श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ षष्ठः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सुग्रीवेण श्रीरामसमक्षे सीताभूषणानां समानयनं श्रीरामस्य शोकरोषमयं वचनं च - सुग्रीवांनी श्रीरामास सीतेची आभूषणे दाखविणे तसेच श्रीरामांचा शोक आणि रोषपूर्ण वचने -
पुनरेवाब्रवीत् प्रीतो राघवं रघुनंदनम् ।
अयमाख्याति मे राम सचिवो मंत्रिसत्तमः । १ ॥

हनुमान् यन्निमित्तं त्वं निर्जनं वनमागतः ।
सुग्रीवाने पुन्हा प्रसन्नतापूर्वक रघुनंदन राघवास म्हटले - ’रामा ! माझ्या मंत्र्यांमध्ये श्रेष्ठ सचिव हे हनुमान् आपल्या विषयी तो सारा वृत्तान्त मला सांगून चुकले आहेत, ज्या कारणाने आपल्याला या निर्जन वनात यावे लागले आहे. ॥१ १/२॥
लक्ष्मणेन सह भ्रात्रा वसतश्च वने तव ॥ २ ॥

रक्षसा ऽपहृता भार्या मैथिली जनकात्मजा ।
त्वया वियुक्ता रुदती लक्ष्मणेन च धीमता ॥ ३ ॥

अंतरप्रेप्सुना तेन हत्वा गृध्रं जटायुषम् ।
भार्यावियगजं दुःखं प्रापितस्तेन रक्षसा ॥ ४ ॥
’आपला भाऊ लक्ष्मण यांच्यासह आपण जेव्हा वनात निवास करीत होता त्या समयी राक्षस रावणाने आपली पत्‍नी जनकनंदिनी मैथिली सीता हिचे हरण केले. त्यावेळी आपण तिच्यापासून दूर होता आणि बुद्धिमान् लक्ष्मणही तिला एकटी सोडून निघून गेले होते. राक्षस अशा वेळेच्याच शोधात होता. त्याने गृध्र जटायुचा वध करून, रडत असलेल्या सीतेचे अपहरण केले याप्रकारे त्या राक्षसाने आपल्याला पत्‍नी-वियोगाच्या कष्टात (दुःखात) टाकले आहे. ॥२-४॥
भार्यावियोगजं दुःखमचिरात्त्वं विमोक्ष्यसे ।
अहं तामानयिष्यामि नष्टां वेदश्रुतीमिव ॥ ५ ॥
’परंतु या पत्‍नी-वियोगाच्या दुःखातून आपण शीघ्रच मुक्त व्हाल. मी राक्षसद्वारा हरण केल्या गेलेल्या वेदवाणी समान आपल्या पत्‍नीला परत आणून देईन. ॥५॥
रसातले वा वर्तंतीं वर्तंतीं वा नभस्तले ।
अहमानीय दास्यामि तव भार्यामरिंदम ॥ ६ ॥
’शत्रुदमन श्रीरामा ! आपली भार्या सीता पाताळात असली अथवा आकाशात असली तरी मी तिला शोधून काढून आपल्या सेवेत समर्पित करीन. ॥६॥
इदं तथ्यं मम वचस्त्वमवेहि च राघव ।
न शक्या सा जरयितुमपि सेंद्रैः सुरासुरैः ॥ ७ ॥

तव भार्या महाबाहो भक्ष्यं विषकृतं यथा ।
त्यज शोकं महाबाहो तां कांतमानयामि ते ॥ ८ ॥
’हे राघव ! आपण माझ्या या वचनास सत्य मानावे. महाबाहो ! आपली पत्‍नी विष मिसळलेल्या भोजनाप्रमाणे दुसर्‍यांसाठी अग्राह्य आहे. इंद्रासहित संपूर्ण देवता आणि असुरही तिला पचवू शकत नाहीत. आपण शोकाचा त्याग करावा. मी आपल्या प्राणवल्लभेला अवश्य आणून देईन. ॥७-८॥
अनुमानात्तु जानामि मैथिली सा न संशयः ।
ह्रियमाणा मया दृष्टा रक्षसा क्रूरकर्मणा ॥ ९ ॥

क्रोशंती राम रामेति लक्ष्मणेति च विस्वरम् ।
स्फुरंती रावणस्याङ्‌केम पन्नगेंद्रवधूर्यथा ॥ १० ॥
’एक दिवस मी पाहिले की भयंकर कर्म करणारा कुणी राक्षस कुणा स्त्रीला घेऊन चालला होता, मला अनुमानाने असे वाटते आहे की ती मैथिली सीताच असावी, यात संशय नाही कारण ती अडखळत्या स्वरांत ’हा राम ! हा राम ! हा लक्ष्मण !’ असे म्हणत रडत होती, तसेच रावणाच्या मांडीवर नागराजाच्या वधुप्रमाणे (नागिणी प्रमाणे) तडफडत असलेली भासत होत होती. ॥९-१०॥
आत्मना ऽञ्चमं मां हि दृष्ट्‍वा शैलतटे स्थितम् ।
उत्तरीयं तया त्यक्तं शुभान्याभरणानि च ॥ ११ ॥
’चार मंत्र्यांसहित आणि मी पाचवा या शैल शिखरावर बसलेलो होतो. मला पाहून देवी सीतेने आपले उत्तरीय आणि काही सुंदर आभूषणे वरून खाली फेकून दिली. ॥११॥
तान्यस्माभिर्गृहीतानि निहितानि च राघव ।
आनयिष्याम्यहं तानि प्रत्यभिज्ञातुमर्हसि ॥ १२ ॥
’राघवा ! या सर्व वस्तू आम्ही लोकांनी घेऊन ठेऊन दिल्या आहेत. मी त्या आत्ताच आणतो. आपण त्या ओळखू शकाल ?. ॥१२॥
तमब्रवीत्ततो रामः सुग्रीवं प्रियवादिनम् ।
आनयस्व सखे शीघ्रं किमर्थं प्रविलंबसे ॥ १३ ॥
तेव्हा श्रीरामांनी हा प्रिय संवाद ऐकविणार्‍या सुग्रीवास म्हटले- ’सख्या ! लवकर घेऊन ये, का विलंब करीत आहेस ?’ ॥१३॥
एवमुक्तस्तु सुग्रीवः शैलस्य गहनां गुहाम् ।
प्रविवेश ततः शीघ्रं राघवप्रियकाम्यया ॥ १४ ॥

उत्तरीयं गृहीत्वा तु शुभान्याभरणानि च ।
इदं पश्येति रामाय दर्शयामास वानरः ॥ १५ ॥
त्यांनी असे म्हटल्यावर सुग्रीव तात्काळच राघवांचे प्रिय करण्याच्या इच्छेने पर्वताच्या एका गहन गुहेत गेले आणि उत्तरीय तसेच ती आभूषणे घेऊन बाहेर आले. बाहेर येऊन वानरराजाने ’घ्यावे, हे पहावे !’ असे म्हणून श्रीरामांना ती सारी आभूषणे दाखविली. ॥१४-१५॥
ततो गृहीत्वा तद्वासः शुभान्याभरणानि च ।
अभवद्बावष्पसंरुद्धो नीहारेणेव चंद्रमाः ॥ १६ ॥
ते वस्त्र आणि सुंदर आभूषणांना घेऊन श्रीराम धुक्याने झांकाळलेल्या चंद्रम्यासारखे अश्रूंनी अवरूद्ध झाले. ॥१६॥
सीतास्नेहप्रवृत्तेन स तु बाष्पेण दूषितः ।
हा प्रियेति रुदन् धैर्यमुत्सृज्य न्यपतत् क्षितौ ॥ १७ ॥
सीतेवरील स्नेहामुळे वाहणार्‍या अश्रूंच्यामुळे त्यांचे मुख आणि वक्षस्थळ भिजू लागले. ते ’हा प्रिये’ असे म्हणून रडू लागले आणि धैर्य सोडून पृथ्वीवर पडले. ॥१७॥
हृदि कृत्वा तु बहुशस्तमलङ्‌काेरमुत्तमम् ।
निशश्वास भृशं सर्पो बिलस्थ इव रोषितः ॥ १८ ॥
त्या उत्तम आभूषणांना वारंवार हृदयाशी धरून ते बिळात बसून रोषाने भरलेल्या सर्पाप्रमाणे जोरजोराने श्वास घेऊ लागले. ॥१८॥
अविच्छिन्नाश्रुवेगस्तु सौमित्रिं वीक्ष्य पार्श्वतः ।
परिदेवयितुं दीनं रामः समुपचक्रमे ॥ १९ ॥
त्यांच्या अश्रूंचा वेग थांबतच नव्हता. आपल्या जवळ उभा असलेल्या सैमित्राकडे पाहून राम दीनभावाने विलाप करीत म्हणाले- ॥१९॥
पश्य लक्ष्मण वैदेह्या संत्यक्तं ह्रियमाणया ।
उत्तरीयमिदं भूमै शरीराद्‌भूिषणानि च ॥ २० ॥
’लक्ष्मणा ! पहा, राक्षसाच्या द्वारा हरण केल्या जाणार्‍या वैदेही सीतेने हे उत्तरीय आणि हे अलंकार आपल्या शरीरावरून उतरवून पृथ्वीवर फेकून दिले आहेत. ॥२०॥
शाद्वलिन्यां ध्रुवं भूम्यां सीतया ह्रियमाणया ।
उत्सृष्टं भूषणमिदं तथारूपं हि दृश्यते ॥ २१ ॥
’निशाचराच्या द्वारा अपह्रत होत असलेल्या सीतेच्या द्वारे त्यागिले गेलेली ही आभूषणे निश्चितच गवत असलेल्या प्रुथ्वीवर पडली असावीत- कारण की त्यांचे रूप जसेच्या तसे दिसून येत आहे- ते तुटले- फुटलेले नाहीत’. ॥२१॥
एवमुक्तस्तु रामेण लक्ष्मणो वाक्यमब्रवीत् ।
नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले ॥ २२ ॥

नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवंदनात् ।
श्रीरामांनी असे म्हटल्यावर लक्ष्मण म्हणाले- ’बंधो ! मी या बाजूबंदांना तर जाणत नाही आणि या कुण्डलांनाही जाणू शकत नाही की ही कोणाची आहेत, परंतु प्रतिदिन वहिनींच्या चरणीं प्रणाम करण्यामुळे मी या दोन्ही नुपुरांना अवश्य ओळखतो.’ ॥२२ १/२॥
ततः स राघवो दीनः सुग्रीवमिदमब्रवीत् ॥ २३ ॥

ब्रूहि सुग्रीव कं देशं ह्रियंती लक्षिता त्वया ।
रक्षसा रौद्ररूपेण मम प्राणैः प्रिया प्रिया ॥ २४ ॥
तेव्हा राघव सुग्रीवास याप्रकारे म्हणाले- ’सुग्रीवा ! तुम्ही तर पाहिलेच आहे, तो भयंकर रूपधारी राक्षस माझ्या प्राणप्रिय सीतेला कोणत्या दिशेकडे घेऊन गेला आहे, ते तरी सांगा.’ ॥२३-२४॥
क्व वा वसति तद्रक्षो महद्व्यसनदं मम ।
यन्निमित्तमहं सर्वान् नाशयिष्यामि राक्षसान् ॥ २५ ॥
’मला महान् संकट देणारा तो राक्षस कोठे राहातो आहे ? मी केवळ त्याच्या अपराधांमुळे समस्त राक्षसांचा विनाश करून टाकीन. ॥२५॥
हरता मैथिलीं येन मां च रोषयता भृशम् ।
आत्मनो जीवितांताय मृत्युद्वारमपावृतम् ॥ २६ ॥
’त्या राक्षसाने मैथिलीचे अपहरण करून माझा रोष वाढवून निश्चितच आपल्या जीवनाचा अंत करण्यासाठी मृत्युचे द्वारच उघडले आहे. ॥२६॥
मम दयिततमा हृता वनाद्
रजनिचरेण विमथ्य येन सा ।
कथम मम रिपुं त्वमद्य वै
प्लवगपते यमसादनं नयामि ॥ २७ ॥
’वानरराज ! ज्या निशाचराने मला धोका देऊन माझा अपमान करून माझ्या प्रियतमेचे वनातून अपहरण केले आहे, तो माझा घोर शत्रु आहे. तुम्ही त्याचा पत्ता लावा. मी त्याला आत्ता यमराजाच्या जवळ पोहोचवितो.’ ॥२७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा सहावा सर्ग पूरा झाला. ॥६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP