[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ एकोनषष्टितम: सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
सीतादुरवस्थां वर्णयित्वा हनुमता लङ्‌कामाक्रमितुं वानराणामुत्तेजनम् -
हनुमंतांनी सीतेची दुरावस्था सांगून वानरांना लंकेवर आक्रमण करण्यासाठी उत्तेजित करणे -
एतदाख्याय तत्सर्वं हनुमान् मारुतात्मजः ।
भूयः समुपचक्राम वचनं वक्तुमुत्तरम् ॥ १ ॥
हा सर्व वृत्तान्त सांगितल्यावर पवनपुत्र हनुमाननी पुन्हा काही उत्तम गोष्टी सांगण्यास आरंभ केला.—॥१॥
सफलो राघवोद्योगः सुग्रीवस्य च सम्भ्रमः ।
शीलमासाद्य सीताया मम च प्रीणितं मनः ॥ २ ॥
ते म्हणाले, 'कपिवरांनो ! श्रीरामचन्द्रांचा उद्योग आणि सुग्रीवाचा उत्साह सफल झाला आहे. सीतेचे उत्तम शील आणि स्वभाव (पातिव्रत्य) पाहून माझे मन अत्यन्त सन्तुष्ट झाले आहे.॥२॥
आर्यायाः सदृशं शीलं सीतायाः प्लवगर्षभाः ।
तपसा धारयेल्लोकान् क्रुद्धो वा निर्दहेदपि ॥ ३ ॥
वानरश्रेष्ठांनो ! ज्या आर्येचे शील आणि स्वभाव आर्या सीतेप्रमाणे असेल ती आपल्या तपस्येच्या योगाने संपूर्ण लोकांना धारण करू शकते अथवा कुपित झाली तर तीन्ही लोकांना जाळूही शकते.॥३॥
सर्वथाऽतिप्रकृष्टोऽसौ रावणो राक्षसेश्वरः ।
यस्य तां स्पृशतो गात्रं तपसा न विनाशितम् ॥ ४ ॥
राक्षसराज रावण सर्वथा महान तपोबलाने संपन्न असावा असे समजून येत आहे. कारण सीतेला स्पर्श करतेवेळी तिच्या तपस्येमुळे त्याचे अंग (शरीर) जळून नष्ट झाले नाही.॥४॥
न तदग्निशिखा कुर्यात् संस्पृष्टा पाणिना सती ।
जनकस्य सुता कुर्याद् यत् क्रोधकलुषीकृता ॥ ५ ॥
जनककन्या सीता क्रुद्ध झाली असता जे करील ते हस्तस्पर्श झाला असता प्रत्यक्ष अग्नीची ज्वालाही करू शकणार नाही.॥५॥
जाम्बवत्प्रमुखान् सर्वान् अनुज्ञाप्य महाकपीन् ।
अस्मिन्नेवंगते कार्ये भवतां च निवेदिते ।
न्याय्यं स्म सह वैदेह्या द्रष्टुं तौ पार्थिवात्मजौ ॥ ६ ॥
आता जांबवान आदि सर्व महाकपिंची अनुज्ञा घेतल्यावर सीताशुद्धीचे कार्य करण्यात मला जेथपर्यत सफलता मिळाली ते सर्व मी आपणास सांगितले आहे. आता या सर्वांच्या अनुज्ञेने आम्ही सर्व (सीतेला रावणाच्या कारावासातून परत आणून) सीतेसहच त्या राजकुमार राम लक्ष्मणांचे दर्शन करावे हेच न्यायसंगत वाटत आहे.॥६॥
अहमेकोऽपि पर्याप्तः सराक्षसगणां पुरीम् ।
तां लङ्‌‍कां तरसा हन्तुं रावणं च महाबलम् ॥ ७ ॥

किं पुनः सहितो वीरैर्बलवद्‌भिः कृतात्मभिः ।
कृतास्त्रैः प्लवगैः शक्तैर्भवद्‌भिर्विजयैषिभिः ॥ ८ ॥
मी एकटा सुद्धा राक्षसगणांसहित समस्त लङ्‌कापुरीचा वेगाने विध्वंस करण्यास आणि महाबलाढ्य रावणास मारण्यास पर्याप्त आहे. मग जर संपूर्ण अस्त्रांना जाणणारे आपल्यासारखे वीर, बलवान, शुद्धात्मा, शक्तिशाली आणि विजयाभिलाषी वानरांची सहायता मिळाली तर आणखी काय पाहिजे ? ॥७-८॥
अहं तु रावणं युद्धे ससैन्यं सपुरःसरम् ।
सहपुत्रं वधिष्यामि सहोदरयुतं युधि ॥ ९ ॥
युद्धस्थळीं सेना, अग्रगामी सैनिक पुत्र आणि बन्धु-बान्धवासह रावणाचा वध मी सुद्धा करून टाकीन. ॥९॥
ब्राह्ममस्त्रं च रौद्रं च वायव्यं वारुणं तथा ।
यदि शक्रजितोऽस्त्राणि दुर्निरीक्ष्याणि संयुगे ।
तान्यहं निहनिष्यामि विधमिष्यामि राक्षसान् ॥ १० ॥
जरी संग्रामामध्ये शत्रूची दृष्टि दिपवून टाकणारी ब्रह्मास्त्र, शैलास्त्र, वायव्यास्त्र आणि वारुणस्त्र सारखी अस्त्रे इन्द्रजितापाशी असली तरी मी ब्रह्मादेवाच्या वरदानाने त्यांचे निवारण करीन आणि राक्षसांचा संहार करीन.॥१०॥
भवतामभ्यनुज्ञातो विक्रमो मे रुणाद्धि तम् ।
मयाऽतुला विसृष्टा हि शैलवृष्टिर्निरन्तरा ॥ ११ ॥

देवानपि रणे हन्यात् किं पुनस्तान् निशाचरान् ।
आपली आज्ञा मिळाली तर माझा पराक्रम रावणालाही कुण्ठित करून टाकील. माझ्याकडून अखंड होणार्‍या पाषाणांच्या अनुपम वृष्टिने रणभूमीत देवतांचाही वध होईल; मग त्या निशाचरांची काय कथा ? ॥११ १/२॥
भवतामननुज्ञातो विक्रमो मे रुणद्धि तम् ॥ १२ ॥

सागरोऽप्यतियाद् वेलां मन्दरः प्रचलेदपि ।
न जाम्बवन्तं समरे कम्पयेदरिवाहिनी ॥ १३ ॥
पण तुम्हा सर्वांची आज्ञा मिळाली नसल्यानेच माझा पुरुषार्थ मला रोखून धरीत आहे. समुद्र कदाचित आपली मर्यादा ओलांडेल आणि कदाचित मन्दराचळ आपल्या स्थानावरून बाजूस सरेल पण समरांगणात शत्रूची सेना जांबवानास विचलीत करेल असे कधीही संभवनीय नाही. ॥१२-१३॥
सर्वराक्षससङ्‌‍घानां राक्षसा ये च पूर्वजाः ।
अलमेकोऽपि नाशाय वीरो वालिसुतः कपिः ॥ १४ ॥
संपूर्ण राक्षसांना आणि त्यांच्या पूर्वजांनाही यमसदनास पोहोंचविण्यास वालीचा वीर पुत्र कपिश्रेष्ठ अंगद एकटाही पुरेसा आहे.॥१४॥
प्लवगस्योरुवेगेन नीलस्य च महात्मनः ।
मन्दरोऽप्यवशीर्येत किं पुनर्युधि राक्षसाः ॥ १५ ॥
वानरवीर महात्मा नीलाच्या महान वेगाने मन्दराचलही विदीर्ण होऊ शकतो मग युद्धात राक्षसांचा नाश करणे त्याच्यासाठी काय अवघड गोष्ट आहे ? ॥१५॥
सदेवासुरयक्षेषु गन्धर्वोरगपक्षिषु ।
मैन्दस्य प्रतियोद्धारं शंसत द्विविदस्य वा ॥ १६ ॥
तुम्ही सर्वच्या सर्व सांगा तर खरे की देवता, असुर, यक्ष, गन्धर्व नाग, आणि पक्ष्यांमध्येही असा कोण वीर आहे की जो मैन्द अथवा द्विविद यांचा सामना करू शकेल ?॥१६॥
अश्विपुत्रौ महावेगावुतौ प्लवगसत्तमौ ।
एतयोः प्रतियोद्धारं न पश्यामि रणाजिरे ॥ १७ ॥
हे दोन्ही वानरशिरोमणी महान वेगवान आणि अश्विनीकुमारांचे पुत्र आहेत. समरांगणात या दोघांचा सामना करणारा मला तर कुणी दिसत नाही. ॥१७॥
मयैव निहता लङ्‌‍का दग्धा भस्मीकृता पुरी ।
राजमार्गेषु सर्वेषु नाम विश्रावितं मया ॥ १८ ॥
मी एकटयानेच लङ्‌कावासी लोकांना मारून टाकले, नगरात आग लावून दिली, आणि सर्व पुरीला जाळून भस्म करून टाकले. इतकेच नव्हे तर तेथील सर्व रस्त्यांवर मी माझ्या नांवाचा डंका पिटविला आहे.॥१८॥
जयत्यतिबलो रामो लक्ष्मणश्च महाबलः ।
राजा जयति सुग्रीवो राघवेणाभिपालितः ॥ १९ ॥

अहं कोसलराजस्य दासः पवनसम्भवः ।
हनुमानिति सर्वत्र नाम विश्रावितं मया ॥ २० ॥
अत्यन्त बलशाली श्रीराम आणि महाबली लक्ष्मणाचा जयजयकार असो. श्रीराघवाच्याद्वारे सुरक्षित राजा सुग्रीवाचा विजय असो. मी कोसलनरेश श्रीरामचन्द्रांचा दास आणि वायुदेवतेचा औरस पुत्र आहे. माझे नाव हनुमान आहे याप्रकारे सर्वत्र आपल्या नावाची घोषणा केली आहे. ॥१९-२०॥
अशोकवनिकामध्ये रावणस्य दुरात्मनः ।
अधस्ताच्छिंशपामूले साध्वी करुणमास्थिता ॥ २१ ॥
दुरात्मा रावणाच्या अशोकवाटिकेच्या मध्यभागी एका शिंशपा (अशोक) वृक्षाखाली साध्वी सीता अत्यन्त दयनीय अवस्थेमध्ये राहात आहे.॥२१॥
राक्षसीभिः परिवृता शोकसन्तापकर्शिता ।
मेघलेखापरिवृता चन्द्रलेखेव निष्प्रभा ॥ २२ ॥
राक्षस स्त्रियांनी घेरलेली असल्याने ती शोक-सन्तापाने दुर्बल होत चालली आहे. ढगांच्या पंक्तींनी घेरलेल्या चन्द्रकले प्रमाणे ती श्रीहीन (निस्तेज) झालेली आहे.॥२२॥
अचिन्तयन्ती वैदेही रावणं बलदर्पितम् ।
पतिव्रता च सुश्रोणी अवष्टब्धा च जानकी ॥ २३ ॥
सुन्दर कटिप्रदेश असणारी विदेहनन्दिनी जानकी पतिव्रता आहे. बळाच्या घमेंडीत चूर असणार्‍या रावणाला ती मुळीच मानत नाही; तरीही ती त्याच्याच कैदेमध्ये पडली आहे.॥२३॥
अनुरक्ता हि वैदेही रामे सर्वात्मना शुभा ।
अनन्यचित्ता रामेण पौलोमीव पुरन्दरे ॥ २४ ॥
कल्याणी सीता श्रीरामांच्या ठिकाणी संपूर्ण हृदयाने अनुरक्त आहे. ज्याप्रमाणे शची देवराज इन्द्राच्या ठिकाणी अनन्य प्रेम करते, त्याच प्रकारे सीतेचे चित्त अनन्ययभावाने श्रीरामांच्या चिन्तनात लागलेले आहे.॥२४॥
तदेकवासःसंवीता रजोध्वस्ता तथैव च ।
सा मया राक्षसीमध्ये तर्ज्यमाना मुहुर्मुहुः ॥ २५ ॥

राक्षसीभिर्विरूपाभिर्दृष्टा हि प्रमदावने ।
एकवेणीधरा दीना भर्तृचिन्तापरायणा ॥ २६ ॥
ती एकच साडी नेसून धूळि-धूसरित होऊ राहिली आहे. राक्षसींच्या मध्ये ती राहात आहे. आणि तिला वांरवार त्यांनी केलेली निर्भत्सना, धमक्या वगैरे ऐकून ध्यावे लागत आहे. या अवस्थेल कुरूप राक्षसींनी घेरलेल्या सीतेला मी प्रमदा वनात पाहिली आहे. ती एकवेणी धारण करून दीनभावाने केवळ आपल्या पतिदेवाच्या चिन्तनात मग्न होऊन राहात आहे. ॥२५-२६॥
अधः शय्या विवर्णाङ्‌‍गी पद्मिनीव हिमोदये ।
रावणाद् विनिवृत्तार्था मर्तव्यकृतनिश्चया ॥ २७ ॥
ती खाली जमिनीवर झोपत आहे. हेमन्त ऋतूतील कमलिनीप्रमाणे तिच्या अंगाची कांति फिकी पडती आहे. रावणाशी तिला काहीही प्रयोजन नाही आहे. ती मरण्याचा निश्चय करून बसलेली आहे.॥२७॥
कथंचिन्मृगशावाक्षी विश्वासमुपपादिता ।
ततः संभाषिता चैव सर्वमर्थं प्रकाशिता ॥ २८ ॥
त्या मृगनयनी सीतेला अत्यन्त प्रयत्‍नाने कसा तरी मी आपला विश्वास उत्पन्न करून दिला. तेव्हां कुठे तिच्याशी संभाषण करण्याची सन्धि मिळाली आणि सर्व गोष्टी मी तिच्या समक्ष मांडू शकलो.॥२८॥
रामसुग्रीवसख्यं च श्रुत्वा प्रीतिमुपागता ।
नियतः समुदाचारो भक्तिर्भर्तरि चोत्तमा ॥ २९ ॥
श्रीराम आणि सुग्रीवाच्या मैत्रीची हकिगत ऐकून ती अत्यन्त प्रसन्न झाली. सीतेच्या ठिकाणी नितान्त सदाचार (पातिव्रत्य) विद्यमान आहे. आपल्या पतिविषयी तिच्या हृदयात उत्तम भक्ति आहे.॥२९॥
यन्न हन्ति दशग्रीवं स महात्मा दशाननः ।
निमित्तमात्रं रामस्तु वधे तस्य भविष्यति ॥ ३० ॥
सीता स्वत: ज्याअर्थी रावणास मारून टाकीत नाही त्यावरून कळून येत आहे की दशमुख रावण महात्मा आहे. तपोबलाने संपन्न असल्यामुळे शाप मिळण्यास अयोग्य आहे. (तथापि सीताहरणाच्या पापामुळे तो नष्ट प्रायच आहे.) श्रीरामचन्द्र त्याच्या वधास केवळ निमित्तमात्रच होतील. ॥३०॥
सा प्रकृत्यैव तन्वङ्‌‍गी तद्वियोगाच्च कर्शिता ।
प्रतिपत्पाठशीलस्य विद्येव तनुतां गता ॥ ३१ ॥
भगवती सीता एक तर स्वभावाने च सडपातळ (तन्वंगी) आहे. दुसरे श्रीरामचन्द्रांच्या वियोगाने ती आणखीच कृश झाली आहे. ज्याप्रमाणे प्रतिपदेच्या दिवशी स्वाध्याय करणार्‍या विद्यार्थ्याची विद्या क्षीण होत जाते त्याप्रमाणेच तिचेही शरीर अत्यन्त दुर्बल झालेले आहे.॥३१॥
एवमास्ते महाभागा सीता शोकपरायणा ।
यदत्र प्रतिकर्तव्यं तत् सर्वमुपकल्प्यताम् ॥ ३२ ॥
याप्रकारे महाभागा सीता सदा शोकात बुडून राहिली आहे. म्हणून यावेळी जो प्रतिकार करावयाचा असेल तो सर्व तुम्ही करावा. ॥३२॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे एकोनषष्टितमः सर्गः ॥ ५९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा एकूणसाठावा सर्ग पूरा झाला.॥५९॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP