॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अरण्यकाण्ड

॥ अध्याय दहावा ॥
दूषण राक्षसाचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

युद्धार्थी चालिला खर । देखोनि उभा श्रीरघुवीर ।
अवघे खवळले निशाचर । शस्त्रसंभार सुटले ॥ १ ॥

ततस्ते कूरकर्माणं क्रुद्धाः सर्वे निशाचराः ।
रामं नानाविधैःशस्त्रैरभ्यवर्षन्त दुर्जयम् ॥ १ ॥

श्रीरामांचे युद्धकौशल्य :

श्रीराम रणरंगधीर । क्रूरकर्मी निशाचर ।
मोळोनि समग्र सैन्यसंभार । शस्त्रें अपार वर्षले ॥ २ ॥
गदा मुग्दल तोमर त्रिशूळ । परशु पट्टिश महाशूळ ।
कातिया कुर्‍हाडी परिघ मुसळ । लहुडी स्थूळ महाघात ॥ ३ ॥
खड्ग हाणिती खणखणां । बाण सुटती सणसणां ।
वोडणें वाजती दणदणां । लागली निशाणां एक घाई ॥ ४ ॥
श्रीराम एकाकी एकला । गेला तुटला निवटला ।
शस्त्रसंपाती आटला । म्हणती निमाला निःशेष ॥ ५ ॥
एक म्हणती खडविखंड । एक म्हणती नवखंड ।
एक म्हणती शतखंड । शस्त्रीं उदंड दंडिला ॥ ६ ॥
महावीरांचा घडघडाट । आणि शस्त्रांचा कडकडाट ।
नाहीं पळावयालागीं वाट । झाला सपाट श्रीराम ॥ ७ ॥
रुधिर प्राशावया अति प्रीतीं । शूर्पणखा येथें आली होती ।
तिच्या तोंडी पडली माती । अशद्ध क्षितीं आटलें ॥ ८ ॥
श्रीराम निमाला निःशेष । वृथा घाय हाणिती राक्षस ।
रणकाविरें लागलें त्यांस । ऐसें बहुवस जल्पती ॥ ९ ॥
जेंवी पर्जन्याच्या धारा । झांकोळती गिरिवरा ।
तेंवी झांकिलें श्रीरामचंद्रा । शस्त्रसंभारीं राक्षसीं ॥ १० ॥
श्रीराम चित्पर्वत अमोघ । राक्षसमंडळी महामेघ ।
शस्त्रधारांनीं झाकोळलें सर्वांग । लौकिकीं सांग दिसेना ॥ ११ ॥
श्रीराम चिदादित्य तेज गाढें । राक्षससेना तें महामेहुडें ।
झांकोळला चहूंकडे । तें यश मूढें मिरविती ॥ १२ ॥
जेंवी हृदयीं आत्मा गुप्त । कीं अभ्रांमाजी भास्वत ।
तेवीं शस्त्रांमाजी श्रीरघुनाथ । सावचित्त धनुष्येसीं ॥ १३ ॥
झांकोळिल्या अभ्रघन । जेंवी तोडी प्रभंजन ।
तेंवी राक्षसशस्त्रांतें छेदोन । राम चिद्भानु प्रकटला ॥ १४ ॥

राक्षसांचा संहार :

देखोनि राक्षसांचे बळ । रामें सोडिलें शरजाळ ।
त्यांची शस्त्रें छेदानि सकळ । वीर प्रबळ खोंचले ॥ १५ ॥
एक बाण ओढितां ओढी । बाण सुटती लक्षकोडी ।
शत्रूंचीं शस्त्रें छेदोनियां गाढीं । वीरमुरकुंडी पाडिल्या ॥ १६ ॥
उरीं शिरीं दोहीं करीं । बाण भेदलें भुजांवरी ।
सपिच्छी बुडाले शरीरीं । वीरां महामारी श्रीराम ॥ १७ ॥
वल्गती मेला गेला निमाला । तंव तो श्रीराम दादुल्यांचा दादुला ।
वीरां निवटीत उठिला अंत पुरला राक्षसांचा ॥ १८ ॥
करुं जातां राक्षस घाता । शस्त्रें छेदोनी तोडी हाता ।
वीर मिरविती पुरुषार्था । तंव करी निःपाता बाणाग्रें ॥ १९ ॥
मागें वीर सरों जातां । तंव बाण वाज्ती त्यांचे माथां ।
सन्मुख होतां श्रीरघुनाथा । जीवघाता करितसे ॥ २० ॥
राहें साहें वीर गर्जत । त्यांची जिव्हा छेदी सदंत ।
ऐसा बाणें मांडिला आकांत । वीर विख्यात श्रीराम ॥ २१ ॥
कंकपत्र बर्हपत्र । हंसपत्र सुवर्णपत्र ।
बाणें भेदिले वीर विचित्र । रणीं मयूर नाचती ॥ २२ ॥
भोंवतां बाणांचा वळसा । सैन्य पाडिलें धारसा ।
महावीर पावलें त्रासा । उरी राक्षसां उरों नेदी ॥ २३ ॥
श्रीरामाचा निजबाण । राक्षसरुधिरीं करोनि स्नान ।
देतसे मोक्षाचें दान । पापी पावन त्याचेनि ॥ २४ ॥
श्रीराम रणरंगधीर । राक्षससैन्या केला भार ।
रणीं उठिला हाहाकार । देखोनि खर कोपला ॥ २५ ॥

तुं दृष्टवा सगुणं चापमुद्यभ्य करनिःस्वनम् ।
रामस्याभिमुखं सूतं चोद्यतामित्यचोदयत्॥२॥
स खरस्याज्ञया सूतस्तुरगान्समचोदयत् ।
यत्र रामो महाबाहुरेको धुन्वन्धनुः स्थितः ॥ ३ ॥

खर व बारा वीर पुढे येतात :

देखोनि श्रीरामपुरुषार्थ । खर सारथियातें म्हणत ।
वेगें प्रेरींगा माझा रथ् । जेथें रघुनाथ रणरंगीं उभा ॥ २६ ॥
कोप चढला चतुर्गुण । वेगें धनुष्या वाहिला गुण ।
आजी रामासीं करीन रण । आंगवण पहा माझी ॥ २७ ॥
देखोनि धुरेचा कडकडाट । सारथियें वारुवां दिधला साट ।
रथ चालिला घडघडाट । तंव देखिला पुढें उद्भट श्रीराम ॥ २८ ॥
आजनुबाहु धनुर्धारी । वीरांतें करित महामारी ।
असो खर देखोनि रहंवरी । श्रीराम टणत्कारी धनुष्यातें ॥ २९ ॥
श्रीरामधनुष्याच्या टणत्कारें । दुमदुमिलीं गिरिकंदरें ।
नादें कोंदलें अंबर । निशाचरें भयभीत ॥ ३० ॥
एक तीं केवळ बापुडीं । एकांची वळली मुरकुंडी ।
नांदें पाडापाडी मांडिली ॥ ३१ ॥
ऐसा देखोनि श्रीरघुवीर । खरासी ओढवलें दुस्तर ।
त्याचे कैवारी अति दुर्धर । बाराही वीर धांविन्नले ॥ ३२ ॥
नावनिगे राक्षसांत । ज्यांसी नित्य कांपिजे कृतांत ।
तिहीं पडखळिला रघुनाथ । स्वामिकार्यार्थ दृढयोद्धे ॥ ३३ ॥
वोढण खांडे घेवोनि जाण । उग्रनामा आला आपण ।
स्वामिकार्यी वेंचावया प्राण । रणप्रवीण बाराही ॥ ३४ ॥
पृथलव यज्ञभक्तां । महाविष दुर्जय चोथा ।
धनुष्यबाण सज्जोनि हातां । युद्धीं रघुनाथा सन्मुख ॥ ३५ ॥
परवीरघ्न पुरुषबळी । काळकार्मुक मेघमाळी ।
चवघे वीर आतुर्बळी । शूळत्रिशूळी महायोद्धें ॥ ३६ ॥
महाबाहु लोहितांबर । महाआस्य अति दुर्धर ।
गदार मुग्दल घेवोनि तोमर । रणीं रघुवीर पडखळिला ॥ ३७ ॥
गदा मुग्दल परशु पट्टिश । बाण मोकलिले बहुवस ।
शस्त्रें सोडिलीं असमसाहस । श्रीराम राजस देखोनी ॥ ३८ ॥
बारा जण कपटरासी । म्हणोनि आवडती खरासी ।
कैसें कपट तयांपासीं । सावकासीं अवधारा ॥ ३९ ॥
गुप्तघाती आकाशपाती । एक ते अतर्क्यविघाती ।
एम मारक निमेषस्थिती । प्राणवृत्ति पांचवी ॥ ४० ॥
संचरोनि नेत्रांतरीं । शूळें जिव्हार विदारीं ।
एक रिघोनि कर्णकुहरीं । वर्मी मारी शस्त्रातें ॥ ४१ ॥
एक तो खड्ग हातवसी । अंतरीं संचरे मनोवेगेंसीं ।
शस्त्रें हाणोनी हृदयासी । मारी वीरांसी अति दृष्ट ॥ ४२ ॥
तों चौघे उरले कपटराशी । वीर वेढोनि चौपासीं ।
गुप्तशस्त्रें कासाविसी । करोनि वीरासी मारिती ॥ ४३ ॥
ऐसे हे वीर बारा जण । कपटयोद्धे प्रवीण ।
रामासी मारावया जाण । अवघे जाण चालिले ॥ ४४ ॥
त्यांचा धरोनि आधार । चालिला राक्षसांचा संभार ।
धरा मारा गर्जती थोर । श्रीरामासमोर लोटले ॥ ४५ ॥

कपटप्रवीण बारा राक्षसांचा दमनीशक्तीने केलेला संहार, त्यामुळे राक्षसांची दाणादाण :

श्रीराम धनुर्धारी विचक्षण । मारावया बारा जण ।
दमनी निजशक्ती दारुण । अभिमंत्रोन सोडिली ॥ ४६ ॥
कपटी निर्दाळावया निश्चितीं । अनिवार शस्त्र दमनी चिच्छक्ती ।
रामें सोडिली अलक्षगती । शस्त्रे ख्याती लाविली ॥ ४७ ॥
दमनी चिच्छक्ती देखोनी । कपटियां पडली मोहिनी ।
जाली बाराही जणां भंगाणी । प्रताप रणीं चालेना ॥ ४८ ॥
बाण भरले नाकीं वदनीं । बाण भरले कानीं नयनीं ।
बाण भरले हृदयभुवनीं । बाणीं खिळोनी पाडिले ॥ ४९ ॥
श्रीरामाच्या बाणांपुढें । केउते पळतील बापुडे ।
वाट न दिसे मागेंपुढे । जीवीं कुर्‍हाडे पैं भेदिले ॥ ५० ॥
वोडणें खिळिलीं उरासीं । कटी छेदिल्या कटारांसीं ।
शिरे छेदिली मुकुटासीं । हात सस्त्रेसीं छेदिले ॥ ५१ ॥
छेदिले स्थूळ लिंग कारण । श्रीरामें छेदिले महाकारण ।
जीवें मारोनि संपूर्ण । बाराही जण निर्दळिले ॥ ५२ ॥
कपटें जिंतितां श्रीरामासी । कपटें मारिलें कपट्यांसी ।
श्रीराम प्रतापाची राशी । राक्षसांसी नाटोपे ॥ ५३ ॥
करोनि बारांचा निःपात । मग मिसळला सैन्यांत ।
भोंवता बाणांचा आवर्त । आला अंत राक्षसांसी ॥ ५४ ॥
रणीं खवळला श्रीरघुनाथ । अनिवार बांणसंपात ।
जेथींचा तेथें राक्षसघात । रणीं आवर्त वीरांसी ॥ ५५ ॥
एक खोंचले सन्मुख घायीं । एक पडिले ठायींच्या ठायीं ।
एक सपाट छेदोनि पायीं । पडिल्या भुई वीरश्रेणी ॥ ५६ ॥
शिरें छेदोनि चेंडूफळी करणें । खेळतु रुधिराचें शिंपणें ।
रणवसंतु माजवणें । किंशुक फुलणें बाणांचें ॥ ५७ ॥
वीर कुंथती अपार । तेवीच कोकिळापंचमस्वर ।
श्रीरामें केला महामार । लहान थोर कुंथती ॥ ५८ ॥
न साहवती श्रीरामबाण । राक्षससेना पलायमान ।
देखोनि धांविन्नला दुषण । अश्वासून सैन्यातें ॥ ५९ ॥

तान्सर्वान्धनुरादाय समाश्वास्य च दुषणः ।
अभ्यधावत्सुसंकुद्धः कुद्धं क्रुद्ध इवान्तकः ॥४॥
निवृत्तास्तु पुनः सर्वे दूषणाश्रयनिर्भयाः ।
राममेवाभ्यधावन्त सालतालशिलायुधाः ॥ ५ ॥

रणातून पळणार्‍या राक्षससैन्यास दूषणाचे आश्वासन :

दूषण म्हणे राक्षसदळा । रण देखोनी केंवी पळा ।
आश्वासोनियां सकळां । सन्नद्ध केला दळभार ॥ ६० ॥
दूषण अवलोकी राक्षसांसी । म्हणे तुम्हीं राहावें माझे पाठीसीं ।
मी वधीन श्रीरामासी । अति आवेशीं धांविन्नला ॥ ६१ ॥
धरोनि दूषणाचें बळ । परतले राक्षसदळ ।
श्रीराम शस्त्रें छेदावया सकळ । शाळताळशिळायोद्धें ॥ ६२ ॥
श्रीरामासीं युद्ध करी दूषण । राक्षय वर्षती पाषाण ।
शाळताळवृक्ष जाण । अति सत्राणें हाणिती ॥ ६३ ॥

श्रीरामांनी दूषणाचा रथ, घोडे व सारथी यांना मारले :

श्रीराम रणरंगी प्रवीण । लघुलाघवें वर्ष बाण ।
तोडून शाळ ताळ पाषाण । बाणें दूषण केला कासाविस ॥ ६४ ॥
बाणांमागें येती बाण । घेतला राक्षसांचा प्राण ।
मूर्च्छित पाडीला दूषण । रणकंदन वीरांसी ॥ ६६ ॥
केव्हां भात्याचा बाण काढी । केव्हां जोडी केव्हा सोडी ।
अलक्ष्य लक्ष्याची परवडी । रणीं करवडी पाडिली ॥ ६७ ॥
वीर खोंचले वितंड । मिथ्या दूषणाचें बळ बंड ।
एकही साहों न शके कांड । काळें तोंड दूषणाचें ॥ ६८ ॥
ऐकोनि वीरांचे वचन । दूषण झाला लज्जायमान ।
सामर्थ्ये मूर्च्छा सांवरोन । रथारोहण तेणें केलें ॥ ६९ ॥

राक्षसांस्तान्रणे भग्नान्दृष्ट्वा रामेण धीमता ।
रथस्थो दूषणो रामं शरवर्षैरवाकिरत् ॥ ६ ॥

दूषणाशी भयंकर रणकंदन व त्याच्याच शस्त्राने त्याचा वध :

राक्षससेना देखोनि भग्न । दूषण झाला कोपायमान ।
रागें रथावरी बैसोनि जाण । वर्षे बाण अनिवार ॥ ७० ॥
शतसहस्त्र लक्षकोडी । बाणांमागें बाण सोडी ।
श्रीराम निमेषार्धे तोडी । धनुष्य पाडी छेदोनी ॥ ७१ ॥
क्रोधें तप्त झाला दूषण । शक्ति गदा पडताळोन ।
सवेंचि रामें दहा बाण । अति दारुण सोडिले ॥ ७२ ॥
चारी वारु चहूं बाणीं । विंधोनि पाडिले धरणीं ।
तोडोनि सांटा चाकें दोनी । तीन बाणीं छेदिलीं ॥ ७३ ॥
एकें ध्वज पाडिला क्षितीं । एकें सारथी ।
श्रीरामें लाविली ख्याती । केला विरथी दूषण ॥ ७४ ॥
छेदोनियां रथ सारथी । रणीं दूषण केला पदाती ।
कोपें गदा घेवोनि हातीं । श्रीरामाप्रती धांविन्नला ॥ ७५ ॥
जाणोनि राक्षसांच्या अति मदा । मिरविशी यशाच्या आनंदा ।
माझी साहें पाहें गदा । तरी मी योद्धा तुज मानीं ॥ ७६ ॥
दूषणासीं करिता रण । रणीं रामाचा गेईन प्राण ।
झाडीन वाढिवेचा अभिमान । गदा घेवोनि चालिला ॥ ७७ ॥
श्रीराम म्हणे नांव दूषण । सांगतां न लाजसी आपण ।
दूषण खरासी भूषण । निंद्य वदन दोगांचे ॥ ७८ ॥
धर्में दूषण कर्मे दूषण । नामे दूषण कामें दूषण ।
दूषणासी बळ दूषण । आंगवण तुज कैचीं ॥ ७९ ॥
दूषण म्हणे जल्पसी किती । गदा घेवोनियां हाती ।
पतंग धांवे दीपाप्रती । तैसे गतीं धांवला ॥ ८० ॥
गदा हाणितांचि दारुण । विंधोनि सुवर्णपत्री बाण ।
श्रीरामें गदा केली शतचूर्ण । रागें दूषण दांत खाय ॥ ८१ ॥
दांत खावोनि करकरां । शूळ घेवोनि धांवे सामोरा ।
घायें मारीन रघुवीरा । क्रोधें थरथरां कांपत ॥ ८२ ॥
बाण सोडोनि तिधारा । शूळ उडविला अंबरा ।
करोनियां शकलें बारा । श्रीराम निशाचरावरी पाडी ॥ ८३ ॥
श्रीरामें सर्व शस्त्रें केली मोघ । देखोनी दूषणा आला राग ।
वज्रपाय घेतला परिघ । अति दूर्धर रणमारा । ८४ ॥
वीरभद्राचें वरद पूर्ण । परिघ सोडिल्या हरी प्राण ।
त्यासी न चले निवारण । तें निर्वाण शस्त्रांचें ॥ ८५ ॥
अष्टौ धंटा घवघवित । वीररक्तें अति आरक्त ।
दूषण धांवे परिघहस्त । श्रीरघुनाथ वधावया ॥ ८६ ॥
परिघ देखोनि अनिवार । स्वर्गी देवां हाहाकार ।
सुरनरांलागीं विचार थोर । केवी रघुवीर वांचेल ॥ ८७ ॥
श्रीराम धुनर्वाडा निजगडी । दूषण परिघ जंव सोडी ।
तंव परिघेंसीं बाहु खुडी । बाण निर्वडीं विंधोनी ॥ ८८ ॥
परिघासह बाहु खुडून । तोचि परतोनियां बाण ।
हृदयीं भेदोनियां पूर्ण । रणीं दूषण पाडिला ॥ ८९ ॥
दूषण पडतां भूमिगत । परिघें वरिला श्रीरघुनाथ ।
येवोनि राहिला भात्याआंत । रणीं प्रमाथा वधावया ॥ ९० ॥
वीरभद्रशस्त्रदेवता । तीही प्रसन्न श्रीरघुनाथा ।
अमोघ परिघ आला हाता । रणीं प्रमाथा वधावया ॥ ९१ ॥
दूषण पडतांचि रणीं । हाहाकार गर्जे गगनीं ।
धाकें कांपती वीरश्रेणी । श्रीराम रणीं रणरुद्र ॥ ९२ ॥

दूषणाचा वध झालेला पाहून त्याचे तिघे साथीदार पुढे आले :

रणीं पडतां दूषण । त्याचे कैवारी तिघे जण ।
श्रीरामासीं करावया रण । अति दारुण चालिले ॥ ९३ ॥
महाकपाळ आणि स्थूळाक्ष । तिसरा प्रमाथी राक्षस ।
युद्धीं हांकिती श्रीरामास । अति कर्कश चालिले ॥ ९४ ॥
राक्षसांमाजी अति दुर्धर । शूळ पट्टिश परशु थोर ।
तिघां हातीं हतियार । श्रीरामासमोर लोटले ॥ ९५ ॥
आमुचा स्वामी पाडिला ठायीं । तुजही पाडूं शस्त्रघाय़ीं ।
शस्त्रें सोडिलीं लावलाहीं । त्रिपुटी पाही तिघांची ॥ ९६ ॥
एक तो चालिला सन्मुख । एक पाठीसी हाणी विमुख ।
एक तो आकाशीं देख । शस्त्रें अनेक वर्षती ॥ ९७ ॥
श्रीराम पाठिमोरा देखणा । हें विंदान न कळे कोणा ।
विंधोनियां विकट बाणा । आणिला रणा प्रमाथी ॥ ९८ ॥

महाकपाळ, स्थूळाक्ष व प्रमाथी या तिघांना श्रीरामानी ठार केले :

हातीं घेंवोनियां शूळ । सन्मुख आला महाकपाळ ।
शूळ छेदोनि तत्काळ । कंठनाळ निवटिलें ॥ ९९ ॥
गगनीं गर्जतां स्थूळाक्ष । त्याचे बाणीं छेदोनि अक्ष ।
तळीं पाडोनियां देख । घायीं निःशेख मारिला ॥ १०० ॥
वक्री शनि भौम केतू । सूर्योदयीं होती अस्तु ।
तैसा राक्षसांसी अंतु । श्रीरघुनाथा रणरंगीं ॥ १ ॥
गृहस्थ अतिथी सन्मान । तैसेचि श्रीराम आपण ।
तिघां देवोनि शरासन । तिघे जण सुखी केले ॥ २ ॥
सुवर्णपत्री सोडोनि शर । प्रमथा मथन केलें थोर ।
दहा बाणीं त्रासिले महावीर । निशाचर पळताती ॥ ३ ॥

सहकारी राक्षसांचा विध्वंस :

एके बाणें शतानुशत वीर । पांच बाणीं मारी सहस्त्र ।
दहा बाणीं दहा सहस्त्र । घोरांदर राक्षसां ॥ ४ ॥
सकुंडल छेदोनि शिर । आयुधांसहित ताडिले कर ।
कवचेंसी भेदिलें शरीर । पाडिले वीर ब्रीदाचे ॥ ५ ॥
बाबरझोटीचे अपार । बाणीं पाडिले महावीर ।
वाहती रुधिराचे पूर । श्रीरामचंद्र क्षोभला ॥ ६ ॥
श्रीरामबाणांच्या कडाडीं । राक्षसें पळती भयें बापुडीं ।
अति दीन होवोनि वेडीं । बाणझडाडीं चरफडती॥ ७॥

चतुर्दशसहस्त्राणि रक्षसां भीमकर्मणाम् ।
हतान्येकेन रामेण मानुषेण पदातिना ॥ ७ ॥

रथेंवीण पायीं रघुवीर । चवदा सहस्त्र निशाचर ।
रणीं मारिले अति दुर्धर । जयांसी सुरनर कांपती ॥ ८ ॥
राक्षसांमाजी बळी दूषण । त्यासी भीतसे रावण ।
परिघ अनिवार दारुण । रामें आपण निर्दळिला ॥ ९ ॥
रणीं निर्दळिले निशाचर । दूषण मारिला महावीर ।
श्रीराम धनुर्वाडा दुर्धर । कोण समोर राहिल ॥ ११० ॥
राक्षसां जाला थोर मार । कोपें चालिला पैं खर ।
त्रिशिरा कोपला दुर्धर । तेणे रघुवीर पडखळिला ॥ ११ ॥
करोनियां राक्षसघाता । केउता जासील तूं आतां ।
राहें साहें श्रीरघुनाथा । शस्त्रसंपाता पेटला ॥ १२ ॥
निर्दळोनियां निशाचरां । रणीं पाडोनियां मुख्य धुरा ।
गर्व धरिसी श्रीरघुवीरा । तो मी त्रिशिरा झाडीन ॥ १३ ॥
श्रीरामत्रिशिरां झाली भेटी । दोघे महाक्रोधदृष्टी ।
दोघीं धनुष्य हट्टी महावीर ॥ १४ ॥
एकाजनार्दना शरण त्रिशिर्‍याचें युद्ध दारुण ।
श्रीरामरण अति पावन । मोक्षसाधन साधका ॥ १५ ॥
श्रीरामकथेचे अक्षर । क्षराक्षरातीत पर ।
मुक्त करावया निशाचर । कृपेनें दुर्धर कोपला श्रीराम ॥ १६ ॥
श्रीरामकथा पवित्र तीर्थ । श्रोते वक्ते नित्यमुक्त ।
एकाजनार्दनीं निर्मुक्त । कथामृत श्रीराम ॥ ११७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थ – रामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
दूषणवधो नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥
॥ ओव्या ११७ ॥ श्लोक ७ ॥ एवं १२४ ॥



GO TOP