विश्वामित्रेण रम्भायै शापं दत्त्वा पुनर्घोरं तपश्चर्तुं दीक्षाग्रहणम् -
|
विश्वामित्रांनी रंभेला शाप देऊन पुन्हा घोर तपस्येसाठी दीक्षा घेणे -
|
सुरकार्यमिदं रंभे कर्तव्यं सुमहत् त्वया ।
लोभनं कौशिकस्येह काममोहसमन्वितम् ॥ १ ॥
|
[इंद्र म्हणाले] - रंभे ! देवतांचे एक फार मोठे कार्य उपस्थित झाले आहे. हे तुलाच पूरे करावयाचे आहे. तू महर्षि विश्वामित्रांना याप्रकारे भुलव की ज्यायोगे ते काम आणि मोहाच्या वशीभूत होतील. ॥ १ ॥
|
तथोक्ता साप्सरा राम सहस्राक्षेण धीमता ।
व्रीडिता प्राञ्जलिर्वाक्यं प्रत्युवाच सुरेश्वरम् ॥ २ ॥
|
'श्रीरामा ! बुद्धिमान् इंद्राने असे सांगितल्यावरर ती अप्सरा लज्जित होऊन हात जोडून देवेश्वर इंद्रास म्हणाली - ॥ २ ॥
|
अयं सुरपते घोरो विश्वामित्रो महामुनिः ।
क्रोधमुत्स्रक्ष्यते घोरं मयि देव न संशयः ॥ ३ ॥
|
'सुरपति ! हे महामुनि विश्वामित्र फार भयंकर आहेत. देवा ! यात संदेह नाही की ते माझ्यावर भयानक क्रोधाचा प्रयोग करतील. ॥ ३ ॥
|
ततो हि मे भयं देव प्रसादं कर्तुमर्हसि ।
एवमुक्तस्तया राम सभयं भीतया तदा ॥ ४ ॥
तामुवाच सहस्राक्षो वेपमानां कृताञ्जलिम् ।
मा भैषी रंभे भद्रं ते कुरुष्व मम शासनम् ॥ ५ ॥
|
'म्हणून देवेश्वर ! मला त्यांचे फार भय वाटते. आपण माझ्यावर कृपा करावी.' श्रीरामा ! रंभेने याप्रकारे भय व्यक्त केल्यावर सहस्राक्ष इंद्र हात जोडून थरथर कांपत उभ्या असलेल्या रंभेला म्हणाले - "रंभे ! तू घाबरू नको. तुझे भले होवो. तू माझी आज्ञा मान." ॥ ४-५ ॥
|
कोकिलो हृदयग्राही माधवे रुचिरद्रुमे ।
अहं कंदर्पसहितः स्थास्यामि तव पार्श्वतः ॥ ६ ॥
|
'वैशाख महिन्यात ज्यावेळी प्रत्येक वृक्ष नवपल्लवांनी परम सुंदर शोभा धारण करतो, आपल्या मधुर कूजनाने सर्वांच्या हृदयाला आकर्षित करणारे कोकिळ आणि कामदेवासह मीही तुझ्याजवळच राहीन. ॥ ६ ॥
|
त्वं हि रूपं बहुगुणं कृत्वा परमभास्वरम् ।
तमृषिं कौशिकं रंभे भेदयस्व तपस्विनम् ॥ ७ ॥
|
'भद्रे ! तू आपल्या परम कान्तिमान् रूपाला हाव-भाव आदि विविध गुणांनी संपन्न करून त्याद्वारे विश्वामित्र मुनिंना तपस्येपासून विचलित कर.' ॥ ७ ॥
|
सा श्रुत्वा वचनं तस्य कृत्वा रूपमनुत्तमम् ।
लोभयामास ललिता विश्वामित्रं शुचिस्मिता ॥ ८ ॥
|
देवराजाचे हे वचन ऐकून मधुर सुहास्य करणार्या सुंदर अप्सरेने परम उत्तम रूप धारण करून विश्वामित्रांना भुलविण्यास आरंभ केला. ॥ ८ ॥
|
कोकिलस्य तु शुश्राव वल्गु व्याहरतः स्वनम् ।
संप्रहृष्टेन मनसा स चैनामन्ववैक्षत ॥ ९ ॥
|
विश्वामित्रांनी मधुर स्वरात कूजन करणार्या कोकिळेचे मधुर असे 'कुहुकुहु' शब्द ऐकले. त्यांनी प्रसन्नचित्त होऊन जेव्हां तिकडे दृष्टिपात केला तेव्हां त्यांना समोर रंभा उभी असलेली दिसून आली. ॥ ९ ॥
|
अथ तस्य च शब्देन गीतेनाप्रतिमेन च ।
दर्शनेन च रम्भाया मुनिः संदेहमागतः ॥ १० ॥
|
कोकिळेचे कूजन, रंभेचे अनुपम गीत आणि अप्रत्याशित दर्शन यामुळे मुनिच्या मनांत संदेह उत्पन्न झाला. ॥ १० ॥
|
सहस्राक्षस्य तत्सर्वं विज्ञाय मुनिपुङ्गवः ।
रम्भां क्रोधसमाविष्टः शशाप कुशिकात्मजः ॥ ११ ॥
|
देवराजाचे हे कुचक्र (कारस्थान) त्यांना समजून आले. मग तर मुनिवर क्रोधाविष्ट होऊन रंभेला शाप देत म्हणाले - ॥ ११ ॥
|
यन्मां लोभयसे रम्भे कामक्रोधजयैषिणम् ।
दशवर्षसहस्राणि शैली स्थास्यसि दुर्भगे ॥ १२ ॥
|
"दुर्भगे रंभे ! मी काम आणि क्रोधावर विजय मिळवू इच्छित आहे आणि तू मला परावृत्त प्रयत्न करीत आहेस. म्हणून या अपराधामुळे तू दहा हजार वर्षेपर्यंत पाषाणाची प्रतिमा बनून राहशील. ॥ १२ ॥
|
ब्राह्मणः सुमहातेजास्तपोबलसमन्वितः ।
उद्धरिष्यति रम्भे त्वां मत्क्रोधकलुषीकृताम् ॥ १३ ॥
|
'रंभे ! शापाचा काळ पूर्ण झाल्यावर एक महान तेजस्वी आणि तपोबल संपन्न ब्राह्मण (ब्रह्मदेवांचे पुत्र वसिष्ठ) माझ्या क्रोधाने कलुषित झालेल्या तुझा उद्धार करतील.' ॥ १३ ॥
|
एवमुक्त्वा महातेजा विश्वामित्रो महामुनिः ।
अशक्नुवन् धारयितुं कोपं संतापमात्मनः ॥ १४ ॥
|
असे म्हणून महतेजस्वी महामुनि विश्वामित्र आपला क्रोध आवरू न शकल्यामुळे मनांतल्या मनांत संतप्त झाले. ॥ १४ ॥
|
तस्य शापेन महता रंभा शैली तदाभवत् ।
वचः श्रुत्वा च कन्दर्पो महर्षेः स च निर्गतः ॥ १५ ॥
|
मुनिच्या महाशापाने रंभा तात्काळ पाषाणाची प्रतिमा बनली. महर्षिंचे शापयुक्त वचन ऐकून कंदर्प आणि इंद्रांनी तेथून काढता पाय घेतला. ॥ १५ ॥
|
कोपेन सुमहातेजास्तपोऽपहरणे कृते ।
इन्द्रियैरजितै राम न लेभे शान्तिमात्मनः ॥ १६ ॥
|
'श्रीरामा ! क्रोधाने तपस्येचा क्षय झाला आणि इंद्रियें अजून काबूत येऊ शकली नाहीत असा विचार करून महातपस्वी मुनिच्या चित्ताला शांति मिळेनासे झाले. ॥ १६ ॥
|
बभूवास्य मनश्चिन्ता तपोऽपहरणे कृते ।
नैवं क्रोधं गमिष्यामि न च वक्ष्ये कथञ्चन ॥ १७ ॥
|
तपस्येचे अपहरण झाल्यामुळे त्यांच्या मनात असा विचार उत्पन्न झाला की 'आता मी क्रोधही करणार नाही आणि मुखाने कुणाशी बोलणारही नाही. ॥ १७ ॥
|
अथवा नोच्छ्वसिष्यामि संवत्सरशतान्यपि ।
अहं हि शोषयिष्यामि आत्मानं विजितेन्द्रियः ॥ १८ ॥
|
'अथवा शंभर वर्षे मी श्वासही घेणार नाही. इंद्रियांना जिंकून या शरीराला सुकवून टाकीन. ॥ १८ ॥
|
तावद् यावद्धि मे प्राप्तं ब्राह्मण्यं तपसार्जितम् ।
अनुच्छ्वसन्नभुञ्जानस्तिष्ठेयं शाश्वतीः समाः ॥ १९ ॥
|
'जोपर्यंत आपल्या तपस्येने उपार्जित ब्राह्मणत्व मला प्राप्त होत नाही तोपर्यंत अनंत वर्षे निघून गेली तरी मी न खाता-पिता उभा राहून श्वासही घेणार नाही. ॥ १९ ॥
|
न हि मे तप्यमानस्य क्षयं यास्यन्ति मूर्तयः ।
एवं वर्षसहस्रस्य दीक्षां स मुनिपुङ्गवः ।
चकाराप्रतिमां लोके प्रतिज्ञां रघुनन्दन ॥ २० ॥
|
'तपस्या करीत असतां माझ्या शरीराचे अवयव कदापि नष्ट होणार नाहीत.' रघुनन्दना ! अस निश्चय करून मुनिवर विश्वामित्रांनी पुन्हा एक हजार वर्षे तपस्या करण्यासाठी दीक्षा घेतली. त्यांनी जी प्रतिज्ञा केली होती त्यास संसारात कुठे तुलना नाही. ॥ २० ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे चतुःषष्टितमः सर्गः ॥ ६४ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा चौसष्टावा सर्ग समाप्त झाला. ॥ ६४ ॥
|