श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ सप्तषष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
हनुमता समुद्रं लंघयितुं उत्साहस्य प्रकाशनं, जांबवता तस्य प्रशंसनं, वेगेन उत्प्लवनाय हनुमतो महेंद्रपर्वत आरोहणम् - हनुमानांनी समुद्र उल्लंघन करण्यासाठी उत्साह प्रकट करणे, जाम्बवानांच्या द्वारा त्यांची प्रशंसा तसेच वेगपूर्वक उड्डाण करण्यासाठी हनुमानांचे महेंद्र पर्वतावर चढणे -
तं दृष्ट्‍वा जृंभमाणं ते क्रमितुं शतयोजनम् ।
वीर्येणापूर्यमाणं च सहसा वानरोत्तमम् ॥ १ ॥

सहसा शोकमुत्सृज्य प्रहेर्षेण समन्वताः ।
विनेदुस्तुष्टुवुश्चापि हनूमंतं महाबलम् ॥ २ ॥
शंभर योजनांचा समुद्र ओलांडण्यासाठी वानरश्रेष्ठ हनुमानांना एकाएकी वाढताना आणि वेगाने परिपूर्ण होतांना पाहून सर्व वानर तात्काळ शोक सोडून अत्यंत हर्षाने भरून गेले आणि महाबली हनुमानांची स्तुति करत मोठ मोठ्याने गर्जना करू लागले. ॥१-२॥
प्रहृष्टा विस्मिताश्चापि ते वीक्षंते समंततः ।
त्रिविक्रमं कृतोत्साहं नारायणमिव प्रजाः ॥ ३ ॥
ते त्यांच्या चोहोबाजूस उभे राहून प्रसन्न आणि चकीत होऊन त्यांना, ज्या प्रमाणे उत्साहयुक्त नारायणावतार वामनांना समस्त प्रजेने पाहिले होते, त्या प्रमाणे पाहू लागले. ॥३॥
संस्तूयमानो हनुमान् व्यवर्धत महाबलः ।
समाविध्य च लाङ्‌गूंलं हर्षाच्च बलमुपेयिवान् ॥ ४ ॥
आपली प्रशंसा ऐकून महाबली हनुमानांनी शरीरास आणखी वाढविण्यास आरंभ केला. त्याच बरोबर आनंदाने आपले पुच्छ वारंवार फिरवून आपल्या महान् बळाचे स्मरण केले. ॥४॥
तस्य संस्तूयमानस्य वृद्धैर्वानरपुंगवैः ।
तेजसाऽऽपूर्यमाणस्य रूपमासीदनुत्तमम् ॥ ५ ॥
वयोवृद्ध आणि मोठ मोठ्या वानरश्रेष्ठांच्या मुखांनी आपली प्रशंसा ऐकणार्‍या आणि तेजाने परिपूर्ण झालेल्या हनुमानांचे रूप त्यावेळी फारच उत्तम प्रतीत होत होते. ॥५॥
यथा विजृंभते सिंहो विवृद्धो गिरिगह्वरे ।
मारुतस्यौरसः पुत्रः तस्तथा संप्रति जृंभते ॥ ६ ॥
ज्याप्रमाणे पर्वताच्या विशाल कंदरेत सिंह आळोखे-पिळोखे देतो त्याप्रमाणे यायुदेवतांच्या औरस पुत्राने त्या समयी आळोखे पिळोखे देत आपल्या शरीरास वाढविले. ॥६॥
अशोभत मुखं तस्य जृंभमाणस्य धीमतः ।
अंबरीषोपमं दीप्तं विधूम इव पावकः ॥ ७ ॥
जांभया देत असतां बुद्धिमान् हनुमानांचे दीप्तिमान् मुख जळत असलेल्या भडभुंज्याच्या भट्टीप्रमाणे तसेच धूमरहित अग्निप्रमाणे शोभून दिसत होते. ॥७॥
हरीणामुत्थितो मध्यात् संप्रहृष्टतनूरुहः ।
अभिवाद्य हरीन् वृद्धान् हनुमानिदमब्रवीत् ॥ ८ ॥
