अङ्गदगंधमादनाभ्यां आश्वासितानां वानराणां पुनः सोत्साहमन्वेषणे प्रवृत्तिः -
|
अंगद आणि गंधमादन यांनी आश्वासन दिल्यावर वानरांनी पुन्हां उत्साहपूर्वक अन्वेषण-कार्यामध्ये प्रवृत्त होणे -
|
अथाङ्ग्दस्तदा सर्वान् वानरानिदमब्रवीत् । परिश्रांतो महाप्राज्ञः समाश्वस्य शनैर्वचः ॥ १ ॥
|
यानंतर परिश्रमाने थकलेले महाबुद्धिमान् अंगद संपूर्ण वानरांना आश्वासन देऊन हळू हळू याप्रकारे म्हणू लागले- ॥१॥
|
वनानि गिरयो नद्यो दुर्गाणि गहनानि च । दर्यो गिरिगुहाश्चैव विचिताः सर्वमंततः ॥ २ ॥ तत्र तत्र सहास्माभिः जानकी न च दृश्यते । तद्वा रक्षोऽपहर्ता च येन सीतायाश्चैव दुष्कृती ॥ ३ ॥
|
’आम्ही लोकांनी वन, पर्वत, नद्या, दुर्गम स्थाने, घनदाट जंगले, कंदरा आणि गुहांमध्ये प्रवेश करून त्या सर्वांमध्ये उत्तम प्रकारे शोध घेतला पण त्या स्थानी आपल्याला जानकीचे दर्शन झाले नाही आणि तिचे अपहरण करणारा तो पापी राक्षस ही भेटला नाही. ॥२-३॥
|
कालश्च वो महान् यातः सुग्रीवश्चोग्रशासनः । तस्माद्भ वंतः सहिता विचिन्वंतु समंततः ॥ ४ ॥
|
’आपला वेळही खूपच निघून गेला आहे. राजा सुग्रीवांचे शासन फार भयंकर आहे. म्हणून आपण सर्व लोकांनी मिळून पुन्हा सर्वत्र सीतेचा शोध घेण्यास आरंभ करू या. ॥४॥
|
विहाय तंद्रीं शोकं च निद्रां चैव समुत्थिताम् । विचिनुध्वं तथा सीतां पश्यामो जनकात्मजाम् ॥ ५ ॥
|
’आळस, शोक आणि आलेल्या निद्रेचा परित्याग करून या प्रकारे शोधू या की ज्यायोगे आपणाला जनककुमारी सीतेचे दर्शन होऊ शकेल. ॥५॥
|
अनिर्वेदं च दाक्ष्यं च मनसश्चापराजयम् । कार्यसिद्धिकराण्याहुः तस्मादेतद् ब्रवीम्यहम् ॥ ६ ॥
|
’उत्साह, सामर्थ्य आणि मनांत हिंमत न हरणे( धैर्य न सोडणे) - हे कार्याची सिद्धि करणारे सद्गुण सांगितले गेले आहेत म्हणून मी आपणांस ही गोष्ट सांगत आहे. ॥६॥
|
अद्यापिदं वनं दुर्गं विचिन्वंतु वनौकसः । खेदं त्यक्त्वा पुनः सर्वं वनमेव चिचिन्वताम् ॥ ७ ॥
|
’आज सर्व वानर खेद सोडून या दुर्गम वनात शोध आरंभ करोत आणि सारे वनच पिंजून काढोत. ॥७॥
|
अवश्यं कुर्वतां तस्य दृश्यते कर्मणः फलम् । अलं निर्वेदमागम्य नहि नोन्मीलनं क्षमम् ॥ ८ ॥
|
’कर्मात रत असणार्या लोकांना त्या कर्माचे फळ अवश्य मिळतांना दिसून येते, म्हणून अत्यंत खिन्न होऊन उद्योग सोडून बसणे कदापि उचित नाही. ॥८॥
|
सुग्रीवः क्रोधनो राजा तीक्ष्णदण्डश्च वानरः । भेतव्यं तस्य सततं रामस्य च महात्मनः ॥ ९ ॥
|
’सुग्रीव क्रोधी राजा आहे. त्यांचा दण्डही फार कठोर असतो. वानरांनो ! त्यांच्यापासून तसेच महात्मा श्रीरामांपासून आपण लोकांनी सदा भिऊन असले पाहिजे. ॥९॥
|
हितार्थमेतदुक्तं वः क्रियतां यदि रोचते । उच्यतां हि क्षमं यत् यत् सर्वेषामेव वानराः ॥ १० ॥
|
’आपणा लोकांच्या हितासाठीच मी ही गोष्ट सांगितली आहे. जर योग्य (चांगली) वाटली तर आपण ही स्वीकारावी. अथवा वानरांनो ! जे कार्य सर्वांसाठी उचित असेल ते कार्य आपणच सांगावे.’ ॥१०॥
|
अङ्गतदस्य वचः श्रुत्वा वचनं गंधमादनः । उवाच व्यक्तया वाचा पिपासाश्रमखिन्नया ॥ ११ ॥
|
अंगदाचे हे बोलणे ऐकून गंधमादनाने तहान आणि थकवा यामुळे शिथिल झालेल्या वाणीने म्हटले- ॥११॥
|
