श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ षष्ठः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भगवतः शिवस्य संमत्या देवानां रक्षोवधार्थं श्रीविष्णोः शरणग्रहणं ततः समाश्वस्तानां च निवर्तनं देवानामुपरि रक्षसामाक्रमणं देवानां साहाय्यकरणाय श्रीविष्णोरागमनं च -
देवतांचे भगवान्‌ शंकरांच्या सल्ल्याने राक्षसांच्या वधासाठी भगवान्‌ विष्णुना शरण जाऊन तसेच त्यांच्याकडून आश्वासन मिळून परत येणे, राक्षसांचे देवतांवर आक्रमण आणि भगवान्‌ विष्णूंचे त्यांच्या सहाय्यासाठी येणे -
तैर्वध्यमाना देवाश्च ऋषयश्च तपोधनाः ।
भयार्ताः शरणं जग्मुः देवदेवं महेश्वरम् ॥ १ ॥
(महर्षि अगस्त्य म्हणतात - हे रघुनंदना !) या राक्षसांमुळे पीडित होऊन देवता तसेच तपोधन ऋषि भयाने व्याकुळ होऊन देवाधिदेव महादेवांना शरण गेले. ॥१॥
जगत्सृष्ट्यन्तकर्तारं अजं अव्यक्तरूपिणम् ।
आधारं सर्वलोकानां आराध्यं परमं गुरुम् ॥ २ ॥

ते समेत्य तु कामारिं त्रिपुरारिं त्रिलोचनम् ।
ऊचुः प्राञ्जलयो देवा भयगद्‌गद भाषिणः ॥ ३ ॥
जे जगताची सृष्टि आणि संहार करणारे, अजन्मा, अव्यक्त रूपधारी, संपूर्ण जगताचे आधार, आराध्य देव आणि परम गुरू आहेत, त्या कामनाशक त्रिपुर विनाशक, त्रिनेत्रधारी भगवान्‌ शिवाजवळ जाऊन त्या सर्व देवता हात जोडून भयाने गद्‍गद वाणीने म्हणाल्या - ॥२-३॥
सुकेशपुत्रैर्भगवन् पितामहवरोद्धतैः ।
प्रजाध्यक्ष प्रजाः सर्वा बाध्यन्ते रिपुबाधनैः ॥ ४ ॥
भगवन्‌ ! प्रजानाथ ! ब्रह्मदेवांच्या वरदानाने उन्मत्त झालेले सुकेशाचे पुत्र शत्रुंना पीडा देणार्‍या साधनांद्वारा संपूर्ण प्रजेला फार कष्ट पोहोचवीत आहेत. ॥४॥
शरण्यानि-अशरण्यानि ह्याश्रमाणि कृतानि नः ।
स्वर्गाच्च देवान् प्राच्याव्य स्वर्गे क्रीडन्ति देववत् ॥ ५ ॥
सर्वांना शरण देण्यायोग्य जे आमचे आश्रम होते, ते त्या राक्षसांनी निवास करण्यास योग्य राहू दिलेले नाहीत - उजाड केले आहे. देवतांना स्वर्गांतून घालवून देऊन ते स्वतःच तेथे कब्जा करुन बसले आहेत, आणि देवतांप्रमाणे स्वर्गात विहार करत आहेत. ॥५॥
अहं विष्णुरहं रुद्रो ब्रह्माहं देवराडहम् ।
अहं यमश्च वरुणः चन्द्रोऽहं रविरप्यहम् ॥ ६ ॥

इति माली सुमाली च माल्यवांश्चैव राक्षसाः ।
बाधन्ते समरोद् हर्षा ये च तेषां पुरःसराः ॥ ७ ॥
माली, सुमाली आणि माल्यवान्‌ - हे तीन्ही राक्षस म्हणत आहेत - मीच विष्णु आहे, मीच रूद्र आहे, मीच ब्रह्मदेव आहे तसेच देवराज इंद्र, यमराज, वरूण, चंद्रमा आणि सूर्य आहे, याप्रकारे अहंकार प्रकट करीत ते रणदुर्जय निशाचर तसेच त्यांचे अग्रगामी सैनिक आम्हांला फार कष्ट देत आहेत. ॥६-७॥
तन्नो देव भयार्तानां अभयं दातुमर्हसि ।
अशिवं वपुरास्थाय जहि वै देवकण्टकान् ॥ ८ ॥
देवा ! त्यांच्या भयाने आम्ही फार घाबरून गेलो आहो, म्हणून आपण आम्हांला अभयदान द्यावे तसेच रौद्र रूप धारण करून देवतांसाठी कंटक बनलेल्या त्या राक्षसांचा संहार करावा. ॥८॥
इत्युक्तस्तु सुरैः सर्वैः कपर्दी नीललोहितः ।
सुकेशं प्रति सापेक्षः प्राह देवगणान् प्रन्प्रभुः ॥ ९ ॥
समस्त देवतांनी असे म्हटल्यावर नील आणि लोहित वर्णाचे जटाजूटधारी भगवान्‌ शंकर सुकेशाप्रति घनिष्ठता ठेवण्यासाठी त्यांना याप्रकारे म्हणाले - ॥९॥
अहं तान्न हनिष्यामि मयावध्या हि तेऽसुराः ।
किं तु मन्त्रं प्रदास्यामि यो वै तान् निहनिष्यति ॥ १० ॥
देवगणांनो ! मी सुकेशाच्या जीवनाचे रक्षण केले आहे. ते असुर सुकेशाचेच पुत्र आहेत, म्हणून माझ्याकडून मारले जाण्यास योग्य नाहीत. म्हणून मी तर त्यांचा वध करणार नाही परंतु तुम्हांला एका अशा पुरुषाजवळ जाण्याचा सल्ला देईन, जो निश्चितच त्या निशाचरांचा वध करील. ॥१०॥
एतमेव समुद्योगं पुरस्कृत्य महर्षयः ।
गच्छध्वं शरणं विष्णुं हनिष्यति स तान् प्रन्प्रभुः ॥ ११ ॥
देवता आणि महर्षिंनो ! तुम्ही हेच कार्य समोर ठेवून तात्काळ भगवान्‌ विष्णुना शरण जावे. ते प्रभु अवश्य त्यांचा नाश करतील. ॥११॥
ततस्तु जयशब्देन प्रतिनन्द्य महेश्वरम् ।
विष्णोः समीपं आजग्मुः निशाचरभयार्दिताः ॥ १२ ॥
हे ऐकून सर्व देवता जय-जयकार करीत महेश्वरांचे अभिनंदन करून त्या निशाचरांच्या भयाने पीडित होऊन भगवान्‌ विष्णुंच्या समीप आले. ॥१२॥
शङ्‌खचक्रधरं देवं प्रणम्य बहुमान्य च ।
ऊचुः सम्भ्रान्तवद् वाक्यं सुकेशतनयान् प्रति ॥ १३ ॥
शङ्‌ख, चक्र धारण करणार्‍या त्या नारायण देवांना नमस्कार करून देवतांनी त्यांच्या प्रति फार अधिक सन्मानाचा भाव प्रकट केला आणि सुकेशाच्या पुत्रांच्या विषयी अत्यंत भीतभीत याप्रकारे म्हटले - ॥१३॥
सुकेशतनयैर्देव त्रिभिस्त्रेताग्निसन्निभैः ।
आक्रम्य वरदानेन स्थानानि अपहृतानि नः ॥ १४ ॥
देवा ! सुकेशाचे तीन पुत्र त्रिविध अग्निंप्रमाणे तेजस्वी आहेत त्यांनी वरदानाच्या बळाने आक्रमण करून आमचे स्थान हिरावून घेतले आहे. ॥१४॥
लङ्‌का नाम पुरी दुर्गा त्रिकूटशिखरे स्थिता ।
तत्र स्थिताः प्रबाधन्ते सर्वान्नः क्षणदाचराः ॥ १५ ॥
त्रिकूट पर्वताच्या शिखरावर जी लङ्‌का नावाची दुर्गम नगरी आहे तेथेच राहून ते निशाचर आम्हा सर्व देवतांना क्लेश पोहोचवीत आहेत. ॥१५॥
स त्वं अस्मद् हितार्थाय जहि तान् मधुसूदन ।
शरणं त्वां वयं प्राप्ता गतिर्भव सुरेश्वर ॥ १६ ॥
मधुसूदना ! आपण आमचे हित करण्यासाठी त्या असुरांचा वध करावा. देवेश्वर ! आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आपण आमचे आश्रयदाते आहात. ॥१६॥
चक्रकृत्तास्यकमलान् निवेदय यमाय वै ।
भयेष्वभयदोऽस्माकं नान्योऽस्ति भवता विना ॥ १७ ॥
आपल्या चक्राने त्यांचे कमलोपम मस्तक छेदून आपण यमराजांना भेट करावे. आपल्या शिवाय दुसरा कोणीही असा नाही आहे की जो या भयाच्या अवसरी आम्हांला अभयदान देऊ शकेल. ॥१७॥
राक्षसान् समरे हृष्टान् सानुबन्धान् मदोद्धतान् ।
नुदं त्वं नो भयं देव नीहारमिव भास्करः ॥ १८ ॥
देवा ! हे राक्षस मदाने मत्त होत आहेत. आम्हांला कष्ट देऊन त्यांचा आनंद गगनात मावत नाही, म्हणून आपण समरांगणार सगे सोयर्‍यांसहित त्यांचा वध करून सूर्यदेव जसे धुक्याला नष्ट करतात त्याप्रमाणे आमचे भय दूर करावे. ॥१८॥
इत्येवं दैवतैरुक्तो देवदेवो जनार्दनः ।
अभयं भयदोऽरीणां दत्त्वा देवानुवाच ह ॥ १९ ॥
देवतांनी असे म्हटल्यावर शत्रूंना भय उत्पन्न करणारे देवाधिदेव भगवान्‌ जनार्दन त्यांना अभय-दान देऊन बोलले - ॥१९॥
सुकेशं राक्षसं जाने ईशानवरदर्पितम् ।
तांश्चास्य तनयाञ्जाने येषां ज्येष्ठः स माल्यवान् ॥ २० ॥

तानहं समतिक्रान्त मर्यादान् राक्षसाधमान् ।
निहनिष्यामि सङ्‌क्रुद्धः सुरा भवत विज्वराः ॥ २१ ॥
देवतांनो ! मी सुकेश नामक राक्षसाला जाणतो. तो भगवान्‌ शंकरांचा वर मिळून अभिमानाने उन्मत्त झाला आहे. त्याच्या ह्या पुत्रांनाही मी जाणतो, ज्यांच्यात माल्यवान्‌ सर्वात मोठा आहे. ते नीच राक्षस धर्माच्या मर्यादेचे उल्लंघन करीत आहेत. म्हणून मी क्रोधपूर्वक त्यांचा विनाश करीन. तुम्ही लोक निश्चिंत होऊन जा. ॥२०-२१॥
इत्युक्तास्ते सुराः सर्वे विष्णुना प्रभविष्णुना ।
यथावासं ययुर्हृष्टाः प्रशंसन्तो जनार्दनम् ॥ २२ ॥
सर्व काही करण्यास समर्थ असलेल्या भगवान्‌ विष्णुंनी याप्रकारे आश्वासन दिल्यावर देवतांना फार हर्ष झाला. ते त्या जनार्दनांची वारंवार प्रशंसा करीत आपापल्या स्थानी निघून गेले. ॥२२॥
विबुधानां समुद्योगं माल्यवांस्तु निशाचरः ।
श्रुत्वा तौ भ्रातरौ वीरौ इदं वचनमब्रवीत् ॥ २३ ॥
देवतांच्या या उद्योगाचा समाचार ऐकून निशाचर माल्यवानाने आपल्या दोन्ही वीर बंधुना याप्रकारे सांगितले - ॥२३॥
अमरा ऋषयश्चैव सङ्‌गम्य किल शंकरम् ।
अस्मद्वधं परीप्सन्त इदं वचनमब्रुवन् ॥ २४ ॥
ऐकण्यात आले आहे की देवता आणि ऋषि मिळून आम्हां लोकांचा वध करू इच्छितात. यासाठी त्यांनी भगवान्‌ शंकरांच्या जवळ जाऊन असे सांगितले - ॥२४॥
सुकेशतनया देव वरदानबलोद्धताः ।
बाधन्तेऽस्मान् समुद्‌दृप्ता घोररूपाः पदे पदे ॥ २५ ॥
देवा ! सुकेशाचे पुत्र आपल्या वरदानाच्या बलाने उद्दंड आणि अभिमानाने उन्मत्त झाले आहेत. ते भयंकर राक्षस पावलो पावली आम्हा लोकांना सतावत आहेत. ॥२५॥
राक्षसैरभिभूताः स्मो न शक्ताः स्म प्रजापते ।
स्वेषु सद्मसु संस्थातुं भयात्तेषां दुरात्मनाम् ॥ २६ ॥
प्रजानाथ ! राक्षसांकडून पराजित होऊन आम्ही त्या दुष्टांच्या भयाने आपल्या घरात राहू शकत नाही. ॥२६॥
तदस्माकं हितार्थाय जहि तांश्च त्रिलोचन ।
राक्षसान् हुंकृतेनैव दह प्रदहतां वर ॥ २७ ॥
त्रिलोचन ! आपण आमच्या हितासाठी त्या असुरांचा वध करावा. दाहकांमध्ये श्रेष्ठ रूद्रदेवा ! आपण आपल्या हुंकारानेही राक्षसांना जाळून भस्म करून टाकले. ॥२७॥
इत्येवं त्रिदशैरुक्तो निशम्यान्धकसूदनः ।
शिरः करं च धुन्वान इदं वचनमब्रवीत् ॥ २८ ॥
देवतांनी असे म्हटल्यावर अंधकशत्रु भगवान्‌ शिवांनी अस्वीकृती सूचित करण्यासाठी आपले मस्तक आणि हात हलवीत या प्रकारे सांगितले - ॥२८॥
अवध्या मम ते देवाः सुकेशतनया रणे ।
मन्त्रं तु वः प्रदास्यामि यस्तान् वै निहनिष्यति ॥ २९ ॥
देवतांनो ! सुकेशाचे पुत्र रणभूमीमध्ये माझ्याकडून मारले जाण्यास योग्य नाहीत परंतु मी तुम्हांला अशा पुरुषाजवळ जाण्याचा सल्ला देईन जो निश्चितच त्यांचा वध करून टाकील. ॥२९॥
योऽसौ चक्रगदापाणिः पीतवासा जनार्दनः ।
हरिर्नारायणः श्रीमान् शरणं तं प्रपद्यथ ॥ ३० ॥
ज्यांच्या हातात चक्र आणि गदा सुशोभित आहे, जे पितांबर धारण करतात, ज्यांना जनार्दन आणि हरि म्हणतात तसेच जे श्रीमान्‌ नारायणाच्या नामाने विख्यात आहेत, त्यांच भगवंतास तुम्ही शरण जावे. ॥३०॥
हरादवाप्य ते मन्त्रं कामारिमभिवाद्य च ।
नारायणालयं प्राप्य तस्मै सर्वं न्यवेदयन् ॥ ३१ ॥
भगवान्‌ शंकराकडून हा सल्ला मिळाल्यावर त्या कामदाहक महादेवांना प्रणाम करून देवता नारायणांच्या धामात जाऊन पोहोचल्या. आणि तेथे नारायणांना सर्व गोष्टी सांगितल्या. ॥३१॥
ततो नारायणेनोक्ता देवा इन्द्रपुरोगमाः ।
सुरारींस्तान् हनिष्यामि सुरा भवत निर्भयाः ॥ ३२ ॥
तेव्हा त्या नारायणांनी इंद्र आदि देवतांना म्हटले - देवगणांनो ! मी त्या देवद्रोह्यांचा नाश करून टाकीन म्हणून तुम्ही लोक निर्भय होऊन जा ! ॥३२॥
देवानां भयभीतानां हरिणा राक्षसर्षभौ ।
प्रतिज्ञातो वधोऽस्माकं चिन्त्यतां यदिह क्षमम् ॥ ३३ ॥
राक्षसशिरोमणीनो ! या प्रकारे भयभीत देवतांच्या समक्ष श्रीहरिने आम्हांला मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. म्हणून आता या विषयी आम्हा लोकांसाठी जे उचित कर्तव्य असेल त्याचा विचार केला पाहिजे. ॥३३॥
हिरण्यकशिपोर्मृत्युः अन्येषां च सुरद्विषाम् ।
नमुचिः कालनेमिश्च संह्रादो वीरसत्तमः ॥ ३४ ॥

राधेयो बहुमायी च लोकपालोऽथ धार्मिकः ।
यमलार्जुनौ च हार्दिक्यः शुम्भश्चैव निशुम्भकः ॥ ३५ ॥

असुरा दानवाश्चैव सत्त्ववन्तो महाबलाः ।
सर्वे समरमासाद्य न श्रूयन्तेऽपराजिताः ॥ ३६ ॥
हिरण्यकशिपु तसेच अन्य देवद्रोही दैत्यांचा मृत्यु याच विष्णुंच्या हाती झाला आहे. नमूचि, कालनेमि, वीरशिरोमणी संह्वाद, नाना प्रकारची माया जाणणारा राधेय, धर्मनिष्ठ लोकपाल, यमलार्जुन, हार्दिक्य, शुम्भ आणि निशुम्भ आदि महाबली आणि शक्तिशाली समस्त असुर आणि दानव समरभूमीमध्ये भगवान्‌ विष्णुंचा सामना करून पराजित झाले नाहीत असे ऐकिवात नाही. ॥३४-३६॥
सर्वैः क्रतुशतैरिष्टं सर्वे मायाविदस्तथा ।
सर्वे सर्वास्त्रकुशलाः सर्वे शत्रुभयङ्‌कराः ॥ ३७ ॥
त्या सर्व असुरांनी शेकडो यज्ञ केले होते. ते सर्वच्या सर्व माया जाणत होते, सर्व संपूर्ण अस्त्रांमध्ये कुशल आणि शत्रुसांठी भयंकर होते. ॥३७॥
नारायणेन निहताः शतशोऽथ सहस्रशः ।
एतज्ज्ञात्वा तु सर्वेषां क्षमं कर्तुमिहार्हथ ।
दुअःखं नारायणं जेतुं यो नो हनुतुमिहेच्छति ॥ ३८ ॥
असे शेकडो आणि हजारो असुर नारायणदेवांनी मारले आहेत. ही गोष्ट जाणून आपणा सर्वासाठी जे उचित कर्तव्य असेल तेच केले पाहिजे. जे नारायणदेव आपला वध करू इच्छितात त्यांना जिंकणे अत्यंत दुष्कर कार्य आहे. ॥३८॥
ततः सुमाली माली च श्रुत्वा माल्यवतो वचः ।
ऊचतुर्भ्रातरं ज्येष्ठं अश्विनौ इव वासवम् ॥ ३९ ॥
माल्यवानाचे हे वचन ऐकून सुमाली आणि माली आपल्या त्या मोठ्‍या भावाला जसे दोन्ही अश्विनीकुमार देवराज इंद्रांशी वार्तालाप करत असावे त्याप्रमाणे बोलले. ॥३९॥
स्वधीतं दत्तमिष्टं च ऐश्वर्यं परिपालितम् ।
आयुर्निरामयं प्राप्तं सुधर्मः स्थापितः पथि ॥ ४० ॥
राक्षसराज ! आपण स्वाध्याय, दान आणि यज्ञ केले आहेत. ऐश्वर्याचे रक्षण तसेच उपभोगही केला आहे. आपल्याला रोग- व्याधि रहित आयुष्य प्राप्त झालेले आहे आणि आपण कर्तव्य मार्गात उत्तम स्थापना केली आहे. ॥४०॥
देवसागरमक्षोभ्यं शस्त्रैः समवगाह्य च ।
जिता द्विषो ह्यप्रतिमाः तन्नो मृत्युकृतं भयम् ॥ ४१ ॥
एवढेच नव्हे तर आपण आपल्या शस्त्रांच्या बळावर देवसेनारूपी अगाध समुद्रात प्रवेश करून जे आपल्या वीरतेमध्ये आपल्या बरोबरीचा कुणी राखून ठेवत नव्हते अशा शत्रुंवरही विजय प्राप्त केला आहे, म्हणून आपल्याला मृत्युपासून काहीही भय नाही आहे. ॥४१॥
नारायणश्च रुद्रश्च शक्रश्चापि यमस्तथा ।
अस्माकं प्रमुखे स्थातुं सर्वे बिभ्यति सर्वदा ॥ ४२ ॥
नारायण, रूद्र, इंद्र तसेच यमराज का असेनात, सर्व सदा आमच्या समोर उभे राहण्यास घाबरतात. ॥४२॥
विष्णोर्देवस्य नास्त्येव कारणं राक्षसेश्वर ।
देवानामेव दोषेण विष्णोः प्रचलितं मनः ॥ ४३ ॥
राक्षसेश्वर ! विष्णुंच्या मनांतही आमच्या प्रति द्वेषाचे तर कारणही नाही आहे. (कारण की आपण त्यांचा काही अपराध केलेला नाही.) केवळ देवतांनी चहाडी केल्यामुळे त्यांचे मन आमच्या बद्दल प्रतिकूल झाले आहे. ॥४३॥
तस्मादद्यैव सहिताः सर्वसैन्यसमावृताः ।
देवानेव जिघांसामो येभ्यो दोषः समुत्थितः ॥ ४४ ॥
म्हणून आपण सर्व लोक एकत्र होऊन एकमेकांचे रक्षण करीत बरोबर बरोबर चलू या आणि ज्यांच्या कारणाने हा उपद्रव उत्पन्न झाला आहे त्या देवतांचा वध करून टाकण्याचा प्रयत्‍न करू या. ॥४४॥
एवं सम्मन्त्र्य बलिनः सर्वे सैन्यसमावृताः ।
उद्योगं घोषयित्वा तु सर्वे नैर्‌ऋतपुङ्‌गवाः ॥ ४५ ॥

युद्धाय निर्ययुः क्रुद्धा जम्भवृत्रादयो यथा ।
असा निश्चय करून त्या सर्व महाबली राक्षसपतिंनी युद्धासाठीच्या आपल्या उद्योगाची घोषणा केली आणि सर्व सेना बरोबर घेऊन जंभ आणि वृत्र आदिंप्रमाणे कुपित होऊन ते युद्धासाठी बाहेर पडले. ॥४५ १/२॥
इति ते राम सम्मन्त्र्य सर्वोद्योगेन राक्षसाः ॥ ४६ ॥

युद्धाय निर्ययुः सर्वे महाकाया महाबलाः ।
श्रीरामा ! पूर्वोक्त मंत्रणा करून त्या सर्व महाबली विशालकाय राक्षसांनी पूर्ण तयारी केली आणि युद्धासाठी कूच केले. ॥४६ १/२॥
स्यन्दनैर्वारणैश्चैव हयैश्च गिरिसन्निभैः ॥ ४७ ॥

खरैर्गोभी रथोष्ट्रैश्च शिंशुमारैर्भुजङ्‌गमैः ।
मकरैः कच्छपैर्मीनैः विहङ्‌गैर्गरुडोपमैः ॥ ४८ ॥

सिंहैर्व्याघ्रैर्वराहैश्च सृमरैश्चमरैरपि ।
त्यक्त्वा लङ्‌कां गताः सर्वे राक्षसा बलगर्विताः ॥ ४९ ॥

प्रयाता देवलोकाय योद्धुं दैवतशत्रवः ।
आपल्या बळाची घमेंड बाळगणारे ते समस्त देवद्रोही राक्षस रथ, हत्ती, हत्तींसारखे घोडे, गाढवे, बैल, ऊंट, शिशुमार, सर्प, मगरी, कासवे, मस्त्य, गरूडतुल्य पक्षी, सिंह, वाघ, डुकरे, मृग आणि नीलगायी आदि वाहनांवर स्वार होऊन लंका सोडून युद्धासाठी देवलोकाकडे निघाले. ॥४७-४९ १/२॥
लङ्‌काविपर्ययं दृष्ट्‍वा यानि लङ्‌कालयान्यथ ॥ ५० ॥

भूतानि भयदर्शीनि विमनस्कानि सर्वशः ।
लंकेमध्ये राहाणारे जे प्राणी अथवा ग्रामदेवता आदि होते, ते सर्व अपशकुन आदिच्या द्वारा लंकेच्या भावी विध्वंसाला पाहून भयाचा अनुभव करीत मनातल्या मनांत खिन्न झाले. ॥५० १/२॥
रथोत्तमैरुह्यमानाः शतशोऽथ सहस्रशः ॥ ५१ ॥

प्रयाता राक्षसास्तूर्णं देवलोकं प्रयत्‍नतः ।
रक्षसामेव मार्गेण दैवतान्यपचक्रमुः ॥ ५२ ॥
उत्तम रथांवर बसलेले शेकडो आणि हजारो राक्षस तात्काळच प्रयत्‍नपूर्वक देवलोकाकडे जाऊ लागले. त्या नगराच्या देवता राक्षसांच्या मार्गानेच पुरी सोडून निघून गेल्या. ॥५१-५२॥
भौमाश्चैवान्तरिक्षाश्च कालाज्ञप्ता भयावहाः ।
उत्पाता राक्षसेन्द्राणां अभावाय समुत्थिताः ॥ ५३ ॥
त्यासमयी काळाच्या प्रेरणेने पृथ्वी आणि आकाशात अनेक भयंकर उत्पात प्रकट होऊ लागले, जे राक्षसांच्या विनाशाची सूचना देत होते. ॥५३॥
अस्थीनि मेघा ववृषुः उष्णं शोणितमेव च ।
वेलां समुद्राश्चोत्क्रान्ताः चेलुश्चाप्यथ भूधराः ॥ ५४ ॥
मेघ गरम गरम रक्त आणि हाडांची वृष्टि करू लागले. समुद्र आपली सीमा ओलांडून पुढे सरकू लागले आणि पर्वत हलू लागले. ॥५४॥
अट्टहासान् विमुञ्चन्तो घननादसमस्वनाः ।
वाश्यन्त्यश्च शिवास्तत्र दारुणं घोरदर्शनाः ॥ ५५ ॥
मेघासमान गंभीर ध्वनि करणारे प्राणी विकट अट्‍टहास करू लागले आणि भयंकर दिसणार्‍या कोल्हीणी कठोर आवाजात चीत्कार करू लागल्या. ॥५५॥
सम्पतन्त्यथ भूतानि दृश्यन्ते च यथाक्रमम् ।
गृध्रचक्रं महच्चात्र प्रज्वालोद् गारिभिर्मुखैः ॥ ५६ ॥

रक्षोगणस्योपरिष्टात् परिभ्रमति कालवत् ।
पृथ्वी आदि भूते क्रमशः पडत, विलीन होत असल्यासारखी दिसू लागली. गिधाडांचा विशाल समूह तोंडातून आगीच्या ज्वाळा ओकत राक्षसांवर काळासमान घिरट्‍या घालू लागला. ॥५६ १/२॥
कपोता रक्तपादाश्च शारिका विद्रुता ययुः ॥ ५७ ॥

काका वाश्यन्ति तत्रैव बिडाला वै द्विपादयः ।
कबुतरे, पोपट, मैना लंका सोडून पळू लागली. कावळे तेथेच काव काव करू लागले. मांजरी तेथेच गुरगुरू लागल्या तसेच हत्ती आदि पशु आर्तनाद करू लागले. ॥५७ १/२॥
उत्पातांस्तान् अनादृत्य राक्षसा बलगर्विताः ॥ ५८ ॥

यान्त्येव न निवर्तन्ते मृत्युपाशावपाशिताः ।
राक्षस बळाच्या घमेंडीत मत्त होत होते. ते काळाच्या पाशात बद्ध होऊन चुकले होते. म्हणून त्या उत्पातांची अवहेलना करीत युद्धासाठी पुढेच चालत राहिले, परतले नाहीत. ॥५८ १/२॥
माल्यवांश्च सुमाली च माली च सुमहाबलः ॥ ५९ ॥

पुरःसरा राक्षसानां ज्वलिता इव पावकाः ।
माल्यवान्‌, सुमाली आणि महाबली माली - हे तिघेही प्रज्वलित अग्निसमान तेजस्वी शरीराने समस्त राक्षसांच्या पुढे पुढे चालत राहिले होते. ॥५९ १/२॥
माल्यवन्तं च ते सर्वे माल्यवन्तमिवाचलम् ॥ ६० ॥

निशाचरा आश्रयन्ति धातारमिव देवताः ।
ज्याप्रमाणे देवता ब्रह्मदेवांचा आश्रय घेतात त्याप्रमाणे त्या सर्व निशाचरांनी माल्यवान्‌ पर्वतासमान अविचल माल्यवानाचाच आश्रय घेतला होता. ॥६० १/२॥
तद् बलं राक्षसेन्द्राणां महाभ्रघननादितम् ॥ ६१ ॥

जयेप्सया देवलोकं ययौ मालिवशे स्थितम् ।
राक्षसांची ती सेना मेघांच्या गर्जनेप्रमाणे कोलाहल करीत विजय प्राप्त करण्याचा इच्छेने देवलोकाकडे पुढे जात राहिली होती. त्यासमयी ती सेनापति मालीच्या नियंत्रणाखाली होती. ॥६१ १/२॥
राक्षसानां समुद्योगं तं तु नारायणः प्रभुः ॥ ६२ ॥

देवदूताद् उपश्रुत्य चक्रे युद्धे तदा मनः ।
देवतांच्या दूताकडून राक्षसांच्या त्या युद्धविषयक उद्योगाची गोष्ट ऐकून भगवान्‌ नारायणांनीही युद्ध करण्याचा विचार केला. ॥६२ १/२॥
स सज्जायुधतूणीरो वैनतेयोपरि स्थितः ॥ ६३ ॥

आसाद्य कवचं दिव्यं सहस्रार्कसमद्युति ।
ते सहस्त्र सूर्यांप्रमाणे दीप्तिमान्‌ दिव्य कवच धारण करून बाणांनी भरलेला भाता घेऊन गरूडावर स्वार झाले. ॥६३ १/२॥
आबध्य शरसम्पूर्णे इषुधी विमले तदा ॥ ६४ ॥

श्रोणिसूत्रं च खड्गं च विमलं कमलेक्षणः ॥
या अतिरिक्त ही त्यांनी सायकांनी पूर्ण दोन चमकणारे भाते बांधून ठेवले होते. त्या कमलनयन श्रीहरिने आपल्या कमरेला पट्‍टा बांधून त्यांत चमकणारी तलवार ही लटकावली होती. ॥६४ १/२॥
शङ्‌खचक्रगदाशार्ङ्‌ग खड्गांश्चैव वरायुधान् ॥ ६५ ॥

सुपर्णं गिरिसंकाशं वैनतेयमथास्थितः ।
राक्षसानामभावाय ययौ तूर्णतरं प्रभुः ॥ ६६ ॥
याप्रकारे शङ्‌ख, चक्र, गदा, शार्ङ्‌ग धनुष्य आणि खङ्‌ग आदि उत्तम आयुधे धारण करून सुंदर पंख असलेल्या पर्वताकार गरूडावर आरूढ होऊन ते प्रभू त्या राक्षसांचा संहार करण्यासाठी तात्काळ निघाले. ॥६५-६६॥
सुपर्णपृष्ठे स बभौ श्यामः पीताम्बरो हरिः ।
काञ्चनस्य गिरेः शृङ्‌गे सतडित्तोयदो यथा ॥ ६७ ॥
गरूडाच्या पाठीवर बसलेले ते पीतांबरधारी श्यामसुंदर श्रीहरि सुवर्णमय मेरूशिखर स्थित असलेल्या मेघासमान शोभा प्राप्त करत होते. ॥६७॥
स सिद्धदेवर्षिमहोरगैश्च
गन्धर्वयक्षैरुपगीयमानः ।
समाससादासुरसैन्यशत्रून्
चक्रासिशार्ङ्‌गायुधशङ्‌खपाणिः ॥ ६८ ॥
त्या समयी सिद्ध, देवर्षि, मोठे मोठे नाग, गंधर्व आणि यक्ष त्यांचे गुण गात होते. असुरांच्या सेनेचे शत्रु ते श्रीहरि शङ्‌ख, चक्र, खङ्‌ग आणि शार्ङ्‌ग धनुष्य घेऊन एकाएकी तेथे येऊन पोहोचले. ॥६८॥
सुपर्णपक्षानिलनुन्नपक्षं
भ्रमत्पताकं प्रविकीर्णशस्त्रम् ।
चचाल तद् राक्षसराजसैन्यं चलोपलं नीलमिवाचलाग्रम् ॥ ६९ ॥
गरूडाच्या पंखाच्या तीव्र वायुच्या झोकाने ती सेना क्षुब्ध झाली. सैनिकांच्या रथाच्या पताका गोल गोल फिरू लागल्या आणि सर्वांच्या हातांतून अस्त्रे-शस्त्रे खाली पडली. याप्रकारे राक्षसराज माल्यावानाची संपूर्ण सेना कापू लागली. ती पाहून जणु पर्वताचे नील शिखर आपल्या शिलांना विखरून टाकत हलत आहे की काय असे वाटत होते. ॥६९॥
ततः शरैः शोणितमांसरूषितैः
युगान्तवैश्वानरतुल्यविग्रहैः ।
निशाचराः सम्परिवार्य माधवं
वरायुधैर्निर्बिभिदुः सहस्रशः ॥ ७० ॥
राक्षसांची उत्तम अस्त्रे-शस्त्रे तीक्ष्ण, रक्त आणि मांसाने माखलेली तसेच प्रलयकालीन अग्निसमान दीप्तिमान्‌ होती. त्यांच्या द्वारा ते हजारो निशाचर भगवान्‌ लक्ष्मीपतिंना चोहोबाजुनी घेरून त्यांच्यावर प्रहार करू लागले. ॥७०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा सहावा सर्ग पूरा झाला. ॥६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP