हनुमता सुग्रीवस्याभिषेकाय श्रीरामं प्रतिकिष्किंधां गन्तुं प्रार्थनं, श्रीरामेण तत्र गमनं विनैवानुमतिप्रदानं तदनु सुग्रीवाङ्गदयोरभिषेकः -
|
हनुमानाची सुग्रीवाच्या अभिषेकासाठी श्रीरामचंद्रांना किष्किंधेत येण्याची प्रार्थना, श्रीरामांनी पुरीमध्ये न जाता केवळ अनुमति देणे, तत्पश्चार् सुग्रीव आणि अंगदाचा अभिषेक -
|
ततः शोकाभिसंतप्तं सुग्रीवं क्लिन्नवाससम् । शाखामृगमहामात्राः परिवार्योपतस्थिरे ॥ १ ॥
अभिगम्य महाबाहुं राममक्लिष्टकारिणम् । स्थिताः प्राञ्जलयः सर्वे पितामहमिवर्षयः ॥ २ ॥
|
त्यानंतर वानरसेनेचे प्रधान प्रधान वीर (हनुमान आदि) ओली वस्त्रे नेसलेल्या शोकसंतप्त सुग्रीवास चारी बाजूनी घेरून त्यांना बरोबर घेऊन अनायासच महान् कर्म करणार्या महाबाहु रामांच्या सेवेत उपस्थित झाले. श्रीरामांच्या जवळ येऊन ते सर्व वानर त्यांच्या समोर हात जोडून उभे राहिले, जसे ब्रह्मदेवांच्या समोर महर्षिगण उभे राहातात त्याप्रमाणे. ॥१-२॥
|
ततः काञ्चनशैलाभः तरुणार्कनिभाननः । अब्रवीत् प्राञ्जलिर्वाक्यं हनुमान् मारुतात्मजः ॥ ३ ॥
|
तत्पश्चात सुवर्णमय मेरू पर्वताप्रमाणे सुंदर आणि विशाल शरीराचे आणि ज्यांचे मुख प्रातःकालच्या सूर्याप्रमाणे अरूण प्रभेने प्रकाशित होत होते असे वायुपुत्र हनुमान् दोन्ही हात जोडून म्हणाले- ॥३॥
|
भवत् प्रसादात् काकुत्स्थ पितृपैतामहं महत् । वानराणां सुदंष्ट्राणां संपन्नबलशालिनाम् ॥ ४ ॥
महात्मनां सुदुष्प्रापं प्राप्तं राज्यं इदं प्रभो भवता समनुज्ञातः प्रविश्य नगरं शुभम् ॥ ५ ॥
संविधास्यति कार्याणि सर्वाणि ससुहृद्गणः ।
|
’काकुत्स्थ ! आपल्या कृपेने सुग्रीवांना सुंदर दाढा असणार्या पूर्णबलशाली आणि महामनस्वी वानरांचे हे विशाल साम्राज्य, जे यांच्या वाड-वडिलांच्या वेळेपासून चालत आले आहे, प्राप्त झाले आहे. यद्यपि हे प्राप्त होणे फारच कठीण होते तरीही आपल्या प्रसादाने त्यांना ते सुलभ झाले आहे. आता जर आपण आज्ञा दिलीत तर हे आपल्या सुंदर नगरात प्रवेश करून सुहृदांसह आपले सर्व राजकार्य संभाळतील. ॥४-५ १/२॥
|
स्नातो ऽयं विविधैर्गंधैरौषधैश्च यथाविधि ॥ ६ ॥
अर्चयिष्यति माल्यैश्च रत्नैौश्च त्वां विशेषतः । इमां गिरिगुहां रम्यां अभिगंतुं त्ममर्हसि ॥ ७ ॥
कुरुष्व स्वामिसंबंधं वानरान् संप्रहर्षय ।
|
’हे शास्त्रविधिस अनुसरून नाना सुगंधित पदार्थ आणि औषधिंसहित जलाने राज्यावर अभिषिक्त होऊन माला तसेच रत्नांच्या द्वारा आपली विशेष पूजा करतील. म्हणून आपण या रमणीय पर्वत-गुफा किष्किंधेमध्ये येण्याची कृपा करावी आणि ह्यांना या राज्याचा स्वामी बनवून वानरांचा हर्ष वाढवावा. ॥७ १/२॥
|
एवमुक्तो हनुमता राघवः परवीरहा ॥ ८ ॥
प्रत्युवाच हनूमंतं बुद्धिमान्वाक्यकोविदः ।
|
हनुमानाने असे म्हटल्यावर शत्रुवीरांचा संहार करणारे तसेच संभाषण करण्यात कुशल (वाक्यकोविद) बुद्धिमान् राघवांनी त्यांना याप्रमाणे उत्तर दिले- ॥८ १/२॥
|
चतुर्दश समाः सौम्य ग्रामं वा यदि वा पुरम् ॥ ९ ॥
न प्रवेक्ष्यामि हनुमन् पितुर्निर्देशपालकः ।
|
’हनुमान् ! सौम्या ! मी पित्याच्या आज्ञेचे पालन करीत राहात आहे म्हणून चौदा वर्षे पूर्ण होईपर्यंत कुठल्याही गावात अथवा नगरात प्रवेश करणार नाही. ॥९ १/२॥
|
सुसमृद्धां गुहां रम्यां सुग्रीवो वानरर्षभः ॥ १० ॥
प्रविष्टो विधिवद् वीरः क्षिप्रं राज्येऽभिषिच्यताम् ।
|
’वानरश्रेष्ठ वीर सुग्रीव या समृद्धशालिनी दिव्य गुफेत प्रवेश करोत आणि तेथे लवकरच यांचा विधिपूर्वक राज्याभिषेक केला जावो. ॥१० १/२॥
|
एवमुक्त्वा हनूमंतं रामः सुग्रीवमब्रवीत् ॥ ११ ॥
वृत्तज्ञो वृत्तसंपन्नं उदारबलविक्रमम् । इममप्यङ्गादं वीर यौवराज्येऽभिषेचय ॥ १२ ॥
|
हनुमानास असे सांगून श्रीराम सुग्रीवास म्हणाले- ’मित्रा ! तुम्ही लौकिक आणि शास्त्रीय सर्व व्यवहार जाणताच. कुमार अंगद सदाचार संपन्न तसेच महान् बलपराक्रमाने परिपूर्ण आहे. यांच्यात वीरता ठासून भरलेली आहे, म्हणून तुम्ही यांना ही युवराज पदावर अभिषिक्त करावे. ॥११-१२॥
|
ज्येष्ठस्य हि सुतो ज्येष्ठः सदृशो विक्रमेण ते । अङ्गषदोऽयमदीनात्मा यौवराज्यस्य भाजनम् ॥ १३ ॥
|
’हे तुमच्या मोठ्या भावाचे ज्येष्ठ पुत्र आहेत. पराक्रमांतही त्यांच्या समानच आहेत तसेच यांचे हृदय उदार आहे. म्हणून अंगद युवराजपदाचे सर्वथा अधिकारी आहेत. ॥१३॥
|
पूर्वोऽयं वार्षिको मासः श्रावणः सलिलागमः । प्रवृत्ताः सौम्य चत्वारो मासा वार्षिकसंज्ञिताः ॥ १४ ॥
|
’सौम्या ! वर्षा मधले जाणारे चार मास अथवा चातुर्मास आले आहेत. यात पहिला मास हा श्रावण जो जलाची प्राप्ति करविणारा आहे, त्याचा आरंभ झाला आहे. ॥१४॥
|
नायमुद्योगसमयः प्रविश त्वं पुरीं शुभाम् । अस्मिन् वत्स्याम्यहं सौम्य पर्वते सहलक्ष्मणः ॥ १५ ॥
|
’सौम्या ! ही कुणावर चढाई करण्याची वेळ नाही आहे. म्हणून तुम्ही आपल्या सुंदर नगरीत जा. मी लक्ष्मणासह या पर्वतावर निवास करीन. ॥१५॥
|
इयं गिरिगुहा रम्या विशाला युक्तमारुता । प्रभूतसलिला सौम्य प्रभूतकमलोत्पला ॥ १६ ॥
|
’सौम्य सुग्रीवा ! ही पर्वतीय गुफा फार रमणीय आणि विशाल आहे. हिच्यात आवश्यकतेनुसार हवा ही मिळू शकते. येथे पर्याप्त जलही सुलभ आहे आणि कमळे आणि उत्पलेही खूप आहेत. ॥१६॥
|
कार्तिके समनुप्राप्ते त्वं रावणवधे यत । एष नः समयः सौम्य प्रविश त्वं स्वमालयम् ॥ १७ ॥
अभिषिञ्चस्व राज्ये च सुहृदः संप्रहर्षय ।
|
’सख्या ! कार्तिक आल्यावर तुम्ही रावणाच्या वधासाठी प्रयत्न करावा. हाच आम्हा लोकांचा निश्चय आहे. आता तुम्ही आपल्या महालात प्रवेश करा आणि राज्यावर अभिषिक्त होऊन सुहृदांना आनंदित करा.’ ॥१७ १/२॥
|
इति रामाभ्यनुज्ञातः सुग्रीवो वानरर्षभः ॥ १८ ॥
प्रविवेश पुरीं रम्यां किष्किंधां वालिपालिताम् ।
|
श्रीरामांची ही आज्ञा मिळाल्यावर, जिचे रक्षण वालीने केले होते त्या रमणीय किष्किंधापुरीत वानरश्रेष्ठ सुग्रीव गेले. ॥१८ १/२॥
|
तं वानरसहस्राणि प्रविष्टं वानरेश्वरम् ॥ १९ ॥
अभिवाद्य प्रविष्टानि सर्वतः प्लवगेश्वरम् ।
|
त्या समयी गुहेमध्ये प्रविष्ट झालेल्या त्या वानरराजास चारी बाजुंनी घेरून हजारो वानर त्यांच्या बरोबरच गुहेत शिरले. ॥१९ १/२॥
|
ततः प्रकृतयः सर्वा दृष्ट्वा हरिगणेश्वरम् ॥ २० ॥
प्रणम्य मूर्ध्ना पतिता वसुधायां समाहिताः ।
|
वानरराजास पाहून प्रजा आदि समस्त प्रकृतिंनी एकाग्रचित्त होऊन पृथ्वीवर मस्तक टेकवून त्यांना प्रणाम केला. ॥२० १/२॥
|
सुग्रीवः प्रकृतीः सर्वाः संभाष्योत्थाप्य वीर्यवान् ॥ २१ ॥
भ्रातुरंतःपुरं सौम्यं प्रविवेश महाबलः ।
|
महाबली पराक्रमी सुग्रीवांनी त्या सर्वांना उठण्याची आज्ञा दिली आणि त्या सर्वांशी संभाषण करून ते भावाच्या सौम्य अंतःपुरात प्रविष्ट झाले. ॥२१ १/२॥
|
प्रविष्टं भीमविक्रान्तं सुग्रीवं वानरर्षभम् ॥ २२ ॥
अभ्यषिञ्चंत सुहृदः सहस्राक्षमिवामराः ।
|
भयंकर पराक्रम प्रकट करणार्या वानरश्रेष्ठ सुग्रीवांना अंतःपुरात आलेले पाहून त्यांच्या सुहृदांनी, ज्याप्रमाणे देवतांनी सहस्त्रनेत्रधारी इंद्राचा अभिषेक केला होता त्यप्रमाणे सुग्रीवांचा अभिषेक केला. ॥२२ १/२॥
|
तस्य पाण्डुरमाजह्रुः छत्रं हेमपरिष्कृतम् ॥ २३ ॥
शुक्ले च वालव्यजने हेमदण्डे यशस्करे । तथा रत्नानि सर्वाणि सर्वबीजौषधानि च ॥ २४ ॥
सक्षीराणां च वृक्षाणां प्ररोहान् कुसुमानि च । शुक्लानि चैव वस्त्राणि श्वेतं चैवानुलेपनम् ॥ २५ ॥
सुगंधीनि च माल्यानि स्थलजान्यंबुजानि च चंदनानि च दिव्यानि गंधांश्च विविधान् बहून् ॥ २६ ॥
अक्षतं जातरूपं च प्रियङ्गुंब मधुसर्पिषी । दधि चर्म च वैयाघ्रं वाराही चाप्युपानहौ ॥ २७ ॥
समालंभनमादाय गोरोचनं मनःशिलाम् । आजग्मुस्तत्र मुदिता वराः कन्यास्तु षोडश ॥ २८ ॥
|
प्रथम तर ते सर्व लोक त्यांच्यासाठी सुवर्णभूषित श्वेत छत्र, सोन्याची दांडी असणार्या दोन पांढर्या चवर्या, सर्व प्रकारची रत्ने, बीजे आणि औषधी, दूधवाल्या (चिक असलेल्या) वृक्षांच्या खाली लटकणार्या जटा, श्वेत पुष्पे, श्वेत वस्त्रे, श्वेत अनुलेपन, जळ आणि स्थळावर होणार्या सुगंधित फुलांच्या माळा, दिव्य चंदन, नाना प्रकारचे बरेचसे सुगंधित पदार्थ, अक्षता, सोने, प्रियङ्गु, मधु, तूप, दही, व्याघ्रचर्म, सुंदर तसेच बहुमूल्य पादत्राणे, अंगराज, गोरोचन आणि मनःशिल आदि सामग्री घेऊन तेथे उपस्थित झाले. त्याच बरोबर हर्षाने भरलेल्या सोळा सुंदर कन्याही सुग्रीवांच्या जवळ आल्या. ॥२३-२८॥
|
ततस्ते वानरश्रेष्ठं यथाकालं यथाविधि । रत्नैर्वस्त्रैश्च भक्षैश्च तोषयित्वा द्विजर्षभान् ॥ २९ ॥
|
तदनंतर त्या सर्वांनी श्रेष्ठ ब्राह्मणांना नाना प्रकारची रत्ने, वस्त्रे आणि भक्ष्य पदार्थांनी संतुष्ट करून वानरश्रेष्ठ सुग्रीवांचे विधिपूर्वक अभिषेक कार्य आरंभ केले. ॥२९॥
|
ततः कुशपरिस्तीर्णं समिद्धं जातवेदसम् । मंत्रपूतेन हविषा हुत्वा मंत्रविदो जनाः ॥ ३० ॥
|
मंत्रवेत्त्या पुरुषांनी वेदीवर अग्निची स्थापना करून त्यास प्रज्वलित केले आणि अग्निवेदीच्या चारी बाजूस कुश पसरले. नंतर अग्निचा संस्कार करून मंत्रपूत हविष्याच्या द्वारा प्रज्वलित अग्निमध्ये आहुति दिली. ॥३०॥
|
ततो हेमप्रतिष्ठाने वरास्तरणसंवृते । प्रासादशिखरे रम्ये चित्रमाल्योपशोभिते ॥ ३१ ॥
प्राङ्मुिखं विविधैर्मंत्रैः स्थापयित्वा वरासने ।
|
त्यानंतर रंगी-बेरंगी पुष्पमालांनी सुशोभित रमणीय अट्टालिकेवर एक सोन्याचे सिंहासन ठेवले गेले आणि त्यावर सुंदर बैठक पसरून त्यावर सुग्रीवाला पूर्वाभिमुख करून विधिवत् मंत्रोच्चारण करीत असता बसविले गेले. ॥३१ १/२॥
|
नदीनदेभ्यः संहृत्य तीर्थेभ्यश्च समंततः ॥ ३२ ॥
आहृत्य च समुद्रेभ्यः सर्वेभ्यो वानरर्षभाः । अपः कनककुंभेषु निधाय विमलं जलम् ॥ ३३ ॥
शुभैर्वृषभशृङ्गैश्च कलशैश्चापि काञ्चनैः । शास्त्रदृष्टेन विधिना महर्षिविहितेन च ॥ ३४ ॥
गजो गवाक्षो गवयः शरभो गंधमादनः । मैंदश्च द्विविदश्चैव हनुमान् जांबवान् तथा ॥ ३५ ॥
अभ्यषिञ्चंत सुग्रीवं प्रसन्नेन सुगंधिना । सलिलेन सहस्राक्षं वसवो वासवं यथा ॥ ३६ ॥
|
’यानंतर श्रेष्ठ वानरांनी नद्या, नद, संपूर्ण दिशांमधील तीर्थे आणि समस्त समुद्रांतून आणले गेलेले निर्मल जल एकत्र करून त्यास सोन्याच्या कलशांमध्ये ठेवले. नंतर गज, गवाक्ष, गवय, शरभ, गंधमादन, मैंद, द्विविद, हनुमान् आणि जांबवानांनी महर्षिंनी सांगितलेल्या शास्त्रोक्त विधिस अनुसरून सुवर्णमय कलशात ठेवलेल्या स्वच्छ आणि सुगंधित जलाने वळूच्या शिंगाच्या द्वारे सुग्रीवाचा, वसुंनी इंद्राचा अभिषेक केला होता त्याप्रमाणे अभिषेक केला. ॥३२-३६॥
|
अभिषिक्ते तु सुग्रीवे सर्वे वानरपुंगवाः । प्रचुक्रुशुर्महात्मानो हृष्टाः शतसहस्रशः ॥ ३७ ॥
|
सुग्रीवाचा अभिषेक झाल्यावर तेथे लाखोच्या संख्येने एकत्र आलेल्या समस्त महामनस्वी श्रेष्ठ वानर हर्षोत्फुल्ल होऊन जयघोष करू लागले. ॥३७॥
|
रामस्य तु वचः कुर्वन् सुग्रीवो वानरेश्वरः । अङ्ग्दं संपरिष्वज्य यौवराज्येऽभ्यषेचयत् ॥ ३८ ॥
|
श्रीरामचंद्रांच्या आज्ञेचे पालन करीत वानरराज सुग्रीवांनी अंगदांना हृदयाशी धरून त्यांनाही युवराजच्या पदावर अभिषिक्त केले. ॥३८॥
|
अङ्ग्दे चाभिषिक्ते तु सानुक्रोशाः प्लवंगमाः । साधु साध्विति सुग्रीवं महात्मानो ह्यपूजयन् ॥ ३९ ॥
|
अंगदाचा अभिषेक झाल्यावर महामनस्वी दयाळू वानर ’साधु साधु’ म्हणून सुग्रीवांची प्रशंसा करू लागले. ॥३९॥
|
रामं चैव महात्मानं लक्ष्मणं च पुनः पुनः । प्रीताश्च तुष्टुवुः सर्वे तादृशे तत्र वर्तिनि ॥ ४० ॥
|
याप्रकारे अभिषेक होऊन किष्किंधेत सुग्रीव आणि अंगद विराजमान झाल्यावर समस्त वानर परम प्रसन्न होऊन महात्मा राम आणि लक्ष्मणांची वारंवार स्तुति करू लागले. ॥४०॥
|
हृष्टपुष्टजनाकीर्णा पताकाध्वजशोभिता । बभूव नगरी रम्या किष्किंधा गिरिगह्वरे ॥ ४१ ॥
|
त्या समयी पर्वतीय पठारावर वसलेली किष्किंधापुरी हृष्ट-पुष्ट पुरवासीनी व्याप्त तसेच ध्वजा-पताकांनी सुशोभित झाल्यामुळे फारच रमणीय प्रतीत होत होती. ॥४१॥
|
निवेद्य रामाय तदा महात्मने महाभिषेकं कपिवाहिनीपतिः । रुमां च भार्यां उपलभ्य वीर्यवान् अवाप राज्यं त्रिदशाधिपो यथा ॥ ४२ ॥
|
वानरसेनेचे स्वामी पराक्रमी सुग्रीव यांनी महात्मा श्रीरामचंद्रांच्या जवळ जाऊन आपल्या महाभिषेकाचा समाचार निवेदन केला आणि आपली पत्नी रूमा हिला प्राप्त करून त्यांनी ज्याप्रमाणे देवराज इंद्रांनी त्रैलोक्याचे राज्य प्राप्त केले त्याप्रमाणे वानरांचे साम्राज्य प्राप्त केले. ॥४२॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे षड्विंशः सर्गः ॥ २६ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा सव्वीसावा सर्ग पूरा झाला. ॥२६॥
|