श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकाशीतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

इन्द्रजिता मायामयसीताया वधः -
इंद्रजित द्वारा मायामयी सीतेचा वध -
विज्ञाय तु मनस्तस्य राघवस्य महात्मनः ।
सन्निवृत्याहवात् तस्मात् संविवेश पुरं ततः ॥ १ ॥
महात्मा राघवाचा मनोभाव समजून इंद्रजित युद्धापासून निवृत्त होऊन लंकापुरीत निघून गेला. ॥१॥
सोऽनुस्मृत्य वधं तेषां राक्षसानां तरस्विनाम् ।
क्रोधताम्रेक्षणः शूरो निर्जगामाथ रावणिः ॥ २ ॥
तेथे गेल्यावर बलवान्‌ राक्षसांच्या वधाचे स्मरण झाल्याने शूरवीर रावणकुमाराचे डोळे क्रोधाने लाल झाले. तो पुन्हा युद्धासाठी निघाला. ॥२॥
स पश्चिमेन द्वारेण निर्ययौ राक्षसैर्वृतः ।
इन्द्रजित्तु महावीर्यः पौलस्त्यो देवकण्टकः ॥ ३ ॥
पुलत्स्यकुळात उत्पन्न महापराक्रमी इंद्रजित देवतांसाठी कण्टकरूप होता. तो राक्षसांची फार मोठी सेना बरोबर घेऊन नगराच्या पश्चिम द्वाराने पुन्हा बाहेर आला. ॥३॥
इन्द्रजित्तु ततो दृष्ट्‍वा भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
रणायाभ्युद्यतौ वीरौ मायां प्रादुष्करोत् तदा ॥ ४ ॥
दोन्ही भाऊ वीर रामलक्ष्मणांना युद्धासाठी उद्यत पाहून इंद्रजिताने त्यासमयी माया प्रकट केली. ॥४॥
इन्द्रजित् तु रथे स्थाप्य सीतां मायामयीं तदा ।
बलेन महतावृत्य तस्या वधमरोचयत् ॥ ५ ॥
त्याने मायामयी सीतेची निर्मिती करून तिला आपल्या रथावर बसविले आणि विशाल सेनेने घेरून ठेवून तिचा वध करण्याचा विचार केला. ॥५॥
मोहनार्थं तु सर्वेषां बुद्धिं कृत्वा सुदुर्मतिः ।
हन्तुं सीतां व्यवसितो वानराभिमुखो ययौ ॥ ६ ॥
त्याची बुद्धि अतिनीच होती. त्याने सर्वांना मोहित करण्याचा विचार करून मायेने बनलेल्या सीतेला मारण्याचा निश्चय केला. याच अभिप्रायाने तो वानरांच्या समोर गेला. ॥६॥
तं दृष्ट्‍वा त्वभिनिर्यान्तं नगर्याः काननौकसः ।
उत्पेतुरभिसङ्‌क्रुद्धाः शिलाहस्ता युयुत्सवः ॥ ७ ॥
त्याला युद्धासाठी बाहेर पडतांना पाहून सर्व वानर क्रोधाविष्ट झाले आणि हातात शिला उचलून युद्धाच्या इच्छेने त्याच्यावर तुटून पडले. ॥७॥
हनुमान् पुरतस्तेषां जगाम कपिकुञ्जरः ।
प्रगृह्य सुमहच्छृङ्‌गं पर्वतस्य दुरासदम् ॥ ८ ॥
कपिकुञ्जर हनुमान्‌ त्या सर्वांच्या पुढे पुढे निघाले. त्यांनी पर्वताचे एक फार मोठे शिखर घेऊन ठेवले होते जे उचलणे इतरांसाठी नितांत कठीण होते. ॥८॥
स ददर्श हतानन्दां सीतां इन्द्रजितो रथे ।
एकवेणीधरां दीनां उपवासकृशाननाम् ॥ ९ ॥
त्यांनी इंद्रजिताच्या रथावर सीतेला पाहिले. त्यांचा आनंद नष्ट झाला. ती एक वेणी धारण केलेली, अत्यंत दुःखी दिसून येत होती आणि उपवासामुळे तिचे मुख अत्यंत कृश बनलेले होते. ॥९॥
परिक्लिष्टैकवसनां अमृजां राघवप्रियाम् ।
रजोमलाभ्यामालिप्तैः सर्वगात्रैर्वरस्त्रियम् ॥ १० ॥
तिच्या शरीरावर एकच मलिन वस्त्र होते. राघवप्रिया सीतेच्या अंगाला उटणी वगैरे लावलेली नव्हती. तिच्या सार्‍या शरीरावर धूळ आणि मळ साचलेला होता आणि तरीही ती श्रेष्ठ आणि सुंदर दिसत होती. ॥१०॥
तां निरीक्ष्य मुहूर्तं तु मैथिलीमध्यवस्य च ।
बभूवाचिरदृष्टा हि तेन सा जनकात्मजा ॥ ११ ॥
हनुमान्‌ काही वेळ तिच्याकडे पहात राहिले. शेवटी त्यांनी हा निश्चय केला की ही मैथिलीच आहे. त्यांनी जनककिशोरीला थोड्‍याच दिवसांपूर्वी पाहिले होते म्हणून ते तिला शीघ्रच ओळखू शकले. ॥११॥
अब्रवीत् तां तु शोकार्तां निरानन्दां तपस्विनीम् ।
सीतां रथस्थितां दीनां राक्षसेन्द्रसुताश्रिताम् ॥ १२ ॥
राक्षसराजाचा पुत्र इंद्रजित याच्या जवळ रथावर बसलेली तपस्विनी सीता शोकाने पीडित, दीन आणि आनंदशून्य होत होती. ॥१२॥
किं समर्थितमस्येति चिन्तयन् स महाकपिः ।
सह तैर्वानरश्रेष्ठैः अभ्यधावत रावणिम् ॥ १३ ॥
सीतेला तेथे पाहून महाकपि हनुमान असा विचार करू लागले की शेवटी या राक्षसाचा अभिप्राय तरी काय आहे ? नंतर ते मुख्य मुख्य वानरांना बरोबर घेऊन रावणपुत्राकडे धावले. ॥१३॥
तद्वानरबलं दृष्ट्‍वा रावणिः क्रोधमूर्च्छितः ।
कृत्वा विकोशं निस्त्रिंशं मूर्ध्नि सीतामकर्षयत् ॥ १४ ॥
वानरांची ती सेना आपल्याकडे येत आहे हे पाहून रावणकुमाराच्या क्रोधाला सीमा राहिली नाही. त्याने तलवार म्यानातून बाहेर काढली आणि सीतेच्या मस्तकावरील केस पकडून तिला ओढले. ॥१४॥
तां स्त्रियं पश्यतां तेषां ताडयामास राक्षसः ।
क्रोशन्तीं राम रामेति मायया योजितां रथे ॥ १५ ॥
मायाद्वारा रथावर बसविली गेलेली ती स्त्री हा राम ! हा राम ! म्हणून ओरडत होती आणि तो राक्षस त्या सर्वांच्या देखत त्या स्त्रीला मारत होता. ॥१५॥
गृहीतमूर्धजां दृष्ट्‍वा हनुमान् दैन्यमागतः ।
शोकजं वारि नैत्राभ्यां उसृजन् मारुतात्मजः ॥ १६ ॥
सीतेचे केस पकडले गेलेले पाहून हनुमानास अत्यंत दुःख झाले. ते पवनकुमार हनुमान्‌ आपल्या नेत्रांतून दुःखजनित अश्रु ढाळू लागले. ॥१६॥
तां दृष्ट्‍वा चारुसर्वाङ्‌गीं रामस्य महिषीं प्रियाम् ।
अब्रवीत् परुषं वाक्यं क्रोधाद् रक्षोधिपात्मजम् ॥ १७ ॥
श्रीरामांची सर्वांगसुंदर प्रिय पट्‍टराणी सीता हिला त्या अवस्थेत पाहून हनुमान्‌ कुपित झाले आणि कठोर वाणीने त्या राक्षस-राजकुमार इंद्रजितास म्हणाले - ॥१७॥
दुरात्मन् आत्मनाशाय केशपक्षे परामृशः ।
ब्रह्मर्षीणां कुले जातो राक्षसीं योनिमाश्रितः ॥ १८ ॥
दुरात्मन्‌ ! तू आपल्या विनाशासाठीच सज्ज झाला आहेस म्हणून तर सीतेच्या केलाला स्पर्श करत आहेस. तुझा जन्म ब्रह्मर्षिंच्या कुळात झाला आहे, तथापि तू राक्षस जातिच्या स्वभावाचा आश्रय घेतला आहेस. ॥१८॥
धिक् त्वां पापसमाचारं यस्य ते मतिरीदृशी ।
नृशंसानार्य दुर्वृत्त क्षुद्र पापपराक्रम ।
अनार्यस्येदृशं कर्म घृणा ते नास्ति निर्घृण ॥ १९ ॥
अरे ! तुझी बुद्धि इतकी बिघडलेली आहे ? तुझ्या सारख्या पापाचार्‍यांचा धिक्कार असो. नृशंस ! अनार्य ! दुराचारी आणि पापपूर्ण पराक्रम करणार्‍या नीचा ! तुझी ही करणी नीच पुरूषायोग्यच आहे. निर्दयी ! तुझ्या हृदयात जरा ही दया नाही ! ॥१९॥
च्युता गृहाच्च राज्याच्च रामहस्ताच्च मैथिली ।
किं तवैषापराद्धा हि यदेनां हंसि निर्दय ॥ २० ॥
बिचारी मैथिली घर, राज्य आणि श्रीरामांच्या करकमलांपासूनही दुरावली गेली आहे. निष्ठुर ! तिने तुझा काय अपराध केला आहे जो तू तिला इतक्या निर्दयतेने मारीत आहेस ? ॥२०॥
सीतां च हत्वा न चिरं जीविष्यसि कथञ्चन ।
वधार्ह कर्मणा तेन मम हस्तगतो ह्यसि ॥ २१ ॥
सीतेला मारून तू अधिक काळपर्यंत कुठल्याही प्रकारे जिवंत राहू शकणार नाहीस. वधायोग्य नीचा ! तू आपल्या पापकर्माच्या कारणाने माझ्या हातात पडला आहेस. आता तुझे जिवंत राहाणे कठीण आहे. ॥२१॥
ये च स्त्रीघातिनां लोका लोकवध्येषु कुत्सिताः ।
इह जिवितमुत्सृज्य प्रेत्य तान् प्रति लप्स्यसे ॥ २२ ॥
लोकात आपल्या पापामुळे जे वधायोग्य मानले गेले आहेत ते चोर आदिही ज्या लोकांची निंदा करतात आणि जे स्त्री हत्यारींना मिळतात त्याच नरक लोकात येथे आपल्या प्राणांचा परित्याग केल्यावर तू जाशील. ॥२२॥
इति ब्रुवाणो हनुमान् सायुधैर्हरिभिर्वृतः ।
अभ्यधावत सङ्‌क्रुद्धो राक्षसेन्द्रसुतं प्रति ॥ २३ ॥
असे म्हणत हनुमान्‌ अत्यंत कुपित होऊन शिला आदि आयुधे धारण करणार्‍या वानरवीरांसह राक्षस राजकुमारावर तुटून पडले. ॥२३॥
आपतन्तं महावीर्यं तदनीकं वनौकसाम् ।
रक्षसां भीमकोपानां अनीकेन न्यवारयत् ॥ २४ ॥
वानरांच्या त्या महापराक्रमी सैन्य-समुदायाला आक्रमण करतांना पाहून इंद्रजिताने भयानक क्रोध करणार्‍या राक्षसांच्या सेनेच्या द्वारे त्यांना पुढे येण्यापासून रोखून धरले. ॥२४॥
स तां बाणसहस्रेण विक्षोभ्य हरिवाहिनीम् ।
हरिश्रेष्ठं हनूमन्तं इन्द्रजित् प्रत्युवाच ह ॥ २५ ॥
नंतर हजारो बाणांच्या द्वारा त्या वानरवाहिनीत खळबळ उडवून देऊन इंद्रजिताने कपिश्रेष्ठ हनुमानास म्हटले- ॥२५॥
सुग्रीवस्त्वं च रामश्च यन्निमित्तमिहागताः ।
तां हनिष्यामि वैदेहीं अद्यैव तव पश्यतः ॥ २६ ॥

इमां हत्वा ततो रामं लक्ष्मणं त्वां च वानर ।
सुग्रीवं च वधिष्यामि तं चानार्यं विभीषणम् ॥ २७ ॥
वानरा ! सुग्रीव, राम आणि तुम्ही सर्व लोक जिच्यासाठी येथपर्यंत आला आहात त्या वैदेही सीतेला मी आत्ता तुमच्या समोर मारून टाकीन. हिला मारून मी क्रमशः रामलक्ष्मण, तुम्ही, सुग्रीव तसेच तो अनार्य विभीषण यांचाही वध करून टाकीन. ॥२६-२७॥
न हन्तव्याः स्त्रियश्चेति यद्ब्रवीषि प्लवङ्‌गम ।
पीडाकरममित्राणां यत् स्यात् कर्तव्यमेव तत् ॥ २८ ॥
वानरा ! तू असे म्हणत होतास की स्त्रियांना मारता कामा नये. त्याच्या उत्तरात मला हे सांगावयाचे आहे की जे कार्य केल्याने शत्रुंना अधिक कष्ट पोहोचतील ते कर्तव्यच मानले गेले आहे. ॥२८॥
तमेवमुक्त्वा रुदतीं सीतां मायामयीं च ताम् ।
शितधारेण खड्गेन निजघान इन्द्रजित् स्वयम् ॥ २९ ॥
हनुमानास असे म्हणून इंद्रजिताने स्वतःच तीक्ष्ण धार असलेल्या तलवारीने त्या रडत असणार्‍या मायामयी सीतेवर घातक प्रहार केला. ॥२९॥
यज्ञोपवीतमार्गेण भिन्ना तेन तपस्विनी ।
सा पृथिव्यां पृथुश्रोणी पपात प्रियदर्शना ॥ ३० ॥
शरीरात यज्ञोपवित धारण करण्याचे जे स्थान आहे त्याच जागेपासून त्या मायामयी सीतेचे दोन तुकडे झाले आणि ती स्थूलकटि प्रदेश असणारी प्रियदर्शना तपस्विनी पृथ्वीवर कोसळून पडली. ॥३०॥
तामिन्द्रजित् स्त्रियं हत्वा हनुमन्तमुवाच ह ।
मया रामस्य पश्येमां कोपेन च निषूदिताम् ।
एषा विशस्ता वैदेही विफलो वः परिश्रमः ॥ ३१ ॥
त्या स्त्रीचा वध करून इंद्रजिताने हनुमानास म्हटले - पाहून घे ! मी रामाची ही प्रिय पत्‍नी सीता हिला तलवारीने मारून टाकले आहे. ही पहा शस्त्रांनी कापली गेलेली वैदेही सीता. आता तुम्हा लोकांचे युद्धासाठीचे परिश्रम व्यर्थ आहेत. ॥३१॥
ततः खड्गेन महता हत्वा तामिन्द्रिजित् स्वयम् ।
हृष्टः स रथमास्थाय ननाद च महास्वनम् ॥ ३२ ॥
याप्रकारे स्वतः इंद्रजिताने विशाल खड्गाने त्या मायामयी स्त्रीचा वध करून रथावर बसल्या बसल्या हर्षाने जोरजोराने सिंहनाद करू लागला. ॥३२॥
वानराः शुश्रुवुः शब्दं अदूरे प्रत्यवस्थिताः ।
व्यादितास्यस्य नदतः तद्दु्र्गं संश्रितस्य च ॥ ३३ ॥
जवळच उभ्या असलेल्या वानरांनी त्याची ती गर्जना ऐकली. तो त्या दुर्गम रथावर बसून तोंड पसरून विकट सिंहनाद करत होता. ॥३३॥
तथा तु सीतां विनिहत्य दुर्मतिः
प्रहृष्टचेताः स बभूव रावणिः ।
तं हृष्टरूपं समुदीक्ष्य वानरा
विषण्णरूपाः सम्स्भिप्रदुद्रुवुः ॥ ३४ ॥
रावणाच्या त्या पुत्राची बुद्धि फार वाईट होती. त्याने याप्रकारे मायामयी सीतेचा वध करून आपल्या मनात अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव केला. त्याला हर्षाने प्रफुल्लित पाहून वानर विषादग्रस्त होऊन पळून गेले. ॥३४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकाशीतितमः सर्गः ॥ ८१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एक्याऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP