॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ अयोध्याकाण्ड ॥ ॥ षष्ठः सर्ग: ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] गंगा उतरून पलीकडे गमन आणि भरद्वाज व वाल्मीकी यांची भेट - श्रीमहादेव उवाच - सुप्तं रामं समालोक्य गुहः सोऽश्रुपरिप्लुतः । लक्ष्मणं प्राह विनयाद्भ्रातः पश्यसि राघवम् ॥ १ ॥ शयानं कुशपत्रौघ संस्तरे सीतया सह । यः शेते स्वर्णपर्यङ्के स्वास्तीर्णे भवनोत्तमे ॥ २ ॥ श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, त्या वेळी झोपलेल्या श्रीरामांना पाहून गुहाचे डोळे अश्रूंनी भरून आले. तो विनयाने लक्ष्मणाला म्हणाला, "बंधू लक्ष्मणा, पाहा ना ! जे रघुनाथ पूर्वी आपल्या उत्तम महालातील उत्तम प्रकारे शृंगारलेल्या सोन्याच्या पलंगावर सीतेसह झोपत होते, तेच श्रीराम आज सीतेसह कुश आणि पानांनी बनविलेल्या पथारीवर झोपले आहेत ! (१-२) कैकेयी रामदुःखस्य कारणं विधिना कृता । मन्थराबुद्धिमास्थाय कैकेयी पापमाचरत् ॥ ३ ॥ ब्रह्मदेवाने या श्रीरामाच्या दुःखाचे कारण कैकेयीला बनविले. मंथरेच्या बुद्धीवर विश्वास ठेवून कैकेयीने पापकर्म केले." (३) तच्छ्रुत्वा लक्ष्मणः प्राह सखे शृणु वचो मम । कः कस्य हेतुर्दुःखस्य कश्च हेतुः सुखस्य च ॥ ४ ॥ स्वपूर्वार्जितकर्मैव कारणं सुखदुःखयोः ॥ ५ ॥ ते ऐकून लक्ष्मण म्हणाला, " मित्रा, माझे वचन ऐक. एखाद्याच्या दुःखाचे कारण अथवा एखाद्याच्या सुखाचे कारण दुसरा कोण असणार ? अर्थात् दुसरा कोणी कारण होऊ शकत नाही, तर माणसाने स्वतःच पूर्वी केलेले कर्मच त्याच्या सुखदुःखाचे कारण बनते. (४-५) सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परो ददातीति कुबुद्धिरेषा । अहं करोमीति वृथाभिमानः स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोकः ॥ ६ ॥ माणसाला सुख आणि दुःख देणारा अन्य कोणीही नाही. दुसरा कुणी सुखदुःख देतो, असे समजणे ही चुकीची समजूत आहे. 'मी करतो' हा माणसाचा फुकटचा अभिमान आहे. कारण लोक हे स्वतःच्या कर्माच्या दोरीने बांधलेले असतात. (६) सुहृन्मित्रार्युदासीन द्वेष्यमध्यस्थबान्धवाः । स्वयमेवाचरन्कर्म तथा तत्र विभाव्यते ॥ ७ ॥ स्वतःच नाना प्रकारची कर्म करणारा माणूस हा आपल्याच भावनेप्रमाणे सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, द्वेष्य, मध्यस्थ, बांधव इत्यादी वेगवेगळ्या कल्पना करीत राहतो. (७) सुखं वा यदि वा दुःखं स्वकर्मवशगो नरः । यद्यद्यथागतं तत्तत् भुक्त्वा स्वस्थमना भवेत् ॥ ८ ॥ स्वतःच्या प्रारब्धानुसार माणसाने जे जे सुख अथवा दुःख जसे येईल तसे ते भोगून स्वस्थ मनाने राहावे. (८) न मे भोगागमे वाञ्छा न मे भोगविवर्जने । आगच्छत्वथ मागच्छत्वभोगवशगो भवेत् ॥ ९ ॥ आपण भोगांच्या प्राप्तीची इच्छा करू नये. भोग येऊ नयेत अशी इच्छाही नाही. माझ्याकडे भोग येवोत अथवा न येवोत, असे मानून माणसाने भोगांच्या अधीन होऊ नये. (९) यस्मिन्देशे च काले च यस्माद्वा येन केन वा । कृतं शुभाशुभं कर्म भोज्यं तत्तत्र नान्यथा ॥ १० ॥ ज्या स्थळी आणि ज्या काळी, ज्या योगाने, ज्या कोणी जे शुभ किंवा अशुभ कर्म केले असेल ते त्याला येथेच भोगावे लागते, त्यापेक्षा वेगळे असे अन्य काही घडणार नाही. (१०) अलं हर्षविषादाभ्यां शुभाशुभफलोदये । विधात्रा विहितं यद्यत्तदलङ्घ्यं सुरासुरैः ॥ ११ ॥ म्हणून शुभ अथवा अशुभ फळाची प्राप्ती झाली असता, हर्ष अथवा विषाद मानू नये. कारण विधात्याने जे जे काही ठरविलेले असेल ते देव किंवा असुर यांनाही चुकविणे शक्य नाही. (११) सर्वदा सुखदुःखाभ्यां नरः प्रत्यवरुध्यते । शरीरं पुण्यपापाभ्यामुत्पन्नं सुखदुःखवत् ॥ १२ ॥ माणूस हा नेहमी सुख अथवा दुःख यांनी घेरलेला असतो. कारण शरीर हे पुण्य आणि पाप यांच्यामुळे उत्पन्न होते; म्हणून ते सुखदुःखांनी युक्त असते. (१२) सुखस्यानन्तरं दुःखं दुःखस्यानन्तरं सुखम् । द्वयमेतद्धि जन्तूनामलङ्घ्य दिनरात्रिवत् ॥ १३ ॥ सुखानंतर दुःख येते आणि दुःखानंतर सुख येते. ही दोन्हीही दिवस-रात्रीप्रमाणे प्राण्यांना टाळता येणार नाहीत. (१३) सुखमध्ये स्थितं दुःखं दुःखमध्ये स्थितं सुखम् । द्वयमन्योन्यसंयुक्तं प्रोच्यते जलपङ्कवत् ॥ १४ ॥ सुखामध्येच दुःख असते आणि दुःखामध्येच सुख असते. हे दोन्हीही पाणी आणि चिखल यांच्याप्रमाणे एकमेकात मिसळून गेलेले असतात, असे म्हटले जाते. (१४) तस्माद्धैर्येण विद्वांस इष्टानिष्टोपपत्तिषु । न हृष्यन्ति न मुह्यन्ति सर्वं मायेति भावनात् ॥ १५ ॥ म्हणून 'सर्व काही माया आहे' या भावनेने विद्वान लोक इष्ट अथवा अनिष्ट यांची प्राप्ती झाली असताना, धीर धरून, आनंदितही होत नाहीत अगर मोहितही होत नाहीत." (१५) गुहलक्ष्मणयोरेवं भाषतोर्विमलं नभः । बभूव रामः सलिलं स्पृष्ट्वा प्रातः समाहितः ॥ १६ ॥ या प्रमाणे गुह आणि लक्ष्मण हे संभाषण करीत असताना, आकाश उजळून गेले. पाण्याने आचमन करून रामचंद्रांनी प्रातःकालचे संध्यावंदनादी उरकले. (१६) उवाच शीघ्रं सुदृढं नावमानय मे सखे । श्रुत्वा रामस्य वचनं निषादाधिपतिर्गुहः ॥ १७ ॥ स्वयमेव दृढं नावमानिनाय सुलक्षणाम् । स्वामिनारुह्यतां नौकां सीतया लक्ष्मणेन च ॥ १८ ॥ मग श्रीराम गुहाला म्हणाले, "मित्रा, माझ्यासाठी एक चांगली बळकट नाव त्वरित घेऊन ये. " श्रीरामांचे हे वचन ऐकल्यावर, निषादराज गुहाने स्वतःच एक चांगली अशी बळकट नाव आणली. मग तो श्रीरामांना म्हणाला, "स्वामी सीता आणि लक्ष्मण यांच्यासह आपण नौकेत चढावे. (१७-१८) वाहये ज्ञातिभिः सार्धमहमेव समाहितः । तथेति राघवः सीतामारोप्य शुभलक्षणाम् ॥ १९ ॥ माझ्या नातलगांसह मी स्वतःच काळजीपूर्वक ही नाव चालवीन. "ठीक आहे" असे म्हणून रामांनी प्रथम शुभलक्षणी सीतेला नौकेत चढविले. (१९) गुहस्य हस्तावालम्ब्य स्वयं चारोहदच्युतः । आयुधादीन् समारोप्य लक्ष्मणोऽप्यारुरोह च ॥ २० ॥ नंतर गुहाच्या हातांचा आधार घेऊन भगवान राम स्वतः नावेत चढले. त्यानंतर आयुधे इत्यादी नावेत चढवून लक्ष्मणसुद्धा नावेत बसला. (२०) गुहस्तान्वाहयामास ज्ञातिभिः सहितः स्वयम् । गङ्गामध्ये गतां गङ्गां प्रार्थयामास जानकी ॥ २१ ॥ आपल्या ज्ञातिबांधवासह गुहाने स्वतःच ती नाव चालविली. ज्या वेळी ती नाव गंगेच्या मध्यभागी पोचली, तेव्हा जानकीने गंगेची प्रार्थना केली. (२१) देवि गङ्गे नमस्तुभ्यं निवृत्ता वनवासतः । रामेण सहिताहं त्वां लक्ष्मणेन च पूजये ॥ २२ ॥ "हे देवी गंगे, तुला नमस्कार असो. वनवासातून परत आल्यावर राम आणि लक्ष्मण यांच्यासह मी तुझी पूजा करीन." (२२) इत्युक्त्वा परकूलं तौ शनैरुत्तीर्य जग्मतुः ॥ २३ ॥ गुहोऽपि राघवं प्राह गमिष्यामि त्वया सह । अनुज्ञां देहि राजेन्द्र नोचेत्प्राणांस्त्यजाम्यहम् ॥ २४ ॥ त्यानंतर ते सावकाशपणे गंगा नदी पार करून पलीकडल्या तीरावर पोचले. त्यानंतर गुह श्रीरघुनाथांना म्हणाला, "हे राजेंद्रा, तुमच्याबरोबर येईन. मला तशी अनुज्ञा द्या. नाहीतर मी प्राणांचा त्याग करीन." (२३-२४) श्रुत्वा नैषादिवचनं श्रीरामस्तमथाब्रवीत् । चतुर्दश समाः स्थित्वा दण्डके पुनरप्यहम् ॥ २५ ॥ आयास्याभ्युदितं सत्यं नासत्यं रामभाषितम् । इत्युक्त्वालिङ्ग्य तं भक्तं समाश्वास्य पुनः पुनः ॥ २६ ॥ निवर्तयामास गुहं सोऽपि कृच्छ्राद्ययौ गृहम् ॥ २७ ॥ निषादराज गुहाचे वचन ऐकल्यावर, श्रीरामचंद्र त्याला म्हणाले, "दंडकारण्यात चौदा वर्षे राहिल्यावर मी पुनःव्येथे परत येईन. मी जे काही बोलतो ते सत्यच असते. रामाचे भाषण कधीच खोटे नसते." असे बोलून आणि त्या भक्ताला आलिंगन देऊन पुनः पुनः धीर दिला आणि मग रामांनी गुहाला परत पाठवून दिले. तेव्हा मोठ्या कष्टाने तोसुद्धा आपल्या घरी परत गेला. (२५-२७) ततो रामस्तु वैदेह्या लक्ष्मणेन समन्वितः ॥ २८ ॥ भरद्वाजाश्रमपदं गत्वा बहिरुपस्थितः । तत्रैकं बटुकं दृष्ट्वा रामः प्राह च हे बटो ॥ २९ ॥ रामो दाशरथिः सीतालक्ष्मणाभ्यां समन्वितः । आस्ते बहिर्वनस्येति ह्युच्यतां मुनिसन्निधौ ॥ ३० ॥ त्यानंतर जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह श्रीरामचंद्र हे भरद्वाज मुनींच्या आश्रमस्थानी जाऊन बाहेरच उभे राहिले. तेथे एका बटूला पाहून श्रीरामचंद्र म्हणाले, "अरे बटू, सीता आणि लक्ष्मण यांच्यासह दशरथपुत्र राम आश्रमाच्या वनाच्या बाहेर उभा आहे, असे मुनीजवळ जाऊन तू सांग." (२८-३०) तत्श्रुत्वा सहसा गत्वा पादयोः पतितो मुनेः । स्वामिन् रामः समागत्य वनाद्बहिरवस्थितः ॥ ३१ ॥ सभार्यः सानुजः श्रीमानाह मां देवसन्निभः । भरद्वाजाय मुनये ज्ञापयस्व यथोचितम् ॥ ३२ ॥ रघुनाथांचे ते वचन ऐकल्यावर तो बटू त्वरित गेला आणि मुनींच्या चरणी लोटांगण घालून म्हणाला, "अहो भगवन्, आपली पत्नी व आपला धाकटा भाऊ यां च्यासह आले ल्या देवतुल्य श्रीमान् रामांनी मला सागितले आहे की भरद्वाज मुनींना योग्य रीतीने मी आल्याचे कळव." (३१-३२) तच्छ्रुत्वा सहसोत्थाय भरद्वाजो मुनीश्वरः । गृहीत्वार्घ्यं च पाद्यं च रामसामीप्यमाययौ ॥ ३३ ॥ ते वचन ऐकून मुनीश्वर भरद्वाज चटदि शी उठले आणि अर्घ्य व पादोदक घेऊन ते रामा च्याजवळ आले. (३३) दृष्ट्वा रामं यथान्यायं पूजयित्वा सलक्ष्मणम् । आह मे पर्णशालां भो राम राजीवलोचन ॥ ३४ ॥ आगच्छ पादरजसा पुनीहि रघुनन्दन । इत्युक्त्वोटजमानीय सीतया सह रघावौ ॥ ३५ ॥ श्रीरामांना पाहिल्यावर त्यांनी लक्ष्मणासह त्यांची यथाविधी पूजा केली आणि म्हटले, " हे कमलनयन रामा, या. हे रघुनंदना, तुमच्या चरण धुळीने ही माझी पर्णशाला तुम्ही पवित्र करा." असे बोलून, सीतेसह त्या दोघा रघुकुमारांना त्यांनी आपल्या कुटीत आणले. (३४-३५) भक्त्या पुनः पूजयित्वा चकारातिथ्यमुत्तमम् । अद्याहं तपसः पारं गतोऽमि तव सङ्गमात् ॥ ३६ ॥ ज्ञातं राम तवोदन्तं भूतं चागामिकं च यत् । जानामि त्वां परात्मानं मायया कार्यमानुषम् ॥ ३७ ॥ त्यानंतर भक्तीने पुनः त्यांची पूजा करून त्यांनी त्यांचा उत्तम आदर-सत्कार केला आणि ते म्हणाले, "अहो रामा, तुमची भेट झाल्याने आज माझी तपश्चर्या सफल झाली आहे. हे रघुनंदना रामा, तुमचा जो काही भूतकालीन आणि भविष्यकालीन वृत्तांत आहे तो सर्व मला ज्ञात आहे आणि मी हेही जाणतो की तुम्ही साक्षात परमात्मा आहात. कार्याच्या सिद्धीसाठी तुम्ही मायेने मनुष्याचे रूप धारण केले आहे. (३६-३७) यदर्थमवतीर्णोऽसि प्रार्थितो ब्रह्मणा पुरा । यदर्थं वनवासस्ते यत्करिष्यसि वै पुनः ॥ ३८ ॥ जानामि ज्ञानदृष्ट्याहं जातया त्वदुपासनात् । इतः परं त्वां किं वक्ष्ये कृतार्थोऽहं रघूत्तम ॥ ३९ ॥ यस्त्वां पश्यामि काकुत्स्थं पुरुषं प्रकृतेः परम् । रामस्तमभिवाद्याह सीतालक्ष्मणसंयुतः ॥ ४० ॥ पूर्वी ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे ज्या कारणासाठी तुम्ही अवतार घेतला आहे, ज्यासाठी तुम्हांला वनवास पत्करावा लागला आहे आणि यानंतर तुम्ही जे काही करणार आहात ते सर्व तुमची उपासना केल्यामुळे निर्माण झाले ल्या ज्ञानदृष्टीने मला कळले आहे. हे रघुश्रेष्ठा, यापेक्षा अधिक मी तुम्हांला काय सांगू ? मी कृतार्थ झालो आहे; कारण प्रकृतीच्या पलीकडे असणार्या साक्षात पुरुषोत्तम अशा तुम्हांला -ककुत्स्थनंदनाला- मी पाहात आहे." त्यानंतर सीता आणि लक्ष्मण यांचे सह श्रीरामचंद्रांनी त्यांना प्रणाम केला. ते त्यांना म्हणाले. (३८-४०) अनुग्राह्यास्त्वया ब्रह्मन्वयं क्षत्रियबान्धवाः । इति सम्भाष्य तेऽन्योन्यमुषित्वा मुनिसन्निधौ ॥ ४१ ॥ "हे ब्रह्मन, आम्हा क्षत्रियबांधवांवर तुम्ही कृपा करावी," अशा प्रकारे एकमेकांशी बोलून झाल्यावर श्रीराम मुनींच्या जवळ राहिले. ४१ प्रातरुत्थाय यमुनां उत्तीर्य मुनिवारकैः । कृताप्लवने मुनिना दृष्टमार्गेण राघवः ॥ ४२ ॥ प्रययौ चित्रकूटाद्रिं वाल्मीकेर्यत्र चाश्रमः । गत्वा रामोऽथ वाल्मीकेराश्रमं ऋषिसङ्कुलम् ॥ ४३ ॥ नानामृगद्विजाकीर्णं नित्यपुष्पफलाकुलम् । तत्र दृष्ट्वा समासीनं वाल्मीकिं मुनिसत्तमम् ॥ ४४ ॥ सर्वजण सकाळी उठले. मग मुनिकुमारांनी तयार केलेल्या होडीत बसून, यमुना नदी ओलांडून, मुनींनी दाखविलेल्या मार्गाने श्रीरघुनाथ चित्रकूट पर्वताकडे गेले. तेथे वाल्मीकि मुनींचा आश्रम होता. तो ऋषि- समूहांनी भरलेला, नाना प्रकारच्या वन्य पशूंनी आणि पक्ष्यांनी गजबजलेला आणि नेहमी फुलांनी व फळांनी बहरलेला होता, त्या वाल्ईकींच्या आश्रमात गेल्यावर, रामांनी तेथे बसलेल्या मुनिश्रेष्ठ वाल्मीकींना पाहिले. (४२-४४) ननाम शिरसा रामो लक्ष्मणेन च सीतया । दृष्ट्वा रामं रमानाथं वाल्मीकिर्लोकसुन्दरम् ॥ ४५ ॥ जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् । कन्दर्पसदृशाकारं कमनीयाम्बुजेक्षणम् ॥ ४६ ॥ आणि लक्ष्मण व सीता यांसह श्रीरामचंद्रांनी मस्तक नमवून वाल्मीकींना प्रणाम केला. तेव्हा सुंदर कमळाप्रमाणे नेत्र असणारे, मदनाप्रमाणे रूप असणारे, जटारूपी मुकुटाने विभूषित, सर्व लोकांमध्ये सुंदर, लक्ष्मीचे पती, आणि जानकी व लक्ष्मण यांच्याबरोबर असलेल्या रामचंद्र यांना वाल्मीकींनी पाहिले. (४५-४६) दृष्ट्वैव सहसोत्तस्थौ विस्मयानिमिषेक्षणः । आलिङ्ग्य परमानन्दं रामं हर्षाश्रुलोचनः ॥ ४७ ॥ त्यांना पाहताच वाल्मीकी लगबगीने उठून उभे राहिले. विस्मयाने त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या हलेनाशा झाल्या आणि आनंदाश्रूंनी डोळे भरलेल्या स्थितीत त्यांनी परमानंद-स्वरूप अशा श्रीरामांना आलिंगन दिले. (४७) पूजयित्वा जगत्पूज्यं भक्त्यार्घ्यादिभिरदृतः । फलमूलैः स मधुरैर्भोजयित्वा च लालितः ॥ ४८ ॥ सर्व जगाला पूज्य अशा भगवान रामांची अर्घ्य इत्यादींनी आदरपूर्वक भक्तीने पूजा करून व त्यांना मधुर फळे आणि मुळे यांचे भोजन देऊन वाल्मीकींनी वात्सल्य भावनेने त्यांचा सत्कार केला. (४८) राघवः प्राञ्जलिः प्राह वाल्मीकिं विनयान्वितः । पितुराज्ञां पुरस्कृत्य दण्डकानागता वयम् ॥ ४९ ॥ त्यानंतर अतिशय नम्रतापूर्वक हात जोडून श्रीरघुनाथ वाल्मीकींना म्हणाले "पित्याची आज्ञा मान्य करून आम्ही दण्डकारण्यात आलो आहोत. (४९) भवन्तो यदि जानन्ती किं वक्ष्यामोऽत्र कारणम् । यत्र मे सुखवासाय भवेत्स्थानं वदस्व तत् ॥ ५० ॥ जर आपणास सर्व काही माहीत आहे, तर याचे कारण मी काय सांगणार ? तेव्हा आता सुखाने राहण्यासाठी योग्य असेल, ते स्थान आपण मला सांगा. (५०) सीतया सहितः कालं किञ्चित्तत्र नयाम्यहम् । इत्युक्तो राघवेणासौ मुनिः सस्मितमब्रवीत् ॥ ५१ ॥ म्हणजे त्या स्थळी सीतेसहित मी काही काळ व्यतीत करीन." रघुनाथांनी असे म्हटल्यावर मुनिवर स्मितपूर्वक बोलले. (५१) त्वमेव सर्वलोकानां निवासस्थानमुत्तमम् । तवापि सर्वभूतानि निवाससदनानि हि ॥ ५२ ॥ "हे श्रीराम, तुम्हीच सर्व लोकांचे एक मात्र उत्तम निवास-स्थान आहात, आणि सर्व भूते हीसुद्धा तुमच्या निवासाचे स्थान आहेत. (५२) एवं साधारणं स्थानमुक्तं ते रघुनन्दन । सीतया सहितस्येन विशेषं पृच्छतस्तव । तद्वक्ष्यामि रघुश्रेष्ठ यत्ते नियतमन्दिरम् ॥ ५३ ॥ शान्तानां समदृष्टीनामद्वेष्टॄणां च जन्तुषु । त्वामेव भजतां नित्यं हृदयं तेऽधिमन्दिरम् ॥ ५४ ॥ अशा प्रकारे, हे रघुनंदना, मी तुमचे सर्वसामान्य असे निवासस्थान सांगितले. परंतु सीतेसहित राहण्यासाठी विशिष्ट असे निवासस्थान विचारले आहे, म्हणून हे रघुश्रेष्ठा, तुमच्यासाठी जे निश्चित स्थान आहे ते मी सांगतो. जे शांत आहेत, जे समष्टी आहेत, जे सर्व प्राण्यांच्या बाबतीत द्वेषरहित आहेत आणि जे नित्य तुमचेच भजन करतात, त्यांचे हृदय हेच तुमचे मुख्य निवास-स्थान आहे. (५३-५४) धर्माधर्मान्परित्यज्य त्वामेव भजतोऽनिशम् । सीतया सह ते राम तस्य हृत्सुखमन्दिरम् ॥ ५५ ॥ हे रामा, धर्म व अधर्म यांचा त्याग करून जो निरंतर तुमचेच भजन करतो, त्याचे हृदय हेच सीतेसहित तुम्हांला राहण्यास सुखकारक मंदिर आहे. (५५) त्वन्मंत्रजापको यस्तु त्वामेव शरणं गतः । निर्द्वन्द्वो निःस्पृहस्तस्य हृदयं ते सुमन्दिरम् ॥ ५६ ॥ जो तुमच्या नामाच्या मंत्राचा जप करतो आणि जो तुम्हांलाच शरण आला आहे, आणि जो द्वंद्वरहित आहे आणि निःस्पृह आहे त्याचे हृदय हे तुमच्यासाठी सुंदर मंदिर आहे. (५६) निरहङ्कारिणः शान्ता ये रागद्वेषवर्जिताः । समलोष्टाश्मकनकास्तेषां ते हृदयं गृहम् ॥ ५७ ॥ जे अहंकाररहित व शांत आहेत, जे राग व द्वेष यांनी रहित आहेत आणि ज्यांना माती व दगड किंवा सोने एकसारखेच वाटतात, त्यांचे हृदय हे तुमच्यासाठी राहण्याचे घर आहे. (५७) त्वयि दत्तमनोबुद्धिः यः सन्तुष्ट सदाः भवेत् । त्वयि सन्त्यक्तकर्मा यस्तन्मनस्ते शुभं गृहम् ॥ ५८ ॥ ज्याने आपले मन आणि बुद्धी हे तुमच्या ठिकाणी लावले आहेत, जो सदा संतुष्ट असतो आणि जो आपली सर्व कर्मे तुम्हांला अर्पण करतो, त्याचे मन हेच तुम्हांला राहण्यास शुभ गृह आहे. (५८) यो न द्वेष्ट्याप्रियं प्राप्य प्रियं प्राप्य न हृष्यते । सर्वं मायेति निश्चित्य त्वां भजेत्तन्मनो गृहम् ॥ ५९ ॥ जरी अप्रिय गोष्ट प्राप्त झाली तरी जो तिचा द्वेष करीत नाही आणि जो प्रिय गोष्ट मिळाल्यावरही आनंदित होत नाही, तसेच 'हे संपूर्ण जग माया आहे' असा निश्चय करून जो नेहमी तुम्हांला भजतो, त्याचे मन हेच तुम्हांला राहण्यास योग्य घर आहे. (५९) षड्भावादिविकारान्यो देहे पश्यति नात्मनि । क्षुत्तृट् सुखं भयं दुःखं प्राणबुद्ध्योर्निरीक्षते ॥ ६० ॥ संसारधर्मैर्निर्मुक्तस्तस्य ते मानसं गृहम् ॥ ६१ ॥ (अस्तित्व, जन्म, वाढ, बदल, क्षीणत्व आणि नाश) हे वस्तूचे सहा विकार जो देहाच्या ठिकाणी म्हणजे देहाचे आहेत असे पाहातो, ते आत्म्याचे ठायी नाहीत असे जो जाणतो, तसेच तहान- भूक, सुख-दुःख, भय हे सर्व प्राण आणि बुद्धी यांचे परिणाम आहेत, असे जो जाणतो आणि जो स्वतः सांसारिक धर्मापासून संपूर्णपणे मुक्त आहे, त्याचे मन हे तुमचे राहण्यासाठीचे घर आहे. (६०-६१) पश्यन्ति ये सर्वगुहाशयस्थं त्वां चिद्घनं सत्यमनन्तमेकम् । अलेपकं सर्वगतं वरेण्यं तेषां हृदब्जे सह सीतया वस ॥ ६२ ॥ चिद्घन, सत्यस्वरूप, अनंत, एकमेवाद्वितीय, लेपरहित, सर्व व्यापक आणि आपलेसे करण्याजोगे, अशा तुम्हा परमेश्वराला जे सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असलेले आहेत असे पाहतात, त्यांच्या हृदयकमलात, हे रामा, तुम्ही सीतेसह निवास करा. (६२) निरन्तराभ्यासदृढीकृतात्मनां त्वत्पादसेवापरिनिष्ठितानाम् । त्वन्नामकीर्त्या हतकल्मषाणां सीतासमेतस्य गृहं हृदब्जे ॥ ६३ ॥ निरंतर अभ्यास केल्याने ज्यांनी आपले चित्त तुमच्यामध्ये स्थिर केले आहे, जे तुमच्या चरणसेवेत पूर्णपणे रत आहेत, तुमच्या नामाच्या संकीर्तनाने ज्यांचे पाप नष्ट होऊन गेले आहे, त्यांच्या हृदयकमळात, हे रामा, सीतेसह तुमचे निवासस्थान आहे. (६३) राम त्वन्नाममहिमा वर्ण्यते केन वा कथम् । यत्प्रभावादहं राम ब्रह्मर्षित्वमवाप्तवान् ॥ ६४ ॥ ज्याच्या प्रभावामुळे, हे रामा, मी ब्रह्मर्षिपद प्राप्त करून घेतले आहे, त्या तुमच्या नामाचा महिमा कोण व कसा वर्णन करू शकेल ? (६४) अहं पुरा किरातेषु किरातैः सह वर्धितः । जन्ममात्रद्विजत्वं मे शूद्राचाररतः सदा ॥ ६५ ॥ फार पूर्वी मी किरातलोकांमध्ये राहात होतो व त्या किरातांकडूनच मी वाढविला गेलो. मी नेहमी शूद्रांच्या आचारातच रत होतो. माझे द्वजत्व हे केवळ जन्मानेंच होते. (६५) शूद्रायां बहवः पुत्रा उत्पन्ना मेऽजितात्मनः । ततश्चोरश्च सङ्गम्य चौरोऽहमभवं पुरा ॥ ६६ ॥ इंद्रियांवर नियंत्रण नसणार्या अशा मला एका शूद्र स्त्रीपासून पुष्कळ पुत्र उत्पन्न झाले होते. त्या वेळी चोरांच्या संगतीत राहिल्याने मी पूर्वी स्वतःही चोर बनलो होतो. ६६ धनुर्बाणधरो नित्यं जीवानामन्तकोपमः । एकदा मुनयः सप्त दृष्टा महति कानने ॥ ६७ ॥ साक्षान्मया प्रकाशन्तो ज्वलनार्कसमप्रभः । तानन्वधावं लोभेन तेषां सर्वपरिच्छदान् ॥ ६८ ॥ ग्रहीतुकामस्तत्राहं तिष्ठ तिष्ठेति चाब्रवम् । दृष्ट्वा मां मुनयोऽपृच्छन्किमायासि द्विजाधमा ॥ ६९ ॥ जीवांचा अंत करणार्या यमाप्रमाणे असणारा मी नेहमी धनुष्य बाण जवळ बाळगीत असे. अग्नी व सूर्याप्रमाणे तेज असणारे आणि प्रकाशमान असणारे असे साक्षात सप्त ऋषी एकदा मला मोठ्या घोर वनात दिसले. त्यांच्या जवळची वस्त्रे इत्यादी सर्व सामग्री हिरावून घेण्याच्या लोभामुळे मी त्यांच्या मागे धावलो आणि 'थांबा, थांबा' असे ओरडलो. तेव्हा मला पाहून मुनींनी विचारले, 'अरे अधम द्विजा, तू येथे का आला आहेस ?' (६७-६९) अहं तानब्रवं किञ्चिदादातुं मुनिसत्तमाः । पुत्रदारादयः सन्ति बहवो मे बुभुक्षिताः ॥ ७० ॥ तेव्हा मी त्यांना म्हटले, "हे मुनिश्रेष्ठांनो, मला पुष्कळ पुत्र, पत्नी इत्यादी आहेत. ते भुकेलेले आहेत. त्यांच्यासाठी तुमच्याकडून काही तरी लुबाडून घेण्यास मी आलो आहे. (७०) तेषां संरक्षणार्थाय चरामि गिरिकानने । ततो मामूचुरव्यग्राः पृच्छ गत्वा कुटुम्बकम् ॥ ७१ ॥ यो यो मया प्रतिदिनं क्रियते पापसञ्चयः । यूयं तद्भागिनः किं वा नेति वेति पृथक्पृथक् ॥ ७२ ॥ त्या पुत्र इत्यादींचे पालन पोषण करण्यासाठी मी पर्वतावर आणि अरण्यात फिरत असतो." तेव्हा ते मला निर्भयपणे म्हणाले, "तू तुझ्या कुटुंबाकडे या आणि प्रत्येकाला वेगवेगळे विचार की 'दररोज मी जो पापाचा संचय करतो, त्याचा काही भाग तुम्ही घेणार आहात की नाही. ?' (७१-७२) वयं स्थास्यामहे तावदागमिष्यसि निश्चयः । तथेत्युक्त्वा गृहं गत्वा मुनिभिर्यदुदीरितम् ॥ ७३ ॥ अपृच्छं पुत्रदारादींस्तैरुक्तोऽहं रघूत्तम । पापं तवैव तत्सर्वं वयं तु फलभागिनः ॥ ७४ ॥ तू परत येईपर्यंत आम्ही निश्चितपणे येथेच थांबू" 'ठीक आहे' असे म्हणून मी घरी गेलो आणि मुनींनी जे सांगितले होते ते मी माझे पुत्र, पत्नी इत्यादींना विचारले. तेव्हा, हे रघूत्तमा, ते मला म्हणाले, "ते सर्व पाप तुम्हीच भोगा. (धनाचे) फळ मात्र आम्ही भोगू.्" (७३-७४) तच्छ्रुत्वा जातनिर्वेदो विचार्य पुनरागमम् । मुनयो यत्र तिष्ठन्ति करुणापूर्णमानसाः ॥ ७५ ॥ ते ऐकून मला वैराग्य आले. आणि मग मी विचार करीत, करूणेने मन पूर्ण भरलेले मुनी जेथे उभे होते तेथे पुनः परत आलो. (७५) मुनीनां दर्शनादेव शुद्धान्तःकरणोऽभवम् । धनुरादीन्परित्यज्य दण्डवत्पतितोऽस्म्यहम् ॥ ७६ ॥ त्या वेळी त्या मुनींच्या दर्शनानेच माझे अंतःकरण शुद्ध झाले. मी धनुष्य इत्यादी फेकून दिले आणि त्या मुनींपुढे साष्टांग नमरकार घातला. (७६) रक्षध्वं मां मुनिश्रेष्ठा गच्छन्तं निरयार्णवम् । इत्यग्रे पतितं दृष्ट्वा मामूचुर्मुनिसत्तमाः ॥ ७७ ॥ मी त्यांना म्हणालो "हे मुनिश्रेष्ठांनो, नरकरूप सागराकडे जाणार्या माझे रक्षण करा." तेव्हा त्यांच्यापुढे पडलेल्या मला ते श्रेष्ट मुनी म्हणाले. (७७) उत्तिष्ठोत्तिष्ठ भद्रं ते सफलः सत्समागमः । उपदेक्ष्यामहे तुभ्यं किञ्चित्तेनैव मोक्ष्यसे । परस्परं समालोच्य दुर्वृत्तोयं द्विजाधमः ॥ ७८ ॥ उपेक्ष्य एव सद्वृत्तैस्तथापि शरणं गतः । रक्षणीयः प्रयत्नेन मोक्षमार्गोपदेशतः ॥ ७९ ॥ "ऊठ, ऊठ. तुझे कल्याण होवो. तुझा सत्समागम सफल झाला आहे. आम्ही तुला थोडासा उपदेश देतो. त्यामुळेच तू कर्माच्या बंधनातून मुक्त होशील." त्यानंतर त्यांनी परस्परांमध्ये विचार करून म्हटले "हा अधम ब्राह्मण दुराचारी असल्यामुळे सज्जनांनी याची उपेक्षाच केली पाहिजे. पण तो आपणास शरण आला आहे. म्हणून त्याला मोक्षमार्गाचा उपदेश करून त्याचे अवश्य रक्षण करावयास हवे." (७८-७९) इत्युक्त्वा राम ते नाम व्यत्यस्ताक्षरपूर्वकम् । एकाग्रमनसात्रैव मरेति जप सर्वदा ॥ ८० ॥ असे बोलून, हे रामा, तुमच्या नावातील अक्षरे उलटी करून ते मला म्हणाले, ' येथेच राहून तू एकाग्रचित्ताने 'मरा' असा सतत जप कर. (८०) आगच्छामः पुनर्यावत्तावदुक्तं सदा जप । इत्युक्त्वा प्रययुः सर्वे मुनयो दिव्यदर्शिनाः ॥ ८१ ॥ आम्ही पुनः परत येईपर्यंत तू आम्ही सांगितलेल्या नावाचा सतत जप कर.' असे सांगून दिव्य दर्शन असणारे ते सर्व मुनी तेथून निघून गेले. (८१) अहं यथोपदिष्टं तैस्तथाकरवमञ्जसा । जपन्नेकाग्रमनसा बाह्यं विस्मृतवानहम् ॥ ८२ ॥ त्या वेळी त्यांनी ज्याप्रमाणे सांगितले होते त्या प्रमाणे मी सरळ भावाने करीत राहिलो. अशा प्रकारे एकाग्र मनाने जप करता करता मी बाह्य जग विसरून गेलो. (८२) एवं बहुतिथे काले गते निश्चलरूपिणः । सर्वसङ्गविहीनस्य वल्मीकोऽभून्ममोपरि ॥ ८३ ॥ अशा प्रकारे पुष्कळ काळ व्यतीत झाला असता, सर्व संगाने रहित आणि निश्चल स्वरूपात राहिल्यामुळे माझ्या अंगावर एक वारूळ तयार झाले. (८३) ततो युगसहस्रान्ते ऋषयः पुनरागमन् । मामूचुर्निष्क्रमस्वेति तच्छ्रुत्वा तूर्णमुत्थितः ॥ ८४ ॥ त्यानंतर एक हजार युगांच्या शेवटी ते ऋषी पुनः तेथे परत आले. ते मला म्हणाले "तू वारूळातून बाहेर ये. " ते शब्द ऐकून मी झट्दिशी उठून उभा राहिलो. (८४) वल्मीकान्निर्गतश्चाहं नीहारादिव भास्करः । मां अप्याहुर्मुनिगणा वाल्मीकिस्त्वं मुनीश्वर ॥ ८५ ॥ ज्या प्रमाणे धुक्यातून सूर्य बाहेर येतो, त्या प्रमाणे मी त्या वारुळातून बाहेर आलो. तेव्हा ते मुनी मला म्हणाले, "हे मुनिवर, तू वाल्मीकी आहेस. (८५) वल्मीकात्सम्भवो यस्माद् द्वितीयं जन्म तेऽभवत् । इत्युक्त्वा ते ययुर्दिव्यगतिं रघुकुलोत्तम ॥ ८६ ॥ आत्ता तू वारुळातून जन्मला आहेस. म्हणून हा तुझा दुसरा जन्म झाला आहे" असे सांगून हे रघुकुलश्रेष्ठा, ते मुनी दिव्यलोकी गेले. (८६) अहं ते राम नाम्नश्च प्रभावादीदृशोऽभवम् । अद्य साक्षात्प्रपश्यामि ससीतं लक्ष्मणेन च ॥ ८७ ॥ रामं राजीवपत्राक्षं त्वां मुक्तो नात्र संशयः । आगच्छ राम भद्रं ते स्थलं वै दर्शयाम्यहम् ॥ ८८ ॥ श्रीरामा, तुमच्या नामाच्या सामर्थ्याने मी असा झालो आहे. लक्ष्मण व सीता यांच्यासह, कमलपत्राप्रमाणे नयन असणार्या अशा श्रीरामा, तुम्हांला मी आज साक्षात पाहात आहे. मी निश्चितपणे मुक्त झालो यात संशय नाही. हे श्रीरामा, तुमचे मंगल होवो. या. मी तुम्हांला राहण्यास योग्य असे स्थळ दाखवितो." (८७-८८) एवमुक्त्वा मुनिः श्रीमाँल्लक्ष्मणेन समन्वितः । शिष्यैः परिवृतो गत्वा मध्ये पर्वतगङ्गयोः ॥ ८९ ॥ तत्र शालां सुविस्तीर्णां कारयामास वासभूः । प्राक्पश्चिमं दक्षिणोदक् शोभनं मन्दिरद्वयम् ॥ ९० ॥ असे बोलून शिष्यांबरोबर ते श्रीमान मुनिवर लक्ष्मणाला तसेच राम व सीतेला बरोबर घेऊन, पर्वत आणि गंगा नदी यांच्यामधील प्रदेशात गेले. ते स्थान त्यांनी रामांना दाखविले. मग सर्व जगाचे निवासस्थान असलेल्या रामांनी तेथे एक अतिशय विस्तीर्ण पर्णशाला तसेच एक पूर्वपश्चिम आणि एक दक्षिणोत्तर अशी दोन सुंदर घरे तयार करवून घेतली. (८९-९०) जानक्या सहितो रामो लक्ष्मणेन समन्वितः । तत्र ते देवसदृशा ह्यवसन् भवनात्तमे ॥ ९१ ॥ जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह, देवसदृश असणारे राम तेथे त्या उत्तम भवनात राहू लागले. (९१) वाल्मीकिना तत्र सुपूजितोऽयं रामः ससीतः सह लक्ष्मणेन । देवैर्मुनीन्द्रैः सहितो मुदास्ते स्वर्गे यथा देवपतिः सशच्या ॥ ९२ ॥ देवांचा राजा इंद्र ज्या प्रमाणे देव आणि शचीसह स्वर्गात आनंदाने राहातो, त्याप्रमाणे वाल्मीकीकडून चांगल्या प्रकारे सन्मानित झालेले श्रीराम हे सीता व लक्ष्मण यांच्यासमवेत आणि मुनिश्रेष्ठांसह तेथे आनंदाने राहू लागले. (९२) इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे अयोध्याकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥ अयोध्याकाण्डातील सहावा सर्गः समाप्त ॥ ६ ॥ |