श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ अष्टाविंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
मेघनादजयन्तयोर्युद्धं, पुलोम्ना जयन्तस्यान्यत्रापनयनं, इन्द्रस्य रणभूमौ प्रवेशो, रुद्रैर्मरुद्‌भिश्च राक्षससेनायाः संहार, इन्द्ररावणयोर्युद्धम् -
मेघनाद आणि जयंताचे युद्ध, पुलोमाने जयंताला अन्यत्र घेऊन जाणे, देवराज इंद्राचे युद्धभूमीमध्ये पदार्पण, रूद्र आणि मरूत्‌गणांच्या द्वारे राक्षससेनेचा संहार आणि इंद्र तथा रावणाचे युद्ध -
सुमालिनं हतं दृष्ट्‍वा वसुना भस्मसात्कृतम् ।
स्वसैन्यं विद्रुतं चापि लक्षयित्वाऽर्दितं सुरैः ॥ १ ॥

ततः स बलवान् क्रुद्धो रावणस्य सुतस्तदा ।
निवर्त्य राक्षसान् सर्वान् मेघनादो व्यवस्थितः ॥ २ ॥
सुमाली मारला गेला, वसुने त्याचे शरीर भस्मसात करून टाकले आहे आणि देवतांकडून पीडित होऊन माझी सेना पळून जात आहे हे पाहून रावणाचा बलवान्‌ पुत्र मेघनाद कुपित होऊन समस्त राक्षसांना परत फिरवून देवतांशी लढण्यासाठी स्वतः उभा राहिला. ॥१-२॥
सुरथेनाग्निवर्णेन कामगेन महारथः ।
अभिदुद्राव सेनां तां वनान्यग्निरिव ज्वलन् ॥ ३ ॥
तो महारथी आणि इच्छेनुसार चालणार्‍या अग्नितुल्य तेजस्वी रथावर आरूढ होऊन वनात पसरणार्‍या प्रज्वलित दावानलाप्रमाणे त्या देवसेनेकडे धावला. ॥३॥
ततः प्रविशतस्तस्य विविधायुधधारिणः ।
विदुद्रुवुर्दिशः सर्वा दर्शनादेव देवताः ॥ ४ ॥
नान प्रकारची आयुधे धारण करून आपल्या सेनेमध्ये प्रवेश करणार्‍या त्या मेघनादाला पहाताच सर्व देवता संपूर्ण दिशांकडे पळून जाऊ लागल्या. ॥४॥
न बभूव तदा कश्चिद् युयुत्सोरस्य सम्मुखे ।
सर्वानाविध्य वित्रस्तान् ततः शक्रोऽब्रवीत्सुरान् ॥ ५ ॥
त्या समयी युद्धाची इच्छा करणार्‍या मेघनादासमोर कुणीही उभा राहू शकला नाही. तेव्हा भयभीत झालेल्या त्या समस्त देवतांना खडसावून इंद्राने त्यांना म्हटले - ॥५॥
न भेतव्यं न गन्तव्यं निवर्तध्वं रणे सुराः ।
एष गच्छति पुत्रो मे युद्धार्थमपराजितः ॥ ६ ॥
देवतांनो ! भयभीत होऊ नका, युद्ध सोडून जाऊ नका आणि रणक्षेत्रात परत या. हा माझा पुत्र जयंत, जो कधी कुणाकडूनही परास्त झालेला नाही, युद्धासाठी येत आहे. ॥६॥
ततः शक्रसुतो देवो जयन्त इति विश्रुतः ।
रथेनाद्‌भुतकल्पेन संग्रामे सोऽभ्यवर्तत ॥ ७ ॥
नंतर इंद्रपुत्र जयंतदेव अद्‌भुत सजावटीने युक्त रथावर आरूढ होऊन युद्धासाठी आला. ॥७॥
ततस्ते त्रिदशाः सर्वे परिवार्य शचीसुतम् ।
रावणस्य सुतं युद्धे समासाद्य प्रजघ्निरे ॥ ८ ॥
नंतर तर सर्व देव शचीपुत्र जयंताला चारी बाजूनी घेरून युद्धस्थळी आले आणि रावणपुत्रावर प्रहार करू लागले. ॥८॥
तेषां युद्धं समभवत् सदृशं देवरक्षसाम् ।
महेन्द्रस्य च पुत्रस्य राक्षसेन्द्रसुतस्य च ॥ ९ ॥
त्यासमयी देवांचे राक्षसांशी आणि महेंद्रकुमाराचे रावणपुत्रा बरोबर त्यांच्या बल-पराक्रमास अनुरूप असे युद्ध होऊ लागले. ॥९॥
ततो मातलिपुत्रे तु गोमुखस्य स रावणिः ।
सारथेः पातयामास शरान् कनकभूषणान् ॥ १० ॥
रावणकुमार मेघनाद जयंताचा सारथि, मातलिपुत्र गोमुखावर सुवर्णभूषित बाणांचा वर्षाव करू लागला. ॥१०॥
शचीसुतश्चापि तथा जयन्तस्तस्य सारथिम् ।
तं चापि रावणिः क्रुद्धः समन्तात् प्रत्यविध्यत ॥ ११ ॥
शचीपुत्र जयंतानेही मेघनादाच्या सारथ्याला घायाळ केले. तेव्हा कुपित झालेल्या मेघानादाने जयंताला सर्व बाजूने क्षत-विक्षत करून टाकले. ॥११॥
स हि क्रोधसमाविष्टो बली विस्फारितेक्षणः ।
रावणिः शक्रतनयं शरवर्षैरवाकिरत् ॥ १२ ॥
त्या समयी क्रोधाविष्ट झालेल्या बलवान्‌ मेघनादाने इंद्रपुत्र जयंताकडे डोळे फाडफाडून पाहून त्याला पीडित करण्यास आरंभ केला. ॥१२॥
ततो नानाप्रहरणात् शितधारान् सहस्रशः ।
पातयामास सङ्‌क्रुद्धः सुरसैन्येषु रावणिः ॥ १३ ॥
अत्यंत कुपित झालेला रावणपुत्र देवतांच्या सेनेवरही तीक्ष्ण धार असणार्‍या नाना प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांचा वर्षाव करू लागला. ॥१३॥
शतघ्नीमुसलप्रास गदा खड्ग परश्वधान् ।
महान्ति गिरिशृङ्‌गाणि पातयामास रावणिः ॥ १४ ॥
त्याने शतघ्नी, मूसळे, प्रास, गदा, खङ्‌ग आणि परशु यांचा वर्षाव केला तसे मोठ मोठी शिखरेही फेकून मारली. ॥१४॥
ततः प्रव्यथिता लोकाः सञ्जज्ञे च तमस्ततः ।
तस्य रावणपुत्रस्य शत्रुसैन्यानि निघ्नतः ॥ १५ ॥
शत्रुसेनेच्या संहार करण्यात दंग असलेल्या रावणकुमाराच्या मायेमुळे त्यासमयी चोहोबाजूस अंधःकार पसरला आणि समस्त लोक व्यथित झाले. ॥१५॥
ततस्तद् दैवतबलं समन्तात् तं शचीसुतम् ।
बहुप्रकारमस्वस्थं अभवत् शरपीडितम् ॥ १६ ॥
तेव्हा शचीकुमाराच्या चारी बाजूस उभी असलेली देवतांची सेना बाणांच्या द्वारा पीडित होऊन अनेक प्रकारांनी अस्वस्थ झाली. ॥१६॥
नाभ्यजानन्त चान्योन्यं रक्षो वा देवताऽथवा ।
तत्र तत्र विपर्यस्तं समन्तात् परिधावत ॥ १७ ॥
राक्षस आणि देवता आपापसात कुणाला ओळखू शकल्या नाहीत आणि जिकडे तिकडे विखरून चोहोबाजूस चकरा मारू लागल्या. ॥१७॥
देवा देवान् निजघ्नुस्ते राक्षसान् राक्षसास्तथा ।
सम्मूढाः तमसाच्छन्ना व्यद्रवन्नपरे तथा ॥ १८ ॥
अंधकाराने आच्छादित होऊन ते विवेकशक्ति गमावून बसले होते. त्यामुळे देवता देवतांना आणि राक्षस राक्षसांनाच मारू लागले आणि बहुतेक योद्धे तर युद्धातून पळूनच गेले. ॥१८॥
एतस्मिन्नन्तरे वीरः पुलोमा नाम वीर्यवान् ।
दैत्येन्द्रस्तेन संगृह्य शचीपुत्रोऽपवाहितः ॥ १९ ॥
इतक्यांत पराक्रमी वीर दैत्यराज पुलोमा युद्धामध्ये आला आणि शचीपुत्र जयंताला पकडून तेथून दूर घेऊन गेला. ॥१९॥
सङ्‌गृह्य तं तु दौहित्रं प्रविष्टः सागरं तदा ।
आर्यकः स हि तस्यासीत् पुलोमा येन सा शची ॥ २० ॥
तो शचीचा पिता आणि जयंताचा आजोबा होता म्हणून आपल्या नातवाला (मुलीच्या मुलाला) घेऊन समुद्रात घुसला. ॥२०॥
ज्ञात्वा प्रणाशं तु तदा जयन्तस्याथ देवताः ।
अप्रहृष्टास्ततः सर्वा व्यथिताः सम्प्रदुद्रुवुः ॥ २१ ॥
देवतांना जेव्हा जयंत बेपत्ता झाल्याची गोष्ट कळली तेव्हा त्यांचा सर्व आनंद नाहीसा झाला आणि त्या दुःखी होऊन चोहो बाजूस पळत सुटल्या. ॥२१॥
रावणिस्त्वथ सङ्‌क्रुद्धो बलैः परिवृतः स्वकैः ।
अभ्यधावत देवांस्तान् मुमोच च महास्वनम् ॥ २२ ॥
तिकडे आपल्या सेनेने घेरलेल्या रावणकुमार मेघनादाने अत्यंत कुपित होऊन देवतांवर आक्रमण केले आणि फार मोठ्‍याने गर्जना केली. ॥२२॥
दृष्ट्‍वा प्रणाशं पुत्रस्य दैवतेषु च विद्रुतम् ।
मातलिं चाह देवेशो रथः समुपनीयताम् ॥ २३ ॥
पुत्र बेपत्ता झाला आणि देवतांच्या सेनेमध्ये गोंधळ उडाला आहे हे पाहून देवराज इंद्रांनी मातलिस म्हटले -माझा रथ घेऊन ये. ॥२३॥
स तु दिव्यो महाभीमः सज्ज एव महारथः ।
उपस्थितो मातलिना वाह्यमानो महाजवः ॥ २४ ॥
मातलिने एक सज्ज केलेला सजविलेला महाभयंकर दिव्य तसेच विशाल रथ आणून उपस्थित केला. त्याच्याकडून हाकला जाणारा तो रथ फारच वेगवान्‌ होता. ॥२४॥
ततो मेघा रथे तस्मिन् तडित्त्वन्तो महाबलाः ।
अग्रतो वायुचपला नेदुः परमनिःस्वनाः ॥ २५ ॥
नंतर त्या रथावर वीजेने युक्त मेघ त्याच्या अग्रभागी वायुने चंचल होऊन फार मोठ्‍याने गर्जना करू लागले. ॥२५॥
नानावाद्यानि वाद्यन्त गन्धर्वाश्च समाहिताः ।
ननृतुश्चाप्सरःसङ्‌घा निर्याते त्रिदशेश्वरे ॥ २६ ॥
देवेश्वर इंद्र निघतांच नाना प्रकारची वाद्ये वाजू लागली, गंधर्व एकाग्र झाले आणि अप्सरांचे समूह नृत्य करू लागले. ॥२६॥
रुद्रैर्वसुभिरादित्यैः अश्विभ्यां समरुद्‌गणैः ।
वृतो नानाप्रहरणैः निर्ययौ त्रिदशाधिपः ॥ २७ ॥
त्यानंतर रूद्र, वसु, आदित्य, अश्विनीकुमार आणि मरूद्‌गणांनी वेढलेले देवराज इंद्र नाना प्रकारची अस्त्रे-शस्त्रे घेऊन पुरीतून बाहेर निघाले. ॥२७॥
निर्गच्छतस्तु शक्रस्य परुषः पवनो ववौ ।
भास्करो निष्प्रभश्चैव महोल्काश्च प्रपेदिरे ॥ २८ ॥
इंद्र बाहेर पडतांच प्रचण्ड वारा वाहू लागला. सूर्याची प्रभा फिकी पडली आणि आकाशांतून मोठ मोठ्‍या उल्का खाली पडू लागल्या. ॥२८॥
एतस्मिन्नन्तरे शूरो दशग्रीवः प्रतापवान् ।
आरुरोह रथं दिव्यं निर्मितं विश्वकर्मणा ॥ २९ ॥
इतक्यात प्रतापी वीर दशग्रीवही विश्वकर्म्याने बनविलेल्या दिव्य रथावर स्वार झाला. ॥२९॥
पन्नगैः सुमहाकार्यैः वेष्टितं लोमहर्षणैः ।
येषां निःश्वासवातेन प्रदीप्तमिव संयुगे ॥ ३० ॥
त्या रथामध्ये अंगावर काटा आणणारे विशालकाय सर्प चिकटलेले होते. त्यांच्या निःश्वास वायुमुळे तो रथ त्या युद्धस्थळावर जणु जळत असल्यासारखा भासत होता. ॥३०॥
दैत्यैर्निशाचरैश्चैव स रथः परिवारितः ।
समराभिमुखो दिव्यो महेन्द्रं सोऽभ्यवर्तत ॥ ३१ ॥
दैत्य आणि निशाचरांनी त्या रथाला सर्व बाजूनी घेरून टाकले होते. समरांगणाकडे जात असलेला रावणाचा तो दिव्य रथ महेंद्राच्या समोर जाऊन पोहोचला. ॥३१॥
पुत्रं तं वारयित्वा तु स्वयमेव व्यवस्थितः ।
सोऽपि युद्धाद् विनिष्क्रम्य रावणिः समुपाविशत् ॥ ३२ ॥
रावण आपल्या पुत्राला अडवून स्वतःच युद्धासाठी उभा राहिला होता. तेव्हा रावणपुत्र मेघनाद युद्धस्थळावरून निघून गुपचुप आपल्या रथावर जाऊन बसला. ॥३२॥
ततो युद्धं प्रवृत्तं तु सुराणां राक्षसैः सह ।
शस्त्राणि वर्षतां तेषां मेघानामिव संयुगे ॥ ३३ ॥
मग तर देवतांचे राक्षसांशी घोर युद्ध होऊ लागले. जलाची वृष्टि करणार्‍या मेघांप्रमाणे देवता युद्धस्थळांवर अस्त्र-शस्त्रांची वृष्टि करू लागल्या. ॥३३॥
कुम्भकर्णस्तु दुष्टात्मा नानाप्रहरणोद्यतः ।
नाज्ञायत तदा राजन् युद्धं केनाभ्यपद्यत ॥ ३४ ॥
राजन्‌ ! दुरात्मा कुम्भकर्ण नाना प्रकारची अस्त्रे-शस्त्रे घेऊन ज्याच्या बरोबर युद्ध करत होता, त्याचा पत्ताच लागत नव्हता. (अर्थात उन्मत्त असल्याने आपल्या आणि परक्याच्या सर्वच सैनिकांशी तो झुंजत होता.) ॥३४॥
दन्तैः पादैर्भुजैर्हस्तैः शक्तितोमरमुद्‌गरैः ।
येन तेनैव संक्रुद्धः ताडयामास देवताः ॥ ३५ ॥
तो अत्यंत कुपित होऊन दांत, लाथा, भुजा, हात, शक्ति, तोमर आणि मुद्‌गर जे काही मिळेल त्यानेच देवतांना पिटत होता. ॥३५॥
ततो रुद्रैर्महाघोरैः संगम्याथ निशाचरः ।
प्रयुद्धस्तैश्च संग्रामे क्षतः शस्त्रैर्निरन्तरम् ॥ ३६ ॥
तो निशाचर महाभयंकर रूद्रांशी भिडून घोर युद्ध करू लागला. संग्रामात रूद्रांनी आपल्या अस्त्र-शस्त्रांच्या द्वारा त्याला असे क्षत-विक्षत करून टाकले की त्याच्या शरीरावर अशी थोडीही जागा उरली नाही की जेथे घाव लागला नसेल. ॥३६॥
बभौ शस्त्राचिततनुः कुम्भकर्णः क्षरन्नसृक् ।
विद्युत्स्तनितनिर्घोषो धारावानिव तोयदः ॥ ३७ ॥
कुम्भकर्णाचे शरीर शस्त्रांनी व्याप्त होऊन त्यातून रक्ताची धार वहात होती. त्यासमयी तो वीजेने आणि गर्जनेने युक्त जलधार वाहविणार्‍या मेघासमान भासत होता. ॥३७॥
ततस्तद् राक्षसं सैन्यं प्रयुद्धं समरुद्‌गणैः ।
रणे विद्रावितं सर्वं नानाप्रहरणैः तदा ॥ ३८ ॥
त्यानंतर घोर युद्धात गुंतलेल्या त्या सर्व राक्षससेनेला रणभूमीमध्ये नाना प्रकारची अस्त्रे-शस्त्रे धारण करणार्‍या रूद्र आणि मरूद्‌गणांनी मारून पिटाळून लावले. ॥३८॥
केचिद् विनिहताः कृत्ताः चेष्टन्ति स्म महीतले ।
वाहनेष्ववसक्ताश्च स्थिता एवापरे रणे ॥ ३९ ॥
कित्येक निशाचर मारले गेले. कित्येक जखमी होऊन (अंगभंग होऊन) जमिनीवर कोसळले आणि तडफडू लागले आणि बरेचसे राक्षस प्राणहीन होऊनही त्या रणभूमीमध्ये आपल्या वाहनांनाच चिकटून राहिले होते. ॥३९॥
रथान् नागान् खरान् उष्ट्रान् पन्नगान् तुरगान् तथा ।
शिंशुमारान् वराहांश्च पिशाचवदनानपि ॥ ४० ॥

तान्समालिङ्‌ग्य बाहुभ्यां विष्टब्धाः केचिदुत्थिताः ।
देवैस्तु शस्त्रसंभिन्ना मम्रिरे च निशाचराः ॥ ४१ ॥
काही राक्षस रथ, हत्ती, गाढवे, ऊंट, सर्प, घोडे, शिशुमार, वराह तसेच पिशाञ्चमुख वाहनांना दोन्ही हातांनी घट्‌ट आवळून धरूनच निश्चेष्ट झाले होते. कित्येक जे पूर्वीच मूर्च्छित होऊन पडले होते, मूर्च्छा गेल्यावर उठले परंतु देवतांच्या शस्त्रांनी छिन्न-भिन्न होऊन मृत्युमुखी पडले. ॥४०-४१॥
चित्रकर्म इवाभाति स तेषां रणसम्प्लवः ।
निहतानां प्रसुप्तानां राक्षसानां महीतले ॥ ४२ ॥
प्राण गमावून जमिनीवर पडलेल्या त्या समस्त राक्षसांचे याप्रकारे युद्धात मारले जाणे जादुसारखे आश्चर्यजनक वाटत होते. ॥४२॥
शोणितोदकनिष्पन्दा काकगृध्रसमाकुला ।
प्रवृत्ता संयुगमुखे शस्त्रग्राहवती नदी ॥ ४३ ॥
युद्धाच्या तोंडावरच रक्ताची नदी वाहू लागली. जिच्यामध्ये अनेक प्रकारची शस्त्रे ग्राहांचा (मगरींचा) भ्रम उत्पन्न करीत होती. त्या नदीच्या तटावर चोहीकडे गिधाडे आणि कावळे जमलेले होते. ॥४३॥
एतस्मिन्नन्तरे क्रुद्धो दशग्रीवः प्रतापवान् ।
निरीक्ष्य तु बलं सर्वं दैवतैर्विनिपातितम् ॥ ४४ ॥
इतक्यातच प्रतापी दशग्रीवाने जेव्हा पाहिले की देवतांनी आपल्या समस्त सैनिकांना मारून टाकले आहे, तेव्हा त्याच्या रागाला सीमा राहिली नाही. ॥४४॥
स तं प्रति विगाह्याशु प्रवृद्धं सैन्यसागरम् ।
त्रिदशान्समरे निघ्नन् शक्रमेवाभ्यवर्तत ॥ ४५ ॥
तो समुद्राप्रमाणे दूरपर्यंत पसरलेल्या देवसेनेत घुसून गेला आणि समरांगणात देवतांना मारत आणि धराशायी करत तात्काळच इंद्राच्या समोर जाऊन पोहोचला. ॥४५॥
ततः शक्रो महच्चापं विस्फार्य सुमहास्वनम् ।
यस्य विस्फारनिर्घोषैः स्तनन्ति स्म दिशो दश ॥ ४६ ॥
तेव्हा इंद्रांनी जोरजोराने टणत्कार करणार्‍या आपल्या विशाल धनुष्यास खेचले. त्याच्या टणत्काराच्या ध्वनिने दाही दिशा प्रतिध्वनित झाल्या. ॥४६॥
तद् विकृष्य महच्चापं इन्द्रो रावणमूर्धनि ।
पातयामास स शरान् पावकादित्यवर्चसः ॥ ४७ ॥
ते विशाल धनुष्य खेचून इंद्रांनी रावणाच्या मस्तकावर अग्नि आणि सूर्यासमान तेजस्वी बाण मारले. ॥४७॥
तथैव च महाबाहुः दशग्रीवो निशाचरः ।
शक्रं कार्मुकविभ्रष्टैः शरवर्षैरवाकिरत् ॥ ४८ ॥
याप्रकारे महाबाहु निशाचर दशग्रीवानेही आपल्या धनुष्यांतून सुटलेल्या बाणांची वृष्टि करून इंद्रास झाकून टाकले. ॥४८॥
प्रयुध्यतोरथ तयोः बाणवर्षैः समन्ततः ।
न ज्ञायते तदा किञ्चित् सर्वं हि तमसा वृतम् ॥ ४९ ॥
ते दोघेही घोर युद्धात तत्पर होऊन जेव्हा बाणांची वृष्टि करू लागले त्या समयी सर्व बाजूला सर्व काही अंधःकाराने आच्छादित झाले. कुणालाही कुठलीही वस्तु ओळखता येत नव्हती. ॥४९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डेऽष्टाविंशः सर्गः ॥ २८ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा अठ्ठाविसावा सर्ग पूरा झाला. ॥२८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP