श्रीरामलक्ष्मणौ प्रति ऋष्यमूक-पम्पासरोवरयोर्मार्गं वर्णयित्वा मतङ्गमुनेर्वनस्याश्रमस्य परिचयं दत्त्वा दिव्यरूपस्य कबन्धस्य ततः प्रस्थानम् -
|
दिव्यरूपधारी कबंधाने श्रीराम आणि लक्ष्मणास ऋष्यमूक आणि पंपासरोवराचा मार्ग सांगणे तसेच मतंगमुनिंचे वन आणि आश्रमाचा परिचय देऊन प्रस्थान करणे -
|
दर्शयित्वा तु रामाय सीतायाः परिमार्गणे ।
वाक्यमन्वर्थमर्थज्ञः कबन्धः पुनरब्रवीत् ॥ १ ॥
|
श्रीरामांना सीतेच्या शोधाचा उपाय दाखवून देऊन अर्थवेत्ता कबंधाने त्यांना पुनः ही प्रयोजनयुक्त गोष्ट सांगितली - ॥१॥
|
एष राम शिवः पन्था यत्रैते पुष्पिता द्रुमाः ।
प्रतीचीं दिशमाश्रित्य प्रकाशन्ते मनोरमाः ॥ २ ॥
|
श्रीरामा ! येथून पश्चिम दिशेचा आश्रय घेऊन जेथे हे फुलांनी लगडलेले मनोरम वृक्ष शोभत आहेत तोच आपणास जाण्यायोग्य सुखद मार्ग आहे. ॥२॥
|
जम्बूप्रियालपनसा न्यग्रोधप्लक्षतिन्दुकाः ।
अश्वत्थाः कर्णिकाराश्च चूताश्चान्ये च पादापाः ॥ ३ ॥
धन्वना नागवृक्षाश्च तिलका नक्तमालकाः ।
नीलाशोकाः कदम्बाश्च करवीराश्च पुष्पिताः ॥४ ॥
अग्निमुख्या अशोकाश्च सुरक्ताः पारिभद्रकाः।
तानारूह्याथवा भूमौ पातयित्वा च तान् बलात् ॥ ५ ॥
फलान्यमृतकल्पानि भक्षयन्तौ गमिष्यथः।
|
जांभूळ, प्रियाळ, फणस, वड, पाकड, तेंदू, पिंपळ, कण्हेर, आंबा तसेच अन्य वृक्ष, धव, नागकेसर, तिलक, नक्तमाल, नील, अशोक, कदंब, फुललेले करवीर, भिलावा, अशोक, लाल चंदन तसेच मंदार - हे वृक्ष मार्गात दिसतील - आपण दोघे भाऊ यांच्या फांद्यांना बलपूर्वक भूमीवर वाकवून अथवा या वृक्षांवर चढून यांच्या अमृततुल्य मधुर फळांचा आहार करीत यात्रा करावी. ॥५ १/२॥
|
तदतिक्रम्य काकुत्स्थ वनं पुष्पितपादपम् ॥ ६ ॥
नन्दनप्रतिमं त्वान्यत् कुरवस्तूत्तरा इव ।
सर्वकालफला यत्र पादपास्तु मधुरस्रवाः ॥ ७ ॥
|
काकुत्स्थ ! फुललेल्या वृक्षांनी सुशोभित त्या वनास ओलांडून आपण एका दुसर्या वनात प्रवेश करावा, जे नंदनवनाप्रमाणे मनोहर आहे. त्या वनांतील वृक्ष उत्तर कुरूवर्षातील वृक्षांप्रमाणे मधुच्या धारा वाहवणारे आहेत तसेच त्यांना सर्व ऋतुंमध्ये सदा फळे लागलेली असतात. ॥६-७॥
|
सर्वे च ऋतवस्तत्र वने चैत्ररथे यथा ।
फलभारानतास्तत्र महाविटपधारिणः ॥ ८ ॥
|
चैत्ररथ वनाप्रमाणे त्या मनोहर काननात सर्व ऋतु निवास करतात. तेथील वृक्ष मोठमोठ्या शाखा धारण करणारे आणि फळांच्या भाराने वाकलेले असतात. ॥८॥
|
शोभन्ते सर्वतस्तत्र मेघपर्वतसंनिभाः ।
तानारुह्याथ वा भूमौ पातयित्वाथवा सुखम् ॥ ९ ॥
फलान्यमृतकल्पानि लक्ष्मणस्ते प्रदास्यति ।
|
ते तेथे सर्व बाजूस मेघांप्रमाणे आणि पर्वतांप्रमाणे शोभून दिसत असतात. लक्ष्मण त्या वृक्षांवर चढून अथवा सुखपूर्वक त्यांना जमिनीवर वाकवून त्यांची अमृततुल्य मधुर फळे आपल्याला मिळतील. ॥९ १/२॥
|
चङ्क्रमन्तौ वराञ्शैलाञ्शैलाच्छैलं वनाद् वनम् ॥ १० ॥
ततः पुष्करिणीं वीरौ पम्पां नाम गमिष्यथः ।
|
या प्रकारे सुंदर पर्वतांवर भ्रमण करीत आपण दोघे भाऊ एक पर्वतावरून दुसर्या पर्वतावर तसेच एका वनातून दुसर्या वनात पोहोचाल, आणि या प्रमाणे अनेक पर्वत तसेच वने ओलांडून आपण दोन्ही वीर पंपानामक पुष्करिणीच्या तटावर पोहोचाल. ॥१० १/२॥
|
अशर्करामविभ्रंशां समतीर्थामशैवलाम् ॥ ११ ॥
राम संजातवालूकां कमलोत्पलशोभिताम् ।
|
श्रीरामा ! तेथे काट्याकुट्यांचे नाव नाही. त्याच्या तटावर पाय घसरण्या लायक चिखल आदि नाही. त्याच्या घाटाची भूमी सर्व बाजूनी सारखी आहे - उंच सखल किंवा ऊबड खाबड नाही आहे. त्या पुष्करणीत शेवाळ्याचा सर्वथा अभाव आहे. तिच्या आतील भूमी वाळुकामय आहे. कमळ आणि उत्पल त्या सरोवराची शोभा वाढवत आहेत. ॥ ११ १/२॥
|
तत्र हंसाः प्लवाः क्रौञ्चाः कुरराश्चैव राघव ॥ १२ ॥
वल्गुस्वना निकूजन्ति पम्पासलिलगोचराः ।
नोद्विजन्ते नरान् दृष्ट्वा वधस्याकोविदाः शुभाः ॥ १३ ॥
|
राघवा ! तेथे पंपाच्या जलात विचरण करणारे हंस, कारण्डव, क्रौंञ्च, आणि कुरर सदा मधुर स्वरात कूजन करीत असतात. ते मनुष्यांना पाहून उद्विग्न होत नाहीत कारण की कुणा मनुष्याच्या द्वारा कुणा पक्ष्याचा वधही होऊ शकतो अशा भयाचा त्यांना अनुभव नाही. ते सर्व पक्षी फारच सुंदर आहेत. ॥१२-१३॥
|
घृतपिण्डोपमान् स्थूलांस्तान् द्विजान् भक्षयिष्यथः ।
रोहितान् वक्रतुण्डांश्च नडमीनांश्च राघव ॥ १४ ॥
पम्पायामिषुभिर्मत्स्यांस्तत्र राम वरान् हतान् ।
निस्त्वक्पक्षानयस्तप्तानकृशानेककण्टकान् ॥ १५ ॥
तव भक्त्या समायुक्तो लक्ष्मणः सम्प्रदास्यति ।
|
बाणांच्या अग्रभागाने ज्यांची साले काढली गेली आहेत, म्हणून ज्यांच्यात एकही काटा राहिलेला नाही, जे तुपाच्या गोळ्याप्रमाणे स्निग्ध तसेच आर्द्र आहेत, शुष्क (वाळलेले) नाहीत, ज्यांना लोहमय बाणांच्या अग्रभागात अडकून आगीत शेकले अथवा शिजवले गेले आहे अशा फळा-मुळांचे ढीग तेथे भक्ष्य पदार्थांच्या रूपात उपलब्ध होतील. आपल्या प्रति भक्तिभावाने संपन्न लक्ष्मण आपल्याला हे भक्ष्य पदार्थ अर्पित करतील. आपण दोघे भाऊ ते पदार्थ घेऊन त्या सरोवरातील मोठे मोठे सुप्रसिद्ध जलचर पक्षी तसेच श्रेष्ठ रोहित (रोहू), वक्रतुण्ड आणि नलमीन आदि माशांना थोडे थोडे करीत खाऊ घालावे. (यामुळे आपले मनोरंजन होईल) ॥१४-१५ १/२॥
|
भृशं तान् खादतो मत्स्यान् पम्पायाः पुष्पसञ्चये ॥ १६ ॥
पद्मगन्धि शिवं वारि सुखशीतमनामयम् ।
उद्धृत्य स तदाक्लिष्टं रूप्यस्फटिकसंनिभम् ॥ १७ ॥
अथ पुष्करपर्णेन लक्ष्मणः पाययिष्यति ।
|
ज्यावेळी आपण पंपासरोवराच्या पुष्पराशीच्या समीप माशांना भोजन करविण्याच्या क्रीडेत अत्यंत गढून जाल, त्यासमयी लक्ष्मण त्या सरोवराचे कमलाच्या गंधाने सुवासित, कल्याणकारी, सुखद, शीतल, रोगनाशक, क्लेशहारी तसेच चांदी आणि स्फटिक मण्याप्रमाणे स्वच्छ जल कमलाच्या पानात काढून आणतील आणि आपल्याला पाजतील. ॥१६-१७ १/२॥
|
स्थूलान् गिरिगुहाशय्यान् वराहान् वनचारिणः ॥ १८ ॥
सायाह्ने विचरन् राम दर्शयिष्यति लक्ष्मणः ।
|
श्रीरामा सायंकाळी आपल्या बरोबर विचरत असता लक्ष्मण आपल्याला त्या मोठ्मोठ्या वनचरी वानरांचे दर्शन करवील, जी पर्वतांच्या गुफेत झोपतात आणि राहातात. ॥१८ १/२॥
|
अपां लोभादुपावृत्तान् वृषभानिव नर्दतः ॥ १९ ॥
स्थूलान् पीतांश्च पम्पायां द्रक्ष्यसि त्वं नरोत्तम ।
|
नरश्रेष्ठ ! ते वानर पाणी पिण्यासाठी पंपाच्या तटावर येऊन वळूंप्रमाणे गर्जना करतात. त्यांचे शरीर मोठे असते आणि रंग पिवळा असतो. आपण त्या सर्वांना तेथे पहाल. ॥१९ १/२॥
|
सायाह्ने विचरन् राम विटपी माल्यधारिणः ॥ २० ॥
शिवोदकं च पम्पायां दृष्ट्वा शोकं विहास्यसि ।
|
श्रीरामा सायंकाळी हिंडत असतांना आपण मोठमोठ्या शाखा असणारे पुष्पधारी वृक्ष तसेच पंपाचे शीतल जल यांचे दर्शन करून आपल्या शोकाचा त्याग कराल. ॥२० १/२॥
|
सुमनोभिश्चितास्तत्र तिलका नक्तमालकाः ॥ २१ ॥
उत्पलानि च फुल्लानि पङ्कजानि च राघव ।
|
राघवा ! तेथे फुलांनी बहरलेले तिलक आणि नक्तमालचे वृक्ष शोभून दिसत असतात तसेच जलामध्ये उत्पल आणि कमलाची फुले दिसून येतात. ॥२१ १/२॥
|
न तानि कश्चिन्माल्यानि तत्रारोपयिता नरः ॥ २२ ॥
न च वै म्लानतां यान्ति न च शीर्यन्ति राघव ।
|
राघवा ! कुणी ही मनुष्य तेथे फुले खुडून त्यांना धारण करीत नाही. (कारण तेथेपर्यंत कोणी पोहोचूच शकत नाही.) पंपासरोवराची फुले कोमेजतही नाहीत अथवा गळूनही पडत नाहीत. ॥२२ १/२॥
|
मतङ्गशिष्यास्तत्रासन्नृषयः सुसमाहिताः ॥ २३ ॥
तेषां भाराभितप्तानां वन्यमाहरतां गुरोः ।
ये प्रपेतुर्महीं तूर्णं शरीरात् स्वेदबिन्दवः ॥ २४ ॥
तानि माल्यानि जातानि मुनीनां तपसा तदा ।
स्वेदबिन्दुसमुत्थानि न विनश्यन्ति राघव ॥ २५ ॥
|
असे म्हणतात की तेथे पूर्वी मतंग मुनिंचे शिष्य निवास करीत होते, ज्यांचे चित्त सदा एकाग्र आणि शांत रहात होते. ते आपले गुरू मतंग मुनि यांच्यासाठी जेव्हा जंगली फळे-मुळे आणीत असत आणि त्यांच्या भाराने थकून जात तेव्हा त्यांच्या शरीरातून पृथ्वीवर घामाचे जे थेंब पडत असत तेच त्या मुनिंच्या तपस्येच्या प्रभावाने तात्काळ फुलांच्या रूपात परिणत होत असत. राघवा ! घामाच्या थेंबापासून उत्पन्न झाल्यामुळे ती फुले नष्ट होत नाहीत. ॥२३-२५॥
|
तेषां गतानामद्यापि दृश्यते परिचारिणी ।
श्रमणी शबरी नाम काकुत्स्थ चिरजीविनी ॥ २६ ॥
त्वां तु धर्मे स्थिता नित्यं सर्वभूतनमस्कृतम् ।
दृष्ट्वा देवोपमं राम स्वर्गलोकं गमिष्यति ॥ २७ ॥
|
ते सर्वच्या सर्व ऋषि तर आता निघून गेले, परंतु त्यांच्या सेवेत राहाणारी तपस्विनी शबरी आजही तेथे दिसून येते. काकुत्स्थ ! शबरी चिरंजीव होऊन सदा धर्माच्या अनुष्ठानात लागलेली असते. श्रीरामा ! आपण समस्त प्राण्यांसाठी नित्य वंदनीय आणि देवता-तुल्य आहात. आपले दर्शन करून शबरी स्वर्गलोकास (साकेतधामास) निघून जाईल. ॥२६-२७॥
|
ततस्तद्राम पम्पायाः तीरमाश्रित्य पश्चिमम् ।
आश्रमस्थानमतुलं गुह्यं काकुत्स्थ पश्यसि ॥ २८ ॥
|
ककुत्स्थ श्रीरामा ! त्यानंतर आपण पंपाच्या पश्चिम तटावर जाऊन एक आश्रम पहाल, जो गुप्त आहे. ॥२८॥
|
न तत्राक्रमितुं नागाः शक्नुवन्ति तदाश्रमे ।
ऋषेस्तस्य मतङ्गस्य विधानात् तच्च काननम् ॥ २९ ॥
|
त्या आश्रमावर तसेच त्या वनांतही मतंग मुनिंच्या प्रभावामुळे हत्ती कधी आक्रमण करू शकत नाहीत. ॥२९॥
|
मतङ्गवनमित्येव विश्रुतं रघुनन्दन ।
तस्मिन् नन्दनसंकाशे देवारण्योपमे वने ॥ ३० ॥
नानाविहगसंकीर्णे रंस्यसे राम निर्वृतः ।
|
रघुनंदन ! तेथील जंगल मतंगवन या नावाने प्रसिद्ध आहे. त्या नंदनवन तुल्य मनोहर आणि देव वनासमान सुंदर वनात नाना प्रकारचे पक्षी भरून राहिलेले असतात. श्रीरामा ! आपण तेथे अत्यंत प्रसन्नतेने सानंद विचरण कराल. ॥३० १/२॥
|
ऋष्यमूकस्तु पम्पायाः पुरस्तात् पुष्पितद्रुमः ॥ ३१ ॥
सुदुःखारोहणश्चैव शिशुनागाभिरक्षितः ।
उदारो ब्रह्मणा चैव पूर्वकालेऽभिनिर्मितः ॥ ३२ ॥
|
पंपा सरोवराच्या पूर्वभागात ऋष्यमूक पर्वत आहे, जेथील वृक्ष फुलांनी सुशोभित दिसत असतात. त्यांच्यावर चढणे फार कठीण आहे कारण ते लहान लहान सर्पांनी अथवा हत्तींच्या पिल्लांच्या द्वारा सर्व बाजूनी सुरक्षित आहेत. ऋष्यमूक पर्वत उदार (अभीष्ट फळ देणारा) आहे. पूर्वी साक्षात् ब्रह्मदेवाने तो निर्माण केला आणि त्याला औदार्य आदि गुणांनी संपन्न बनविले. ॥३१-३२॥
|
शयानः पुरुषो राम तस्य शैलस्य मूर्धनि ।
यत् स्वप्नं लभते वित्तं तत् प्रबुद्धोऽधिगच्छति ॥ ३३ ॥
यस्त्वेनं विषमाचारः पापकर्माधिरोहति ।
तत्रैव प्रहरन्त्येनं सुप्तमादाय राक्षसाः ॥ ३४ ॥
|
श्रीरामा ! त्या पर्वताच्या शिखरावर झोपलेला पुरुष स्वप्नात जी संपत्ति प्राप्त करतो ती जागे झाल्यावरही प्राप्त करून घेतो. जो पापकर्मी तसेच विषम आचरण करणारा पुरुष त्या पर्वतावर चढतो त्याला त्या पर्वतशिखरावरच झोपला असता राक्षस लोक उचलून त्याच्यावर प्रहार करतात. ॥३३-३४॥
|
तत्रापि शिशुनागानामाक्रन्दः श्रूयते महान् ।
क्रीडतां राम पम्पायां मतङ्गाश्रमवासिनाम् ॥ ३५ ॥
|
श्रीरामा ! मतंग मुनिंच्या आश्रमाच्या आसपासच्या वनात राहाणार्या आणि पंपासरोवरात क्रीडा करणार्या लहान लहान हत्तींच्या चीत्कारण्याचा शब्द त्या पर्वतावरही ऐकू येत असतो. ॥३५॥
|
सक्ता रुधिरधाराभिः संहृत्य परमद्विपाः ।
प्रचरंति पृथक्कीर्णा मेघवर्णास्तरस्विनः ॥ ३६ ॥
ते तत्र पीत्वा पानीयं विमलं चारु शोभनम् ।
अत्यन्तसुखसंस्पर्शं सर्वगन्धसमन्वितम् ॥ ३७ ॥
निर्वृताः संविगाहन्ते वनानि वनगोचराः ।
|
ज्यांच्या गण्डस्थलांवर काहीशा लाल रंगाच्या मदाच्या धारा वहात असतात ते वेगवान् आणि मेघांप्रमाणे काळे मोठ मोठे गजराज, झुंडीच्या झुंडीने एकत्र येऊन दुसर्या जातीच्या हत्तींपासून पृथक होऊन तेथे विचरत राहातात. वनामध्ये विचरणारे ते हत्ती जेव्हा पंपा सरोवराचे निर्मल, मनोहर, सुंदर, स्पर्श करण्यास अत्यंत सुखद तसेच सर्व प्रकारच्या सुगंधाने सुवासिक झालेले जल पिऊन परततात तेव्हा त्या वनांमध्ये प्रवेश करतात. ॥३६-३७ १/२॥
|
ऋक्षांश्च द्वीपिनश्चैव नीलकोमलकप्रभान् ॥ ३८ ॥
रुरूनपेतापजयान् दृष्ट्वा शोकं प्रहास्यसि ।
|
रघुनंदन ! तेथे अस्वले, वाघ आणि नील कोमल कांति असणार्या मनुष्यांना पाहून पळणार्या आणि पळण्यात कुणाकडूनही पराजित न होणार्या मृगांना पाहून आपण आपला सारा शोक विसरून जाल. ॥३८ १/२॥
|
राम तस्य तु शैलस्य महती शोभते गुहा ॥ ३९ ॥
शिलापिधाना काकुत्स्थ दुःखं चास्याः प्रवेशनम् ।
