[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ सप्तदशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्याश्रमे शूर्पणखाया आगमनं तस्य परिचयं ज्ञात्वा स्वात्मनः परिचयं दत्त्वाऽऽत्मानं भार्यारूपतया ग्रहीतुं तं प्रति तस्या अनुरोधः -
श्रीरामांच्या आश्रमात शूर्पणखेच येणे, त्यांच्या परिचय जाणणे आणि आपला परिचय देऊन त्यांनी आपले भार्यारूपाने ग्रहण करावे यासाठी अनुरोध करणे -
कृताभिषेको रामस्तु सीता सौमित्रिरेव च ।
तस्माद् गोदावरीतीरात् ततो जग्मुः स्वामाश्रमम् ॥ १ ॥
स्नान करून श्रीराम, लक्ष्मण आणि सीता ही तिघेही त्या गोदावरीच्या तटावरून आपल्या आश्रमात परत आली. ॥१॥
आश्रमं तमुपागम्य राघवः सह लक्ष्मणः ।
कृत्वा पौर्वह्णिकं कर्म पर्णशालामुपागमत् ॥ २ ॥
त्या आश्रमात परत येऊन लक्ष्मणासहित श्रीरामांनी पूर्वाह्नकाळची होम-पूजन आदि कार्ये पूर्ण केली आणि नंतर ते दोघे भाऊ पर्णशाळेत येऊन बसले. ॥२॥
उवास सुखितस्तत्र पूज्यमानो महर्षिभिः ।
स रामः पर्णशालायामासीनः सह सीतया ॥ ३ ॥

विरराज महाबाहुश्चित्रया चन्द्रमा इव ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा चकार विविधाः कथाः ॥ ४ ॥
तेथे सीतेसह ते सुखपूर्वक राहू लागले. त्या दिवसात मोठ मोठे ऋषि-मुनि येऊन तेथे त्यांचा सत्कार करीत होते. पर्णशाळेत सीतेसहित बसलेले महाबाहु श्रीरामचंद्र चित्रे बरोबर विराजमान चंद्रम्या प्रमाणे शोभून दिसत होते. ते आपला भाऊ लक्ष्मण याजबरोबर नाना प्रकारच्या गोष्टी बोलत असत. ॥३-४॥
तदासीनस्य रामस्य कथासंसक्तचेतसः ।
तं देशं राक्षसी काचिदाजगाम यदृच्छया ॥ ५ ॥

सा तु शूरर्पणखा नाम दशग्रीवस्य रक्षसः ।
भगिनी राममासाद्य ददर्श त्रिदशोपमम् ॥ ६ ॥
एकदा श्रीराम लक्ष्मणाबरोबर गप्पागोष्टी करीत बसले असता एक राक्षसी अकस्मात त्या स्थानावर येऊन पोहोचली. ती दशमुख राक्षस रावणाची बहीण शूर्पणखा होती. तिने तेथे येऊन देवतांच्या प्रमाणे मनोहर रूप असलेल्या श्रीरामचंद्रांना पाहिले. ॥५-६॥
दीप्तास्यं च महाबाहुं पद्मपत्रायतेक्षणम् ।
गजविक्रान्तगमनं जटामण्डलधारिणम् ॥ ७ ॥
त्यांचे मुख तेजस्वी, भुजा मोठ मोठ्या, नेत्र प्रफुल्लित कमलदला समान विशाल आणि सुंदर होते. ते हत्ती प्रमाणे मंद गतीने चालत होते. त्यांनी मस्तकावर जटामण्डल धारण केलेले होते. ॥७॥
सुकुमारं महासत्त्वं पार्थिवव्यञ्जनान्वितम् ।
राममिन्दीवरश्यामं कन्दर्पसदृशप्रभम् ॥ ८ ॥
परम सुकुमार, महान बलशाली, राजोचित लक्षणांनी युक्त, नील कमला प्रमाणे श्याम कांतिने सुशोभित, कामदेवासमान सौन्दर्यशाली तसेच इंद्राप्रमाणे तेजस्वी श्रीरामांना पहाताच ती राक्षसी कामाने मोहित झाली. ॥८॥
बभूवेन्द्रोपमं दृष्टवा राक्षसी काममोहिता ।
सुमुखं दुर्मुखी रामं वृत्तमध्यं महोदरी ॥ ९ ॥

विशालाक्षं विरूपाक्षी सुकेशं ताम्रमूर्धजा ।
प्रियरूपं विरूपा सा सुस्वरं भैरवस्वना ॥ १० ॥
श्रीरामांचे मुख सुंदर होते आणि शूर्पणखेचे मुख फारच वाईट आणि कुरूप होते. श्रीरामांचा मध्यभाग (कटिप्रदेश आणि उदर) क्षीण होता परंतु शूर्पणखा बेडौल आणि मोठे पोट असलेली होती. श्रीरामांचे डोळे मोठमोठे असल्याने मनोहर होते परंतु त्या राक्षसीचे नेत्र कुरूप आणि भयानक होते. रघुनाथांचे केस स्निग्ध आणि सुंदर होते. परंतु त्या निशाचरीच्या मस्तकावरील केस तांब्यासारखे लाल होते. श्रीरामांचे रूप अतिशय प्रिय वाटत होते परंतु शूर्पणखेचे रूप वीभत्स आणि विकराल होते. श्रीराम मधुर स्वरात बोलत होते, परंतु ती राक्षसी भैरवनाद करणारी होती. ॥९-१०॥
तरुणं दारुणा वृद्धा दक्षिणं वामभाषिणी ।
न्यायवृत्तं सुदुर्वृत्ता प्रियमप्रियदर्शना ॥ ११ ॥
हे दिसण्यात सौम्य आणि नित्य नूतन तरूण होते परंतु ती निशाचरी क्रूर आणि हजारो वर्षाची वृद्धा होती. ते सरलतेने बोलणारे होते आणि उदार होते; परंतु शूर्पणखेच्या बोलण्यात कुटिलता भरलेली होती. हे न्यायोचित सदाचाराचे पालन करणारे होते आणि ती अत्यंत दुराचारिणी होती. श्रीराम दिसण्यात प्रिय वाटत होते आणि शूर्पणखेला पाहूनच घृणा उत्पन्न होत होती. ॥११॥
शरीरजसमाविष्टा राक्षसी राममब्रवीत् ।
जटी तापसरूपेण सभार्यः शरचापधृक् ॥ १२ ॥

आगतस्त्वमिमं देशं कथं राक्षससेवितम् ।
किमागमनकृत्यं ते तत्त्वमाख्यातुमर्हसि ॥ १३ ॥
तर ती राक्षसी कामभावाने आविष्ट होऊन (मनोहर रूप धारण करून) श्रीरामांच्या जवळ आली आणि म्हणाली -’ तपस्व्याच्या वेषामध्ये मस्तकावर जटा धारण करून बरोबर स्त्रीला घेऊन आणि हातात धनुष्य- बाण ग्रहण करून या राक्षसांच्या देशात तुम्ही कसे निघून आलात ? येथे तुमच्या आगमनाचे काय प्रयोजन आहे ? हे सर्व मला ठीक ठीक सांगा.’ ॥१२-१३॥
एवमुक्तस्तु राक्षस्या शूर्पणख्या परंतपः ।
ऋजुबुद्धितया सर्वमाख्यातुमुपचक्रमे ॥ १४ ॥
राक्षसी शूर्पणखेने अशा प्रकारे विचारल्यावर शत्रूंना संताप देणार्‍या श्रीरामचंद्रांनी आपल्या सरल स्वभावामुळे सर्व काही सांगण्यास आरंभ केला. ॥१४॥
आसीद् दशरथो नाम राजा त्रिदशविक्रमः ।
तस्याहमग्रजः पुत्रो रामो नाम जनैः श्रुतः ॥ १५ ॥
देवी ! दशरथ नावाने प्रसिद्ध एक चक्रवर्ती राजे होऊन गेले; जे देवतांच्या प्रमाणे पराक्रमी होते. मी त्यांचाच ज्येष्ठ पुत्र आहे आणि लोकांमध्ये राम नावाने विख्यात आहे. ॥१५॥
भ्रातायं लक्ष्मणो नाम यवीयान् मामनुव्रतः ।
इयं भार्या च वैदेही मम सीतेति विश्रुता ॥ १६ ॥
हे माझे लहान भाऊ लक्ष्मण आहेत जे सदा माझ्या आज्ञेच्या अधीन राहातात आणि ही माझी पत्‍नी आहे, जी विदेहराज जनकांची कन्या असून सीता नावाने प्रसिद्ध आहे. ॥१६॥
नियोगात् तु नरेन्द्रस्य पितुर्मातुश्च यन्त्रितः ।
धर्मार्थं धर्मकाङ्‌क्षी च वनं वस्तुमिहागतः ॥ १७ ॥
’आपले पिता दशरथ आणि माता कैकेयीच्या आज्ञेने प्रेरित होऊन मी धर्मपालनाची इच्छा ठेवून धर्मरक्षणाच्याच उद्देशाने या वनात निवास करण्यासाठी येथे आलो आहे. ॥१७॥
त्वां तु वेदितुमिच्छामि कस्य त्वं कासि कस्य वा ।
त्वं हि तावन्मनोज्ञाङ्‌गी राक्षसी प्रतिभासि मे ॥ १८ ॥

इह वा किन्निमित्तं त्वमागता ब्रूहि तत्त्वतः ।
’आता मी तुमचा परिचय प्राप्त करू इच्छितो. तुम्ही कोणाची पुत्री आहात ? तुमचे नाव काय आहे ? आणि कुणाची पत्‍नी आहांत ? तुमचे अङ्‌ग इतके मनोहर आहे की तुम्ही मला इच्छेनुसार रूप धारण करणारी कुणी राक्षसी प्रतीत होता आहात. तुम्ही येथे कशासाठी आला आहांत ? हे ठीक ठीक सांगा.’ ॥१८ १/२॥
साब्रवीद् वचनं श्रुत्वा राक्षसी मदनार्दिता ॥ १९ ॥

श्रूयतां राम तत्त्वार्थं वक्ष्यामि वचनं मम ।
अहं शूर्पणखा नाम राक्षसी कामरूपिणी ॥ २० ॥
श्रीरामचंद्रांचे हे बोलणे ऐकून ती राक्षसी कामाने पीडित होऊन म्हणाली - ’श्रीराम ! मी सर्व काही ठीक ठीक सांगत आहे. तुम्ही माझे म्हणणे ऐका. माझे नाव शूर्पणखा आहे आणि मी इच्छानुसार रूप धारण करणारी राक्षसी आहे. ॥१९-२०॥
अरण्यं विचरामीदमेका सर्वभयंकरा ।
रावणो नाम मे भ्राता यदि ते श्रोत्रमागतः ॥ २१ ॥
’मी समस्त प्राण्यांच्या मना मध्ये भय उत्पन्न करीत या वनात एकटीच विचरण करीत असते. माझ्या भावाचे नाव रावण आहे. संभव आहे की त्याचे नाव तुमच्या कानापर्यंत पोहोचले असेल. ॥२१॥
वीरो विश्रवसः पुत्रो यदि ते श्रोत्रमागतः ।
प्रवृद्धनिद्रश्च सदा कुम्भकर्णो महाबलः ॥ २२ ॥
’रावण विश्रवा मुनिंचा वीर पुत्र आहे; ही गोष्ट तुमच्या ऐकण्यात आली असेल. माझा दुसरा भाऊ महाबली कुम्भकर्ण आहे, ज्याची निद्रा सदाच वाढत राहात असते. ॥२२॥
विभीषणस्तु धर्मात्मा न तु राक्षसचेष्टितः ।
प्रख्यातवीर्यौ च रणे भ्रातरौ खरदूषणौ ॥ २३ ॥
’माझ्या तिसर्‍या भावाचे नाम विभीषण आहे, परंतु तो धर्मात्मा आहे, राक्षसांच्या आचार- विचाराचे तो कधी पालन करीत नाही. युद्धात ज्यांचा पराक्रम विख्यात आहे ते खर आणि दूषण ही माझेच भाऊ आहेत.’ ॥२३॥
तानहं समतिक्रान्ता राम त्वा पूर्वदर्शनात् ।
समुपेतास्मि भावेन भर्तारं पुरुषोत्तमम् ॥ २४ ॥
’श्रीरामा ! बल आणि पराक्रमात मी आपल्या त्या सर्व भावांपेक्षा अधिक वरचढ आहे. तुमच्या प्रथम दर्शनानेच माझे मन तुमच्या ठिकाणी आसक्त होऊन गेले आहे. ( अथवा तुमचे रूप-सौंदर्य अपूर्व आहे. आजच्या आधी देवतांमध्येही कुणाचे असे रूप माझ्या पहाण्यात आलेले नाही; म्हणून या अपूर्व रूपाच्या दर्शनाने मी तुमच्याकडे आकृष्ट झालेली आहे.) ह्याच कारणामुळे मी तुमच्या सारख्या पुरुषोत्तम संबंधी पतिची भावना ठेवून मोठ्या प्रेमाने तुमच्या जवळ आले आहे. ॥२४॥
अहं प्रभावसम्पन्ना स्वच्छन्दबलगामिनी ।
चिराय भव भर्ता मे सीतया किं करिष्यसि ॥ २५ ॥
’मी प्रभावाने (उत्कृष्ट भाव- अनुराग अथवा महान बल-पराक्रमाने) संपन्न आहे. आणि आपल्या इच्छेने आणि शक्तीने समस्त लोकात विचरण करू शकते, म्हणून आता तुम्ही दीर्घकाळासाठी माझे पती बनून जा. या अबला सीतेला घेऊन काय करणार आहात ? ॥२५॥
विकृता च विरूपा च न चेयं सदृशी तव ।
अहमेवानुरूपा ते भार्यारूपेण पश्य माम् ॥ २६ ॥
’ही विकारयुक्त आणि कुरूप आहे म्हणून तुमच्या योग्य नाही आहे. मी च तुमच्या अनुरूप आहे, म्हणून मला आपल्या भार्येच्या रूपात पहा. ॥२६॥
इमां विरूपामसतीं करालां निर्णतोदरीम् ।
अनेन सह ते भ्रात्रा भक्षयिष्यामि मानुषीम् ॥ २७ ॥
’ही सीता माझ्या दृष्टी मध्ये कुरूप, तुच्छ, विकृत, खपाटीला पोट गेलेली आणि मानवी आहे; मी हिला तुझ्या या भावा सहितच खाऊन टाकीन.’ ॥२७॥
ततः पर्वतशृङ्‌गाणि वनानि विविधानि च ।
पश्यन् सह मया कामी दण्डकान् विचरिष्यसि ॥ २८ ॥
’मग तुम्ही कामभावयुक्त होऊन माझ्या बरोबर पर्वतीय शिखरे आणि नाना प्रकारची वनांची शोभा पहात दण्डक वनात विहार करा.’ ॥२८॥
इत्येवमुक्तः काकुत्स्थः प्रहस्य मदिरेक्षणाम् ।
इदं वचनमारेभे वक्तुं वाक्यविशारदः ॥ २९ ॥
शूर्पणखेने असे म्हटल्यावर बोलण्यात कुशल काकुत्स्थ श्रीराम मोठमोठ्याने हसू लागले. नंतर त्यांनी त्या मदिराक्षी निशाचरीला या प्रमाणे सांगण्यास आरंभ केला. ॥२९॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे सप्तदशः सर्गः ॥ १७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा सत्रावा सर्ग पूरा झाला. ॥१७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP