अंशुमतो भगिरस्य च तपस्या, ब्रह्मणा भगीरथस्याभीष्टं वरं प्रदाय गङ्गां धारयितुं शिवस्य प्रसादनार्थं प्रययितुं तस्मै सम्मतिदानम् -
|
अंशुमान आणि भगीरथाची तपस्या, ब्रह्मदेवांनी भगीरथाला अभीष्ट वर देऊन गंगेला धारण करण्यासाठी भगवान् शंकरांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगणे -
|
कालधर्मं गते राम सगरे प्रकृतीजनाः ।
राजानं रोचयामासुरंशुमन्तं सुधार्मिकम् ॥ १ ॥
|
श्रीरामा ! सगराचा मृत्यु झाल्यानंतर प्रजाजनांनी परम धर्मात्मा अंशुमानास राजा बनविण्याची रुचि प्रकट केली. ॥ १ ॥
|
स राजा सुमहानसीदंशुमान् रघुनन्दन ।
तस्य पुत्रो महानासीद् दिलीप इति विश्रुतः ॥ २ ॥
|
रघुनन्दना ! अंशुमान फार प्रतापी राजा झाला. त्याच्या पुत्राचे नाव दिलीप होते. तोही एक महान पुरुष होता. ॥ २ ॥
|
तस्मै राज्यं समादिश्य दिलीपे रघुनन्दन ।
हिमवच्छिखरे रम्ये तपस्तेपे सुदारुणम् ॥ ३ ॥
|
'रघुनन्दना ! अंशुमान दिलीपाला राज्य देऊन हिमालयाच्या रमणीय शिखरावर निघून गेले आणि तेथे अत्यंत कठोर तपस्या करू लागले. ॥ ३ ॥
|
द्वात्रिंशच्छतसाहस्रं वर्षाणि सुमहायशाः ।
तपोवनगतो राजा स्वर्गं लेभे तपोधनः ॥ ४ ॥
|
महान यशस्वी राजा अंशुमानाने तपोवनात जाऊन बत्तीस हजार वर्षेपर्यंत तप केले. त्या तपोधन नरेशाने तेथेच शरीराचा त्याग करून स्वर्गलोक प्राप्त केला. ॥ ४ ॥
|
दिलीपस्तु महातेजाः श्रुत्वा पैतामहं वधम् ।
दुःखोपहतया बुद्ध्या निश्चयं नाध्यगच्छत ॥ ५ ॥
|
आपल्या पितामहांच्या वधाचा वृत्तांत ऐकून महातेजस्वी दिलीपही फार दुःखी रहात असे. गंगेला पृथ्वीवर आणण्याच्या उपायासंबंधात आपल्या बुद्धीने खूप विचार करूनही ते कुठल्याही निश्चयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. ॥ ५ ॥
|
कथं गङ्गावतरणं कथं तेषां जलक्रिया ।
तारयेयं कथं चैतानिति चिन्तापरोऽभवत् ॥ ६ ॥
|
ते सदा याच चिंतेत बुडलेले असत की कुठल्या प्रकारे जलाञ्जलि देता येईल आणि कशा प्रकारे मी आपल्या पितरांचा उद्धार करू शकेन. ॥ ६ ॥
|
तस्य चिन्तयतो नित्यं धर्मेण विदितात्मनः ।
पुत्रो भगीरथो नाम जज्ञे परमधार्मिकः ॥ ७ ॥
|
प्रतिदिन याच चिंतेत पडलेल्या राजा दिलीपाला, जो आपल्या धरमाचरणामुळे खूप विख्यात होता, भगीरथ नामक एक परम धर्मात्मा पुत्र प्राप्त झाला. ॥ ७ ॥
|
दिलीपस्तु महातेजा यज्ञैर्बहुभिरिष्टवान् ।
त्रिंशद्वर्षसहस्राणि राजा राज्यमकारयत् ॥ ८ ॥
|
महातेजस्वी दिलीपाने अनेक यज्ञांचे अनुष्ठान केले आणि तीस हजार वर्षेपर्यंत राज्य केले. ॥ ८ ॥
|
अगत्वा निश्चयं राजा तेषामुद्धरणं प्रति ।
व्याधिना नरशार्दूल कालधर्ममुपेयिवान् ॥ ९ ॥
|
पुरुषसिंह ! पितरांच्या उद्धाराच्या विषयी कुठल्याही निश्चयापर्यंत न पोहोंचता, राजा दिलीप रोगाने पीडित होऊन मृत्यु पावले. ॥ ९ ॥
|
इन्द्रलोकं गतो राजा स्वार्जितेनैव कर्मणा ।
राज्ये भगीरथं पुत्रमभिषिच्य नरर्षभः ॥ १० ॥
|
पुत्र भगीरथाचा राज्यावर अभिषेक करून नरश्रेष्ठ राजा दिलीप स्वतःच्या पुण्यकर्माच्या प्रभावाने इंद्रलोकांत गेले. ॥ १० ॥
|
भगीरथस्तु राजर्षिः धार्मिको रघुनन्दन ।
अनपत्यो महातेजाः प्रजाकामः स च प्रजाः ॥ ११ ॥
मन्त्रिष्वाधाय तद् राज्यं गङ्गावतरणे रतः ।
स तपो दीर्घं समातिष्ठद् गोकर्णे रघुनन्दन ॥ १२ ॥
|
रघुनन्दन ! धर्मात्मा राजर्षि महाराज भगीरथाला काही संतान नव्हते. त्याला संतान प्राप्तीची इच्छा असूनही, तो प्रजा आणि राज्याच्या रक्षणाचा भार मंत्र्यांच्यावर ठेवून गंगेला पृथ्वीवर आणण्याच्या प्रयत्नास लागला, आणि गोकर्ण तीर्थामध्ये फार मोठी तपस्या करू लागला. ॥ ११-१२ ॥
|
ऊर्ध्वबाहुः पञ्चतपा मासाहारो जितेन्द्रियः ।
तस्य वर्षसहस्राणि घोरे तपसि तिष्ठतः ॥ १३ ॥
अतीतानि महाबाहो तस्य राज्ञो महात्मनः ।
|
'महाबाहु ! ते आपल्या दोन्ही भुजा वर उचलून पञ्चाग्निचे सेवन करीत असत आणि इंद्रियांना काबूत ठेवून एका एका महिन्यानंतर आहार ग्रहण करीत असत. या प्रकारे घोर तपस्येमध्ये लागलेल्या महात्मा राज भागीरथाची एक हजार वर्षे या प्रमाणे निघून गेली. ॥ १३ १/२ ॥
|
सुप्रीतो भगवान् ब्रह्मा प्रजानां प्रभुरीश्वरः ॥ १४ ॥
ततः सुरगुणैः सार्धमुपागम्य पितामहः ।
भगीरथं महात्मानं तप्यमानमथाब्रवीत् ॥ १५ ॥
|
या योगे प्रजांचे स्वामी भगवान् ब्रह्मदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. पितामह ब्रह्मदेवांनी तेथे जाऊन तपस्येत मग्न असलेल्या महात्मा भगीरथास या प्रकारे म्हटले - ॥ १४-१५ ॥
|
भगीरथ महाराज प्रीतस्तेऽहं जनाधिप ।
तपसा च सुतप्तेन वरं वरय सुव्रत ॥ १६ ॥
|
'महाराज भगीरथ ! तुमच्या या उत्तम तपस्येने मी खूप प्रसन्न झालो आहे. श्रेष्ठ व्रताचे पालन करणार्या नरेश्वरा ! तू काही वर माग.' ॥ १६ ॥
|
तमुवाच महातेजाः सर्वलोकपितामहम् ।
भगीरथो महाबाहुः कृताञ्जलिपुटः स्थितः ॥ १७ ॥
|
तेव्हां महातेजस्वी महाबाहु भगीरथ हात जोडून त्यांच्या समोर उभे राहिले आणि त्या सर्वलोक पितामहांना (ब्रह्मदेवांना) या प्रकारे बोलले - ॥ १७ ॥
|
यदि मे भगवान् प्रीतो यद्यस्ति तपसःफलम् ।
सगरस्यात्मजाः सर्वे मत्तः सलिलमाप्नुयुः ॥ १८ ॥
|
'भगवन् ! जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल आणि जर या तपस्येचे काही उत्तम फळ असेल तर सगरांच्या सर्व पुत्रांना माझ्या हातून गंगेचे जल प्राप्त होवो. ॥ १८ ॥
|
गङ्गायाः सलिलक्लिन्ने भस्मन्येषां महात्मनाम् ।
स्वर्गं गच्छेयुरत्यन्तं सर्वे च प्रपितामहाः ॥ १९ ॥
|
'या महात्म्यांच्या भस्मराशीला गंगेच्या जलाने भिजविल्यावर माझ्या सर्व प्रपितामहांना अक्षय स्वर्गलोक मिळावा. ॥ १९ ॥
|
देव याचे ह संतत्यै नावसीदेत् कुलं च नः ।
इक्ष्वाकूणां कुले देव एष मेऽस्तु वरः परः ॥ २० ॥
|
'देवा ! मी संततीसाठीही आपली प्रार्थना करीत आहे. आमच्या कुळाची परंपरा कधी नष्ट होऊ नये. भगवन् ! माझ्या द्वारा मागितलेला उत्तम वर संपूर्ण इक्ष्वाकुवंशाला लागू पडला पाहिजे.' ॥ २० ॥
|
उक्तवाक्यं तु राजानं सर्वलोकपितामहः ।
प्रत्युवाच शुभां वाणीं मधुरां मधुराक्षराम् ॥ २१ ॥
|
राजा भगीरथाने असे म्हटल्यावर सर्वलोकपितामह ब्रह्मदेवांनी मधुर शब्दांच्या आपल्या परम कल्याणमयी गोड वाणीमध्ये म्हटले - ॥ २१ ॥
|
मनोरथो महानेष भगीरथ महारथ ।
एवं भवतु भद्रं ते इक्ष्वाकुकुलवर्धन ॥ २२ ॥
|
'इक्ष्वाकुवंशाची वृद्धि करणार्या महारथी भगीरथा ! तुझे कल्याण होवो ! तुझा हा महान् मनोरथ याच रूपात पूर्ण होवो. ॥ २२ ॥
|
इयं हैमवती ज्येष्ठा गङ्गा हिमवतः सुता ।
तां वै धारयितुं राजन् हरस्तत्र नियुज्यताम् ॥ २३ ॥
|
'राजन् ! ही आहे हिमालयाची ज्येष्ठ पुत्री हैमावती गंगा. हिला धारण करण्यासाठी भगवान् शंकरांना प्रसन्न करून घे. ॥ २३ ॥
|
गङ्गायाः पतनं राजन् पृथिवी न सहिष्यति ।
तां वै धारयितुं राजन् नान्यं पश्यामि शूलिनः ॥ २४ ॥
|
महाराज ! गंगेच्या खाली अवतरण्याचा वेगही पृथ्वी सहन करू शकणार नाही. मी त्रिशूलधारी भगवान् शंकरांच्या शिवाय आणखी कोणाला असे पाहू शकत नाही की जो या गंगेला धारण करू शकेल. ॥ २४ ॥
|
तमेवमुक्त्वा राजानं गङ्गां चाभाष्य लोककृत् ।
जगाम त्रिदिवं देवैः सर्वैः सह मरुद्गणैः ॥ २५ ॥
|
राजाला असे सांगून लोकस्रष्टा ब्रह्मदेवांनी भगवती गंगेला भगीरथावर अनुग्रह करण्यास सांगितले. यानंतर ते संपूर्ण देवता आणि मरुद्गणांसह स्वर्गलोकास निघून गेले. ॥ २५ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे द्विचत्वारिंशः सर्गः ॥ ४२ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा बेचाळीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ४२ ॥
|