत्स्थे कुमाराणां यशस्विनाम् ॥ १६ ॥
काकुत्स्थ श्रीरामांनी असे म्हटल्यावर त्या सर्व यशस्वी कुमारांच्या नेत्रांतून खूपच अश्रु दाटून आले. ॥ १६ ॥
ततस्ते भ्रातरः सर्वे भृशमाश्वास्य दुःखितम् ।
अब्रुवञ्जगतीभर्तुः क्रियतामुदकं पितुः ॥ १७ ॥
त्यानंतर सर्व भावांनी दुःखी झालेल्या श्रीरामांना सांत्वना देत म्हटले - "बंधो ! आता पृथ्वीपति पित्यासाठी जलांजलीचे दान द्यावे." ॥ १७ ॥
सा सीता स्वर्गतं श्रुत्वा श्वशुरं तं महानृपम् ।
नेत्राभ्यामश्रुपूर्णाभ्यां न शशाकेक्षितुं प्रियम् ॥ १८ ॥
आपले श्वशुर महाराज दशरथ यांच्या स्वर्गवासाचा समाचार ऐकून सीतेच्या नेत्रात अश्रु दाटून आले. ती आपल्या प्रियतम श्रीरामांकडे पाहू शकली नाही. ॥ १८ ॥
सान्त्वयित्वा तु तां रामो रुदतीं जनकात्मजाम् ।
उवाच लक्ष्मणं तत्र दुःखितो दुःखितं वचः ॥ १९ ॥
त्यानंतर रडणार्‍या जनककुमारीला सांत्वना देऊन दुःखमग्न श्रीरामाने अत्यंत दुःखी झालेल्या लक्ष्मणास म्हटले - ॥ १९ ॥
आनयेङ्‌गुदिपिण्याकं चीरमाहर चोत्तरम् ।
जलक्रियार्थं तातस्य गमिष्यामि महात्मनः ॥ २० ॥
’बंधु ! तुम्ही इंगुदीचे वाटलेले फळ आणि चीर तसेच उत्तरीय घेऊन यावे. मी महात्मा पित्याला जलदान देण्यासाठी येईन. ॥ २० ॥
सीता पुरस्ताद् व्रजतु त्वमेनामभितो व्रज ।
अहं पश्चाद् गमिष्यामि गतिर्ह्येषा सुदारुणा ॥ २१ ॥
’सीता पुढे पुढे चालेल. तिच्या मागे तुम्ही चला आणि तुमच्या मागे मी चालेन. शोकाच्या समयाची हीच परिपाठी आहे, जी अत्यंत दारुण असते. ॥ २१ ॥
ततो नित्यानुगस्तेषां विदितात्मा महामतिः ।
मृदुर्दान्तश्च कान्तश्च रामे च दृढभक्तिमान् ॥ २२ ॥

सुमन्त्रस्तैर्नृपसुतैः सार्धमाश्वास्य राघवम् ।
अवातारयदालम्ब्य नदीं मन्दाकिनीं शिवाम् ॥ २३ ॥
त्यानंतर त्यांच्या कुलाचे परंपरागत सेवक, आत्मज्ञानी, परम बुद्धिमान् कोमल स्वभावाचे, जितेंद्रिय, तेजस्वी आणि श्रीरामांचे सुदृढ भक्त सुमंत्र समस्त राजकुमारांसह श्रीरामांना धैर्य, आश्वासन देऊन त्यांना हाताचा आधार देऊन कल्याणमयी मंदाकिनीच्या तटावर घेऊन गेले. ॥ २२-२३ ॥
ते सुतीर्थां ततः कृच्छ्रादुपागम्य यशस्विनः ।
नदीं मन्दाकिनीं रम्यां सदा पुष्पितकाननाम् ॥ २४ ॥

शीघ्रस्रोतसमासाद्य तीर्थं शिवमकर्दमम् ।
सिषिचुस्तूदकं राज्ञे तत एतद् भवत्विति ॥ २५ ॥
ते यशस्वी राजकुमार, सदा पुष्पित काननाने, सुशोभित, शीघ्र गतीने प्रवाहित होणार्‍या, आणि उत्तम घाट असणार्‍या रमणीय मंदाकिनी नदीच्या तटावर मोठ्या कष्टाने येऊन पोहोंचले आणि तिचे पंकरहित, कल्याणप्रद, तीर्थभूत जल घेऊन त्यांनी राजासाठी जल दिले. त्यावेळी ते म्हणाले - "हे पित्या ! हे जल आपल्या सेवेत उपस्थित होवो." ॥ २४-२५ ॥
प्रगृह्य च महीपालो जलपूरितमञ्जलिम् ।
दिशं याम्यामभिमुखो रुदन् वचनमब्रवीत् ॥ २६ ॥

एतत्ते राजशार्दूल विमलं तोयमक्षयम् ।
पितृलोकगतस्याद्य मद्दत्तमुपतिष्ठतु ॥ २७ ॥
पृथ्वीपालक श्रीरामांनी जलांनी भरलेली अंजली घेऊन दक्षिण दिशेकडे तोंड करून रडत या प्रकारे म्हटले - ’माझे पूज्य पिता राजशिरोमणि दशरथ महाराज ! आज मी दिलेले हे निर्मल जल पितृलोकात गेलेल्या आपल्याला अक्षयरूपाने प्राप्त होवो.’ ॥ २६-२७ ॥
ततो मन्दाकिनीतीरं प्रत्युत्तीर्य स राघवः ।
पितुश्चकार तेजस्वी निर्वापं भ्रातृभिः सह ॥ २८ ॥
यानंतर मंदाकिनीच्या जलातून निघून किनार्‍यावर येऊन तेजस्वी राघवांनी आपल्या भावांसह मिळून पित्यासाठी पिण्डदान केले. ॥ २८ ॥
ऐङ्‌गुदं बदरैर्मिश्रं पिण्याकं दर्भसंस्तरे ।
न्यस्य रामः सुदुःखार्तो रुदन् वचनमब्रवीत् ॥ २९ ॥
त्यांनी इंगुदीच्या गरात बोरे मिसळून त्याचा पिण्ड तयार केला आणि पसरलेल्या कुशावर (दर्भावर) त्यास ठेवून अत्यंत दुःखाने आर्त होऊन रडत याप्रमाणे बोलले - ॥ २९ ॥
इदं भुङ्‌क्ष्व महाराज प्रीतो यदशना वयम् ।
यदन्नः पुरुषो भवति तदन्नास्तस्य देवताः ॥ ३० ॥
महाराज ! प्रसन्नतापूर्वक हे भोजन स्वीकारावे. कारण की आजकाल हाच आमचा आहार आहे. मनुष्य स्वतः जे अन्न खातो तेच त्याच्या देवताही भक्षण करतात. ॥ ३० ॥
ततस्तेनैव मार्गेण प्रत्युत्तीर्य सरित्तटात् ।
आरुरोह नरव्याघ्रो रम्यसानुं महीधरम् ॥ ३१ ॥

ततः पर्णकुटीद्वारमासाद्य जगतीपतिः ।
परिजग्राह बाहुभ्यामुभौ भरतलक्ष्मणौ ॥ ३२ ॥
त्यानंतर त्याच मार्गाने मंदाकिनी तटाच्या वर येऊन पृथ्वीपालक पुरुषसिंह श्रीराम सुंदर शिखर असलेल्या चित्रकूट पर्वतावर चढले आणि पर्णकुटीच्या द्वारावर येऊन भरत आणि लक्ष्मण दोन्ही भावांना दोन्ही हातांनी पकडून रडू लागले. ॥ ३१-३२ ॥
तेषां तु रुदतां शब्दात् प्रतिशब्दोऽभवद् गिरौ ।
भ्रातॄणां सह वैदेह्याः सिंहानां नर्दतामिव ॥ ३३ ॥
सीतेसहित रडत असलेल्या त्या चारी भावांच्या रडण्याच्या आवाजाने त्या पर्वतावर गर्जणार्‍या सिंहाच्या आरोळी प्रमाणे प्रतिध्वनी होऊ लागला. ॥ ३३ ॥
महाबलानां रुदतां कुर्वतामुदकं पितुः ।
विज्ञाय तुमुलं शब्दं त्रस्ता भरतसैनिकाः ॥ ३४ ॥

अब्रुवंश्चापि रामेण भरतः सङ्‌गतो ध्रुवम् ।
तेषामेव महाञ्छब्दः शोचतां पितरं मृतम् ॥ ३५ ॥
पित्याला जलांजली देऊन रडत असणार्‍या त्या महाबली भावांच्या रडण्याचा तुमुल शब्द ऐकून भरताचे सैनिक कुठल्यातरी भयाच्या आशंकेने घाबरून गेले. नंतर तो ओळखून ते एक दुसर्‍याला म्हणाले - ’निश्चितच भरत श्रीरामांना भेटले आहेत. आपल्या परलोकवासी पित्यासाठी शोक करणार्‍या त्या चारही भावांच्या रडण्याचाच हा महान् शब्द आहे.’ ॥ ३४-३५ ॥
अथ वाहान् परित्यज्य तं सर्वेऽभिमुखाः स्वनम् ।
अप्येकमनसो जग्मुः यथास्थानं प्रधाविताः ॥ ३६ ॥
असे म्हणून त्या सर्वांनी आपली वाहने तेथेच सोडून दिली आणि ज्या स्थानापासून तो आवाज येत होता तिकडे तोंड करून एकचित्त होऊन ते धावत निघाले. ॥ ३६ ॥
हयैरन्ये गजैरन्ये रथैरन्ये स्वलङ्‌कृतैः ।
सुकुमारास्तथैवान्ये पद्‌भिरेव नरा ययुः ॥ ३७ ॥
त्यांच्याहून भिन्न जे सुकुमार लोक होते त्यांतील काही लोक घोड्यावरून , काही हत्तीवरून तर काही सजविलेल्या रथांतूनच पुढे निघाले. कित्येक माणसे पायीच चालू लागली. ॥ ३७ ॥
अचिरप्रोषितं रामं चिरविप्रोषितं यथा ।
द्रष्टुकामो जनः सर्वो जगाम सहसाश्रमम् ॥ ३८ ॥
जरी श्रीरामांना परदेशात येऊन आत्ता थोडेच दिवस झालेले होते तरी लोकांना असे वाटत होते की जणु ते दीर्घ काळापासून परदेशातच राहात आले आहेत. म्हणून सर्वलोक त्यांच्या दर्शनाच्या इच्छेने एकाएकी आश्रमाकडे चालू लागले. ॥ ३८ ॥
भ्रातॄणां त्वरितास्ते तु द्रष्टुकामाः समागमम् ।
ययुर्बहुविधैर्यानैः खुरनेमिसमाकुलैः ॥ ३९ ॥
ते लोक चारही भावांचे मिलन पाहण्याच्या इच्छेने खुरांनी आणि चाकांनी युक्त नाना प्रकारच्या वाहनांतून मोठ्या उतावळीने चालू लागले. ॥ ३९ ॥
सा भूमिर्बहुभिर्यानैः रथनेमिसमाहता ।
मुमोच तुमुलं शब्दं द्यौरिवाभ्रसमागमे ॥ ४० ॥
अनेक प्रकारच्या वाहनांनी आणि रथांच्या चाकांनी आक्रांत झालेली ती भूमी भयंकर शब्द करू लागली. जणु काही मेघांच्या समुदायांनी घेरले गेल्यावर आकाशात गडगडाट होऊ लागतो त्याप्रमाणे वाटू लागले. ॥ ४० ॥
तेन वित्रासिता नागाः करेणुपरिवारिताः ।
आवासयन्तो गन्धेन जग्मुरन्यद्वनं ततः ॥ ४१ ॥
त्या तुमुल नादांनी भयभीत झालेले हत्ती, हत्तीणींनी घेरले जाऊन मदाच्या गंधांनी त्या स्थानाला सुवासित करीत तेथून दुसर्‍या वनांत पळून गेले. ॥ ४१ ॥
वराहवृकसिंहाश्च महिषाः सृमरास्तथा ।
व्याघ्रगोकर्णगवयाः वित्रेसुः पृषतैः सह ॥ ४२ ॥
वराह, लांडगे, सिंह, रेडे, मृगर (मृगविशेष), व्याघ्र, गोकर्ण (मृगविशेष) आणि गवे(नीलगायी) चितकबर्‍या हरणांसहित संत्रस्त झाले. ॥ ४२ ॥
रथाह्वहंसानत्यूहाः प्लवाः कारण्डवाः परे ।
तथा पुंस्कोकिलाः क्रौञ्चा विसंज्ञा भेजिरे दिशः ॥ ४३ ॥
चक्रवाक, हंस, जलकुक्कुट, बक, करण्ड व नरकोकीळ, आणि क्रौंच पक्षी घाबरून भान विसरून निरनिराळ्या दिशांना उडून गेले. ॥ ४३ ॥
तेन शब्देन वित्रस्तैराकाशं पक्षिभिर्वृतम् ।
मनुष्यैरावृता भूमिरुभयं प्रबभौ तदा ॥ ४४ ॥
त्या शब्दांनी भयभीत झालेले पक्षी आकाशात सर्वत्र पसरले आणि खालील भूमी मनुष्यांनी भरून गेली. या प्रकारे दोन्हीची समान रूपाने शोभा होऊ लागली. ॥ ४४ ॥
ततस्तं पुरुषव्याघ्रं यशस्विनमकल्मषम् ।
आसीनं स्थण्डिले रामं ददर्श सहसा जनः ॥ ४५ ॥
लोकांनी एकाएकी पोहोंचल्यावर पाहिले - यशस्वी, पापरहित, पुरुषसिंह श्रीराम वेदीवर बसलेले आहेत. ॥ ४५ ॥
विगर्हमाणः कैकेयीं मंथरासहितामपि ।
अभिगम्य जनो रामं बाष्पपूर्णमुखोऽभवत् ॥ ४६ ॥
श्रीरामांच्याजवळ आल्यावर सर्वांची तोंडे आसवांनी भिजून गेली आणि सर्व लोक मंथरेसहित कैकेयीची निंदा करू लागले. ॥ ४६ ॥
तान् नरान् बाष्पपूर्णाक्षान् समीक्ष्याथ सुदुःखितान् ।
पर्यष्वजत धर्मज्ञः पितृवन्मातृवच्च सः ॥ ४७ ॥
त्या सर्व लोकांचे डोळे अश्रुंनी भरलेले होते आणि ते सर्वच्या सर्व अत्यंत दुःखी होत होते. धर्मज्ञ श्रीरामांनी त्यांना पाहून पिता-माता यांच्याप्रमाणे हृदयाशी धरले. ॥ ४७ ॥
स तत्र कांश्चित् परिषस्वजे नरान्
     नराश्च केचित्तु तमभ्यवादयन् ।
चकार सर्वान् सवयस्यबान्धवान्
     यथार्हमासाद्य तदा नृपात्मजः ॥ ४८ ॥
श्रीरामांनी काही मनुष्यांना हृदयाशी धरले तर काही लोकांनी तेथे पोहोंचल्यावर त्यांच्या चरणांना प्रणाम केला. राजकुमार श्रीरामांनी त्या समयी तेथे आलेल्या सर्व मित्रांचा आणि बंधु बांधवांचा यथायोग्य सन्मान केला. ॥ ४८ ॥
ततः स तेषां रुदतां महात्मनां
     भुवं च खं चानुविनादयन् स्वनः ।
गुहा गिरीणां च दिशश्च संततं
     मृदङ्‌गघोषप्रतिमो विशुश्रुवे ॥ ४९ ॥
त्या समयी तेथे रडणार्‍या त्या महात्म्यांचा तो रोदन शब्द, पृथ्वी, आकाश, पर्वतांच्या गुफा आणि संपूर्ण दिशांना निरंतर प्रतिध्वनित करीत मृदंगाच्या ध्वनीप्रमाणे ऐकू येत होता. ॥ ४९ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे त्र्यधिकशततमःसर्गः ॥ १०३ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे तीनावा सर्ग पूरा झाला ॥ १०३ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP