॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ युद्धकाण्ड ॥ ॥ अष्टमः सर्ग: ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] कुंभकर्णाचा वध श्रीमहादेव उवाच कुम्भकर्णश्च वचः श्रुत्वा भ्रुकुटीविकटाननः । दशग्रीवो जगादेदम् आसनाद् उत्पतन्निव ॥ १ ॥ श्रीमहादेव म्हणाले-हे पार्वती, कुंभकर्णाचे वचन ऐकल्यावर, भुवया वर चढवून रावणाने आपले तोंड विकृत आणि भयंकर केले. तो आसनावरून जणू उडी मारतो की काय असे वाटले. तो म्हणाला. (१) त्वमानितो न मे ज्ञान-बोधनाय सुबुद्धिमान् । मया कृतं समीकृत्य युध्यस्व यदि रोचते ॥ २ ॥ "तू फार शहाणा आहेस हे मला माहीत आहे. परंतु मला ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी मी तुला येथे बोलावून घेतलेले नाही. मी आत्तापर्यंत जे काही केले ते तुला रुचत असेल, तर तू युद्ध कर. (२) नोचेद्गच्छ सुषुप्त्यर्थं निद्रा त्वां बाधतेऽधुना । रावणस्य वचं श्रुत्वा कुम्भकर्णो महाबलः ॥ ३ ॥ रुष्टोऽयमिति विज्ञाय तूर्णं युद्धाय निर्ययौ । स लङ्घयित्वा प्राकारं महापर्वतसन्निभः ॥ ४ ॥ निर्ययौ नगरात्तूर्णं भीषयन् हरिसैनिकान् । स ननाद महानादं समुद्रमभिनादयन् ॥ ५ ॥ नाही तर तू सरळ झोपायला जा. कारण तुला आता झो प सतावीत असे ल." रावणाचे ते वचन ऐकल्यावर, 'हा रावण कुद्ध झाला आहे' हे ओळखून महाबलवान कुंभकर्ण तत्काळ युद्धासाठी बाहेर पडला. प्रचंड पर्वताप्रमाणे शरीर असलेला तो लंकानगरीचा तट ओलांडून नगरातून बाहेर पडला (कारण अतिशय प्रचंड शरीर असल्याने तो नगरीच्या लहान वेशीतून बाहेर जाऊ शकत नव्हता) आणि मग वानर सैनिकांना भिववीत, समुद्राला नादाने भेदून टाकणारी, अशी मोठी गर्जना त्याने केली. (३-५) वानरान्कालयामास बाहुभ्यां भक्षयन् रुषा । कुम्भकर्ण तदा दृष्ट्वा सपक्षमिव पर्वतम् ॥ ६ ॥ दुद्रुवुर्वानराः सर्वे कालान्तकमिवाखिलाः । भ्रमन्तं हरिवाहिन्यां मुद्गरेण महाबलम् ॥ ७ ॥ कालयन्तं हरीन् वेगात् भक्षयन्तं समन्ततः । चूर्णयन्तं मुद्गरेण पाणिपादैरनेकधा ॥ ८ ॥ कुम्भकर्णं तदा दृष्ट्वा गदापाणिर्विभीषणः । ननाम चरणं तस्य भ्रातुर्ज्येष्ठस्य बुद्धिमान् ॥ ९ ॥ क्रोधाने दोन्ही हातांनी वानरांना धरून, त्यांना खाऊन टाकीत तो वानरांना नष्ट करू लागला. त्या वेळी कुंभकर्ण पंख असणाऱ्या प्रत्यक्ष पर्वताप्रमाणे दिसत होता. आणि यमराज दिसल्यावर ज्या प्रमाणे सर्व लोक पळू लागतात, त्या प्रमाणे त्या कुंभकर्णाला पाहून सर्व वानर पळू लागले. त्या वेळी महाबलवान कुंभकर्ण हातात मुद्गर घेऊन वानर सैन्यात फिरत होता आणि संधी मिळताच वानरांना ठार करीत, आजूबाजूला सापडतील त्या वानरांना वेगाने खाऊन टाकीत होता. तसेच आपला मुद्गर व आपले हातपाय यांचे द्वारा नाना प्रकारांनी तो वानरांचे चूर्ण करीत होता. कुंभकर्णाला तेव्हा पाहिल्यावर, हातात गदा घेतलेल्या बुद्धिमान बिभीषणाने आपल्या थोरल्या भावाच्या चरणांना वंदन केले. (६-९) विभीषणोऽहं भ्रातुर्मे दयां कुरु महामते । रावणस्तु मया भ्रातर्बहुधा परिबोधितः ॥ १० ॥ सीतां देहीति रामाय रामः साक्षाज्जनार्दनः । न शृणोति च मां हन्तुं खड्गमुद्यम्य चोक्तवान् ॥ ११ ॥ धिक् त्वां गच्छेति मां हत्वा पदा पापिभिरावृतः । चतुर्भिर्मंत्रिभिः सार्धं रामं शरणमागतः ॥ १२ ॥ (मग बिभीषण कुंभकर्णाला म्हणाला,) "हे महा बुद्धिमंता, मी तुझा भाऊ बिभीषण आहे. माझ्यावर दया कर. हे बंधो, मी रावणाला नाना प्रकारांनी बोध केला की बाबा रे, राम हे साक्षात जनार्दन आहेत. तू रामांना सीता परत देऊन टाक. पण त्याने माझे ऐकले नाही. उलट मला ठार मारण्यास तलवार उगारून तो मला म्हणाला, ' तुझा धिक्कार असो. तू येथून चालता हो.' असे बोलून पापी मंत्र्यांनी वेढलेल्या त्याने मला पायाने लाथ मारली. तेव्हा माझ्या चार मंत्र्यांसह मी रामांना शरण आलो." (१०-१२) तच्छ्रुत्वा कुम्भकर्णोऽपि ज्ञात्वा भ्रातरमागतम् । समालिङ्ग्य च वत्स त्वं जीव रामपदाश्रयात् ॥ १३ ॥ कुलसंरक्षणार्थाय राक्षसानां हिताय च । महाभागवतोऽसि त्वं पुरा मे नारदाच्छ्रुतम् ॥ १४ ॥ ते ऐकल्यावर आपला भाऊ बिभीषण जवळ आला आहे, हे कुंभकर्णाला कळले. मग बिभीषणाला आलिंगन देऊन तो म्हणाला, "अरे वत्सा, रामांच्या चरणांचा आश्रय घेऊन तू आपल्या कुळाच्या संरक्षणासाठी आणि राक्षसांच्या हितासाठी जिवंत राहा. तू महान भगवद्भक्त आहेस, असे मी पूर्वी नारदांकडून ऐकलेले आहे. (१३-१४) गच्छ तात ममेदानीं दृश्यते न च किञ्चन । मदीयो वा परो वापि मदमत्तविलोचनः ॥ १५ ॥ बाबा रे, तू जा आता. रणाच्या मदाने माझे डोळे धुंद झाले असल्यामुळे, कोण आपला आणि कोण परका हे मला आता काहीच दिसेनासे झाले आहे." (१५) इत्युक्तोऽश्रुमुखो भ्रातुः चरणावभिवन्द्य सः । रामपार्श्वमुपागत्य चिन्तापर उपस्थितः ॥ १६ ॥ कुंभकर्णाने असे सांगितल्यावर, बिभीषणाच्या मुखावर अश्रू ओघळू लागले. नंतर बंधूच्या चरणांना वंदन करून, चिंताग्रस्त झालेला बिभीषण रामांजवळ येऊन उभा राहिला. (१६) कुम्भकर्णोऽपि हस्ताभ्यां पादाभ्यां पेषयन्हरीन् । चचार वानरीं सेनां कालयन् गन्धहस्तिवत् ॥ १७ ॥ इकडे हातांनी व पायांनी वानरांना चिरडीत आणि गर्जना करीत एखाद्या मदमस्त हत्तीप्रमाणे कुंभकर्ण वानरांच्या सैन्यात फिरू लागला. (१७) दृष्ट्वा तं राघवः क्रुद्धो वायव्यं शस्त्रमादरात् । चिक्षेप कुम्भकर्णाय तेन चिच्छेद रक्षसः ॥ १८ ॥ समुद्गरं दक्षहस्तं तेन घोरं ननाद सः । स हस्तः पतितो भूमौ अनेकानर्दयन्कपीन् ॥ १९ ॥ त्या कुंभकर्णाला पाहून राघव रागावले. त्यांनी वायव्य अस्त्र घेतले आणि ते दक्षतेने कुंभकर्णावर सोडले. त्या अस्त्राने मुद्गर घेतलेल्या राक्षसाचा उजवा हात तोडून टाकला. त्यामुळे तो भयंकर गर्जना करू लागला. अनेक वानरांना चिरडून टाकीत तो तुटलेला हात जमिनीवर पडला. (१८-१९) पर्यन्तमाश्रिताः सर्वे वानरा भयवेपिताः । रामराक्षसयोर्युधं पश्यन्तः पर्यवस्थिताः ॥ २० ॥ रामांच्या जवळपास उभे असणारे सर्व वानर भीतीने कापू लागले आणि श्रीराम व कुंभकर्ण यांचे युद्ध पाहात उभे राहिले. (२०) कुम्भकर्णश्छिन्नहस्तः शालमुद्यम्य वेगतः । समरे राघवं हन्तुं दुद्राव तमथोऽच्छिनत् ॥ २१ ॥ शालेन सहितं वाम हस्तमैन्द्रेण राघवः । छिन्नबाहुमथायान्तं नर्दन्तं वीक्ष्य राघवः ॥ २२ ॥ द्वावर्धचन्द्रौ निशितौ आदायास्य पदद्वयम् । चिच्छेद पतितौ पादौ लङ्काद्वारि महास्वनौ ॥ २३ ॥ हात तुटलेल्या कुंभकर्णाने एक शालवृक्ष उगारून, रामांना ठार करण्यास तो वेगाने त्यांच्याकडे धावला. तेव्हा राघवांनी इंद्रअस्त्राने त्याचा डावा हात शालवृक्षासह तोडून टाकला. नंतर दोन्ही बाहू तुटलेले असूनसुद्धा तो गर्जना करीत आपल्याकडे येत आहे, हे पाहून राघवांनी दोन अर्धचंद्राकार तीक्ष्ण बाण घेऊन त्यांचे द्वारा त्याचे दोन्ही पाय तोडून टाकले. तेव्हा ते पाय धाडदिशी लंकेच्या द्वारात जाऊन पडले. (२१-२३) निकृत्तपाणिपादोऽपि कुम्भकर्णौऽतिभीषणः । वडवामुखवद्वक्त्रं व्यादाय रघुनन्दनम् ॥ २४ ॥ अभिदुद्राव निनदन् राहुश्चन्द्रमसं यथा । अपूरयच्छिताग्रैश्च सायकैस्तद्रघूत्तमः ॥ २५ ॥ ज्याप्रमाणे राहू हा चंद्राकडे धावतो, त्या प्रमाणे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तुटले होते, तरीसुद्धा तो महाभयंकर कुंभकर्ण राक्षस वडवानलाप्रमाणे आपले विस्तीर्ण तोंड वासून गर्जना करीत रघुनंदनांकडे धावू लागला; तेव्हा तीक्ष्ण टोके असणाऱ्या अनेक बाणांनी रघूत्तम रामांनी कुंभकर्णाचे तोंड भरून टाकले. (२४-२५) शरपूरितवक्त्रोऽसौ चुक्रोसातिभयङ्करः । अथ सूर्यप्रतीकाशं ऐन्द्रं शरमनुत्तमम् ॥ २६ ॥ वज्राशनिसमं रामः चिक्षेपासुरमृत्यवे । स तत्पर्वतसङ्काशं स्फुरत्कुण्डलदंष्ट्रकम् ॥ २७ ॥ चकर्त रक्षोऽधिपतेः शिरो वृत्रमिवाशनिः । तच्छिरः पतितं लङ्का-द्वारि कायो महोदधौ ॥ २८ ॥ त्याचे तोंड बाणांनी भरून गेले होते, तो अतिभयंकर राक्षस आक्रोश करू लागला. त्यानंतर सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारा अतिशय उत्तम असा, वज्र किंवा विद्युत्पाताप्रमाणे असणारा तो ऐंद्र बाण रामांनी त्या कुंभकर्ण असुराच्या वधासाठी सोडला. ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्राने वृत्रासुराचे शिर तोडले, त्याप्रमाणे ज्यावर कुंडले आणि दाढा चमकत होत्या असे ते राक्षसाधिपती कुंभकर्णाचे पर्वताप्रमाणे असणारे मस्तक तुटले. ते लंकेच्या द्वारात जाऊन पडले आणि कुंभकर्णाचे धड महासागरात पडले. (२६-२८) शिरोऽस्य रोधयद्द्वारं कायो नक्राद्यचूर्णयत् । ततो देवाः सऋषयो गन्धर्वाः पन्नगाः खगाः ॥ २९ ॥ सिद्धा यक्षा गुह्यकाश्च अप्सरोभिश्च राघवम् । ईडिरे कुसुमासारैः वर्षन्तश्चाभिनन्तिताः ॥ ३० ॥ त्याच्या मस्तकाने लंकेचे द्वार बंद करून टाकले तर त्याच्या धडाने सागरातील नक्र इत्यादी जलचरांचे चूर्ण करून टाकले. तेव्हा ऋषींचेसह देव आणि अप्सरांसहित गंधर्व, नाग, पक्षी, सिद्ध, यक्ष आणि गुह्यक, हे सर्व अतिशय आनंदित झाले आणि फुलांचा वर्षाव करीत ते राघवांची स्तुती करू लागले. (२९-३०) आजगाम तदा रामं द्रष्टुं देवमुनीश्वरः । नारदो गगनात्तुर्णं स्वभासा भासयन्दिशः ॥ ३१ ॥ त्या वेळी स्वतःच्या तेजाने दिशांना प्रकाशित करीत, देवमहर्षी नारद रामांचे दर्शन घेण्यास आकाशातून त्वरेने खाली पृथ्वीवर आले. (३१) रामं इन्दीवरश्यामं उदाराङ्गं धनुर्धरम् । ईषत्ताम्रविशालाक्षं ऐन्द्रास्त्राञ्चितबाहुकम् ॥ ३२ ॥ दयार्द्रदृष्ट्या पश्यन्तं वानरान् शरपीडितान् । दृष्ट्वा गद्गदया वाचा भक्त्या स्तोतुं प्रचक्रमे ॥ ३३ ॥ नंतर जे नीलकमलाप्रमाणे श्याम वर्ण होते, ज्यांचे शरीर मनोहर होते, ज्यांनी धनुष्य धारण केले होते, ज्यांचे विशाल डोळे किंचित लाल झाले होते, ज्यांनी एका हाताने ऐंद्र अस्त्र पकडले होते, जे आपल्या दयार्द्र दृष्टीने बाणांनी त्रस्त झालेल्या वानरांकडे पाहात होते, अशा त्या रामांना पाहिल्यावर, नारदांनी भक्तीने गद्गद झालेल्या वाणीने स्तुती करण्यास प्रारंभ केला. (३२-३३) नारद उवाच देवदेव जगन्नाथ परमात्मन् सनातन । नारायणाखिलाधार विश्वसाक्षिन्नमोऽस्तु ते ॥ ३४ ॥ नारद म्हणाले- "हे देवाधिदेवा, हे जगन्नाथा, हे सनातन परमात्म्या, हे सर्वांचा आधार असणाऱ्या नारायणा, हे विश्वसाक्षिन, तुम्हांला नमरकार असो. (३४) विशुद्धज्ञानरूपोऽपि त्वं लोकान् अतिवञ्चयन् । मायया मनुजाकारः सुखदुःखादिमानिव ॥ ३५ ॥ जरी तुम्ही विशुद्ध ज्ञानस्वरूप आहात, तरी मायेने मनुष्यरूप धारण करून तुम्ही जणू सुखी-दुःखी होता असे भासवत लोकांना मोहवीत आहात. (३५) त्वं मायया गुह्यमानं सर्वेषां हृदि संस्थितः । स्वयंज्योतिः स्वभावस्त्वं व्यक्त एवामलात्मनाम् ॥ ३६ ॥ मायेमुळे झाकले गेलेले तुम्ही अंतर्यामी रूपाने सर्वांच्या हृदयांत स्थित आहात. तुम्ही स्वयंप्रकाशी आहात. ज्यांचे चित्त शुद्ध झाले आहे, अशा लोकांना तुम्ही स्पष्टपणे दिसता. (३६) उन्मीलयन् सृजस्येतन् नेत्रे राम जगत्त्रयम् । उपसंह्रियते सर्वं त्वया चक्षुर्निमीलनात् । ३७ ॥ हे श्रीरामा, जेव्हा तुम्ही तुमचे डोळे उघडता तेव्हा तुम्ही हे त्रैलोक्य निर्माण करता आणि जेव्हा तुम्ही डोळे मिटता तेव्हा तुमच्याकडून या सर्व त्रैलोक्याचा नाश केला जातो. (३७) यस्मिन्सर्वमिदं भाति यतश्चैतच्चराचरम् । यस्मान्न किञ्चिल्लोकेऽस्मिन् तस्मै ते ब्रह्मणे नमः ॥ ३८ ॥ ज्यांच्या ठिकाणी हे स्थावर जंगमात्मक जग भासते, ज्यांच्यापासून या जगाची उत्पत्ती, स्थिती व नाश होतात आणि ज्यांच्याखेरीज या जगात अन्य काहीही नाही, असे ब्रह्म तुम्ही आहात, त्या तुम्हांला नमरकार असो. (३८) प्रकृतिं पुरुषं कालं व्यक्ताव्यक्तस्वरूपिणम् । यं जानन्ति मुनिश्रेष्ठाः तस्मै रामाय ते नमः ॥ ३९ ॥ तुम्हांला मुनिश्रेष्ठ प्रकृती, पुरुष, काल तसेच व्यक्त आणि अव्यक्त असे म्हणतात, त्या तुम्हांला, रामांना नमरकार असो. (३९) विकाररहितं शुद्धं ज्ञानरूपं श्रुतिर्जगौ । त्वां सर्वजगदाकार मूर्तिं चाप्याह सा श्रुतिः ॥ ४० ॥ विकारांनी रहित, शुद्ध आणि ज्ञानरूप असे तुम्ही आहात, असे श्रुती सांगते आणि ती श्रुती असेसुद्धा सांगते की तुम्ही सर्व जगदाकार स्वरूपाचे आहात. (४०) विरोधो दृश्यते देव वैदिको वेदवादिनाम् । निश्चयं नाधिगच्छन्ति त्वत्प्रसादं विना बुधाः ॥ ४१ ॥ अशा प्रकारे हे देवा, वेदांची चर्चा करणाऱ्या लोकांमध्ये वेदांचे मत सांगताना वेद-वचनांचे बाबतीत विरोध दिसून येतो. परंतु तुमची कृपा झाल्याशिवाय विद्वानांना तुमच्या स्वरूपाचा निश्चय करता येत नाही. (४१) मायया क्रीडतो देव न विरोधो मनागपि । रश्मिजालं रवेर्यद्वद् दृश्यते जलवद् भ्रमात् ॥ ४२ ॥ भ्रान्तिज्ञानात्तथा राम त्वयि सर्वं प्रकल्प्यते । मनसोऽविषयो देव रूपं ते निर्गुणं परम् ॥ ४३ ॥ परंतु हे देवा, तुम्ही मायेच्या योगाने क्रीडा करता म्हणून श्रुतीमधील वाक्यात वाटतो तसा थोडासुद्धा विरोध येत नाही. ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांचा समूह हा भ्रमामुळे पाण्याप्रमाणे दिसतो, त्या प्रमाणे हे श्रीरामा, भ्रांति ज्ञानामुळे तुमच्या ठिकाणी सर्व जग कल्पिले जाते. हे देवा, तुमचे श्रेष्ठ निर्गुण रूप हे मनाचा विषय होत नाही, (निर्गुण रूप हे मनाला आकलन होत नाही.) (४२-४३) कथं दृश्यं भवेद्देव दृश्याभावे भजेत्कथम् । अतस्तव अवतारेषु रूपाणि निपुणा भुवि ॥ ४४ ॥ भजन्ति बुद्धिसम्पन्नाः तरन्त्येव भवार्णवम् । कामक्रोधादयस्तत्र बहवः परिपन्थिनः ॥ ४५ ॥ भीषयन्ति सदा चेतो मार्जारा मूषकं यथा । त्वन्नाम स्मरतां नित्यं त्वद् रूपं अपि मानसे ॥ ४६ ॥ त्वत्पूजानिरतानां ते कथामृत परात्मनाम् । द्वद्भक्तसङ्गिनां राम संसारो गोष्पदायते ॥ ४७ ॥ तर असे ते निर्गुण रूप कसे बरे दृश्य होईल ? आणि जर ते दृश्य होत नसेल तर त्याची भक्ती कोण व कशी बरे करेल ? म्हणून बुद्धिसंपन्न आणि हुशार लोक हे पृथ्वीवरील तुमच्या अवतारांतील रूपांची भक्ती करतात आणि ते संसारसागर तरून जातात. भक्ति-मार्गात काम, क्रोध इत्यादी बरेच शत्रू आहेत. मांजर ज्या प्रमाणे उंदराला भयभीत करते, त्याप्रमाणे ते काम इत्यादी माणसाच्या मनाला भयभीत करतात. हे श्रीरामा, जे लोक तुमच्या नामाचे नित्य स्मरण करतात, जे तुमच्या रूपाचे मनात ध्यान करतात, जे तुमच्या पूजेत रत असतात, तुमचे कथामृत सेवन करण्यात ज्यांचे मन गले असते आणि जे तुमच्या भक्तांची संगती करतात, त्यांना हा संसार चिखलात उमटलेल्या गाईच्या पावलाप्रमाणे तुच्छ वाटतो. (४४-४७) अतस्ते सगुणं रुपं ध्यात्वाहं सर्वदा हृदि । मुक्तश्चरामि लोकेषु पूज्योऽहं सर्वदैवतैः ॥ ४८ ॥ म्हणून हे रामा, सदा सर्वदा माझ्या हृदयात तुमच्या सगुण रूपाचे ध्यान करून मुक्त झालेला मी सर्व लोकांत फिरत असतो आणि मी सर्व देवांनाही पूजनीय झालो आहे. (४८) राम त्वया महत्कार्यं कृतं देवहितेच्छया । कुम्भकर्णवधेनाद्य भूभारोऽयं गतः प्रभो ॥ ४९ ॥ हे रामा, देवांचे हित करण्याच्या इच्छेने तुम्ही फार महान कार्य केले आहे. हे प्रभो, कुंभकर्णाचा वध झाल्यामुळे आज भूमीचा भार नाहीसा झाला आहे. (४९) श्वो हनिष्यति सौमित्रिः इन्द्रजेतारमाहवे । हनिष्यसेऽथ राम त्वं परश्वो दशकन्धरम् ॥ ५० ॥ उद्या युद्धात लक्ष्मण इंद्रजिताचा वध करील आणि त्यानंतर परवा दिवशी हे रामा, तुम्ही रावणाला ठार कराल. (५०) पश्यामि सर्वं देवेश सिद्धैः सह नभोगतः । अनुगृह्णीष्व मां देव गमिष्यामि सुरालयम् ॥ ५१ ॥ हे देवेश्वरा, हे सर्व काही मी सिद्धांसह आकाशात राहून पाहीन. हे देवा, माझ्यावर कृपा करा. आता मी स्वर्ग लोकात जातो." (५१) इत्युक्त्वा राममामंत्र्य नारदो भगवान् ऋषिः । ययौ देवैः पूज्यमानो ब्रह्मलोकं अकल्मषम् ॥ ५२ ॥ असे बोलून आणि रामांचा निरोप घेऊन, देवांचे कडून पूजिले जाणारे भगवान नारद मुनी निष्कलंक अशा ब्रह्मलोकाला निघून गेले. (५२) भ्रातरं निहतं श्रुत्वा कुम्भकर्णं महाबलम् । रावणः शोकसंतप्तो रामेणाक्लिष्टकर्मणा ॥ ५३ ॥ मूर्छितः पतितो भुमौ उत्थाय विललाप ह । पितृव्यं निहतं श्रुत्वा पितरं चातिविह्वलम् ॥ ५४ ॥ इन्द्रजित्प्राह शोकार्तं त्यज शोकं महामते । मयि जीवति राजेंद्र मेघनादे महाबले ॥ ५५ ॥ दुःख्यावसरः कुत्र देवान्तक महामते । व्येतु ते दुःखमखिलं स्वस्थो भव महीपते ॥ ५६ ॥ आपल्या महाबलवान अशा कुंभकर्ण भावाला फारसे कष्ट न करता रामांनी ठार केले, हे ऐकल्यावर रावण अतिशय शोकाकुल झाला आणि मूर्च्छित होऊन तो जमिनीवर पडला. मग शुद्धीवर आल्यावर उडून तो विलाप करू लागला. इकडे आपला चुलता कुंभकर्ण ठार झाला आणि आपला पिता रावण अतिशय विव्हल झाला आहे हे ऐकल्यावर, इंद्रजित आपल्या शोकाकुल पित्याला म्हणाला, "हे महाबुद्धिमंता, तुम्ही शोक करणे सोडून द्या. हे महाबुद्धिवाना, देवांचा अंत करणाऱ्या हे राजेंद्रा, मी महाबलवान मेघनाद जिवंत असताना, तुम्हांला दुःख करायचे कारण काय ? हे पृथ्वीपते, तुमचे सर्व दुःख नष्ट होवो. तुम्ही स्वस्थ व्हा. (५३-५६) सर्वं समीकरिष्यामि हनिष्यामि च वै रिपून् । गत्वा निकुम्भिलां सद्यः तर्पयित्वा हुताशनम् ॥ ५७ ॥ लब्ध्वा रथादिकं तस्माद् अजेयोऽहं भवाम्यरेः । इत्युक्त्वा त्वरितं गत्वा निर्दिष्टं हवनस्थलम् ॥ ५८ ॥ मी सर्व काही सरळ व्यवस्थित करीन. मी सर्व शत्रूंना ठार मारीन. आता ताबडतोब निकुंभिला स्थानी जाऊन, अग्नीला हवनांनी तृप्त करून, रथ इत्यादी प्राप्त करून घेतल्यावर, मी शत्रूला अजिंक्य होईन." असे बोलून तो नियोजित यज्ञशाळेत निघून गेला. (५७-५८) रक्तमाल्याम्बरधरो रक्तगन्धानुलेपनः । निकुम्भिलास्थले मौनी हवनायोपचक्रमे ॥ ५९ ॥ लाल फुलांच्या माळा व लाल वस्त्रे परिधान करून आणि रक्तचंदनाचा लाल लेप लावून, त्या निकुंभिलेच्या स्थानी, त्याने मौन धारण करून हवन करण्यास प्रारंभ केला. (५९) बिभीषणोऽथ तच्छ्रुत्वा मेघनादस्य चेष्टितम् । प्राह रामाय सकलं होमारम्भं दुरात्मनः ॥ ६० ॥ समाप्यते चेद्धोमोऽयं मेघनादस्य दुर्मतेः । तदा अजेयो भवेद्राम मेघनादः सुरासुरैः ॥ ६१ ॥ मेघनादाच्या त्या कृत्याची माहिती बिभीषणाला लागली. तेव्हा तो रामांना म्हणाला, "हे रामा, जर त्या दुरात्म्या, दुष्टबुद्धी मेघनादाने सुरू केलेला हा होम निर्विघ्नपणे समाप्त झाला, तर तो देव आणि असुर यांना अजिंक्य होईल. (६०-६१) अतः शीघ्रं लक्ष्मणेन घातयिष्यामि रावणिम् । आज्ञापय मया सार्धं लक्ष्मणं बलिनां वरम् । हनिष्यति न सन्देहो मेघनादं तवानुजः ॥ ६२ ॥ म्हणून मी ताबडतोब लक्ष्मणाकडून रावणपुत्र मेघनादाचा वध करवून घेतो. तेव्हा बलवानांमधील श्रेष्ठ अशा लक्ष्मणाला माझ्याबरोबर येण्याची आज्ञा द्या. तुमचा धाकटा भाऊ लक्ष्मण हा मेघनादाला ठार करेल, यात संशय नाही." (६२) श्रीरामचन्द्र उवाच अहमेवागमिष्यामि हन्तुमिन्द्रजितं रिपुम् । आग्नेयेन महास्त्रेण सर्वराक्षसघातिना ॥ ६३ ॥ श्रीरामचंद्र म्हणाले- "सर्व राक्षसांचा घात करू शकणाऱ्या आग्नेय या महाअस्त्राने इंद्रजिताला ठार करण्यास मीच स्वतः येतो." (६३) विभीषणोऽपि तं प्राह नासावन्यैर्निहन्यते । यस्तु द्वादश वर्षाणि निद्राहारविवर्जितः ॥ ६४ ॥ तेनैव मृत्युर्निर्दिष्टो ब्रह्मणास्य दुरात्मनः । लक्ष्मणस्तु अयोध्याया निर्गम्यायात्त्वया सह ॥ ६५ ॥ तदादि निद्राहारादीन् न जानाति रघूत्तम । सेवार्थं तव राजेन्द्र ज्ञातं सर्वमिदं मया ॥ ६६ ॥ तेव्हा बिभीषण म्हणाला, "हा मेघनाद अन्य कुणाकडूनही ठार केला जाऊ शकणार नाही. जो कोणी बारा वर्षे निद्रा व आहार सोडून राहिला असेल, त्याच्याकडूनच या दुरात्म्याचा मृत्यू होईल, असे ब्रह्मदेवानेच निश्चित आहे. हे रघूत्तम रामा, हा लक्ष्मण अयोध्येतून बाहेर पडून तुमच्याबरोबर आला आहे. तेव्हापासून तो तुमच्या सेवेत मग्न असल्याने त्याला आहार व निद्रा माहीतच नाहीत. हे राजेंद्रा, हे सर्व मला ज्ञात आहे. (६४-६६) तद् आज्ञापय देवेश लक्ष्मणं त्वरया मया । हनिष्यति न सन्देहः शेषः साक्षात् धराधरः ॥ ६७ ॥ म्हणून हे देवेश्वरा, माझ्याबरोबर येण्यास लक्ष्मणाला चट्दिशी आज्ञा द्या. हा लक्ष्मण त्या मेघनादाला नक्कीच ठार करील यात संशय नाही. कारण तो पृथ्वीला धारण करणारा साक्षात शेष नाग आहे. (६७) त्वमेव साक्षाज्जगतामधीशो नारायणो लक्ष्मण एव शेषः । युवां धराभारनिवारणार्थं जातौ जगन्नाटकसूत्रधारौ ॥ ६८ ॥ हे श्रीरामा, तुम्हीच सर्व जगतांचे अधिपती नारायण आहात आणि लक्ष्मण हा शेष नाग आहे. जगरूपी नाटकाचे सूत्रधार असणारे तुम्ही दोघे भूमीचा भार हरण करण्यासाठी मनुष्यरूपाने जन्माला आलेले आहात." (६८) इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे अष्टमः सर्गः ॥ ८ ॥ इति श्रीमद्अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डेऽष्टमः सर्गः ॥ ८ ॥ |