श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ द्वात्रिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामस्य निधनं मत्वा सीताया विलापः, रावणेन सभां गत्वा मंत्रिभिः सह युद्धविषये मंत्रणम् - श्रीराम मारले गेले यावर विश्वास ठेवून सीतेचा विलाप करणे तसेच रावणाचे सभेत जाऊन मंत्र्यांच्या सल्ल्याने युद्धविषयक उद्योग करणे -
सा सीता तच्छिरो दृष्ट्‍वा तच्च कार्मुकमुत्तमम् ।
सुग्रीवप्रतिसंसर्गं आख्यातं च हनूमता ॥ १ ॥

नयने मुखवर्णं च भर्तुस्तत्सदृशं मुखम् ।
केशान् केशान्तदेशं च तं च चूडामणिं शुभम् ॥ २ ॥

एतैः सर्वैरभिज्ञानैः अभिज्ञाय सुदुःखिता ।
विजगर्हेऽत्र कैकेयीं कोशन्ती कुररी यथा ॥ ३ ॥
सीतेने ते मस्तक आणि ते उत्तम धनुष्य पाहून तसेच हनुमानांनी सांगितलेली सुग्रीवाशी मैत्री-संबंध झाल्याची हकिगत आठवून व आपल्या पतिप्रमाणेच नेत्र, मुखाचा वर्ण, मुखाकृति, केस, ललाट, आणि तो सुंदर चूडामणी पाहिला. या सर्व चिन्हांच्या वरून पतिला ओळखून ती फार दु:खी झाली आणि कुररीप्रमाणे विलाप करीत रडत रडत कैकेयीची निंदा करू लागली- ॥१-३॥
सकामा भव कैकेयि हतोऽयं कुलनंदनः ।
कुलमुत्सादितं सर्वं त्वया कलहशीलया ॥ ४ ॥
कैकेयी ! आता तू सफल मनोरथ होऊन जा. रघुकुळाला आनंदित करणारे हे माझे पतिदेव मारले गेले. तू स्वभावानेच कलह निर्माण करणारी आहेस. तू समस्त रघुकुळाचा संहार करून टाकलास. ॥४॥
आर्येण किं ते कैकेय्याःयि कृतं रामेण विप्रियम् ।
यन्मया चीरवसनं दत्त्वा प्रव्राजितो वनम् ॥ ५ ॥
आर्य श्रीरामांनी कैकेयीचा असा कोणता अपराध केला होता, ज्यासाठी तिने त्यांना चीरवस्त्र देऊन माझ्यासह वनात धाडले होते. ॥५॥
एवमुक्त्वा तु वैदेहीं वेपमाना तपस्विनी ।
जगाम जगतीं बाला छिन्ना तु कदली यथा ॥ ६ ॥
असे म्हणून दु:खाने झोडपली गेलेली तपस्विनी वैदेही बाला थरथर कांपत असता कापून टाकलेल्या कर्दळीप्रमाणे पृथ्वीवर कोसळली. ॥६॥
सा मुहूर्तात् समाश्वस्य प्रतिलभ्य च चेतनाम् ।
तच्छिरः समुपाघ्राय विललापायतेक्षणा ॥ ७ ॥
नंतर एका मुहूर्ताने तिची चेतना परत आली आणि ती विशाललोचना सीता थोडेसे धैर्य धारण करून त्या मस्तकाला आपल्या जवळ ठेऊन विलाप करु लागली- ॥७॥
हा हतास्मि महाबाहो वीरव्रतमनुव्रत ।
इमां ते पश्चिमावस्थां गतास्मि विधवा कृता ॥ ८ ॥
हाय ! महाबाहो ! मी मारली गेले. आपण वीरव्रताचे पालन करणारे होता. आपली ही अंतिम अवस्था मला स्वत:च्या डोळ्यांनी पहावी लागली. आपण मला विधवा बनवून टाकले आहे. ॥८॥
प्रथमं मरणं नार्या भर्तुः वैगुण्यमुच्यते ।
सुवृत्त साधुवृत्तायाः संवृत्तस्त्वं ममाग्रतः ॥ ९ ॥
स्त्रीसाठी तिच्या पतीचे मरण तिच्यासाठी महान्‌ अनर्थकारी दोष सांगितला गेला आहे. मी सती-साध्वी जिवंत असताना माझ्या समोर माझ्या आपल्या सारख्या सदाचारी पतिचे निधन झाले ही माझ्यासाठी महान्‌ दु:खाची गोष्ट आहे. ॥९॥
दुःखाद्दुःखं प्रपन्नाया मग्नायाः शोकसागरे ।
यो हि मामुद्यतस्त्रातुं सोऽपि त्वं विनिपातितः ॥ १० ॥
मी महान्‌ संकटात पडले आहे, शोकाच्या समुद्रात बुडले आहे. जे माझा उद्धार करण्यासाठी उद्यत होते, त्या आपल्यासारख्या वीरालाही शत्रुने मारून टाकले. ॥१०॥
सा श्वश्रूर्मम कौसल्या त्वया पुत्रेण राघव ।
वत्सेनेव यथा धेनुः विवत्सा वत्सला कृता ॥ ११ ॥
राघवा ! रघुनंदना ! ज्याप्रमाणे एखाद्या वासरासंबंधी वात्सल्याने भारलेल्या धेनुला कोणी तिच्या वासरापासून विलग करावे तशी दशा माझी सासु कौसल्या हिची झाली आहे. ती दयामय जननी आपल्या सारख्या पुत्रापासून दुरावली गेली. ॥११॥
उद्दिष्टं दीर्घमायुस्ते दैवज्ञ्यैरपि राघव ।
अनृतं वचनं तेषां अल्पायुरसि राघव ॥ १२ ॥
राघवा ! ज्योतिष्यांनी तर आपण दीर्घायुषी असल्याचे सांगितले होते, परंतु त्यांचे वचन खोटे ठरले. राघवा ! आपण फार अल्पायुषी ठरलात. ॥१२॥
अथवा नश्यति प्रज्ञा प्राज्ञस्यापि सतस्तव ।
पचत्येनं यथा कालो भूतानां प्रभवो ह्ययम् ॥ १३ ॥
अथवा बुद्धिमान्‌ असूनही आपली बुद्धि मारली गेली; तेव्हा तर आपण झोपलेले असता शत्रूंच्या ताब्यात सांपडलात अथवा हा काळच समस्त प्राण्यांच्या उद्‍भवात हेतु आहे. म्हणून तोच प्राणीमात्रांना पक्व करून - त्यांना शुभाशुभ कर्मांच्या फळांनी संयुक्त करतो. ॥१३॥
अदृष्टं मृत्युमापन्नः कस्मात्त्वं नयशास्त्रवित् ।
व्यसनानामुपायज्ञः कुशलो ह्यसि वर्जने ॥ १४ ॥
आपण तर नीतिशास्त्राचे विद्वान होतात. संकटातून वाचण्याचे उपाय जाणत होता आणि संकटांचे निवारण करण्यात कुशल होता तरीही आपल्याला अशा प्रकारे मृत्यु कसा आला की जो दुसर्‍या कुणा वीर पुरुषाला प्राप्त झालेला दिसून आला नव्हता ? ॥१४॥
तथा त्वं संपरिष्वज्य रौद्रयाऽतिनृशंसया ।
कालरात्र्या ममाच्छिद्य हृतः कमललोचन ॥ १५ ॥
कमलनयना ! भीषण आणि अत्यंत क्रूर काळरात्री आपल्याला हृदयाशी धरून, माझ्यापासून हट्टाने हरण करून घेऊन गेली आहे. ॥१५॥
उपशेषे महाबाहो मां विहाय तपस्विनीम् ।
प्रियामिव यथा नारीं पृथिवीं पुरुषर्षभ ॥ १६ ॥
हे पुरूषोत्तमा ! हे महाबाहो ! आपण माझा तपस्विनीचा त्याग करून आपल्या प्रियतम नारीप्रमाणे या पृथ्वीला आलिंगन देऊन येथे झोपला आहात. ॥१६॥
अर्चितं सततं यत्‍नांद् गंधमाल्यैर्मया तव ।
इदं ते मत्प्रियं वीर धनुः काञ्चनभूषणम् ॥ १७ ॥
वीरा ! ज्याचे मी प्रयत्‍नपूर्वक गंध आणि पुष्पमाळा आदिंच्या द्वारा नित्यप्रति पूजन करीत असे आणि जे मला अत्यंत प्रिय होते, तेच हे आपले स्वर्णभूषित धनुष्य आहे. ॥१७॥
पित्रा दशरथेन त्वं श्वशुरेण ममानघ ।
सर्वैश्च पितृभिः सार्धं नूनं स्वर्गे समागतः ॥ १८ ॥
निष्पाप रघुनंदना ! निश्चितच आपण स्वर्गात जाऊन माझे सासरे आणि आपले पिता महाराज दशरथांना तसेच अन्य सर्व पितरांनाही भेटले असाल. ॥१८॥
दिवि नक्षत्रभूतं च महत्कर्मकृतां तथा ।
पुण्यं राजर्षिवंशं त्वं आत्मनः समुपेक्षसे ॥ १९ ॥
आपण पित्याची आज्ञा पालनरूपी महान्‌ कर्म करून अद्‌भुत पुण्याचे उपार्जन करून येथून आपल्या त्या आकाशांत नक्षत्र(**) बनून प्रकाशित होणार्‍या राजर्षिकुळाची उपेक्षा करुन, त्यास सोडून जात आहात. आपण असे करता कामा नये. ॥१९॥
(**- इक्ष्वाकुवंशाचे राजे त्रिशंकु आकाशात नक्षत्र होऊन प्रकाशित होत असतात, त्यांच्यामुळेच क्षत्रिन्यायाने समस्त कुळालाच नक्षत्रकुळ म्हटले जाते.)
किं मां न प्रेक्षसे राजन् किं वा न प्रतिभाषसे ।
बालां बाल्येन संप्राप्तां भार्यां मां सहचारिणीम् ॥ २० ॥
राजन ! आपण आपल्या लहान वयातच,जेव्हा मीही लहान वयाचीच होते मला पत्‍नीरूपाने प्राप्त केलेत. मी सदा आपल्या बरोबर विचरण करणारी आपली सहधर्मिणी आहे. आपण माझ्याकडे का पहात नाही अथवा माझ्या बोलण्याला उत्तर का देत नाही ? ॥२०॥
संश्रुतं गृह्णता पाणिं चरिष्यामीति यत्त्वया ।
स्मर तन्मम काकुत्स्थ नय मामपि दुःखिताम् ॥ २१ ॥
काकुत्स्थ ! माझे पाणिग्रहण करते समयी आपण जी प्रतिज्ञा केली होती की तुझ्यासह धर्माचरण करीन, तिचे स्मरण करा आणि मला दु:खितेलाही बरोबर घेऊन चला. ॥२१॥
कस्मान्मामपहाय त्वं गतो गतिमतां वर ।
अस्माल्लोकादमुं लोकं त्यक्त्वा मामपि दुःखिताम् ॥ २२ ॥
गतिमानात श्रेष्ठ रघुनंदना ! आपण मला आपल्या बरोबर वनांत आणून आणि येथे मला दु:खितेला सोडून या लोकातून परलोकात का बरे निघून गेलात ? ॥२२॥
कल्याणै रुचिरं गात्रं परिष्वक्तं मयैव तु ।
क्रव्यादैस्तच्छरीरं ते नूनं विपरिकृष्यते ॥ २३ ॥
मीच अनेक मंगलमय उपचारांनी युक्त आपल्या ज्या सुंदर श्रीविग्रहास आलिंगन दिले होते, आज त्यालाच मांसभक्षी हिंसक जंतु अवश्यच इकडून तिकडे खेचत असतील. ॥२३॥
अग्निष्टोमादिभिर्यज्ञैः इष्टवानाप्तदक्षिणैः ।
अग्निहोत्रेण संस्कारं केन त्वं तु न लप्स्यसे ॥ २४ ॥
आपण तर पर्याप्त दक्षिणेने युक्त अग्निष्टोम आदि यज्ञांच्या द्वारा भगवान्‌ यज्ञपुरूषाची आराधना केली आहे, मग अग्निहोत्राच्या अग्निने दाहसंस्काराचा सुयोग आपल्याला कुठल्या कारणामुळे मिळत नाही आहे ? ॥२४॥
प्रव्रज्यामुपपन्नानां त्रयाणामेकमागतम् ।
परिप्रेक्ष्यति कौसल्या लक्ष्मणं शोकलालसा ॥ २५ ॥
आपण तीन व्यक्ती एकदमच वनात आलो होतो, परंतु आता शोकाकुळ झालेल्या माता कौसल्येला केवळ एकटा लक्ष्मणच घरी परतलेला दिसू शकेल. ॥२५॥
स तस्याः परिपृच्छन्त्या वधं मित्रबलस्य ते ।
तव चाख्यास्यते नूनं निशायां राक्षसैर्वधम् ॥ २६ ॥
त्यांनी विचारल्यावर लक्ष्मण त्यांना रात्रीच्या समयी राक्षसांच्या हातून आपल्या मित्राची सेना तसेच झोपलेल्या त्या आपल्याही वधाचा समाचार अवश्यच ऐकवतील. ॥२६॥
सा त्वां सुप्तं हतं श्रुत्वा मां च रक्षोगृहं गताम् ।
हृदयेनावदीर्णेन न भविष्यति राघव ॥ २७ ॥
राघवा ! जेव्हा त्यांना ज्ञात होईल की आपण झोपलेले असता मारले गेलात आणि मी राक्षसांचा घरात हरण करून आणली गेलेली आहे तेव्हा त्यांचे हृदय विदीर्ण होऊन जाईल आणि त्या आपल्या प्राणांचा त्याग करतील. ॥२७॥
मम हेतोरनार्याया ह्यनर्हः पार्थिवात्मजः ।
रामः सागरमुत्तीर्य सत्त्ववान् गोष्पदे हतः ॥ २८ ॥
हाय ! माझ्या सारख्या अनार्येमुळे निष्पाप राजकुमार श्रीराम, जे महान्‌ पराक्रमी होते, समुद्र-लंघना सारखे महान्‌ कर्म करूनही गायीच्या खुरात मावेल एवढ्‍या जलात बुडून गेले - युद्ध न करता झोपलेले असता मारले गेले. ॥२८॥
अहं दाशरथेनोढा मोहात् स्वकुलपांसनी ।
आर्यपुत्रस्य रामस्य भार्या मृत्युरजायत ॥ २९ ॥
हाय ! दाशरथी राम माझ्या सारख्या कुलकलंकिनी नारीला मोहवश होऊन विवाह करून घेऊन आले ! पत्‍नी ही आर्यपुत्र श्रीरामांसाठी मृत्युरूप बनली. ॥२९॥
नूनमन्यां मया जातिं वारितं दानमुत्तमम् ।
याहमद्येह शोचामि भार्या सर्वातिथेरिह ॥ ३० ॥
ज्यांच्याकडे सर्वलोक याचक बनून येत असत, सर्व अतिथी ज्यांना प्रिय होते, त्याच श्रीरामांची पत्‍नी होऊनही मी आज शोक करत आहे. त्यावरून असे कळून येत आहे की मी कोण्या मागील जन्मात निश्चितच उत्तम दानधर्मात बाधा आणली होती. ॥३०॥
साधु पातय मां क्षिप्रं रामस्योपरि रावण ।
समानय पतिं पत्‍न्या कुरु कल्याणमुत्तमम् ॥ ३१ ॥
रावणा ! मलाही रामांच्या शवावर ठेवून माझा वध करून टाक. या प्रकारे पतीचे पत्‍नीशी मिलन कर. हे उत्तम कल्याणकारी कार्य आहे, हे अवश्य कर. ॥३१॥
शिरसा मे शिरश्चास्य कायं कायेन योजय ।
रावणानुगमिष्यामि गतिं भर्तुर्महात्मनः ॥ ३२ ॥
रावणा ! माझ्या शिराशी पतीचे शिर आणि माझ्या शरीराशी त्यांच्या शरीराचा संयोग करून दे. याप्रकारे मी आपल्या महात्मा पतिच्या गतिचे अनुसरण करीन. ॥३२॥
इति सा दुःखसन्तप्ता विललापायतेक्षणा ।
भर्तुः शिरो धनुश्चैव ददर्श जनकात्मजा ॥ ३३ ॥
याप्रकारे दु:खाने संतप्त झालेली विशाल लोचना जनकनंदिनी सीता पतिचे मस्तक तसेच धनुष्य पाहू लागली आणि विलाप करू लागली. ॥३३॥
एवं लालप्यमानायां सीतायां तत्र राक्षसः ।
अभिचक्राम भर्त्तारं अनीकस्थः कृताञ्जलिः ॥ ३४ ॥
ज्यावेळी सीता या प्रकारे विलाप करत होती त्याच वेळी तेथे रावणाच्या सैन्यांतील एक राक्षस हात जोडून आपल्या स्वामींच्या जवळ आला. ॥३४॥
विजयस्वार्यपुत्रेति सोऽभिवाद्य प्रसाद्य च ।
न्यवेदयदनुप्राप्तं प्रहस्तं वाहिनीपतिम् ॥ ३५ ॥
त्याने आर्यपुत्र महाराजांचा जय असो असे म्हणून रावणाला अभिवादन केले आणि त्याला प्रसन्न करून सेनापति प्रहस्त आलेले आहेत अशी सूचना दिली. ॥३५॥
अमात्यैः सहितैः सर्वैः प्रहस्तस्त्वामुपस्थितः ।
तेन दर्शनकामेन अहं प्रस्थापिताः प्रभो ॥ ३६ ॥
प्रभो ! सर्व मंत्र्यांच्यासह प्रहस्त महाराजांच्या सेवेत उपस्थित झाले आहेत. ते आपले दर्शन करू इच्छितात म्हणून त्यांनी मला येथे धाडले आहे. ॥३६॥
नूनमस्ति महाराज राजभावात् क्षमान्वित ।
किञ्चिदात्ययिकं कार्यं तेषां त्वं दर्शनं कुरु ॥ ३७ ॥
क्षमाशील महाराज ! निश्चितच काही अत्यंत आवश्यक राजकीय कार्य उपस्थित झाले आहे म्हणून आपण त्यांना दर्शन देण्याचे कष्ट घ्यावे. ॥३७॥
एतच्छुत्वा दशग्रीवो राक्षसप्रतिवेदितम् ।
अशोकवनिकां त्यक्त्वा मंत्रिणां दर्शनं ययौ ॥ ३८ ॥
राक्षसाने सांगितलेली ही गोष्ट ऐकून दशग्रीव रावण अशोक वाटिका सोडून मंत्र्यांना भेटण्यासाठी निघून गेला. ॥३८॥
स तु सर्वं समर्थ्यैव मंत्रिभिः कृत्यमात्मनः ।
सभां प्रविश्य विदधे विदित्वा रामविक्रमम् ॥ ३९ ॥
त्याने मंत्र्यांकडून आपल्या सर्व कृत्याचे समर्थन करविले आणि श्रीरामचंद्रांच्या पराक्रमाची माहिती करून देऊन सभा-भवनात प्रवेश करून तो प्रस्तुत कार्याची व्यवस्था करू लागला. ॥३९॥
अन्तर्धानं तु तच्छीर्षं तच्च कार्मुकमुत्तमम् ।
जगाम रावणस्यैव निर्याणसमनन्तरम् ॥ ४० ॥
रावण तेथून निघून जाताच ते शिर आणि उत्तम धनुष्य दोन्ही अदृश्य झाले. ॥४०॥
राक्षसेन्द्रस्तु तैः सार्धं मंत्रिभिर्भीमविक्रमैः ।
समर्थयामास तदा रामकार्यविनिश्चयम् ॥ ४१ ॥
राक्षसराज रावणाने आपल्या त्या भयानक मंत्र्यांच्या बरोबर बसून रामांच्या प्रति केल्या जाणार्‍या तत्कालोचित कर्तव्याचा निश्चय केला. ॥४१॥
अविदूरस्थितान् सर्वान् बलाध्यक्षान् हितैषिणः ।
अब्रवीत् कालसदृशं रावणो राक्षसाधिपः ॥ ४२ ॥
नंतर राक्षसराज रावणाने जवळच उभा असलेल्या आपल्या हितैषी सेनापतिंना उद्देशून या प्रकारे समयानुकूल गोष्ट सांगितली- ॥४२॥
शीघ्रं भेरीनिनादेन स्फुटं कोणाहतेन मे ।
समानयध्वं सैन्यानि वक्तव्यं च न कारणम् ॥ ४३ ॥
तुम्ही सर्व लोक लगेचच दांड्‍यांनी नगारा वाजवून, भेरींच्या निनादाने समस्त सैनिकांना एकत्रित करा, परंतु त्यांना याचे कारण न सांगता करावे. ॥४३॥
ततस्तथेति प्रतिगृह्य तद्वचः
तदैव दूताः सहसा महद् बलम् ।
समानयंश्चैव समागतं च
न्यवेदयन् भर्तरि युद्धकाङ्‌क्षिणि ॥ ४४ ॥
तेव्हा दूतांनी तथास्तु म्हणून रावणाची आज्ञा स्वीकारली आणि त्याच वेळी एकाएकी विशाल सेनेला एकत्रित केले. मग युद्धाची अभिलाषा बाळगणार्‍या आपल्या स्वामीला सूचना दिली की सारी सेना आलेली आहे. ॥४४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे द्वात्रिंशः सर्गः ॥ ३२ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा बत्तीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥३२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP