॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ युद्धकाण्ड ॥ ॥ दशमः सर्ग: ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] रावणाच्या यज्ञाचा विध्वंस व त्याने मंदोदरीची समजूत घालणे श्रीमहादेव उवाच स विचार्य सभामध्ये राक्षसैः सह मंत्रिभिः । निर्ययौ येऽवशिष्टास्तै राक्षसैः सह राघवम् ॥ १ ॥ शलभः शलभैर्युक्तः प्रज्वलन्तमिवानलम् । ततो रामेण निहताः सर्वे ते राक्षसा युधि ॥ २ ॥ श्रीमहादेव म्हणाले - हे पार्वती, सभेमध्ये राक्षस-मंत्र्याबरोबर विचार करून, ज्या प्रमाणे एखादा पतंग अन्य पतंगासह पेटत्या अग्नीकडे धावतो, त्या प्रमाणे जे काही राक्षस उरले होते त्यांना बरोबर घेऊन रावण राघवांवर चालून गेला. तेव्हा रामांनी त्या सर्व राक्षसांचा वध केला. (१-२) स्वयं रामेण निहताः तीक्ष्णबाणेन वक्षसि । व्यथितस्त्वरितं लङ्कां प्रविवेश दशाननः ॥ ३ ॥ नंतर स्वतः रामांनी एका तीक्ष्ण बाणाने रावणाच्या वक्षःस्थळावर प्रहार केला असता, व्याकूळ झालेला रावण त्वरित पुनः लंकेमध्ये प्रविष्ट झाला. (३) दृष्ट्वा रामस्य बहुशः पौरुषं चाप्यमानुषम् । रावणो मारुतेश्चैव शीघ्रं शुक्रान्तिकं ययौ ॥ ४ ॥ रामांचे आणि मारुतीचे फार मोठे अतिमानवी शौर्य पाहून, रावण त्वरित शुक्राचार्यांचे जवळ गेला. (४) नमस्कृत्य दशग्रीवः शुक्रं प्राञ्जलिरब्रवीत् । भगवन् राघवेणैवं लङ्का राक्षसयुथपैः ॥ ५ ॥ विनाशिता महादैत्या निहताः पुत्रबान्धवाः । कथं मे दुःखसन्दोहः त्वयि तिष्ठति सद्गुरौ ॥ ६ ॥ शुक्राला नमस्कार करून व हात जोडून रावण त्याला म्हणाला, "हे भगवन, राघवाने अशा प्रकारे राक्षस समूहांच्या नायकांसह लंका नष्ट करून टाकली आहे आणि मोठमोठे दैत्य, माझे पुत्र व बांधव यांना ठार केले आहे. आपल्यासारखे सद्गुरू असताना, माझ्यावर हा दुःखाचा समूह कसा बरे कोसळला आहे ?" (५-६) इति विज्ञापितो दैत्य-गुरुः प्राह दशाननम् । होमं कुरु प्रयत्नेन रहसि त्वं दशानन ॥ ७ ॥ रावणाने असा प्रश्र केल्यावर दैत्यांचा गुरू शुक्र रावणाला म्हणाला, "हे रावणा, तू प्रयत्नपूर्वक एकांतात एक होम कर. (७) यदि विघ्नो न चेत् होमे तर्हि होमानलोत्थितः ॥ ८ ॥ महान् रथश्च वाहाश्च चापतूणीरसायकाः । सम्भविष्यन्ति तैर्युक्तः त्वं अजेयो भविष्यसि ॥ ९ ॥ जर तुझ्या होमात काही विघ्न आले नाही तर त्या होमाच्या अग्नीतून एक प्रचंड रथ, घोडे, धनुष्य, भाता आणि बाण उत्पन्न होतील. त्यांनी तू युक्त झालास, तर तू अजिंक्य होशील. (८-९) गृहाण मंत्रान् मद्दत्तान् गच्छ होमं कुरु द्रुतम् । इत्युक्तस्त्वरितं गत्वा रावणो राक्षसाधिपः ॥ १० ॥ मी देतो ते मंत्र घे. जा आता. चट्दिशी होम कर." शुक्राने असे सांगितले असता, राक्षसराज रावण तेथून त्वरेने निघाला. (१०) गुहां पातालसदृशीं मन्दिरे स्वे चकार ह । लङ्काद्वारकपाटादि बद्ध्वा सर्वत्र यत्नतः ॥ ११ ॥ होमद्रव्याणि सम्पाद्य यान्युयुक्तान्याभिचारिके । गुहां प्रविश्य चैकान्ते मौनी होमं प्रचक्रमे ॥ १२ ॥ आपल्या महालात त्याने पाताळासारखी एक गुहा तयार केली. नंतर प्रयत्नपूर्वक लंकेची सगळीकडची दारे, कवाडे इत्यादी बंद करून आणि अभिचार कर्मासाठी शास्त्रात सांगितलेली सर्व होमद्रव्ये संपादन केली, मग गुहेत प्रवेश करून, मौन धारण करून, त्याने एकांतात होम करण्यास प्रारंभ केला. (११-१२) उत्थितं धूममालोक्य महान्तं रावणानुजः । रामाय दर्शयामास होमधूमं भयाकुलः ॥ १३ ॥ त्या होमातून उठणारा तो प्रचंड धूर बिभीषणाने पाहिला. तेव्हा भयभीत होऊन त्याने तो रामांना दाखविला. (१ ३) पश्य राम दशग्रीवो होमं कर्तुं समारभत् । यदि होमः समाप्तः स्यात् तदा अजेयो भविष्यति ॥ १४ ॥ (आणि तो म्हणाला,) "हे रामा, पाहा, रावणाने होम करण्यास आरंभ केला आहे. हा होम जर निर्विघ्नपणे पूर्ण होईल, तर रावण अजेय होईल. (१४) अतो विघ्नाय होमस्य प्रेषयाशु हरीश्वरान् । तथेति रामः सुग्रीव सम्मतेनाङ्गदं कपिम् ॥ १५ ॥ हनूमत्प्रमुखान्वीरान् आदिदेश महाबलान् । प्राकारं लङ्घयित्वा ते गत्वा रावणमन्दिरम् ॥ १६ ॥ म्हणून रावणाच्या होमात विघ्न करण्यासाठी तुम्ही श्रेष्ठ वानरांना त्वरित पाठवून द्या." "ठीक आहे " असे म्हणून सुग्रीवाच्या संमतीने रामांनी अंगद आणि हनुमान इत्यादी महाबलवान वानरवीर यांना आज्ञा केली. त्या प्रमाणे मग ते लंकेचा तट ओलांडून रावणाच्या महालाकडे गेले. (१५-१६) दशकोट्यः प्लवङ्गानां गत्वा मन्दिररक्षकान् । चूर्णयामासुरश्वांश्च गजांश्च न्यहनन् क्षणात् ॥ १७ ॥ दहा कोटी वानर तेथे गेले आणि त्यांनी महालाच्या रक्षकांचे चूर्ण केले आणि एका क्षणात त्यांनी घोडे व हत्ती यांनाही ठार केले. (१७) ततश्च सरमा नाम प्रभाते हस्तसंज्ञया । विभीषस्य भार्या सा होमस्थानम् असूचयत् । ॥ १८ ॥ त्यानंतर प्रातःकाल होताच, सरमा नावाच्या बिभीषणाच्या भार्येने हाताने खूण करून रावणाच्या होमाचे स्थान वानरांना दाखविले. (१८) गुहापिधानपाषाणं अङ्गदः पादघट्टनैः । चूर्णयित्वा महासत्त्वः प्रविवेश महागुहाम् ॥ १९ ॥ गुहेच्या तोंडावर ठेवलेल्या पाषाणाचे अंगदाने आपल्या पायाच्या प्रहारांनी चूर्ण केले आणि तो महापराक्रमी अंगद त्या प्रचंड गुहेत शिरला. (१९) दृष्ट्वा दशाननं तत्र मीलिताक्षं दृढासनम् । ततोऽङ्गदाज्ञया सर्वे वानरा विविशुर्द्रुतम् ॥ २० ॥ तेथे डोळे मिटून, दृढ आसन घालून बसलेल्या रावणाला पाहिल्यानंतर अंगदाच्या आज्ञेने सर्व वानर चटदिशी गुहेत शिरले. (२०) तत्र कोलाहलं चक्रुः ताडयन्तश्च सेवकान् । सम्भारांश्चिक्षिपुस्तस्य होमकुण्डे समन्ततः ॥ २१ ॥ गुहेत उपस्थित असणाऱ्या सेवकांना बदडून काढीत वानरांनी कोलाहल केला आणि इकडे तिकडे असलेली होमाची द्रव्यसामग्री त्यांनी त्या होमकुंडात फेकून दिली. (२१) स्रुवमाच्छिद्य हस्ताच्च रावणस्य बलाद्रुषा । तेनैव सञ्जघानाशु हनूमान् प्लवगाग्रणीः ॥ २२ ॥ रागावलेल्या वानराग्रणी हनुमानाने बळजबरीने रावणाच्या हातातून स्रुवा हिसकावून घेतली आणि तिनेच तो रावणाला मारू लागला. (२२) घ्नन्ति दन्तैश्च काष्टैश्च वानरास्तमितस्ततः । न जहौ रावणो ध्यानं हतोऽपि विजिगीषया ॥ २३ ॥ इकडून तिकडून सर्व बाजूंनी वानर आपल्या दातांनी रावणाला चावू लागले आणि लाकडांनी त्याला चोपू लागले. तथापि शत्रूवर विजय मिळविण्याच्या इच्छेमुळे असा मार बसला, तरी रावणाने आपले ध्यान सोडले नाही. (२३) प्रविश्यान्तःपुरे वेश्मनि अङ्गदो वेगवत्तरः । समानयत्केशबन्धे धृत्वा मन्दोदरीं शुभाम् ॥ । २४ ॥ इकडे अंगद अतिशय वेगाने (रावणाच्या) अंतःपुरातील महालात शिरला आणि शुभलक्षणा मंदोदरीची वेणी पकडून तो तिला त्या गुहेत घेऊन आला. २४ रावणस्यैव पुरतो विलपन्तीमनाथवत् । विददाराङ्गदस्तस्याः कञ्चुकं रत्नभूषितम् ॥ २५ ॥ रावणाच्या पुढेच ती मंदोदरी अनाथ स्त्री असल्याप्रमाणे विलाप करू लागली, तेव्हा अंगदाने रत्नाने भूषित अशी तिची चोळी फाडली. (२५) मुक्ता विमुक्ताः पतिताः समन्ताद् रत्नसञ्चयैः । श्रोणिसूत्रं निपतितं त्रुटितं रत्नचित्रितम् ॥ २६ ॥ त्या चोळीवरील तुटलेले मोती रत्नांच्या समूहासह इतस्ततः गळून पडले. तसेच तिचा रत्नखचित कंबरपट्टा सुद्धा तुटून खाली पडला. (२६) कटिप्रदेशाद् विस्रस्ता नीवी तस्यैव पश्यतः । भूषणानि च सर्वाणि पतितानि समन्ततः ॥ २७ ॥ रावण पाहात असतांनाच, तिच्या साडीची निरी ढिली होऊन ती कटिप्रदेशावरून खाली घसरली. आणि तिचे सर्व अलंकार सगळीकडे विखरून पडले. (२७) देवगन्धर्वकन्याश्च नीता हृष्टैः प्लवङ्गमैः । मन्दोदरी रुरोदाथ रावणस्याग्रतो भृशम् ॥ २८ ॥ आनंदित झालेल्या वानरांनी रावणाच्या भार्या असणाऱ्या किंवा त्याच्या बंदीत असणाऱ्या देव आणि गंधर्व यांच्या कन्यांनाही गुहेत नेले. तेव्हा रावणाच्यापुढे मंदोदरी मोठ्यांदा रडू लागली. (२८) क्रोशन्ती करुणं दीना जगाद दशकन्धरम् । निर्लज्जोऽसि परैरेवं केशपाशे विकृष्यते ॥ २९ ॥ भार्या तवैव पुरतः किं जुहोषि न लज्जसे । हन्यते पश्यतो यस्य भार्या पापैश्च शत्रुभिः ॥ ३० ॥ मर्तव्यं तेन तत्रैव जीवितान्मरणं वरम् । हा मेघनाद ते माता क्लिश्यते बत वानरैः ॥ ३१ ॥ दीन होऊन करुण स्वरात आक्रोश करीत मंदोदरी रावणाला म्हणाली, "तुम्ही अगदी निर्लज आहात. तुमचीच बायको तुमच्याच पुढे परक्यांकडून वेणी धरून खेचली जात आहे. तरीसुद्धा तुम्ही कसे बरे होम करीत बसला आहात ? तुम्हांला लाज कशी वाटत नाही ? डोळ्यांदेखत ज्याची पत्नी पापी शत्रूकडून त्रस्त केली जाते, त्याने तेथेच तत्काळ मरून जावयास हवे. जगण्यापेक्षा मरण हेच त्याला अधिक चांगले आहे. हाय मेघनादा, अरेरे, तुझी ही आई वानरांकडून क्लेश भोगीत आहे. (२९-३१) त्वयि जीवति मे दुःखं ईदृश्यं च कथं भवेत् । भार्या लज्जा च सन्त्यक्ता भर्त्रा मे जीविताशया ॥ ३२ ॥ अरे पुत्रा, तू जिवंत असतास तर मला असले दुःख कसे बरे झाले असते ? स्वतःचे जीवन रक्षण करण्यासाठी माझ्या पतीने आपली भार्या आणि आपली लज्जा, हे दोन्हीही सोडून दिले आहेत." (३२) श्रुत्वा तद्देवितं राजा मन्दोदर्या दशाननः । उत्तस्थौ खड्गमादाय त्यज देवीं इति ब्रुवन् ॥ ३३ ॥ जघानाङ्गदमव्यग्रः कटिदेशे दशाननः । तदोत्सृज्य ययुः सर्वे विध्वंस्य हवनं महत् ॥ ३४ ॥ मंदोदरीचा तो दुःखमय विलाप ऐकून राजा रावण खड्ग घेऊन उभा राहिला आणि " अरे, सोड माझ्या राणीला." असे म्हणत त्याने नेमका अंगदाच्या कटिप्रदेशावर प्रहार केला. तेव्हा तेथे असणाऱ्या विपुल हवन-सामुग्रीचा विध्यंस करून, सगळे वानर ते स्थान सोडून निघून गेले. (३३-३४) रामपार्श्वमुपागम्य तस्थुः सर्वे प्रहर्षिताः ॥ ३५ ॥ रावणस्तु ततो भार्यां उवाच परिसान्त्वयन् । आणि अतिशय आनंदित झालेले ते वानर रामांजवळ येऊन उभे राहिले. (३५) दैवाधीनमिदं भद्रे जीवता किं न दृश्यते । त्यज शोकं विशालाक्षि ज्ञानमालम्ब्य निश्चितम् ॥ ३६ ॥ त्यानंतर आपल्या भार्येचे सांत्वन करीत रावण तिला म्हणाला, "हे कल्याणी, हे जे सर्व काही घडले ते दैवाच्या अधीन होते. जिवंत असणाऱ्या प्राण्याला या जगात काय काय पाहावे लागत नाही ? विशालनयने, हे सत्य जाणून घेऊन तू शोक करणे सोडून दे. (३६) अज्ञानप्रभवः शोकः शोको ज्ञानविनाशकृत् । अज्ञानप्रभवाहन्धीः शरीरादिष्वनात्मसु ॥ ३७ ॥ अज्ञानामुळे शोक उत्पन्न होतो. शोक हा ज्ञानाचा नाश करणारा आहे. शरीर इत्यादी जड पदार्थ वर 'मी' अशी बुद्धी अज्ञानानेच निर्माण होते. (३७) तन्मूलः पुत्रदारादि संबन्धः संसृतिस्ततः । हर्षशोकभयक्रोध लोभमोह स्पृहादयः ॥ ३८ ॥ अज्ञानप्रभवा ह्येते जन्ममृत्युजरादयः । आत्मा तु केवलं शुद्धो व्यतिरिक्तो ह्यलेपकः ॥ ३९ ॥ आनन्दरूपो ज्ञानात्मा सर्वभावविवर्जितः । न संयोगो वियोगो वा विद्यते केनचित्सतः ॥ ४० ॥ त्या अहंकारामुळेच पुत्र, पत्नी इत्यादींचा संबंध तसेच त्यापासूनच संसार उत्पन्न होतो. हर्ष, शोक, भय, क्रोध, लोभ, मोह, स्पृहा इत्यादी तसेच हे जन्म, मृत्यू, जरा इत्यादी अज्ञानापासूनच उत्पन्न होतात. याउलट आत्मा हा या सर्वांपेक्षा वेगळा, एकमात्र, शुद्ध, अलिप्त लेपरहित, आनंदरूप, ज्ञानस्वरूप, आणि सर्व भावांनी रहित असा आहे; सत्-अस्तित्व हे स्वरूप असणाऱ्या आत्म्याचा कुणाशीही, कशाशीही संयोग अगर वियोग होत नाही. (३८-४०) एवं ज्ञात्वा समात्मानं त्यज शोकमनिन्दिते । इदानीमेव गच्छामि हत्वा रामं सलक्ष्मणम् ॥ ४१ ॥ आगमिष्यामि नोचेन्मां दारयिष्यति सायकैः । श्रीरामो वज्रकल्पैश्च ततो गच्छामि तत्पदम् ॥ ४२ ॥ हे प्रिये, स्वतःच्या आत्म्याचे असे स्वरूप जाणून तू शोक करणे सोडून दे. हा मी लगेच जातो आणि लक्ष्मणासह रामाला ठार करून परत येतो. असे घडले नाही तर तो श्रीराम आपल्या वज्रासारख्या बाणांनी मला छिन्न भिन्न करील. तसे घडले तर मी त्या रामाच्या पदी जाईन. (४१-४२) तदा त्वया मे कर्तव्या क्रिया मच्छासनात्प्रिये । सीतां हत्वा मया सार्धं त्वं प्रवेक्ष्यसि पावकम् ॥ ४३ ॥ हे प्रिये, त्या वेळी तू माझ्या आज्ञेने एक काम कर. सीतेला ठार करून माझ्या मृतदेहाबरोबर तू अग्नीमध्ये प्रवेश कर." (४३) एवं श्रुत्वा वचस्तस्य रावणस्यातिदुःखिता । उवाच नाथ मे वाक्यं शृणु सत्यं तथा कुरु ॥ ४४ ॥ रावणाचे अशा प्रकारे बोलणे ऐकल्यावर अतिशय दुःखी झालेली ती मंदोदरी म्हणाली, "हे नाथा, मी तुम्हांला खरे सांगते, ते ऐका. आणि मग हवे ते करा. (४४) शक्यो न राघवो जेतुं त्वया चान्यैः कदाचन । रामो देववरः साक्षात् प्रधानपुरुषेश्वरः ॥ ४५ ॥ तुमच्याकडून अगर अन्य कुणाकडून रामाला जिंकले जाणे, हे कधीही शक्य होणार नाही. कारण देवाधिदेव राम हे साक्षात प्रवृत्ती आणि पुरुष यांचे स्वामी आहेत. (४५) मत्स्यो भूत्वा पुरा कल्पे मनुं वैवस्वतं प्रभुः । ररक्ष सकलापद्भ्यो राघवो भक्तवत्सलः ॥ ४६ ॥ पूर्वीच्या कल्पात मत्स्य होऊन भक्तवत्सल प्रभू राघवांनी सर्व संकटातून वैवस्वत मनूचे रक्षण केले होते. (४६) रामः कूर्मोऽभवत्पूर्वं लक्षयोजनविस्तृतः । समुद्रमथने पृष्ठे दधार कनकाचलम् ॥ ४७ ॥ पूर्वी राम हे एक लक्ष योजने विस्तार असणारे कूर्म झाले होते. आणि समुद्र मंथनाचे वेळी त्यांनी आपल्या पाठीवर सुमेरू या सुवर्णपर्वताला धारण केले होते. (४७) हिरण्याक्षोऽतिदुर्वृत्तो हतोऽनेन महात्मना । क्रोडरूपेण वपुषा क्षोणीं उद्धरता क्वचित् ॥ ४८ ॥ एकदा वराहाचे रूप धारण करून पृथ्वीला वर उचलून काढताना याच महात्म्या रामांनी अती दुराचारी हिरण्याक्षाला ठार केले होते. (४८) त्रिलोककण्टकं दैत्यं हिरण्यकशिपुं पुरा । हतवान् नारसिंहेन वपुषा रघुनन्दनः ॥ ४९ ॥ पूर्वी नरसिंहाचे शरीर धारण करून रामांनी त्रैलोक्याला त्रासदायक झालेल्या हिरण्यकशिपू दैत्याचा वध केला होता. (४१) विक्रमैस्त्रिभिरेवासौ बलिं बद्ध्वा जगत्त्रयम् । आक्रम्यादात्सुरेन्द्राय भृत्याय रघुसत्तमः ॥ ५० ॥ वामन अवतारात बळीला बांधून आणि तीन पावलांनी तिन्ही लोक व्यापून याच रामांनी आपला सेवक जो इंद्र त्याला राज्य दिले होते. (५०) राक्षसाः क्षत्रियाकारा जाता भूमेर्भरावहाः । तान्हत्वा बहुशो रामो भुवं जित्वा ह्यदान्मुनेः ॥ ५१ ॥ एके काळी क्षत्रियांच्या स्वरूपात जन्माला आलेले राक्षस हे भूमीला भारभूत झाले, तेव्हा रामांनी परशूरामाचे रूप धारण करून त्या क्षत्रियांना अनेक वेळा नष्ट केले आणि पृथ्वी जिंकून ती त्यांनी कश्यप नावाच्या मुनींना देऊन टाकली. (५१) स एव साम्प्रतं जातो रघुवंशे परात्परः । भवदर्थे रघुश्रेष्ठो मानुषत्वमुपागतः ॥ ५२ ॥ तेच परात्पर परमात्मा सध्या रघुवंशामध्ये उत्पन्न झाले आहेत. तुमच्यासाठी त्या रघुश्रेष्ठांनी मानवाचे रूप धारण केले आहे. (५२) तस्य भार्या किमर्थं वा हृता सीता वनाद्बलात् । मम पुत्रविनाशार्थं स्वस्यापि निधनाय च ॥ ५३ ॥ माझ्या पुत्रांच्या नाशासाठी आणि तुमच्या स्वतःच्या मरणासाठी, तुम्ही त्या रामांची भार्या सीता वनातून बळजबरीने कशासाठी बरे अपहरण करून आणलीत ? (५३) इतः परं वा वैदेहीं प्रेषयस्व रघूत्तमे । विभीषणाय राज्यं तु दत्त्वा गच्छामहे वनम् ॥ ५४ ॥ आता तरी वैदेहीला रामांकडे परत पाठवा आणि बिभीषणाला राज्य देऊन आपण वनात जाऊ." (५४) मन्दोदरीवचः श्रुत्वा रावणो वाक्यमब्रवीत् । कथं भद्रे रणे पुत्रान् भ्रातॄन् राक्षसमण्डलम् ॥ ५५ ॥ घातयित्वा राघवेण जीवामि वनगोचरः । रामेण सह योत्स्यामि रामबाणैः सुशीघ्रगैः ॥ ५६ ॥ विदार्यमाणो यास्यामि तद्विष्णोः परमं पदम् । जानामि राघवं विष्णुं लक्ष्मीं जानामि जानकीम् । ज्ञात्वैव जानकी सीता मयानीता वनाद्बलात् ॥ ५७ ॥ रामेण निधनं प्राप्य यास्यामीति परं पदम् । विमुच्य त्वां तु संसाराद् गमिष्यामि सह प्रिये ॥ ५८ ॥ मंदोदरीचे वचन ऐकल्यावर रावण म्हणाला, "अग भद्रे, युद्धामध्ये पुत्र, भाऊ व राक्षस यांचा वध राघवांकडून झाल्यावर मी वनात जाऊन कसा बरे जिवंत राहू ? आता मी रामांबरोबर युद्ध करणारच आणि रामांच्या शीघ्रगामी बाणांनी मी विदीर्ण होऊन मरून गेल्यावर विष्णूच्या परमपदाला जाईन. राघव हे विष्णू आहेत आणि जानकी या लक्ष्मी आहेत हे मला नक्की माहीत आहे. आणि ते माहीत असल्यामुळेच, रामाच्या हातून मरण मिळाल्यावर मी परम पदाला जाईन, असा विचार करून मी सीतेला वनातून बळजबरीने हरण करून आणले होते. हे प्रिये, आता तुला सोडून मी अन्य राक्षसांसह या संसारातून निघून जाईन. (५५-५८) परानन्दमयी शुद्धा सेव्यते या मुमुक्षुभिः । तां गतिं तु गमिष्यामि हतो रामेण संयुगे ॥ ५९ ॥ मुमुक्षु लोक परमानंदमय आणि शुद्ध अशा गतीचे सेवन करतात, तीच गती युद्धात रामांनी ठार केल्यावर मला मिळेल. (५९) प्रक्षाल्य कल्मषाणीह मुक्तिं यास्यामि दुर्लभाम् ॥ ६० ॥ आपली पापे धुऊन टाकून मी दुर्लभ अशा मुक्तीला पोहोचेन. (६०) क्लेशादिपञ्चतरङ्गयुतं भ्रमाढ्यं दारात्मजाप्तधनबन्धुझषाभियुक्तम् । और्वानलाभनिजरोषमनङ्गजालं संसारसागरमतीत्य हरिं व्रजामि ॥ ६१ ॥ ज्यामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पाच क्लेशरूपी तरंग उठत आहेत, जो भ्रमरूपी भोवऱ्यांनी भरलेला आहे, ज्यात पत्नी, पुत्र, आप्त, धन, बंधू हेच मस्त्य इत्यादी जलचर आहेत, ज्यामध्ये स्वतःचा क्रोध हाच वडवानल आहे आणि ज्यात मदनरूपी जाळे पसरलेले आहे, असा संसारसागर ओलांडून मी हरीकडे जाईन." (६१) इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे दशमः सर्गः ॥ १० ॥ इति श्रीमद्अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे दशमः सर्गः ॥ १० ॥ |