हनुमता सीतायै मुद्रिकाया अर्पणं कदा श्रीराघवो मामुद्धरिष्यतीति सौत्सुक्यं सीतायाः प्रश्नो हनुमता श्रीरामस्य सीताविषयकमनुरागं वर्णयित्वा सीतायाः सान्त्वनं च -
|
हनुमन्तानी सीतेला मुद्रिका देणे, सीतेने राम केव्हा माझा उद्धार करतील असे उत्सुक होऊन विचारणे; तथा हनुमन्तांनी श्रीरामाचे, सीतेविषयीच्या प्रेमाचे वर्णन करून तिला सान्त्वना देणे -
|
भूय एव महातेजा हनुमान् पवनात्मजः ।
अब्रवीत् प्रश्रितं वाक्यं सीताप्रत्ययकारणात् ॥ १ ॥
|
त्यानन्तर महातेजस्वी वायुपुत्र हनुमान सीतेला आपला विश्वास वाटावा यासाठी पुन्हा नम्रपणे तिला म्हणाले- ॥१॥
|
वानरोऽहं महाभागे दूतो रामस्य धीमतः ।
रामनामाङ्कितं चेदं पश्य देव्यङ्गुलीयकम् ॥ २ ॥
|
हे महाभाग्यशालिनी ! मी परम बुद्धिमान रामाचा दूत असलेला वानर आहे. हे देवी ! ही रामनामांकित मुद्रिका आहे, ही माझ्यापाशी असलेली अंगठी तू पहा. ॥२॥
|
प्रत्ययार्थं तवानीतं तेन दत्तं महात्मना ।
समाश्वसिहि भद्रं ते क्षीणदुःखफला ह्यसि ॥ ३ ॥
|
तुला विश्वास वाटावा म्हणून महात्मा श्रीरामचन्द्रांनी ती मजजवळ दिली होती. ती मी तुझ्यासाठी येथे आणिली आहे. तुझे कल्याण असो ! तू आता धैर्य धारण कर. तुझ्या पूर्वसंचित पापाचे जे दुःखदायक फळ तुला आतापर्यन्त मिळत होते, ते संपत आले आहे. ॥३॥
|
गृहीत्वा प्रेक्षमाणा सा भर्तुः करविभूषणम् ।
भर्तारमिव सम्प्राप्तं जानकी मुदिताऽभवत् ॥ ४ ॥
|
आपल्या पतीचे हस्तभूषण असलेली ती मुद्रिका हातात घेऊन सीता ती लक्षपूर्वक पाहू लागली. तेव्हा जणु कांही प्रत्यक्ष तिचे पतीदेवच तिला भेटले असावे असा आनन्द तिला झाला. ॥४॥
|
चारु तद् वदनं तस्याsताम्रशुक्लायतेक्षणम् ।
बभूव हर्षोदग्रं च राहुमुक्त इवोडुराट् ॥ ५ ॥
|
तिचे आरक्त आणि शुक्ल वर्णाच्या नेत्रांनी युक्त असलेले मनोहर सुन्दर मुख हर्षाने प्रफुल्लित होऊन जणु ग्रहण सुटलेल्या नक्षत्रधिपती चन्द्रम्याप्रमाणे आल्हादकारक दिसू लागले. ॥५॥
|
ततः सा ह्रीमती बाला भर्तृः सन्देशहर्षिता ।
परितुष्टा प्रियं कृत्वा प्रशशंस महाकपिम् ॥ ६ ॥
|
ती अंगठी पाहिल्यावर, पतीचा सन्देश प्राप्त झालेली व त्यामुळे आनन्दित झालेली ती विनयशील बाला सीता अत्यन्त प्रसन्न झाली आणि आदरपूर्वक त्या महाकपिची प्रशंसा करू लागली- ॥६॥
|
विक्रान्तस्त्वं समर्थस्त्वं प्राज्ञस्त्वं वानरोत्तम ।
येनेदं राक्षसपदं त्वयैकेन प्रधर्षितम् ॥ ७ ॥
|
ती म्हणाली - हे वानरश्रेष्ठा ! तू एकट्याने या राक्षसस्थानामध्ये प्रवेश केलास त्या अर्थी तू अत्यन्त पराक्रमी, शक्तिमान आणि बुद्धिमान आहेस. ॥७॥
|
शतयोजनविस्तीर्णः सागरो मकरालयः ।
विक्रमश्लाघनीयेन क्रमता गोष्पदीकृतः ॥ ८ ॥
|
मकरांचे निवासस्थान असलेला हा शंभर योजने विस्तीर्ण असा हा सागर उल्लंघन करून, तू या सागराला गाईच्या खुराप्रमाणे करून टाकले आहेस, म्हणून तुझ्या या पराक्रमामुळे तू प्रशंसा करण्यास योग्य आहेस. तुझा पराक्रम खरोखरच प्रशंसनीय आहे. ॥८॥
|
न हि त्वां प्राकृतं मन्ये वानरं वानरर्षभ ।
यस्य ते नास्ति सन्त्रासो रावणादपि सम्भ्रमः ॥ ९ ॥
|
हे वानरश्रेष्ठा ! तुला मी कुणी साधारण वानर मानीत नाही कारण रावणासारख्या राक्षसांपासूनही तुला कुठल्याही प्रकारे भय, त्रास अथवा उद्वेग वाटत नाही आहे. ॥९॥
|
अर्हसे च कपिश्रेष्ठ मया समभिभाषितुम् ।
यद्यपि प्रेषितस्तेन रामेण विदितात्मना ॥ १० ॥
|
हे कपिश्रेष्ठा ! स्वपराक्रमाने प्रसिद्ध आणि आत्मज्ञानी भगवान श्रीरामांनी जर तुला धाडलेला असेल तर तू माझ्याशी भाषण करण्यास नक्कीच योग्य आहेस. ॥१०॥
|
प्रेषयिष्यति दुर्धषो रामो न ह्यपरीक्षितम् ।
पराक्रममविज्ञाय मत्सकाशं विशेषतः ॥ ११ ॥
|
ते अजिंक्य राम, परीक्षा केल्याखेरीज आणि पराक्रम पाहिल्यावाचून विशेषतः माझ्याकडे कोणाला कधी धाडणार नाही. ॥११॥
|
दिष्ट्या च कुशली रामो धर्मात्मा सत्यसंगरः ।
लक्ष्मणश्च महातेजाः सुमित्रानन्दवर्धनः ॥ १२ ॥
|
धर्मात्मा सत्यप्रतिज्ञ श्रीराम तसेच सुमित्रेचा आनन्द वृद्धिगत करणारा महातेजस्वी लक्ष्मणही कुशल आहे, हे जाणून मला अतिशय आनन्द झाला आहे. आणि हा शुभ संवाद माझ्यासाठी सौभाग्यसूचक आहे, असेच मी समजते. ॥१२॥
|
कुशली यदि काकुत्स्थः किं न सागरमेखलाम् ।
महीं दहति कोपेन युगान्ताग्निरिवोत्थितः ॥ १३ ॥
|
परन्तु काकुत्स्थकुळभूषण श्रीराम जर कुशल आहेत तर प्रलयाग्नीप्रमाणे ते कोपाने ही सर्व समुद्रवलयांकित पृथ्वी दग्ध का बरे करून टाकीत नाहीं ? ॥१३॥
|
अथवा शक्तिमन्तौ तौ सुराणामपि निग्रहे ।
ममैव तु न दुःखानामस्ति मन्ये विपर्ययः ॥ १४ ॥
|
अथवा ते उभयता रामलक्ष्मण देवांचाही निग्रह करण्यास समर्थ आहेत, आणि तरी ते दोघे गप्पच राहिले आहेत. तेव्हा माझ्याच दुःखाचा अन्त होण्याची वेळ अद्यापि आलेली नाही असे मला वाटते. ॥१४॥
|
कच्चिन्न व्यथते रामः कच्चिन्न परितप्यते ।
उत्तराणि च कार्याणि कुरुते पुरुषोत्तमः ॥ १५ ॥
|
बरे तू हे तर सांग की पुरुषोत्तम श्रीरामचन्द्रांच्या मनान्त कुठली व्यथा तर नाही ना ? ते सन्तप्त तर होत नाही ना ? त्यांना पुढे जे काही करावयाचे असते ते ते करतात की नाही ? ॥१५॥
|
कच्चिन्न दीनः सम्भ्रान्तः कार्येषु च न मुह्यति ।
कच्चित् पुरुषकार्याणि कुरुते नृपतेः सुतः ॥ १६ ॥
|
त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दैन्य अथवा भिती तर नाही ना ? काम करता करता ते मोहवश तर होऊन जात नाहीत ना ? ते राजकुमार श्रीराम पुरुषोचित कार्य तर करत आहेत ना ? ॥१६॥
|
द्विविधं त्रिविधोपायमुपायमपि सेवते ।
विजिगीषुः सुहृत् कच्चिन्मित्रेषु च परन्तपः ॥ १७ ॥
|
शत्रूंना सन्ताप देणारे श्रीराम त्यांच्या मित्रांबरोबर मित्रभाव ठेवून साम आणि दाम या दोन उपायांचे अवलंबन करीत आहेत ना ? तथा शत्रूंना जिंकण्याची इच्छा ठेवून दान, भेद आणि दण्ड या तीन प्रकारांचे अवलंबन करीत आहेत ना ? ॥१७॥
|
कच्चिन्मित्राणि लभतेऽमित्रैश्चाप्यभिगम्यते ।
कच्चित् कल्याणमित्रश्च मित्रैश्चापि पुरस्कृतः ॥ १८ ॥
|
स्वतः श्रीराम प्रयत्नपूर्वक मित्रांचा संग्रह करीत आहेत ना ? त्यांचे शत्रूही शरणागत होऊन संरक्षण व्हावे म्हणून त्यांच्याजवळ येत असतात ना ? त्यांनी मित्रांच्यावर उपकार करून स्वतःसाठी त्यांना कल्याणकारी बनवले आहे ना ? ते आपल्या मित्रांकडून कधी उपकृत किंवा पुरस्कृत होत असतात ना ? ॥१८॥
|
कच्चिदाशास्ति देवानां प्रसादं पार्थिवात्मजः ।
कच्चित् पुरुषकारं च दैवं च प्रतिपद्यते ॥ १९ ॥
|
राजकुमार श्रीराम कधी देवतांच्या कृपा प्रसादाची इच्छा करतात की नाही - त्यांची कृपा व्हावी म्हणून कधी प्रार्थना करतात की नाही ? ते पुरुषार्थ आणि दैव दोन्हीचा आश्रय घेतात की नाही ? ॥१९॥
|
कच्चिन्न विगतस्नेहः विवासान्मयि राघवः ।
कच्चिन्मां व्यसनादस्मान्मोक्षयिष्यति राघवः ॥ २० ॥
|
दुर्भाग्याने मी त्यांच्यापासून दुरावले आहे. या कारणामुळे ते माझ्या बाबतीत स्नेहहीन तर झाले नाहीत ना ? ते मला या संकटातून कधी सोडवतील ना ? ॥२०॥
|
सुखानामुचितो नित्यं असुखानामनूचितः ।
दुःखमुत्तरमासाद्य कच्चिद् रामो न सीदति ॥ २१ ॥
|
ते सदा सुख भोगण्यासच योग्य आहेत, दुःख भोगण्यास नव्हे. पण दुःखांमागून दुःखे सहन करावी लागल्यामुळे श्रीराम अधिक खिन्न आणि शिथिल तर झालेले नाहीत ना ? ॥२१॥
|
कौसल्यायास्तथा कच्चित् सुमित्रायास्तथैव च ।
अभीक्ष्णं श्रूयते कच्चित् कुशलं भरतस्य च ॥ २२ ॥
|
त्यांना माता कौसल्या, सुमित्रा तसेच भरताचा समाचार बरोबर मिळत असतो ना ? ॥२२॥
|
मन्निमित्तेन मानार्हः कच्चिच्छोकेन राघवः ।
कच्चिन्नान्यमना रामः कच्चिन्मां तारयिष्यति ॥ २३ ॥
|
सन्माननीय राघव, माझ्यामुळे त्यांना जो शोक उत्पन्न झाला आहे, त्यामुळे सन्तप्त तर झाले नाही ना ? माझ्याशिवाय अन्यत्र त्यांचे मन गेले नाही ना ? मला या संकटातून ते तारून नेतील ना ? ॥२३॥
|
कच्चिदक्षौहिणीं भीमां भरतो भ्रातृवत्सलः ।
ध्वजिनीं मन्त्रिभिर्गुप्तां प्रेषयिष्यति मत्कृते ॥ २४ ॥
|
आपल्या भावावर प्रेम करणारा भरत माझ्या उद्धारासाठी (सुटकेसाठी) मन्त्र्यांच्या द्वारा सुरक्षित भयंकर अक्षौहिणी सेना धाडून देईल ना ? ॥२४॥
|
वानराधिपतिः श्रीमान् सुग्रीवः कच्चिदेष्यति ।
मत्कृते हरिभिर्वीरैर्वृतो दन्तनखायुधैः ॥ २५ ॥
|
श्रीमान वानरराज सुग्रीव दात आणि नखांनी प्रहार करणार्या वीर वानरांसह माझी सुटका करण्यासाठी येथपर्यत येण्याचे कष्ट घेतील ना ? ॥२५॥
|
कच्चिच्च लक्ष्मणः शूरः सुमित्रानन्दवर्धनः ।
अस्त्रविच्छरजालेन राक्षसान् विधमिष्यति ॥ २६ ॥
|
सुमित्रेचा आनन्द वाढविणारा शूरवीर लक्ष्मण जे अनेक अस्त्रांचे ज्ञाते आहेत, ते आपल्या बाणांचा वर्षाव करून राक्षसांचा संहार करतील ना ? ॥२६॥
|
रौद्रेण कच्चिदस्त्रेण रामेण निहतं रणे ।
द्रक्ष्याम्यल्पेन कालेन रावणं ससुहृज्जनम् ॥ २७ ॥
|
मी रावणाला त्याच्या सुहृदजनांसह थोडेच दिवसात श्रीरामांनी युद्धात सोडलेल्या भयंकर अस्त्रशस्त्रांनी मारला गेलेला पाहीन ना ? ॥२७॥
|
कच्चिन्न तद्धेमसमानवर्णं
तस्याननं पद्मसमानगन्धि ।
मया विना शुष्यति शोकदीनं
जलक्षये पद्ममिवातपेन ॥ २८ ॥
|
ज्याप्रमाणे प्रखर उन्हाने सरोवरातील पाणी आटून गेले की कमळ वाळून-सुकून जाते, त्याप्रमाणे सुवर्णासारखे तेजस्वी आणि पद्मासारखे सुगन्धी असे त्या श्रीरामांचे मुख माझ्या वियोगामुळे उत्पन्न झालेल्या शोकाने म्लान आणि शुष्क तर होत चालले नाही ना ? ॥२८॥
|
धर्मापदेशात् त्यजतः स्वराज्यं
मां चाप्यरण्यं नयतः पदातेः ।
नासीद् यथा यस्य न भीर्न शोकः
कच्चित् स धैर्यं हृदये करोति ॥ २९ ॥
|
धर्मपालनाच्या उद्देश्याने आपल्या राज्याचा त्याग करतांना आणि मलाही बरोबर घेऊन अरण्यात जातांना ज्या सदाचारी रामांना जराही भय अथवा शोक उत्पन्न झाला नाही, ते राम या संकट समयी हृदयात धैर्य धारण करीत आहेत ना ? ॥२९॥
|
न चास्य माता न पिता न चान्यः
स्नेहाद् विशिष्टोऽस्ति मया समो वा ।
तावद्ध्यहं दूत जिजीविषेयं
यावत् प्रवृत्तिं शृणुयां प्रियस्य ॥ ३० ॥
|
हे दूता ! त्यांचे माता-पिता अथवा अन्य कोणी स्नेही संबन्धीही असे कुणीही नाही की ज्यांना त्यांचे प्रेम माझ्याहून अधिक अथवा माझ्या बरोबरीने प्राप्त झाले आहे. जोपर्यन्त मी आपल्या प्रियतमांचा श्रीरामांचा वृत्तान्त, येथे येण्यासंबन्धी त्यांच्या प्रवृत्तीसंबन्धी ऐकत राहीन, तोपर्यत मी जीविताची आशा धरून राहीन. ॥३०॥
|
इतीव देवी वचनं महार्थं
तं वानरेन्द्रं मधुरार्थमुक्त्वा ।
श्रोतुं पुनस्तस्य वचोऽभिरामं
रामार्थयुक्तं विरराम रामा ॥ ३१ ॥
|
याप्रमाणे त्या वानरश्रेष्ठाशी गंभीर अर्थयुक्त आणि मधुर वचन बोलून देवी सीता श्रीरामांविषयीचा वृत्तान्त ज्यात आहे असे हनुमन्तांचे चित्ताकर्षक ऐकण्यासाठी स्तब्ध राहिली. ॥३१॥
|
सीताया वचनं श्रुत्वा मारुतिर्भीमविक्रमः ।
शिरस्यञ्जलिमाधाय वाक्यमुत्तरमब्रवीत् ॥ ३२ ॥
|
सीतेचे भाषण ऐकून महापराक्रमी मारूती मस्तकावर हात जोडून तिला म्हणाले- ॥३२॥
|
न त्वामिहस्थां जानीते रामः कमललोचने ।
तेन त्वां नानयत्याशु शचीमिव पुरन्दरः ॥ ३३ ॥
|
हे देवी ! कमलनयन भगवान श्रीरामाला तू लंकेमध्ये राहात आहेस या गोष्टीचा पत्ता नाही. म्हणूनच इन्द्राने दानवांपासून शचीला ज्याप्रमाणे उचलून नेले त्याप्रमाणे श्रीराम आपल्याला येथून शीघ्र घेऊन गेले नाहीत. ॥३३॥
|
श्रुत्वैव च वचो मह्यं क्षिप्रमेष्यति राघवः ।
चमूं प्रकर्षन् महतीं हर्यृक्षगणसंयुताम् ॥ ३४ ॥
|
ज्यावेळी मी येथून परत जाईन त्यावेळी माझ्याकडून सर्व वृत्तान्त जाणून लगेचच राघव वानर आणि अस्वलांची विशाल सेना घेऊन तेथून निघतील. ॥३४॥
|
विष्टम्भयित्वा बाणौधैः अक्षोभ्यं वरुणालयम् ।
करिष्यति पुरीं लङ्कां काकुत्स्थः शान्तराक्षसाम् ॥ ३५ ॥
|
काकुत्स्थकुळभूषण श्रीराम आपल्या बाणांच्या समूहाने अक्षोभ्य महासागरालाही स्तब्ध करून त्यावर सेतु बान्धून लङ्कापुरीत पोहोचतील आणि तिला राक्षसरहित करून टाकतील. ॥३५॥
|
तत्र यद्यन्तरा मृत्युः यदि देवा महासुराः ॥
स्थास्यन्ति पथि रामस्य स तानपि वधिष्यति ॥ ३६ ॥
|
त्यावेळी श्रीरामाच्या मार्गात जरी मृत्यु, अन्य देवता अथवा मोठमोठे असुर जरी विघ्न बनून आडवे आले तरी ते त्या सर्वांचाही संहार करून टाकतील. ॥३६॥
|
तवादर्शनजेनार्ये शोकेन परिपूरितः ।
न शर्म लभते रामः सिंहार्दित इव द्विपः ॥ ३७ ॥
|
आर्ये ! तुझे दर्शन न झाल्याने उत्पन्न झालेल्या शोकाने त्यांचे हृदय व्याप्त झाले आहे, त्यामुळे सिंहाने पीडित झालेल्या हत्ती प्रमाणे श्रीरामास क्षणभरही चैन पडत नाही आहे. ॥३७॥
|
मन्दरेण च ते देवि शपे मूलफलेन च ।
मलयेन च विन्ध्येन मेरुणा दर्दुरेण च ॥ ३८ ॥
यथा सुनयनं वल्गु बिम्बोष्ठं चारुकुण्डलम् ।
मुखं द्रक्ष्यसि रामस्य पूर्णचन्द्रमिवोदितम् ॥ ३९ ॥
|
हे देवी ! मन्दार आदि पर्वत हे आमचे निवासस्थान आहे आणि फल मूळ आमचे भोजन आहे. म्हणून मी मन्दराचल, मलय, विन्ध्य, मेरू आणि दुर्दर पर्वताची तसेच आमच्या जीविकेचे साधन असणार्या फलमूलादिंची शपथ घेऊन सांगतो की तू लवकरच सुन्दर नेत्र आणि बिम्बफलाप्रमाणे लाल-लाल ओठ असलेले आणि सुन्दर कुण्डलांनी अलंकृत व चित्ताकर्षक असे नवोदित पूर्ण चन्द्राप्रमाणे अत्यन्त मनोहर असे श्रीरामांचे मुख पाहशील. ॥३८-३९॥
|
क्षिप्रं द्रक्ष्यसि वैदेहि रामं प्रस्रवणे गिरौ ।
शतक्रतुमिवासीनं नागपृष्ठस्य मूर्धनि ॥ ४० ॥
|
हे वैदेही ! ऐरावताच्या पाठीवर बसलेल्या देवराज इन्द्राप्रमाणे प्रस्त्रवण गिरीच्या शिखरावर विराजमान अशा श्रीरामाचे दर्शन तुला लवकरच होईल. ॥४०॥
|
न मांसं राघवो भुङ्क्ते न चैव मधु सेवते ।
वन्यं सुविहितं नित्यं भक्तमश्नाति पञ्चमम् ॥ ४१ ॥
|
कुणीही रघुवंशी मांस खात नाहीत आणि मधुचे सेवन ही करीत नाहीत मग भगवान श्रीराम या वस्तुंचे सेवन कसे बरे करतील ? ते सदा चार समयात उपवास करून पाचव्या समयी शास्त्र विहित जंगली फळमूळ आणि ओदन यांचेच भोजन करतात. ॥४१॥
|
नैव दंशान् न मशकान् न कीटान् न सरीसृपान् ।
राघवोऽपनयेद् गात्रात् त्वद्गतेनान्तरात्मना ॥ ४२ ॥
|
श्रीरामाचे अन्तःकरण केवळ तुझ्या ठिकाणीच खिळून गेले असल्यामुळे डास, माश्या, कीटक आणि सर्प हे आपल्या शरीराजवळ आले तरीही ते त्यांना दूर करीत नाहीत, त्यांना त्यांची जाणीवही नसते. ॥४२॥
|
नित्यं ध्यानपरो रामो नित्यं शोकपरायणः ।
नान्यत् चिन्तयते किञ्चित् स तु कामवशं गतः ॥ ४३ ॥
|
श्रीराम तुझ्या प्रेमाला वशीभूत होऊन सदा तुझेच ध्यान करतात आणि निरन्तर तुझ्या विरहजनित शोकातच बुडून राहातात. तुझ्याखेरीज दुसर्या कुठल्याही गोष्टीचा ते विचारच करीत नाहीत. ॥४३॥
|
अनिद्रः सततं रामः सुप्तोऽपि च नरोत्तमः ।
सीतेति मधुरां वाणीं व्याहरन् प्रतिबुद्ध्यते ॥ ४४ ॥
|
नरश्रेष्ठ श्रीरामास सदा तुझी चिन्ता वाटत असल्याने त्यांना कधी स्वस्थ झोप ही लागत नाही. जर कधी डोळा लागला तर ते सीता सीता या मधुर वाणीचा उच्चार करीत तात्काळ जागे होतात (उठून बसतात) ॥४४॥
|
दृष्ट्वा फलं वा पुष्पं वा यच्चान्यत् स्त्रीमनोहरम् ।
बहुशो हा प्रियेत्येवं श्वसंस्त्वामभिभाषते ॥ ४५ ॥
|
फळ, पुष्प अथवा स्त्रियांचे मन हरण करणारी अशी दुसरी काही वस्तु दृष्टीस पडली म्हणजे हे प्रिये, हे प्रिये ! असे सुस्कारे टाकीत ते बोलू लागतात (तुला संबोधू लागतात) ॥४५॥
|
स देवि नित्यं परितप्यमान-
स्त्वामेव सीतेत्यभिभाषमाणः ।
दृढव्रतो राजसुतो महात्मा
तवैव लाभाय कृतप्रयत्नः ॥ ४६ ॥
|
हे देवी ! राजकुमार महात्मा श्रीराम तुझ्यासाठी नेहमी शोक करीत असतात. ते सीता सीता म्हणून तुलाच उद्देशून बोलत असतात (अथवा तुझाच घोसरा काढीत असतात) आणि उत्तम व्रताचे पालन करीत तुझ्याच प्राप्तीच्या प्रयत्नास लागलेले असतात. ॥४६॥
|
सा रामसङ्कीर्तनवीतशोका
रामस्य शोकेन समानशोका ।
शरन्मुखेनाम्बुदशेषचन्द्रा
निशेव वैदेहसुता बभूव ॥ ४७ ॥
|
श्रीरामचन्द्राविषयीच्या चर्चेने प्रथम तर सीतेचा स्वतःचा शोक दूर झाला परन्तु श्रीरामांच्या शोकासंबन्धी ऐकून ती परत त्यांच्याप्रमाणेच शोकात मग्न झाली. त्यावेळी विदेहनन्दिनी सीता, शरद ऋतू आल्यावर मेघांचा समुदाय आणि चन्द्रमा या दोन्हीने युक्त (अन्धःकार आणि प्रकाशपूर्ण) रात्रीप्रमाणे (हर्ष आणि शोक यांनी युक्त झाल्याने) शोभू लागली. ॥४७॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे षट्त्रिंशः सर्गः ॥ ३६ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा छत्तीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥३६॥
|