|
श्रीरामा ! त्या पर्वतावर एक फार मोठी गुहा शोभत आहे, जिचे द्वार दगडाने झाकलेले आहे. तिच्यात प्रवेश करण्यास फार कष्ट पडतात. ॥३९ १/२॥
|
तस्या गुहायाः प्राग्द्वारे महान् शीतोदको ह्रदः ॥ ४० ॥
बहुमूलफलो रम्यो नानानगसमाकुलः ।
|
त्या गुफेच्या पूर्वद्वारावर शीतल जलाने भरलेले एक फार मोठे कुण्ड आहे. तसेच तो रमणीय डोह नाना प्रकारच्या वृक्षांनी व्याप्त आहे. ॥४० १/२॥
|
तस्यां वसति धर्मात्मा सुग्रीवः सह वानरैः ॥ ४१ ॥
कदाचिच्छिखरे तस्य पर्वतस्यापि तिष्ठते ।
|
धर्मात्मा सुग्रीव वानरांच्या सह त्याच गुफेत निवास करीत आहेत. ते कधी कधी त्या पर्वताच्या शिखरावरही राहात असतात. ॥४१ १/२॥
|
कबन्धस्त्वनुशास्यैवं तावुभौ रामलक्ष्मणौ ॥ ४२ ॥
स्रग्वी भास्करवर्णाभः खे व्यरोचत वीर्यवान् ।
|
याप्रकारे श्रीराम आणि लक्ष्मण या दोघा भावांना सर्व गोष्टी सांगून सूर्यासमान तेजस्वी आणि पराक्रमी कबंध दिव्य पुष्पांची माळा धारण करून आकाशात प्रकाशित होऊ लागला. ॥४२ १/२॥
|
तं तु खस्थं महाभागं तावुभौ रामलक्ष्मणौ ॥ ४३ ॥
प्रस्थितौ त्वं व्रजस्वेति वाक्यमूचतुरन्तिके ।
|
त्यासमयी ते दोघे भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण तेथून प्रस्थान करण्यासाठी उद्यत होऊन आकाशात उभा असलेल्या महाभाग कबंधास त्याच्या निकट उभे राहून बोलले - आता तुम्ही परम धामास जावे ॥४३ १/२॥
|
गम्यतां कार्यसिद्ध्यर्थमिति तावब्रवीत् स च ॥ ४४ ॥
सुप्रीतौ तावनुज्ञाप्य कबन्धः प्रस्थितस्तदा ॥ ४५ ॥
|
कबंधाने त्या दोघा भावांना म्हटले - आपण ही आपल्या कार्याच्या सिद्धिसाठी यात्रा करावी. असे म्हणून परम प्रसन्न झालेल्या त्या दोन बंधुंची आज्ञा घेऊन कबंधाने तात्काळ प्रस्थान केले. ॥४४-४५॥
|
स तत् कबन्धः प्रतिपद्य रूपं
वृतः श्रिया भास्वरसर्वदेहः ।
निदर्शयन् राममवेक्ष्य खस्थं
सख्यं कुरुष्वेति तदाभ्युवाच ॥ ४६ ॥
|
कबंध आपले पूर्वीचे रूप प्राप्त करून अद्भुत शोभेने संपन्न झाला. त्याचे सारे शरीर सूर्यतुल्य प्रभेने प्रकाशित झाले. तो रामांकडे पहात त्यांना पंपा सरोवराचा मार्ग दाखवीत आकाशातच स्थित होऊन म्हणाला- आपण सुग्रीवाशी अवश्य मित्रता करावी. ॥४६॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे त्रिसप्ततितमः सर्गः ॥ ७३ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा त्र्याहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७३॥
|