श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ त्रिपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण कार्यार्थिनां उपेक्षतो नृगसम्बन्धि शापकथां श्रावयित्वा लक्ष्मणस्य कार्यार्थिनां निरीक्षणाय नियोजनम् -
श्रीरामांनी कार्यार्थी पुरुषांच्या उपेक्षेमुळे राजा नृगाला मिळालेल्या शापाची कथा ऐकवून लक्ष्मणाला देखरेख करण्यासाठी आदेश देणे -
लक्ष्मणस्य तु तद्‌ वाक्यं निशम्य परमाद्‌भुतम् ।
सुप्रीतश्चाभवद् रामो वाक्यमेतदुवाच ह ॥ १ ॥
लक्ष्मणांचे ते अत्यंत अद्‌भुत वचन ऐकून श्रीराम फार प्रसन्न झाले आणि याप्रकारे बोलले - ॥१॥
दुर्लभस्त्वीदृशो बन्धुः अस्मिन्काले विशेषतः ।
यादृशस्त्वं महाबुद्धिः मम सौम्य मनोऽनुगः ॥ २ ॥
सौम्या ! तू फार बुद्धिमान्‌ आहेस. तू जसे माझ्या मनाचे अनुसरण करणारा आहेस, तसा भाऊ विशेषतः या काळी मिळणे कठीण आहे. ॥२॥
यच्च मे हृदये किञ्चिद् वर्तते शुभलक्षण ।
तन्निशामय च श्रुत्वा कुरुष्व वचनं मम ॥ ३ ॥
शुभलक्षण लक्ष्मणा ! आता माझ्या मनांत जी गोष्ट आहे ती ऐक आणि ऐकून तसेच कर. ॥३॥
चत्वारो दिवसाः सौम्य कार्यं पौरजनस्य च ।
अकुर्वाणस्य सौमित्रे तन्मे मर्माणि कृन्तति ॥ ४ ॥
सौम्या सौमित्रा ! मी पुरवासी लोकांचे काम न करता चार दिवस निघून गेले आहेत, ही गोष्ट माझ्या मर्मस्थळाला विदीर्ण करीत आहे. ॥४॥
आहूयन्तां प्रकृतयः पुरोधा मन्त्रिणस्तथा ।
कार्यार्थिनश्च पुरुषाः स्त्रियश्च पुरुषर्षभ ॥ ५ ॥
पुरुषप्रवर ! तू प्रजा, पुरोहित आणि मंत्री यांना बोलाव. ज्या पुरुषांचे अथवा स्त्रियांचे काही काम असेल त्यांना उपस्थित कर. ॥५॥
पौरकार्याणि यो राजा न करोति दिने दिने ।
संवृते नरके घोरे पतितो नात्र संशयः ॥ ६ ॥
जो राजा प्रतिदिन पुरवासी लोकांचे कार्य करीत नाही, तो निःसंदेह सर्व बाजुनी निश्छिद्र अर्थात वायुसंचार रहित घोर नरकात पडतो. ॥६॥
श्रूयते हि पुरा राजा नृगो नाम महायशाः ।
बभूव पृथिवीपालो ब्रह्मण्यः सत्यवाक् शुचिः ॥ ७ ॥
असे ऐकण्यात येते की पूर्वी या पृथ्वीवर नृग नावाने प्रसिद्ध एक महायशस्वी राजे राज्य करीत होते. ते भूपाल फार ब्राह्मणभक्त, सत्यवादी तसेच पवित्र आचार विचाराचे होते. ॥७॥
स कदाचिद् गवां कोटीः सवत्साः स्वर्णभूषिताः ।
नृदेवो भूमिदेवेभ्यः पुष्करेषु ददौ नृपः ॥ ८ ॥
त्या नरदेवांनी कोण्या समयी पुष्करतीर्थात जाऊन ब्राह्मणांना सुवर्णभूषित आणि सवत्स एक कोटी गायी दान केल्या. ॥८॥
ततः सङ्‌गाद् गता धेनुः सवत्सा स्पर्शिताऽनघ ।
ब्राह्मणस्याहिताग्नेस्तु दरिद्रस्योञ्छवर्तिनः ॥ ९ ॥
निष्पाप लक्ष्मणा ! त्या समयी दुसर्‍या गायींबरोबर बरोबर एका दरिद्री उञ्छवृत्तिने जीवन निर्वाह करणार्‍या तसेच अग्निहोत्री ब्राह्मणाची गाय वत्सासह तेथे चालत गेली आणि राजाने संकल्प करून तिला कुणा ब्राह्मणाला देऊन टाकले. ॥९॥
स नष्टां गां क्षुधार्तो वै अन्विषंस्तत्र तत्र च ।
नापश्यत् सर्वराष्ट्रेषु संवत्सरगणान् बहून् ॥ १० ॥
तो बिचारा ब्राह्मण भुकेने पीडित होऊन त्या हरवलेल्या गाईला शोधत बर्‍याच वर्षांपर्यंत सर्व राज्यात इकडे तिकडे हिंडत फिरत होता, परंतु त्याला ती दिसली नाही. ॥१०॥
ततः कनखलं गत्वा जीर्णवत्सां निरामयाम् ।
ददर्श गां स्वकां धेनुं ब्राह्मणस्य निवेशने ॥ ११ ॥
शेवटी एक दिवस कनखलला पोहोचल्यावर त्याने आपली गाय एका ब्राह्मणाच्या घरांत पाहिली. ती निरोगी आणि हृष्टपुष्ट होती परंतु तिचे वासरू खूप मोठे झाले होते. ॥११॥
अथ तां नामधेयेन स्वकेनोवाच स द्विजः ।
आगच्छ शबलेत्येवं सा तु शुश्राव गौः स्वरम् ॥ १२ ॥
ब्राह्मणाने आपण ठेवलेल्या शबला नावाने तिला हाक मारली - शबले ! ये ! ये ! गाईने तो स्वर ऐकला. ॥१२॥
तस्य तं स्वरमाज्ञाय क्षुधार्तस्य द्विजस्य वै ।
अन्वगात् पृष्ठतः सा गौः गच्छन्तं पावकोपमम् ॥ १३ ॥
भुकेने पीडित झालेल्या त्या ब्राह्मणाचा तो परिचित स्वर ओळखून ती गाय पुढे पुढे जाणार्‍या त्या अग्नितुल्य तेजस्वी ब्राह्मणाच्या मागे जाऊ लागली. ॥१३॥
योऽपि पालयते विप्रः सोऽपि गामन्वगाद् द्रुतम् ।
गत्वा तं ऋषिं चष्टे मम गौरिति सत्वरम् ॥ १४ ॥

