देवानां विष्णूं प्रति रावणवधाय नररूपेणावतरणाय प्रार्थना, राज्ञः पुत्रेष्टियज्ञेऽग्निकुण्डात् प्रादुर्भूतेन प्राजापत्यपुरुषेण पायसस्यार्पणं तद् भुक्त्वा राज्ञीनां गर्भधारणम् -
|
देवतांनी श्रीहरिला रावणवधासाठी मनुष्यरूपात अवतीर्ण होण्यासाठी सांगणे, राजाच्या पुत्रेष्टि यज्ञात अग्निकुण्डातून प्राजापत्य पुरुषाचे प्रकटन व खीर अर्पण करणे, आणि ती खाऊन राण्यांचे गर्भवती होणे -
|
ततो नारायणो विष्णुर्नियुक्तः सुरसत्तमैः ।
जानन्नपि सुरानेवं श्लक्ष्णं वचनमबव्रीत् ॥ १ ॥
|
त्यानंतर श्रेष्ठ देवतांच्या द्वारे याप्रकारे रावण वधासाठी नियुक्त झाल्यावर सर्वव्यापी नारायणाने रावण वधाचा उपाय जाणत असूनही देवतांना उद्देशून हे मधुर वचन उच्चारले - ॥ १ ॥
|
उपायः को वधे तस्य राक्षसाधिपतेः सुराः ।
यमहं तं समास्थाय निहन्यामृषिकण्टकम् ॥ २ ॥
|
"देवगणांनो ! राक्षसराज रावणाच्या वधासाठी कुठला उपाय आहे की ज्याचा आश्रय घेऊन मी महर्षिंना कण्टकरूप अशा त्या निशाचराचा वध करावा ?" ॥ २ ॥
|
एवमुक्ताः सुराः सर्वे प्रत्यूचुर्विष्णुमव्ययम् ।
मानुषीं रूपमास्थाय रावणं जहि संयुगे ॥ ३ ॥
|
त्यांनी अशा प्रकारे विचारल्यावर सर्व देवता त्या अविनाशी भगवान् विष्णुला म्हणाल्या - "प्रभो ! आपण मनुष्याचे रूप घेऊन उद्धट रावणास मारावे. ॥ ३ ॥
|
स हि तेपे तपस्तीव्रं दीर्घकालमरिंदमः ।
येन तुष्टोऽभवद् ब्रह्मा लोककृल्लोकपूर्वजः ॥ ४ ॥
|
'त्या शत्रुदमन निशाचराने दीर्घकाळपर्यंत तीव्र तपस्या केली होती, ज्यामुळे सर्व लोकांचे पूर्वज लोकस्रष्टा ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले होते. ॥ ४ ॥
|
सम्तुष्टः प्रददौ तस्मै राक्षसाय वरं प्रभुः ।
नानाविधेभ्यो भूतेभ्यो भयं नान्यत्र मानुषात् ॥ ५ ॥
|
'त्याच्यावर संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवांनी त्या राक्षसाला असा वर दिला होता की तुला नाना प्रकारच्या प्राण्यांपैकी मनुष्याशिवाय इतर कोणापासूनही भय नाही. ॥ ५ ॥
|
अवज्ञाताः पुरा तेन वरदाने हि मानवाः ।
एवं पितामहात् तस्माद् वरदानेन गर्वितः ॥ ६ ॥
|
पूर्वकाळी वरदान मागतेवेळी त्या राक्षसाने मनुष्यास दुर्बल समजून त्याची अवहेलना केली होती. या प्रकारे पितामहाकडून मिळालेल्या वरदानामुळे त्याची घमेंड वाढली आहे. ॥ ६ ॥
|
उत्सादयति लोकांस्त्रीन् स्त्रियश्चाप्युपकर्षति ।
तस्मात्तस्य वधो दृष्टो मानुषेभ्यः परंतप ॥ ७ ॥
|
'शत्रुंना संताप देणार्या देवा ! तो तिन्ही लोकांना पीडा देत आहे आणि स्त्रियांचेही अपहरण करीत आहे, म्हणून त्याचा वध मनुष्याच्या हाताने निश्चित ठरलेला आहे." ॥ ७ ॥
|
इत्येतद् वचनं श्रुत्वा सुराणां विष्णुरात्मवान् ।
पितरं रोचयामास तदा दशरथं नृपम् ॥ ८ ॥
|
समस्त जीवात्म्यांना वश ठेवणार्या भगवान् विष्णुंनी देवतांचे म्हणणे ऐकून अवतार कालात राजा दशरथालाच आपला पिता बनविण्याची इच्छा केली. ॥ ८ ॥
|
स चाप्यपुत्रो नृपतिस्तस्मिन् काले महाद्युतिः ।
अयजत् पुत्रियामिष्टिं पुत्रेप्सुररिसूदनः ॥ ९ ॥
|
त्याचवेळी ते शत्रुसूदन महातेजस्वी नरेश पुत्रहीन असल्याने पुत्रप्राप्तिच्या इच्छेने पुत्रेष्टि यज्ञ करीत होते. ॥ ९ ॥
|
स कृत्वा निश्चयं विष्णुरामन्त्र्य च पितामहम् ।
अंतर्धानं गतो देवैः पूज्यमानो महर्षिभिः ॥ १० ॥
|
त्यांना पिता बनविण्याचा निश्चय करून भगवान् विष्णु पितामहांची अनुमति घेऊन देवता आणि महर्षिंच्या द्वारा पूजित होऊन तेथून अंतर्धान पावले. ॥ १० ॥
|
ततो वै यजमानस्य पावकादतुलप्रभम् ।
प्रादुर्भूतं महद् भूतं महावीर्यं महाबलम् ॥ ११ ॥
|
तत्पश्चात् पुत्रेष्टि यज्ञ करणार्या राजा दशरथाच्या यज्ञात अग्निकुंडातून एक विशालकाय पुरुष प्रकट झाला. त्याचे शरीर इतके प्रकाशमय होते की ज्याची तुलनाच करता येत नाही. त्याचे बल पराक्रम महान् होते. ॥ ११ ॥
|
कृष्ण रक्ताम्बरधरं रक्तास्यं दुन्दुभिस्वनम् ।
स्निग्धहर्यक्षतनुजश्मश्रुप्रवरमूर्धजम् ॥ १२ ॥
|
त्याची अंगकान्ति काळ्या रंगाची होती. त्याने आपल्या शरीरावर लाल वस्त्र धारण केले होते. त्याचे मुखही लाल होते. त्याच्या वाणीतून दुन्दुभि समान गंभीर ध्वनि प्रकट होत होता. त्याचे रोम, दाढी, मिशा आणि मोठमोठे चिकट केस तुकतुकीत आणि सिंहाच्या केसाप्रमाणे होते. ॥ १२ ॥
|
शुभलक्षणसम्पन्नं दिव्याभरणभूषितम् ।
शैलशृङ्गसमुत्सेधं दृप्तशार्दूलविक्रमम् ॥ १३ ॥
|
तो शुभलक्षणांनी संपन्न, दिव्य आभूषणांनी विभूषित्, शैलशिखराप्रमाणे उंच आणि गर्विष्ठ सिंहाप्रमाणे चालणारा होता. ॥ १३ ॥
|
दिवाकरसमाकारं दीप्तानलशिखोपमम् ।
तप्तजाम्बूनदमयीं राजतान्तपरिच्छदाम् ॥ १४ ॥
दिव्यपायससम्पूर्णां पात्रीं पत्नीमिव प्रियाम् ।
प्रगृह्य विपुलां दोर्भ्यां स्वयं मायामयीमिव ॥ १५ ॥
|
त्याची आकृति सूर्यासमान तेजस्वी होती. ती प्रज्वलित अग्निच्या ज्वाळाप्रमाणे देदीप्यमान दिसत होती. त्याच्या हातात तप्त जांबूनद नामक सुवर्णाची बनविलेली परात होती जी चांदिच्या झाकणाने झाकली होती. ती परात फार मोठी होती आणि दिव्य खीरीने भरलेली होती. तिला त्या पुरुषाने आपल्या दोन्ही भुजांवर अशा प्रकारे उचलून धरली होती की जणु कोणी रसिक आपल्या प्रियतम पत्नीला आपल्या अङ्कावर घेऊन राहिला आहे. ती अद्भुत परात मायामयी असल्यासारखी भासत होती. ॥ १४-१५ ॥
|
समवेक्ष्याब्रवीद् वाक्यमिदं दशरथं नृपम् ।
प्राजापत्यं नरं विद्धि मामिहाभ्यागतं नृप ॥ १६ ॥
|
त्याने राजा दशरथाकडे पाहून म्हटले - "नरेश्वर ! मला प्रजापति लोकांतील पुरुष जाण. मी प्रजापतिच्या आज्ञेनेच येथे आलो आहे." ॥ १६ ॥
|
ततः परं तदा राजा प्रत्युवाच कृताञ्जलिः ।
भगवन् स्वागतं तेऽस्तु किमहं करवाणि ते ॥ १७ ॥
|
तेव्हां राजाने हात जोडून म्हटले - "भगवन् ! आपले स्वागत असो. सांगावे, मी आपली काय सेवा करू." ॥ १७ ॥
|
अथो पुनरिदं वाक्यं प्राजापत्यो नरोऽब्रवीत् ।
राजन्नर्चयता देवानद्य प्राप्तमिदं त्वया ॥ १८ ॥
|
नंतर प्राजापत्य पुरुषाने परत म्हटले, "राजन् ! तुम्ही देवतांची आराधना करता म्हणून तुम्हाला आज ही वस्तु प्राप्त झाली आहे. ॥ १८ ॥
|
इदं तु नृपशार्दूल पायसं देवनिर्मितम् ।
प्रजाकरं गृहाण त्वं धन्यमारोग्यवर्धनम् ॥ १९ ॥
|
'नृपश्रेष्ठ ! ही देवतांनी बनविलेली खीर आहे जी संतानाची प्राप्ति करविणरी आहे. तू ही ग्रहण कर. ही धन आणि आरोग्याचीही वृद्धि करणारी आहे. ॥ १९ ॥
|
भार्याणामनुरूपाणामश्रीतेति प्रयच्छ वै ।
तासु त्वं लप्स्यसे पुत्रान् यदर्थं यजसे नृप ॥ २० ॥
|
'राजन् ! ही खीर आपल्या योग्य पत्नींना दे आणि सांग 'तुम्ही ही खीर खा.' असे केल्यानंतर त्यांच्या गर्भापासून आपल्याला अनेक पुत्रांची प्राप्ती होईल., ज्यासाठी तू हा यज्ञ करीत आहेस." ॥ २० ॥
|
तथेति नृपतिः प्रीतः शिरसा प्रतिगृह्य ताम् ।
पात्रीं देवान्नसम्पूर्णां देवदत्तां हिरण्मयीम् ॥ २१ ॥
अभिवाद्य च तद्भूतमद्भुतं प्रियदर्शनम् ।
मुदा परमया युक्तश्चकाराभिप्रदक्षिणम् ॥ २२ ॥
|
राजाने प्रसन्नतापूर्वक 'फार छान' असे म्हणून त्या दिव्य पुरुषाने दिलेली देवन्नाने परिपूर्ण सोन्याची थाळी घेऊन तिला आपल्या मस्तकावर धारण केली. नंतर त्या अद्भुत आणि प्रियदर्शन पुरुषास प्रणाम करून अत्यंत आनंदाने त्याची परिक्रमा केली. ॥ २१-२२ ॥
|
ततो दशरथः प्राप्य पायसं देवनिर्मितम् ।
बभूव परमप्रीतः प्राप्य वित्तमिवाधनः ॥ २३ ॥
ततस्तदद्भुतप्रख्यं भूतं परमभास्वरम् ।
संवर्तयित्वा तत् कर्म तत्रैवान्तरधीयत ॥ २४ ॥
|
या प्रकारे देवतांच्या द्वारा बनविलेली खीर मिळाल्याने राजे दशरथ फार प्रसन्न झाले, जणु निर्धनाला धन मिळाले असावे. त्यानंतर तो परम तेजस्वी अद्भुत पुरुष आपले काम पूर्ण झाल्यावर तेथेच अंतर्धान पावला. ॥ २३-२४ ॥
|
हर्षरश्मिभिरुद्योतं तस्यान्तःपुरमाबभौ ।
शारदस्याभिरामस्य चन्द्रस्येव नभोंऽशुभिः ॥ २५ ॥
|
त्यावेळी राजाच्या अंतःपुरातील स्त्रिया हर्षोल्लासाने द्विगुणित झालेल्या कान्तिमयी किरणांनी प्रकाशित होऊन, शरत्कालातील नयनाभिरम्य चंद्रम्याच्या रम्य रश्मिंनी उद्भासित होणार्या आकाशाप्रमाणे सुशोभित दिसू लागला. ॥ २५ ॥
|
सोऽन्तःपुरं प्रविश्यैव कौसल्यामिदमब्रवीत् ।
पायसं प्रतिगृह्णीष्व पुत्रीयं त्विदमात्मनः ॥ २६ ॥
|
राजा दशरथ ती खीर घेऊन अंतःपुरात गेले आणि कौसल्येस म्हणाले - "देवि ! ही आपल्यासाठी पुत्र प्राप्त करविणारी खीर ग्रहण कर." ॥ २६ ॥
|
कौसल्यायै नरपतिः पायसार्धं ददौ तदा ।
अर्धादर्धं ददौ चापि सुमित्रायै नराधिपः ॥ २७ ॥
|
असे म्हणून नरेशाने त्या वेळी त्या खीरीचा अर्धभाग महाराणी कौसल्येला दिला. नंतर राहिलेल्या अर्ध्याचा अर्धा भाग राणी सुमित्रेला अर्पण केला. ॥ २७ ॥
|
कैकेय्यै चावशिष्टार्धं ददौ पुत्रार्थकारणात् ।
प्रददौ चावशिष्टार्धं पायसस्यामृतोपमम् ॥ २८ ॥
अनुचिन्त्य सुमित्रायै पुनरेव महामतिः ।
एवं तासां ददौ राजा भार्याणां पायसं पृथक् ॥ २९ ॥
|
त्या दोघींना दिल्यावर जी खीर उरली होती तिचा अर्धा भाग त्यांनी पुत्रप्राप्तिच्या उद्देशाने कैकेयीला दिला. तत्पश्चात् त्या खीरीचा जो अवशिष्ट भाग होता तो अमृतोपमम् भाग महाबुद्धिमान नरेशाने काही काळ विचार करून पुन्हा सुमित्रेलाच अर्पित केला. या प्रकारे राजाने आपल्या सर्व राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे खीर वाटून टाकली. ॥ २८-२९ ॥
|
ताश्चैव पायसं प्राप्य नरेन्द्रस्योत्तमस्त्रियः ।
सम्मानं मेनिरे सर्वाः प्रहर्षोदितचेतसः ॥ ३० ॥
|
महाराजांच्या त्या सर्व साध्वी राण्यांनी त्यांच्या हाताने ती खीर मिळाली हा आपला मोठा सन्मान मानला. त्यांच्या चित्तात अत्यंत हर्षोल्हास पसरला. ॥ ३० ॥
|
ततस्तु ताः प्राश्य तदुत्तमस्त्रियो
महीपतेरुत्तमपायसं पृथक् ।
हुताशनादित्य समानतेजसो-
ऽचिरेण गर्भान् प्रतिपेदिरे तदा ॥ ३१ ॥
|
ती उत्तम खीर खाऊन महाराजांच्या त्या तिन्ही साध्वी महाराण्यांनी शीघ्रच पृथक् पृथक् गर्भ धारण केले. त्यांचे ते गर्भ अग्नि आणि सूर्यासमान तेजस्वी होते. ॥ ३१ ॥
|
ततस्तु राजा प्रतिवीक्ष्य ताः स्त्रियः
प्ररूढगर्भाः प्रतिलब्धमानसः ।
बभूव हृष्टस्त्रिदिवे यथा हरिः
सुरेन्द्रसिद्धर्षिगणाभिपूजितः ॥ ३२ ॥
|
त्यानंतर आपल्या राण्यांना गर्भवती झालेल्या पाहून राजा दशरथास मोठी प्रसन्नता वाटली. त्यांना वाटले की माझा मनोरथ सफल झाला. ज्याप्रमाणे स्वर्गात इंद्र, सिद्ध आणि ऋषिंच्या द्वारा पूजित होऊन श्रीहरि प्रसन्न होतात त्याचप्रमाणे भूतलवर देवेन्द्र, सिद्ध आणि महर्षि यांच्या द्वारे सन्मानित होऊन राजे दशरथही अत्यंत संतुष्ट झाले होते. ॥ ३२ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे षोडशः सर्गः ॥ १६ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा सोळावा सर्ग समाप्त झाला. ॥ १६ ॥
|