॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ युद्धकाण्ड ॥

॥ षोडशः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



वानरांना निरोप आणि ग्रंथाची प्रशंसा


श्रीमहादेव उवाच
रामेऽभिषिक्ते राजेन्द्रे सर्वलोकसुखावहे ।
वसुधा सस्यसम्पन्ना फलवन्तो महीरुहाः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, लोकांना सुख देणाऱ्या राजश्रेष्ठ श्रीरामांचा राज्याभिषेक झाल्यावर, पृथ्वी ही धान्याने संपन्न झाली आणि वृक्ष फलयुक्त झाले. (१)

गन्धहीनानि पुष्पाणि गन्धवन्ति चकाशिरे ।
सहस्रशतमश्वानां धेनूनां च गवां तथा ॥ २ ॥
ददौ शतवृषान्पूर्वं द्विजेभ्यो रघुनन्दनः ।
त्रिंशत्कोटि सुवर्णस्य ब्राह्मणेभ्यो ददौ पुनः ॥ ३ ॥
जी फुले गंधरहित होती, ती सुगंधी होऊन शोभून दिसू लागली. राज्याभिषेकानंतर सर्व प्रथम रघुनंदनांनी एक लक्ष घोडे, एक लक्ष धेनू आणि शेकडो बैल ब्राह्मणांना दान म्हणून दिले. तसेच पुनः त्यांनी त्यांना तीस कोटी सुवर्ण मुद्रा दिल्या. (२-३)

वस्त्राभरणरत्‍नानि ब्राह्मणेभ्यो मुदा तथा ।
सूर्यकान्तिसमप्रख्यां सर्वरत्‍नमयीं स्रजम् ॥ ४ ॥
सुग्रीवाय ददौ प्रीत्या राघवो भक्तवत्सलः ।
अङ्‌गदाय ददौ दिव्ये ह्यङ्‌गदे रघुनन्दनः ॥ ५ ॥
तसेच रामांनी ब्राह्मणांना आनंदपूर्वक वस्त्रे, अलंकार आणि रत्ने दिली. त्यानंतर सूर्याच्या कांतीप्रमाणे तेजस्वी, सर्व रत्नांनी गुंफलेली एक माळ भक्तवत्सल राघवांनी प्रेमपूर्वक सुग्रीवाला दिली. तसेच रघुनंदनांनी दोन दिव्य बाहूभूषणे अंगदाला दिली. (४-५)

चन्द्रकोटिप्रतीकाशं मणिरत्‍नविभूषितम् ।
सीतायै प्रददौ हारं प्रीत्या रघुकुलोत्तमः ॥ ६ ॥
नंतर कोटिचंद्राप्रमाणे तेज असणारा आणि मणी व रत्ने यांनी विभूषित असा एक हार रघुकुलश्रेष्ठांनी प्रीतिपूर्वक सीतेला दिला. (६)

अवमुच्यात्मनः कण्ठाद् हारं जनकनन्दिनी ।
अवैक्षत हरीन् सर्वान् भर्तारं च मुहुर्मुहुः ॥ ७ ॥
स्वतःच्या गळ्यातील तो हार उतरवून जनकनंदिनी सीता आपले पती आणि सर्व वानर यांच्याकडे वारंवार पाहू लागली. (७)

रामस्तामाह वैदेहीं इङ्‌गितज्ञो विलोकयन् ।
वैदेहि यस्य तुष्टासि देहि तस्मै वरानने ॥ ८ ॥
तिच्या मनातील भाव ओळखून जानकीकडे पाहात श्रीराम तिला म्हणाले, "हे सुंदरमुखी वैदेही, तू ज्याच्यावर संतुष्ट असशील, त्याला तू हा हार दे." (८)

हनूमते ददौ हारं पश्यतो राघवस्य च ।
तेन हारेण शुशुभे मारुतिर्गौरवेण च ॥ ९ ॥
त्या वेळी राघवांच्या देखतच, सीतेने तो हार हनुमंताला दिला. त्या हारामुळे आणि झालेल्या गौरवाने मारुती शोभून दिसू लागला. (९)

रामोऽपि मारुतिं दृष्ट्वा कृताञ्जलिमुपस्थितम् ।
भक्त्या परमया तुष्ट इदं वचनमब्रवीत् ॥ १० ॥
हात जोडून जवळच उभ्या असणाऱ्या मारुतीकडे पाहून, त्याच्या सर्वश्रेष्ठ भक्तीने संतुष्ट झालेले श्रीरामसुद्धा त्याला म्हणाले. (१०)

हनूमंस्ते प्रसन्नोऽस्मि वरं वरय काङ्‌क्षितम् ।
दास्यामि देवैरपि यत् दुर्लभं भुवनत्रये ॥ ११ ॥
"हे हनुमाना, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू इच्छित वर मागून घे. त्रैलोक्यात देवांनासुद्धा जे दुर्लभ असेल ते मी तुला देईन." (११)

हनूमानपि तं प्राह नत्वा रामं प्रहृष्टधीः ।
त्वन्नाम स्मरतो राम न तृप्यति मनो मम ॥ १२ ॥
अतिशय आनंदित झालेल्या हनुमानानेसुद्धा रामांना नमस्कार करून म्हटले, "हे रामा, तुमच्या नामाचे स्मरण करताना माझे मन तृप्तच होत नाही. (१२)

अतस्त्वन्नाम सततं स्मरन् स्थास्यामि भूतले ।
यावत्स्थास्यति ते नाम लोके तावत्कलेवरम् ॥ १३ ॥
मम तिष्ठतु राजेन्द्र वरोऽयं मेऽभिकाङ्‌क्षितः ।
रामस्तथेति तं प्राह मुक्तस्तिष्ठ यथासुखम् ॥ १४ ॥
म्हणून तुमच्या नावाचे सतत स्मरण करीत मी या भूतलावर राहावे, अशी माझी इच्छा आहे. जोपर्यंत या जगात तुमचे नाव टिकून राहील, तोपर्यंत माझे शरीर टिकून राहो. हे राजेंद्रा, हा माझा इच्छित वर आहे." "ठीक आहे." असे म्हणून रामांनी त्याला सांगितले. "जीवन्मुक्त स्थितीत तू या जगात तुझ्या इच्छेप्रमाणे सुखाने राहा. (१३-१४)

कल्पान्ते मम सायुज्यं प्राप्स्यसे नात्र संशयः ।
तमाह जानकी प्रीता यत्र कुत्रापि मारुते ॥ १५ ॥
स्थितं त्वामनुयास्यन्ति भोगाः सर्वे ममाज्ञया ।
इत्युक्तो मारुतिस्ताभ्यां ईश्वराभ्यां प्रहृष्टधी ॥ १६ ॥
नंतर कल्पाच्या शेवटी तुला माझे सायुज्य प्राप्त होईल, यात संशय नाही." त्यानंतर जानकी प्रीतिपूर्वक त्याला म्हणाली, "हे मारुती, तू जेथे कोठेही असशील तेथे सर्व भोग हे माझ्या आज्ञेने तुला प्राप्त होतील." त्या दोन्हीही ईश्वरांनी असे सांगितल्यावर, मारुतीचे मन अतिशय आनंदित झाले. (१५-१६)

आनन्दाश्रुपरीताक्षो भूयो भूयः प्रणम्य तौ ।
कृच्छाद्ययौ तपस्तप्तुं हिमवन्तं महामतिः ॥ १७ ॥
त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू भरून आले होते. मारुतीने त्या दोघांना वारंवार प्रणाम केला आणि मग मोठ्या कष्टाने तो महाबुद्धिमान तपश्चर्या करण्यासाठी हिमालय पर्वताकडे निघून गेला. (१७)

ततो गुहं समासाद्य रामः प्राञ्जलिमब्रवीत् ।
सखे गच्छ पुरं रम्यं शृङ्‌गवेरमनुत्तमम् ॥ १८ ॥
त्यानंतर हात जोडून उभे असणाऱ्या गुहाजवळ जाऊन राम त्याला म्हणाले, "अरे मित्रा, तू अतिशय उत्तम आणि रम्य अशा तुझ्या शृंगवेरनगराकडे परत जा. (१८)

मामेव चिन्तयन्नित्यं भुङ्‌क्ष्व भोगान्निजार्जितान् ।
अन्ते ममैव सारूप्यं प्राप्स्यसे त्वं न संशयः ॥ १९ ॥
आणि तेथे माझे चिंतन करीत, तू स्वतःच संपादन केलेले भोग भोगत राहा. शेवटी तुला माझेच सारूप्य प्राप्त होणार, यात संशय नाही." (१९)

इत्युक्‍त्वा प्रददौ तस्मै दिव्यानि आभरणानि च ।
राज्यं च विपुलं दत्त्वा विज्ञानं च ददौ विभुः ॥ २० ॥
असे सांगून रामांनी त्याला दिव्य अलंकार दिले. त्याला विशाल राज्य देऊन, सामर्थ्यसंपन्न अशा रामांनी आत्मज्ञानाचा उपदेशही केला. (२०)

रामेणालिङ्‌गितो हृष्टो ययौ स्वभवनं गुहः ।
ये चान्ये वानराः श्रेष्ठा अयोध्यां समुपागताः ॥ २१ ॥
अमुल्याभरणैर्वस्त्रैः पूजयामास राघवः ।
सुग्रीवप्रमुखाः सर्वे वानराः सविभीषणाः ॥ २२ ॥
यथार्हं पूजितास्तेन रामेण परमात्मना ।
प्रहृष्टमनसः सर्वे जग्मुरेव यथागतम् ॥ २३ ॥
त्यानंतर रामांनी त्याला आलिंगन दिले. गुह आनंदित झाला आणि तो घरी परत गेला. त्यानंतर जे इतर श्रेष्ठ वानर अयोध्येत आले होते, त्यांना अमूल्य अलंकार आणि वस्त्रे देऊन राघवांनी त्यांचा सत्कार केला. बिभीषणासकट, सुग्रीवादी वानरांचा त्यांच्या योग्यतेनुसार परमात्म्या रामांनी सत्कार केला, तेव्हा आनंदित मनाने ते सर्वजण आपापल्या स्थानी परत गेले. (२१-२३)

सुग्रीवप्रमुखाः सर्वे किष्किन्धां प्रययुर्मुदा ।
विभीषणस्तु सम्प्राप्य राज्यं निहतकण्टकम् ॥ २४ ॥
रामेणः पूजितः प्रीत्या ययौ लङ्‌कामनिन्दितः ।
राघवो राज्यमखिलं शशासाखिलवत्सलः ॥ २५ ॥
सुग्रीवादी सर्व वानर आनंदाने किष्किंधेकडे गेले. निष्कंटक राज्य प्राप्त करून घेऊन, आणि रामांकडून आदर सत्कार घेऊन, पुण्यशील बिभीषण आनंदाने लंकेकडे निघून गेला. इकडे सर्वांवर वात्सल्य करणारे राघव आपल्या संपूर्ण राज्याचे पालन करू लागले. (२४-२५)

अनिच्छन्नपि रामेण यौवराज्येऽभिषेचितः ।
लक्ष्मणः परया भक्त्या रामसेवापरोऽभवत् ॥ २६ ॥
नंतर लक्ष्मणाची इच्छा नसतानाही रामांनी त्याला यौवराज्यपदावर अभिषेक केला. अतिशय भक्तीने लक्ष्मण रामांची सेवा करण्यात तत्पर झाला. (२६)

रामस्तु परमात्मापि कर्माध्यक्षोऽपि निर्मलः ।
कर्तृत्वादि विहीनोऽपि निर्विकारोऽपि सर्वदा ॥ २७ ॥
स्वानन्देनापि तुष्टः सन् लोकानामुपदेशकृत् ।
अश्वमेधादियज्ञैश्च सर्वैर्विपुलदक्षिणैः ॥ २८ ॥
अयजत् परमानन्दो मानुषं वपुराश्रितः ।
न पर्यदेवन् विधवा न च व्यालकृतं भयम् ॥ २९ ॥
न व्याधिजं भयं चासीत् ‍रामे राज्यं प्रशासति ।
लोके दस्युभयं नासीत् अनर्थो नास्ति कश्चन ॥ ३० ॥
वृद्धेषु सत्सु बालानां नासीन्मृत्युभयं तथा ।
रामपूजापराः सर्वे सर्वे राघवचिन्तकाः ॥ ३१ ॥
ववर्षुजलदास्तोयं यथाकालं यथारुचि ।
प्रजाः स्वधर्मनिरता वर्णाश्रमगुणान्विताः ॥ ३२ ॥
जरी राम परमात्मा, कार्यांचे अध्यक्ष, निर्मळ स्वरूप, कर्तृत्व इत्यादींनी रहित, सर्वदा निर्विकार, आणि स्वतःच्या आनंदात संतुष्ट होते, तरीसुद्धा लोकांना उपदेश करण्यासाठी, परमानंदस्वरूप अशा रामांनी मानवी शरीराचा आश्रय घेऊन, विपुल दक्षिणांनी युक्त असे सर्व अश्वमेध इत्यादी यज्ञ केले. राम आपले राज्य चालवीत असताना, कधी विधवा स्त्रियांचे क्रंदन ऐकू आले नाही. सापामुळे होणारे भय नव्हते, रोगांपासून निर्माण होणारी भीती नव्हती, लोकांना लुटारूंचे भय नव्हते, कोणताही अनर्थ येत नव्हता, तसेच वृद्ध माणसे जिवंत असताना लहान बालकांना मृत्यूचे भय नव्हते. सर्व लोक रामांच्या पूजेत तत्पर होते. सर्व लोक राघवांचे चिंतन करीत होते. योग्यकाळी आणि लोकांच्या इच्छेप्रमाणे मेघ पाण्याची वृष्टी करीत होते. स्वतःचा वर्ण आणि आश्रम यांच्या गुणांनी युक्त असणारी प्रजा स्वतःच्या धर्मात मग्न होती. (२७-३२)

औरसानिव रामोऽपि जुगोप पितृवत्प्रजाः ।
सर्वेलक्षणसंयुक्तः सर्वधर्मपरायणः ॥ ३३ ॥
दशवर्षसहस्राणि रामो राज्यमुपास्त सः ॥ ३४ ॥
स्वतः श्रीरामसुद्धा आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करीत असत. सर्व शुभ लक्षणांनी युक्त आणि सर्व धर्मात परायण अशा श्रीरामांनी दहा हजार वर्षे राज्य केले. (३३-३४)

इदं रहस्यं धनधान्यऋद्धिमत्
    दिर्घायुरारोग्यकरं सुपुण्यदम् ।
पवित्रमाध्यात्मिकसंज्ञितं पुरा
    रामायणं भाषितमादिशम्भुना ॥ ३५ ॥
धन, धान्य आणि वैभव देणारे, दीर्घ आयुष्य आणि आरोग्य देणारे, चांगले पुण्य देणारे, पवित्र, अध्यात्म हे नाव असणारे हे रहस्ययुक्त रामायण पूर्वी शंकरांनी पार्वतीला सांगितले होते. (३५)

शृणोति भक्त्या मनुजः समाहितो
    भक्त्या पठेद्वा परितुष्टमानसः ।
सर्वाः समाप्नोति मनोगताशिषो
    विमुच्यते पातककोटिभिः क्षणात् ॥ ३६ ॥
जो मनुष्य एकाग्र मनाने भक्तिपूर्वक हे अध्यात्म रामायण ऐकतो किंवा संतुष्ट मनाने भक्तिपूर्वक वाचतो, तो मनातील सर्व इच्छांची पूर्ती करून घेतो आणि तो एका क्षणात कोट्यवधी पातकांतून मुक्त होऊन जातो. (३६)

रामाभिषेकं प्रयतः शृणोति यो
    धनाभिलाषि लभते महद्धनम् ।
पुत्राभिलाषी सुतमार्यसम्मतं
    प्राप्नोति रामायणमादितः पठन् ॥ ३७ ॥
द्रव्याची इच्छा करणारा जो माणूस एकाग्रतेने रामांच्या अभिषेकाचे वर्णन ऐकतो त्याला पुष्कळ धन प्राप्त होते. पुत्रप्राप्तीची इच्छा करणाऱ्या माणसाने हे रामायण प्रारंभापासून वाचले, तर त्याला सज्जनांकडून मान्यता मिळणारा पुत्र प्राप्त होतो. (३७)

शृणोति योऽध्यात्मिकरामसंहितां
    प्राप्नोति राजा भुवमृद्धसम्पदम् ।
शत्रून्विजित्यारिभिरप्रधर्षितो
    व्यपेतदुःखो विजयी भवेन्नृपः ॥ ३८ ॥
जो राजा ही आध्यात्मिक रामसंहिता (अध्यात्मरामायण) ऐकतो त्याला धन-धान्य ऐश्वर्य-संपन्न अशा पृथ्वीचे राज्य प्राप्त होते. शत्रूंना जिंकून आणि शत्रूंचा हल्ला न होता, तो राजा दुःखरहित होऊन विजयी होतो. (३८)

स्त्रीयोऽपि शृण्वन्त्यधिरामसंहितां
    भवन्ति ता जीविसुताश्च पूजिताः ।
वन्ध्यापि पुत्रं लभते सुरूपिणं
    कथामिमां भक्तियुता शृणोति या ॥ ३९ ॥
ज्या स्त्रियांसुद्धा आध्यात्मिक रामसंहिता म्हणजे हे अध्यात्म रामायण ऐकतात, त्यांची मुले चिरकाल जगतात, आणि त्यांचा मानसन्मान होतो आणि जी वंध्या स्त्री भक्तीने युक्त होऊन ही अध्यात्म रामायणातील कथा ऐकते, तिला सुंदर पुत्र प्राप्त होतो. (३९)

श्रद्धान्वितो यः शृणुयात्पठेन्नरो
    विजित्य कोपं च तथा विमत्सरः ।
दुर्गाणि सर्वाणि विजित्य निर्भयो
    भवेत्सुखी राघवभक्तिसंयुतः ॥ ४० ॥
क्रोधाला जिंकून आणि मत्सररहित होऊन तसेच श्रद्धायुक्त होऊन जो माणूस हे अध्यात्म रामायण ऐकतो किंवा वाचतो, तो सर्व संकटांवर मात करून, भयरहित, सुखी आणि श्रीरामांवरील भक्तीने संपन्न होतो. (४०)

सुराः समस्ता अपि यान्ति तुष्टतां
    विघ्नाः समस्ता अपयान्ति शृण्वताम् ।
अध्यात्मरामायणमादितो नृणां
    भवन्ति सर्वा अपि सम्पदः परा ॥ ४१ ॥
जी माणसे हे अध्यात्मरामायण प्रारंभापासून ऐकतात त्यांच्यावर सर्व देव संतुष्ट होऊन जातात, त्यांची सर्व विघ्ने दूर पळून जातात आणि त्यांना सर्वश्रेष्ठ संपदा प्राप्त होतात. (४१)

रजस्वला वा यदि रामतत्परा
    शृणोति रामायणमेतदादितः ।
पुत्रं प्रसूते ऋषभं चिरायुषं
    पतिव्रता लोकसुपूजिता भवेत् ॥ ४२ ॥
रामांच्या ठिकाणी मन जडवून जर एखाद्या रजस्वला स्त्रीने शुद्धीनंतर पाचव्या दिवसापासून सोळाव्या दिवसापर्यंत हे अध्यात्मरामायण पहिल्यापासून ऐकले, तर ती दीर्घायुषी उत्तम पुत्राला जन्म देते आणि लोकांकडून पतिव्रता म्हणून तिचा सन्मान होतो. (४२)

पूजयित्वा तु ये भक्त्या नमस्कुर्वन्ति नित्यशः ।
सर्वैः पापैर्विनिर्मुक्ता विष्णोर्यान्ति परं पदम् ॥ ४३ ॥
जे कोणी लोक दररोज भक्तीने अध्यात्म-रामायणाची पूजा करून त्याला नमरकार करतात, ते लोक सर्व पातकांतून मुक्त होऊन विष्णूच्या श्रेष्ठ पदी जातात. (४३)

अध्यात्मरामचरितं कृत्स्नं शृण्वन्ति भक्तितः ।
पठन्ति वा स्वयं वक्‍त्रात् तेषां रामः प्रसीदति ॥ ४४ ॥
जे पुरुष भक्तीने हे अध्यात्मरामचरित संपूर्णपणे ऐकतात किंवा स्वतःच्या मुखाने त्याचे पठण करतात, त्यांच्यावर राम प्रसन्न होतात. (४४)

राम एव परं ब्रह्म तस्मिंस्तुष्टेऽखिलात्मनि ।
धर्मार्थकाममोक्षाणां यद् यदिच्छति तद्‌भवेत् ॥ ४५ ॥
राम हेच परब्रह्म आहेत. ते सर्वात्मा राम संतुष्ट झाले असताना, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांतील जी जी इच्छा एखाद्या माणसाला होईल, ती ती इच्छा फलद्रूप होईल. (४५)

श्रोतव्यं नियमेनैत ‍रामायणमखण्डितम् ।
आयुष्यमारोग्यकरं कल्पकोट्यघनाशनम् ॥ ४६ ॥
आयुष्य आणि आरोग्य देणारे आणि कोट्यवधी कल्पांतील पापांचा नाश करणारे हे अध्यात्म रामायण नियमाने खंड न पाडता ऐकत राहावे. (४६)

देवाश्च सर्वे तुष्यन्ति ग्रहाः सवे महर्षयः ।
रामायणस्य श्रवणे तृप्यन्ति पितरस्तथा ॥ ४७ ॥
अध्यात्म रामायणाच्या श्रवणामुळे सर्व देव, सर्व ग्रह आणि सर्व महर्षी संतुष्ट होतात, तसेच सर्व पितरही तृप्त होतात. (४७)

अध्यात्मरामायणमेतद् अद्‌भूतं
    वैराग्यविज्ञानयुतं पुरातनम् ।
पठन्ति शृण्वन्ति लिखन्ति ये नरा -
    स्तेषां भवेऽस्मिन्न पुनर्भवो भवेत् ॥ ४८ ॥
वैराग्य आणि विज्ञान यांनी युक्त असे हे प्राचीन, अद्‌भुत अध्यात्म रामायण जे पुरुष वाचतात अथवा ऐकतात किंवा लिहून काढतात, त्यांना या संसारात पुनर्जन्म प्राप्त होत नाही. (४८)

आलोड्याअखिलवेदराशिमसकृत् यत्तारकं ब्रह्म तद्
रामो विष्णुरहस्यमूर्तिरिति यो विज्ञाय भूतेश्वरः ।
उद्‍धृत्याखिलसारसङ्‌ग्रहमिदं संक्षेपतः प्रस्फुटं
श्रीरामस्य निगूढतत्त्वमखिलं प्राह प्रियायै भवः ॥ ४९ ॥
संपूर्ण वेदराशींचे वारंवार मंथन करून, भूतनाथ अशा शंकरांनी "जे तारक ब्रह्म आहे, ते रामच आहे," राम हाच विष्णूची गुप्त मूर्ती आहे असे जाणून घेतले, आणि नंतर सर्व वेदांचे सार संग्रहरूपाने एकत्र करून, शंकरांनी या ग्रंथाद्वारे श्रीरामांचे संपूर्ण गूढ तत्त्व स्पष्टपणाने पार्वतीला संक्षेपाने सांगितले. ४९

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
युद्धकाण्डे षोडशः सर्गः ॥ १६ ॥
इति श्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे षोडशः सर्गः ॥ १६ ॥
युद्धकाण्ड समाप्त


GO TOP