इन्द्रजित्-लक्ष्मणयोर्घोरं युद्धं इन्द्रजितो वधश्च -
|
इन्द्रजित आणि लक्ष्मणांचे भयंकर युद्ध तसेच इन्द्रजिताचा वध -
|
स हताश्वो महातेजा भूमौ तिष्ठन् निशाचरः । इन्द्रजित् परमक्रुद्धः सम्प्रजज्वाल तेजसा ॥ १ ॥
|
घोडे मारले गेल्याने पृथ्वीवर उभ्या असलेल्या महातेजस्वी निशाचर इन्द्रजिताचा क्रोध फारच वाढला, तो तेजाने प्रज्वलित झाल्यासारखा झाला. ॥१॥
|
तौ धन्विनौ जिघांसन्तौ अन्योन्यमिषुभिर्भृशम् । विजयेनाभिनिष्क्रान्तौ वने गजवृषाविव ॥ २ ॥
|
इन्द्रजित आणि लक्ष्मण दोघांच्या हातांमध्ये धनुष्य होते. दोघेही आपापल्या विजयासाठी एक दुसर्याच्या सन्मुख युद्धास प्रवृत्त झाले होते. ते आपल्या बाणांच्या द्वारा परस्पराच्या वधाची इच्छा ठेवून वनात लढण्यास निघालेल्या दोन गजराजांच्या समान एक-दुसर्यावर गंभीर प्रहार करू लागले. ॥२॥
|
निबर्हयन्तश्चान्योन्यं ते राक्षसवनौकसः । भर्तारं न जहुर्युद्धे सम्पतन्तस्ततस्ततः ॥ ३ ॥
|
वानर आणि राक्षसही परस्परांचा संहार करीत इकडे तिकडे धावत होते, परंतु आपापल्या स्वामींची साथ सोडू शकले नाहीत. ॥३॥
|
ततस्तान् राक्षसान् सर्वान् हर्षयन् रावणात्मजः । स्तुवानो हर्षमाणश्च इदं वचनमब्रवीत् ॥ ४ ॥
|
त्यानंतर रावणकुमाराने प्रसन्न होऊन प्रशंसा करत राक्षसांचा हर्ष वाढवीत म्हटले - ॥४॥
|
तमसा बहुलेनेमाः संसक्ताः सर्वतो दिशः । नेह विज्ञायते स्वो वा परो वा राक्षसोत्तमाः ॥ ५ ॥
|
श्रेष्ठ निशाचरांनो ! चारी दिशांना अन्धकार पसरला आहे म्हणून येथे आपला अथवा परका हे ओळखू येत नाही आहे. ॥५॥
|
धृष्टं भवन्तो युध्यन्तु हरीणां मोहनाय वै । अहं तु रथमास्थाय आगमिष्यामि संयुगे ॥ ६ ॥
तथा भवन्तः कुर्वन्तु यथेमे हि वनौकसः । न युध्येयुर्महात्मानः प्रविष्टे नगरं मयि ॥ ७ ॥
|
म्हणून मी जातो आहे. दुसर्या रथावर शीघ्रच युद्धासाठी परत येईन. तो पर्यत तुम्ही लोक वानरांना मोहात पाडण्यासाठी निर्भय होऊन असे युद्ध करा ज्यायोगे हे महामनस्वी वानर नगरात प्रवेश करते समयी माझा सामना करण्यास येणार नाहीत. ॥६-७॥
|
इत्युक्त्वा रावणसुतो वञ्चयित्वा वनौकसः । प्रविवेश पुरीं लङ्कां रथहेतोरमित्रहा ॥ ८ ॥
|
असे म्हणून शत्रुहन्ता रावणकुमार वानरांना गुंगारा देऊन रथासाठी लंकापुरीत निघून गेला. ॥८॥
|
स रथं भूषयित्वाथ रुचिरं हेमभूषितम् । प्रासासिशरसंयुक्तं युक्तं परमवाजिभिः ॥ ९ ॥
अधिष्ठितं हयज्ञेन सूतेनाप्तोपदेशिना । आरुरोह महातेजा रावणिः समितिञ्जयः ॥ १० ॥
|
त्याने एक सुवर्णभूषित सुंदर रथ सजवून त्याच्यावर प्रास, खङ्ग तसेच बाण आदि आवश्यक सामग्री ठेवली, नंतर त्याला उत्तम घोडे जुंपविले आणि अश्व हाकण्याच्या विद्येचा जाणकार आणि हितकर उपदेश देणार्या सारथ्याला बसवून तो महातेजस्वी समरविजयी रावणकुमार स्वत:ही त्या रथावर आरूढ झाला. ॥९-१०॥
|
स राक्षसगणैर्मुख्यैः वृतो मन्दोदरीसुतः । निर्ययौ नगरात् वीरः कृतान्तबलचोदितः ॥ ११ ॥
|
नंतर प्रमुख राक्षसांना बरोबर घेऊन वीर मंदोदरीकुमार काळशक्तीने प्रेरित होऊन नगरातून बाहेर पडला. ॥११॥
|
सोऽभिनिष्क्रम्य नगराद् इन्द्रजित् परमौजसा । अभ्ययाज्जवनैरश्वैः लर्लक्ष्मणं सविभीषणम् ॥ १२ ॥
|
नगरांतून निघून इन्द्रजिताने आपल्या वेगवान् घोड्यांच्याद्वारा विभीषणसहित लक्ष्मणांवर बलपूर्वक हल्ला चढविला. ॥१२॥
|
ततो रथस्तमालोक्य सौमित्री रावणात्मजम् । वानराश्च महावीर्या राक्षसश्च विभीषणः ॥ १३ ॥
विस्मयं परमं जग्मुः लाघवात् तस्य धीमतः ।
|
रावणकुमार रथावर बसलेला पाहून सौमित्र लक्ष्मण, महापराक्रमी वानरगण तसेच राक्षसराज विभीषण - सर्वांना मोठा विस्मय वाटला. सर्व त्या बुद्धिमान् निशाचराचे लाघव पाहून दंग झाले. ॥१३ १/२॥
|
रावणिश्चापि सङ्क्रुद्धो रणे वानरयूथपान् ॥ १४ ॥
पातयामास बाणौघैः शतशोऽथ सहस्रशः ।
|
तत्पश्चात् क्रोधाने भरलेल्या रावणपुत्राने आपल्या बाणसमूहांच्या द्वारा रणभूमीमध्ये शेकडो आणि हजारो वानर-यूथपतिंना पाडून टाकण्यास आरंभ केला. ॥१४ १/२॥
|
स मण्डलीकृतधनू रावणिः समितिञ्जयः ॥ १५ ॥
हरीनभ्यहनत् क्रुद्धः परं लाघवमास्थितः ।
|
युद्धविजयी रावणकुमाराने आपले धनुष्य इतके खेचले की ते मण्डलाकार बनून गेले. त्याने कुपित होऊन अत्यंत शीघ्रतेने वानरांचा संहार करण्यास आरंभ केला. ॥१५ १/२॥
|
ते वध्यमाना हरयो नाराचैर्भीमविक्रमाः ॥ १६ ॥
सौमित्रिं शरणं प्राप्ताः प्रजापतिमिव प्रजाः ।
|
त्याच्या नाराच्यांचा मार खाऊन भयानक पराक्रमी वानर सौमित्र लक्ष्मणास शरण आले, जणु प्रजा, प्रजापतिना शरण आली असावी. ॥१६ १/२॥
|
ततः समरकोपेन ज्वलितो रघुनन्दनः । चिच्छेद कार्मुकं तस्य दर्शयन् पाणिलाघवम् ॥ १७ ॥
|
तेव्हा शत्रुच्या युद्धाने रघुनन्दन लक्ष्मणांचा क्रोध भडकला. ते क्रोधाने जळू लागले आणि त्यांनी आपल्या हाताच्या लाघवाने त्या राक्षसाचे धनुष्य तोडून टाकले. ॥१७॥
|
सोऽन्यत् कार्मुकमादाय सज्जं चक्रे त्वरन्निव । तदप्यस्य त्रिभिर्बाणैः लक्ष्मणो निरकृन्तत ॥ १८ ॥
|
हे पाहून त्या निशाचराने तात्काळच दुसरे धनुष्य घेऊन त्यावर प्रत्यञ्चा चढविली, परंतु लक्ष्मणांनी तीन बाण सोडून त्याचे ते धनुष्य तोडून टाकले. ॥१८॥
|
अथैनं छिन्नधन्वानं आशीविषविषोपमैः । विव्याधोरसि सौमित्री रावणिं पञ्चभिः शरैः ॥ १९ ॥
|
धनुष्य तोडले गेल्यावर विषधर सर्पासमान पाच भयंकर बाणांच्या द्वारा सौमित्राने रावणकुमाराच्या छातीवर भीषण आघात केला. ॥१९॥
|
ते तस्य कायं निर्भिद्य महाकार्मुकनिःसृताः । निपेतुर्धरणीं बाणा रक्ता इव महोरगाः ॥ २० ॥
|
त्यांच्या विशाल धनुष्यातून सुटलेले ते बाण इन्द्रजिताचे शरीर छेदून लाल रंगाच्या मोठ मोठ्या सर्पांसमान पृथ्वीवर पडले. ॥२०॥
|
स छिन्नधर्मा रुधिरं वमन् वक्त्रेण रावणिः । जग्राह कार्मुकश्रेष्ठं दृढज्यं बलवत्तरम् ॥ २१ ॥
|
धनुष्य तोडले गेल्यावर त्या बाणांचा प्रहार होताच तोंडाने रक्त ओकत रावणपुत्राने पुन्हा एक मजबूत धनुष्य हातात घेतले. त्याची प्रत्यञ्चा ही फारच दृढ होती. ॥२१॥
|
स लक्ष्मणं समुद्दिश्य परं लाघवमास्थितः । ववर्ष शरवर्षाणि वर्षाणीव पुरन्दरः ॥ २२ ॥
|
नंतर तर त्याने लक्ष्मणांना लक्ष्य करून अत्यंत लाघवाने बाणांची वृष्टि करण्यास आरंभ केला. जणु देवराज इन्द्र जलाची वृष्टि करत होते. ॥२२॥
|
मुक्तमिन्द्रजिता तत्तु शरवर्षमरिन्दमः । अवारयद् असम्भ्रान्तो लक्ष्मणः सुदुरासदम् ॥ २३ ॥
|
यद्यपि इन्द्रजितद्वारा केली गेलेली बाणवृष्टि रोखणे फारच कठीण होते तरीही शत्रुदमन लक्ष्मणांनी जराही न घाबरता तिला रोखून धरले. ॥२३॥
|
दर्शयामास च तदा रावणिं रघुनन्दनः । असम्भ्रान्तो महातेजाः तदद्भुसतमिवाभवत् ॥ २४ ॥
|
रघुनन्दन महातेजस्वी लक्ष्मणांच्या मनात जराही भीती नव्हती. त्यांनी त्या रावणकुमाराला जे आपले पौरूष दाखविले, ते अद्भुतासारखेच होते. ॥२४॥
|
ततस्तान् राक्षसान् सर्वान् त्रिभिरेकैकमाहवे । अविध्यत् परमक्रुद्धः शीघ्रास्त्रं सम्प्रदर्शयन् । राक्षसेन्द्रसुतं चापि बाणौघैः समताडयत् ॥ २५ ॥
|
त्यांनी अत्यंत कुपित होऊन आपल्या शीघ्र अस्त्र संचालन करण्याच्या कलेचे प्रदर्शन करत त्या समस्त राक्षसांच्या प्रत्येकाच्या शरीरात तीन-तीन बाण मारून घायाळ करून टाकले तसेच राक्षसराजाचा पुत्र इन्द्रजित यालाही आपल्या बाण समूहांच्या द्वारा गंभीर जखमी केले. ॥२५॥
|
सोऽतिविद्धो बलवता शत्रुणा शत्रुघातिना । असक्तं प्रेषयामास लक्ष्मणाय बहून् शरान् ॥ २६ ॥
|
शत्रुहन्ता प्रबल शत्रुच्या बाणांनी अत्यंत घायाळ होऊन इन्द्रजिताने लक्ष्मणांवर न थांबता बरेचसे बाण सोडले. ॥२६॥
|
तानप्राप्तान् शितैर्बाणैः चिच्छेद परवीरहा । सारथेरस्य च रणे रथिनो रथसत्तमः ॥ २७ ॥
शिरो जहार धर्मात्मा भल्लेनानतपर्वणा ।
|
परंतु शत्रुवीरांचा संहार करणार्या रथिंच्यामध्ये श्रेष्ठ धर्मात्मा लक्ष्मणांनी आपल्या जवळ पोहोचण्यापूर्वीच त्या बाणांना आपल्या तीक्ष्ण सायकांच्या द्वारा तोडून टाकले आणि रणभूमीमध्ये रथी इन्द्रजिताच्या सारथ्याचे मस्तक वाकलेल्या गांठीच्या भल्लाने उडवून दिले. ॥२७ १/२॥
|
असूतास्ते हयास्तत्र रथमूहुरविक्लवाः ॥ २८ ॥
मण्डलान्यभिधावन्ति तदद्भुातमिवाभवत् ।
|
सारथी न राहिल्याने हीतेथे त्याचे घोडे व्याकुळ झाले नाहीत. पूर्ववत् शान्तभावाने रथास चालवत राहिले आणि विभिन्न प्रकारचे पवित्रे बदलत मण्डलाकार गतिने धावत राहिले. ती एक अद्भुत गोष्टच होती. ॥२८ १/२॥
|
अमर्षवशमापन्नः सौमित्रिर्द्दढविक्रमः ॥ २९ ॥
प्रत्यविध्यद्धयांस्तस्य शरैर्वित्रासयन् रणे ।
|
सुदृढ पराक्रमी सौमित्र लक्ष्मण अमर्षाच्या वशीभूत होऊन रणक्षेत्रात त्याच्या घोड्यांना भयभीत करण्यासाठी त्यांना बाणांनी विंधू लागले. ॥२९ १/२॥
|
अमृष्यमाणस्तत्कर्म रावणस्य सुतो रणे ॥ ३० ॥
विव्याध दशभिर्बाणैः सौमित्रिं तममर्षणम् ।
|
रावणकुमार इन्द्रजित युद्धस्थळी लक्ष्मणांच्या या पराक्रमास सहन करू शकला नाही. त्याने त्या अमर्षशील सौमित्रांना दहा बाण मारले. ॥३० १/२॥
|
ते तस्य वज्रप्रतिमाः शराः सर्पविषोपमाः । विलयं जग्मुराहत्य कवचं काञ्चनप्रभम् ॥ ३१ ॥
|
त्याचे ते वज्रतुल्य बाण सर्पाच्या विषाप्रमाणे प्राणघाती होते, तथापि लक्ष्मणांच्या सोनेरी कान्तीच्या कवचावर आदळून तेथेच नष्ट झाले. ॥३१॥
|
अभेद्यकवचं मत्वा लक्ष्मणं रावणात्मजः । ललाटे लक्ष्मणं बाणैः सुपुङ्खैस्त्रिभिरिन्द्रजित ॥ ३२ ॥
अविध्यत् परमक्रुद्धः शीघ्रमस्त्रं च प्रदर्शयन् । तैः पृषत्कैर्ललाटस्थैः शुशुभे रघुनन्दनः ॥ ३३ ॥
रणाग्रे समरश्लाघी त्रिशृङ्ग इव पर्वतः ।
|
लक्ष्मणांचे कवच(**) अभेद्य आहे हे जाणून रावणकुमार इन्द्रजिताने त्यांच्या ललाटात सुंदर पंख असलेले तीन बाण मारले. त्याने आपले अस्त्र चालविण्याचे लाघव दाखवीत अत्यंत क्रोधपूर्वक त्यांना घायाळ केले. ललाटात घुसलेले त्या बाणांनी युद्धाची श्लाधा ठेवणारे रघुनन्दन लक्ष्मण संग्रामाच्या तोंडावरच तीन शिखरे असलेल्या पर्वतासमान शोभा प्राप्त करत होते. ॥३२-३३ १/२॥ |
स तथाप्यर्दितो बाणै राक्षसेन तदा मृधे ॥ ३४ ॥
तमाशु प्रतिविव्याध लक्ष्मणः पञ्चभिः शरैः । विकृष्येन्द्रजितो युद्धे वदने शुभकुण्डले ॥ ३५ ॥
|
त्या राक्षसाच्या द्वारा युद्धात बाणांनी याप्रकारे पीडित केले गेल्यावरही लक्ष्मणांनी त्यासमयी तात्काळ पाच बाणांचे संधान केले आणि धनुष्याला खेचून सोडलेल्या त्या बाणांच्या द्वारा सुंदर कुण्डलांनी सुशोभित इन्द्रजिताच्या मुखमण्डलास क्षत-विक्षत करून टाकले. ॥३४-३५॥
|
लक्ष्मणेन्द्रजितौ वीरौ महाबलशरासनौ । अन्योन्यं जघ्नतुर्वीरौ विशिखैर्भीमविक्रमौ ॥ ३६ ॥
|
लक्ष्मण तसेच इन्द्रजित दोन्ही वीर महाबलवान् होते. त्यांची धनुष्ये ही फार मोठी होती. भयंकर पराक्रम करणारे ते दोघे योद्धे एक-दुसर्याला बाणांनी घायाळ करू लागले. ॥३६॥
|
ततः शोणितदिग्धाङ्गौ लक्ष्मणेन्द्रजितावुभौ । रणे तौ रेजतुर्वीरौ पुष्पिताविव किंशुकौ ॥ ३७ ॥
|
यामुळे लक्ष्मण आणि इन्द्रजित दोघांचे शरीर रक्तबंबाळ झाले. रणभूमीमध्ये ते दोन्ही वीर फुललेल्या पलाश वृक्षाप्रमाणे शोभा प्राप्त करत होते. ॥३७॥
|
तौ परस्परमभ्येत्य सर्वगात्रेषु धन्विनौ । घोरैर्विव्यधतुर्बाणैः कृतभावावुभौ जये ॥ ३८ ॥
|
त्या दोन्ही धनुर्धर वीरांच्या मनात विजय मिळविण्याचा दृढ संकल्प होता, म्हणून ते आपसात भिडून एक दुसर्याच्या सर्व अंगांना भयंकर बाणांचे लक्ष्य बनवू लागले. ॥३८॥
|
ततः समरकोपेन संयुक्तो रावणात्मजः । विभीषणं त्रिभिर्बाणैः विव्याध वदने शुभे ॥ ३९ ॥
|
यामध्येच समरोचित क्रोधाने युक्त झालेल्या रावणकुमाराने विभीषणांच्या सुंदर मुखावर तीन बाणांचा प्रहार केला. ॥३९॥
|
अयोमुखैस्त्रिर्भिर्विद्ध्वा राक्षसेन्द्रं विभीषणम् । एकैकेनाभिविव्याध तान् सर्वान् हरियूथपान् ॥ ४० ॥
|
ज्यांचा अग्रभागी लोखंडाचे फल लावलेले होते, अशा तीन बाणांनी राक्षसराज विभीषणास घायाळ करून इन्द्रजिताने त्या सर्व वानर-यूथपतिंवर एकेका बाणाचा प्रहार केला. ॥४०॥
|
तस्मै दृढतरं क्रुद्धो जघान गदया हयान् । विभीषणो महातेजा रावणेः स दुरात्मनः ॥ ४१ ॥
|
यामुळे महातेजस्वी विभीषणाला त्याचा फार राग आला आणि त्यांनी आपल्या गदेने त्या दुरात्मा रावणकुमाराच्या चारी घोड्यांना मारून टाकले. ॥४१॥
|
स हताश्वादवप्लुत्य रथान्निहतसारथेः । अथ शक्तिं महातेजाः पितृव्याय मुमोच ह ॥ ४२ ॥
|
ज्याचा सारथि पूर्वीच मारला गेला होता आणि आता घोडेही मारले गेले त्या रथांतून खाली उडी मारून महातेजस्वी इन्द्रजिताने आपल्या काकावर शक्तिचा प्रहार केला. ॥४२॥
|
तामापतन्तीं सम्प्रेक्ष्य सुमित्रानन्दवर्धनः । चिच्छेद निशितैर्बाणैः दशधापातयद् भुवि ॥ ४३ ॥
|
ती शक्ति येतांना पाहून सुमित्रानन्दवर्धन लक्ष्मणांनी तीक्ष्ण बाणांनी तिचे छेदन केले आणि दहा तुकडे करून तिला पृथ्वीवर पाडले. ॥४३॥
|
तस्मै दृढधनुः क्रुद्धो हताश्वाय विभीषणः । वज्रस्पर्शसमान् पञ्च ससर्जोरसि मार्गणान् ॥ ४४ ॥
|
तत्पश्चात् सुदृढ धनुष्य धारण करणार्या विभीषणांनी, ज्याचे घोडे मारले गेले होते त्या इन्द्रजितावर कुपित होऊन त्याच्या छातीवर पाच बाण मारले, ज्यांचा स्पर्श वज्रासमान दु:सह होता. ॥४४॥
|
ते तस्य कायं भित्त्वा तु रुक्मपुङ्खा निमित्तगाः । बभूवुर्लोहितादिग्धा रक्ता इव महोरगाः ॥ ४५ ॥
|
सोनेरी पंखानी सुशोभित आणि लक्ष्यापर्यंत पोहोचणारे ते बाण इन्द्रजिताच्या शरीरास विदीर्ण करून त्याच्या रक्तात रंगून गेले आणि लाल रंगाच्या मोठ मोठ्या सर्पांप्रमाणे दिसून येऊ लागले. ॥४५॥
|
स पितृव्यस्य सङ्क्रुद्ध इन्द्रजिच्छरमाददे । उत्तमं रक्षसां मध्ये यमदत्तं महाबलः ॥ ४६ ॥
|
तेव्हा महाबली इन्द्रजिताच्या मनात आपल्या चुलत्याबद्दल अत्यंत क्रोध उत्पन्न झाला. त्याने राक्षसांच्या मध्ये यमराजांनी दिलेला उत्तम बाण हातात घेतला. ॥४६॥
|
तं समीक्ष्य महातेजा महेषुं तेन संहितम् । लक्ष्मणोऽप्याददे बाणं अन्यद् भीमपराक्रमः ॥ ४७ ॥
|
त्या महान् बाणाला इन्द्रजितद्वारा धनुष्यावर ठेवला गेलेला पाहून भयानक पराक्रम करणार्या महातेजस्वी लक्ष्मणांनीही दुसरा बाण उचलला. ॥४७॥
|
कुबेरेण स्वयं स्वप्ने स्वस्मै दत्तममितात्मना । दुर्जयं दुर्विषह्यं च सेन्द्रैरपि सुरासुरैः ॥ ४८ ॥
|
त्या बाणाचे शिक्षण महात्मा कुबेरांनी स्वप्नात प्रकट होऊन स्वत: त्यांना दिले होते. तो बाण इन्द्र आदि देवता तसेच असुरांसाठीही असह्य आणि दुर्जय होता. ॥४८॥
|
तयोस्ते धनुषी श्रेष्ठे बाहुभिः परिघोपमैः । विकृष्यमाणे बलवत् क्रौञ्चाविव चुकूजतुः ॥ ४९ ॥
|
त्या दोघांच्या परिघासमान मोठ्या आणि बलिष्ठ भुजांच्या द्वारे जोरजोराने खेंचल्या जाणार्या श्रेष्ठ धनुष्यातून क्रौंञ्च पक्ष्यांप्रमाणे शब्द निघू लागला. ॥४९॥
|
ताभ्यां तु धनुषि श्रेष्ठे संहितौ सायकोत्तमौ । विकृष्यमाणौ वीराभ्यां भृशं जज्वलतुः श्रिया ॥ ५० ॥
|
त्या वीरांनी आपल्या आपल्या श्रेष्ठ धनुष्यावर जे उत्तम सायक ठेवले होते ते खेचले जाताच अत्यंत तेजाने प्रज्वलित झाले. ॥५०॥
|
तौ भासयन्तावाकाशं धनुर्भ्यां विशिखौ च्युतौ । मुखेन मुखमाहत्य सन्निपेततुरोजसा ॥ ५१ ॥
|
दोघांचे बाण एकाचवेळी धनुष्यातून सुटले आणि आपल्या प्रभेने आकाशाला प्रकाशित करू लागले. दोन्हींचे मुखभाग अत्यंत वेगाने आपसात टक्कर घेऊ लागले. ॥५१॥
|
सन्निपातस्तयोश्चासीत् शरयोर्घोररूपयोः । सधूमविस्फुलिङ्गश्च तज्जोऽग्निर्दारुणोऽभवत् ॥ ५२ ॥
|
त्या दोन्ही भयानक बाणांची ज्या क्षणी टाक्कर झाली, त्यावेळी दारूण अग्नि प्रकट झाला, ज्यामधून धूर निघू लागला आणि ठिणग्या पडू लागलेल्या दिसू लागल्या. ॥५२॥
|
तौ महाग्रहसङ्काशौ अन्योन्यं सन्निपत्य च । सङ्ग्रामे शतधा यातौ मेदिन्यां चैव पेततुः ॥ ५३ ॥
|
ते दोन्ही बाण महान् ग्रहांप्रमाणे आपसात टकरून शेकडो तुकडे होऊन संग्रामभूमीवर पडले. ॥५३॥
|
शरौ प्रतिहतौ दृष्ट्वा तावुभौ रणमूर्धनि । व्रीडितौ जातरोषौ च लक्ष्मणेन्द्रजितौ तदा ॥ ५४ ॥
|
युद्धाच्या तोंडावरच त्या दोन बाणांना आपसांतच आघात-प्रतिघात होऊन व्यर्थ झालेले पाहून लक्ष्मण आणि इन्द्रजित दोघांनाही त्या समयी लाज वाटली. नंतर दोघेही एक दुसर्याबद्दल अत्यंत रोषाने भरून गेले. ॥५४॥
|
सुसंरब्धस्तु सौमित्रिः अस्त्रं वारुणमाददे । रौद्रं महेन्द्रजिद् युद्धेऽपि असृजद् युधि निष्ठितः ॥ ५५ ॥
|
सौमित्र लक्ष्मणांनी कुपित होऊन वारूणास्त्र उचलले. त्याचबरोबर त्या रणभूमीत उभा असलेल्या इन्द्रजिताने रौद्रास्त्र घेऊन त्याला वारूणास्त्राच्या प्रतिकारासाठी सोडून दिले. ॥५५॥
|
तेन तद्विहितं शस्त्रं वारुणं परमाद्भुतम् । ततः क्रुद्धो महातेजा इन्द्रजित् समितिञ्जयः । आग्नेयं सन्दधे दीप्तं स लोकं संक्षिपन्निव ॥ ५६ ॥
|
त्या रौद्रास्त्राने आहत होऊन लक्ष्मणांचे अत्यंत अद्भुत वारूणास्त्र शांत झाले. तदनंतर समरविजयी महातेजस्वी इन्द्रजिताने कुपित होऊन दीप्तिमान् आग्नेस्त्राचे संधान केले, जणु तो त्याच्या द्वारे समस्त लोकांचा प्रलय करू इच्छित होता. ॥५६॥
|
सौरेणास्त्रेण तद् वीरो लक्ष्मणः पर्यवारयत् । अस्त्रं निवारितं दृष्ट्वा रावणिः क्रोधमूर्च्छितः ॥ ५७ ॥
|
परंतु वीर लक्ष्मणांनी सूर्यास्त्राच्या प्रयोगाने त्याला शांत करून टाकले. आपल्या अस्त्राला प्रतिहत झालेले पाहून रावणकुमार इन्द्रजित अचेतसा झाला. ॥५७॥
|
आददे निशितं बाणं आसुरं शत्रुदारणम् । तस्माच्चापाद् विनिष्पेतुः भास्वराः कूटमुद्ग राः ॥ ५८ ॥
शूलानि च भुशुण्ड्यश्च गदाः खड्गाः परश्वधाः ।
|
त्याने आसुर नामक तीक्ष्ण शत्रुनाशक बाणाचा प्रयोग केला नंतर तो त्याच्या त्या धनुष्यांतून चमकणार्या कूट, मुद्गर, शूल, भुशुण्डी, गदा, खड्ग आणि परशु काढू लागला. ॥५८ १/२॥
|
तद्दृष्ट्वा लक्ष्मणः सङ्ख्ये घोरमस्त्रमथासुरम् ॥ ५९ ॥
अवार्यं सर्वभूतानां सर्वशस्त्रविदारणम् । माहेश्वरेण द्युतिमान् तदस्त्रं प्रत्यवारयत् ॥ ६० ॥
|
रणभूमीमध्ये ते भयंकर आसुरास्त्र प्रकट झालेले पाहून तेजस्वी लक्ष्मणांनी सम्पूर्ण अस्त्र-शस्त्रांना विदीर्ण करणार्या माहेश्वरास्त्राचा प्रयोग केला, ज्याचे निवारण समस्त प्राणी मिळूनही करू शकत नव्हते. त्या माहेश्वरास्त्राच्या द्वारा त्यांनी त्या आसुरास्त्राला नष्ट करून टाकले. ॥५९-६०॥
|
तयोः समभवद् युद्धं अद्भुातं रोमहर्षणम् । गगनस्थानि भूतानि लक्ष्मणं पर्यवारयन् ॥ ६१ ॥
|
याप्रकारे त्या दोघांमध्ये अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी युद्ध होऊ लागले. आकाशात राहाणारे प्राणी लक्ष्मणांना घेरून उभे राहिले. ॥६१॥
|
भैरवाभिरुते भीमे युद्धे वानररक्षसाम् । भूतैर्बहुभिराकाशं विस्मितैरावृतं बभौ ॥ ६२ ॥
|
भैरव गर्जनेने निनादणार्या वानर आणि राक्षसांचे ते भयानक युद्ध सुरू झाल्यावर आश्चर्यचकित झालेले बहुसंख्य प्राणी आकाशात येऊन उभे राहिले. त्यांनी घेरलेल्या त्या आकाशाची अद्भुत शोभा होत होती. ॥६२॥
|
ऋषयः पितरो देवा गन्धर्वा गरुडोरगाः । शतक्रतुं पुरस्कृत्य ररक्षुर्लक्ष्मणं रणे ॥ ६३ ॥
|
ऋषी, पितर्, देव, गंधर्व, गरुड आणि नागदेखील इंद्राला पुढे करून रंअभूमीवरील सुमित्राकुमारांचे रक्षण करू लागले. ॥ ६३ ॥
|
अथान्यं मार्गणश्रेष्ठं सन्दधे राघवानुजः । हुताशनसमस्पर्शं रावणात्मजदारणम् ॥ ६४ ॥
|
त्यानंतर लक्ष्मणांनी दुसरा उत्तम बाण आपल्या धनुष्यावर ठेवला ज्याचा स्पर्श आगीप्रमाणे जाळणारा होता. त्याच्यात रावणकुमाराला विदीर्ण करण्याची शक्ति होती. ॥६४॥
|
सुपत्रमनुवृत्ताङ्गं सुपर्वाणं सुसंस्थितम् । सुवर्णविकृतं वीरः शरीरान्तकरं शरम् ॥ ६५ ॥
दुरावारं दुर्विषह्यं राक्षसानां भयावहम् । आशीविषविषप्रख्यं देवसङ्घैः समर्चितम् ॥ ६६ ॥
येन शक्रो महातेजा दानवानजयत् प्रभुः । पुरा दैवासुरे युद्धे वीर्यवान् हरिवाहनः ॥ ६७ ॥
अथैन्द्रमस्त्रं सौमित्रिः संयुगेष्वपराजितम् । शरश्रेष्ठं धनुश्रेष्ठे विकर्षन् इदमब्रवीत् ॥ ६८ ॥
लक्ष्मीवाँल्लक्ष्मणो वाक्यं अमर्थसाधकमात्मनः । धर्मात्मा सत्यसन्धश्च रामो दाशरथिर्यदि । पौरुषे चाप्रतिद्वन्द्वः तदैनं जहि रावणिम् ॥ ६९ ॥
|
त्यामध्ये सुंदर पिसे लावलेली होती. त्या बाणाचे सारे अंग सुडौल आणि गोल होते. त्याची गांठही सुंदर होती. तो फारच मजबूत आणि सुवर्णाने भूषित होता. त्याच्या ठिकाणी शरीरास चिरून टाकण्याची क्षमता होती. त्याला अडविणे अत्यंत कठीण होते. त्याचा आघात सहन करणेही फार मुष्किल होते. तो राक्षसांना भयभीत करणारा आणि विषधर सर्पाच्या विषासमान शत्रूंचे प्राण घेणारा होता. देवतांच्या द्वारा त्या बाणाची सदाच पूजा केली गेली होती. पूर्व काळी देवासुर संग्रामात हिरव्या रंगाच्या घोड्यांनी युक्त रथ असणार्या, पराक्रमी, शक्तिमान् तसेच महातेजस्वी इन्द्रांनी त्याच बाणाने दानवांवर विजय मिळविला होता. त्याचे नाव ऐन्द्रास्त्र होते. ते युद्धाच्या अवसरी कधी पराजित अथवा असफल झाले नव्हते. शोभासम्पन्न वीर सौमित्र लक्ष्मणांनी आपल्या उत्तम धनुष्यावर तो श्रेष्ठ बाण ठेवला आणि खेचतेवेळी आपला अभिप्राय सिद्ध करणारी ही गोष्ट सांगितली - ’जर दशरथनन्दन भगवान् श्रीराम धर्मात्मा आणि सत्यप्रतिज्ञ असतील तसेच पुरुषाशार्थात त्यांची बरोबरी दुसरा कोणी वीर करत नसेल तर हे अस्त्रा ! तू या रावणपुत्राचा वध करून टाक. ॥६५-६९॥
|
इत्युक्त्वा बाणमाकर्णं विकृष्य तमजिह्मगम् । लक्ष्मणः समरे वीरः ससर्जेन्द्रजितं प्रति । ऐन्द्रास्त्रेण समायुज्य लक्ष्मणः परवीरहा ॥ ७० ॥
|
समरांगणात असे म्हणून शत्रुवीरांचा संहार करणार्या वीर लक्ष्मणांनी सरळ जाणार्या त्या बाणाला कानापर्यंत खेचून ऐन्द्रास्त्राने संयुक्त करून इन्द्रजितावर सोडले. ॥७०॥
|
स शिरः सशिरस्त्राणं श्रीमज्ज्वलितकुण्डलम् । प्रमथ्येन्द्रजितः कायात् पातयामास भूतले ॥ ७१ ॥
|
धनुष्यातून सुटताच ऐन्द्रास्त्राने झगमगणार्या कुण्डलांनी युक्त इन्द्रजिताचे शिरस्त्राण सहित दीप्तिमान् मस्तक धडापासून वेगळे करून कापून भूतलावर पाडले. ॥७१॥
|
तद्राक्षसतनूजस्य भिन्नस्कन्धं शिरो महत् । तपनीयनिभं भूमौ ददृशे रुधिरोक्षितम् ॥ ७२ ॥
|
राक्षसपुत्र इन्द्रजिताचे खांद्यापासून छाटलेले ते विशाल शिर, जे रक्ताने चिंब होत होते, भूमीवर सुवर्णासमान दिसून येऊ लागले. ॥७२॥
|
हतः स निपपाताथ धरण्यां रावणात्मजः । कवची सशिरस्त्राणो विप्रविद्धशरासनः ॥ ७३ ॥
|
या प्रकारे मारला जाऊन कवच, शिर आणि शिरस्त्राणासहित रावणकुमार धराशायी झाला. त्याचे धनुष्य दूर जाऊन पडले. ॥७३॥
|
चुक्रुशुस्ते ततः सर्वे वानराः सविभीषणाः । हृष्यन्तो निहते तस्मिन् देवा वृत्रवधे यथा ॥ ७४ ॥
|
जसे वृत्रासुराचा वध झाल्यावर देव प्रसन्न झाले होते त्याच प्रकारे इन्द्रजित मारला गेल्यावर विभीषणासहित समस्त वानर हर्षाने भरून गेले आणि जोरजोराने सिंहनाद करू लागले. ॥७४॥
|
अथान्तरिक्षे देवानां ऋषीणां च महात्मनाम् । जज्ञेऽथ जयसन्नादो गन्धर्वाप्सरसामपि ॥ ७५ ॥
|
आकाशात देवता, महात्मा ऋषि, गन्धर्व आणि अप्सरा यांचाही विजयजनित हर्षनाद निनादत राहिला. ॥७५॥
|
पतितं समभिज्ञाय राक्षसी सा महाचमूः । वध्यमाना दिशो भेजे हरिभिर्जितकाशिभिः ॥ ७६ ॥
|
इन्द्रजित धराशायी झालेला जाणून राक्षसांची ती विशाल सेना विजयाने उल्लासित झालेल्या वानरांचा मार खात संपूर्ण दिशांमध्ये पळू लागली. ॥७६॥
|
वानरैर्वध्यमानास्ते शस्त्राण्युत्सृज्य राक्षसाः । लङ्कामभिमुखाः सस्त्रुः भ्रष्टसंज्ञाः प्रधाविताः ॥ ७७ ॥
|
वानरांच्या द्वारे मारले जाणारे राक्षस आपली शुद्ध-बुद्ध हरवून बसले आणि अस्त्र-शस्त्रांना सोडून जोराने पळत लंकेकडे निघून गेले. ॥७७॥
|
दुद्रुवुर्बहुधा भीता राक्षसाः शतशो दिशः । त्यक्त्वा प्रहरणान् सर्वे पट्टिशासिपरश्वधान् ॥ ७८ ॥
|
राक्षस फार घाबरून गेले होते म्हणून ते सर्वच्या सर्व पट्टिश, खङ्ग आणि परशु आदि शस्त्रांचा त्याग करून शेकडोंच्या संख्येने एकाच वेळी एकदमच सर्व दिशांना पळू लागले. ॥७८॥
|
केचिल्लङ्कां परित्रस्ताः प्रविष्टा वानरार्दिताः । समुद्रे पतिताः केचित् केचित् पर्वतमाश्रिताः ॥ ७९ ॥
|
वानरांकडून पीडित होऊन कोणी भीतीने लंकेत घुसले, कोणी समुद्रात उडी घेतली तर कोणी कोणी पर्वतांच्या शिखरावर चढले. ॥७९॥
|
हतमिन्द्रजितं दृष्ट्वा शयानं च रणक्षितौ । राक्षसानां सहस्रेषु न कश्चित् प्रत्यदृश्यत ॥ ८० ॥
|
इन्द्रजित मारला गेला आणि रणभूमीवर झोपी गेला आहे हे पाहून हजारो राक्षसांपैकी एकही तेथे उभा असलेला दिसून येत नव्हता. ॥८०॥
|
यथाऽस्तं गत आदित्ये नावतिष्ठन्ति रश्मयः । तथा तस्मिन् निपतिते राक्षसास्ते गता दिशः ॥ ८१ ॥
|
ज्याप्रमाणे सूर्याचा अस्त झाल्यावर त्याचे किरण तेथे थांबू शकत नाहीत त्याचप्रकारे इन्द्रजित धराशायी झाल्यावर ते राक्षस तेथे थांबू शकले नाहीत, संपूर्ण दिशांमध्ये पळून गेले. ॥८१॥
|
शान्तरश्मिरिवादित्यो निर्वाण इव पावकः । स बभूव महाबाहुः व्यपास्तगतजीवितः ॥ ८२ ॥
|
महाबाहु इन्द्रजित निष्प्राण झाल्यावर शांत किरणाच्या सूर्याप्रमाणे अथवा विझलेल्या आगीप्रमाणे निस्तेज झाला. ॥८२॥
|
प्रशान्तपीडाबहुलो नष्टारिष्टः प्रहर्षवान् । बभूव लोकः पतिते राक्षसेन्द्रसुते तदा ॥ ८३ ॥
|
त्यासमयी राक्षसराजकुमार इन्द्रजित समरभूमीवर मारला गेल्यावर सार्या संसाराची अधिकांश पीडा नष्ट झाली. सर्वांचा शत्रु मारला गेला आणि सर्व हर्षाने भरून गेले. ॥८३॥
|
हर्षं च शक्रो भगवान् सह सर्वैर्महर्षिभिः । जगाम निहते तस्मिन् राक्षसे पापकर्मणि ॥ ८४ ॥
|
तो पापकर्मा राक्षस मारला गेल्यावर संपूर्ण महर्षिंसहित भगवान् इन्द्रांना फार प्रसन्नता वाटली. ॥८४॥
|
आकाशे चापि देवानां शुश्रुवे दुन्दुभिस्वनः । नृत्यद्भिरप्सरोभिश्च गन्धर्वैश्च महात्मभिः ॥ ८५ ॥
|
आकाशात नाचणार्या अप्सरा आणि गात असलेले महामना गंधर्व यांच्या नृत्य आणि गाण्याचा ध्वनि बरोबर देवतांच्या दुन्दुभिंचा शब्दही ऐकू येऊ लागला. ॥८५॥
|
ववर्षुः पुष्पवर्षाणि तदद्भुशमिवाभवत् । प्रशशाम हते तस्मिन् राक्षसे क्रूरकर्मणि ॥ ८६ ॥
|
देवता आदि तेथे पुष्पवृष्टि करू लागले. ते दृश्य अद्भुतसे प्रतीत झाले. तो क्रूरकर्मा राक्षस मारला गेल्यावर तेथे उडणारी धूळ शांत झाली. ॥८६॥
|
शुद्धा आपो नभश्चैव जहृषुर्देवदानवाः । आजग्मुः पतिते तस्मिन् सर्वलोकभयावहे ॥ ८७ ॥
ऊचुश्च सहितास्तुष्टा देवगन्धर्वदानवाः । विज्वराः शान्तकलुषा ब्राह्मणा विचरन्त्विति ॥ ८८ ॥
|
संपूर्ण लोकांना भयभीत करणारा इन्द्रजित धराशायी झाल्यावर जल स्वच्छ झाले, आकाशही निर्मळ दिसू लागले आणि देवता आणि दानव हर्षाने प्रफुल्लित झाले. देवता, गन्धर्व आणि दानव तेथे आले आणि एकाच वेळी संतुष्ट होऊन बोलले - ’आता ब्राह्मण लोक निश्चिन्त आणि क्लेशशून्य होऊन सर्वत्र विचरोत. ॥८७-८८॥
|
ततोऽभ्यनन्दन् संहृष्टाः समरे हरियूथपाः । तमप्रतिबलं दृष्ट्वा हतं नैर्ऋतपुङ्गवम् ॥ ८९ ॥
|
समरांगणात अप्रतिम बलशाली निशाचर इन्द्रजित मारला गेलेला पाहून हर्षाने भरलेले वानर-यूथपति लक्ष्मणांचे अभिनन्दन करू लागले. ॥८९॥
|
विभीषणो हनूमांश्च जाम्बवांश्चर्क्षयूथपः । विजयेनाभिनन्दन्तः तुष्टुवुश्चापि लक्ष्मणम् ॥ ९० ॥
|
विभीषण, हनुमान् आणि अस्वलांचे यूथपति जाम्बवान् - हे या विजयासाठी लक्ष्मणांचे अभिनन्दन करीत त्यांची पुन्हा पुन्हा प्रशंसा करू लागले. ॥९०॥
|
क्ष्वेडन्तश्च प्लवन्तश्च गर्जन्तश्च प्लवङ्गमाः । लब्धलक्षा रघुसुतं परिवार्योपतस्थिरे ॥ ९१ ॥
|
हर्ष आणि रक्षणाचा अवसर मिळताच वानर किलकिलत, उड्या मारत आणि गर्जना करत तेथे रघुसुत लक्ष्मणांना घेरून उभे राहिले. ॥९१॥
|
लाङ्गूलानि प्रविध्यन्तः स्फोटयन्तश्च वानराः । लक्ष्मणो जयतीत्येव वाक्यं विश्रावयंस्तदा ॥ ९२ ॥
|
त्यासमयी आपल्या शेपट्या हलवत आणि आपटत वानरवीर ’लक्ष्मणांचा जय होवो’ अशा घोषणा देऊ लागले. ॥९२॥
|
अन्योन्यं च समाश्लिष्य कपयो हृष्टमानसाः । चक्रुरुच्चावचगुणा राघवाश्रयसत्कथाः ॥ ९३ ॥
|
वानरांचे चित्त हर्षाने भरलेले होते. ते विविध गुण असणारे वानर एक दुसर्याला ह्रदयाशी धरून राघव आश्रय सत्कथा सांगू लागले. (श्रीरामचन्द्रांसंबंधी कथा सांगू लागले.) ॥९३॥
|
तदसुकरमथाभिवीक्ष्य हृष्टाः प्रियसुहृदो युधि लक्ष्मणस्य कर्म । परममुपलभन् मनः प्रहर्षं विनिहतमिन्द्ररिपुं निशम्य देवाः ॥ ९४ ॥
|
युद्धस्थळी लक्ष्मणांचे प्रिय सुहृद वानर त्यांचा तो दुष्कर आणि महान् पराक्रम पाहून फार प्रसन्न झाले. देवताही त्या इन्द्रद्रोही राक्षसाचा वध झालेला पाहून मनांत अत्यंत मोठ्या हर्षाचा अनुभव करू लागल्या. ॥९४॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे नवतितमः सर्गः ॥ ९० ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा नव्वदावा सर्ग पूरा झाला. ॥९०॥
|