सौवर्णमृगरूपं धारयित्वा मारीचस्य श्रीरामाश्रमे गमनं सीताकर्तृकं तस्य दर्शनं च -
|
मारीचाचे सुवर्णमय मृगरूप धारण करून श्रीरामांच्या आश्रमावर जाणे आणि सीतेने त्यास पहाणे -
|
एवमुक्त्वा तु परुषं मारीचो रावणं ततः ।
गच्छावेत्यब्रवीद् दीनो भयाद् रात्रिंचरप्रभोः ॥ १ ॥
|
रावणाला या प्रमाणे कठोर वचन बोलून त्या निशाचर राजाच्या भयाने दुःखी झालेल्या मारीचाने म्हटले- चला जाऊ या ! ॥१॥
|
दृष्टश्चाहं पुनस्तेन शरचापासिधारिणा ।
मद्वधोद्यतशस्त्रेण विनष्टं जीवितं च मे ॥ २ ॥
|
माझ्या वधासाठी ज्यांचे हत्यार सदा उचललेलेच असते त्या धनुष्य-बाण आणि तलवार धारण करणार्या श्रीरामचंद्रांनी जर परत मला पाहिले तर माझ्या जीवनाचा अंत निश्चितच आहे. ॥२॥
|
नहि रामं पराक्रम्य जीवन् प्रतिनिवर्तते ।
वर्तते प्रतिरूपोऽसौ यमदण्डहतस्य ते ॥ ३ ॥
|
श्रीरामचंद्रांच्या समोर पराक्रम दाखवून कुणी जिवंत परत येऊ शकत नाही. तुम्ही यमदण्डाने मारले गेलेले आहात (म्हणून त्यांना भिडण्याचा विचार करीत आहात.) ते श्रीराम तुमच्यासाठी यमदण्डाप्रमाणेच आहेत. ॥३॥
|
किं नु कर्तुं मया शक्यं एवं त्वयि दुरात्मनि ।
एष गच्छाम्यहं तात स्वस्ति तेऽस्तु निशाचर ॥ ४ ॥
|
परंतु जर तुम्ही या प्रकारे दुष्टता करण्यासच सिद्ध झाला आहात तर मी काय करू शकतो ? चला, हा मी निघालो. तात ! निशाचरा ! तुमचे कल्याण असो. ॥४॥
|
प्रहृष्टस्त्वभवत् तेन वचनेन स राक्षसः ।
परिष्वज्य सुसंश्लिष्टमिदं वचनमब्रवीत् ॥ ५ ॥
|
मारीचाच्या त्या वचनाने राक्षस रावण फार प्रसन्न झाला आणि त्याला घट्ट हृदयाशी धरून या प्रकारे म्हणाला- ॥५॥
|
एतच्छौटीर्ययुक्तं ते मच्छन्दवशवर्तिनः ।
इदानीमसि मारीचः पूर्वमन्यो हि राक्षसः ॥ ६ ॥
|
आता तू शौर्याची गोष्ट बोलला आहेस. कारण आता तू माझ्या इच्छेला वश झाला आहेस. या वेळी तू खरा मारीच आहेस. प्रथम तुझ्यात दुसर्या कोणाचा तरी आवेश (संचार) झाला होता. ॥६॥
|
आरुह्यतामयं शीघ्रं खगो रत्न विभूषितः ।
मया सह रथो युक्तः पिशाचवदनैः खरैः ॥ ७ ॥
|
हा रत्नांनी विभूषित माझा आकाशगामी रथ तयार आहे. याला पिशाच्यांसारखी मुखे असलेली गाढवे जोडली आहेत. यावर माझ्या बरोबर चटकन् बसून जा. ॥७॥
|
प्रलोभयित्वा वैदेहीं यथेष्टं गन्तुमर्हसि ।
तां शून्ये प्रसभं सीतामानयिष्यामि मैथिलीम् ॥ ८ ॥
|
(तुझ्यावर एकच काम आहे) वैदेही सीतेच्या मनात स्वतःविषयी लोभ उत्पन्न कर. तिला लोभ उत्पन्न करून तुझी इच्छा असेल तिकडे तू जाऊ शकतोस. आश्रम शून्य झाल्यावर मी मैथिली सीतेला जबरदस्तीने उचलून आणीन. ॥८॥
|
ततस्तस्थेत्युवाचैनं रावणं ताटकासुतः ।
ततो रावणमारीचौ विमानमिव तं रथम् ॥ ९ ॥
आरुह्याययतुः शीघ्रं तस्मादाश्रममण्डलात् ।
|
तेव्हा ताटकासुत मारीचाने रावणास म्हटले - तथास्तु असेच होऊ दे. तदनंतर रावण आणि मारीच दोघेही त्या विमानाकार रथावर बसून तात्काळच त्या आश्रममण्डलाकडे निघाले. ॥९ १/२॥
|
तथैव तत्र पश्यन्तौ पत्तनानि वनानि च ॥ १० ॥
गिरींश्च सरितः सर्वा राष्ट्राणि नगराणि च ।
समेत्य दण्डकारण्यं राघवस्याश्रमं ततः ॥ ११ ॥
ददर्श सहमारीचो रावणो राक्षसाधिपः ।
|
मार्गात पूर्वीप्रमाणे अनेकानेक पट्टणे, वने, पर्वत, समस्त नद्या, राष्ट्रे आणि नगरे पहात त्या दोघांनी दण्डकारण्यात प्रवेश केला आणि तेथे मारीचासहित राक्षसराज रावणाने श्रीरामांचा आश्रम पाहिला. ॥१०-११ १/२॥
|
अवतीर्य रथात् तस्मात् ततः काञ्चनभूषणात् ॥ १२ ॥
हस्ते गृहीत्वा मारीचं रावणो वाक्यमब्रवीत् ।
|
तेव्हा त्या सुवर्णभूषित रथांतून उतरून रावणाने मारीचाचा हात आपल्या हातात घेऊन त्यास म्हटले- ॥१२ १/२॥
|
एतद् रामाश्रमपदं दृश्यते कदलीवृतम् ॥ १३ ॥
क्रियतां तत् सखे शीघ्रं यदर्थं वयमागताः ।
|
सख्या ! हा केळीनी घेरलेला रामाचा आश्रम दिसून येत आहे. आतां लवकरच, ज्यासाठी आपण येथे आलो आहोत ते कार्य कर. ॥१३ १/२॥
|
स रावणवचः श्रुत्वा मारीचो राक्षसस्तदा ॥ १४ ॥
मृगो भूत्वाऽऽश्रमद्वारि रामस्य विचचार ह ।
|
रावणाचे बोलणे ऐकून राक्षस मारीच त्या समयी मृगाचे रूप धारण करून श्रीरामाच्या आश्रमाच्या द्वारावरून विचरू लागला. ॥१४ १/२॥
|
स तु रूपं समास्थाय महद् अद्भुतदर्शनम् ॥ १५ ॥
मणिप्रवरशृङ्गाग्रः सितासितमुखाकृतिः ।
रक्तपद्मोत्पलमुख इन्द्रनीलोत्पलश्रवाः ॥ १६ ॥
किञ्चिदभ्युन्नतग्रीव इन्द्रनीलनिभोदरः ।
मधूकनिभपार्श्वश्च कञ्जकिञ्जल्कसंनिभः ॥ १७ ॥
|
त्यावेळी त्याने दिसण्यात फारच अद्भुत रूप धारण केले होते. त्याच्या शिंगाचा वरचा भाग इंद्रनील नामक श्रेष्ठ मण्यांचा बनविलेला असावा असे वाटत होते. मुखमण्डलावर पांढर्या आणि काळ्या रंगाचे ठिपके होते आणि मुखाचा रंग लाल कमलाप्रमाणे होता. त्याचे कान नीलकमलासमान होते आणि मान थोडीशी उंच होती. उदराचा भाग इंद्रनीलमण्याची कान्ती धारण करीत होता. पार्श्वभाग मोहाच्या फुलाप्रमाणे श्वेतवर्णाचा होता, शरीराचा सोनेरी रंग कमलाच्या केसराप्रमाणे सुशोभित होत होता. ॥१५-१७॥
|
वैदूर्यसंकाशखुरस्तनुजङ्घः सुसंहतः ।
इन्द्रायुधसवर्णेन पुच्छेनोर्ध्वं विराजितः ॥ १८ ॥
|
त्याचे खूर वैडूर्यमण्याप्रमाणे, पोट पातळ आणि शेपटी वरून इंद्रधनुष्याच्या रंगाची होती, जिच्यामुळे त्याचे सुसंगठित शरीर विशेष शोभून दिसत होते. ॥१८॥
|
मनोहरस्निग्धवर्णो रत्नैर्नानाविधैर्वृतः ।
क्षणेन राक्षसो जातो मृगः परमशोभनः ॥ १९ ॥
|
त्याच्या देहाची कांति खूपच मनोहर आणि तुकतुकीत होती. तो नाना प्रकारच्या रत्नमयी ठिपक्यांनी विभूषित दिसून येत होता. राक्षस मारीच क्षणभरातच परम शोभाशाली मृग बनला. ॥१९॥
|
वनं प्रज्वलयन् रम्यं रामाश्रमपदं च तत् ।
मनोहरं दर्शनीयं रूपं कृत्वा स राक्षसः ॥ २० ॥
प्रलोभनार्थं वैदेह्या नानाधातुविचित्रितम् ।
विचरन् गच्छते सम्यक् शाद्बलानि समन्ततः ॥ २१ ॥
|
वैदेहीला प्रलोभन दाखविण्यासाठी विविध धातुंनी चित्रित मनोहर आणि दर्शनीय रूप बनवून तो निशाचर त्या रमणीय वनाला तसेच श्रीरामांच्या त्या आश्रमाला प्रकाशित करीत सर्व बाजूस उत्तम गवत चरत विचरण करू लागला. ॥२०-२१॥
|
रौप्यैर्बिन्दुशतैश्चित्रं भूत्वा च प्रियदर्शनः ।
विटपीनां किसलयान् भक्षयन् विचचार ह ॥ २२ ॥
|
शेकडो रजतमय ठिपक्यांनी युक्त विचित्र रूप धारण करून तो मृग फारच प्रिय दिसून येत होता. तो वृक्षांची कोवळी पालवी खात इकडे तिकडे फिरू लागला. ॥२२॥
|
कदलीगृहकं गत्वा कर्णिकारानितस्ततः ।
समाश्रयन् मन्दगतिः सीतासंदर्शनं ततः ॥ २३ ॥
|
केळीच्या बागेतून जाऊन तो कण्हेरीच्या कुंजात जाऊन पोहोंचला. नंतर जेथे सीतेची दृष्टी पडू शकेल अशा स्थानी जाऊन मंदगतिने तो इकडे तिकडे फिरू लागला. ॥२३॥
|
राजीवचित्रपृष्ठः स विरराज महागृगः ।
रामाश्रमपदाभ्याशे विचचार यथासुखम् ॥ २४ ॥
|
त्याचा पृष्ठभाग कमलाच्या केसराप्रमाणे सोनेरी रंगाचा असल्यामुळे विचित्र दिसत होता, त्यामुळे त्या महान मृगाला फार शोभा आली होती. श्रीरामांच्या आश्रमाच्या जवळच तो आपल्या इच्छेप्रमाणे सुखाने हिंडत होता. ॥२४॥
|
पुनर्गत्वा निवृत्तश्च विचचार मृगोत्तमः ।
गत्वा मुहूर्तं त्वरया पुनः प्रतिनिवर्तते ॥ २५ ॥
|
तो श्रेष्ठ मृग थोडे दूर जाऊन परत तेथे येत होता आणि तेथेच फिरत होता. एक मुहूर्तभर कोठे तरी निघून जाऊन परत मोठ्या उतावळेपणाने तेथे परत येत होता. ॥२५॥
|
विक्रीडंश्च क्वचिद् भूमौ पुनरेव निषीदति ।
आश्रमद्वारमागम्य मृगयूथानि गच्छति ॥ २६ ॥
|
तो कोठे खेळे, कोठे उड्या मारी आणि परत भूमीवर बसे, परत आश्रमाच्या द्वारावर येऊन मृगांच्या झुंडींच्या मागोमाग निघून जात होता. ॥२६॥
|
मृगयूथैरनुगतः पुनरेव निवर्तते ।
सीतादर्शनमाकाङ्क्षन् राक्षसो मृगतां गतः ॥ २७ ॥
|
त्यानंतर मृगांच्या झुंडी बरोबर परत तेथे येत होता. त्या मृगरूपधारी राक्षसाच्या मनात केवळ हीच अभिलाषा होती की कुठल्या प्रकारे सीतेची दृष्टी माझ्यावर पडावी. ॥२७॥
|
परिभ्रमति चित्राणि मण्डलानि विनिष्पतन् ।
समुद्वीक्ष्य च सर्वे तं मृगा येऽन्ये वनेचराः ॥ २८ ॥
उपागम्य समाघ्राय विद्रवन्ति दिशो दश ।
|
सीतेच्या जवळ येते समयी तो विचित्र पवित्रे दाखवीत चोहोबाजूस चकरा मारीत होता. त्या वनात विचरण करणारे जे दुसरे मृग होते ते सर्व त्यास पाहून त्याच्या जवळ येत आणि त्याला हुंगून दाही दिशास पळून जात. ॥२८ १/२॥
|
राक्षसः सोऽपि तान् वन्यान् मृगान् मृगवधे रतः ॥ २९ ॥
प्रच्छादनार्थं भावस्य न भक्षयति संस्पृशन् ।
|
राक्षस मारीच यद्यपि मृगांच्या वधातच तत्पर राहात असे तरी त्या समयी आपला भाव लपवून ठेवण्यासाठी त्या वन्य मृगांना स्पर्श करून त्यांना खात नव्हता. ॥२९ १/२॥
|
तस्मिन्नेव ततः काले वैदेही शुभलोचना ॥ ३० ॥
कुसुमापचये व्यग्रा पादपानत्यवर्तत ।
कर्णिकारानशोकांश्च चूतांश्च मदिरेक्षणा ॥ ३१ ॥
|
त्याच समयी सुंदर शुभ नेत्र असलेली वैदेही सीता जी फुले खुडण्यात मग्न झाली होती, कण्हेर, अशोक आणि आम्रवृक्षांना ओलांडून तेथे येऊन पोहोचली. ॥३०-३१॥
|
कुसुमान्यपचिन्वन्ती चचार रुचिरानना ।
अनर्हा वनवासस्य सा तं रत्नमयं मृगम् ॥ ३२ ॥
मुक्तामणिविचित्राङ्गं ददर्श परमाङ्गना ।
|
फुले खुडत ती तेथेच विचरण करू लागली. तिचे मुख फारच सुंदर होते. ती वनवासाचे कष्ट भोगण्यास योग्य नव्हती. परम सुंदर सीतेने त्या रत्नमयी मृगास पाहिले, ज्याचे अंग-प्रत्यंग मुक्तामण्यांनी चित्रितसे भासत होते. ॥३२ १/२॥
|
तं वै रुचिरदन्तोष्ठं रूप्यधातुतनूरुहम् ॥ ३३ ॥
विस्मयोत्फुल्लनयना सस्नेहं समुदैक्षत ।
|
त्याचे दात आणि ओठ फारच सुंदर होते तसेच शरीरावरील रोम, चांदी तसेच तांबे आदि धातूंचे बनविल्याप्रमाणे वाटत होते. त्याच्यावर दृष्टी पडताच सीतेचे डोळे आश्चर्याने उत्फुल्ल झाले आणि ती अत्यंत स्नेहाने त्याच्याकडे न्याहाळून पाहू लागली. ॥३३ १/२॥
|
स च तां रामदयितां पश्यन् मायामयो मृगः ॥ ३४ ॥
विचचार ततस्तत्र दीपयन्निव तद्वनम् ।
|
तो मायामय मृगही श्रीरामाची प्राणवल्लभा जी सीता, तिला पहात आणि त्या वनाला जणु प्रकाशित करीत तेथे विचरण करू लागला. ॥३४ १/२॥
|
अदृष्टपूर्वं दृष्ट्वा तं नानारत्नमयं मृगम् ।
विस्मयं परमं सीता जगाम जनकात्मजा ॥ ३५ ॥
|
सीतेने असा मृग पूर्वी कधीही पाहिला नव्हता. तो नाना प्रकारच्या रत्नांचाच बनविल्याप्रमाणे वाटत होता. त्याला पाहून जनकात्मजा सीतेला फार विस्मय वाटला. ॥३५॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे द्विचत्वारिंशः सर्गः ॥ ४२ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा बेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४२॥
|