स्पर्शिता राजसिंहेन मम दत्ता नृगेण ह ।
जो ब्राह्मण त्या काळात तिचे पालन करीत होता तोही तात्काळ त्या गाईचा पाठलाग करत गेला आणि जाऊन त्या ब्रह्मर्षिंना म्हणला - ब्रह्मन्‌ ! ही गाय माझी आहे. मला राजांमध्ये श्रेष्ठ नृगाने हिला दानांत दिली आहे. ॥१४ १/२॥
तयोर्ब्राह्मणयोर्वादो महानासीद् विपश्चितोः ॥ १५ ॥

विवदन्तौ ततोऽन्योन्यं दातारमभिजग्मतुः ।
नंतर त्या दोन्ही विद्वान ब्राह्मणांमध्ये त्या गायीसंबंधी महान्‌ विवाद उभा राहिला. ते दोघे परस्परात भांडत, भांडत त्या दानी नरेश नृगाकडे गेले. ॥१५ १/२॥
तौ राजभवनद्वारि न प्राप्तौ नृगशासनम् ॥ १६ ॥

अहोरात्राण्यनेकानि वसन्तौ क्रोधमीयतुः ।
तेथे राजभवनाच्या द्वारावर जाऊन ते कित्येक दिवस बसून राहिले. परंतु त्यांना राजाकडून न्याय मिळाला नाही. (राजा त्यांना भेटलाच नाही.) यामुळे त्या दोघांना फारच क्रोध आला. ॥१६ १/२॥
ऊचतुश्च महात्मानौ तावुभौ द्विजसत्तमौ ॥ १७ ॥

क्रुद्धौ परमसंतप्तौ वाक्यं घोराभिसंहितम् ।
ते दोन्ही श्रेष्ठ महात्मा ब्राह्मण अत्यंत संतप्त आणि कुपित होऊन राजाला शाप देत असे घोर वाक्य बोलले - ॥१७ १/२॥
अर्थिनां कार्यसिद्ध्यर्थं यस्मात्त्वं नैषि दर्शनम् ॥ १८ ॥

अदृश्यः सर्वभूतानां कृकलासो भविष्यसि ।
बहुवर्षसहस्राणि बहुवर्षशतानि च ॥ १९ ॥

श्वभ्रे त्वं कृकलीभूतौ दीर्घकालं निवत्स्यति ।
राजन्‌ ! आपल्या विवादाचा निर्णय करवून घेण्याच्या इच्छेने आलेल्या प्रार्थी पुरुषांच्या कार्याच्या सिद्धिसाठी तू त्यांना दर्शन देत नाहीस, म्हणून तू सर्व प्राण्यांपासून लपून राहणारा सरडा होशील आणि हजारो वर्षे दीर्घकालपर्यंत खड्‍ड्यात सरडा होऊनच पडून रहाशील. ॥१८-१९ १/२॥
उत्पत्स्यते हि लोकेऽस्मिन् यदूनां कीर्तिवर्धनः ॥ २० ॥

वासुदेव इति ख्यातो विष्णुः पुरुषविग्रहः ।
स ते मोक्षयिता शापाद् राजंस्तस्माद् भविष्यसि ॥ २१ ॥

कृता च तेन कालेन निष्कृतिस्ते भविष्यति ।
भारावतरणार्थं हि नरनारायणावुभौ ॥ २२ ॥

उत्पत्स्येते महावीर्यौ कलौ युग उपस्थिते ।
जेव्हा यदुकुलाची कीर्ती वाढविणारे वासुदेव नामांनी विख्यात भगवान्‌ विष्णु पुरुषरूपाने या जगतात अवतार घेतील, त्या समयी तेच तुला या शापातून सोडवतील. म्हणून या समयी तर तू सरडा होशील, नंतर श्रीकृष्ण अवताराच्या समयीच तुझा उद्धार होईल. कलियुग उपस्थित होण्यापूर्वी काही काळ महापराक्रमी नर आणि नारायण दोघेही या पृथ्वीचा भार उतरविण्यासाठी अवतीर्ण होतील. ॥२०-२२ १/२॥
एवं तौ शापमुत्सृज्य ब्राह्मणौ विगतज्वरौ ॥ २३ ॥

तां गां हि दुर्बलां वृद्धां ददतुर्ब्राह्मणाय वै ।
याप्रकारे शाप देऊन ते दोन्ही ब्राह्मण शांत झाले. त्यांनी ती वृद्ध आणि दुर्बळ गाय कुणा ब्राह्मणाला देऊन टाकली. ॥२३ १/२॥
एवं स राजा तं शापं उपभुङ्‌क्ते सुदारुणम् ॥ २४ ॥

कार्यार्थिनां विमर्दो हि राज्ञां दोषाय कल्पते ।
याप्रकारे राजा नृग त्या अत्यंत दारूण शापाचा उपभोग करीत आहे. म्हणून कार्यार्थी पुरुषांचा विवाद जर निर्णीत झाला नाही तर तो राजांच्यासाठी महान्‌ दोषाची प्राप्ती करविणारा होतो. ॥२४ १/२॥
तच्छीघ्रं दर्शनं मह्यं अभिवर्तन्तु कार्यिणः ॥ २५ ॥

सुकृतस्य हि कार्यस्य फलं नावैति पार्थिवः ।
तस्माद् गच्छ प्रतीक्षस्व सौमित्रे कार्यवाञ्जनः ॥ २६ ॥
म्हणून कार्यार्थी मनुष्य शीघ्र माझ्या समोर उपस्थित होऊ दे. प्रजापालनरूप पुण्यकर्माचे फळ काय राजाला मिळत नाही ? अवश्य प्राप्त होते. म्हणून सौमित्रा ! तू जा, राजद्वारावर प्रतिक्षा कर की कोण कार्यार्थी पुरुष येत आहे. ॥२५-२६॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे त्रिपञ्चाशः सर्गः ॥ ५३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा त्रेपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP