वाल्मीकिःश्चतुर्विंशतिसहस्रश्लोकयुतं रामायणं काव्यं निर्माय कुशीलवौ तदध्यापयत्, तथा रामायणगानं श्रुत्वा मुनिभिः प्रशंसनमयोध्यायां श्रीरामेण सम्मानिताभ्यां ताभ्यां तदीयराजसभायां रामायणगानश्रावणम् -
|
महर्षि वाल्मीकिंनी चोवीस हजार श्लोकांनी युक्त रामायणकाव्याची निर्मिती करून ते लवकुशास शिकविणे, मुनिमण्डळींमध्ये रामायणगान करून लव आणि कुश यांची प्रशंसा होणे, तसेच अयोध्येत श्रीरामांकडून सन्मानित होऊन त्या दोघांनी राम दरबारामध्ये रामायणगान ऐकविणे -
|
प्राप्तराज्यस्य रामस्य वाल्मीकिर्भगवानृषिः ।
चकार चरितं कृत्स्नं विचित्रपदमर्थवत् ॥ १ ॥
|
श्रीरामचंद्रांनी जेव्हां वनातून परत येऊन राज्याचे शासन आपल्या हातात घेतले, त्यानंतर भगवान् वाल्मीकि मुनिंनी त्यांच्या संपूर्ण चरित्रावर आधारित विचित्र पदे आणि अर्थांनी युक्त रामायण काव्य निर्माण केले ॥ १ ॥
|
चतुर्विंशत्सहस्राणि श्लोकानां उक्तवानृषिः ।
तथा सर्गशतान् पञ्च षट्काण्डानि तथोत्तरम् ॥ २ ॥
|
त्यात महर्षिंनी चोवीस हजार श्लोक, पांचशे सर्ग आणि उत्तरकाण्डासहित सात काण्डांमध्ये प्रस्तुत केले आहे. ॥ २ ॥
|
कृत्वा तु तन्महाप्राज्ञः सभविष्यं सहोत्तरम् ।
चिंतयामास को न्वेतत् प्रयुञ्जीयादिति प्रभुः ॥ ३ ॥
|
भविष्यात घडणारे चरित्र आणि उत्तरकाण्डासहित समस्त रामायण पूर्ण केल्यानंतर सामर्थ्यशाली, महाज्ञानी महर्षिंनी विचार केला की असा कोण शक्तिशाली पुरुष असेल की जो या महाकाव्याचे पठण करून जनसमुदायास ऐकवू शकेल ॥ ३ ॥
|
तस्य चिंतयमानस्य महर्षेर्भावितात्मनः ।
अगृह्णीतां ततः पादौ मुनिवेषौ कुशीलवौ ॥ ४ ॥
|
शुद्ध अंतःकरणाच्या त्या महर्षिंनी या प्रकारे विचार करीत असता मुनिवेषात वावरणारे राजकुमार कुश आणि लवांनी येऊन त्यांच्या चरणी प्रणाम केला. ॥ ४ ॥
|
कुशीलवौ तु धर्मज्ञौ राजपुत्रौ यशस्विनौ ।
भ्रातरौ स्वरसम्पन्नौ ददर्शाश्रमवासिनौ ॥ ५ ॥
स तु मेधाविनौ दृष्ट्वा वेदेषु परिनिष्ठितौ ।
वेदोपबृंहणार्थाय तावग्राहयत प्रभुः ॥ ६ ॥
काव्यं रामायणं कृत्स्नं सीतायाश्चरितं महत् ।
पौलस्त्यवधमित्येवं चकार चरितव्रतः ॥ ७ ॥
|
राजकुमार कुश आणि लव दोघे बंधु धर्माचे उत्तम ज्ञाते आणि यशस्वी होते. त्यांचा स्वर (कंठ) अत्यंत मधुर होता, आणि ते मुनिंच्या आश्रमातच राहात होते. त्यांची धारणाशक्ति अद्भुत होती आणि ते दोघेही वेदांत पारंगत झालेले होते. भगवान् वाल्मीकिंनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना सुयोग्य समजून, उत्तम व्रताचे पालन करणार्या त्या महर्षिंनी वेदार्थाचे विस्ताराने ज्ञान करविण्यासाठी त्यांना सीतेच्या चरित्राने युक्त संपूर्ण रामायण नामक महाकाव्याचे, ज्याचे दुसरे नाम पौलस्त्यवध अथवा दशाननवध होते, अध्ययन करविले. ॥ ५-७ ॥
|
पाठ्ये गेये च मधुरं प्रमाणैस्त्रिभिरन्वितम् ।
जातिभिः सप्तभिर्युक्तं तन्त्रीलयसमन्वितम् ॥ ८ ॥
रसैः शृङ्गारकरुणहास्यरौद्रभयानकैः ।
वीरादिभी रसैर्युक्तं काव्यं एतदगायताम् ॥ ९ ॥
|
ते महाकाव्य पठण करणे आणि गाणे यातही मधुर, द्रुत, मध्य आणि विलंबित - या तिन्ही गतिंनी अन्वित, षडज् आदि सातही स्वरांनी युक्त, वीणा वाजवून स्वर तालासह गाण्यायोग्य आणि शृंगार, करुण, हास्य, रौद्र, भयानक आणि वीर आदि सर्व रसांनी अनुप्रणित आहे. दोघे बंधु, कुश आणि लव, महाकाव्याचे पठण करून त्याचे गान करू लागले. ॥ ८-९ ॥
|
तौ तु गान्धर्वतत्त्वज्ञौ स्थानमूर्च्छनकोविदौ ।
भ्रातरौ स्वरसम्पन्नौ गन्धर्वाविव रूपिणौ ॥ १० ॥
|
ते दोघे बंधु गांधर्व विद्येचे (संगीत शास्त्राचे) तत्त्वज्ञ, स्थान** आणि मूर्च्छनेचे++ जाणकार, मधुर स्वरांनी संपन्न आणि गंधर्वांप्रमाणे मनोहर रूप असणारे होते. ॥ १० ॥
|
रूपलक्षणसम्पन्नौ मधुरस्वरभाषिणौ ।
बिम्बादिवोत्थितौ बिम्बौ रामदेहात् तथापरौ ॥ ११ ॥
|
सुंदर रूप आणि शुभ लक्षणे ही त्यांची सहज संपत्ती होती. ते दोन्ही भाऊ अत्यंत मधुर स्वरात वार्तालाप करीत असत. जसे बिंबातून प्रतिबिंब प्रकट होते त्याप्रकारे श्रीरामाच्या शरीरापासून उत्पन्न झालेले ते दोन्ही राजकुमार दुसरे युगल श्रीरामच प्रतीत होत होते. ॥ ११ ॥
|
तौ राजपुत्रौ कार्त्स्न्येन धर्म्यमाख्यानमुत्तमम् ।
वाचोविधेयं तत्सर्वं कृत्वा काव्यमनिन्दितौ ॥ १२ ॥
ऋषीणां च द्विजातीनां साधूनां च समागमे ।
यथोपदेशं तत्त्वज्ञौ जगतुः सुसमाहितौ ॥ १३ ॥
|
ते दोघे राजकुमार सर्व लोकांच्या प्रशंसेला पात्र होते. दोघांनी त्या धर्मानुकूल उत्तम उपाख्यांनी युक्त संपूर्ण काव्यास जिव्हाग्र (तोंड पाठ) केले होते आणि जेव्हां केव्हां ऋषि, ब्राह्मण आणि साधुंचा समागम होत असे त्यावेळी तेथे बसून ते दोघे तत्त्वज्ञ बालक एकाग्रचित्त होऊन रामायणाचे गान करीत असत. ॥ १२-१३ ॥
|
महात्मानौ महाभागौ सर्वलक्षणलक्षितौ ।
तौ कदाचित् समेतानामृषीणां भावितात्मनाम् ॥ १४ ॥
मध्ये सभं समीपस्थाविदं काव्यमगायताम् ।
तच्छ्रुत्वा मुनयः सर्वे बाष्पपर्याकुलेक्षणाः ॥ १५ ॥
साधु साध्विति तावूचुः परं विस्मयमागताः ।
ते प्रीतमनसः सर्वे मुनयो धर्मवत्सलाः ॥ १६ ॥
|
कोणे एके समयी बर्याचशा शुद्ध अंतःकरण असलेल्या महर्षिंचा समुदाय एकत्र जमला होता. त्यात महान् भाग्यशाली आणि समस्त शुभ लक्षणांनी युक्त, सुशोभित, महामनस्वी कुश आणि लवही उपस्थित होते. त्यांनी महात्माम्यांच्या त्या सभेत रामायण महाकाव्याचे गान केले. ते ऐकून सर्व मुनिंच्या नेत्रांतून अश्रू दाटून आले आणि ते अत्यंत विस्मय विमुग्ध होऊन त्यांना धन्यवाद देऊ लागले. मुनि धर्मवत्सल तर असतातच. ते धार्मिक उपाख्यान ऐकून सर्वांचे मन प्रसन्न झाले. ॥ १४-१६ ॥
|
प्रशशंसुः प्रशस्तव्यौ गायमानौ कुशीलवौ ।
अहो गीतस्य माधुर्यं श्लोकानां च विशेषतः ॥ १७ ॥
|
प्रशंसेस सुयोग्य असणार्या रामायण कथेचे गायन करण्यार्या लव-कुशाची सर्व मुनि प्रशंसा करू लागले. ते म्हणाले - "अहो ! या बालकांच्या गीतात किती माधुर्य आहे ! श्लोकांची मधुरता तर फारच अद्भुत आहे. ॥ १७ ॥
|
चिरनिर्वृत्तमप्येतत् प्रत्यक्षमिव दर्शितम् ।
प्रविश्य तावुभौ सुष्ठु तथाभावमगायताम् ॥ १८ ॥
सहितौ मधुरं रक्तं सम्पन्नं स्वरसम्पदा ।
|
'जरी या काव्यात वर्णन केलेल्या घटना फार दिवसापूर्वी घडलेल्या असल्या तरीही या दोन्ही बालकांनी या सभेत येऊन एकसाथ अशा सुंदर भावाने स्वरसंपन्न, रागयुक्त मधुरगान केले आहे, की पूर्वी घडलेल्या त्या घटना जणू नुकत्याच घडत असल्याप्रमाणे प्रत्यक्षशा दिसून येत आहेत. जणू आत्ता आत्ता आपल्या डोळ्यांसमोर घडत आहेत. ॥ १८ १/२ ॥
|
एवं प्रशस्यमानौ तौ तपः श्लाघ्यैर्महर्षिभिः ॥ १९ ॥
संरक्ततरमत्यर्थं मधुरं तावगायताम् ।
|
या प्रकारे उत्तम तपस्येने युक्त महर्षिगण त्या कुमारांची प्रशंसा करत असत आणि त्यांच्याकडून प्रशंसित होऊन ते कुमार अत्यंत मधुर रागात रामायणाचे गान करीत असत. ॥ १९ १/२ ॥
|
प्रीतः कश्चिन्मुनिस्ताभ्यां संस्थितः कलशं ददौ ॥ २० ॥
प्रसन्नो वल्कलं कश्चित् ददौ ताभ्यां महायशाः ।
अन्यः कृष्णाजिनमदाद् यज्ञसूत्रं तथापरः ॥ २१ ॥
|
त्यांच्या गानाने संतुष्ट झालेल्या कुणा मुनीने उठून त्यांना पुरस्कार रूपाने एक कलश प्रदान केला; कुणी दुसर्या एका महायशस्वी मुनिने प्रसन्न होऊन त्या दोघांना वल्कल वस्त्रे दिली. कुणी काळे मृगचर्म भेट दिले तर कुणी योज्ञोपवीत दिले. ॥ २०-२१ ॥
|
कश्चित् कमण्डलुं प्रादान्मौञ्जीमन्यो महामुनिः ।
बृसीमन्यस्तदा प्रादात् कौपीनमपरो मुनिः ॥ २२ ॥
ताभ्यां ददौ तदा हृष्टः कुठारमपरो मुनिः ।
काषायमपरो वस्त्रं चीरमन्यो ददौ मुनिः ॥ २३ ॥
|
एकाने कमण्डलु दिला तर दुसर्या महामुनिने मुञ्जाची मेखला भेट दिली. तिसर्याने आसन, चवथ्याने कौपीन प्रदान केले. कुणा अन्य मुनिने हर्षाने भरून जाऊन त्या दोन्ही बालकांना कुठार अर्पण केली. कुणी भगवी वस्त्रे दिले तर कुणी मुनिंचे वस्त्र भेट दिले ॥ २२-२३ ॥
|
जटाबन्धनमन्यस्तु काष्ठरज्जुं मुदान्वितः ।
यज्ञभाण्डमृषिः कश्चित् काष्ठभारं तथापरः ॥ २४ ॥
औदुम्बरीं बृसीमन्यः स्वस्ति केचित् तदावदन् ।
आयुष्यमपरे प्राहुर्मुदा तत्र महर्षयः ॥ २५ ॥
ददुश्चैवं वरान् सर्वे मुनयः सत्यवादिनः ।
|
कुणी अन्याने आनंदमग्न होऊन जटा बांधण्यासाठी गोफ दिले, तर कुणी समिधा बांधून आणण्यासाठी दोरी प्रदान केली. एका ऋषिने यज्ञपात्र दिले तर कुणा एकाने काष्ठभार समर्पित केला. कुणी औदुंबराच्या लाकडाचा केलेला पाट (चौरंग) अर्पण केला. काही महर्षि त्यावेळी आशिर्वाद देऊ लागले - 'मुलांनो ! तुम्हां दोघांचे कल्याण होवो!' दुसरे एक महर्षि प्रसन्नतापूर्वक म्हणाले 'तुमचे आयुष्य वाढो !' याप्रकारे सर्व सत्यवादी मुनींनी त्या दोघांना नाना प्रकारचे वर दिले. ॥ २४-२५ १/२ ॥
|
आश्चर्यमिदमाख्यानं मुनिना सम्प्रकीर्तितम् ॥ २६ ॥
परं कवीनामाधारं समाप्तं च यथाक्रमम् ।
|
महर्षि वाल्मीकि द्वारा वर्णित हे आश्चर्यमय काव्य परवर्ती कविंसाठी श्रेष्ठ आधारशिला आहे. श्रीरामचंद्रांच्या संपूर्ण चरित्राचे क्रमशः वर्णन करीत याची समाप्ति केली गेली आहे. ॥ २६ १/२ ॥
|
अभिगीतमिदं गीतं सर्वगीतेषु कोविदौ ॥ २७ ॥
आयुष्यं पुष्टिजननं सर्वश्रुतिमनोहरम् ।
|
संपूर्ण गीतांचे विशेषज्ञ राजकुमारांनो ! हे काव्य आयु आणि पुष्टि प्रदान करणारे आणि सर्वांचे कानाला व मनाला मोहित करणारे मधुर संगीत आहे. तुम्ही दोघांनी अत्यंत सुंदर रीतीने याचे गान केले आहे. ॥ २७ १/२ ॥
|
प्रशस्यमानौ सर्वत्र कदाचित् तत्र गायकौ ॥ २८ ॥
रथ्यासु राजमार्गेषु ददर्श भरताग्रजः ।
स्ववेश्म चानीय ततो भ्रातरौ स कुशीलवौ ॥ २९ ॥
पूजयामास पूजार्हौ रामः शत्रुनिबर्हणः ।
आसीनः काञ्चने दिव्ये स च सिंहासने प्रभुः ॥ ३० ॥
उपोपविष्टैः सचिवैर्भ्रातृभिश्च समन्वितः ।
दृष्ट्वा तु रूपसम्पन्नौ विनितौ भ्रातरावुभौ ॥ ३१ ॥
उवाच लक्ष्मणं रामः शत्रुघ्नं भरतं तथा ।
श्रूयतामेतदाख्यानमनयोर्देववर्चसोः ॥ ३२ ॥
विचित्रार्थपदं सम्यग्गायकौ समचोदयत् ।
|
एके समयी सर्वत्र प्रशंसा केले गेलेले राजकुमार कुश आणि लव अयोध्येच्या गल्लीबोळांतून, सडकांवरून, रस्त्यांतुन रामायणाच्या श्लोकांचे गान करत विचरत होते. त्याचवेळी भरतांचे थोरले बंधु श्रीराम यांची दृष्टी त्यांच्यावर पडली. त्यांनी त्या समादर योग्य बंधूंना आपल्या राजगृही बोलावले आणि त्यांचा यथोचित सन्मान केला. तदनंतर शत्रूंचा संहार करणारे श्रीराम सुवर्णमय सिंहासनावर विराजमान झाले. त्यांचे मंत्री आणि बंधुही त्यांच्याजवळ बसले होते. त्या सर्वांसह सुंदर रूपवान, विनयशील अशा त्या दोन्ही भावांकडे पाहून श्रीरामचंद्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना म्हणाले - ' देवताप्रमाणे हे तेजस्वी दोन्ही कुमार विचित्र अर्थ आणि पदांनी युक्त मधुर काव्य फार सुंदर रीतीने गाऊन ऐकवीत आहेत. तुम्ही सर्वजण ते ऐका.' असे म्हणून त्यांनी त्या दोघा बंधूंना गाण्याची आज्ञा दिली. ॥ २८-३२ १/२ ॥
|
तौ चापि मधुरं रक्तं स्वचित्तायतनिःस्वनम् ॥ ३३ ॥
तन्त्रीलयवदत्यर्थं विश्रुतार्थमगायताम् ।
ह्लादयत् सर्वगात्राणि मनांसि हृदयानि च ।
श्रोत्राश्रयसुखं गेयं तद् बभौ जनसंसदि ॥ ३४ ॥
|
आज्ञा मिळताच ते दोघे भाऊ वीणेच्या लयीबरोबर आपल्या मनानुकूल तार (उच्च) एवं मधुर स्वरात राग आलापित रामायण काव्याचे गान करू लागले. त्यांचे उच्चारण इतके स्पष्ट होते की ऐकतांच अर्थाचा बोध होत होता. त्यांचे गान ऐकून श्रोत्यांच्या समस्त अंगावर हर्षजनित रोमांच उभे राहिले आणि सर्वांच्या मनात आणि आत्म्यात आनंदाचे तरंग उठू लागले. त्या जनसभेत होणारे ते गान सर्वांच्या श्रवणेंद्रियांना अत्यंत सुखद प्रतीत होत होते. ॥ ३३-३४ ॥
|
इमौ मुनी पार्थिवलक्षणान्वितौ
कुशीलवौ चैव महातपस्विनौ ।
ममापि तद् भूतिकरं प्रचक्षते
महानुभावं चरितं निबोधत ॥ ३५ ॥
|
त्यावेळी श्रीराम आपल्या बंधूंचे ध्यान आकृष्ट करीत म्हणाले - 'हे दोघे कुमार मुनि असूनही राजोचित लक्षणांनी संपन्न आहेत. संगीतामध्ये कुशल असूनही महान तपस्वी आहेत. ते ज्या चरित्राचे, प्रबंधकाव्याचे गान करतात ते शब्दार्थालंकार, उत्तम गुण आणि सुंदर सादरीकरण आदिंनी युक्त असल्यामुळे अत्यंत प्रभावशाली आहे. माझ्यासाठी हे अभ्युदयकारक आहे, असे वृद्ध पुरुषांचे कथन आहे. म्हणून तुम्ही सर्वजण ते ध्यान देऊन ऐका'॥ ३५ ॥
|
ततस्तु तौ रामवचःप्रचोदिता-
वगायतां मार्गविधानसम्पदा ।
स चापि रामः परिषद्गतः शनै-
र्बुभूषयासक्तमना बभूव ॥ ३६ ॥
|
त्यानंतर श्रीरामांच्या आज्ञेने प्रेरित होऊन ते दोघे भाऊ मार्गविधानाच्या%% रीतीने रामायणाचे गान करू लागले. सभेमध्ये बसलेले भगवान् श्रीरामही हळू हळू त्यांचे गान ऐकण्यात तन्मय होऊन गेले. ॥ ३६ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा चौथा सर्ग समाप्त झाला. ॥ ४ ॥
|