संपातेर्नवपुङ्ख उद्गमः, तस्य वानराणां प्रोत्साहनं कृत्वा ततो उड्डयनं, वानराणां ततो दक्षिणस्यां प्रस्थानं च -
|
संपातिचे पंखयुक्त होऊन वानरांना उत्साहित करून उडून जाणे आणि वानरांचे तेथून दक्षिण दिशेकडे प्रस्थान करणे -
|
एतैरन्यैश्च बहुभिः वाक्यैर्वाक्यविशारदः । मां प्रशस्याभ्यनुज्ञाप्य प्रविष्टाः स स्वमाश्रमम् ॥ १ ॥
|
’वाक्यविशारद महर्षि निशाकरांनी ही आणि आणखी बर्याचशा गोष्टी सांगून मला समजाविले आणि श्रीरामकार्यात सहायक बनण्याच्या माझ्या सौभाग्याची प्रशंसा केली. तत्पश्चात् माझी अनुमति घेऊन ते आपल्या आश्रमामध्ये निघून गेले. ॥१॥
|
कंदरात् तु विसर्पित्वा पर्वतस्य शनैः शनैः । अहं विंध्यं समारुह्य भवतः प्रतिपालये ॥ २ ॥
|
’त्यानंतर कंदरेमधून हळू हळू निघून मी विंध्य पर्वताच्या शिखरावर चढून आलो आणि तेव्हापासून तुम्हां लोकांच्या येण्याची वाट पहात राहिलो आहे. ॥२॥
|
अद्य त्वेतस्य कालस्य वर्षं साग्रशतं गतम् । देशकालप्रतीक्षोऽस्मि हृदि कृत्वा मुनेर्वचः ॥ ३ ॥
|
’मुनिंशी बोलणे झाल्यानंतर आजपर्यत जो समय गेला आहे यात आठ(+*) हजाराहून अधिक वर्षे निघून गेली आहेत. मुनींचे कथन हृदयात करुन मी देश-कालाची प्रतीक्षा करीत आहे. ॥३॥ (+*- यात मूळात ’साग्रशतम्’ (शंभर वर्षाहून अधिक) समय निघून गेल्याची गोष्ट सांगितली आहे परंतु साठाव्या सर्गाच्या नवव्या श्लोकात आठ सहस्त्र वर्षे निघून गेल्याची चर्चा आली आहे. म्हणून दोन्हीची एक वाक्यता करण्यासाठी येथे शत शब्दाला आठ सहस्त्र वर्षाचे उपलक्षण मानले पाहिजे.)
|
महाप्रस्थानमासाद्य स्वर्गते तु निशाकरे । मां निर्दहति संतापो वितर्कैर्बहुभिर्वृतम् ॥ ४ ॥
|
’निशाकर मुनि महाप्रस्थान करून जेव्हा स्वर्गलोकास निघून गेले, तेव्हापासून मी अनेक प्रकारच्या तर्क-वितर्काने घेरला गेलो. संतापाची आग मला रात्रंदिन जाळत राहिली होती. ॥४॥
|
उत्थितां मरणे बुद्धिं मुनिवाक्यैर्निवर्तये । बुद्धिर्या तेन मे दत्ता प्राणानां रक्षणे मम ॥ ५ ॥
सा मेऽपनयते दुःखं दीप्तेवाग्निशिखा तमः ।
|
’माझ्या मनात कित्येक वेळा प्राणत्याग करण्याची इच्छा होई, परंतु मुनींच्या वचनाची आठवण ठेवून मी त्या संकल्पास टाळीत आलो आहे. त्यांनी मला प्राणांचे रक्षण करण्याची जी बुद्धि दिली होती, ती, जाळणारी अग्निशिखा अंधकाराला दूर करते त्याप्रमाणे माझ्या त्या दुःखाला दूर सारीत असे. ॥५ १/२॥
|
बुध्यता च मया वीर्यं रावणस्य दुरात्मनः ॥ ६ ॥
पुत्रः संतर्जितो वाग्भिः न त्राता मैथिली कथम् ।
|
’दुरात्मा रावणात किती बळ आहे हे मी जाणतो. म्हणून मी कठोर वचनांच्या द्वारे आपल्या पुत्राला खडसावले होते की तू मैथिलीचे रक्षण का केले नाहीस ?’ ॥६ १/२॥
|
तस्या विलपितं श्रुत्वा तौ च सीतावियोजितौ ॥ ७ ॥
न मे दशरथस्नेहात् पुत्रेणोत्पादितं प्रियम् ।
|
