दण्डस्य भार्गवकन्यया सह बलात्कारः -
|
राजा दण्डाचा भार्गवकन्येशी बलात्कार -
|
एतदाख्याय रामाय महर्षिः कुम्भसम्भवः । अस्यामेवापरं वाक्यं कथायां उपचक्रमे ॥ १ ॥
|
महर्षि कुम्भज रामांना इतकी कथा सांगून नंतर तिचा अवशिष्ट अंश याप्रकारे सांगू लागले - ॥१॥
|
ततः स दण्डः काकुत्स्थ बहुवर्षगणायुतम् । अकरोत्तत्र दान्तात्मा राज्यं निहतकण्टकम् ॥ २ ॥
|
काकुत्स्थ ! त्यानंतर राजा दण्डाने मन आणि इंद्रियांना काबूत ठेवून बरीच वर्षेपर्यंत तेथे अकण्टक राज्य केले. ॥२॥
|
अथ काले तु कस्मिंश्चिद् राजा भार्गवमाश्रमम् । रमणीयं उपाक्रामः चैत्रे मासि मनोरमे ॥ ३ ॥
|
त्यानंतर केव्हा तरी राजा मनोरम चैत्रमासात शुक्राचार्यांच्या रमणीय आश्रमावर आला. ॥३॥
|
तत्र भार्गव कन्यां स रूपेणाप्रतिमां भुवि । विचरन्तीं वनोद्देशे दण्डोऽपश्यदनुत्तमाम् ॥ ४ ॥
|
तेथे शुक्राचार्यांची सर्वोत्तम सुंदर कन्या, जिच्या रूपाची या भूतलावर कोठे तुलना नव्हती, वनप्रान्तात विचरत होती, तिला दण्डाने पाहिले. ॥४॥
|
स दृष्ट्वा तां सुदुर्मेधा अनङ्गशरपीडितः । अभिगम्य सुसंविग्नां कन्यां वचनमब्रवीत् ॥ ५ ॥
|
तिला पहाताच तो अत्यंत वाईट बुद्धि असणारा राजा कामदेवांच्या बाणांनी पीडित होऊन जवळ जाऊन त्या घाबरलेल्या कन्येला म्हणाला - ॥५॥
|
कुतस्त्वमसि सुश्रोणि कस्य वाऽसि सुता शुभे । पीडितोऽहमनङ्गेन गच्छामि त्वां शुभानने ॥ ६ ॥
|
सुश्रोणि ! तू कोठून आली आहेस ? अथवा शुभे, तू कुणाची पुत्री आहेस ? शुभानने ! मी कामदेवाने पीडित आहे म्हणून तुझा परिचय विचारीत आहे. ॥६॥
|
तस्य त्वेवं ब्रुवाणस्य मोहोन्मत्तस्य कामिनः । भार्गवी प्रत्युवाचेदं वचः सानुनयं त्विदम् ॥ ७ ॥
|
मोहाने उन्मत्त होऊन तो कामी राजा जेव्हा याप्रकारे विचारू लागला तेव्हा भृगुकन्येने विनयपूर्वक त्याला याप्रकारे उत्तर दिले - ॥७॥
|
भार्गवस्य सुतां विद्धि देवस्याक्लिष्टकर्मणः । अरजां नाम राजेन्द्र ज्येष्ठामाश्रमवासिनीम् ॥ ८ ॥
|
राजेंद्र ! तुम्हांला ज्ञात व्हावयास पाहिजे की मी पुण्यकर्मा शुक्रदेवांची ज्येष्ठ पुत्री आहे. माझे नाव अरजा आहे. मी याच आश्रमांत निवास करते. ॥८॥
|
मा मां स्पृश बलाद् राजन् कन्या पितृवशा ह्यहम् । गुरुः पिता मे राजेन्द्र त्वं च शिष्यो महात्मनः ॥ ९ ॥
|
राजन् ! बलपूर्वक मला स्पर्श करू नका. मी पित्याच्या अधीन राहाणारी कुमारी कन्या आहे. राजेंद्र ! माझे पिता तुमचे गुरू आहेत आणि तुम्ही त्या महात्म्यांचे शिष्य आहात. ॥९॥
|
व्यसनं सुमहत् क्रुद्धः स ते दद्यान्महातपाः । यदि वान्यन्मया कार्यं धर्मदृष्टेन सत्पथा ॥ १० ॥
वरयस्व नरश्रेष्ठ पितरं मे महाद्युतिम् । अन्यथा तु फलं तुभ्यं भवेद् घोराभिसंहितम् ॥ ११ ॥
|
नरश्रेष्ठ ! ते महातपस्वी आहेत. जर कुपित झाले तर मग तुम्हांला फार मोठ्या विपत्तित पाडू शकतात. जर माझ्याकडून तुम्हांला दुसरे काम करून घ्यावयाचे असेल (अर्थात् जर तुम्ही मला आपली भार्या बनवू इच्छित असाल) तर धर्मशास्त्रोक्त सन्मार्गाने चालून माझ्या महातेजस्वी पित्याकडून मला मागून घ्या. अन्यथा आपल्या स्वेच्छाचाराचे फार भयानक फळ भोगावे लागेल. ॥१०-११॥
|
क्रोधेन हि पिता मेऽसौ त्रैलोक्यमपि निर्दहेत् । दास्यते चानवद्याङ्ग तव मा याचितः पिता ॥ १२ ॥
|
माझे पिता आपल्या क्रोधाग्निने सार्या त्रैलोक्याला सुद्धा दग्ध करू शकतात म्हणून सुंदर अंगे असणार्या नरेशा ! तू बलात्कार करू नकोस. तू याचना केल्यावर माझे पिता मला अवश्य तुमच्या हाती सोपवतील. ॥१२॥
|
एवं ब्रुवाणामरजां दण्डः कामवशं गतः । प्रत्युवाच मदोन्मत्तः शिरस्याधाय चाञ्जलिम् ॥ १३ ॥
|
जेव्हा अरजा अशा प्रकारे बोलत होती त्या समयी कामाच्या अधीन झालेल्या दण्डाने मदोन्मत्त होऊन दोन्ही हात मस्तकावर जोडून याप्रकारे उत्तर दिले - ॥१३॥
|
प्रसादं कुरु सुश्रोणि न कालं क्षेप्तुमर्हसि । त्वत्कृते हि मम प्राणा विदीर्यन्ते वरानने ॥ १४ ॥
|
सुंदरी ! कृपा कर. वेळ घालवू नकोस. वरानने ! तुझ्यासाठी माझे प्राण जाऊ पहात आहेत. ॥१४॥
|
त्वां प्राप्य तु वधो वापि पापं वापि सुदारुणम् । भक्तं भजस्व मां भीरु भजमानं सुविह्वलम् ॥ १५ ॥
|
तुला प्राप्त केल्यावर माझा वध होऊन जाऊ दे अथवा मला अत्यंत दारूण दुःख प्राप्त झाले तरी काही चिंता नाही. भीरू ! मी तुझा भक्त आहे. अत्यंत व्याकुळ झालेल्या आपल्या सेवकाचा स्वीकार कर. ॥१५॥
|
एवमुक्त्वा तु तां कन्यां दोर्भ्यां गृह्य बलाद् बली । विस्फुरन्तीं यथाकामं मैथुनायोपचक्रमे ॥ १६ ॥
|
असे म्हणून त्या बलवान् नरेशाने त्या भार्गवकन्येला बलपूर्वक दोन्ही भुजांमध्ये पकडली. ती त्याच्या पकडीतून सुटण्यासाठी तडफडू लागली तरीही त्याने आपल्या इच्छेनुसार तिच्याशी समागम केला. ॥१६॥
|
तमनर्थं महाघोरं दण्डः कृत्वा सुदारुणम् । नगरं प्रययावाशु मधुमन्तं अनुत्तमम् ॥ १७ ॥
|
तो अत्यंत दारूण तसेच महाभयंकर अनर्थ करून दण्ड तात्काळच आपल्या उत्तम नगरात मधुमंतास निघून गेला. ॥१७॥
|
अरजाऽपि रुदन्ती सा आश्रमस्याविदूरतः । प्रतीक्षन्ति सुसंत्रस्ता पितरं देवसन्निभम् ॥ १८ ॥
|
अरजा भयभीत होऊन रडत आश्रमाच्या जवळच आपल्या देवतुल्य पित्याच्या येण्याची वाट पाहू लागली. ॥१८॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डेऽशीतितमः सर्गः ॥ ८० ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा ऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८०॥
|