॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ युद्धकाण्ड ॥

॥ सप्तमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



कालनेमीचे कपट. हनुमानाकडून त्याचा वध, लक्ष्मण जिवंत होणे आणि रावणाने कुंभकर्णास जागे करणे


श्रीमहादेव उवाच ।
कालनेमि वचः श्रुत्वा रावाणोऽमृतसन्निभम् ।
जज्वाल क्रोधताम्राक्षः सर्पिरद्‌भिरिवाग्निमत् ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले-हे पार्वती, तापलेल्या तुपात पाणी पडल्यास जसे तडतडते, त्याप्रमाणे कालनेमीचे अमृततुल्य वचन ऐकल्यावर, रागाने डोळे लाल झालेला रावण जळफळू लागला. (१)

निहन्मि त्वां दुरात्मानं मच्छासनपराङ्‌मुखम् ।
परै किञ्चिद्‍गृहीत्वा त्वं भाषसे रामकिंकरः ॥ २ ॥
(तो म्हणाला,) "माझ्या आज्ञेच्या विरुद्ध वागणाऱ्या, दुष्टात्म्या, तुला मी आत्ताच ठार करीन. मला वाटते की शत्रूकडून काही तरी लाच घेऊन, रामाचा सेवक होऊन, तू अशा प्रकारे बोलत आहेस." (२)

कालनेमिरुवाचेदं रावणं देव किं क्रुधा ।
न रोचते मे वचनं यदि गत्वा करोमि तत् ॥ ३ ॥
तेव्हा कालनेमी रावणाला म्हणाला, "महाराज, रागावून काय उपयोग आहे ? जर तुम्हांला माझे वचन आवडले नसेल तर मी जाऊन, तुम्ही सांगाल ते करीन." (३)

इत्युक्‍त्वा प्रययौ शीघ्रं कालनेमिर्महासुरः ।
नोदितो रावणेनैव हनूमद्‌विघ्नकारणात् ॥ ४ ॥
असे सांगून, रावणाने पाठवलेला तो महासुर कालनेमी हनुमानाच्या कार्यात विघ्न आणण्याच्या हेतूने त्वरित तेधून निघाला. (४)

स गत्वा हिमवत्पार्श्वं तपोवनं अकल्पयत् ।
तत्र शिष्यैः परिवृतो मुनिवेषधरः खलः ॥ ५ ॥
गच्छतो मार्गमासाद्य वायुसूनोर्महात्मनः ।
ततो गत्वा ददर्शाथ हनूमानाश्रमं शुभम् ॥ ६ ॥
हिमालय पर्वताच्या एका बाजूवर जाऊन वायुपुत्र महात्म्या हनुमानाचा जाण्याचा मार्ग लक्षात घेऊन, त्याच्या वाटेत त्याने एक तपोवन तयार केले आणि तो दुष्ट राक्षस मुनीचा वेष धारण करून तेथे बसला. सभोवती शिष्य होते. तेधून जात असताना वाटेत हनुमानाला तो सुंदर आश्रम दिसून आला. (५-६)

चिन्तयामास मनसा श्रीमान् पवननन्दनः ।
पुरा न दृष्टमेतन्मे मुनिमण्डलमुत्तमम् ॥ ७ ॥
श्रीमान पवनसुत हनुमान मनात विचार करू लागला- 'हे उत्तम असे आश्रमस्थान मला पूर्वी दिसले नव्हते. (७)

मार्गो विभ्रंशितो वा मे भ्रमो वा चित्तसम्भवः ।
यद्वाविश्याश्रमपदं दृष्ट्वा मुनिमशेषतः ॥ ८ ॥
पीत्वा जलं ततो यामि द्रोणाचलमनुत्तमम् ।
इत्युक्‍त्वा प्रविवेशाथ सर्वतो योजनायतम् ॥ ९ ॥
आश्रमं कदलीशाल खर्जूर पनसादिभिः ।
समावृतं पक्वफलैः नम्रशाखैश्च पादपैः ॥ १० ॥
माझा मार्ग चुकला की काय ? की माझ्या मनांत काही भ्रम निर्माण झाला आहे ? हे कळत नाही. या आश्रमस्थानात प्रवेश करून, मुनींचे दर्शन घेऊन, आणि पाणी पिऊन मग मी अतिशय उत्तम अशा द्रोण पर्वताकडे जाईन.' असा विचार करून त्याने त्या आश्रमात प्रवेश केला. तो आश्रम लांबी रूंदीच्या सर्व बाजूंनी एक योजन विस्तृत होता. केळी, सागवान, खजूर, फणस इत्यादी पिकलेल्या फळांनी ज्यांच्या फांद्या वाकलेल्या होत्या, अशा वृक्षांनी तो संपन्न होता. (८-१०)

वैरभावविनिर्मुक्तं शुद्धं निर्मललक्षणम् ।
तस्मिन्महाश्रमे रम्ये कालनेमिः स राक्षसः ॥ ११ ॥
इन्द्रयोगं समास्थाय चकार शिवपूजनम् ।
हनूमानभिवाद्याह गौरवेण महासुरम् ॥ १२ ॥
तो आश्रम वैरभावनेने रहित असून पवित्र व निर्मळ होता. त्या रम्य अशा मोठ्या आश्रमात तो कालनेमि राक्षस इंद्रजाल विद्येचा आश्रय घेऊन शिवाचे पूजन करीत होता. हनुमानाने त्या महाराक्षसाला आदरपूर्वक वंदन केले आणि म्हटले. (११-१२)

भगवन् रामदूतोऽहं हनूमान्नाम नामतः ।
रामकार्येण महता क्षीराब्धिं गन्तुमुद्यतः ॥ १३ ॥
" हे भगवन, हनुमान नावाचा मी रामांचा दूत आहे. रामांचे एक महान कार्य करण्यास मी क्षीरसागराकडे जाण्यास निघालो आहे. (१३)

तृषा मां बाधते ब्रह्मन् उदकं कुत्र विद्यते ।
यथेच्छं पातुमिच्छामि कथ्यतां मे मुनीश्वर ॥ १४ ॥
हे भगवन्, तहानेने मी व्याकूळ झालो आहे. यथेच्छ पाणी पिण्याची माझी इच्छा आहे. हे मुनीश्वरा, मला सांग की पाणी कुठे आहे " (१४)

तच्छ्रुत्वा मारुतेर्वाक्यं कालनेमिस्तमब्रवीत् ।
कमण्डलुगतं तोयं मम त्वं पातुमर्हसि ॥ १५ ॥
मारुतीचे हे वाक्य ऐकल्यावर कालनेमी त्याला म्हणाला, "माझ्या कमंडलूतील पाणी पिण्यास हरकत नाही. (१५)

भुङ्‌क्ष्व चेमानि पक्वानि फलानि तदनन्तरम् ।
निवसस्व सुखेनात्र निद्रामेहि त्वरास्तु मा ॥ १६ ॥
त्यानंतर ही पिकलेली फळे तू खा. येथे सुखाने राहा. थोडीशी झोप घे. फार घाई करू नकोस. (१६)

भूतं भव्यं भविष्यं च जानामि तपसा स्वयम् ।
उत्थितो लक्ष्मणः सर्वे वानरा रामवीक्षिताः ॥ १७ ॥
माझ्या स्वतःच्या तपोबलाने मी भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व काही जाणतो आणि आता मला कळले आहे की लक्ष्मण हा सावध होऊन उठला आहे आणि रामाच्या दृष्टिक्षेपामुळे सर्व वानरही जिवंत झाले आहेत." (१७)

तच्छ्रुत्वा हनुमानाह कमण्डलुजलेन मे ।
न शाम्यत्यधिका तृष्णा ततो दर्शय मे जलम् ॥ १८ ॥
ते ऐकून हनुमान म्हणाला, "मला फार तहान लागली आहे. ती कमंडलूतील पाण्याने शांत होणार नाही. तेव्हा तू मला जलाशय दाखव." (१८)

तथेत्याज्ञापयामास बटुं मायाविकल्पितम् ।
बटो दर्शय विस्तीर्णं वायुसूनोर्जलाशयम् ॥ १९ ॥
"ठीक आहे," असे म्हणून मायेने निर्माण केलेल्या बटूला कालनेमीने आज्ञा केली, 'अरे बटू, या वायुपुत्राला विस्तीर्ण जलाशय दाखव.' (१९)

निमील्य चाक्षिणी तोयं पीत्वागच्छ ममान्तिकम् ।
उपदेक्ष्यामि मे मंत्रं येन द्रक्ष्यसि चौषधीः ॥ २० ॥
(मग कालनेमी मारुतीला म्हणाला,) " अरे हनुमाना, डोळे मिटून तू पाणी पी आणि माझ्याजवळ ये. मी तुला एका मंत्राचा उपदेश करीन. त्यामुळे तुला औषधी दिसतील. " (२०)

तथेति दर्शितं शीघ्रं बटुना सलिलाशयम् ।
प्रविश्य हनुमांस्तोयं अपिबन्मिलितेक्षणः ॥ २१ ॥
"ठीक आहे," असे मारुती म्हणाला. मग बटूने मारुतीला जलाशय दाखविला. त्यात शिरून मारुती डोळे मिटून पाणी पिऊ लागला. (२१)

ततश्चागत्य मकरी महामाया महाकपिम् ।
अग्रसत्तं महवेगान् मारुतिं घोररूपिणी ॥ २२ ॥
तितक्यात महाभयंकर रूप असणारी महामाया अशी एक सुसर तेथे आली आणि ती मारूतीला अतिशय वेगाने गिळू लागली. (२२)

ततो ददर्श हनुमान् ग्रसन्तीं मकरीं रुषा ।
दारयामास हस्ताभ्यां वदनं सा ममार ह ॥ २३ ॥
तेव्हा डोळे उघडल्यावर मारुतीला दिसले की एक सुसर आपणास गिळत आहे. तेव्हा क्रोधाने मारुतीने आपल्या हातांनी तिचे तोंड फाडले. त्यामुळे ती तत्काळ मरून गेली. (२३)

ततोऽन्तरिक्षे ददृशे दिव्यरूपधराङ्‌गना ।
धान्यमालीति विख्याता हनूमन्तमथाब्रवीत् ॥ २४ ॥
तेव्हा आकाशात एक दिव्य रूप धारण करणारी स्त्री दिसू लागली. ती धान्यमाली या नावाने विख्यात होती. त्या वेळी ती हनूमंताला म्हणाली. (२४)

त्वत्प्रसादाद् अहं शापाद् विमुक्तास्मि कपेश्वर ।
शप्ताहं मुनिना पूर्वं अप्सराः कारणान्तरे ॥ २५ ॥
"हे वानरश्रेष्ठा, तुझ्या कृपेमुळे मी शापातून मुक्त झाले आहे. पूर्वी मी एक अप्सरा होते. काही कारणाने एका मुनीने शाप दिला होता म्हणून मी सुसर झाले होते. (२५)

आश्रमे यस्तु ते दृष्टः कालनेमिर्महासुरः ।
रावणप्रहितो मार्गे विघ्नं कर्तुं तवानघ ॥ २६ ॥
या आश्रमात जो मुनिवेष धारण केलेला पुरुष तू पाहिला आहेस, तो कालनेमी नावाचा महान असुर आहे. हे पुण्यशील वानरा, तुझ्या मार्गात विघ्न निर्माण करण्यास त्याला रावणाने पाठविलेला आहे. (२६)

मुनिवेषधरो नासौ मुनिर्विप्रविहिंसकः ।
जहि दुष्टं गच्छ शीघ्रं द्रोणाचलमनुत्तमम् ॥ २७ ॥
मुनीचा वेष धारण करणारा तो खरा मुनी नाही, तर तो ब्राह्मणांची हिंसा करणारा आहे. त्या दुष्टाचा वध कर आणि तू झटपट अतिउत्तम अशा द्रोण पर्वताकडे जा. (२७)

गच्छाम्यहं ब्रह्मलोकं त्वत्स्पर्शात् हतकल्मषा ।
इत्युक्‍त्वा सा ययौ स्वर्गं हनूमानप्यथाश्रमम् ॥ २८ ॥
तुझ्या स्पर्शाने माझी पापे नष्ट झाली आहेत. मी आता ब्रह्मलोकी जाईन," असे सांगून ती स्वर्गलोकी निघून गेली. मारुतीसुद्धा आश्रमाकडे परत गेला. (२८)

आगतं तं समालोक्य कालनेमिरभाषत ।
किं विलम्बेन महता तव वानरसत्तम ॥ २९ ॥
तो परत आलेला पाहून कालनेमी त्याला म्हणाला, "हे वानरश्रेष्ठा, इतका उशीर का ? (२९)

गृहाण मत्तो मंत्रांस्त्वं देहि मे गुरुदक्षिणाम् ।
इत्युक्तो हनुमान्मुष्टिं दृढं बद्‍ध्वाह राक्षसम् ॥ ३० ॥
तू माझ्याकडून त्वरित मंत्र घे आणि मला गुरुदक्षिणा दे." त्यानेअसे म्हटल्यावर, हनुमानानेआपली मूठ घट्ट आवळून त्या राक्षसाला म्हटले. (३०)

गृहाण दक्षिणामेतां इत्युक्‍त्वा निजघान तम् ।
विसृज्य मुनुवेषं स कालनेमिर्महासुरः ॥ ३१ ॥
युयुधे वायुपुत्रेण नाना मायाविधानतः ।
महामायिकदूतोऽसौ हनूमान्मायिनां रिपुः ॥ ३२ ॥
"घे ही दक्षिणा," असे बोलून त्याने एक मुष्टिप्रहार केला. तेव्हा मुनिवेष टाकून तो महासुर कालनेमी वायुपुत्राबरोबर नाना प्रकारच्या मायावी प्रकारांनी लढू लागला. परंतु हनुमान हा महामायेच्या स्वामींचा (रामांचा) दूत होता. शिवाय तो मायावी राक्षसांचा शत्रू होता. (३१-३२)

जघान मुष्टिना शीर्ष्णि भग्नमूर्धा ममार सः ।
ततः क्षीरनिधिं गत्वा दृष्ट्वा द्रोणं महागिरिम् ॥ ३३ ॥
अदृष्ट्वा चौषधीस्तत्र गिरिमुत्पाट्य सत्वरः ।
गृहीत्वा वायुवेगेन गत्वा रामस्य सन्निधिम् ॥ ३४ ॥
उवाच हनुमान् रामं आनीतोऽयं महागिरिः ।
यद्युक्तं कुरु देवेश विलम्बो नात्र युज्यते ॥ ३५ ॥
हनुमानाने कालनेमीच्या मस्तकावर बुक्की मारली. डोके फुटून तो कालनेमी मरण पावला. त्यानंतर क्षीरसागरी गेल्यावर त्याला द्रोण नावाचा महापर्वत दिसला. पण तेथे त्याला आवश्यक त्या औषधी दिसल्या नाहीत. तेव्हा त्याने तो पर्वत उपटून घेतला आणि तो वायुवेगाने सत्वर रामाजवळ पोचला आणि म्हणाला, "हे देवेश्वरा, हा महापर्वतच मी आणला आहे. जे योग्य असेल ते करा. या बाबतीत विलंब करणे योग्य नाही." (३३-३५)

श्रुत्वा हनूमतो वाक्यं रामः सन्तुष्टमानसः ।
गृहीत्वा चौषधीः शीघ्रं सुषेणेन महामतिः ॥ ३६ ॥
चिकित्सां कारयामास लक्ष्मणाय महात्मने ।
ततः सुप्तोत्थित इव बुद्‍ध्वा प्रोवाच लक्ष्मण ॥ ३७ ॥
हनुमंताचे वाक्य ऐकल्यावर, रामांचे मन संतुष्ट झाले. म ग त्या महाबुद्धिमान रामांनी सुषेणाकडून अट्दिशी औषधी तोडून घेतल्या आणि त्याच्याकडून महात्म्या लक्ष्मणावर उपचार करविला. तेव्हा झोपेतून उठलेल्या माणसाप्रमाणे जागे होऊन लक्ष्मण म्हणू लागला. (३६-३७)

तिष्ठ तिष्ठ क्व गन्तासि हन्मीदानीं दशानन ।
इति ब्रुवन्तमालोक्य मूर्ध्न्यवघ्राय राघवः ॥ ३८ ॥
मारुतिं प्राह वत्साद्य त्वत्प्रसादान्महाकपे ।
निरामयं प्रपश्यामि लक्ष्मणं भ्रातरं मम ॥ ३९ ॥
"अरे रावणा, थांब, थांब. जातोस कुठे ? मी आत्ताच तुला ठार करतो." असे बोलणाऱ्या लक्ष्मणाला पाहून राघवांनी त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले आणि मग त्यांनी मारुतीला म्हटले, "वत्सा, महावानरा, आज तुझ्याच कृपेमुळे लक्ष्मणाला मी सुखरूप पाहात आहे." (३८-३९)

इत्युक्‍त्वा वानरैः सार्धं सुग्रीवेण समन्वितः ।
विभीषणमतेनैव युद्धाय समवस्थितः ॥ ४० ॥
असे बोलून वानरासह सुग्रीवाला बरोबर घेऊन, बिभीषणाच्या संमतीनेच, श्रीराम पुनः युद्ध करण्यास सिद्ध झाले. (४०)

पाषाणैः पादपैश्चैव पर्वताग्रैश्च वानराः ।
युद्धायाभिमुखा भूत्वा ययुः सर्वे युयुत्सवः ॥ ४१ ॥
युद्ध करण्यासाठी ते सर्व वानर पाषाण, वृक्ष, आणि पर्वतशिखरे घेऊन, युद्धाभिमुख होऊन चालू लागले. (४ १)

रावणो विव्यथे राम बाणैर्विद्धो महासुरः ।
मातङ्‌ग इव सिंहेन गरुडेनेव पन्नगः ॥ ४२ ॥
इकडे, ज्याप्रमाणे सिंहाकडून हत्ती किंवा गरुडाकडून सर्प विद्ध होऊन व्याकूळ होतो, त्या प्रमाणे रामांच्या बाणांनी विद्ध झालेला महाराक्षस रावण हा अगदी व्याकूळ झालेला होता. (४२)

अभिभूतोऽगमद् राजा राघवेण महात्मना ।
सिंहासने समाविश्य राक्षसान् इदमब्रवीत् ॥ ४३ ॥
म्हणून महात्म्या राघवांकडून पराभूत झालेला राजा रावण लंकापुरीत परत गेला. ते थे आपल्या सिंहासनावर बसून तो राक्षसांना असे म्हणाला. (४३)

मानुषेणैव मे मृत्युं माह पूर्वं पितामहः ।
मानुषो हि न मां हन्तुं शक्तोऽस्ति भुवि कश्चन ॥ ४४ ॥
"माणसाकडूनच मला मृत्यू येईल, असे पूर्वी मला पितामह ब्रह्मदेवांनी सांगितले होते. परंतु जो मला ठार करण्यास समर्थ होईल असा या पृथ्वीवर कोणीही मनुष्य नाही. (४४)

ततो नारायणः साक्षात् मानुषोऽभून्न संशयः ।
रामो दाशरथिर्भूत्वा मां हन्तुं समुपस्थितः ॥ ४५ ॥
म्हणून साक्षात नारायणच मनुष्य झाला आहे. दशरथपुत्र राम होऊन तो माझा वध करण्यास आला आहे, यात संशय नाही." (४५)

अनरण्येन यत्पूर्वं शप्तोऽहं राक्षसेश्वर ।
उत्पत्स्यते च मद्वंशे परमात्मा सनातनः ॥ ४६ ॥
तेन त्वां पुत्रपौत्रैश्च बान्धवैश्च समन्वितः ।
हनिष्यसे न सन्देह इत्युक्‍त्वा मां दिवं गतः ॥ ४७ ॥
"पूर्वकाळी अनरण्याने मला जो शाप दिला होता की, 'राक्षसराज, माझ्या वंशात सनातन परमात्मा जन्माला येणार आहे आणि त्याच्याकडून तुझे पुत्र, पौत्र आणि बांधव यांच्यासह तू ठार मारला जाशील, यात संशय नाही, असे मला सांगून तो स्वर्गाला गेला होता.' (४६-४७)

स एव रामः संजातो मदर्थे मां हनिष्यति ।
कुम्भकर्णस्तु मूढात्मा सदा निद्रावशं गतः ॥ ४८ ॥
तोच हा राम मला ठार करण्यासाठी जन्माला आला आहे, आणि तो नक्कीच माझा वध करील. कुंभकर्ण हा तर मूर्ख असून तो नेहमीच झोपलेला असतो. (४८)

तं विबोध्य महासत्त्वं आनयन्तु ममान्तिकम् ।
इत्युक्तास्ते महाकायाः तूर्णं गत्वा तु यत्‍नतः ॥ ४९ ॥
विबोध्य कुम्भश्रवणं निन्यू रावणसन्निधिम् ।
नमस्कृत्य स राजानं आसनोपरि संस्थितः ॥ ५० ॥
त्या महापराक्रमी कुंभकर्णाला जागे करून तुम्ही त्याला माझ्याजवळ घेऊन या." रावणाने असे सांगताच, ते प्रचंड देहाचे राक्षस त्वरेने गेले आणि फार प्रयत्नांनी कुंभकर्णाला जागे करून, त्यांनी रावणाजवळ नेले. रावण राजाला नमस्कार करून तो एका आसनावर बसला. (४९-५०)

तमाह रावणो राजा भ्रातरं दीनया गिरा ।
कुम्भकर्ण निबोध त्वं महत्कष्टमुपस्थितम् ॥ ५१ ॥
राजा रावण त्या भावाला दीनवाणीने म्हणाला, "हे कुंभकर्णा, माझ्यावर फार मोठे संकट कोसळले आहे, हे तू जाणून घे व त्याचा विचार कर. (५१)

रामेण निहताः शूराः पुत्राः प्रौत्राश्च बान्धवाः ।
किं कर्तव्यमिदानीं मे मृत्युकाल उपस्थिते ॥ ५२ ॥
माझे शूर असे पुत्र, पौत्र आणि बांधव यांना रामाने ठार केले आहे. आता माझा मृत्युकाळ जवळ आला. मी आता काय करू ? (५२)

एष दाशरथी रामः सुग्रीवसहितो बली ।
समुद्रं सबलस्तीर्त्वा मूलं नः परिकृन्तति ॥ ५३ ॥
हा बलवान दशरथपुत्र राम सुग्रीवासहित आपले सैन्य घेऊन, समुद्र ओलांडून, इकडे आला आहे. आणि तो आमचा समूळ नाश करील. (५३)

ये राक्षसा मुख्यतमाः ते हता वानरैर्युधि ।
वानराणां क्षयं युद्धे न पश्यामि कदाचन ॥ ५४ ॥
आमच्याकडील जे मुख्य मुख्य राक्षस होते, ते सगळे युद्धामध्ये वानरांकडून मारले गेले आहेत. परंतु या युद्धात वानरांचा नाश झाल्याचे मात्र मला कधीच दिसून आलेले नाही. (५४)

नाशयस्व महाबाहो यदर्थं परिबोधितः ।
भ्रातुरर्थे महासत्त्व कुरु कर्म सुदुष्करम् ॥ ५५ ॥
हे महाबाहो कुंभकर्णा, तू यांचा नाश कर. त्या साठीच मी तुला झोपेतून जागे केले आहे. हे महासामर्थ्यसंपन्न कुंभकर्णा, आपल्या भावासाठी हे अतिशय दुष्कर असे कार्य तू कर." (५५)

श्रुत्वा तद् रावणेन्द्रस्य वचनं परिदेवितम् ।
कुम्भकर्णो जहासोच्चैः वचनं चेदमब्रवीत् ॥ ५६ ॥
राजा रावणाचे ते दुःखपूर्ण शब्द ऐकल्यावर, कुंभकर्ण मोठमोठ्यांदा हसला आणि म्हणाला. (५६)

पुरा मंत्रविचारे ते गदितं यन्मया नृप ।
तदद्य त्वामुपगतं फलं पापस्य कर्मणः ॥ ५७ ॥
"हे राजा, पूर्वी विचार-विनिमय करीत असताना, मी जे काही तुला सांगितले होते, तेच तुझ्या पापकर्माचे फळ आज तुझ्याजवळ आले आहे. (५७)

पूर्वमेव मया प्रोक्तो रामो नारायणः परः ।
सीता च योगमायेति बोधितोऽपि न बुध्यसे ॥ ५८ ॥
मी पूर्वीच तुला सांगितले होते की राम हा साक्षात परमात्मा नारायण आहे आणि सीता ही योगमाया आहे. त्या वेळी मी तुला असा बोध केला असूनसुद्धा तू ते लक्षात घेतले नाहीस. (५८)

एकदाहं वने सानौ विशालायां स्थितो निशि ।
दृष्टो मया मुनिः साक्षात् नारदो दिव्यदर्शनः ॥ ५९ ॥
एकदा मी रात्रीच्या वेळी एका वनामध्ये एका विशाल पर्वतशिखरावरील शिलेवर बसलो होतो. तेथे दिव्यदृष्टी असणारे साक्षात नारद मुनी मला भेटले होते. (५९)

तमब्रवं महाभाग कुतो गन्तासि मे वद ।
इत्युक्तो नारदः प्राह देवानां मंत्रणे स्थितः ॥ ६० ॥
मी त्यांना म्हटले, 'अहो महाभाग, तुम्ही कोढून आलात, ते मला सांगा.' मी असे विचारल्यावर नारद म्हणाले, 'जेथे देवांचा गुप्त विचार-विनिमय चालला होता, तेथे मी होतो. (६०)

तत्रोत्पन्नमुदन्तं ते वक्ष्यामि शृणु तत्त्वतः ।
युवाभ्यां पीडिता देवाः सर्वे विष्णुमुपागताः ॥ ६१ ॥
तेथे जो वृत्तांत घडला तो मी तुला खराखुरा सांगतो, ऐक. तुम्हा दोघांकडून (म्हणजे रावण व कुंभकर्ण या दोघांकडून) त्रस्त झालेले सर्व देव विष्णूकडे गेले होते. (६१)

ऊचुस्ते देवदेवेशं स्तुत्वा भक्त्या समाहिताः ।
जहि रावणमक्षोभ्यं देव त्रैलोक्यकण्टकम् ॥ ६२ ॥
त्या देवदेवेश्वरांची एकाग्र भक्तीने स्तुती करून ते त्यांना म्हणाले, 'हे देवा, तिन्ही लोकांचा शत्रू आणि अजिंक्य अशा रावणाचा वध करा. (६२)

मानुषेण मृतिस्तस्य कल्पिता ब्रह्मणा पुरा ।
अतस्त्वं मानुषो भूत्वा जहि रावणकण्टकम् ॥ ६३ ॥
माणसाच्या हातून त्या रावणाला मरण येणार आहे, असे ब्रह्मदेवांनी पूर्वीच ठरवून दिले आहे. म्हणून तुम्ही माणूस होऊन रावणरूपी शत्रूंचा नाश करा.' (६३)

तथेत्याह महाविष्णुः सत्यसङ्‌कल्प ईश्वरः ।
जातो रघुकुले देवो राम इत्यभिविश्रुतः ॥ ६४ ॥
'ठीक आहे' असे सत्य संकल्प असणारे ईश्वर महाविष्णू म्हणाले. तेच देव आता रघूकुळात जन्म घेऊन राम या नावाने विख्यात झाले आहेत. (६४)

स हनिष्यति वः सर्वान् इत्युक्त्वा प्रययौ मुनिः ।
अतो जानीहि रामं त्वं परं ब्रह्म सनातनम् ॥ ६५ ॥
तुम्हां सर्वांचा ते वध करतील.' असे सांगून नारद मुनी निघून गेले. म्हणून हे रावणा, राम हे सनातन परब्रह्म आहेत, हे लक्षात घे. (६५)

त्यज वैरं भजस्वाद्य मायामानुषविग्रहम् ।
भजतो भक्तिभावेन प्रसीदति रघूत्तमः ॥ ६६ ॥
म्हणून रामांबरोबरचे वैर सोडून दे. मायेने मनुष्य देह धारण केलेल्या रामांची आता तू भक्ती कर. भक्तिभावाने भजणाऱ्या पुरुषावर रघूत्तम प्रसन्न होतात. (६६)

भक्तिर्जनित्री ज्ञानस्य भक्तिर्मोक्षप्रदायिनी ।
भक्तिहीनेन यत्किञ्चित् कृतं सर्वं असत्समम् ॥ ६७ ॥
भक्ती ही ज्ञानाची जननी आहे. भक्ती ही मोक्ष देणारी आहे. भक्तिरहित माणसाने जे काही केलेले असते, ते सर्व न केल्यातच जमा होते. (६७)

अवताराः सुबहवो विष्णोर्लीलानुकारिणः ।
तेषां सहस्रसदृशो रामो ज्ञानमयः शिवः ॥ ६८ ॥
विष्णूंनी आत्तापर्यंत पुष्कळ अवतार घेतले आहेत. आणि तदनुरूप त्यांनी अनेक लीला केल्या आहेत. अशा हजारो अवतारासमान हे ज्ञानस्वरूप आणि कल्याणकारक राम आहेत. (६८)

रामं भजन्ति निपुणा मनसा वचसानिशम् ।
अनायासेन संसारं तीर्त्वा यान्ति हरेः पदम् ॥ ६९ ॥
भक्तीमध्ये निपुण असणारे जे लोक मनाने आणि वाचेने रात्रंदिवस रामांचे भजन करतात, ते विनासायास संसार-सागर तरून जाऊन हरीचे पदी पोचतात. (६९)

ये राममेव सततं भुवि शुद्धसत्त्वा
    ध्यायन्ति तस्य चरितानि पठन्ति सन्तः ।
मुक्तास्त एव भवभोगमहाहिपाशैः
    सीतापते पदमनन्तसुखं प्रयान्ति ॥ ७० ॥
शुद्ध चित्त असणारे जे साधू पुरुष या जगात सतत रामाचेच ध्यान करतात आणि त्या रामांची चरित्रे पठण करतात, तेच संसारातील भोगरूपी महासर्पाचे पाशांतून मुक्त होतात आणि शेवटी सीतापती रामांच्या अनंत सुखाने युक्त असणाऱ्या स्थानी जाऊन पोचतात. (७०)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
युद्धकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥
इति श्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥


GO TOP