श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। षड्‌‍विंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामकर्तृकस्ताटकावधः - श्रीरामद्वारा ताटकेचा वध -
मुनेर्वचनमक्लीबं श्रुत्वा नरवरात्मजः ।
राघवः प्राञ्जलिर्भूत्वा प्रत्युवाच दृढव्रतः ॥ १ ॥
मुनिंचे उत्साहवर्धक वचन ऐकून दृढतापूर्वक उत्तम व्रताचे पालन करणार्‍या राजकुमार श्रीरामाने हात जोडून असे उत्तर दिले -॥ १ ॥
पितुर्वचननिर्देशात् पितुर्वचनगौरवात् ।
वचनं कौशिकस्येति कर्तव्यमविशङ्‍कया ॥ २ ॥
"विश्वामित्र मुनिंची आज्ञा काही एक शंका न घेता पाळावी, अशी पित्याची प्रत्यक्ष आज्ञा झाली आहे आणि पित्याचे वचन मला अत्यंत प्रमाणभूत आहे. ॥ २ ॥
अनुशिष्टोऽस्म्ययोध्यायां गुरुमध्ये महात्मना ।
पित्रा दशरथेनाहं नावज्ञेयं हि तद्वचः ॥ ३ ॥
'अहो ! विश्वामित्र मुनिंच्या भाषणाची कधीही अवहेलना करू नको अशी आज्ञा महात्मा पिता दशरथाने अयोध्येत असताना वसिष्ठ वामदेव प्रभृति गुरुजनांच्या समक्ष मला केली आहे. ॥ ३ ॥
सोऽहं पितुर्वचः श्रुत्वा शासनाद् ब्रह्मवादिनः ।
करिष्यामि न संदेहस्ताटकावधमुत्तमम् ॥ ४ ॥
तेव्हां मी पित्याची आज्ञा शिरसा मान्य करून ब्रह्मवेत्त्याच्या आज्ञेने उत्कृष्ट धर्माला कारणीभूत होणारा ताटकेचा वध मनामधे कसलाही संदेह न आणता करीन. ॥ ४ ॥
गोब्राह्मणहितार्थाय देशस्य च हिताय च ।
तव चैवाप्रमेयस्य वचनं कर्त्तुमुद्यतः ॥ ५ ॥
'गो ब्राह्मण आणि संपूर्ण देशाच्या हितासाठी मी आपल्यासारख्या अनुपम प्रभावशाली महात्म्याच्या आदेशचे पालन करण्यास सर्व प्रकारे तयार आहे." ॥ ५ ॥
एवमुक्त्वा धनुर्मध्ये बद्ध्वा मुष्टिमरिन्दमः ।
ज्याघोषं अकरोत् तीव्रं दिशः शब्देन नादयन् ॥ ६ ॥
असे बोलून शत्रुदमन श्रीरामांनी धनुष्याच्या मध्यभागी मूठ वळून त्यास जोराने पकडून त्याच्या प्रत्यञ्चेचा प्रचंड टणत्कार केला. त्याच्या आवाजाने सर्व दिशा दुमदुमून निघाल्या. ॥ ६ ॥
तेन शब्देन वित्रस्तास्ताटकावनवासिनः ।
ताटका च सुसंक्रुद्धा तेन शब्देन मोहिता ॥ ७ ॥
त्या टणत्काराने ताटकावनात राहणारे सर्व प्राणी भयभीत व कावरेबावरे झाले. ताटकाही त्या टणत्काराने प्रथम किंकर्तव्यमूढ झाली. पण जरा सावरल्यावर विचार करून अतिशय क्रुद्ध झाली. ॥ ७ ॥
तं शब्दमभिनिध्याय राक्षसी क्रोधमूर्च्छिता ।
श्रुत्वा चाभ्यद्रवत् क्रुद्धा यत्र शब्दो विनिःसृतः ॥ ८ ॥
तो शब्द ऐकून ती राक्षसी क्रोधाने अगदी बेभान झाली. तो नाद ऐकून ज्या दिशेने तो आवाज आला होता त्या दिशेकडे ती त्वेषाने धावत निघाली. ॥ ८ ॥
तां दृष्ट्‍वा राघवः क्रुद्धां विकृतां विकृताननाम् ।
प्रमाणेनातिवृद्धां च लक्ष्मणं सोऽभ्यभाषत ॥ ९ ॥
शरीराने ती उंच व धिप्पाड होती. तिचे मुखही आक्राळ विक्राळ होते. क्रोधाने आविष्ट झालेल्या त्या विक्राळ साक्षसीकडे दृष्टिपात करून श्रीराम लक्ष्मणास म्हणाले - ॥ ९ ॥
पश्य लक्ष्मण यक्षिण्या भैरवं दारुणं वपुः ।
भिद्येरन् दर्शनादस्या भीरूणां हृदयानि च ॥ १० ॥
"हे लक्ष्मणा ! या यक्षिणीचे हे घोर आणि भयंकर असे रूप अवलोकन कर. हिच्या केवळ दर्शनानेच भित्र्या पुरुषांची हृदये विदीर्ण होऊ शकतील. ॥ १० ॥
एतां पश्य दुराधर्षां मायाबलसमन्विताम् ।
विनिवृत्तां करोम्यद्य हृतकर्णाग्रनासिकाम् ॥ ११ ॥
'अरे पहा ! मायाबलाने संपन्न आणि म्हणून अत्यंत दुर्जय अशा या यक्षिणीचे कान आणि नाक कापून टाकून आज मी हिला परतण्यास विवश करतो. ॥ ११ ॥
न ह्येनामुत्सहे हन्तुं स्त्रीस्वभावेन रक्षिताम् ।
वीर्यं चास्या गतिं चैव हनिष्यामीति मे मतिः ॥ १२ ॥
'आपल्या स्त्रीस्वभावाने ही रक्षित असल्यामुळे (स्त्री जातीचा वध करणे अनुचित या नियमानुसार सुरक्षित असल्याने) मला हिचा वध करणे प्रशस्त वाटत नाही. माझा असा विचार आहे की मी हिचा पराक्रम, बल आणि हात-पाय तोडून हिची गमनशक्तिच नष्ट करावी." ॥ १२ ॥
एवं ब्रुवाणे रामे तु ताटका क्रोधमूर्च्छिता ।
उद्यम्य बाहू गर्जन्ती राममेवाभ्यधावत ॥ १३ ॥
श्रीराम याप्रमाणे बोलत असतानाच क्रोधाने अत्यंत बेभान झालेली ताटका तेथे येऊन पोहोचली आणि गर्जना करीत करीत हात उगारून थेट रामाकडे झेपावली. ॥ १३ ॥
विश्वामित्रस्तु ब्रह्मर्षिर्हुङ्‍कारेणाभिभर्त्स्य ताम् ।
स्वस्ति राघवयोरस्तु जयं चैवाभ्यभाषत ॥ १४ ॥
हे पाहून ब्रह्मर्षि विश्वामित्रांनी आपल्या हुंकाराने तिला दटावून म्हटले, "रघुकुलातील या दोन राजकुमारांचे कल्याण होवो. यांचा विजय असो." ॥ १४ ॥
उद्‌धून्वाना रजो घोरं ताटका राघवावुभौ ।
रजोमेघेन महता मुहूर्तं सा व्यमोहयत् ॥ १५ ॥
तेव्हा ताटकेने त्या दोन्ही रघुवंशी वीरांवर भयंकर धूळ उडविण्यास आरंभ केला. तेथे धुळीचा जणु प्रचंड ढगच बनला. त्याद्वारे तिने श्रीराम आणि लक्ष्मणास दोन घटकापर्यंत मोहित केले. ॥ १५ ॥
ततो मायां समास्थाय शिलावर्षेण राघवौ ।
अवाकिरत् सुमहता ततश्चुक्रोध राघवः ॥ १६ ॥
तत्पश्चात मायेचा आश्रय घेऊन ती त्या दोन्ही बंधुंवर पाषाणांची वृष्टि करू लागली. हे पाहून रघुनाथ तिच्यावर फार क्रुद्ध झाले. ॥ १६ ॥
शिलावर्षं महत् तस्याः शरवर्षेण राघवः ।
प्रतिवार्योपधावन्त्याः करौ चिच्छेद पत्रिभिः ॥ १७ ॥
रघुवीरांनी आपल्या बाणांची वृष्टि करून तिच्या त्या भयंकर पाषाणवृष्टिचे निवारण केले आणि आपल्याकडे धावत येणार्‍या त्या निशाचरीचे दोन्ही हात तीक्ष्ण सायकांनी छाटून टाकले. ॥ १७ ॥
ततश्छिन्नभुजां श्रान्तामभ्याशे परिगर्जतीम् ।
सौमित्रिरकरोत् क्रोधाद्धृतकर्णाग्रनासिकाम् ॥ १८ ॥
दोन्ही भुजा तोडल्या गेल्याने थकलेली ती ताटका त्याच्याजवळ येऊन मोठमोठ्याने गर्जना करू लागली. हे पाहून सुमित्राकुमार लक्ष्मणाने क्रोधाविष्ट होऊन तिचे नाक कान कापून टाकले. ॥ १८ ॥
कामरूपधरा सा तु कृत्वा रूपाण्यनेकशः ।
अन्तर्धानं गता यक्षी मोहयन्ती स्वमायया ॥ १९ ॥
तदनंतर ती इच्छेप्रमाणे रूप धारण करणारी यक्षिणी असल्याने तिने अनेक प्रकारची रूपे धारण करून श्रीराम आणि लक्ष्मणांना मोहित करून अदृश्य झाली. ॥ १९ ॥
अश्मवर्षं विमुञ्चन्ती भैरवं विचचार सा ।
ततस्तामश्मवर्षेण कीर्यमाणौ समन्ततः ॥ २० ॥

दृष्ट्‍वा गाधिसुतः श्रीमानिदं वचनमब्रवीत् ।
अलं ते घृणया राम पापैषा दुष्टचारिणी ॥ २१ ॥

यज्ञविघ्नकरी यक्षी पुरा वर्धेत मायया ।
वध्यतां तावदेवैषा पुरा संध्या प्रवर्तते ॥ २२ ॥

रक्षांसि संध्याकाले तु दुर्धर्षाणि भवन्ति हि ।
आता ती पाषाणांची भयंकर वृष्टि करीत आकाशातून विचरण करू लागली. श्रीराम आणि लक्ष्मणांवर चारी बाजूने प्रस्तरांची वृष्टि होत असलेली पाहून तेजस्वी गाधिनंदन विश्वामित्र याप्रमाणे बोलले - "श्रीराम ! तुझे हिच्यावर दया करणे व्यर्थ आहे. ही अत्यंत पापी आणि दुराचारी आहे. नेहमी यज्ञात विघ्न उत्पन्न करीत असते. ही आपल्या मायेने पुन्हा प्रबल होण्यापूर्वीच हिला मारून टाक. आता संध्याकाल होऊ पहात आहे, त्यापूर्वीच हे कार्य होणे आवश्यक आहे. कारण संध्येच्या समयी राक्षस दुर्जय होत असतात." ॥ २०-२२ १/२ ॥
इत्युक्तः स तु तां यक्षीमश्मवृष्ट्याभिवर्षिणीम् ॥ २३ ॥

दर्शयञ्शब्दवेधित्वं तां रुरोध स सायकैः ।
विश्वामित्रांनी असे म्हटल्यावर श्रीरामाने शब्दवेधी बाण चालविण्याच्या आपल्या शक्तिचा परिचय देत बाण मारून प्रस्तरांची वृष्टि करणार्‍या त्या यक्षिणीला सर्व बाजूंनी अवरुद्ध केले. ॥ २३ १/२ ॥
सा रुद्धा बाणजालेन मायाबलसमन्विता ॥ २४ ॥

अभिदुद्राव काकुत्स्थं लक्ष्मणं च विनेदुषी ।
तामापतन्तीं वेगेन विक्रान्तामशनीमिव ॥ २५ ॥

शरेणोरसि विव्याध सा पपात ममार च ।
त्यांच्या बाणसमूहाने घेरली गेल्यावर मायाबलाने युक्त ती यक्षीण जोरजोराने गर्जना करीत श्रीराम आणि लक्ष्मणांवर तुटून पडली. इंद्राने फेकलेल्या वज्राप्रमाणे अत्यंत वेगाने तिला येताना पाहून श्रीरामांनी एक बाण मारून तिचे वक्षःस्थल विदीर्ण करून टाकले; तेव्हां ताटका पृथ्वीवर पडली आणि मरून गेली. ॥ २४-२५ १/२ ॥
तां हतां भीमसङ्‍काशां दृष्ट्‍वा सुरपतिस्तदा ॥ २६ ॥

साधु साध्विति काकुत्स्थं सुराश्चाप्यभिपूजयन् ।
त्या भयंकर राक्षसीचा वध झाला आहे हे पाहून देवराज इंद्र आणि देवतांनी 'साधु साधु' म्हणून श्रीरामाचे अभिनंदन करून त्यांनी श्रीरामांची प्रशंसा केली. ॥ २६ १/२ ॥
उवाच परमप्रीतः सहस्राक्षः पुरन्दरः ॥ २७ ॥

सुराश्च सर्वे संहृष्टा विश्वामित्रमथाब्रुवन् ।
त्या समयी सहस्रलोचन इंद्र आणि समस्त देवतांनी अत्यंत प्रसन्न आणि हर्षोत्स्फुल्ल होऊन विश्वामित्रांना म्हटले - ॥ २७ १/२ ॥
मुने कौशिक भद्रं ते सेन्द्राः सर्वे मरुद्‍गणाः ॥ २८ ॥

तोषिताः कर्मणानेन स्नेहं दर्शय राघवे ।
'हे मुने ! कुशिकनंदन ! आपले कल्याण असो. आपण या कार्याने इंद्रासहित सर्व देवतांना संतुष्ट केले आहे. आता रघुकुलतिलक श्रीरामावर आपण आपला स्नेह प्रकट करावा. ॥ २८ १/२ ॥
प्रजापतेः कृशाश्वस्य पुत्रान् सत्यपराक्रमान् ॥ २९ ॥

तपोबलभृतो ब्रह्मन् राघवाय निवेदय ।
'ब्रह्मन् ! प्रजापति कृशाश्वाच्या अस्त्ररूपधारी पुत्रांना, जे सत्य पराक्रम आणि तपोबलाने संपन्न आहेत, श्रीरामास समर्पित करावे. ॥ २९ १/२ ॥
पात्रभूतश्च ते ब्रह्मंस्तवानुगमने रतः ॥ ३० ॥

कर्तव्यं सुमहत् कर्म सुराणां राजसूनुना ।
'विप्रवर ! आपण हे कृशाश्वपुत्र अस्त्रदान करण्यास सुयोग्य पात्र आहात आणि आपले तेही अनुसरण (सेवा-सुश्रुषा) करण्यात तत्पर राहात असतात. राजकुमार रामांकडून देवतांचे महान् कार्य संपन्न होणार आहे." ॥ ३० १/२ ॥
एवमुक्त्वा सुराः सर्वे जग्मुर्हृष्टा विहायसम् ॥ ३१ ॥

विश्वामित्रं पूजयन्तस्ततः संध्या प्रवर्तते ।
असे म्हणून सर्व देवता विश्वामित्रांची प्रशंसा करीत प्रसन्नतापूर्वक आकाशमार्गाने निघून गेले. तत्पश्चात संध्या झाली. ॥ ३१ १/२ ॥
ततो मुनिवरः प्रीतस्ताटकावधतोषितः ॥ ३२ ॥

मूर्ध्नि राममुपाघ्राय इदं वचनमब्रवीत् ।
त्यानंतर ताटकावधाने संतुष्ट झालेले मुनिवर विश्वामित्र यांनी श्रीरामचंद्रांच्या मस्तकाचे अवघ्राण करून त्यांना म्हटले - ॥ ३२ १/२ ॥
इहाद्य रजनीं राम वसाम शुभदर्शन ॥ ३३ ॥

श्वःप्रभाते गमिष्यामस्तदाश्रमपदं मम ।
"शुभदर्शन रामा ! आजची रात्र आपण येथेच निवास करू. उद्या सकाळी आपण आपल्या आश्रमाकडे जाऊ." ॥ ३३ १/२ ॥
विश्वामित्रवचः श्रुत्वा हृष्टो दशरथात्मजः ॥ ३४ ॥

उवास रजनीं तत्र ताटकाया वने सुखम् ।
विश्वामित्रांचे हे बोलणे ऐकून दशरथकुमार श्रीराम अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी ताटकावनात राहून ती रात्र सुखाने व्यतीत केली. ॥ ३४ १/२ ॥
मुक्तशापं वनं तच्च तस्मिन्नेव तदाहनि ।
रमणीयं विबभ्राज यथा चैत्ररथं वनम् ॥ ३५ ॥
त्याच दिवशी ते वन शापमुक्त होऊन रमणीय शोभेने संपन्न झाले. आणि चैत्ररथ वनाप्रमाणे आपली मनोहर छटा दाखवू लागले. ॥ ३५ ॥
निहत्य तां यक्षसुतां स रामः
     प्रशस्यमानः सुरसिद्धसंघैः ।
उवास तस्मिन् मुनिना सहैव
     प्रभातवेलां प्रतिबोध्यमानः ॥ ३६ ॥
यक्षकन्या ताटकेचा वध करून श्रीरामचंद्र देवता आणि सिद्धसमूह यांच्या प्रशंसेस पात्र बनले. त्यांनी प्रातःकालची प्रतीक्षा करीत विश्वामित्रांसह ताटका वनांत निवास केला. ॥ ३६ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे षड्‌विंशः सर्गः ॥ २६ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा सव्विसावा सर्ग समाप्त झाला. ॥ २६ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP