[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ त्रयोदशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
महर्षिणागस्त्येन श्रीरामं प्रति परितोषं प्रकट्य सीतायाः प्रशंसनं श्रीरामेण पृष्टेन तेन पञ्चवट्यामाश्रमं निर्माय तत्रावस्थातुमाज्ञाप्रदानं श्रीरामप्रभृतीनां ततः प्रस्थानं च -
महर्षि अगस्त्यांनी श्रीरामांच्या प्रति आपली प्रसन्नता प्रकट करून सीतेची प्रशंसा करणे, श्रीरामांनी विचारल्यावरून त्यांना पञ्चवटीत आश्रम बनवून राहाण्याचा आदेश देणे तसेच श्रीराम आदिंचे प्रस्थान -
राम प्रीतोऽस्मि भद्रं ते परितुष्टोऽस्मि लक्ष्मण ।
अभिवादयितुं यन्मां प्राप्तौ स्थः सह सीतया ॥ १ ॥
’श्रीरामा ! आपले कल्याण होवो ! मी आपल्यावर फार प्रसन्न आहे. लक्ष्मण मी तुझ्यावर ही फार संतुष्ट आहे. आपण दोघे भाऊ मला प्रणाम करण्यासाठी जे सीतेसह येथपर्यंत आला आहात त्यामुळे मला फार प्रसन्नता वाटली आहे. ॥१॥
अध्वश्रमेण वां खेदो बाधते प्रचुरश्रमः ।
व्यक्तमुत्कण्ठते वापि मैथिली जनकात्मजा ॥ २ ॥
’पायी चालण्याच्या परिश्रमाने आपण लोक फार थकला आहात यामुळे जे कष्ट झाले आहेत ते आपणा दोघांना फार पीडा देत असतील. जनकनंदिनी मैथिली ही आपला थकवा दूर करण्यासाठी अधिक उत्कंठित आहे ही गोष्ट स्पष्ट कळून येत आहे. ॥२॥
एषा च सुकुमारी च खेदैश्च न विमानिता ।
प्राज्यदोषं वनं प्राप्ता भर्तृस्नेहप्रचोदिता ॥ ३ ॥
’ही सुकुमार आहे आणि या आधी तिला अशा दुःखाचा कधी सामना करावा लागलेला नाही. वनात अनेक प्रकारचे कष्ट होतात पण तरीही ही पतिप्रेमाने प्रेरित होऊन येथे आली आहे. ॥३॥
यथैषा रमते राम इह सीता तथा कुरु ।
दुष्करं कृतवत्येषा वने त्वामनुगच्छती ॥ ४ ॥
’श्रीरामा ! ज्याप्रकारे सीतेचे येथे मन लागेल - ज्या प्रकारे ती प्रसन्न राहील, असे कार्य आपण करावे. वनात आपल्या बरोबर येऊन तिने दुष्कर कार्य केले आहे. ॥४॥
एषा हि प्रकृतिः स्त्रीणामासृष्टे रघुनन्दन ।
समस्थमनुरज्यन्ते विषमस्थं त्यज्यन्ति च ॥ ५ ॥
’रघुनंदन ! सृष्टिकालापासून आजपर्यत स्त्रियांचा प्रायः स्वभाव असा राहात आला आहे की जर पति सम अवस्थेत अर्थात धनधान्यादिनी संपन्न असेल, स्वस्थ आणि सुखी असेल तर ती त्याच्या ठिकाणी अनुराग ठेवते परंतु जर तो विषम अवस्थेत पडला - दरिद्री तसेच रोगी झाला तर ती त्याचा त्याग करते. ॥५॥
शतह्रदानां लोलत्वं शस्त्राणां तीक्ष्णतां तथा ।
गरुडानिलयोः शैघ्र्यमनुगच्छन्ति योषितः ॥ ६ ॥
’स्त्रिया विद्युतची चपलता, शस्त्रांची तीक्ष्णता तसेच गरूड आणि वायुच्या तीव्र गतीचे अनुसरण करीत असतात. ॥६॥
इयं तु भवतो भार्या दोषैरेतैर्विवर्जिता ।
श्लाध्या च व्यपदेश्या च यथा देवीष्वरुन्धती ॥ ७ ॥
’आपली ही धर्मपत्‍नी सीता या सर्व दोषांच्या विरहित आहे. देविंच्या मध्ये अरून्धती जशी अग्रगण्य आहे तशी ती स्पृहणीय आणि पतिव्रतांच्या मध्ये अग्रगण्य आहे. ॥७॥
अलङ्‌कृतोऽयं देशश्च यत्र सौमित्रिणा सह ।
वैदेह्या चानया राम वत्स्यसि त्वमरिंदम ॥ ८ ॥
’शत्रुदमन श्रीरामा ! आजपासून या देशाची शोभा वाढली आहे; जेथे सौमित्र लक्ष्मण आणि वैदेही सीतेसहित आपण निवास कराल. ॥८॥
एवमुक्तस्तु मुनिना राघवः संयताञ्जलिः ।
उवाच प्रश्रितं वाक्यमृषिं दीप्तमिवानलम् ॥ ९ ॥
मुनीनी असे म्हटल्यावर श्रीरामचंद्रांनी प्रज्वलित अग्निसमान तेजस्वी त्या महर्षिंना दोन्ही हात जोडून या प्रमाणे विनययुक्त गोष्ट सांगितली - ॥९॥
धन्योस्म्यनुगृहीतोऽस्मि यस्य मे मुनिपुंगवः ।
गुणैः सभ्रातृभार्यस्य गुरुर्नः परितुष्यति ॥ १० ॥
’भाऊ आणि पत्‍नीसहित ज्यांच्या अर्थात माझ्या गुणांनी आमचे गुरूदेव मुनिवर अगस्त्य जर संतुष्ट होत असतील तर मी मग धन्य आहे. माझ्यावर मुनीश्वरांचा महान अनुग्रह आहे. ॥१०॥
किं तु व्यादिश मे देशं सोदकं बहुकाननम् ।
यत्राश्रमपदं कृत्वा वसेयं निरतः सुखम् ॥ ११ ॥
’परंतु मुने ! आता आपण मला असे एखादे स्थान सांगावे जेथे बरेचसे वन असेल, जलाची सुविधा असेल; तसेच जेथे आश्रम बनवून मी सुखपूर्वक सानंद निवास करू शकेन.’ ॥११॥
ततोऽब्रवीन्मुनिश्रेष्ठः श्रुत्वा रामस्य भाषितम् ।
ध्यात्वा मुहूर्तं धर्मात्मा ततोवाच वचः शुभम् ॥ १२ ॥
श्रीरामांचे हे कथन ऐकून मुनिश्रेष्ठ धर्मात्मा अगस्त्यांनी एक मुहूर्तभर जरा विचार केला आणि नंतर ते हे शुभ वचन बोलले- ॥१२॥
इतो द्वियोजने तात बहुमूलफलोदकः ।
देशो बहुमृगः श्रीमान् पञ्चवट्यभिविश्रुतः ॥ १३ ॥
’तात ! येथून दोन योजनांच्या अंतरावर पञ्चवटी नामाने विख्यात एक फार सुंदर स्थान आहे, जेथे बरेचसे मृग राहातात तसेच फल- मूल आणि जलाची अधिक सुविधा आहे. ॥१३॥
तत्र गत्वाऽऽश्रमपदं कृत्वा सौमित्रिणा सह ।
रमस्व त्वं पितुर्वाक्यं यथोक्तमनुपालयन् ॥ १४ ॥
’तेथे जाऊन लक्ष्मणासह आपण आश्रम बनवावा आणि पित्याच्या यथोक्त आज्ञेचे पालन करीत तेथे सुखपूर्वक निवास करावा. ॥१४॥
विदितो ह्येष वृत्तान्तो मम सर्वस्तवानघ ।
तपसश्च प्रभावेन स्नेहाद् दशरथस्य च ॥ १५ ॥
’अनघ ! आपला आणि दशरथ राजांचा हा सारा वृत्तांत मला आपल्या तपस्येच्या प्रभावाने आणि आपल्या प्रति स्नेह असल्याने उत्तम प्रकारे विदित आहे. ॥१५॥
हृदयस्थं च ते च्छन्दो विज्ञातं तपसा मया ।
इह वासं प्रतिज्ञाय मया सह तपोवने ॥ १६ ॥
’आपण तपोवनात माझ्या जवळ राहाण्याची आणि वनवासाचा शेष समय येथेच घालविण्याची अभिलाषा प्रकट करून जे येथून अन्यत्र राहाण्याच्या योग्य स्थानाविषयी मला विचारले आहे, यात आपला हार्दिक आभिप्राय काय आहे ? हे मी आपल्या तपोबलाने जाणलेले आहे. (आपणा ऋषिंच्या रक्षणासाठी राक्षसांच्या वधाची जी प्रतिज्ञा केली आहे, त्या प्रतिज्ञेचा निर्वाह अन्यत्र राहाण्यानेच होऊ शकेल, कारण की येथे राक्षसांचे येणे - जाणे होत नाही.)’ ॥१६॥
अतश्च त्वामहं ब्रूमि गच्छ पञ्चवटीमिति ।
स हि रम्यो वनोद्देशो मैथिली तत्र रंस्यते ॥ १७ ॥
’म्हणून मी आपल्याला सांगतो आहे की पञ्चवटीमध्ये जावे. तेथील वनस्थली अत्यंत रमणीय आहे. तेथे मैथिली सीता आनंदपूर्वक सर्वत्र विचरण करील.’ ॥१७॥
स देशः श्लाघनीयश्च नातिदूरे च राघव ।
गोदावर्याः समीपे च मैथिली तत्र रंस्यते ॥ १८ ॥
’रघुनंदन ! (राघव !) ते स्पृहणीय स्थान येथून अधिक दूर नाही आहे. गोदावरीच्या जवळ (तिच्याच तटावर) आहे म्हणून मैथिलीचे मन तेथे खूप रमेल. ॥१८॥
प्राज्यमूलफलश्चैव नानाद्विजगणैर्युतः ।
विविक्तश्च महाबाहो पुण्यो रम्यस्तथैव च ॥ १९ ॥
’महाबाहो ! ते स्थान प्रचुर फल मूलांनी संपन्न, नाना प्रकारच्या विंहगमांनी सेवित, एकांत, पवित्र आणि रमणीय आहे. ॥१९॥
भवानपि सदाचारः शक्तश्च परिरक्षणे ।
अपि चात्र वसन् राम तापसान् पालयिष्यसि ॥ २० ॥
’श्रीरामा ! आपणही सदाचारी आणि ऋषींचे रक्षण करण्यास समर्थ आहात. म्हणून तेथे राहून तपस्वी मुनींचे पालन करावे. ॥२०॥
एतदालक्ष्यते वीर मधूकानां महावनम् ।
उत्तरेणास्य गन्तव्यं न्यग्रोधमपि गच्छता ॥ २१ ॥

ततः स्थलमुपारुह्य पर्वतस्याविदूरतः ।
ख्यातः पञ्चवटीत्येव नित्यपुष्पितकाननः ॥ २२ ॥
’वीर ! हे जे मोहाचे विशाल वन दिसून येत आहे त्याच्या उत्तरेस जाऊन पुढे गेले पाहिजे. त्या मार्गाने जाताना आपल्याला पुढे एक वटवृक्ष दिसेल. त्याच्या पुढे काही अंतरावर उंच मैदान आहे. ते पार केल्यानंतर एक पर्वत दिसून येईल. त्या पर्वतापासून थोडेसेच दूर पञ्चवटी नामाने प्रसिद्ध सुंदर वन आहे, जे सदा फुलांनी सुशोभित राहाते.’ ॥२१-२२॥
अगस्त्येनैवमुक्तस्तु रामः सौमित्रिणा सह ।
सत्कृत्यामन्त्रयामास तमृषिं सत्यवादिनम् ॥ २३ ॥
महर्षि अगस्त्यांनी असे सांगितल्यावर लक्ष्मणा सहित श्रीरामांनी त्यांचा सत्कार करून त्या सत्यवादी मुनींच्याकडे तिकडे जाण्याची आज्ञा मागितली. ॥२३॥
तौ तु तेनाभ्यनुज्ञातौ कृतपादाभिवन्दनौ ।
तमाश्रमं पञ्चवटीं जग्मतुः सह सीतया ॥ २४ ॥
त्यांची आज्ञा मिळताच त्या दोन्ही भावांनी त्यांच्या चरणी वंदन केले आणि सीतेसह ते पञ्चवटी नामक आश्रमाकडे निघाले. ॥२४॥
गृहीतचापौ तु नराधिपात्मजौ
विषक्ततूणी समरेष्वकातरौ ।
यथोपदिष्टेन पथा महर्षिणा
प्रजग्मतुः पञ्चवटीं समाहितौ ॥ २५ ॥
राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मणांनी पाठीवर भाते बांधून हातात धनुष्य घेतलेले होते. ते दोन्ही भाऊ समराङ्‌गणावर कायरता दाखविणारे नव्हते. ते दोन्ही बंधु महर्षिंनी सांगितलेल्या मार्गाने अत्यंत सावधानतेने पञ्चवटी कडे प्रस्थित झाले. ॥२५॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे त्रयोदशः सर्गः ॥ १३ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्ष रामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा तेरावाः सर्ग पूरा झाला. ॥१३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP