श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकविंशत्यधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामस्यायोध्यायां गन्तुं उद्यमनं तदाज्ञया विभीषणेन पुष्पकस्यानयनं च -
श्रीरामांचे अयोध्येला जाण्यास उद्यत होणे आणि त्यांच्या आज्ञेने विभीषणाने पुष्पक विमान मागविणे -
तां रात्रिमुषितं रामं सुखोत्थितमरिन्दमम् ।
अब्रवीत् प्राञ्जलिर्वाक्यं जयं पृष्ट्‍वा विभीषणः ॥ १ ॥
त्या रात्री विश्राम करून जेव्हा शत्रुसूदन श्रीराम दुसरे दिवशी प्रातःकाळी सुखपूर्वक उठले तेव्हा कुशल प्रश्नानंतर विभीषणाने हात जोडून त्यांना म्हटले - ॥१॥
स्नानानि चाङ्‌गरागाणि वस्त्राण्याभरणानि च ।
चन्दनानि च माल्यानि दिव्यानि विविधानि च ॥ २ ॥
रघुनंदन ! स्नानासाठी जल, अङ्‌गराग, वस्त्रे, आभूषणे, चंदन आणि नाना प्रकारच्या दिव्य माळा आपल्या सेवेमध्ये उपस्थित आहेत. ॥२॥
अलङ्‌कारविदश्चैता नार्यः पद्मनिभेक्षणाः ।
उपस्थितास्त्वां विधिवत् स्नापयिष्यन्ति राघव ॥ ३ ॥
हे राघव ! शृङ्‌गारकला जाणणार्‍या ह्या कमलनयनी नारीही सेवेसाठी प्रस्तुत आहेत, ज्या आपल्याला विधिपूर्वक स्नान करवतील. ॥३॥
एवमुक्तस्तु काकुत्स्थः प्रत्युवाच विभीषमम् ।
हरीन् सुग्रीवमुख्यांस्त्वं स्नानेनोपनिमन्त्रय ॥ ४ ॥
विभीषणांनी असे म्हटल्यावर काकुत्स्थ रामांनी त्यांना म्हटले- मित्रा ! तुम्ही सुग्रीव आदि वानरवीरांना स्नानासाठी अनुरोध करा. ॥४॥
स तु ताम्यति धर्मात्मा मम हेतोः सुखोचितः ।
सुकुमारो महाबाहुः भरतः सत्यसंश्रयः ॥ ५ ॥
माझ्यासाठी तर या समयी सत्याचा आश्रय घेणारे धर्मात्मा महाबाहु भरत फार कष्ट सहन करीत आहेत. ते सुकुमार आहेत आणि सुख प्राप्त करण्यास योग्य आहेत. ॥५॥
तं विना केकयीपुत्रं भरतं धर्मचारिणम् ।
न मे स्नानं बहु मतं वस्त्राण्याभरणानि च ॥ ६ ॥
त्या धर्मपरायण कैकेयीपुत्र भरतांना भेटल्याशिवाय मला स्नान करणे, वस्त्रे, आभूषणे धारण करणे आदि काहीच चांगले वाटत नाही. ॥६॥
एतत् पश्य यथा क्षिप्रं प्रतिगच्छामि तां पुरीम् ।
अयोध्यां गच्छतो ह्येष पन्थाः परमदुर्गमः ॥ ७ ॥
आता तर आपण इकडे लक्ष द्यावे की आम्ही लवकरात लवकर अयोध्यापुरीला कसे परत जाऊ शकू; कारण की तेथपर्यंत पायी यात्रा करणारांसाठी हा मार्ग फारच दुर्गम आहे. ॥७॥
एवमुक्तस्तु काकुत्स्थं प्रत्युवाच विभीषणः ।
अह्ना त्वां प्रापयिष्यामि तां पुरीं पार्थिवात्मज ॥ ८ ॥
त्यांनी असे म्हटल्यावर विभीषणांनी काकुत्स्थ श्रीरामांना याप्रकारे उत्तर दिले - राजकुमार ! आपण यासाठी चिंतित होऊ नये. मी एकाच दिवसात आपल्याला त्या पुरीमध्ये पोहोचवून देईन. ॥८॥
पुष्पकं नाम भद्रं ते विमानं सूर्यसन्निभम् ।
मम भ्रातुः कुबेरस्य रावणेन बलीयसा ॥ ९ ॥

हृतं निर्जित्य सङ्‌ग्रामे कामगं दिव्यमुत्तमम् ।
त्वदर्थे पालितं चेदं त्तिष्ठत्यतुलविक्रम ॥ १० ॥
आपले कल्याण होवो ! माझ्याकडे माझे मोठे भाऊ कुबेर यांचे सूर्यतुल्य तेजस्वी पुष्पकविमान विद्यमान आहे, जे महाबली रावणाने संग्रामात कुबेरांना हरवून बळकावले होते. अतुल पराक्रमी श्रीरामा ! ते इच्छेनुसार गमन करणारे, दिव्य आणि उत्तम विमान मी आपल्यासाठीच येथे ठेवले आहे. ॥९-१०॥
तदिदं मेघसङ्‌काशं विमानमिह तिष्ठति ।
तेन यास्यसि यानेन त्वमयोध्यां गतज्वरः ॥ ११ ॥
मेघाप्रमाणे दिसणारे ते दिव्य विमान येथे विद्यमान आहे. ज्याच्या द्वारा निश्चिंत होऊन आपण अयोध्यापुरीला जाऊ शकाल. ॥११॥
अहं ते यद्यनुग्राह्यो यदि स्मरसि मे गुणान्
वस तावदिह प्राज्ञ यद्यस्ति मयि सौहृदभ् ॥ १२ ॥

लक्ष्मणेन सह भ्रात्रा वैदेह्या भार्यया सह ।
अर्चितः सर्वकामैस्त्वं ततो राम गमिष्यसि ॥ १३ ॥
श्रीराम ! जर आपण मला कृपापात्र समजत असाल, माझ्यांत आपल्याला काही गुण दिसत असतील आणि माझ्या प्रति आपले सौहार्द्र असेल तर भाऊ लक्ष्मण तसेच पत्‍नी सीता यांच्यासह आपण कांही दिवस येथे विराजमान व्हावे. मी संपूर्ण मनोवाञ्छित वस्तुंच्या द्वारा आपला सत्कार करीन. माझा तो सत्कार ग्रहण केल्यानंतर आपण अयोध्येला गमन करावे. ॥१२-१३॥
प्रीतियुक्तस्य विहितां ससैन्यः ससुहृद्गणः ।
सत्क्रियां राम मे तावद् गृहाण त्वं मयोद्यताम् ॥ १४ ॥
रामा ! मी प्रसन्नतापूर्वक आपला सत्कार करू इच्छितो. माझ्या द्वारा प्रस्तुत केल्या जाणार्‍या त्या सत्काराला आपण सुहृदांसह आणि सेनांच्यासह ग्रहण करावे. ॥१४॥
प्रणयाद् बहुमानाच्च सौहार्देन च राघव ।
प्रसादयामि प्रेष्योऽहं न खल्वाज्ञापयामि ते ॥ १५ ॥
हे राघवा ! मी केवळ प्रेम, सम्मान आणि सौहार्द्र यामुळेच आपल्यालाही प्रार्थना करीत आहे. आपल्याला मी प्रसन्न करू इच्छितो. मी आपला सेवक आहे. म्हणून आपल्याला विनंति करीत आहे, आपल्याला आज्ञा देत नाही. ॥१५॥
एवमुक्तस्ततो रामः प्रत्युवाच विभीषणम् ।
रक्षसां वानराणां च सर्वेषामेव शृण्वताम् ॥ १६ ॥
जेव्हा विभीषण असे म्हणाले तेव्हा श्रीराम समस्त राक्षस आणि वानर ऐकत असतांनाच त्यांना म्हणाले - ॥१६॥
पूजितोऽस्मि त्वया वीर साचिव्येन परेण च ।
सर्वात्मना च चेष्टाभिः सौहार्देन परेण च ॥ १७ ॥
वीरा ! माझा परम सुहृद आणि उत्तम सचिव बनून तू सर्व प्रकारच्या क्रियांच्या द्वारे माझा सम्मान आणि पूजन केले आहेस. ॥१७॥
न खल्वेतन्न कुर्यां ते वचनं राक्षसेश्वर ।
तं तु मे भ्रातरं द्रष्टुं भरतं त्वरते मनः ॥ १८ ॥

मां निवर्तयितुं योऽसौ चित्रकूटमुपागतः ।
शिरसा याचतो यस्य वचनं न कृतं मया ॥ १९ ॥
राक्षसेश्वरा ! तुझी ही विनंती निश्चितच मी अस्वीकार करू शकत नाही परंतु या समयी माझे मन माझा भाऊ भरत याला पहाण्यासाठी उतावीळ झालेले आहे. जो मला परत नेण्यासाठी चित्रकूट येथे आला होता आणि माझ्या चरणी मस्तक नमवून याचना करूनही मी त्याचे म्हणणे मान्य केले नव्हते. ॥१८-१९॥
कौसल्यां च सुमित्रां च कैकेयीं च यशस्विनीम् ।
गुहं च सुहृदं चैव पौराञ्जानपदैः सह ॥ २० ॥
त्यांच्या शिवाय माता कौसल्या, सुमित्रा, यशस्विनी माता कैकेयी, मित्रवर गुह आणि नगर आणि जनपदातील लोकांना पहाण्यासाठीही मला फार उत्कण्ठा वाटत आहे. ॥२०॥
अनुजानीहि मां सौम्य पूजितोऽस्मि विभीषणः ।
मन्युर्न खलु कर्तव्यः सखे त्वां चानुमानये ॥ २१ ॥
सौम्य विभीषणा ! आता तर तुम्ही मला जाण्याचीच अनुमति द्यावी. मी तुमच्या द्वारा खूप सम्मानित होऊन चुकलो आहे. सख्या ! माझ्या या हट्‍टामुळे माझ्यावर क्रोध करू नको. यासाठी मी तुझी वारंवार प्रार्थना करीत आहे. ॥२१॥
उपस्थापय मे शीघ्रं विमानं राक्षसेश्वर ।
कृतकार्यस्य मे वासः कथं स्यादिह सम्मतः ॥ २२ ॥
राक्षसराज ! आता शीघ्र माझ्यासाठी पुष्पकविमानाला येथे मागवून घ्या. जर येथे माझे कार्य आता समाप्त झाले आहे तर येथे थांबून राहाणे माझ्यासाठी कसे योग्य होऊ शकेल ? ॥२२॥
एवमुक्तस्तु रामेण राक्षसेन्द्रो विभीषणः ।
विमानं सूर्यसंकाशं आजुहाव त्वरान्वितः ॥ २३ ॥
श्रीरामांनी असे म्हटल्यावर राक्षसराज विभीषणाने अत्यंत उतावळेपणाने त्या सूर्यतुल्य तेजस्वी विमानाचे आवाहन केले. ॥२३॥
ततः काञ्चनचित्राङ्‌गं वैदुउर्यमणिवेदिकम् ।
कूटागारैः परिक्षिप्तं सर्वतो रजतप्रभम् ॥ २४ ॥
त्या विमानाचे एकेक अंग सोन्यांनी जडविलेले होते ज्यायोगे त्याची विचित्र शोभा होत होती. त्याच्या आत वैडूर्य मणि (नीलम) च्या वेदी होत्या. जेथे तेथे गुप्त गृहे बनविलेली होती आणि ते सर्व बाजूनी चांदीप्रमाणे चमकत होते. ॥२४॥
पाण्डुराभिः पताकाभिः ध्वजैश्च समलङ्‌कृतम् ।
शोभितं काञ्चनैर्हर्म्यैः हेमपद्म विभूषितैः ॥ २५ ॥
ते श्वेत-पीत वर्णाच्या पताकांनी तसेच ध्वजांनी अलंकृत होते. त्यात सोन्याच्या कमळांनी सुसज्जित स्वर्णमयी अट्‍टालिका होत्या ज्या विमानाची शोभा वाढवित होत्या. ॥२५॥
प्रकीर्णं किङ्‌किणीजालैः मुक्तामणिगवाक्षकम् ।
घण्टाजालैः परिक्षिप्तं सर्वतो मधुरस्वनम् ॥ २६ ॥
सारे विमान लहान-लहान घंटिकांनी युक्त झालरीनी व्याप्त होते. त्यात मोती आणि मण्यांनी सजविलेल्या खिडक्या बसविलेल्या होत्या. सर्व बाजूस घंटा बांधल्या होत्या, ज्यांचा मधुर ध्वनी होत राहिला होता. ॥२६॥
तं मेरुशिखराकारं निर्मितं विश्वकर्मणा ।
बहुभिर्भूषितं हर्म्यैः मुक्तारजत शोभितैः ॥ २७ ॥
ते विश्वकर्म्याने बनविलेले विमान सुमेरू शिखरासमान ऊंच तसेच मोती आणि चांदीने सुसज्जित मोठ मोठ्‍या खोल्यांनी विभूषित होते. ॥२७॥
तलैः स्फाटिकचित्राङ्‌गैः वैदूर्यैश्च वरासनैः ।
महार्हास्तरणोपेतैः उपपन्नं महाधनैः ॥ २८ ॥
त्याची फरशी विचित्र स्फटिक मण्यांनी जडविलेली होती. त्यात नीलमचे बहूमूल्य सिंहासन होते, ज्यांच्यावर महामूल्यवान्‌ चादरी पसरलेल्या होत्या. ॥२८॥
उपस्थितमनाधृष्यं तद् विमानं मनोजवम् ।
निवेदयित्वा रामाय तस्थौ तत्र विभीषणः ॥ २९ ॥
त्याचा वेग मनासमान होता आणि त्याची गति कुठेही थांबत नव्हती. ते विमान सेवेमध्ये उपस्थित झाले. विभीषणांनी श्रीरामास त्याच्या येण्याची सूचना दिली आणि ते तेथे उभे राहिले. ॥२९॥
तत् पुष्पकं कामगमं विमानं
उपस्थितं भूधरसंनिकाशम् ।
दृष्ट्‍वा तदा विस्मयमाजगाम
रामः ससौमित्रिरुदारसत्त्वः ॥ ३० ॥
पर्वतासमान ऊंच आणि इच्छानुसार जाणारे ते पुष्पक विमान्‌ तात्काळ उपस्थित झालेले पाहून लक्ष्मणासहित उदारचित्त भगवान्‌ श्रीरामांना अत्यंत विस्मय वाटला. ॥३०॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकविंशत्यधिकशततमः सर्गः ॥ १२१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशे‌एकविसावा सर्ग पूरा झाला. ॥१२१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP