॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
किष्किंधाकांड
॥ चौदावा ॥
वानरांचा गुहाप्रवेश
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
एक महिना होतांच पूर्व, पश्चिम व उत्तरेकडील वानर परत आले :
पूर्व पश्चिम वायव्य ईशान्य । उत्तर नैर्ऋत्य आग्नेयकोण ।
पाताळदिशा स्वर्गभुवन । आले शोधून वानर ॥१॥
तदहः प्रथमं कृत्वा मासे प्रस्रवणं गतां ।
कपिराजेन संगम्य निराशाः कपिकुंजराः ॥१॥
समेत्य मासे संपूर्णे सुग्रीवमुपचक्रमुः ।
तं प्रस्रवणपृष्ठस्थमभिगम्याभिवाद्य च ।
सुग्रीवं प्लवगाः सर्वे सुषेणप्रमुखा ब्रुवन् ॥२॥
राया सुग्रीवांचे आज्ञापन । मासें एकें संपूर्ण ।
अवघीं यावें सीता शोधून । न येतां दारूण राजदंड ॥२॥
सर्वजण शोध न लागता परत आले :
प्रस्रवण गिरिवर । तेथें वसे श्रीरामचंद्र ।
तयापासीं सुग्रीव वीर । नित्य तत्पर सेवेंसीं ॥३॥
श्रीराम पुसे सुग्रीवासी । वानर गेले दशदिशीं ।
कोणी नाहीं आला शुद्धीसीं । विलंब त्यासीं कां जाला ॥४॥
ऐसे करीत जंव विचार । सुग्रीवराजाज्ञा अति दुर्धर ।
तेणें भयें वानरवीर । आले समग्र एक मासांतीं ॥५॥
शुद्धि न लभेचि साचार । अति सलज्ज वानरवीर ।
न येती श्रीरामासमोर । करिती नमस्कार सुग्रीवा ॥६॥
प्रतिज्ञा करोनि केलें नमन । शेखीं आलों शुद्धीविण ।
लाजा न बोलवे वचन । अधोवचन तटस्थ ॥७॥
तटस्थ देखोनि वानरवीर । वालिसुग्रीवांचा श्वशुर ।
पुढें होवोनि सुषेण वीर । सांगे विचार शुद्धीचा ॥८॥
विचित्ताः पर्वताः सर्वे वनानि गहनानि च ।
गुहाश्च विचिताः सर्वा यास्त्वया परिकीर्तिताः ॥३॥
निम्नगाः सागरांताश्च सर्वे जनपदास्तथा ।
सत्वान्यतिप्रमाणानि विचितानि हतानि च ॥४॥
गहनेषु च देशेषु दुर्गेषु विषमेषु च ।
ये चैव गहना देशा विचितास्ते पुनः पुनः ॥५॥
विचिताश्च महागुल्मलताविततसंतताः ।
राक्षसा मानवाश्चैव तत्र तत्र प्लवंगमाः ॥६॥
ये चैव गहना देशा विचितास्ते पुनः पुनः ।
प्रवृत्ति चैव वैदेह्या नानुविदामहे प्रभो ॥७॥
सुषेणाचा वृत्तांत :
क्षीरसमुद्र क्षारसमुद्र । दधिमधुघृतसमुद्र ।
सहावा तो इक्षुसमुद्र । सुरासमुद्र सातवा ॥९॥
शाल्मलिद्वीप शाकद्वीप । क्रौंचद्वीप ।
पुष्करद्वीप प्लक्षद्वीप । जंबुद्वीप सातवें ॥१०॥
अयोध्या मथुरा माया जे कां । काशीं कांची अवंतिका ।
बळीचेनि द्वारें आलों देखा । ते द्वारका सातवी ॥११॥
दंडकारण्य खंडारण्य । चंपाकारण्य वेदारण्य ।
नैमिषारण्य ब्रह्मारण्य । धर्मारण्य सातवें ॥१२॥
सरें सरिता गुहा गव्हरें । खेटें खर्वटें ग्राम नगरें ।
जन विजन गिरिकंदरें । विवरें विवरें शोधिली ॥१३॥
निंद्य अनिंद्य स्थानें । दुर्धर राक्षसांची भुवनें ।
तेथें तेथें प्रवेशोन । केलें शोधन सीतेचें ॥१४॥
आळस सांडोनि वानर । आतुर्बळी महावीर ।
भूगोळ शोधितां समग्र । सीता सुंदर न लभेचि ॥१५॥
सप्तद्वीप स्थळा आणि निराळ । शोधून पाहतां जनकबाळ ।
शुद्धि न लभे अळुमाळ । आलों सकळ एकमासा ॥१७॥
राजाज्ञा अति दुर्धर । समयीं न येतां विटंबु थोर ।
तेणें भयें आम्ही समग्र । आलों सत्वर एक मासा ॥१८॥
सलज्जलज्जा वीरपंक्ती । श्रीरामसंमुख न येती ।
काय मुख दाखवूं तयाप्रती । सीता सती नुगमेचि ॥१९॥
श्रीराम आम्हांस पुसेल सीता । आम्ही काय सांगावी वार्ता ।
आम्हां वानरां समस्तां । बैसली माथां महालाज ॥२०॥
वानरवीरांचें मनोगत । श्रीराम जाणोनि समस्त ।
त्यांसी स्वयें आश्वासित । युक्तायुक्तविभागें ॥२१॥
तुम्हांसी दिशा नेमिल्या आम्हीं । सीता नाहीं त्या भूमीं ।
कैंची शोधून आणावी तुम्हीं । अति आक्रमीं शोधोनि ॥२२॥
सीता नाहीं पैं तेथ । हें वचन सत्य सत्य ।
सत्यासी मानिजेल अनृत । रासभगत तयापासीं ॥२३॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । वानरीं मस्तकीं धरिले चरण ।
श्रीरामें दिधलें आलिंगन । समाधान वानरां ॥२४॥
साधावया श्रीरामकाज । वानरीं सोडोलियां लाज ।
करावया रावणासीं झुंज । नाचती भोजें स्वानंदें ॥२५॥
समयो लोटला साचार । न येती दक्षिणेचे वीर ।
ते शुद्धि आणितील साचार । श्रीरामचंद्र अनुवादें ॥२६॥
सह तारांगदाभ्यां सः प्रस्थितो हनुमान्कपिः ।
स तु दूरमुपागम्य सर्वैस्तैर्हरिभिः सह ॥८॥
दक्षिणेकडील सैन्याचा वृत्तांत :
श्रीराममुद्रा झालिया प्राप्त । वेंगें निघाला हनुमंत ।
नळनीळादि जांबुवंत । वाट पाहत तिष्ठती ॥२७॥
येरीकडे दक्षिणेसीं । वानर वीर पराक्रमेंसीं ।
सीताशुद्धि करिती कैसी । श्रोतीं सावकाशीं अवधारिजे ॥२८॥
हनुमंत येवोनियां तेथ । दक्षिणदिशेच्या शोधानार्थ ।
अंगद अति उल्लासयुक्त । कपींसमवेत निघाला ॥२९॥
गुहा गहन गव्हरें । शैल कक्षा कुहरें ।
विवरें उखरें शिखरें । गिरिकंदरें शोधित ॥३०॥
खाती नानाविध फळें । सेविती नदीनिर्म जळें ।
नीतीनें शोधिती स्थळें । निजबळें वानर ॥३१॥
वानरवीर अति उद्भट । अटवी शोधिती विकट ।
पुढें ओढवलें अति दुर्घट । अति संकट तें ऐका ॥३२॥
यत्र वै निष्फळा वृक्षा विपुष्पाः पर्णवर्जिताः ।
निस्तोयाः सरितो यत्र मूलं यत्र सुदुर्लभम् ॥९॥
दंडो नाम महाभागः सत्यवादी तपोधनः ।
तस्य तस्मिन्वने पत्रो बालको दशवार्षिकः ॥१०॥
प्रनष्टो जीवितान्ताय लब्धस्तत्र माहमुनिः ।
तेनैव मुनिना शप्तं कृत्स्नं तच्च महद्वनम् ॥११॥
निर्जन, निर्जल व रुक्षप्रदेशात प्रवेश :
पुढें वन अति विकळ । वृक्ष कांखरले सकळ ।
नाहीं पत्र पुष्प फळमूळ । शुष्क जळ सरितांचें ॥३३॥
वनीं नाहीं मुंगी माशी । नाहीं पशुपक्षी कीटकेंसी ।
सुर्य तपे निजदोघेंसीं । तेणें कासाविसीं वानरां ॥३४॥
नाहीं फळमूळ भक्षावयासी । पाला न मिळे वानरांसी ।
जळ न मिळे प्राशनासी । कासाविसी वानरां ॥३५॥
त्यजावया दुष्ट तें स्थान । वानर करितां उड्डान ।
उडी पडे तेथिंचे वन । निर्गमन दिसेना ॥३६॥
निर्गम न पुरे बाहेरी । क्षुधे तळमळिजे वानरीं ।
जळेंविण येती लहरी । उष्णेंकरी तळमळिती ॥३७॥
ऐसें वानरां परम कष्ट । ओढवलें दुःख दुर्घट ।
बाहेर जावया न फुटे वाट । प्राणसंकट मांडलें ॥३८॥
आतां कायसी सीताशुद्धि । आम्हांसी आली प्राणांतविधी ।
येथें निर्गत न दिसे बुद्धी । आम्ही त्रिशुद्धी निमालों ॥३९॥
ये वनीं रिघतां यावें मरण । ऐसा ऋषिशापदारुण ।
वानरां नित्य रामस्मरण । तेणैं सप्राण वांचलें ॥४०॥
त्या वनाचा मूळ वृत्तांत हनुमंत सांगतात; दंडक ऋषीचा दहा वर्षाचा मुलगा वनदेवतांनी मारिला :
श्रीराम भक्तांचा सहकारी । नामें दैन्य दुःख निवारी ।
शापोपदग्धवनांतरीं । नामोच्चारीं वांचलें ॥४१॥
त्या वनाचा समूळ वृत्तांत । वानरां सांगे हनुमंत ।
दंडऋषींचे वन शापयुक्त । निर्गम येथ असेना ॥४२॥
ऐसा शाप अति दारुण । द्यावयासी काय कारण ।
त्या शापाचे समूळ लक्षण । सांगे आपण हनुमंत ॥४३॥
दंडऋषीचा निजसुत । दशवर्षी प्रज्ञावंत ।
वनदैवतीं करोनि घात । मांस समस्त भक्षिलें ॥४४॥
पित्याच्या शापाचा प्रभाव :
त्याचें अस्थिचर्म जाण । पशुपक्षीं केलें भक्षण ।
ऋषीनें जाणोनियां ज्ञान । शाप दारुण दिधला ॥४५॥
दुर्धर शापें जाणा येथ । हें वन जालेंसें उपहत ।
जो प्राणी येवा वनांत । त्यासी प्राणांत ऋषिशापें ॥४६॥
मुलगा विद्वान; परंतु ब्राह्मणांचा उपमर्द करणारा :
विद्यासंपन्न ऋषिसुत । वेदशास्रार्थी अति उन्मत्त ।
वादीं ब्राह्मणां निर्भर्त्सित । यालागीं घात भूतीं केला ॥४७॥
त्यामुळे तो ब्रह्मराक्षस झाला व वन निर्जन झाले :
जो वादी ब्राह्मणां देत त्रास । तो जातीचा ब्रह्मराक्षस ।
त्याचा देह तो भूतग्रास । यालागीं नाश भूतीं केला ॥४८॥
ऐकतां हनुमंताची मात । वानरां झाला अति आकांत ।
सवेंचि दुसरा अनर्थ । त्या वनांत ओढवला ॥४९॥
त्या ऋषीचा निजसुत । ब्रह्मराक्षत्व त्यासी प्राप्त ।
तो राहोनियां त्या वनांत । स्वयें भक्षित प्राणिमात्रा ॥५०॥
दशशुस्तं महाकायमसुरं भीमकर्मणा ।
सहितान्वानरान्सर्वांस्तिष्ठ तिष्ठेति चाब्रवीत् ॥१२॥
तमापतंतं सहसा वालिपुत्रोंऽगदास्तदा ।
रावणोऽयमिति ज्ञात्वा तलेनाभिजघान ह ॥१३॥
स वालिपुत्राभिहतो मुखाच्छोणितमुद्वमन् ।
असुरो न्यपतद्भूमौ पर्यस्त इव पर्वतः ॥१४॥
शापामुळे झालेला तो राक्षस भयंकर गर्जना करुन वानरांना भक्षण करण्यासाठी आला :
विकळ देखोनियां वानर । स्वयें भक्षावया समग्र ।
वेगीं धांविन्नला निशाचर । गिरागजर गर्जोनी ॥५१॥
अग्निकुंड जेंवी सोज्ज्वळें । तैसे आरक्त दोनी डोळे ।
वानर गिळावया सगळे । धावें अवाळे चाटित ॥५२॥
येतां देखोनि राक्षसासी । वानर चालिले युद्धासी ।
अंगदे उडोनि आवेंशीं । तळहातेंसी ठोकिला ॥५३॥
अंगदाच्या एकाच तडाख्याने त्याचा नाश केला, व त्याला मुक्ती मिळाली :
अंगद म्हणे पैं आपण । हा राक्षस होय रावण ।
बळें हाणोनि चडकण । घाये प्राण घेतला ॥५४॥
गाय हाणितां निष्ठुर । नाकीं तोंडी वमूनि रुधिर ।
अचेतन पर्वताकार । निशाचर पडिला ॥५५॥
श्रीरामभक्तांच्या हातीं । ब्रह्मराक्षसा जाली मुक्ती ।
ऋषि सुखोवोनि चित्तीं । शापनिर्मुक्ति वना केली ॥५६॥
वानरांचें वन प्रवेशन । तैं शापनिर्मुक्ति पावे वन ।
जेथें जेथें जाती भक्तजन । तें तें स्थान अति मुक्त ॥५७॥
सर्व वानर भुकेने व्याकुळ होतात :
रणीं पाडिला निशाचर । अंगद विजयी राजकुमर ।
वनीं न मिळे आहार नीर । तेणें वानर तळमळिती ॥५८॥
सुग्रीवें सांगितलें ज्या रीतीं । निबरें उखरें विपिनें क्षितीं ।
सीता शोधावी शतावर्ती । नाना पर्वतीं आयासें ॥५९॥
सीताशुद्धीची निजकथा । लाग माग न लभे वार्ता ।
काय करावें आम्हीं आतां । चिंता समस्तां वानरां ॥६०॥
गजो गवाक्षः शरभो गवयो गंधमादनः ।
मैंदश्च द्विविदश्चैव हनुमान्जांबवान्नलः ॥१५॥
अंगदो युवराजश्च निलश्च वनगोचरः ॥
क्षुत्पिपासापरीतास्तु श्रांताश्च सलिलार्थिंनः ॥१६॥
गज गवाक्ष गवययुक्त । शरभ गंधमादन विख्यात ।
मैंद द्विविद जांबवंत । वीर हनुमंत नळ नीळ ॥६१॥
अंगद युवराज आपण । क्षुधेनें जावों पाहे प्राण ।
तृषा फुटलें अंतःकरण । आलें मरण वानरां ॥६२॥
वानरवीर अति विख्यात । पाला न मिळे आहारार्थ ।
क्षुधा तृषा परमोदित । मग प्रार्थित हनुमंत ॥६३॥
हनुमंताची प्रार्थना :
अवघे म्हणती हनुमंता । आम्ही शरण आलों आतां ।
शरणागतां आम्हां समस्तां । प्राणदाता तूं होई ॥६४॥
आमचे वांचवावया प्राण । तुझे अंगीं सामर्थ्य पूर्ण ।
तुज देवांचें वरदान । जीवदान दे आम्हां ॥६५॥
वानरवीर ऐशिया रीतीं । पीडिले येती काकुळती ।
त्यांसी वांचवावयाचे अर्थीं । वनीं मारुती निरीक्षी ॥६६॥
ततः पर्वतसंकाशो हनुमान्वारर्षभः ।
अवलोक्य वन सर्वं संपश्यत्स्थिरचक्षुषा ॥१७॥
निरीक्षमाणो दद्दशे वृक्षाः स्निग्धाः समंततः ।
अब्रवीद्वानरान्सर्वान्कांतारवनकोविदाः ॥१८॥
नूनं सलिलवानत्र भविष्यति महार्हदः ।
बिलास्मात्सुनिष्कांता हंसाः सारसवञ्जुलाः ॥१९॥
जलार्द्राश्चक्रवाकाश्च निष्कांताश्च सहस्रशः ॥२०॥
सर्व वनांची पहाणी करतात, गुप्त जलाचा सुगावा :
वन निरीक्षी हनुमंत । विवर देखे तंव त्या वनांत ।
वृक्षाजाळीमाजी गुप्त । जळपक्षी तेथ रिघतां देखे ॥६७॥
क्षुधे तृषे अत्यंत क्षीण । त्या वानरां सांगे आपण ।
येथें आहे जलस्थान । सावधान तुम्ही पहा ॥६८॥
चंचू धरोनियां फळें । आंतून निघती पक्षिकुळें ।
हंस सारस बक वंजुळें । निघती समेळें चक्रवाकें ॥६९॥
मत्स्य धरोनि मुखासीं । ढोंक निघती विवरप्रदेशीं ।
फळ जळ आहे विवरीं निश्चयेंसी । तृप्ति तुम्हांसी मी देईन ॥७०॥
आम्ही श्रीरामाचे भक्त । भक्तां संरक्षी श्रीरघुनाथ ।
क्षुधा केंवी करील घात । रामा समर्थ तुष्टला ॥७१॥
ऐकोनि हनुमंताची मात । वानरां आठवला श्रीरघुनाथ ।
श्रम गेला निमेषार्धांत । विवरार्थ पाहूं आले ॥७२॥
चंचूं धरोनियां फळें । असंख्य निघताती पक्षिकुळें ।
देखोनि वानरांचे पाळे । सुजसमेळें हरिखले ॥७३॥
वानर बोलती विस्मित । धन्य धन्य देखणा हनुमंत ।
गुप्त विवर जाळीआंत । जळयुक्त लक्षिलें ॥७४॥
ऐसें विनविलें हनुमंता । अवघीं चरणीं ठेविला माथा ।
आम्हांसी जीवदाता । प्राणरक्षिता तूं आम्हां ॥७५॥
तूं तंव सर्वांर्तीं अदट । तुझा सत्संग आम्हां श्रेष्ठ ।
आम्हां बाधेना संकट । तूं वरिष्ठ रक्षिता ॥७६॥
मारुतीच्या सांगण्यावरुन सर्व वानरांचा बिळात प्रवेश :
हनुमंत म्हणे वानरांजवळी । अवघे प्रवेशा ये बिळीं ।
तृप्ति पावोनि फळीं जळीं । जनकबाळीं स्वयें शोधूं ॥७७॥
प्रविश्यात्र विचेष्यामो रावणं राक्षसाधमम् ।
तां च सीतां महाभागाः सर्व एव महद्वले ॥२१॥
इत्युक्त्वा तद्विले सर्वे प्रविष्टास्तिमिरावृतम् ।
अचंद्रसूर्यं हरयो दद्दशू रोमहर्षणम् ॥२२॥
ततस्तस्मिन्बिले दुर्गे नानापादसंवृते ।
अन्योन्यं संपरिष्वज्य जग्मुर्योजनमंतरम् ॥२३॥
ते नष्टसंज्ञाः संभ्रातास्तृषिताः सलिलार्थिनः ।
परिपेतुर्बिले तस्मिन्मासमेकं बुभुक्षिताः ॥२४॥
तें देखोनियां विवर । गजबजिले वानरवीर ।
भीतरीं घदघुंग अंधार । रवि चंद्र भासेना ॥७८॥
प्रवेशतां विवराआंत । वानरां थोर भयसंकेत ।
पुढें चालिला हनुमंत । विवराप्रांत शोधावया ॥७९॥
येरयेरांचा धरोनि हात । वानर हनुमंता कवळित ।
प्रवेशले विवराआंत । भयभीत अवधारीं ॥८०॥
विवरमार्ग अति कठिण । आपणा न देखती आपण ।
ऐसे आंधारीं दारुण । उभ्यां प्राण निघों पाहे ॥८१॥
वानरवीरां एक मास । निखळ पडले उपवास ।
अन्नोदकेंविण कासावीस । विवरीं त्रास पावले ॥८२॥
शक्ति नाहीं पुढें जावयासी । मागें परतोनि यावयासी।
मार्ग लक्षेना तयांसी वानरांसी अति दुःख ॥८३॥
महिन्याचा उपवास व चालण्याचे श्रम यामुळे वानरांना मूर्च्छा :
विवरमार्ग अति दारुण । तमामाजी एक योजन ।
अति संकटीं केलें गमन । मूर्च्छापन्न मग झाले ॥८४॥
तमें गिळिली प्रज्ञासंज्ञा । निराहारें गिळिलें चैतन्या ।
तृषेनें शोषिलें वदना । शब्दसंज्ञा निमाली ॥८५॥
वानर पडिले चेतन । हनुमंत बळिया संपूर्ण ।
एकैक पुच्छीं बांधोन । करी गमन तेणेंसीं ॥८७॥
देखोनि वानरांची अवस्था । मागें सरणें नाहीं हनुमंता ।
विवर शोधावयाचे अर्था । घेवोनि समस्तां निघाला ॥८८॥
हनुमंताचे देखणे नेत्र । आवरुं न शके अंधार ।
पुच्छीं वानरांचा भार । घेवोनि सत्वर चालिला ॥८९॥
मारुतीने सर्व वानरांना पुच्छात बांधून प्राण रक्षसाकरिता पित्याचा धावा केला :
वांचवावयो वानरांचा प्राण । हनुमंतें केले विंदान ।
पिता पाचारोनि पवन । सांगे आपण तें ऐका ॥९०॥
श्रीरामकार्यालागीं जाण । वानरां परमानंदे मरण ।
तुवां रक्षावा यांचा प्राण । सेवा संपूर्ण श्रीरामीं ॥९१॥
श्रीरामसेवाहितवचन । तेणें संतोषोनि पिता पवन ।
वानरांचा निजप्राण । स्वयें आपण संरक्षी ॥९२॥
श्रीरामाचे निजभक्त । जरी अदृष्टे जाले मूर्च्छिंत ।
तरी काळाचा न चले घात । श्रीरघुनाथ रक्षिता ॥९३॥
श्रीरामभक्तांचे संरक्षण, हनुमंताला प्रकाश दिसतोः
भक्त सावधान असावधान । त्यासी न विसंबे श्रीरघुनंदन ।
बाधूं न शके जन्ममरण । काळें वदन काळाचें ॥९४॥
नामें गर्जती अखंड । त्यांचेनि पवित्र ब्रह्मांड ।
भक्तां करूं जातां दंड । काळें तोंड काळाचें ॥९५॥
भक्त श्रीरामीं लळेवाड । श्रीराम त्याचें पुरवी कोड ।
नामें गर्जोनि वितंड । ठेंचिलें तोंड काळाचें ॥९६॥
हनुमंत देखोनि श्रीरामदूत । कळिकाळ चळीं कांपत ।
हरिभक्ता करावया घात । नव्हे समर्थ कळिकाळ ॥९७॥
हनुमंते तेच आवेशीं । वानर तारिले बांधोनि पुच्छीं ।
सद्गुरुशिष्य निजकाजेंसीं । अनाथांसी तारक ॥९८॥
वानरां मूर्च्छा जरी प्राणांत । जवळी सद्गुरु हनुमंत ।
येणे सुसंगें चुकला घात । अति समर्थ तारक ॥९९॥
श्रीरामभक्तांची निजकथा । ग्रंथ नाकळें आकळितां ।
एका शरण साधुसंतां विवरवार्ता अवधारा ॥१००॥
पुच्छीं बांधोनि वानरकोटी । हनुमंत चालिला जगजेठी ।
पुढे प्रकाश देखिला दृष्टीं । सुखसंतुष्टी सर्वांसी ॥१०१॥
आतां ही हनुमंताची गोष्टी । नाम आठविल्या संकटी ।
विघ्नें पळती बारा वाटीं । नामें जगजेठी तारक ॥१०२॥
प्रकाशामुळे वानर सावध व हनुमंत स्तुती :
होतां प्रकाशाचें भान । अमृतमय प्रभा पूर्ण ।
वानर झाले सावधान । देखोनि स्थान विस्मित ॥३॥
आम्ही मूर्च्छिंत पडिलों क्षितीं । सद्भुत हनुमंताची शक्ती ।
सकळ श्रमा करोनि शांती । स्वस्थगतीं आणिलें ॥१०४॥
आम्हांसी मूर्च्छित सांडून । एकला नयेचि आपण ।
कोट्यनुकोटी वीर उचलोन । आला घेवोन कृपाळु ॥१०५॥
नळनीळादि जांबवंत । स्वयें अंगद गुण वर्णिंत ।
अवघीं वंदोनि हनुमंत । स्वस्थचित्त राहिले ॥१०६॥
एकाजनार्दना शरण । निधडी हनुमंता आंगवण ।
अचेतन वानरसैन्य । आला घेवोन विवरांत ॥१०७॥
त्या विवरामाजी उद्बोध । तापसीहनुमंत संवाद ।
तो एकाजनार्दनीं विनोन । परमानंद रामायणीं ॥१०८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां वानरबिलप्रवेशो नाम चतुर्दशोध्यायः ॥ १४ ॥
॥ ओंव्या १०८ ॥ श्लोक २४ ॥ एवं १३२ ॥
GO TOP
|