रावणं सीतां स्वान्तःपुरं दर्शयित्वा त्वं मे भार्या भवेति प्रैरयत् -
|
रावणाचे सीतेला आपल्या अंतःपुराचे दर्शन करविणे आणि आपली भार्या बनण्यासाठी समजाविणे -
|
संदिश्य राक्षसान् घोरान् रावणोऽष्टौ महाबलान् ।
आत्मानं बुद्धिवैक्लव्यात् कृत्कृतकृत्यममन्यत ॥ १ ॥
|
याप्रमाणे आठ महाबलाढ्य भयंकर राक्षसांना जनस्थानात जाण्याची आज्ञा देऊन रावणाने आपल्या विपरित बुद्धिमुळे आपल्याला कृतकृत्य मानले. ॥१॥
|
स चिन्तयानो वैदेहीं कामबाणैः प्रपीडितः ।
प्रविवेश गृहं रम्यं सीतां द्रष्टुमभित्वरन् ॥ २ ॥
|
तो वैदेही सीतेचे स्मरण करून कामाच्या बाणांनी अत्यंत पीडित होऊ लागला म्हणून तिला पहाण्यासाठी त्याने अत्यंत उतावळेपणाने आपल्या रमणीय अंतःपुरात प्रवेश केला. ॥२॥
|
स प्रविश्य तु तद्वेश्म रावणो राक्षसाधिपः ।
अपश्यद् राक्षसीमध्ये सीतां दुःखपरायणाम् ॥ ३ ॥
अश्रुपूर्णमुखीं दीनां शोकभारावपीडिताम् ।
वायुवेगैरिवाक्रान्तां मज्जन्तीं नावमर्णवे ॥ ४ ॥
मृगयूथपरिभ्रष्टां मृगीं श्वभिरिवावृताम् ।
|
त्या भवनात प्रवेश करून राक्षसांचा राजा रावणाने पाहिले की सीता राक्षसीणींच्या मध्ये बसून दुःखात बुडून गेलेली आहे. तिच्या मुखावरून आसवांच्या धारा वहात आहेत आणि ती शोकाच्या दुःसह भाराने अत्यंत पीडित आणि दीन होऊन, वायुच्या वेगाने आक्रान्त होऊन समुद्रात बुडणार्या नौकेप्रमाणे भासत आहे. हरिणांच्या कळपापासून वियोग होऊन कुत्र्यांनी घेरल्या गेलेल्या एकाकी हरिणीप्रमाणे ती दिसत आहे. ॥३-४ १/२॥
|
अधोगतमुखीं सीतां तामभ्येत्य निशाचरः ॥ ५ ॥
तां तु शोकवनाद् दीनामवशां राक्षसाधिपः ।
स बलाद् दर्शयामास गृहं देवगृहोपपम् ॥ ६ ॥
|
शोकवश दीन आणि विवश होऊन खाली मान घालून बसलेल्या सीतेजवळ पोहोचून राक्षसांचा राजा असलेल्या निशाचर रावणाने तिला जबरदस्तीने आपल्या देवगृहासमान सुंदर भवनाचे दर्शन करविले. ॥५-६॥
|
हर्म्यप्रासादसम्बाधं स्त्रीसहस्रनिषेवितम् ।
नानापक्षिगणैर्जुष्टं नानारत्नसमन्वितम् ॥ ७ ॥
|
ते उंच उंच महालांनी आणि सात मजली घरांनी भरलेले होते. त्यात हजारो स्त्रिया निवास करीत होत्या. नाना जातीचे पक्षी झुंडी झुंडीने तेथे कलरव करीत होते. नाना प्रकारची रत्ने त्या अंतःपुरात शोभा वाढवीत होती. ॥७॥
|
दान्तकैस्तापनीयैश्च स्फाटिकै राजतैस्तथा ।
वज्रवैदूर्यचित्रैश्च स्तम्भैर्दृष्टिमनोरमैः ॥ ८ ॥
|
त्यात बरेचसे मनोहर खांब उभारलेले होते, जे हस्तीदंत, चोख सोने, स्फटिक मणी, चांदी, हीरे आणि वैडूर्य मणी जडविले असल्यामुळे फारच विचित्र दिसून येत होते. ॥८॥
|
दिव्यदुन्दुभिनिर्घोषं तप्तकाञ्चनभूषणम् ।
सोपानं काञ्चनं चित्रमारुरोह तया सह ॥ ९ ॥
|
त्या महालात दिव्य दुंदुभींचा मधुर घोष होत राहिला होता. त्या अंतःपुरास तापविलेल्या सुवर्णाच्या आभूषणांनी सजविले गेले होते. रावण सीतेला बरोबर घेऊन सोन्याच्या बनविलेल्या विचित्र पायर्यांवर चढून गेला. ॥९॥
|
दान्तका राजताश्चैव गवाक्षाः प्रियदर्शनाः ।
हेमजालावृताश्चासंस्तत्र प्रासादपङ्क्तयः ॥ १० ॥
|
तेथे हस्तीदंत आणि चांदीच्या बनविलेल्या त्या खिडक्या होत्या. ज्या फारच सुंदर दिसत होत्या. सोन्याच्या जाळ्यांनी झाकली गेलेली प्रासादांची मालिका ही दृष्टीगोचर होत होती. ॥१०॥
|
सुधामणिविचित्राणि भूमिभागानि सर्वशः ।
दशग्रीवः स्वभवने प्रादर्शयत मैथिलीम् ॥ ११ ॥
|
त्या महालात जो भूभाग (फरशी) होता तो सुर्खी चुन्याचे पक्के बनविलेले होते आणि त्यात मणि (रत्ने) जडविली गेली होती. त्यामुळे ते सर्वच्या सर्व विचित्र दिसून येत होते. दशग्रीवाने आपल्या महालातील या सर्व वस्तु मैथिलीला दाखविल्या. ॥११॥
|
दीर्घिकाः पुष्करिण्यश्च नानापुष्पसमावृताः ।
रावणो दर्शयामास सीतां शोकपरायणाम् ॥ १२ ॥
|
रावणाने बर्याचशा विहीरी आणि विविध प्रकारच्या फुलांनी आच्छादित बर्याचशा पुष्करिणी सीतेस दाखविल्या. ते सर्व पाहून सीता शोकात बुडून गेली. ॥१२॥
|
दर्शयित्वा तु वैदेहीं कृत्स्नं तद्भवनोत्तमम् ।
उवाच वाक्यं पापात्मा सीतां लोभितुमिच्छया ॥ १३ ॥
|
तो पापात्मा निशाचर वैदेही सीतेला आपले सारे सुंदर भवन दाखवून तिला लोभ उत्पन्न करण्याच्या इच्छेने याप्रकारे बोलला- ॥१३॥
|
दश राक्षसकोट्यश्च द्वाविंशतिरथापराः ।
वर्जयित्वा जरावृद्धान् बालांश्च रजनीचरान् ॥ १४ ॥
तेषां प्रभुरहं सीते सर्वेषां भीमकर्मणाम् ।
सहस्रमेकमेकस्य मम कार्यपुरःसरम् ॥ १५ ॥
|
सीते ! माझ्या अधीन बत्तीस कोटी राक्षस आहेत. ही संख्या वृद्ध आणि बाल निशाचरांना सोडून सांगितली गेली आहे. भयंकर कर्म करणार्या या सर्व राक्षसांचा मीच स्वामी आहे. माझ्या एकट्याच्या सेवेमध्ये एक हजार राक्षस रहातात. ॥१४-१५॥
|
यदिदं राज्यतन्त्रं मे त्वयि सर्वं प्रतिष्ठितम् ।
जीवितं च विशालाक्षि त्वं मे प्राणैर्गरीयसी ॥ १६ ॥
|
विशालाक्षी ! माझे हे सारे राज्य आणि जीवन तुझ्या चरणीं समर्पित आहे. तू मला प्राणांहूनही अधिक प्रिय आहेस. ॥१६॥
|
बह्वीनामुत्तमस्त्रीणां मम योऽसौ परिग्रहः ।
तासां त्वमीश्वरी सीते मम भार्या भव प्रिये ॥ १७ ॥
|
सीते ! माझे अंतःपुर माझ्या बर्याचशा सुंदर भार्यांनी भरलेले आहे. तू त्या सर्वांची स्वामिनी बन. प्रिये ! माझी भार्या हो. ॥१७॥
|
साधु किं तेऽन्यथाबुद्ध्या रोचयस्व वचो मम ।
भजस्व माभितप्तस्य प्रसादं कर्तुमर्हसि ॥ १८ ॥
|
माझ्या या हितकर वचनास मान्य कर - पसंत कर. याहून विपरित विचार मनात आणण्यामुळे तुला काय लाभ होणार आहे ? माझा अंगीकार कर. मी पीडित आहे. माझ्यावर कृपा कर. ॥१८॥
|
परिक्षिप्ता समुद्रेण लङ्केयं शतयोजना ।
नेयं धर्षयितुं शक्या सेन्द्रैरपि सुरासुरैः ॥ १९ ॥
|
समुद्राने वेढलेल्या या लंकेच्या राज्याचा विस्तार शंभर योजने आहे. इंद्रासहित संपूर्ण देवता आणि असुर मिळूनही हिला उध्वस्त करू शकत नाहीत. ॥१९॥
|
न देवेषु न यक्षेषु न गन्धर्वेषु नर्षिषु ।
अहं पश्यामि लोकेषु यो मे वीर्यसमो भवेत् ॥ २० ॥
|
देवता, यक्ष, गंधर्व तसेच ऋषि यामध्ये मला असा कुणीही दिसून येत नाही, जो पराक्रमात माझी बरोबरी करू शकेल. ॥२०॥
|
राज्यभ्रष्टेन दीनेन तापसेन पदातिना ।
किं करिष्यसि रामेण मानुषेणाल्पतेजसा ॥ २१ ॥
|
राम तर राज्यापासून भ्रष्ट, दीन, तपस्वी, अनवाणी चालणारा आणि मनुष्य असल्या कारणाने अल्प तेज असणारा आहे, त्याला घेऊन तू काय करणार आहेस ? ॥२१॥
|
भजस्व सीते मामेव भर्ताहं सदृशस्तव ।
यौवनं त्वध्रुवं भीरू रमस्वेह मया सह ॥ २२ ॥
|
सीते ! मलाच आपलासा कर. मी तुझ्या योग्य पति आहे. भीरू ! तारूण्य सदा रहात नाही म्हणून येथे राहून माझ्याशी रमण कर. ॥२२॥
|
दर्शने मा कृथा बुद्धिं राघवस्य वरानने ।
कास्य शक्तिरिहागन्तुमपि सीते मनोरथैः ॥ २३ ॥
|
वरानने ! सीते ! आता तू रामाच्या दर्शनाचा विचार सोडून दे. या रामात इतकी शक्ती कोठे आहे की येथपर्यंत येण्याचा मनोरथ करू शकेल ? ॥२३॥
|
न शक्यो वायुराकाशे पाशैर्बद्धं महाजवः ।
दीप्यमानस्य वाप्यग्नेर्ग्रहीतुं विमलाः शिखाः ॥ २४ ॥
|
आकाशात महान् वेगाने वहाणार्या वायुला दोर्यांनी बांधणे शक्य नसते अथवा प्रज्वलित अग्निच्या निर्मल ज्वाळांना हातांनी पकडता येणे शक्य नसते. ॥२४॥
|
त्रयाणामपि लोकानां न तं पश्यामि शोभने ।
विक्रमेण नयेद् यस्त्वां मद्बाहुपरिपालिताम् ॥ २५ ॥
|
शोभने ! मी तीन्ही लोकात कुणाही अशा वीरास पहात नाही, जो माझ्या भुजांमध्ये सुरक्षित असलेल्या तुला पराक्रम करून येथून घेऊ जाऊ शकेल. ॥२५॥
|
लङ्कायां सुमहद्राज्यमिदं त्वमनुपालय ।
त्वत्प्रेष्या मद्विधाश्चैव देवाश्चापि चराचरम् ॥ २६ ॥
|
लंकेच्या या विशाल राज्याचे तूच पालन कर. माझ्यासारखे राक्षस, देवता तसेच संपूर्ण चराचर जगत तुझेच सेवक बनून राहतील. ॥२६॥
|
अभिषेकजलल्किन्ना तुष्टा च रमयस्व माम् ।
दुष्कृतं यत्पुरा कर्म वनवासेन तद्गतम् ॥ २७ ॥
यश्च ते सुकृतं कर्म तस्येह फलमाप्नुहि ।
|
स्नानाच्या जलाने आर्द्र (अथवा लंकेच्या राज्यावर आपला अभिषेक करवून त्या जलाने आर्द्र) होऊन संतुष्ट होऊन तू आपल्या- स्वतःला क्रीडा- विनोदात लाव. तुझे पूर्वीचे जे दुष्कर्म होते ते वनवासाचे कष्ट देऊन समाप्त झाले आहे. आता जे तुझे पुण्यकर्म शेष आहे, त्याचे फळ तू येथे भोग. ॥२७ १/२॥
|
इह सर्वाणि माल्यानि दिव्यगन्धानि मैथिलि ॥ २८ ॥
भूषणानि च मुख्यानि तानि सेव मया सह ।
|
मैथिली ! तू माझ्यासह येथे राहून सर्व प्रकारचे पुष्पहार, दिव्यगंध आणि श्रेष्ठ आभूषणे आदिचे सेवन कर. ॥२८ १/२॥
|
पुष्पकं नाम सुश्रोणि भ्रातुर्वैश्रवणस्य मे ॥ २९ ॥
विमानं सूर्यसंकाशं तरसा निर्जितं रणे ।
विशालं रमणीयं च तद्विमानं मनोजवम् ॥ ३० ॥
तत्र सीते मया सार्धं विहरस्व यथासुखम् ।
|
सुंदर कटिप्रदेश असणार्या सुंदरी ! हे सूर्यासमान प्रकाशित होणारे पुष्पक विमान माझा भाऊ कुबेर याचे होते. ते मी बलपूर्वक जिंकले आहे. ते अत्यंत रमणीय, विशाल तसेच मनासमान वेगाने जाणारे आहे. सीते ! तू याच्यावर माझ्यासह बसून सुखपूर्वक विहार कर. ॥२९-३० १/२॥
|
वदनं पद्मसंकाशं विमलं चारुदर्शनम् ॥ ३१ ॥
शोकार्तं तु वरारोहे न भ्राजति वरानने ।
|
वरारोहे सुमुखी ! तुझे हे कमलासमान सुंदर, निर्मल आणि मनोहर दिसणारे मुख शोकाने पीडित झाल्यामुळे शोभून दिसत नाही आहे. ॥३१ १/२॥
|
एवं वदति तस्मिन् सा वस्त्रान्तेन वराङ्गना ॥ ३२ ॥
पिधायेन्दुनिभं सीता मुखमश्रूण्यवर्तयत् ।
|
ज्यावेळी रावण अशा प्रकारे बोलू लागला, तेव्हा परम सुंदरी सीतादेवी चंद्रम्याप्रमाणे मनोहर आपले मुखास पदराने झाकून हळू हळू अश्रु ढाळू लागली. ॥३२ १/२॥
|
ध्यायन्तीं तामिवास्वस्थां दीनां चिन्ताहतप्रभाम् ॥ ३३ ॥
उवाच वचनं वीरो रावणो रजनीचरः ।
|
सीता शोकाने अस्वस्थ झाल्यासारखी होत होती, चिंतेने तिची कांति नष्ट झाल्यासारखी झाली होती आणि ती भाग्यवान् रामाचे ध्यान करू लागली होती. त्या अवस्थेत तिला तो घोर निशाचर रावण याप्रमाणे बोलला- ॥३३ १/२॥
|
अलं व्रीडेन वैदेहि धर्मलोपकृतेन च ॥ ३४ ॥
आर्षोऽयं दैवि निष्पन्दो यस्त्वामभिभविष्यति ।
|
वैदेही ! आपल्या पतिचा त्याग आणि परपुरुषाच्या अंगीकारामुळे जी धर्मलोपाची आशंका होत आहे त्यामुळे तुला येथे लाज वाटतां कामा नये. या प्रकारची लाज व्यर्थ आहे. देवी ! तुझ्या बरोबर जो माझा स्नेह संबंध होईल तो आर्ष- धर्मशास्त्रांच्या द्वारा समर्थीत आहे. ॥३४ १/२॥
|
एतौ पादौ मया स्निग्धौ शिरोभिः परिपीडितौ ॥ ३५ ॥
प्रसादं कुरु मे क्षिप्रं वश्यो दासोऽहमस्मि ते ।
|
तुझा या कोमल आणि स्निग्ध चरणांवर मी आपली ही दहा मस्तके ठेवीत आहे. आता शीघ्र माझ्यावर कृपा कर. मी सदा तुझ्या अधीन राहाणारा दास आहे. ॥३५ १/२॥
|
इमाः शून्या मया वाचः शुष्ममाणेन भाषिताः ॥ ३६ ॥
न चापि रावणः काञ्चिन्मूर्ध्ना स्त्रीं प्रणमेत ह ।
|
मी कामाग्नीने संतप्त होऊन या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या निष्फळ होऊ नयेत अशी कृपा कर; कारण रावण कुणा स्त्रीला मस्तक नमवून प्रणाम करीत नाही; केवळ तुझ्या समोरच त्याचे मस्तक वाकले आहे. ॥३६ १/२॥
|
एवमुक्त्वा दशग्रीवो मैथीलीं जनकात्मजाम् ।
कृतान्तवशमापन्नो ममेयमिति मन्यते ॥ ३७ ॥
|
मैथिली जानकीला असे म्हणून कालाच्या वशीभूत झालेला रावण मनातल्या मनात आता ही माझ्या अधीन झाली आहे असे मानू लागला. ॥३७॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे पञ्चपञ्चाशः सर्गः ॥ ५५ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा पंचावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५५॥
|