भरते महाराजे दशरथे च प्रणयं रक्षितुमनुरुन्धतः श्रीरामस्य पुरवासिनः प्रति दूरे निवर्तनाय प्रार्थना, पौराणां वृद्धब्राह्मणानां रामं प्रति पुरे निवर्तितुमाग्रहस्तैः सह श्रीरामस्य तमसातटे गमनम् -
|
श्रीरामांनी पुरवासी लोकांना भरत आणि महाराज दशरथांच्या प्रति प्रेमभाव ठेवण्याचा अनुरोघ करीत परत जाण्यास सांगणे, नगरातील वृद्ध ब्राह्मणांची श्रीरामांना परत येण्याविषयी आग्रह करणे तथा त्या सर्वांसह श्रीरामांचे तमसा तटावर पोहोचणे -
|
अनुरक्ता महात्मानं रामं सत्यपराक्रमम् ।
अनुजग्मुः प्रयान्तं तं वनवासाय मानवाः ॥ १ ॥
|
इकडे सत्यपराक्रमी महात्मा श्रीराम जेव्हा वनाकडे जाऊ लागले तेव्हां त्यांच्या प्रति अनुराग असणारे बरेचसे अयोध्यावासी (नागरीक) वनात निवास करण्यासाठी त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. ॥१॥
|
निवर्तितेतीव बलात् सुहृद्धर्मेण राजनि ।
नैव ते सन्न्यवर्तंत रामस्यानुगता रथम् ॥ २ ॥
|
'ज्यांच्या संबंधी लौकर परतण्याची कामना केली जाते त्या स्वजनास दूरपर्यंत पोहोचविण्यास जाऊ नये' - इत्यादि रूपाने सांगितलेल्या सुहृद धर्मास अनुसरून ज्यावेळी दशरथ राजांना बलपूर्वक मागे वळविले गेले त्याच वेळी श्रीरामांच्या रथाच्या मागेमागे धावणारे ते अयोध्यावासी मात्र आपल्या घराकडे परतले नाहीत. ॥२॥
|
अयोध्यानिलयानां हि पुरुषाणां महायशाः ।
बभूव गुणसम्पन्नः पूर्णचंद्र इव प्रियः ॥ ३ ॥
|
कारण अयोध्यावासी पुरुषांसाठी सद्गुण संपन्न महायशस्वी राम पूर्ण चंद्राप्रमाणे प्रिय झालेले होते. ॥३॥
|
स याच्यमानः काकुत्स्थस्ताभिः प्रकृतिभिस्तदा ।
कुर्वाणः पितरं सत्यं वनमेवान्वपद्यत ॥ ४ ॥
|
त्या प्रजाजनांनी रामांनी घरी परतून यावे म्हणून खूप प्रार्थना केली परंतु ते पित्याच्या सत्याचे रक्षण करण्यासाठी वनाकडेच पुढे पुढे जात राहिले. ॥४॥
|
अवेक्षमाणः सस्नेहं चक्षुषा प्रपिबन्निव ।
उवाच रामः सस्नेहं ताः प्रजाः स्वाः प्रजा इव ॥ ५ ॥
|
राम प्रजाजनांना अशा प्रकारे स्नेहपूर्ण दृष्टीने पहात राहिले होते की जणु नेत्रांनी ते त्यांना पिऊन टाकीत आहेत. त्या समयी श्रीरामांनी आपल्या संतती प्रमाणे प्रिय त्या प्रजाजनांना स्नेहपूर्वक म्हटले- ॥५॥
|
या प्रीतिर्बहुमानश्च मय्ययोध्यानिवासिनाम् ।
मत्प्रियार्थं विशेषेण भरते सा विधीयताम् ॥ ६ ॥
|
'अयोध्या निवासी लोकांना माझ्याबद्दल जे प्रेम आणि जो आदर आहे तेच प्रेम आणि तसाच आदर माझ्याच प्रसन्नतेसाठी भरताच्या प्रति अधिक प्रमाणात असावयास हवा. ॥६॥
|
स हि कल्याणचारित्रः कैकेय्यानन्दवर्धनः ।
करिष्यति यथावद् वः प्रियाणि च हितानि च ॥ ७ ॥
|
त्यांचे चरित्र फारच सुंदर आणि सर्वांचे कल्याण करणारे आहे. कैकेयीचा आनंद वाढविणारे भरत आपणा लोकांचे यथावत प्रिय आणि हित करतील. ॥७॥
|
ज्ञानवृद्धो वयोबालो मृदुर्वीर्यगुणान्वितः ।
अनुरूपः स वो भर्त्ता भविष्यति भयापहः ॥ ८ ॥
|
'ते वयाने लहान असूनही ज्ञानाने मोठे (ज्ञानवृद्ध) आहेत. पराक्रमोचित गुणांनी संपन्न असूनही ते स्वभावाने अत्यंत कोमल आहेत. ते आपल्यासाठी योग्य राजा होतील आणि प्रजेच्या भयाचे निवारण करतील. ॥८॥
|
स हि राजगुणैर्युक्तो युवराजः समीक्षितः ।
अपि चापि मया शिष्टैः कार्यं वो भर्तृशासनम् ॥ ९ ॥
|
'ते माझ्यापेक्षाही राजोचित गुणांनी अधिक युक्त आहेत म्हणूनच महाराजांनी त्यांना युवराज बनविण्याचा निश्चय केला आहे, म्हणून आपण लोकांनी आपले स्वामी भरत यांच्या आज्ञेचे सदा पालन केले पाहिजे. ॥९॥
|
न सन्तप्येद् यथा चासौ वनवासं गते मयि ।
महाराजस्तथा कार्यो मम प्रियचिकीर्षया ॥ १० ॥
|
'मी वनात निघून गेल्यावर महाराज दशरथ ज्याप्रकारे शोकाने संतप्त होणार नाहीत यासाठी आपण लोकांनी सदा प्रयत्न केले पाहिजेत. माझे प्रिय करण्याच्या इच्छेने आपण माझ्या या प्रार्थनेकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे. ॥१०॥
|
यथायथा दाशरथिर्धर्ममेवाश्रितो भवेत् ।
तथा तथा प्रकृतयो रामं पतिमकामयन् ॥ ११ ॥
|
दशरथनंदन श्रीरामांनी जशी जशी धर्माचा आश्रय घेण्यासंबंधी दृढता व्यक्त केली तसतशी प्रजाजनांच्या मनात त्यांनाच आपले स्वामी बनविण्याची इच्छा प्रबल होत गेली. ॥११॥
|
बाष्पेण पिहितं दीनं रामः सौमित्रिणा सह ।
चकर्षेव गुणैर्बद्धं जनं पुरनिवासिनम् ॥ १२ ॥
|
समस्त पुरवासी अत्यंत दीन होऊन अश्रू ढाळीत होते आणि सौमित्रासह राम जणु आपल्या गुणांनी त्यांना बांधून खेचून नेत होते. ॥१२॥
|
ते द्विजास्त्रिविधं वृद्धा ज्ञानेन वयसौजसा ।
वयःप्रकम्पशिरसो दूरादूचुरिदं वचः ॥ १३ ॥
|
त्यांत बरेचसे ब्राह्मण होते जे ज्ञान, अवस्था आणि तपोबल या तिन्ही दृष्टीने मोठे होते. वृद्धावस्थेमुळे कित्येकांचे मस्तक थरथर कापत होते. ते दुरूनच या प्रकारे बोलले- ॥१३॥
|
वहन्तो जवना रामं भो भो जात्यास्तुरङ्गमाः ।
निवर्तध्वं न गन्तव्यं हिता भवत भर्त्तरि ॥ १४ ॥
|
'अरे, वेगाने जाणार्या उत्तम जातीच्या घोड्यांनो ! तुम्ही फार वेगवान आहात आणि रामाला वनाकडे घेऊन जात आहात. परत या, आपल्या स्वामींचे हितैषी बना. तुम्ही वनात जाता उपओगी नाही. ॥१४॥
|
कर्णवन्ति हि भूतानि विशेषेण तुरङ्गमाः ।
यूयं तस्मान्निवर्तध्वं याचनां प्रतिवेदिताः ॥ १५ ॥
|
'तसे तर सर्वच प्राण्यांना कान असतात, परंतु घोड्यांचे कान मोठे असतात, म्हणून तुम्हाला याचनेचे ज्ञान तर झालेच असले पाहिजे, म्हणून घराकडे परत चला. ॥१५॥
|
धर्मतः स विशुद्धात्मा वीरः शुभदृढव्रतः ।
उपवाह्यस्तु वो भर्त्ता नापवाह्यः पुराद् वनम् ॥ १६ ॥
|
'तुमचे स्वामी श्रीराम विशुद्धात्मा, वीर आणि दृढतेने उत्तम व्रताचे पालन करणारे आहेत, म्हणून तुम्ही त्यांचे उपवहन केले पाहिजे - त्यांना बाहेरून नगर समीप घेऊन आले पाहिजे - नगरांतून वनाकडे त्यांचे अपवहन करणे - त्यांना घेऊन जाणे तुमच्यासाठी कदापि उचित नाही.' ॥१६॥
|
एवमार्तप्रलापांस्तान् वृद्धान् प्रलपतो द्विजान् ।
अवेक्ष्य सहसा रामो रथादवततार ह ॥ १७ ॥
|
वृद्ध ब्राह्मणांना या प्रकारे आर्तभावाने प्रलाप करतांना पाहून श्रीराम एकाएकी रथांतून खाली उतरले. ॥१७॥
|
पद्भ्यामेव जगामाथ ससीतः सहलक्ष्मणः ।
सन्निकृष्टपदन्यासो रामो वनपरायणः ॥ १८ ॥
|
ते सीता आणि लक्ष्मणासह पायीच चालू लागले. ब्राह्मणांच्या बरोबरीने चालता यावे म्हणून ते आपली पावले जवळ जवळ ठेवून चालत होते. लांब टांगा टाकीत चालत नव्हते. वनात पोहोंचणे हेच त्यांच्या यात्रेचे परम लक्ष्य होते. ॥१८॥
|
द्विजातीन् हि पदातींस्तान् रामश्चारित्रवत्सलः ।
न शशाक घृणाचक्षुः परिमोक्तुं रथेन सः ॥ १९ ॥
|
श्रीरामांच्या चरित्रात वात्सल्य गुणाची प्रधानता होती. त्यांच्या दृष्टीमध्ये दया भरलेली होती. म्हणून ते रथांतून जाऊन त्या पायी चालत येणार्या ब्राह्मणांना मागे सोडून (पुढे निघून जाण्याचे) साहस करू शकले नाहीत. ॥१९॥
|
गच्छन्तमेव तं दृष्ट्वा रामं सम्भ्रान्तमानसाः ।
ऊचुः परमसंतप्ता रामं वाक्यमिदं द्विजाः ॥ २० ॥
|
श्रीरामांना अद्यापही वनाकडेच जातांना पाहून ते ब्राह्मण मनातल्या मनात घाबरून गेले आणि अत्यंत संतप्त होऊन त्यांना या प्रकारे म्हणाले- ॥२०॥
|
ब्राह्मण्यं कृत्स्नमेतत् त्वां ब्रह्मण्यमनुगच्छति ।
द्विजस्कंधाधिरूढास्त्वामग्नयोऽप्यनुयान्त्यमी ॥ २१ ॥
|
'रघुनंदन ! तुम्ही ब्राह्मणांचे हितैषी आहात म्हणून हा सारा ब्राह्मण समाज तुमच्या पाठोपाठ येत आहे. या ब्राह्मणांच्या खांद्यावर चढून अग्निदेव ई तुमचे अनुसरण करीत आहे. ॥२१॥
|
वाजपेयसमुत्थानि च्छत्राण्येतानि पश्य नः ।
पृष्ठतोऽनुप्रयातानि मेघानिव जलात्यये ॥ २२ ॥
|
वर्षा ऋतू निघून गेल्यावर शरद ऋतूमध्ये दिसून येणार्या पांढर्या ढगांप्रमाणे दिसणार्या आमच्या या श्वेत छत्रांच्याकडे पहा, जी तुमच्या मागे मागे येत आहेत. ती आम्हाला वाजपेय यज्ञात प्राप्त झालेली आहेत. ॥२२॥
|
अनवाप्तातपत्रस्य रश्मिसन्तापितस्य ते ।
एभिश्छायां करिष्यामः स्वैश्छत्रैर्वाजपेयकैः ॥ २३ ॥
|
'तुम्हाला राजकीय श्वेतछत्र प्राप्त झाले नाही, म्हणून तुम्ही सूर्य देवाच्या किरणांनी संतप्त होत आहात. या अवस्थेत आम्ही वाजपेय यज्ञात प्राप्त झालेल्या या आमच्या छत्रांच्या द्वारे तुमच्यासाठी छाया करूं. ॥२३॥
|
या हि नः सततं बुद्धिर्वेदमन्त्रानुसारिणी ।
त्वत्कृते सा कृता वत्स वनवासानुसारिणी ॥ २४ ॥
|
'वत्स ! आमची जी बुद्धी सदा वेदमंत्रांच्या पाठोपाठ चालत असे- त्यांच्या चिंतनात लागलेली असे, तीच तुमच्यासाठी वनवासाचे अनुसरण करणारी झाली आहे. ॥२४॥
|
हृदयेष्वेवतिष्ठन्ते वेदा ये नः परं धनम् ।
वत्स्यन्त्यपि गृहेष्वेव दाराश्चारित्ररक्षिताः ॥ २५ ॥
|
'जे आमचे परमधन वेद आहेत, ते आमच्या हृदयात स्थित आहेत. आमच्या स्त्रिया आपल्या चारित्र्य बलाने सुरक्षित राहून घरीच राहतील. ॥२५॥
|
पुनर्न निश्चयः कार्यस्त्वद्गतौ सुकृता मतिः ।
त्वयि धर्मव्यपेक्षे तु किं स्याद् धर्मपथे स्थितम् ॥ २६ ॥
|
'आता आम्हांला आपल्या कर्तव्याच्या विषयी पुन्हा काही निश्चय करायचा नाही. आम्ही तुमच्या बरोबरच जाण्याचा विचार स्थिर केलेला आहे. तरी ही आम्हाला इतके अवश्य सांगायचे आहे की 'जर तुम्हीच ब्राह्मणांच्या आज्ञापालनरूपी धर्मा संबंधी निरपेक्ष होऊन गेलात तर दुसरा कोण प्राणी धर्ममार्गावर स्थित राहू शकेल.' ॥२६॥
|
याचितो नो निवर्तस्व हंसशुक्लशिरोरुहैः ।
शिरोभिर्निभृताचार महीपतनपांसुलैः ॥ २७ ॥
|
'सदाचाराचे पोषण करणार्या श्रीरामा ! आमच्या डोक्यावरील केस पिकून हंसा समान सफेद (पांढरे) होऊन गेले आहेत आणि पृथ्वीवर पडून साष्टांंग प्रणाम करण्याने त्यांच्यात धूळ भरली आहे. आम्ही आपली अशी मस्तके नमवून तुमच्याकडे याचना करीत आहो की तुम्ही घरी परत चला. (ते तत्वज्ञ ब्राह्मण हे जाणत होते की श्रीराम साक्षात भगवान विष्णु आहेत. म्हणून त्यांनी श्रीरामांना प्रणाम करणे दोषास्पद नाही.) ॥२७॥
|
बहूनां वितता यज्ञा द्विजानां य इहागताः ।
तेषां समाप्तिरायत्ता तव वत्स निवर्तने ॥ २८ ॥
|
(इतके म्हणूनही जेव्हा श्रीराम थांबले नाहीत तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले- ) 'वत्स ! जे लोक येथे आलेले आहेत, त्यातील बरेचसे असे ब्राह्मण आहेत की ज्यांनी यज्ञाचा आरंभ केलेला आहे आता त्यांच्या यज्ञांची समाप्ती तुमच्या परत येण्यावरच निर्भर आहे. ॥२८॥
|
भक्तिमन्तीह भूतानि जङ्गमाजङ्गमानि च ।
याचमानेषु राम त्वं भक्तिं भक्तेषु दर्शय ॥ २९ ॥
|
'संसारातील स्थावर आणि जंगम सर्व प्राणी तुमच्याप्रति भक्तिभाव बाळगतात. ते सर्व तुमची तुम्ही परत यावे म्हणून प्रार्थना करीत आहेत. आपल्या त्या भक्तांवर तुम्ही आपला स्नेह दाखवावा. ॥२९॥
|
अनुगन्तुमशक्तास्त्वां मूलैरुद्धतवेगिनः ।
उन्नता वायुवेगेन विक्रोशन्तीव पादपाः ॥ ३० ॥
|
'हे वृक्ष आपल्या मूळांच्यामुळे अत्यंत वेगहीन आहेत त्यामुळे ते तुमच्या पाठोपाठ येऊ शकत नाहीत, परंतु वायुच्या वेगामुळे ज्यांच्यात जी सळसळ निर्माण होत आहे, तिच्या द्वारे हे उंच वृक्ष जणु तुम्हाला हाका मारीत आहेत- तुम्ही परत यावे म्हणून प्रार्थना करीत आहेत. ॥३०॥
|
निश्चेष्टाहारसंचारा वृक्षैकस्थानविष्ठिताः ।
पक्षिणोऽपि प्रयाचन्ते सर्वभूतानुकम्पिनम् ॥ ३१ ॥
|
ज्यांनी सर्व प्रकारची हालचाल करणे सोडले आहे, चारा वेचण्यासाठीही ते कुठे जात नाही आणि निश्चित रूपाने वृक्षावरच्या एकाच ठिकाणी पडून राहिलेले आहेत ते पक्षीही तुमची परतून येण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. कारण तुम्ही समस्त प्राण्यांवर कृपा करणारे अहात. ॥३१॥
|
एवं विक्रोशतां तेषां द्विजातीनां निवर्तने ।
ददृशे तमसा तत्र वारयन्तीव राघवम् ॥ ३२ ॥
|
याप्रकारे श्रीरामांनी परत यावे म्हणून विनवण्या करण्यार्या त्या ब्राह्मणांच्या वर जणु कृपा करण्यासाठीच मार्गात तमसा नदी दिसून आली, जी आपल्या तिर्यक-प्रवाह (तिरक्या प्रवाह) द्वारा राघवास अडवितच आहे कि काय अशी प्रतीत होत होती. ॥३२॥
|
ततः सुमन्त्रोऽपि रथाद् विमुच्य
श्रान्तान् हयान् सम्परिवर्त्य शीघ्रम् ।
पीतोदकांस्तोयपरिप्लुताङ्गा
नचारयद् वै तमसाविदूरे ॥ ३३ ॥
|
तेथे पोहोचल्यावर सुमंत्रांनीही थकलेल्या घोड्यांना शीघ्र रथापासून सोडले आणि त्यांना थोडेसे फिरवले, नंतर त्यांना पाणी पाजले आणि न्हाऊ घातले आणि त्यानंतर तमसा नदीच्या जवळच चरावयासाठी सोडून दिले. ॥३३॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे पञ्चचत्वारिंशः सर्गः ॥ ४५ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा पंचेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४५॥
|