सदृशं खलु वो वाक्यं अङ्गादो यदुवाच ह । हितं चैवानुकूलं च क्रियतामस्य भाषितम् ॥ १२ ॥
|
’वानरांनो ! युवराज अंगदांनी जी गोष्ट सांगितली आहे ती आपणा लोकांसाठी योग्य, हितकर आणि अनुकूल आहे; म्हणून सर्व लोकांनी यांच्या कथनानुसार कार्य करावे. ॥१२॥
|
पुनर्मार्गामहे शैलान् कंदरांश्च शिलांस्तथा । काननानि च शून्यानि गिरिप्रस्रवणानि च ॥ १३ ॥
|
’आपण सर्वजण पुन्हा पर्वत, कंदरा, शिला, निर्जन वने आणि पर्वतीय झरे यांचा शोध घेऊ या. ॥१३॥
|
यथोद्दिष्टानि सर्वाणि सुग्रीवेण महात्मना । विचिन्वंतु वनं सर्वे गिरिदुर्गाणि संगताः ॥ १४ ॥
|
’महात्मा सुग्रीवांनी ज्या स्थानांची चर्चा केली होती, त्या सर्वांमध्ये वन आणि पर्वतीय दुर्गम प्रदेशात सर्व वानर एकत्र होऊन एकदमच शोध आरंभ करोत.’ ॥१४॥
|
ततः समुत्थाय पुनः वानरास्ते महाबलाः । विंध्यकाननसङ्कीतर्णां विचेरुर्दक्षिणां दिशम् ॥ १५ ॥
|
हे ऐकून ते महाबली वानर उठून उभे राहिले आणि विंध्य पर्वताच्या काननांनी व्याप्त दक्षिण दिशेमध्ये विचरण करू लागले. ॥१५॥
|
ते शारदाभ्रप्रतिमं श्रीमद्रजतपर्वतम् । शृङ्गयवंतं दरीमंतं अधिरुह्य च वानराः ॥ १६ ॥
|
समोर शरद ऋतुच्या मेघांसमान शोभाशाली रजत पर्वत दिसून आला ज्याच्यामध्ये अनेक शिखरे आणि गुहा होत्या. ते सर्व वानर त्यावर चढून शोध घेऊ लागले. ॥१६॥
|
तत्र लोध्रवनं रम्यं सप्तपर्णवनानि च । विचिन्वंतो हरिवराः सीतादर्शनकाङ्क्षिणः ॥ १७ ॥
|
सीतेच्या दर्शनाची इच्छा ठेवणारे ते सर्व श्रेष्ठ वानर तेथील रमणीय लोध्रवनात आणि सप्तपर्णाच्या जंगलात तिचा शोध करू लागले. ॥१७॥
|
तस्याग्रमधिरूढास्ते श्रांता विपुलविक्रमाः । न पश्यंति स्म वैदेहीं रामस्य महिषीं प्रियाम् ॥ १८ ॥
|
त्या पर्वताच्या शिखरावर चढलेले महापराक्रमी वानर शोधून शोधून थकले परंतु श्रीरामांच्या प्रिय राणी सीतेचे दर्शन घेऊ शकले नाहीत. ॥१८॥
|
ते तु दृष्टिगतं कृत्वा तं शैलं बहुकंदरम् । अवारोहंत हरयो वीक्षमाणाः समंततः ॥ १९ ॥
|
अनेक गुहा असलेल्या त्या पर्वताचे उत्तम तर्हेने निरीक्षण करून सर्व बाजूस दृष्टिपात करणारे ते वानर त्याच्यावरून खाली उतरले. ॥१९॥
|
अवरुह्य ततो भूमिं श्रांता विगतचेतसः । स्थित्वा मुहूर्तं तत्राथ वृक्षमूलमुपाश्रिताः ॥ २० ॥
|
पृथ्वीवर उतरून जास्त थकून जाण्यामुळे अचेत होऊन ते सर्व वानर तेथे एका वृक्षाच्या खाली गेले आणि एक मुहूर्त पर्यंत तेथे बसून राहिले. ॥२०॥
|
ते मुहूर्तं समाश्वस्ताः किञ्चिद्भुग्नपरिश्रमाः । पुनरेवोद्यताः कृत्स्नां मार्गितुं दक्षिणां दिशम् ॥ २१ ॥
|
एक मुहूर्त पर्यत विश्रांती घेतल्यावर जेव्हा त्यांचा थकवा थोडा कमी झाला, तेव्हा ते पुन्हा संपूर्ण दक्षिण दिशेमध्ये शोध घेण्यासाठी उद्यत झाले. ॥२१॥
|
हनुमत् प्रमुखास्तावत् प्रस्थिताः प्लवगर्षभाः । विंध्यमेवादितः कृत्वा विचेरुश्च समंततः ॥ २२ ॥
|
हनुमान् आदि सर्व श्रेष्ठ वानर सीतेच्या अन्वेषणासाठी प्रस्थित होऊन प्रथम विंध्य पर्वताच्याच चारी बाजूस विचरण करू लागले. ॥२३॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे एकोनपञ्चाशः सर्गः ॥ ४९ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा एकोणपन्नासावा सर्ग पूरा झाला. ॥४९॥
|