श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ षट्‌त्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
स्वीयं लघुत्वं श्रीरामस्य महत्त्वं च प्रतिपादयता सुग्रीवेण लक्ष्मणं प्रति क्षमायाः प्रार्थनं, लक्ष्मणेन तस्य प्रशंसापूर्वकं तं प्रत्यात्मना सह चलितुमादेशकरणम् - सुग्रीवांनी आपली क्षुद्रता तसेच श्रीरामांची महत्ता सांगून लक्ष्मणाची क्षमा मागणे आणि लक्ष्मणांनी त्यांची प्रशंसा करून त्यांना आपल्या बरोबर येण्यासाठी सांगणे -
इत्युक्तस्तारया वाक्यं प्रश्रितं धर्मसंहितम् ।
मृदुस्वभावः सौमित्रिः प्रतिजग्राह तद्वचः ॥ १ ॥
तारेने जेव्हा याप्रकारे धर्मास अनुकूल विनययुक्त गोष्ट सांगितली तेव्हा कोमल स्वभावाचे सुमित्राकुमार लक्ष्मणांनी ती मानली. (क्रोधाचा त्यांनी त्याग केला). ॥१॥
तस्मिन् प्रतिगृहीते तु वाक्ये हरिगणेश्वरः ।
लक्ष्मणात्सुमहत् त्रासं वस्त्रं क्लिन्नमिवात्यजत् ॥ २ ॥
त्यांच्या द्वारा तारेने सांगितलेली गोष्ट मान्य झालेली पाहून वानर यूथपति सुग्रीवांनी लक्ष्मणापासून प्राप्त होणार्‍या भयाचा भिजलेल्या वस्त्राप्रमाणे त्याग केला. ॥२॥
ततः कण्ठगतं माल्यं चित्रं बहुगुणं महत् ।
चिच्छेद विमदश्चासीत् सुग्रीवो वानरेश्वरः ॥ ३ ॥
त्यानंतर वानरराज सुग्रीवांनी आपल्या कंठात पडलेली फुलांची विचित्र, विशाल आणि बहुगुणसंपन्न माळ तोडून टाकली आणि ते मदरहित झाले. ॥३॥
स लक्ष्मणं भीमबलं सर्ववानरसत्तमः ।
अब्रवीत् प्रश्रितं वाक्यं सुग्रीवः संप्रहर्षयन् ॥ ४ ॥
नंतर समस्त वानरांमध्ये श्रेष्ठ सुग्रीवांनी भयंकर बलशाली लक्ष्मणांचा हर्ष वाढवीत त्यांना ही विनययुक्त गोष्ट सांगितली - ॥४॥
प्रणष्टा श्रीश्च कीर्तिश्च कपिराज्यं च शाश्वतम् ।
रामप्रसादात् सौमित्रे पुनश्चाप्तमिदं मया ॥ ५ ॥
’सौमित्रा ! माझी श्री, कीर्ति तसेच नेहमीच चालत आलेले वानरांचे राज्य - हे सर्व नष्ट होऊन चुकले होते. भगवान् श्रीरामांच्या कृपेनेच मला पुन्हा या सर्वाची प्राप्ति झाली आहे. ॥५॥
कः शक्तस्तस्य देवस्य ख्यातस्य स्वेन कर्मणा ।
तादृशं प्रतिकुर्वीत अंशेनापि नृआत्मज ॥ ६ ॥
’राजकुमार ! ते भगवान् राम आपल्या कर्मानेच सर्वत्र विख्यात आहेत. त्यांच्या उपकाराची तशीच परतफेड अंशमात्रानेही कोण करू शकतो ? ॥६॥
सीतां प्राप्स्यति धर्मात्मा वधिष्यति च रावणम् ।
सहायमात्रेण मया राघवः स्वेन तेजसा ॥ ७ ॥
’धर्मात्मा श्रीराम आपल्याच पराक्रमाने, तेजाने रावणाचा वध करतील आणि सीतेला प्राप्त करतील. मी तर त्यांचा एक तुच्छ सहायक मात्र राहीन. ॥७॥
सहायकृत्यं किं तस्य येन सप्त महाद्रुमाः ।
शैलश्च वसुधा चैव बाणेनैकेन दारिताः ॥ ८ ॥
’ज्यांनी एकाच बाणाने सात मोठ मोठे ताल वृक्ष, पर्वत, पृथ्वी आणि तेथे राहाणार्‍या दैत्यांनाही विदीर्ण करून टाकले होते त्यांना दुसर्‍या कुणा सहाय्यकाची आवश्यकताच काय आहे ? ॥८॥
धनुर्विस्फारमाणस्य यस्य शब्देन लक्ष्मण ।
सशैला कंपिता भूमिः सहायैः किं नु तस्य वै ॥ ९ ॥
’लक्ष्मणा ! ज्यांच्या धनुष्य खेचते समयी होणार्‍या टणत्काराने पर्वतांसहित पृथ्वी कांपून उठली होती, त्यांना सहाय्यकाशी काय देणे घेणे आहे ? ॥९॥
अनुयात्रां नरेंद्रस्य करिष्येऽहं नरर्षभ ।
गच्छतो रावणं हंतुं वैरिणं सपुरःसरम् ॥ १० ॥
’नरश्रेष्ठ ! मी तर वैरी रावणाचा वध करण्यासाठी अग्रगामी सैनिकांसहित यात्रा करणार्‍या महाराज श्रीरामांच्या मागोमाग चालत जाईन. ॥१०॥
यदि किञ्चिदतिक्रांतं विश्वासात् प्रणयेन वा ।
प्रेष्यस्य क्षमितव्यं मे न कश्चिन्नापराध्यति ॥ ११ ॥
’विश्वास अथवा प्रेमाच्या कारणामुळे जर काही अपराध घडला असेल तर माझ्या दासाच्या त्या अपराधाची क्षमा केली पाहिजे; कारण की असा कोणीही सेवक नाही आहे ज्याच्या कडून कधी कुठलाही अपराध घडला नसेल. ॥११॥
इति तस्य ब्रुवाणस्य सुग्रीवस्य महात्मनः ।
अभवील्लक्ष्मणः प्रीतः प्रेम्णा चैवमुवाच ह ॥ १२ ॥
महात्मा सुग्रीवांनी असे म्हटल्यावर लक्ष्मण प्रसन्न झाले आणि मोठ्या प्रेमाने याप्रकारे बोलले- ॥१२॥
सर्वथा हि मम भ्राता सनाथो वानरेश्वर ।
त्वया नाथेन सुग्रीव प्रश्रितेन विशेषतः ॥ १३ ॥
’वानरराज सुग्रीव ! विशेषतः तुमच्या सारखा विनयशील सहायक मिळाल्याने माझे बंधु श्रीराम सर्वथा सनाथ आहेत. ॥१३॥
यस्ते प्रभावः सुग्रीव यच्च ते शौचमार्जवम् ।
अर्हस्त्वं कपिराज्यस्य श्रियं भोक्तुमनुत्तमाम् ॥ १४ ॥
’सुग्रीव ! तुमचा जो प्रभाव आहे आणि तुमच्या हृदयात जो इतका शुद्ध भाव आहे यामुळे तुम्ही वानरराज्याच्या परम उत्तम लक्ष्मीचा सदाच उपभोग घेण्यास अधिकारी आहात. ॥१४॥
सहायेन च सुग्रीव त्वया रामः प्रतापवान् ।
वधिष्यति रणे शत्रून् अचिरान्नात्र संशयः ॥ १५ ॥
’सुग्रीव ! तुम्हाला सहाय्य्काच्या रूपात प्राप्त करून प्रतापी श्रीराम रणभूमी मध्ये आपल्या शत्रूंचा शीघ्रच वध करतील, यात संशय नाही. ॥१५॥
धर्मज्ञस्य कृतज्ञस्य संग्रामेष्वनिवर्तिनः ।
उपपन्नं च युक्तं च सुग्रीव तव भाषितम् ॥ १६ ॥
’सुग्रीव ! तुम्ही धर्मज्ञ, कृतज्ञ आणि युद्धात कधी पाठ न दाखविणारे आहात. तुमचे हे भाषण सर्वथा युक्तिसंगत आणि उचित आहे. ॥१६॥
दोषज्ञः सति सामर्थ्ये कोऽन्यो भाषितुमर्हति ।
वर्जयित्वा मम ज्येष्ठं त्वां च वानरसत्तम ॥ १७ ॥
’वानरशिरोमणे ! तुम्हाला आणि माझ्या मोठ्या भावाला सोडून दुसरा कोण असा विद्वान् आहे, जो आपल्यात सामर्थ्य असूनही असे नम्रतापूर्ण वचन बोलू शकेल ? ॥१७॥
सदृशश्चासि रामस्य विक्रमेण बलेन च ।
सहायो दैवतैर्दत्तः चिराय हरिपुंगव ॥ १८ ॥
’कपिराज ! तुम्ही बल आणि पराक्रमांत भगवान् श्रीरामांच्या बरोबरीचे आहांत. देवतांनीच आम्हांला दीर्घकाळासाठी तुमच्या सारखा सहाय्यक प्रदान केला आहे. ॥१८॥
किंतु शीघ्रमितो वीर निष्क्राम त्वं मया सह ।
सांत्वय वयस्यं च भार्याहरणदुःखितम् ॥ १९ ॥
’परंतु वीरा ! आता तुम्ही शीघ्रच माझ्या बरोबर या पुरीतून बाहेर निघा. तुमचे मित्र आपल्या पत्‍नीच्या अपहरणाने खूप दुःखी आहेत. येथून निघून त्यांना सांत्वना द्या.’ ॥१९॥
यच्च शोकाभिभूतस्य श्रुत्वा रामस्य भाषितम् ।
मया त्वं परुषाण्युक्तः तत् क्षमस्व सखे मम ॥ २० ॥
’सख्या ! शोकमग्न श्रीरामांची वचने ऐकून जे मी तुम्हांला कठोर शब्द बोललो, त्यासाठी तुम्ही मला क्षमा करावी. ॥२०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे षट्त्रिंशः सर्गः ॥ ३६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा छत्तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP