श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ सप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

हनुमता देवान्तक त्रिशिरसोर्वधो, नीलेन महोदरस्य, ऋषभेण महापार्श्वस्य च वधः -
हनुमानाद्वारा देवांतक आणि त्रिशिराचा, नील द्वारा महोदराचा तसेच ऋषभ द्वारा महापार्श्वाचा वध -
नरान्तकं हतं दृष्ट्‍वा चुक्रुशुर्नैर्ऋतर्षभाः ।
देवान्तकस्त्रिमूर्धा च पौलस्त्यश्च महोदरः ॥ १ ॥
नरांतक मारला गेलेला पाहून देवांतक, पुलस्यनंदन त्रिशिरा आणि महोदर - हे श्रेष्ठ राक्षस हाहाकार करु लागले. ॥१॥
आरूढो मेघसंकाशं वारणेन्द्रं महोदरः ।
वालिपुत्रं महावीर्यं अभिदुद्राव वीर्यवान् ॥ २ ॥
महोदराने मेघासमान गजराजावर बसून महापराक्रमी अंगदावर मोठ्या वेगाने हल्ला चढवला. ॥२॥
भ्रातृव्यसनसन्तप्तः तदा देवान्तको बली ।
आदाय परिघं दीप्तं अङ्‌गदं समभिद्रवत् ॥ ३ ॥
भाऊ मारला गेल्याने संतप्त झालेल्या बलवान् देवांतकाने भयानक परिघ हातात घेऊन अंगदावर आक्रमण केले. ॥३॥
रथमादित्यसंकाशं युक्तं परमवाजिभिः ।
आस्थाय त्रिशिरा वीरो वालिपुत्रमथाभ्ययात् ॥ ४ ॥
याप्रकारे वीर त्रिशिरा उत्तम घोडे जुंपलेल्या सूर्यतुल्य तेजस्वी रथावर बसून वालिकुमाराचा सामना करण्यासाठी आला. ॥४॥
स त्रिभिर्देवदर्पघ्नै राक्षसेन्द्रैरभिद्रुतः ।
वृक्षमुत्पाटयामास महाविटपमङ्‌गदः ॥ ५ ॥

देवान्तकाय तं वीरः चिक्षेप सहसाऽङ्‌गदः ।
महावृक्षं महाशाखं शक्रो दीप्तमिवाशनिम् ॥ ६ ॥
देवतांचा दर्प दलन करणार्‍या त्या तीन्ही निशाचरपतिंनी आक्रमण करूनही वीर अंगदाने विशाल शाखांनी युक्त एक वृक्ष उपटला आणि जसा इंद्र प्रज्वलित वज्राचा प्रहार करतात त्याप्रकारे वालिकुमारांनी मोठ मोठ्या शाखांनी युक्त असलेला तो वृक्ष एकाएकी देवांतकावर फेकून मारला. ॥५-६॥
त्रिशिरास्तं प्रचिच्छेद शरैराशीविषोपमैः ।
स वृक्षं कृत्तमालोक्य उत्पपात तदाऽङ्‌गदः ॥ ७ ॥

स ववर्ष ततो वृक्षान् शैलांश्च कपिकुञ्जरः ।
तान् प्रचिच्छेद संक्रुद्धः त्रिशिरा निशितैः शरैः ॥ ८ ॥
परंतु त्रिशिराने विषधर सर्पांसमान भयंकर बाण मारून त्या वृक्षाचे तुकडे तुकडे करून टाकले. वृक्ष खण्डित झालेला पाहून कपिकुंजर अंगदांनी तात्काळ आकाशात उडी मारली आणि त्रिशिरावर वृक्षांची आणि शिलांची वृष्टि करू लागले. परंतु क्रोधाविष्ट त्रिशिराने तीक्ष्ण बाणांच्या द्वारे त्यांनाही तोडून टाकले. ॥७-८॥
परिघाग्रेण तान् वृक्षान् बभञ्ज च महोदरः ।
त्रिशिराश्चाङ्‌गदं वीरं अभिदुद्राव सायकैः ॥ ९ ॥
महोदराने आपल्या परिघाच्या अग्रभागाने त्या वृक्षांना मोडून-तोडून टाकले. त्यानंतर सायकांची वृष्टि करत त्रिशिराने वीर अंगदावर हल्ला केला. ॥९॥
गजेन समभिद्रुत्य वालिपुत्रं महोदरः ।
जघानोरसि संक्रुद्धः तोमरैर्वज्रसंनिभैः ॥ १० ॥
त्याच बरोबर कुपित झालेल्या महोदराने हत्तीच्या द्वारा आक्रमण करून वालिकुमाराच्या छातीवर वज्रतुल्य तोमरांचा प्रहार केला. ॥१०॥
देवान्तकश्च संक्रुद्धः परिघेण तदाऽङ्‌गदम् ।
उपगम्याभिहत्याशु व्यपचक्राम वेगवान् ॥ ११ ॥
याप्रकारेच देवांतकही अंगदाच्या निकट येऊन अत्यंत क्रोधपूर्वक परिघाच्या द्वारा त्याच्यावर आघात करून तात्काळ वेगाने तेथून दूर निघून गेला. ॥११॥
स त्रिभिर्नैर्ऋतश्रेष्ठैः युगपत् समभिद्रुतः ।
न विव्यथे महातेजा वालिपुत्रः प्रतापवान् ॥ १२ ॥
त्या तीन्ही प्रमुख निशाचरांनी एकाच वेळी हल्ला केला होता तरीही महातेजस्वी आणि प्रतापी वालिकुमार अंगदांच्या मनात जराही व्यथा झाली नाही. ॥१२॥
स वेगवान् महावेगं कृत्वा परमदुर्जयः ।
तलेन समभिद्रुत्य जघानास्य महागजम् ॥ १३ ॥
ते अत्यंत दुर्जय आणि फार वेगशाली होते. त्यांनी महान् वेग प्रकट करून महोदराच्या महान् गजराजावर आक्रमण केले आणि त्याच्या मस्तकावर जोराने थप्पड मारली. ॥१३॥
तस्य तेन प्रहारेण नागराजस्य संयुगे ।
पेततुर्नयने तस्य विननाद स कुंजरः ॥ १४ ॥
युद्धस्थळी त्यांच्या त्या प्रहाराने गजराजाचे दोन्ही डोळे निघून पृथ्वीवर पडले आणि तो तात्काळ मरून पडला. ॥१४॥
विषाणं चास्य निष्कृष्य वालिपुत्रो महाबलः ।
देवान्तकमभिद्रुत्य ताडयामास संयुगे ॥ १५ ॥
नंतर महाबली वालिकुमारांनी त्या हत्तीचा एक दात उपटला आणि युद्धस्थळी धावत जाऊन त्याचे द्वारा देवांतकावर प्रहार केला. ॥१५॥
स विह्वलस्तु तेजस्वी वातोद्‌धूत इव द्रुमः ।
लाक्षारससवर्णं च सुस्राव रुधिरं महत् ॥ १६ ॥
तेजस्वी देवांतक त्या प्रहाराने व्याकुळ झाला आणि वार्‍याने हलणार्‍या वृक्षाप्रमाणे कापू लागला. त्याच्या शरीरांतून लाक्षारसाप्रमाणे रक्ताचा महान् प्रवाह वाहू लागला. ॥१६॥
अथाश्वास्य महातेजाः कृच्छ्राद् देवान्तको बली ।
आविध्य परिघं वेगाद् आजघान तदाऽङ्‌गदम् ॥ १७ ॥
त्यानंतर महातेजस्वी बलवान् देवांतकाने मोठ्या कष्टाने स्वतःला संभाळून परिघ उचलला आणि तो वेगपूर्वक फिरवून अंगदावर फेकून मारला. ॥१७॥
परिघाभिहतश्चापि वानरेन्द्रात्मजस्तदा ।
जानुभ्यां पतितो भूमौ पुनरेवोत्पपात ह ॥ १८ ॥
त्या परिघाचा आघात खाऊन वानर राजकुमार अंगदांनी भूमीवर गुडघे टेकले. पण तात्काळच उठून ते वरच्या बाजूस उडाले. ॥१८॥
तमुत्पतन्तं त्रिशिराः त्रिभिर्बाणैरजिह्मगैः ।
घोरैर्हरिपतेः पुत्रं ललाटेऽभिजघान ह ॥ १९ ॥
ते वर उडी मारत असता त्रिशिराने तीन सरळ जाणारे भयंकर बाण मारून त्यांचे द्वारा वानर राजकुमाराच्या ललाटावर प्रहार केला. ॥१९॥
ततोऽङ्‌गदं परिक्षिप्तं त्रिभिर्नैर्ऋतपुङ्‌गवैः ।
हनुमानपि विज्ञाय नीलश्चापि प्रतस्थतुः ॥ २० ॥
त्यानंतर अंगदांना तीन प्रमुख निशाचरांनी घेरले आहे असे जाणून हनुमान् आणि नीलही त्यांच्या सहाय्याकरिता पुढे सरसावले. ॥२०॥
ततश्चिक्षेप शेलाग्रं नीलस्त्रिशिरसे तदा ।
तद् रावणसुतो धीमान् बिभेद निशितैः शरैः ॥ २१ ॥
त्यासमयी नीलाने त्रिशिरावर एक पर्वतशिखर फेकले, परंतु त्या बुद्धिमान् रावणपुत्राने तीक्ष्ण बाण मारून त्याला फोडून टाकले. ॥२१॥
तद् बाणशतनिर्भिन्नं विदारितशिलातलम् ।
सविस्फुलिङ्‌गं सज्वालं निपपात गिरेः शिरः ॥ २२ ॥
त्याच्या शेकडो बाणांनी विदीर्ण होऊन त्याची एक एक शिला विखरून गेली आणि ते पर्वतशिखर आगीच्या ठिणग्या आणि ज्वाळांसह पृथ्वीवर पडले. ॥२२॥
स विजृम्भितमालोक्य हर्षाद् देवान्तको बली ।
परिघेणाभिदुद्राव मारुतात्मजमाहवे ॥ २३ ॥
आपल्या भावाचा वाढता पराक्रम पाहून बलवान् देवांतकाला फार हर्ष झाला आणि त्याने परिघ घेऊन युद्धस्थळी हनुमानावर हल्ला केला. ॥२३॥
तमापतन्तमुत्पत्य हनुमान् कपिकुंजरः ।
आजघान तदा मूर्ध्नि वज्रकल्पेन मुष्टिना ॥ २४ ॥
त्याला येताना पाहून कपिकुंजर हनुमानांनी उडी मारुन आपल्या वज्रासारख्या मूठीने त्याच्या डोक्यावर मारले. ॥२४॥
शिरसि प्राहरनद् वीरः तदा वायुसुतो बली ।
नादेनाकम्पयच्चैव राक्षसान् स महाकपिः ॥ २५ ॥
बलवान् वायुकुमार महाकपि हनुमानाने त्यासमयी देवांतकाच्या मस्तकावर प्रहार केला आणि आपल्या भीषण गर्जनेने राक्षसांना कंपित करून टाकले. ॥२५॥
स मुष्टिनिष्पिष्टविभिन्नर्णमूर्धा
निर्वान्तदन्ताक्षिविलम्बिजिह्वः ।
देवान्तको राक्षसराजसूनुः
गतासुरुर्व्यां सहसा पपात ॥ २६ ॥
त्यांच्या मुष्टिप्रहाराने देवांतकाचे मस्तक फुटून गेले आणि त्याचे पीठ झाले. दात, डोळे आणि लांब जीभ बाहेर निघाली, तसेच तो राक्षस राजकुमार प्राण-शून्य होऊन एकाएकी पृथ्वीवर कोसळला. ॥२६॥
तस्मिन् हते राक्षसयोधमुख्ये
महाबले संयति देवशत्रौ ।
क्रुद्धस्त्रिशीर्षा निशितास्त्रमुग्रं
ववर्ष नीलोरसि बाणवर्षम् ॥ २७ ॥
राक्षस-योद्धांमधील प्रमुख महाबली देवद्रोही देवांतक युद्धात मारला गेल्यानंतर त्रिशिराला फार क्रोध आला आणि त्याने नीलाच्या छातीवर तीक्ष्ण बाणांची भयंकर वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥२७॥
महोदरस्तु संक्रुद्धः कुञ्जरं पर्वतोपमम् ।
भूयः समधिरुह्याशु मन्दरं रश्मिमानिव ॥ २८ ॥
तदनंतर अत्यंत क्रोधाविष्ट झालेला महोदर पुन्हा लवकरच एका पर्वताकार हत्तीवर स्वार झाला, जणु सूर्यदेवच मंदराचलावर आरूढ झाला आहे. ॥२८॥
ततो बाणमयं वर्षं नीलस्योपर्यपातयत् ।
गिरौ वर्षं तडिच्चक्र चापवानिव तोयदः ॥ २९ ॥
हत्तीवर चढून त्याने नीलावर बाणांची विकट वृष्टि केली जणु इंद्रनुष्य तसेच विद्युतमण्डलानी युक्त मेघच एखाद्या पर्वताकार जलाची वृष्टि करत असावा. ॥२९॥
ततः शरौघैरभिवर्ष्यमाणो
विभिन्नगात्रः कपिसैन्यपालः ।
नीलो बभूवाथ निसृष्टगात्रो
विष्टम्भितस्तेन महाबलेन ॥ ३० ॥
बाण-समूहांच्या निरंतर वृष्टिमुळे वानर सेनापति नीलाचे सारे अंग क्षत-विक्षत झाले. त्याचे शरीर शिथिल झाले. याप्रकारे महाबली महोदराने त्यांना मूर्च्छित करून त्यांच्या बल-विक्रमाला कुण्ठित करुन टाकले. ॥३०॥
ततस्तु नीलः प्रतिलब्धसंज्ञः
शैलं समुत्पाट्य सवृक्षखण्डम् ।
ततः समुत्पत्य भृशोग्रवेगो
महोदरं तेन जघान मूर्ध्नि ॥ ३१ ॥
त्यानंतर शुद्धिवर आल्यावर नीलाने वृक्षसमूहांनी युक्त एका शैलशिखराला उपटले. त्याचा वेग फार भयंकर होता. त्याने उडी मारून त्या शैलाला महोदराच्या मस्तकावर फेकून मारले. ॥३१॥
ततः स शैलाभिनिपातभग्नो
महोदरस्तेन महाद्विपेन ।
व्यामोहितो भूमितले गतासुः
पपात वज्राभिहतो यथाद्रिः ॥ ३२ ॥
त्या पर्वत शिखराच्या आघाताने महोदर त्या महान् गजराजासह चूर्ण झाला आणि मूर्च्छित तसेच प्राणशून्य होऊन वज्राने मारलेल्या पर्वताप्रमाणे पृथ्वीवर कोसळला. ॥३२॥
पितृव्यं निहतं दृष्ट्‍वा त्रिशिराश्चापमाददे ।
हनुमन्तं च संक्रुद्धो विव्याध निशितैः शरैः ॥ ३३ ॥
पित्याचा भाऊ मारला गेलेला पाहून त्रिशिराच्या क्रोधाला मर्यादा राहिली नाही. त्याने धनुष्य हातात घेतले आणि हनुमंतांना तीक्ष्ण बाणांनी विंधण्यास आरंभ केला. ॥३३॥
स वायुसूनुः कुपितः चिक्षेप शिखरं गिरेः ।
त्रिशिरास्तच्छरैस्तीक्ष्णैः बिभेद बहुधा बली ॥ ३४ ॥
तेव्हा वायुसुताने कुपित होऊन त्या राक्षसावर पर्वताचे शिखर फेकले, परंतु बलवान् त्रिशिराने आपल्या तीक्ष्ण सायकांनी त्याचे कित्येक तुकडे करून टाकले. ॥३४॥
तद्व्यर्थं शिखरं दृष्ट्‍वा द्रुमवर्षं तदा कपिः ।
विससर्ज रणे तस्मिन् रावणस्य सुतं प्रति ॥ ३५ ॥
त्या पर्वतशिखराचा प्रहार व्यर्थ झाल्याचे पाहून कपिवर हनुमानांनी त्या रणभूमीमध्ये रावणपुत्र त्रिशिरावर वृक्षांचा वर्षाव करण्यास आरंभ केला. ॥३५॥
तमापन्तमाकाशे द्रुमवर्षं प्रतापवान् ।
त्रिशिरा निसितैर्बाणैः चिच्छेद च ननाद च ॥ ३६ ॥
परंतु प्रतापी त्रिशिराने आकाशातून होणार्‍या वृक्षांच्या त्या वृष्टिला आपल्या तीक्ष्ण बाणांनी छिन्न-भिन्न करून टाकले आणि मोठ्या जोराने गर्जना केली. ॥३६॥
हनूमांस्तु समुत्पत्य हयं त्रिशिरसस्तदा ।
विददार नखैः क्रुद्धो गजेन्द्रं मृगराडिव ॥ ३७ ॥
तेव्हा हनुमान उडी मारून त्रिशिराच्या जवळ पोहोचले आणि जसा कुपित सिंह गजराजाला आपल्या पंजांनी चिरून टाकतो त्याचप्रकारे क्रोधाविष्ट त्या पवनकुमारांनी त्रिशिराच्या घोड्याला आपल्या नखांनी विदीर्ण करून टाकले. ॥३७॥
अथ शक्तिं समादाद्य कालरात्रिमिवान्तकः ।
चिक्षेपानिलपुत्राय त्रिशिरा रावणात्मजः ॥ ३८ ॥
हे पाहून रावणकुमार त्रिशिराने शक्ती हातात घेतली. जणु यमराजाने कालरात्रीला बरोबर घेतली असावी, आणि ती शक्ति घेऊन त्याने ती पवनकुमार हनुमानावर फेकली. ॥३८॥
दिवः क्षिप्तामिवोल्कां तां शक्तिं क्षिप्तामसङ्‌गताम् ।
गृहीत्वा हरिशार्दूलो बभञ्ज च ननाद च ॥ ३९ ॥
आकाशात उल्कापात झाला असावा त्याप्रमाणे ती शक्ती, जिची गति कुठे कुण्ठित होत नव्हती, निघाली, परंतु वानरश्रेष्ठ हनुमानाने ती आपल्या शरीरावर आदळण्या पूर्वीच हातांनी तिला पकडली आणि तोडून टाकली. तोडल्यानंतर त्यांनी भयंकर गर्जना केली. ॥३९॥
तां दृष्ट्‍वा घोरसंकाशां शक्तिं भग्नां हनूमता ।
प्रहृष्टा वानरगणा विनेदुर्जलदा यथा ॥ ४० ॥
हनुमानांनी ती भयानक शक्ती तोडली हे पाहून वानरवृंद अत्यंत हर्षाने उल्हासित होऊन मेघांच्या समान गंभीर गर्जना करू लागले. ॥४०॥
ततः खड्गं समुद्यम्य त्रिशिरा राक्षसोत्तमः ।
निचखान तदा खड्गं वानरेन्द्रस्य वक्षसि ॥ ४१ ॥
तेव्हा राक्षसोत्तम त्रिशिराने तलवार उचलली आणि कपिश्रेष्ठ हनुमानाच्या छातीवर तिचा भरपूर आघात केला. ॥४१॥
खड्गप्रहाराभिहतो हनूमान् मारुतात्मजः ।
आजघान त्रिमूर्धानं तलेनोरसि वीर्यवान् ॥ ४२ ॥
तलवारीच्या वाराने घायाळ होऊन पराक्रमी पवनकुमार हनुमानांनी त्रिशिराच्या छातीवर एक चपराक मारली. ॥४२॥
स तलाभिहतस्तेन स्रस्तहस्तायुधो भुवि ।
निपपात महातेजाः त्रिशिरास्त्यक्तचेतनः ॥ ४३ ॥
त्यांची थप्पड लागताच महातेजस्वी त्रिशिरा आपली चेतना गमावून बसला. त्याच्या हातातून हत्यार गळून पडले आणि तो स्वतःही पृथ्वीवर पडला. ॥४३॥
स तस्य पततः खड्गं तमाच्छिद्य महाकपिः ।
ननाद गिरिसंकाशः त्रासयन् सर्वराक्षसान् ॥ ४४ ॥
पडतेवेळी त्या राक्षसाचे खड्ग हिसकावून घेऊन पर्वताकार महाकपि हनुमान सर्व राक्षसांना भयभीत करीत गर्जना करू लागले. ॥४४॥
अमृष्यमाणस्तं घोषं उत्पपात निशाचरः ।
उत्पत्य च हमूमन्तं ताडयामास मुष्टिना ॥ ४५ ॥
त्यांची ती गर्जना त्या निशाचराला सहन झाली नाही म्हणून तो एकाएकी उडी मारून उभा राहिला. उठताच त्याने हनुमानांना मुठीने एक बुक्का मारला. ॥४५॥
तेन मुष्टिप्रहारेण संचुकोप महाकपिः ।
कुपितश्च निजग्राह किरीटे राक्षसर्षभम् ॥ ४६ ॥
त्याच्या बुक्क्याचा भार खाऊन महाकपि हनुमानांना फार क्रोध आला. कुपित झाल्यावर त्यांनी त्या राक्षसाचे मुकुटमण्डित मस्तक पकडून धरले. ॥४६॥
स तस्य शीर्षाण्यसिना शितेन
किरीटजुष्टानि सकुण्डलानि ।
क्रुद्धः प्रचिच्छेद सुतोऽनिलस्य
त्वष्टुः सुतस्येव शिरांसि शक्रः ॥ ४७ ॥
नंतर तर जसे पूर्वकाळी इंद्राने त्वष्ट्याच्या पुत्र विश्वरूपाच्या तीन्ही मस्तकांना वज्राने तोडून टाकले होते, त्याचप्रकारे कुपित झालेल्या पवनपुत्र हनुमानांनी रावणपुत्र त्रिशिराची किरीट आणि कुण्डलांसहित तीन्ही मस्तके तीक्ष्ण तलवारीनी कापून टाकली. ॥४७॥
तान्यायताक्षाण्यगसंनिभानि
प्रदीप्तवैश्वानरलोचनानि ।
पेतुः शिरांसीन्द्ररिपोः पृथिव्यां
ज्योतींषि मुक्तानि यथार्कमार्गात् ॥ ४८ ॥
त्या मस्तकांची सर्व इंद्रिये विशाल होती. त्याचे डोळे प्रज्वलित अग्निसमान उद्दीप्त होत होते. त्या इंद्रद्रोही त्रिशिराची तीन्ही शिरे, जसे आकाशांतून तारे तुटून पृथ्वीवर पडतात तशी पृथ्वीवर पडली. ॥४८॥
तस्मिन् हते देवरिपौ त्रिशीर्षे
हनूमता शक्रपराक्रमेण ।
नेदुः प्लवंगाः प्रचचाल भूमी
रक्षांस्यथो दुद्रुविरे समन्तात् ॥ ४९ ॥
देवद्रोही त्रिशिरा जेव्हा इंद्रतुल्य पराक्रमी हनुमानांच्या हाताने मारला गेला तेव्हा समस्त वानर हर्षनाद करू लागले, धरणी कापू लागली तसेच राक्षस चारी दिशांना पळून जाऊ लागले. ॥४९॥
हतं त्रिशिरसं दृष्ट्‍वा तथैव च महोदरम् ।
हतौ प्रेक्ष्य दुराधर्षौ देवान्तकनरान्तकौ ॥ ५० ॥

चुकोप परमामर्षी मत्तो राक्षसपुङ्‌गवः ।
जग्राहार्चिष्मतीं चापि गदां सर्वायसीं तदा ॥ ५१ ॥
त्रिशिरा आणि महोदर मारले गेलेले पाहून आणि दुर्जय वीर देवांतक आणि नरांतकही मृत्युमुखी पडल्याचे जाणून अत्यंत अमर्षशील राक्षसश्रेष्ठ मत्त महापार्श्व कुपित झाला. त्याने एक तेजस्वी गदा हातात घेतली जी संपूर्ण लोखंडाची बनलेली होती. ॥५०-५१॥
हेमपट्टपरिक्षिप्तां मांसशोणितफेनिलाम् ।
विराजमानां विपुलां शत्रुशोणिततर्पिताम् ॥ ५२ ॥
तिच्यावर सोन्याचा पत्रा मढविलेला होता. युद्धस्थळी पोहोचल्यावर ती शत्रूंच्या रक्त आणि मांसात लडबडून जात होती. तिचा आकार विशाल होता. ती सुंदर शोभेने संपन्न तसेच शत्रूंच्या रक्ताने तृप्त होणारी होती. ॥५२॥
तेजसा संप्रदीप्ताग्रां रक्तमाल्याविभूषिताम् ।
ऐरावतमहापद्म सार्वभौमभयावहाम् ॥ ५३ ॥
तिचा अग्रभाग तेजाने प्रज्वलित होत होता. ती लाल रंगाच्या फुलांनी सजविली गेली होती तसेच ऐरावत, पुण्डरीक तसेच सार्वभौम नामक दिग्गजांनाही भयभीत करणारी होती. ॥५३॥
गदामादाय संक्रुद्धो मत्तो राक्षसपुङ्‌गवः ।
हरीन् समभिदुद्राव युगान्ताग्निरिव ज्वलन् ॥ ५४ ॥
त्या गदेला हातात घेऊन क्रोधाविष्ट झालेला राक्षस-शिरोमणी मत्त (महापार्श्व) प्रलयकालच्या अग्निसमान प्रज्वलित झाला आणि वानरांकडे धावला. ॥५४॥
अथर्षभः समुत्पत्य वानरो रावणानुजम् ।
मत्तानीकमुपागम्य तस्थौ तस्याग्रतो बली ॥ ५५ ॥
तेव्हा वृषभ नामक बलवान् वानर उडी मारून रावणाचा लहान भाऊ महापार्श्व जवळ येऊन पोहोचले आणि त्याच्या समोर उभे राहिले. ॥५५॥
तं पुरस्तात् स्थितं दृष्ट्‍वा वानरं पर्वतोपमम् ।
आजघानोरसि क्रुद्धो गदया वज्रकल्पया ॥ ५६ ॥
पर्वताकार वानरवीर ऋषभाला समोर उभा असलेला पाहून कुपित झालेल्या महापार्श्वाने आपला वज्रतुल्य गदेने त्यांच्या छातीवर प्रहार केला. ॥५६॥
स तयाभिहतस्तेन गदया वानरर्षभः ।
भिन्नवक्षाः समाधूतः सुस्त्राव रुधिरं बहु ॥ ५७ ॥
त्याच्या त्या गदेच्या आघाताने वानरशिरोमणी ऋषभाचे वक्षःस्थळ क्षत-विक्षत झाले. ते कंपित झाले आणि अधिक प्रमाणात रक्ताची धारा वाहवू लागले. ॥५७॥
स संप्राप्य चिरात् संज्ञां ऋषभो वानरेश्वरः ।
क्रुद्धौ विस्फुरमाणौष्ठौ महापार्श्वमुदैक्षत ॥ ५८ ॥
बर्‍याच वेळाने शुद्धिवर आल्यावर वानरराज ऋषभ कुपित झाले आणि महापार्श्वाकडे पाहू लागले. त्यासमयी त्यांचे ओठ रागाने थरथरत होते. ॥५८॥
स वेगवान वेगवदभ्युपेत्य
तं राक्षसं वानरवीरमुख्यः ।
संवर्त्य मुष्टिं सहसा जघान
बाह्वंतरे शैलनिकाशरूपः ॥ ५९ ॥
वानरवीरांमध्ये श्रेष्ठ मुख्य ऋषभांचे रूप पर्वतासमान भासत होते. ते अत्यंत वेगवान् होते. त्यांनी वेगपूर्वक त्या राक्षसाच्या जवळ पोहोचून मूठ उगारली आणि एकाएकी त्याच्या छातीवर प्रहार केला. ॥५९॥
स कृत्तमूलः सहसेव वृक्षः
क्षितौ पपात क्षतजोक्षिताङ्‌गः ।
तां चास्य घोरां यमदण्डकल्पां
गदां प्रगृह्याशु तदा ननाद ॥ ६० ॥
नंतर तर महापार्श्व मूळापासून छाटून टाकलेल्या वृक्षाप्रमाणे एकाएकी पृथ्वीवर कोसळला. त्याचे सारे अंग रक्ताने न्हाऊन गेले होते. इकडे ऋषभ त्या निशाचराची यमदण्डासमान भयंकर गदा शीघ्रच हातात घेऊन जोरजोराने गर्जना करू लागले. ॥६०॥
मुहूर्तमासीत् स गतासुकल्पः
प्रत्यागतात्मा सहसा सुरारिः ।
उत्पत्य संध्याभ्रसमानवर्णः
तं वारिराजात्मजमाजघान ॥ ६१ ॥
देवद्रोही महापार्श्व एक मुहूर्तपर्यंत प्रेतवत् पडून राहिला नंतर शुद्धिवर आल्यावर तो एकाएकी उडी मारून उभा राहिला. त्याचे रक्तरंजित शरीर संध्याकाळच्या मेघाप्रमाणे लाल दिसत होते. त्याने वरूणपुत्र ऋषभावर जबरदस्त प्रहार केला. ॥६१॥
स मूर्च्छितो भूमितले पपात
मुहूर्तमुत्पत्य पुनः ससंज्ञः ।
तामेव तस्याद्रिवराद्रिकल्पां
गदां समाविध्य जघान संख्ये ॥ ६२ ॥
त्या आघाताने ऋषभ मूर्च्छित होऊन पृथ्वीवर पडले. दोन घटकांनंतर शुद्धिवर आल्यावर ते परत उडी मारून समोर आले आणि त्यांनी युद्धस्थळी महापार्श्वाची तीच गदा, जी एखाद्या पर्वतराजाच्या शिखरासमान भासत होती, फिरवून त्या निशाचरावर मारली. ॥६२॥
सा तस्य रौद्रा समुपेत्य देहं
रौद्रस्य देवाध्वरविप्रशत्रोः ।
बिभेद वक्षः क्षतजं च भूरि
सुस्राव धात्वम्भ इवाद्रिराजः ॥ ६३ ॥
त्याच्या त्या भयंकर गदेने देवता, यज्ञ आणि ब्राह्मणांशी शत्रुत्व ठेवणार्‍या त्या रौद्र राक्षसाच्या शरीरावर आघात करून त्याचे वक्षःस्थळ विदीर्ण करून टाकले. नंतर तर जसे पर्वतराज हिमालय गेरू आदि धातुंशी मिसळलेले जल प्रवाहित करतो त्याचप्रमाणे तोही अधिक प्रमाणात रक्त वाहवू लागला. ॥६३॥
अभिदुद्राव वेगेन गदां तस्य महात्मनः ।
तां गृहीत्वा गदां भीमां आविध्य च पुनः पुनः ॥ ६४ ॥

मत्तानीकं महात्मा स जघान रणमूर्धनि ।
त्यासमयी त्या राक्षसाने महामना ऋषभाच्या हातून आपली गदा घेण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केला; परंतु ऋषभांनी त्या भयानक गदेला हातात घेऊन वारंवार फिरविले आणि अत्यंत वेगाने महापार्श्वावर आक्रमण केले. याप्रकारे त्या महामनस्वी वानरवीराने युद्धाच्या आरंभीच त्या निशाचराची जीवन-लीला समाप्त केली होती. ॥६४ १/२॥
स स्वया गदया भग्नो विशीर्णदशनेक्षणः ॥ ६५ ॥

निपपात तदा मत्तो वज्राहत इवाचलः।
आपल्याच गदेचा प्रहार खाऊन महापार्श्वाचे दात तुटून गेले आणि डोळे फुटून गेले. तो वज्र मारले गेलेल्या पर्वत-शिखराप्रमाणे तात्काळ धराशायी झाला. ॥६५ १/२॥
विशीर्णनयने भूमौ गतसत्त्वे गतायुषि ।
पतिते राक्षसे तस्मिन् विद्रुतं राक्षसं बलम् ॥ ६६ ॥
ज्याचे डोळे नष्ट झाले होते आणि चेतना विलुप्त झाली होती, तो राक्षस महापार्श्व जेव्हा गतायु होऊन पृथ्वीवर कोसळला, तेव्हा राक्षसांची सेना सर्व बाजूस पळू लागली. ॥६६॥
तस्मिन् हते भ्रातरि रावणस्य
तन्नैर्ऋतानां बलमर्णवाभम् ।
त्यक्तायुधं केवलजीवितार्थं
दुद्राव भिन्नार्णवसंनिकाशम् ॥ ६७ ॥
रावणाचा भाऊ महापार्श्वाचा वध झाल्यावर राक्षसांची ती समुद्राप्रमाणे विशाल सेना हत्यारे फेकून देऊन केवळ जीव वाचविण्यासाठी सर्व बाजूस पळून जाऊ लागली, जणु काही महासागर फुटून सर्व बाजूस वाहू लागला होता. ॥६७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे सप्ततितमः सर्गः ॥ ७० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा सत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP