श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। अष्टपञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
गुरुपुत्रैर्निर्भर्स्य तस्मै गृहं गन्तुमाज्ञाप्रदानमन्यं गुरुं वरीतुमुद्यम्यताय राज्ञे शापदानं च, तेषां शापेन चाण्डालत्वं गतस्य त्रिशङ्कोर्विश्वामित्रमाश्रयितुं ततो गमनम् - वसिष्ठ ऋषिंच्या पुत्रांनी दटावून घरी परत जाण्याची आज्ञा देणे, तथा त्यांना दुसरा पुरोहित बनविण्यास उद्यत झालेले पाहून शाप-प्रदान आणि त्यांच्या शापाने चाण्डाळ झालेल्या त्रिशङ्‍कुने विश्वामित्रांना शरण जाणे -
ततस्त्रिशङ्‍कोर्वचनं श्रुत्वा क्रोधसमन्वितम् ।
ऋषिपुत्रशतं राम राजानमिदमब्रवीत् ॥ १ ॥

प्रत्याख्यातोऽसि दुर्मेधो गुरुणा सत्यवादिना ।
तं कथं समतिक्रम्य शाखान्तरमुपेयिवान् ॥ २ ॥
'रघुनन्दना ! राजा त्रिशङ्‍कुचे हे वचन ऐकून वसिष्ठ मुनिंचे शंभर पुत्र कुपित होऊन त्यास या प्रकारे बोलले - 'दुर्बुद्धे तुझ्या सत्यवादी गुरूने जर तुला प्रतिबद्ध केले आहे तर तू त्यांचे उल्लंघन करून दुसर्‍या शाखेचा आश्रय कसा घेतलास ? ॥ १-२ ॥
इक्ष्वाकूणां हि सर्वेषां पुरोधाः परमा गतिः ।
न चातिक्रमितुं शक्यं वचनं सत्यवादिनः ॥ ३ ॥
समस्त इक्ष्वाकुवंशी क्षत्रियांसाठी वसिष्ठच परमगति आहेत. त्या सत्यवादी महात्म्यांच्या वचनाचे कुणीही उल्लंघन करू शकत नाही. ॥ ३ ॥
अशक्यमिति सोवाच वसिष्ठो भगवानृषिः ।
तं वयं वै समाहर्तुं क्रतुं शक्ताः कथञ्चन ॥ ४ ॥
ज्या यज्ञ कर्माला भगवान वसिष्ठ मुनिंनी असंभव म्हटले आहे, ते आम्ही कसे करू शकू ? ॥ ४ ॥
बालिशस्त्वं नरश्रेष्ठ गम्यतां स्वपुरं पुनः ।
याजने भगवाञ्शक्तस्त्रैलोक्यस्यापि पार्थिव ॥ ५ ॥

अवमानं कथं कर्तुं तस्य शक्ष्यामहे वयम् ।
'नरश्रेष्ठ ! आपण अजून अज्ञ आहात. आता आपण आपल्या नगरास परत जावे. पृथ्वीनाथ ! भगवान् वसिष्ठ तिन्ही लोकी यज्ञ करण्यास समर्थ असताना आम्ही (असे करून) त्यांचा अवमान करणे कसे शक्य आहे ? ॥ ५ १/२ ॥
तेषां तद् वचनं शृत्वा क्रोधपर्याकुलाक्षरम् ॥ ६ ॥

स राजा पुनरेवैतानिदं वचनमब्रवीत् ।
प्रत्याख्यातो भगवता गुरुपुत्रैस्तथैव हि ॥ ७ ॥

अन्यां गतिं गमिष्यामि स्वस्ति वोऽस्तु तपोधनाः ।
गुरुपुत्रांचे ते क्रोधयुक्त वचन ऐकून राजा त्रिशङ्‍कुने त्यांना या प्रकारे म्हटले - 'तपोधनांनो भगवान् वसिष्ठांनी तर मला लाथाडलेच आहे, आपण गुरुपुत्रगणही माझी प्रार्थना स्वीकार करीत नाही, तरी आपले कल्याण होवो ! मी आता दुसर्‍या कोणाला तरी शरण जाईन. ॥ ६-७ १/२ ॥
ऋषिपुत्रास्तु तच्छ्रुत्वा वाक्यं घोराभिसंहितम् ॥ ८ ॥

शेपुः परमसङ्‍क्रुद्धाश्चण्डालत्वं गमिष्यसि ।
इत्युक्त्वा ते महात्मानो विविशुः स्वं स्वमाश्रमम् ॥ ९ ॥
त्रिशङ्‍कुचे हे घोर अभिसंधिपूर्ण वचन ऐकून महर्षिंचे पुत्र अत्यंत कुपित होऊन त्यांनी त्यास शाप दिला - 'अरे जा ! तू चाण्डाळ होशील.'असे म्हणून ते आपापल्या आश्रमात प्रविष्ट झाले. ॥ ८-९ ॥
अथ रात्र्यां व्यतीतायां राजा चण्डालतां गतः ।
नीलवस्त्रधरो नीलः पुरुषो ध्वस्तमूर्धजः ॥ १० ॥

चित्यमाल्याङ्‌गरागश्च आयसाभरणोऽभवत् ।
तदनंतर रात्र व्यतीत होताच राजा त्रिशङ्‍कु चाण्डाळ झाला. त्याच्या शरीराचा रंग निळा झाला. कपडेही निळे होऊन गेले. प्रत्येक अंगात रुक्षता आली. मस्तकावरील केस लहान झाले. सार्‌या शरीरावर जणु चितेची राखच चिकटली गेली. विभिन्न अंगावर यथास्थान असलेले दागिने लोखंडाचे बनले. ॥ १० १/२ ॥
तं दृष्ट्‍वा मन्त्रिणः सर्वे त्यज्य चण्डालरूपिणम् ॥ ११ ॥

प्राद्रवन् सहिता राम पौरा येऽस्यानुगामिनः ।
एको हि राजा काकुत्स्थ जगाम परमात्मवान् ॥ १२ ॥

दह्यमानो दिवारात्रं विश्वामित्रं तपोधनम् ।
'श्रीरामा आपल्या राजाला चाण्डाळाच्या रूपात पाहून त्यांच्या बरोबरचे सर्व मंत्री आणि पुरवासी आलेले होते ते त्याला सोडून पळून गेले. काकुत्स्थनन्दना ! ते धीर स्वभावाचे नरेश रात्रंदिवस चिंतेच्या आगीत होरपळून गेले आणि एकटेच तपोधन विश्वामित्रांना शरण गेले. ॥ ११-१२ १/२ ॥
विश्वामित्रस्तु तं दृष्ट्‍वा राजानं विफलीकृतम् ॥ १३ ॥

चण्डालरूपिणं राम मुनिः कारुण्यमागतः ।
कारुण्यात् स महातेजा वाक्यं परमधार्मिकः ॥ १४ ॥

इदं जगाद भद्रं ते राजानं घोरदर्शनम् ।
किमागमनकार्यं ते राजपुत्र महाबल ॥ १५ ॥

अयोध्याधिपते वीर शापाच्चण्डालतां गतः ।
'श्रीरामा ! विश्वामित्रांनी पाहिले की राजाचे जीवन निष्फळ झाले आहे. त्यांना चाण्डाळाच्या रूपात पाहून त्या महातेजस्वी परम धर्मात्मा मुनिच्या हृदयात करुणा दाटून आली. ते दयेने द्रवित होऊन भयंकर दिसणार्‍या राजा त्रिशङ्‍कुला या प्रकारे बोलले - 'महाबली राजकुमारा ! तुझे भले होवो ! येथे कोणत्या कामासाठी तुमचे आगमन झाले आहे ? वीर अयोध्यानरेश ! असे कळून येत आहे की तू शापामुळे चाण्डाळ रूपास प्राप्त झाला आहेस. ॥ १३-१५ १/२ ॥
अथ तद्‌वाक्यमाकर्ण्य राजा चण्डालतां गतः ॥ १६ ॥

अब्रवीत् प्राञ्जलिर्वाक्यं वाक्यज्ञो वाक्यकोविदम् ।
विश्वामित्रांचे बोलणे ऐकून चाण्डाळ रूप प्राप्त झालेला आणि वाणीचे तात्पर्य समजणार्‍या राजा त्रिशङ्‍कुने हात जोडून वाक्यार्थ कोविद विश्वामित्र मुनिंना या प्रकारे सांगितले - ॥ १६ १/२ ॥
प्रत्याख्यातोऽस्मि गुरुणा गुरुपुत्रैस्तथैव च ॥ १७ ॥

अनवाप्यैव तं कामं मया प्राप्तो विपर्ययः ।
'महर्षे ! मला गुरुंनी आणि गुरुपुत्रांनी लाथाडले आहे. मी ज्या मनोऽभीष्ट वस्तुला प्राप्त करू इच्छित होतो, त्याची प्राप्ति न होता इच्छेच्या विपरीत अनर्थाचा भागी झालो आहे. ॥ १७ १/२ ॥
सशरीरो दिवं यायामिति मे सौम्यदर्शन ॥ १८ ॥

मया चेष्टं क्रतुशतं तच्च नावाप्यते फलम् ।
'सौम्यदर्शन मुनीश्वरा ! माझी इच्छा होती की याच शरीराने मी स्वर्गात जाईन. परंतु ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. मी शेकडो यज्ञ केले आहेत पण त्यांचेही काही फळ मिळत नाही आहे. ॥ १८ १/२ ॥
अनृतं नोक्तपूर्वं मे न च वक्ष्ये कदाचन ॥ १९ ॥

कृच्छ्रेष्वपि गतः सौम्य क्षत्रधर्मेण ते शपे ।
'सौम्य ! मी क्षत्रियधर्माची शपथ घेऊन आपल्याला सांगत आहे की मोठमोठ्या संकटात सांपडलो असतांना पूर्वीही मी कधी मिथ्या भाषण केलेले नाही आणि भविष्यातही कधी करणार नाही. ॥ १९ १/२ ॥
यज्ञैर्बहुविधैरिष्टं प्रजा धर्मेण पालिताः ॥ २० ॥

गुरवश्च महात्मानः शीलवृत्तेन तोषिताः ।
धर्मे प्रयतमानस्य यज्ञं चाहर्तुमिच्छतः ॥ २१ ॥

परितोषं न गच्छन्ति गुरवो मुनिपुङ्‍गव ।
दैवमेव परं मन्ये पौरुषं तु निरर्थकम् ॥ २२ ॥
मी नाना प्रकारच्या यज्ञांचे अनुष्ठान केले, प्रजाजनांचे धर्मपूर्वक रक्षण केले आणि शील व सदाचाराच्या द्वारे महात्म्यांना तथा गुरुजनांना संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्त्‍न केला. या समयीही मी यज्ञ करू इच्छित होतो म्हणून माझा हा प्रयत्‍नही धर्मासाठी होता. मुनिप्रवर ! तरीही माझे गुरुजन माझ्यावर संतुष्ट होऊ शकले नाहीत. हे पाहून मी दैवालाच श्रेष्ठ मानतो आहे. पुरुषार्थ तर निरर्थक असल्याचे कळून हेत आहे. ॥ २०-२२ ॥
दैवेनाक्रम्यते सर्वं दैवं हि परमा गतिः ।
तस्य मे परमार्तस्य प्रसादं अभिकाङ्‍क्षतः ।
कर्तुमर्हसि भद्रं ते दैवोपहतकर्मणः ॥ २३ ॥
'दैव सर्वांवर आक्रमण करते. दैवच सर्वांची परमगति आहे. मुने ! मी अत्यंत आर्त होऊन आपली कृपा इच्छित आहे. दैवाने माझ्या पुरुषार्थाला दडपून टाकले आहे. आपले भले होवो ! आपण माझ्यावर अवश्य कृपा करावी. ॥ २३ ॥
नान्यां गतिं गमिष्यामि नान्यच्छरणमस्ति मे ।
दैवं पुरुषकारेण निवर्तयितुमर्हसि ॥ २४ ॥
'आता मला आपल्याशिवाय आणखी कुणाला शरण जाणे योग्य वाटत नाही. दुसरे कुणी मला शरण देणाराही उरला नाही. केवळ आपणच आपल्या बलाने माझ्या दुर्दैव स्थितीवर मात करण्यास योग्य आहात. ॥ २४ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे अष्टपञ्चाशः सर्गः ॥ ५८ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा अठ्ठावन्नावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५८ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP