[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ एकचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
मारीचेन रावणस्य विनाशभयं प्रदर्श्य पुनः प्रतिबोधनम् - मारीचाचे रावणाला विनाशाचे भय दाखवून पुन्हां समजाविणे -
आज्ञप्तो रावणेनेत्थं प्रतिकूलं च राजवत् ।
अब्रवीत् परुषं वाक्यं निःशङ्‌को राक्षसाधिपम् ॥ १ ॥
रावणाने ज्यावेळी राजा प्रमाणे त्याला अशी प्रतिकूल आज्ञा दिली तेव्हा मारीचाने निशंक होऊन त्या राक्षस राजास कठोर वाणीने म्हटले - ॥१॥
केनायमुपदिष्टस्ते विनाशः पापकर्मणा ।
सपुत्रस्य सराज्यस्य सामात्यस्य निशाचर ॥ २ ॥
निशाचरा ! कुठल्या पाप्याने तुम्हांला पुत्र, राज्य आणि मंत्र्यांसहित तुमच्या विनाशाचा हा मार्ग दाखविला आहे ? ॥२॥
कस्त्वया सुखिना राजन् नाभिनन्दति पापकृत् ।
केनेदमुपदिष्टं ते मुत्युद्वारमुपायतः ॥ ३ ॥
राजन ! कोण असा पापाचारी आहे की जो तुम्हांला सुखी पाहून प्रसन्न होत नाही आहे ? कुणी तुम्हांला युक्तीने मृत्युच्या द्वारावर जाण्याचा हा सल्ला दिला आहे ? ॥३॥
शत्रवस्तव सुव्यक्तं हीनवीर्या निशाचराः ।
इच्छन्ति त्वां विनश्यन्तमुपरुद्धं बलीयसा ॥ ४ ॥
निशाचरा ! आज ही गोष्ट स्पष्ट रूपाने कळून येत आहे की तुमचा दुर्बल शत्रु तुम्हांला कुणा बलवानाशीं भिडावयास लावून नष्ट झालेले पाहू इच्छित आहे. ॥४॥
केनेदमुपदिष्टं ते क्षुद्रेणाहितबुद्धिना ।
यस्त्वामिच्छति नश्यन्तं स्वकृतेन निशाचर ॥ ५ ॥
राक्षसराज ! तुमच्या अहिताचा विचार बाळगणार्‍या कुणा नीचाने तुम्हाला हे पाप करण्याचा उपदेश केला आहे ? असे वाटते आहे की तो तुम्हांला स्वतःच्याच कुकर्माने नष्ट होतांना पाहू इच्छित आहे. ॥५॥
वध्याः खलु न वध्यन्ते सचिवास्तव रावण ।
ये त्वामुत्पथमारुढं न निगृह्णन्ति सर्वशः ॥ ६ ॥
रावणा ! निश्चितच कुमार्गावर आरूढ होणार्‍या तुमच्यासारख्या राजाला जे रोखून धरीत नाहीत ते तुमचे मंत्री वध करण्यास योग्य आहेत, परंतु तुम्ही त्यांचा वध करीत नाही. ॥६॥
अमात्यैः कामवृत्तो हि राजा कापथमाश्रितः ।
निग्राह्यः सर्वथा सद्‌भिः न निग्राह्यो न गृह्यसे ॥ ७ ॥
उत्तम मंत्र्यांचे हे कर्तव्य आहे की जो राजा स्वेच्छाचारी होऊन कुमार्गावर चालू लागेल, त्याला सर्व प्रकारे त्यांनी रोखून धरले पाहिजे. तुम्ही सुद्धा रोखून धरण्या योग्यच आहात आणि तरीही ते मंत्री तुम्हांला अडवीत नाहीत. ॥७॥
धर्ममर्थं च कामं च यशश्च जयतां वर ।
स्वामिप्रसादात् सचिवाः प्राप्नुवन्ति निशाचर ॥ ८ ॥
विजयी वीरात श्रेष्ठ निशाचरा ! मंत्री आपल्या स्वामी राजाच्या कृपेनेंच धर्म, अर्थ, काम आणि यश मिळवितात. ॥८॥
विपर्यये तु तत्सर्वं व्यर्थं भवति रावण ।
व्यसनं स्वामिवैगुण्यात् प्राप्नुवन्तीतरे जनाः ॥ ९ ॥
रावणा ! जर स्वामीची कृपा प्राप्त झाली नाही तर सर्व व्यर्थ होऊन जाते. राजाच्या दोषामुळे दुसर्‍या लोकांनाही कष्ट भोगावे लागतात. ॥९॥
राजमूलो हि धर्मश्च यशश्च जयतां वर ।
तस्मात् सर्वास्ववस्थासु रक्षितव्या नराधिपाः ॥ १० ॥
विजयीशीलात श्रेष्ठ राक्षसराज ! धर्म आणि यशाच्या प्राप्तिचे मूळ कारण राजाच आहे, म्हणून सर्व अवस्थांमध्ये राजाचे रक्षण केले पाहिजे. ॥१०॥
राज्यं पालयितुं शक्यं न तीक्ष्णेन निशाचर ।
न चातिप्रतिकूलेन नाविनीतेन राक्षस ॥ ११ ॥
हे निशाचरा ! ज्याचा स्वभाव अत्यंत तिखट (तीक्ष्ण) असेल, जो जनतेच्या प्रतिकूल वागणारा असेल आणि उद्दण्ड असेल अशा राजाकडून राज्याचे रक्षण होऊ शकत नाही. ॥११॥
ये तीक्ष्णमन्त्राः सचिवा भुज्यन्ते सह तेन वै ।
विषमेषु रथाः शीघ्रं मन्दसारथयो यथा ॥ १२ ॥
ज्याप्रमाणे ज्यांचे सारथी मूर्ख असतील असे रथ उंच-सखल भूमीमध्ये गेले असता त्या सारथ्याच्या बरोबरच संकटात पडतात त्याप्रमाणे जे मंत्री तीक्ष्ण उपायांचा उपदेश करतात ते आपला सल्ला मानणार्‍या त्या राजासहच दुःख भोगतात. ॥१२॥
बहवः साधवो लोके युक्तधर्ममनुष्ठिताः ।
परेषामपराधेन विनष्टाः सपरिच्छदाः ॥ १३ ॥
उपर्युक्त धर्माचे अनुष्ठान करणारे बरेचसे साधुपुरुष या जगतात दुसर्‍यांच्या अपराधाने परिवारासहित नष्ट होऊन गेले आहेत. ॥१३॥
स्वामिना प्रतिकूलेन प्रजास्तीक्ष्णेन रावण ।
रक्ष्यमाणा न वर्धन्ते मेषा गोमायुना यथा ॥ १४ ॥
रावणा ! ज्याप्रमाणे कोल्हा अथवा लांडगा यांच्या द्वारे पालित मेष वृद्धिला प्राप्त होत नाहीत त्याप्रमाणे प्रतिकूल वर्तन करणार्‍या आणि तीक्ष्ण स्वभावाच्या राजाच्या द्वारा रक्षित प्रजा वृद्धिला प्राप्त होत नाही. ॥१४॥
अवश्यं विनशिष्यन्ति सर्वे रावण राक्षसाः ।
येषां त्वं कर्कशो राजा दुर्बुद्धिरजितेन्द्रियः ॥ १५ ॥
रावणा ! ज्यांचा तू क्रूर, दुर्बुद्धि आणि अजितेन्द्रिय राजा आहेस ते सर्व राक्षस निश्चितच नष्ट होऊन जातील. ॥१५॥
तदिदं काकतालीयं घोरमासादितं मया ।
अत्रैव शोचनीयोऽसि ससैन्यो विनशिष्यसि ॥ १६ ॥
काकतालीय न्यायास अनुसरून मला तुझ्याकडून अकस्मातच हे दुःख प्राप्त झाले आहे. या विषयात मला तूच शोक करण्यास योग्य दिसत आहेस कारण की सेनेसहित तुझा नाश होऊन जाईल. ॥१६॥
मां निहत्य तु रामोऽसावचिरात् त्वां वधिष्यति ।
अनेन कृतकृत्योऽस्मि म्रिये चाप्यरिणा हतः ॥ १७ ॥
श्रीरामचंद्र मला मारून तुझाही लवकरच वध करून टाकतील. जर दोन्ही तर्‍हेने माझा मृत्यु निश्चित आहे तर श्रीरामांच्या हातांनी येणारा जो हा मृत्यु आहे तो मिळताच मी कृतकृत्य होऊन जाईन, कारण की शत्रुच्या द्वारा युद्धात मारला जाऊन मी प्राणत्याग करीन. (तुझ्या सारख्या राजाच्या हातून बलपूर्वक प्राणदण्ड मिळण्याचे कष्ट मी भोगणार नाही.) ॥१७॥
दर्शनादेव रामस्य हतं मामवधारय ।
आत्मानं च हतं विद्धि हृत्वा सीतां सबान्धवम् ॥ १८ ॥
राजन ! हे निश्चितच समजा की श्रीरामांच्या समोर जाऊन त्यांची दृष्टी पडताच मी मारला जाईन आणि जर तुम्ही सीतेचे हरण केलेत तर तुम्ही स्वतःला बंधु-बांधवांसह मारले गेलेलेच समजा. ॥१८॥
आनयिष्यसि चेत् सीतामाश्रमात् सहितो मया ।
नैव त्वमपि नाहं वै नैव लङ्‌का न राक्षसाः ॥ १९ ॥
जर तुम्ही माझ्यासह जाऊन श्रीरामांच्या आश्रमांतून सीतेचे अपहरण कराल तर तुम्ही जिवंत राहाणार नाही आणि मीही जिवंत राहणार नाही. लंकापुरी ही राहणार नाही आणि तेथील निवासी राक्षसही राहणार नाहीत. ॥१९॥
निवार्यमाणस्तु मया हितैषिणा
न मृष्यसे वाक्यमिदं निशाचर ।
परेतकल्पा हि गतायुषो नरा
हितं न गृह्णन्ति सुहृद्‌भिरीरितम् ॥ २० ॥
निशाचरा ! मी तुझा हितैषी आहे म्हणून तुला पापकर्मापासून अडवीत आहे. परंतु तुला माझी गोष्ट (सल्ला) सहन होत नाही आहे. हे सत्यच आहे की ज्यांचे आयुष्य समाप्त होत आलेले असते ते मरणासन्न पुरुष आपल्या सुहृदांनी सांगितलेल्या हितकर गोष्टी स्वीकारत नाहीत. ॥२०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे एकचत्वारिंशः सर्गः ॥ ४१ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा एकेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP