॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय तेरावा ॥
सुबाहुनिर्दलनं
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
एह्येहि रजनीं वसाम शुभदर्शन ।
अयं सिद्धाश्रमो नाम त्वत्प्रादाद्भविष्यति ॥१॥
सिद्धाश्रमात मुक्काम :
विश्वामित्र म्हणे रामासी । सिद्धाश्रम नाम यासी ।
येळे राहावें आजिचे निशीं । सिद्धाश्रमासी निजसिद्धी ॥१॥
आम्ही तुम्ही केलिया वस्ती । या सिद्धाश्रमाची सिद्ध ख्याती ।
विस्तारेल त्रिजगतीं । मम आश्रमाप्रति प्रभाते गमन ॥२॥
अस्त्र विद्याग्रहण :
येथे सुखें निशा क्रमून । प्रभाते स्नानसंध्या करून ।
विश्वामित्र म्हणे आपण । अस्त्रग्रहण करीं रामा ॥३॥
वसिष्ठाज्ञेचा निर्धारू । अनुविद्येसी तूं सद्गुरूं ।
तदर्थीं आल्हाद थोरू । श्रद्धासादरू रघुनाथ ॥४॥
वंदोनि सद्गुरूचरण । कृतांजलि रामलक्ष्मण ।
त्यासीं विश्वामित्र आपण । अस्त्रप्रदान प्रारंभी ॥५॥
तो म्हणे हें अस्त्रभिग्रहण । त्रिशुद्धी व्हावें सावधान ।
सबीजमंत्राचें मत्रोद्वारण । प्रेरणावरणा अस्त्रांचें ॥६॥
अस्त्र सोडिलें तत्काळ जाय । कार्य साधूनि हातासी येय ।
ऐसीं बीजें निःसंदेह । ऋषि सांगताहे सवर्म ॥७॥
अस्त्रांची यादी :
पन्नगास्त्र गरूडास्त्र । अग्न्यस्त्र पर्जन्यास्त्र ।
वायव्यास्त्र पर्वतास्त्र । वज्रास्त्र दुर्धारत्वें ॥८॥
सोमास्त्र हिमास्त्र । क्रोधास्त्र नंदिकास्त्र ।
गंधवास्त्र आदित्यास्त्र हयशिरोस्त्र दारुण ॥९॥
वीरघ्नास्त्र विरोधास्त्र । दुर्मनास्त्र सर्पघ्नास्त्र ।
घोरास्त्र अधोरात्र । घोरघोरास्त्र अतितापी ॥१०॥
संतापास्त्र अतितापास्त्र । घोषणास्त्र दानवास्त्र ।
पिशाचिकास्त्र पिपीलिकास्त्र । विद्याधरास्त्र मारक ॥११॥
वृकास्त्रे जंबुकास्त्र । जंबुकास्त्र शुचिकास्त्र ।
मानवास्त्र वृश्चिकास्त्र । त्वष्ट्रस्त्र तडित्प्राये ॥१२॥
कंकाळास्त्र कालिकास्त्र । सूचिकास्त्र विषूचिकास्त्र ।
चंडास्त्र प्रंचंडास्त्र । वितंडास्त्र विध्वंसी ॥१४॥
मायास्त्र मोहनास्त्र । तानास्त्र घातनास्त्र ।
मातंगीदहनास्त्र । ब्रह्मकपालास्त्र रुधिराशी ॥१५॥
भीमास्त्र भयानकास्त्र । शृंगास्त्र भृंगास्त्र ।
क्रूरास्त्र भैरवास्त्र । करालास्त्र उगत्वें ॥१६॥
वारुणास्त्र दारुणास्त्र । काळरुद्रास्त्र कार्तिकेयास्त्र ।
कपालास्त्र भद्रास्त्र । वामनास्त्र विघाती ॥१७॥
संकर्षणास्त्र नारायणास्त्र । शंकरास्त्र नृसिंहास्त्र ।
वामनास्त्र पद्युम्नास्त्र । मदनाशास्त्र प्रतापी ॥१८॥
ईषीकास्त्र तृणाशलाका । दाटूगी जिणोनि अस्त्रें अनेका ।
पाशुपताची मह्मा देखा । तिहीं लोकां अनिवार ॥१९॥
ब्रह्मशिरास्त्राचा मंत्र । प्रेरिलिया छेदी चराचर ।
याचा ऐसा असे विचार । यालागीं हे अस्त्र राखिजे जतन ॥२०॥
माडल्याही निर्वाण । या अस्त्राचें प्ररण ।
सर्वथा न करिती विचक्षण । परम दारूण अनिवार ॥२१॥
हें अस्त्र जो पाळूं जाणे । सकळां अस्त्रा सामर्थ्य येणें ।
यालागीं हें अस्त्र शहाणे । अति यत्नें पाळिती ॥२२॥
जाली अस्त्रांची अवधी । आतां सांगेन आतां सांगेन शस्त्रविधी ।
जे स्मरतांचि त्रिशुद्धी । युद्धसमयीं येती स्वयें ॥२३॥
वायुचक्र विष्णुचक्र । कूर्मचक्र काळचक्र ।
नक्रचक्र अतिवक्र । अति दुर्शर कंदनाकार ॥२४॥
शूळ त्रिशूळ महाशूळ पाहें । घाईं खोचीं चारी देहें ।
तया समोर कोण राहे । धाकें कांपताहे कळिकाळ ॥२५॥
कौमोदकी शिवोदकी । दोन्ही गदा अलौकिकी ।
मोहममतेच्या छेदकी । तिहीं लोकीं अति धाक ॥२६॥
दोनी खड्ग अति खाच । एक जीवाचा छेदक ।
दुजा कल्पनेचा घातक । यासी लोकालोक कांपती ॥२७॥
शिवशक्ती विष्णुशक्ती । अनादि आदिशक्ती ।
संदेहें लिंगदेह छेदिती । याचिका दीप्तीं पळे कथिकाळ ॥२८॥
धनुर्विद्येचा प्रभाव :
टणत्कारें ओढितां कानाडी । नादें निमती राक्षसकोडी ।
माया सहकुटुंब प्राण सांडी । हे धनुविद्या गाढी दूध धरीं ॥२९॥
निजतेजें तिखट सदा । अशेष आशेच्या करी छेदा ।
तो दिव्य बाण हे प्रबुद्धा । तूणीरबद्धो निर्बंध ॥३०॥
मल्लविद्या :
जालिया शस्त्रास्त्रविधी । मल्लविद्याविंदानसिद्धी ।
गुरुकृपा उपजे त्रिशुद्धीं । कृपानिधी सच्छिष्या ॥३१॥
उपदेशितां विश्वामित्रें । धनुर्विद्या शस्त्रास्त्रें ।
ते विद्या श्रीरामचंद्रें निमिषमात्रें निजबोघिली ॥३२॥
मंत्रदेवता श्रीरामसेवेची घोषणा करतात :
मंत्राच्या मंत्रशक्ती तत्वतां । आणि मंत्रमूर्तिं समस्ता ।
स्वयें वंदिती रघुनाथा । आमची समर्थता तुझेनी ॥३३॥
आमचा स्वभाव शेदक भूर्ती । ते चेदकता तुझे हातीं ।
मरत्या मारित्या अमृतपाप्ती । ऋषि वदिती पावनत्वें ॥३४॥
तूं अधर्मातें निर्दाहिसी । स्वधर्मातें प्रतिपाळिसी ।
तेचि कार्ति पैं आम्हांसी । तुझेनि हस्तेसी पावन ॥३५॥
तुवां आम्हांसी धरितां हातीं । आम्ही पावन तुझिया ख्यातीं ।
तुझिया युद्धाची कीर्ती । कवि वानिती पुराणीं ॥३६॥
आमचें कर्म भूतघातीं । घातामाजीं तूं देसी मुक्ती ।
तेणें आमची पावन कीर्ती । स्वयें वंदिती द्वैज देव ॥३७॥
ऐसी करोनि स्तुतिवादना । रामचरणीं लागल्या जाणा ।
मग करूनियां प्रदक्षिणा । रामहृदयीं जाणा प्रवेशल्या ॥३८॥
शस्त्रदेवता अहर्निशीं । जोडोनि हात ठेल्या श्रीरामचरणांसी ।
घोकणीं चिंतन न लगे त्यासी । अनायासी प्राप्त सर्वज्ञा ॥३९॥
यालागी संग्रामासीं । जें जे शस्त्र पाहिजे त्यासी ।
तें तें येतें हातापासीं । शत्रुघातासी स्वभावें ॥४०॥
शस्त्रास्त्रांसी श्रीरामीक्ती । रामहृदयीं शस्त्राची वस्ती ।
ऐसिया अभिनवा गतीं । संग्रामस्थिती श्रीरामीं ॥४१॥
एवं श्रीरामसौमित्रां । उपदेशितां विश्वामित्रा ।
उलास जाला शस्त्रास्त्रां । निशाचरां वधावया ॥४२॥
श्रीराम विद्यासंपन्न झाल्यामुळे विश्वामित्रांना आनंद :
ऋषीनें हात ठेवितां माथा । विद्या बाणली रघुनाथा ।
तेणें उल्लास तत्वता । ऋषि स्वानंदता स्वयें नाचे ॥४३॥
विद्या बाणतां शिष्याचे पोटीं । गुरुसी आनंदाच्या कोटीं ।
हे शाब्दिक न कळे गोष्टी । बोधकसवटी अनुपम्य ॥४४॥
शाब्दिकाचें शब्दज्ञान । तेंचि सोलींव अज्ञान ।
तेंचि साधकां निजबंधन । रघुनंदन तैसा नव्हें ॥४५॥
रगुनाथा विद्याधिनाष्ठान हे विश्वामित्रा कळली खूण ।
तेणें आनंदें बोले आपण । येथोनि प्रयाण करावें ॥४६॥
विश्वामित्रांच्या आश्रमात आगमन :
ऐकोनि गुरुचें वचन । रथारूढ रामलक्ष्मण ।
उल्लसें करितां गमन । पुढें शोभायमान नव देखें ॥४७॥
राम म्हणे ऋषि निर्मळा । ही कोणाची शोभनशाळा ।
येरू म्हणे धननीळा । आश्रम सोज्ज्वळा पें माझा ॥४८॥
आश्रमा आले रघुपती । आनंदल्या ऋषिपंक्ती ।
विश्वामित्रे धर्मस्थिती । रामा अति प्रीतीं पूजिलें ॥४९॥
आणोनि श्रीरामा सुभटा । पाचारोनी मुनिशेष्ठां ।
आदरें अग्निप्रतिष्ठा । केली स्वधर्मॆं पैं ॥५०॥
गर्ता वेदी कुंड मंडप । विधियुक्त तोरें पताकारोप ।
यालागीं मुख्य रघुनाथ यूप । तो निजरूप यज्ञाचें ॥५१॥
अग्निप्रतिष्ठा पूजन । परिसमूहन परिस्तरण ।
प्रणीतापात्रें करोनि पूर्ण । इध्माविसर्जन होमार्थ ॥५२॥
बहींचे आस्तरण । आज्यस्थालीसंस्थापन ।
ज्वलनाज्य आघारून । होमप्राधान्य मंत्रोक्तीं ॥५३॥
राक्षसांकडूण यज्ञनिध्वंसासंबंधी श्रीरामाचा प्रश्न :
ओंकारवषत्कारेंसीं करिती यज्ञ । ऋषींस पुरे रघुनंदन ।
राक्षस यज्ञविध्वंसन । कोठोनि येवोन ते करिती ॥५४॥
ऐसें पुसतां रघुनाथा । उल्लास मुनिवरां समस्तां ।
कौशिकें आश्वासोनि माथा । राक्षसकथा स्वयें सांगे ॥५५॥
आरंभापासोनि साहावे रातीं । अलक्षलक्षें राक्षस येती ।
रिघोनियां यागाप्रती विध्वंसिती दुर्धर ॥५६॥
जो निर्विकार निजनेटासीं । सहा दिवस अहर्निशीं ।
सावध राहे निंद्रेंसीं । राक्षस त्यासी वध्य होती ॥५७॥
ऐसें ऐकतां गुरुवचन । श्रीराम नित्य सावधान ।
वगें घेवोनि धनुष्य बाण । राहिला आपण यज्ञद्वारीं ॥५८॥
कर्मयोगीं कर्ता विश्वामित्र । क्षात्रधर्मयागीं रघुवीर ।
दोहीं यागांचा विचार । श्रोती साचार परिसावा ॥५९॥
कर्मयागीं कुंडसाधन । क्षात्रयागीं रणरंगण ।
कर्मयागीं वेदविधान । अपलायन क्षात्रत्यागीं ॥६०॥
ऋषियागीं ब्रह्मा श्रेष्ठ । रणयागीं सत्ववरिष्ठ ।
यज्ञयागीं कर्मखटपट । तेथे खणखणाट शस्त्रांचा ॥६१॥
येथें स्त्रुक्स्त्रुवा परिमार्जन । तेथे धनुष्यीं लाविले बाण ।
बाणांचे परिस्तरण । परिसमूहन धैर्याचें ॥६२॥
कर्मयागीं अग्निस्थापन । येथें काळानळहुताशन ।
तेथें स्त्रुवेनें होमिती अन्न । येत्हें मांसावदन बाणाग्रे ॥६३॥
ऋषियागीं वसोर्धारा । येथे प्रवाहो रुधिरा ।
तेथें ऊंकारवषट्कारा । येथें हाहाकार वीरांचे ॥६४॥
कर्मयागीं ज्वाला उद्भट । येथें शस्त्रांचा खणखणाट ।
यागीं धूम्र निघे अचाट । येथे स्वेद श्रम कष्ट वीरांचे ॥६५॥
यागीं वाढल्या हुताशन । पृषदाज्यें अभिषिंचन ।
राक्षस वाढल्या दारूण । अस्रीं सिंचन तयांसी ॥६६॥
यागीं सदीप बलिदान । येथें जीवबळी संदीप्तज्ञान ।
बळि नेती सलोभ हीन । येथें जीवपण देहेलोभें ॥६७॥
श्रीरामासी विमुख होऊन । जे युद्धीं करिती पलायन ।
त्यांचे न तुटे देहबंधन । जीवबळिभक्षण अधःपात ॥६८॥
या यागीं पूर्णाहुति नारिकेळें । येथें पूर्णाहूति शिसाळे ।
तेथें प्रदक्षिणा मंत्रमेळें । येथें रणकल्लोळें प्रदक्षिणा ॥६९॥
कर्मयागीं दक्षिणा धन । येथें दक्षिणा निजपद पूर्ण ।
तेथें अभिषिंचितां ब्राह्मण । येथ देवगणपुष्पवृष्टि ॥७०॥
या यागीं श्रेय संपाद्य विश्वामित्रा । संग्रामश्रेय श्रीरामचंद्रा ।
श्रेयें उलास स्वगोत्रा । येथें चराचरा उलास ॥७१॥
कर्मयागीं ब्राह्मणभोजन । रणयागीं भूतसंतर्पण ।
दोनी यागीं समसमान । सिद्धी संपुर्ण रघुवीरें ॥७२॥
यज्ञांती अग्निविसर्जन । तैसें न करी रघुनंदन ।
पूर्ण द्यावया भोजन । नवें निमंत्रण काळानळा ॥७३॥
ताटाकावधें पात्रप्रोक्षण । चित्राहुति सुबाहु संपूर्ण ।
त्रिशिरा आणि खर दूषण । प्रथम जाण प्राणाहुती ॥७४॥
कढीभात तो कुंभकर्ण । इंद्रजित पक्वान्नें पूर्ण ।
रावण तो दध्योदन । उत्तरापोशन रणत्याग ॥७५॥
प्रधान आणि राक्षसगण । हे भोजनीं शाखा आणि लवन ।
अखयादि पुत्र पूर्ण । ते लोणचीं जाण सर्वसवें ॥७६॥
इतुकें जलिया संपूर्ण । काळानळा तृप्तिभोजन ।
हें द्यावया रघुनंदन । सावधान युद्धर्थीं ॥७७॥
श्रोत्यांना विनंती :
विश्वामित्रयज्ञरक्षण । कथा सांडोनि रामायण ।
मध्येंचि केले व्यर्थ कथन । तें श्रोतीं संपूर्ण क्षमा कीजे ॥७८॥
मी तंव संतांचे लळिवाड । माझ्या बोलांचे त्यांसी कोड ।
यालागीं माझी बडबड । लागो गोड साधूसीं ॥७९॥
साधूंचें मी तान्हें बाळक । अगणुपणें समूळ मूर्ख ।
रामकथा वदे ज्याचें मुख । हें कृपापीयूष साधूंचें ॥८०॥
तव संत म्हणती नवलाव । उभययाग अभिप्राव ।
शुद्ध साधिला आत्मानुभव । अविरुध भाव वेदोक्तीं ॥८१॥
श्रीरामीं प्रेम गहन । हें निरूपणीं कळलें चिन्ह ।
आतां चालवीं रामायण । मूळनिरूपण ग्रंथार्था ॥८२॥
ऐकोनि साधूंचा अनुवाद । कवित्वा जाला परम आल्हाद ।
एकाजनार्त्दनीं बोध । कथासंबंध अवधारा ॥८३॥
श्रीरामांच्या पहार्यामुळे राक्षसांना संधी मिळेना :
विश्वामित्रयज्ञरक्षण । करावया श्रीराम स्वयें सावधान ।
रोघों न शक्ती राक्षसगण । सुबाहु स्वयें आपण आला ॥८४॥
यज्ञद्वारीं श्रीरघुपती । तेथें राक्षसांची न चले गती ।
अंधारी छळावया येती । तंव श्रीराममूर्ति सावधान ॥८५॥
दिवसा करावया छळण । तेथे श्रीराम सावधान ।
स्वयें सुबाहु भोंवे आपण । तरी रघुनंदन छळेना ॥८६॥
अंधराचे निजतेज । स्वयें श्रीरामाच सहज ।
दिवसाचे निजबीज । दशरथात्मज निजांगे ॥८७॥
यज्ञरक्षक रघुनाथ । न चले दळाचें छळमत ।
हा बाळपणीं प्रतापवंत । ठेला तटस्थ सुबाहु ॥८८॥
दावूं दूर्धरत्वें दरारा । तंव श्रीराम नेघे भेदरा ।
झांपडे पडिलें निशांचरां । सर्वथा अध्वरां शिरों नेदी ॥८९॥
श्रीराम नित्य सावधान । सर्वांगदेखणा संपूर्ण ।
सुबाहूचें तळमळी मन । ऋषीनें संपूर्ण गांजिलों ॥९०॥
आतां संग्राम करूं सदृढ । घेऊं ताटिकेचा सूड ।
म्हणोनि असुर पडिपाड । गगनीं गडगड गर्जत ॥९१॥
वर्षती रुधिराचिया धारा । भयें भेडसावीत द्विजवरां ।
सांभाळीं म्हणत रघुवारा । आला सामोरा सुबाहु ॥९२॥
राक्षसांचा हल्ला, श्रीरामांकडून सुबाहूचा नाश :
हांसे आले रघुवीरा । बाणीं त्रासिला सुबाहु पुरा ।
तंव मारीच धांविन्नला कैवारा । तेणें रामचंद्रां हाकिलें ॥९३॥
बाबरझोटिया समस्तक । घोर नादें दिधली हाक ।
विक्राळ पसरोनिया मुख । श्रीरामसन्मुख धांविन्नला ॥९४॥
ऐकतां राक्षस आरोळी । भयें द्विज पडिलें भूतळीं ।
एकांच्या बैसल्या दांतखिळी । एक ते चळचळीं कांपत ॥९५॥
एकांची धोत्रें गहती । एक ते धोत्रांत मुतती ।
एकां अधोवात सस्ती । एक करिती महाशब्द ॥९६॥
एक आरडती ओरडती । एक दीर्घस्वरें रउती ।
एक उघडे पडती । एक चरफडती अति धाकें ॥९७॥
एकांचे खुटखुटती दांत । एकांचे फुटलें ओंठ ।
एकांचे भये फुगले पोट । अति संकट ब्राह्मणां ॥९८॥
राम म्हणे लक्ष्मणासी । वेगीं नाभिकार दे द्विजांसी ।
थोर होती कासाविसी । मी राक्षसांसी निवटीन ॥९९॥
तंव समुदायें निशाचर । करीत आले हाहाकार ।
विक्राळ दिर्मद अति दुर्धर । अति भयंकर संग्रामीं ॥१००॥
कातिया त्रिशूभ तोमर । गदा मुद्रल चंड चक्र ।
बाण खड्गें लहुडी थोर । शस्त्रभार सूटले ॥१॥
महाशस्त्रांचा लखलखाट । थोर खड्गांचा खणखणाट ।
बाण सुटती सणसणाट । घाय उद्भट हाणिती ॥२॥
राहें साहें वीर शूर । घायें निर्बळ केले असुर ।
पळूं नको धरीं धीर । क्रोधें वीर गर्जती ॥३॥
तंव रामे सोडिला बाण । सकळ शस्त्रें केली चूर्ण ।
तिळप्राय केले वोढण । बळसंपन्न रधुवीरें ॥४॥
निवारावयास रामबाण । शस्त्रें सोडितां ती होती चूर्ण ।
वीर खोचलें दारुण । सुबाहु पूर्ण क्षोभला ॥५॥
मह हातीं वसवोनि गदा । सुबाहु धांविन्नला मल्लयुद्धा ।
तंव श्रीराम नित्यसावध । राक्षसद्वंद्वतें कळलें ॥६॥
सुबाहूची गदा केली पीठ । मारीचाचा मुद्रल केला कूट ।
शूळ त्रिशूळ अति तिखट । ते करी सपाट श्रीराम ॥७॥
बाणपिसार्याचने मारीचाला शतयोजने दूर उडविले :
बाणी योजिले अग्निअस्त्रा । घायें सुबाहु केला पुरा ।
मारीच पळविला माघार । त्यासी पिसारा लागला ॥८॥
पिसारा लागला ब्रह्मांडी । तेणें त्यासी आली भोवंडी ।
हातपायां वळली मुरकुंडी । सुटल्या तोंडी रुधिरधारा ॥९॥
बाणपिसारियाचा पवन । मारीचास उडवी जैसें तृण ।
वाहुटळीमाजी भोवें पान । तेंवी परिभ्रमण आकाशीं ॥११०॥
बाणपिसारियाचा वारा । मारीच उडविला अंबरा ।
शतयोजन समुद्रतीरा । तेथें निशाचर टाकिलें ॥११॥
राम लक्ष्मणासी म्हणे आपण । मारीचास नाहीं लागला बाण ।
यालागीं त्याचा न वचे प्राण । पिसारें पूर्ण उडविला ॥१२॥
मारीचास मूर्च्छा उद्भट । वटारिले नेत्रवाट ।
घुरघुरीत वाजे कंठ । प्राणसंकट मांडलें ॥१३॥
मारीच दैवें जाला सावध । परी धाक घेतला सुबद्ध ।
पिसारियाचा येवढा बाध । मा सन्मुख युद्ध कोण साहे ॥१४॥
राम देखतांचि जीव जाय । त्याचे निर्वाणाचे घाय ।
देहवंत कोण साहे । महाभया भय श्रीराम ॥१५॥
श्रीरामांच्या धाकाने मारीचाकडून आश्रमस्वीकार :
देखोनि श्रीरामाचे चरण । युद्धाभिमान गेला पळोन ।
संग्राम न करी आपण । वाहोनियां आण निजाश्रमीं शांत ॥१६॥
श्रीरामाचा निजबाण । सुबाहून्चे निवटी मन ।
चित्त बुद्धी अभिमान । छेदूनि संपूर्ण मारिला ॥१७॥
येणें नेटें मारिला देख । जे मरणाचें नाठवें दुःख ।
पुढे जन्माचें न देखें मुख । ऐसा निःशेष मारिला ॥१८॥
मारीच-सुबाहूंचे अनेक सेवक । राक्षस जे आले अनेक ।
रोमं मारिलें एक एक । राक्षसातक श्रीराम ॥१९॥
राक्षसांची महाधेंडी । आरमीं पडलीं मढीं ।
शिष्य धाकती बापुडीं । ही कोण काढी अति दीर्घ ॥१२०॥
त्या शिष्यांच्या सांकडी । न लागतां अर्धघडी ।
श्रीरामें फेडिली रोकडी । घेवोनि भूतकोडी जगदंबा ॥२१॥
जगदंबा आणि विश्वामित्रऋषींनीं श्रीरामाचे केलेले अभिनंदन :
औटकोटी भूतावळी । सहित आली भद्रकाळी ।
आरती घेवोनि सोज्ज्वळी । स्वयें अओवाळी श्रीरामा ॥२२॥
येतां भूतांचा मेळा । प्रेतें नेलीं देखतां डोळां ।
आश्रम जाला अति सोज्ज्वळा । सडे रंगमळा घातल्या भूतीं ॥२३॥
ऋषि राक्षसभयें भयभीत । पडलें होते पैं मूर्छित ।
ते लक्ष्मणें करूनि सावच्चित । शीघ्र स्नानार्थ पाठविलें ॥२४॥
वेगीं आले करूनि स्नान । आश्रम दिसे शोभायमान ।
बाप प्रतापी रघुनंदन । स्वानंदे स्तवन ऋषि करिती ॥२५॥
विजयी जाला रघुवीर । सुखी जाले ऋषीश्वर ।
विष्णू पूजिती सुरवर । तैसा रामचंद्र पूजिला ॥२६॥
रामप्रताप देखोनि दृष्टीं । विश्वामित्रा आनंदकोटी ।
श्रीरामाची पाठी थापटी । उल्लस सृष्टीं न समायें ॥२७॥
गुरुआज्ञा तुवां पाळिली । गुरुसेवा तुजचि फळली ।
गुरुची चिंता तुवा करिली । गुरुपूजा केली यथार्थ ॥२८॥
तूं गुरुत्व सद्गुरूचें । तूं गुरुज्ञान निश्चयाचें ।
तूं निजबीज गुरुवाक्याचें । गुरुत्व साचें तुझेनी ॥२९॥
श्रीराम गुरुत्वाची गरिमा । श्रीराम गुरुत्वाची महिमा ।
श्रीराम गुरुत्वाची सीमा । ब्रह्मत्व ब्रह्मा श्रीरामें ॥१३०॥
श्रीराम गुरुत्वाचे निजवीर्य । श्रीराम गुरूचें निजधैर्य ।
श्रीराम गुरुत्वा गुरुवर्य । गुरुगांभीर्य श्रीराम ॥३१॥
श्रीराम गुरुत्वाचें निजतेज । श्रीराम गुरुत्वाचें निजबीज ।
श्रीराम गुरुत्वाचें गुह्यगुज । स्वानंदभोज श्रीराम ॥३२॥
श्रीराम गुरूची निजमूर्ति । श्रीराम निश्चितीं गुरुगमय ॥३३॥
श्रीराम गुरुत्वा निजप्रताप । श्रीराम गुरूचें सद्रूिप ।
श्रीराम स्वयें ब्रह्मरूप । चित्स्वरूप श्रीराम ॥३४॥
ऐसें श्रीरामाचें निजस्तवन । कौशिकें करोनि आपण ।
आनंदें दिधले आलिंगन । समाधान गुरुशिष्यां ॥३५॥
विजयप्राप्तीच्या आनंदामुळे विश्वामित्रांकडून दानधर्म :
विश्वामित्र आनंदे निर्भर । द्विजा दे गौ सहस्रासहस्र ।
सुवर्णशुंगी रौप्यखूर । पृष्ठींस ताम्र कांस्यदोही ॥३६॥
गोपुच्छींची प्रवाळें । लेवविली रत्नें मुक्ताफळें ।
ऐसीं विश्वामित्रें गोकुळे । देवोनि द्विजकुळें सुखी केलीं ॥३७॥
सुवर्णाचे सांभार । दक्षिणांचे सहस्रासहस्र ।
याचक केले हर्षनिर्भर । मागते अभर कौशिक यागीं ॥३८॥
रामें निवटले राक्षसगण । ऋषींचा सिद्धि पावला यज्ञ ।
जालें ब्राह्मणभोजन । रघुनंदन निजवियी ॥३९॥
विजयी जाला रघुनाथ । पवाडा केला त्रैलोक्यांत ।
ऐकोनि रावण विस्मित । आनंद अद्भुत सुरवरांसी ॥४०॥
एकाजनार्दना शरण । जालें सुबाहुनिर्दळण ।
सिद्धि पावला गुरूचा यज्ञ । अहल्योद्धरण अवधारा ॥४१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां सुबाहुनिर्दलनं नाम त्रयोदशो॓ऽध्यायः ॥१३॥ ओव्यां ॥१४१॥ श्लोक ॥१॥ एवं ॥१४२॥
GO TOP
|