’सीतेचा विलाप ऐकून आणि तिच्यापासून वियोग झालेल्या श्रीराम तसेच लक्ष्मणाचा परिचय मिळून आणि राजा दशरथांच्या प्रति माझ्या स्नेहाचे स्मरण करूनही माझ्या पुत्राने जे सीतेचे रक्षण केले नाही, त्या आपल्या वर्तनाने त्याने मला प्रसन्न केले नाही - माझे प्रिय कार्य त्याने होऊ दिले नाही.’ ॥७ १/२॥
|
तस्य त्वेवं ब्रुवाणस्य संपातेर्वानरैः सह ॥ ८ ॥
उत्पेततुस्तदा पक्षौ समक्षं वनचारिणाम् ।
|
तेथे एकत्र जमून बसलेल्या वानरांशी संपाति याप्रकारे बोलत असतांनाच त्या वनचारी वानरांच्या समक्ष त्याच वेळी त्यास दोन नवीन पंख फुटून आले. ॥८ १/२॥
|
स दृष्ट्वा स्वां तनुं पक्षैः उद्ग।तैररुणच्छदैः ॥ ९ ॥
प्रहर्षमतुलं लेभे वानरांश्चेदमब्रवीत् ।
|
आपल्या शरीरातून निघालेल्या नवीन लाल रंगाच्या पंखांनी युक्त आपले शरीर पाहून संपातिला अनुपम हर्ष प्राप्त झाला, ते वानरांना याप्रकारे म्हणाले- ॥९ १/२॥
|
निशाकरस्य राजर्षेः प्रसादादमितौजसः ॥ १० ॥
आदित्यरश्मिनिर्दग्धौ पक्षौ मे पुनरुत्थितौ ।
|
’कपिवरांनो ! अमित तेजस्वी राजर्षि निशाकरांच्या प्रसादाने सूर्यकिरणांच्या द्वारा दग्ध झालेले माझे दोन्ही पंख परत उत्पन्न झाले आहेत. ॥१० १/२॥
|
यौवने वर्तमानस्य ममासीद् यः पराक्रमः ॥ ११ ॥
तमेवाद्यानुगच्छामि बलं पौरुषमेव च ।
|
’युवावस्थेमध्ये माझा जसा पराक्रम आणि बल होते, तसेच बल आणि पुरुषार्थ यांचा अनुभव यावेळी मी करत आहे. ॥११ १/२॥
|
सर्वथा क्रियतां यत्नःद सीतामधिगमिष्यथ ॥ १२ ॥
पक्षलाभो ममायं वः सिद्धिप्रत्ययकारकः ।
|
’वानरांनो ! तुम्ही सर्व प्रकारे प्रयत्न करा. निश्चितच तुम्हांला सीतेचे दर्शन प्राप्त होईल. मला पंख प्राप्त होणे हे तुम्हा-लोकांच्या कार्य-सिद्धिचा विश्वास देणारे आहे.’ ॥१२ १/२॥
|
इत्युक्त्वा तान् हरीन् सर्वान् संपातिः पतगोत्तमः ॥ १३ ॥
उत्पपात गिरेः शृङ्गा्त् जिज्ञासुः खगमो गतिम् ।
|
त्या समस्त वानरांना असे सांगून पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ संपाति आपल्या आकाश-गमन शक्तिचा परिचय प्राप्त करण्यासाठी त्या पर्वत शिखरावरून उडून गेले. ॥१३ १/२॥
|
तस्य तद्वचनं श्रुत्वा प्रतिसंहृष्टमानसाः । बभूवुर्हरिशार्दूला विक्रमाभ्युदयोन्मुखाः ॥ १४ ॥
|
त्यांची ही गोष्ट ऐकून त्या श्रेष्ठ वानरांचे हृदय प्रसन्नतेने प्रफुल्लित झाले. ते पराक्रमसाध्य अभ्युदयासाठी उद्यत झाले. ॥१४॥
|
अथ पवनसमानविक्रमाः प्लवगवराः प्रतिलब्धपौरुषाः । अभिजिदभिमुखा दिशं ययुः जनकसुतापरिमार्गणोन्मुखाः ॥ १५ ॥
|
तदनंतर वायुसमान पराक्रमी ते श्रेष्ठ वानर आपल्या विसरलेल्या पुरुषार्थास परत प्राप्त झाले आणि जनकसुता सीतेच्या शोधासाठी उत्सुक होऊन अभिजित् नक्षत्राने युक्त दक्षिण दिशेकडे निघून गेले. ॥१५॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे त्रिषष्टितमः सर्गः ॥ ६३ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा त्रेसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६३॥
|