ते वानरांच्या मधून उठून उभे राहिले. त्यांच्या संपूर्ण शरीरावर रोमांच आले होते. त्या अवस्थेमध्ये हनुमानांनी मोठ्या वयोवृद्ध वानरांना प्रणाम करून या प्रकारे म्हटले- ॥८॥
अरुजन् पर्वताग्राणि हुताशनसखोऽनिलः ।
बलवानप्रमेयश्च वायुराकाशगोचरः ॥ ९ ॥
’आकाशात विचरण करणारे वायुदेव फार बलवान् आहेत. त्यांच्या शक्तिला काही सीमा नाही आहे. ते अग्निदेवांचे मित्र आहेत (सखा आहेत) आणि आपल्या वेगाने मोठ मोठ्या पर्वत शिखरांनाही तोडून फोडून टाकतात. ॥९॥
तस्याहं शीघ्रवेगस्य शीघ्रगस्य महात्मनः ।
मारुतस्यौरसः पुत्रः प्लवनेनास्मि तत्समः ॥ १० ॥
’अत्यंत शीघ्र वेगाने जाणार्‍या त्या शीघ्रगामी महात्मा वायूंचा मी औरस पुत्र आहे आणि उड्डाण करण्यात त्यांच्या समान आहे. ॥१०॥
उत्सहेयं हि विस्तीर्णं आलिखंतमिवांबरम् ।
मेरुं गिरिमसंगेन परिगंतुं सहस्रशः ॥ ११ ॥
’कित्येक हजार योजनापर्यंत पसरलेल्या मेरूगिरिला, जो आकाशाच्या फार मोठ्या भागास झाकून टाकत असतो आणि त्या आकाशात जणु रेखा ओढावी तसा भासतो- त्याची मी विश्राम न घेता हजारो वेळा परिक्रमा करू शकतो. ॥११॥
बाहुवेगप्रणुन्नेन सागरेणाहमुत्सहे ।
समाप्लावयितुं लोकं सपर्वतनदीह्रदम् ॥ १२ ॥
’आपल्या भुजांच्या वेगाने समुद्राला विक्षुब्ध करून त्याच्या जलाने मी पर्वत, नद्या आणि जलाशयांसहित संपूर्ण जगताला आप्लावित करू शकतो. ॥१२॥
ममोरुजङ्‌घातवेगेन भविष्यति समुत्थितः ।
समुच्छ्रितमहाग्राहः समुद्रो वरुणालयः ॥ १३ ॥
’वरूणाचे निवासस्थान असलेला हा महासागर माझ्या मांड्यांच्या आणि पोटर्‍यांच्या वेगाने विक्षुब्ध होऊन जाईल आणि याच्यात राहाणारे मोठ मोठे ग्राह वर येतील. ॥१३॥
पन्नगाशनमाकाशे पतंतं पक्षिसेवितम् ।
वैनतेयमहं शक्तः परिगंतुं सहस्रशः ॥ १४ ॥
’समस्त पक्षी ज्यांची सेवा करतात ते सर्पभोजी विनतानंदन गरूड आकाशात उडत असतील तरीही मी हजारो वेळा त्यांच्या बाजूस फिरत राहू शकतो. ॥१४॥
उदयात् प्रस्थितं वापि ज्वलंतं रश्मिमालिनम् ।
अनस्तमितमादित्यं अहं गंतुं समुत्सहे ॥ १५ ॥

ततो भूमिमसंस्पृष्ट्‍वा पुनरागंतुमुत्सहे ।
प्रवेगेनैव महता भीमेन प्लवगर्षभाः ॥ १६ ॥
’श्रेष्ठ वानरांनो ! उदयाचलापासून निघून आपल्या तेजाने प्रज्वलित होणार्‍या सूर्यदेवतांना मी अस्त होण्यापूर्वीच स्पर्श करू शकतो आणि तेथून पृथ्वीवर येऊन येथे पाय न टेकताच पुन्हा त्यांच्या जवळ अत्यंत भयंकर वेगाने जाऊ शकतो. ॥१५-१६॥
उत्सहेयमतिक्रांतुं सर्वान् आकाशगोचरान् ।
सागरान् शोषयिष्यामि दारयिष्यामि मेदिनीम् ॥ १७ ॥

पर्वतांश्चूर्णयिष्यामि प्लवमानः प्लवंगमः ।
हरिष्याम्यूरुवेगेन प्लवमानो महार्णवम् ॥ १८ ॥
’आकाशचारी समस्त ग्रह-नक्षत्र आदिंना ओलांडून पुढे जाण्याचा उत्साह मी बाळगून आहे. मी इच्छा केली तर समुद्रास शोषून घेईन, पृथ्वीला विदीर्ण करीन आणि उड्या मारमारून पर्वतांना चिरडून चुराडा करून टाकीन; कारण की मी दूरपर्यंत उड्डाण करणारा वानर आहे. महान् वेगाने महासागरास ओलांडून मी अवश्य त्याच्या पार पोहोचून जाईन. ॥१७-१८॥
लतानां विविधं पुष्पं पादपानां च सर्वशः ।
अनुयास्यंति मामद्य प्लवमानं विहायसा ॥ १९ ॥
’आज आकाशात वेगपूर्वक जात असता त्या समयी लतांची आणि वृक्षांची नानाप्रकारची फुले माझ्या बरोबर बरोबर उडत येतील. ॥१९॥
भविष्यति हि मे पंथाः स्वातेः पंथा इवांबरे ।
चरंतं घोरमाकाशं उमुत्पतिष्यंतमेव वा ॥ २० ॥

द्रक्ष्यंति निपतंतं च सर्वभूतानि वानराः ।
’बरीचशी फुले विखुरली गेल्याने माझा मार्ग आकाशात अनेक नक्षत्रपुंजांनी सुशोभित स्वातिमार्गाप्रमाणे (छायापथा समान) प्रतीत होईल. वानरांनो ! आज समस्त प्राणी मला भयंकर आकाशात सरळ जातांना, वर उड्डाण करतांना आणि खाली उतरताना पहातील. ॥२० १/२॥
महामेघप्रतीकाशं मां द्रक्ष्यध्वं प्लवंगमाः ॥ २१ ॥

दिवमावृत्य गच्छंतं ग्रसमानमिवांबरम् ।
विधमिष्यामि जीमूतान् कंपयिष्यामि पर्वतान् ।
सागरं क्षोभयिष्यामि प्लवमानः समाहितः ॥ २२ ॥
’कपिवरांनो ! तुम्ही पहाल की मी महागिरि मेरूसमान विशाल देह धारण करून स्वर्गाला झाकून टाकत आणि आकाशाला गिळून टाकीत असल्याप्रमाणे पुढे जाईन. मेघांना छिन्नभिन्न करून टाकीन, पर्वतांना हलवून सोडीन आणि एकचित्त होऊन उड्डाण करून पुढे गेल्यावर समुद्रालाही सुकवून टाकीन. ॥२१-२२॥
वैनतेयस्य सा शक्तिः मम वा मारुतस्य वा ।
ऋते सुपर्णराजानं मारुतं वा महाबलम् ।
न तद् भूतं प्रपश्यामि यन्मां प्लुतमनुव्रजेत् ॥ २३ ॥
’विनतानंदन गरूडात, माझ्यात, अथवा वायुदेवातच समुद्रास ओलांडून जाण्याची शक्ती आहे. पक्षिराज गरूड अथवा महाबलाढ्य वायुदेवाशिवाय मी दुसर्‍या कोणाही प्राण्याला असा पाहू शकत नाही की जो मी येथून उड्डाण करताच माझ्याबरोबर जाऊ शकेल. ॥२३॥
निमेषांतरमात्रेण निरालंबनमंबरम् ।
सहसा निपतिष्यामि घनाद् विद्युदिवोत्थिता ॥ २४ ॥
’मेघापासून उत्पन्न झालेल्या वीजेप्रमाणे मी डोळ्याचे पाते लवते न लवते तोच एकाएकी निराधार आकाशात उडून जाईन. ॥२४॥
भविष्यति हि मे रूपं प्लवमानस्य सागरम् ।
विष्णोः प्रक्रममाणस्य तदा त्रीन् विक्रमानिव ॥ २५ ॥
’समुद्र ओलांडते समयी, आपल्या तीन पावलांना वाढवीते वेळी वामनरूपधारी भगवान् विष्णुचे रूप जसे प्रकट झाले होते त्याप्रमाणे तेच माझे रूप प्रकट होईल. ॥२५॥
बुद्ध्या चाहं प्रपश्यामि मनश्चेष्टा च मे तथा ।
अहं द्रक्ष्यामि वैदेहीं प्रमोदध्वं प्लवंगमाः ॥ २६ ॥
’वानरांनो ! मी बुद्धिने जसे पहातो वा विचार करतो त्याप्रमाणे व त्यास अनुसरून माझ्या मनाची क्रिया होत असते. मला निश्चितपणे कळून येत आहे की मी वैदेही सीतेचे दर्शन करीन म्हणून आता तुम्ही लोक आनंद साजरा करा. ॥२६॥
मारुतस्य समो वेगे गरुडस्य समो जवे ।
अयुतं योजनानां तु गमिष्यामीति मे मतिः ॥ २७ ॥
’मी वेगात वायुदेवता तसेच गरूडासमान आहे. माझा तर असा विश्वास आहे की यावेळी मी दहा हजार योजनांपर्यंत जाऊ शकतो. ॥२७॥
वासवस्य सवज्रस्य ब्रह्मणो वा स्वयंभुवः ।
विक्रम्य सहसा हस्ताद् अमृतं तदिहानये ॥ २८ ॥

लङ्‌कां् वापि समुत्क्षिप्य गच्छेयमिति मे मतिः ।
’वज्रधारी इंद्र अथवा स्वयंभू ब्रह्मदेवांच्या हातातूनही मी बलपूर्वक अमृत हिसकावून घेऊन एकाएकी येथे घेऊन येऊ शकतो. समस्त लंकेलाही मी जमिनीवरून उपटून हातावर घेऊन चालू शकतो असा मला विश्वास आहे. ॥२८ १/२॥
तमेवं वानरश्रेष्ठं गर्जंतममितप्रभम् ॥ २९ ॥

प्रहृष्टा हरयस्तत्र समुदैक्षंत विस्मिताः ।
अमित तेजस्वी वानरश्रेष्ठ हनुमान् जेव्हा या प्रकारे गर्जना करीत होते त्या समयी संपूर्ण वानर अत्यंत हर्षित होऊन चकितभावाने त्यांच्याकडे पहात राहिले होते. ॥२९ १/२॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा ज्ञातीनां शोकनाशनम् ॥ ३० ॥

उवाच परिसंहृष्टो जांबवान् प्लवगेश्वरः ।
हनुमानांचे बोलणे बंधु-बांधवांचा शोक नष्ट करणारे होते. ते ऐकून वानर-सेनापति जाम्बवानास फार प्रसन्नता वाटली. ते म्हणाले- ॥३० १/२॥
वीर केसरिणः पुत्र हनुमन् मारुतात्मज ॥ ३१ ॥

ज्ञातीनां विपुलः शोकः त्वया तात प्रणाशितः ।
’वीरा ! केसरीच्या सुपुत्रा ! वेगवान् पवनकुमारा ! तात ! तू आपल्या बंधुंचा महान् शोक नष्ट केला आहेस. ॥३१ १/२॥
तव कल्याणरुचयः कपिमुख्याः समागताः ॥ ३२ ॥

मङ्‌गतलान्यर्थसिद्ध्यर्थं करिष्यंति समाहिताः ।
’येथे आलेले सर्व श्रेष्ठ वानर तुमच्या कल्याणाची कामना करत आहेत. आता हे कार्याच्या सिद्धिच्या उद्देशाने एकाग्रचित्त होऊन तुमच्यासाठी मंगलकृत्य स्वास्तिवाचन आदिचे अनुष्ठान करतील. ॥३२ १/२॥
ऋषीणां च प्रसादेन कपिवृद्धमतेन च ॥ ३३ ॥

गुरूणां च प्रसादेन प्लवस्व त्वं महार्णवम् ।
’ऋषिंचा प्रसाद, वृद्ध वानरांची अनुमति आणि गुरूजनांची कृपा यायोगे तुम्ही या महासागरास पार करून जा. ॥३३ १/२॥
स्थास्यामश्चैकपादेन यावदागमनं तव ॥ ३४ ॥

त्वद्गचतानि च सर्वेषां जीवितानि वनौकसाम् ।
तुम्ही परतून येथे येईपर्यत आम्ही सर्व तुमच्या प्रतीक्षेमध्ये एका पायावर उभे राहू. कारण आम्हा सर्व वानरांचे जीवन तुमच्याच अधीन आहे.’ ॥३४ १/२॥
ततस्तु हरिशार्दूलः तानुवाच वनौकसः ॥ ३५ ॥

कोऽपि लोके न मे वेगं प्लवने धारयिष्यति ।
त्यानंतर कपिश्रेष्ठ हनुमानांनी त्या वनवासी वानरांना म्हटले - ’जेव्हा मी येथून उड्डाण करीन त्यासमयी संसारात कोणीही माझ्या वेगास धारण करू शकणार नाही. ॥३५ १/२॥
एतानीह नगस्यास्य शिलासङ्‌क टशालिनः ॥ ३६ ॥

शिखराणि महेंद्रस्य स्थिराणि च महांति च ।
येषु वेगं करिष्यामि महेंद्रशिखरेष्वहम् ॥ ३७ ॥

नानाद्रुमविकीर्णेषु धातुनिःष्यंदशोभिषु ।
’शिलांच्या समुदायांनी शोभणार्‍या केवळ या महेंद्र पर्वताची ही शिखरेच उंचच उंच आणि स्थिर आहेत, ज्यांच्यावर नाना प्रकारचे वृक्ष पसरलेले आहेत आणि गैरिक आदि धातुंचे समुदाय शोभा प्राप्त करून देत आहेत. या महेंद्र-शिखरांवरच वेगपूर्वक पाय ठेवून मी येथून उड्डाण करीन (आकाशात झेप घेईन) ॥३६-३७ १/२॥
एतानि मम वेगं हि शिखराणि महांति च ॥ ३८ ॥

प्लवतो धारयिष्यंति योजनानामितः शतम् ।
’येथून शंभर योजनासाठी झेप घेत असताना महेंद्र पर्वताची ही महान् शिखरेच माझ्या वेगास धारण करू शकतील.’ ॥३८ १/२॥
ततस्तु मारुतप्रख्यः स हरिर्मारुतात्मजः ।
आरुरोह नगश्रेष्ठं महेंद्रमरिमर्दनः ॥ ३९ ॥
असे म्हणून वायुसमान महान् पराक्रमी शत्रुमर्दन पवनकुमार हनुमान् पर्वतामध्ये श्रेष्ठ असलेल्या महेंद्र पर्वतावर चढून गेले. ॥३९॥
वृतं नानाविधैपुष्पैः मृगसेवितशाद्वलम् ।
लताकुसुमसंबाधं नित्यपुष्पफलद्रुमम् ॥ ४० ॥
तो पर्वत नाना प्रकारच्या पुष्पयुक्त वृक्षांनी भरलेला होता; वन्य पशु हिरवेगार गवत चरत होते; लता आणि फुले यामुळे तो सघन वाटत होता आणि त्यावरील वृक्षांवर सदा फळे-फुले लागून राहिलेली होती. ॥४०॥
सिंहशार्दूलचरितं मत्तमातङ्‌गफसेवितम् ।
मत्तद्विजगणोद्घु ष्टं सलिलोत्पीडसङ्‌कु्लम् ॥ ४१ ॥
महेंद्र पर्वताच्या वनात सिंह आणि वाघही निवास करत होते, मत्त गजराज विचरत होते, मदमत्त पक्ष्यांचे समूह सदा कलरव करीत होते तसेच जलाचे स्त्रोत आणि निर्झरांनी तो पर्वत व्याप्त दिसून येत होता. ॥४१॥
महद्‌भिरुच्छ्रितं शृङ्‌गैः महेंद्रं स महाबलः ।
विचचार हिरश्रेष्ठो महेंद्रसमविक्रमः ॥ ४२ ॥
मोठ मोठ्या शिखरांमुळे उंच प्रतीत होणार्‍या महेंद्र पर्वतावर आरूढ होऊन इंद्रतुल्य पराक्रमी महाबली कपिश्रेष्ठ हनुमान् तेथे इकडे-तिकडे फिरू लागले. ॥४२॥
पादाभ्यां पीडितस्तेन महाशैलो महात्मना ।
रराज सिंहाभिहतो महान् मत्त इव द्विपः ॥ ४३ ॥
महाकाय हनुमानांच्या दोन्ही पायांनी दबला गेलेला तो महान् पर्वत सिंहाने आक्रान्त झालेल्या महान् गजराजाप्रमाणे जणु चीत्कार करू लागला. (तेथे राहाणार्‍या प्राण्यांचा शब्दच जणु त्याचा आर्त चीत्कार होता.) ॥४३॥
मुमोच सलिलोत्पीडान् विप्रकीर्णशिलोच्चयः ।
वित्रस्तमृगमातङ्‌गः् प्रकंपितमहाद्रुमः ॥ ४४ ॥
त्याचेवरील शिला-समूह इकडे-तिकडे विखुरले गेले. त्यांच्यातून नवीन नवीन झरे फुटून निघाले. तेथे राहाणारे मृग आणि हत्ती भयाने थरारून गेले आणि मोठे मोठे वृक्ष झोके खाऊन डोलू लागले. ॥४४॥
नागगंधर्वमिथुनैः पानसंसर्गकर्कशैः ।
उत्पतद्‌भिर्विहःगैश्च विद्याधरगणैरपि ॥ ४५ ॥

त्यज्यमानमहासानुः संनिलीनमहोरगः ।
शैलशृङ्‌गनशिलोत्पातः तदाभूत् स महागिरिः ॥ ४६ ॥
मधुपानाच्या संसर्गाने उद्धत चित्त झालेल्या अनेकानेक गंधर्वांच्या जोड्या, विद्याधरांचे समुदाय आणि उडणारे पक्षीही त्या पर्वताच्या विशाल शिखरांना सोडून जाऊ लागले. मोठ मोठे सर्प बिळात लपून गेले तसेंच त्या पर्वताच्या शिखरांवरून मोठमोठ्या शिळा तुटून फुटून खाली कोसळू लागल्या. या प्रकारे तो महान् पर्वत मोठ्या दुरावस्थेमध्ये पडला. ॥४५-४६॥
निःश्वसद्‌भिस्तदा तैस्तु भजङ्‌गैारर्धनिःसृतैः ।
सपताक इवाभाति स तदा धरणीधरः ॥ ४७ ॥
बिळातून आपल्या अर्ध्या शरीरास बाहेर काढून दीर्घ श्वास घेणार्‍या सर्पांनी उपलक्षित होणारा तो महान् पर्वत त्या समयी अनेकानेक पताकांनी अलंकृत झाल्याप्रमाणे प्रतीत होत होता. ॥४७॥
ऋषिभिस्त्राससंभ्रांतैः त्यज्यमानः शिलोच्चयः ।
सीदन् महति कांतारे सार्थहीन इवाध्वगः ॥ ४८ ॥
भयाने घाबरलेले ऋषि-मुनि त्या पर्वतास सोडून जाऊ लागले. ज्याप्रमाणे विशाल दुर्गम वनात आपल्या साथीदारांपासून वियोग झालेला एखादा प्रवासी मोठ्या विपत्तित जसा फसून जातो, हीच दशा त्या महान् पर्वत महेंद्राची होत होती. ॥४८॥
स वेगवान् वेगसमाहितात्मा
हरिप्रवीरः परवीरहंता ।
मनः समाधाय महानुभावो
जगाम लङ्‌कां मनसा मनस्वी ॥ ४९ ॥
शत्रुवीरांचा संहार करणार्‍या वानरसेनेचे श्रेष्ठ वीर वेगवान् महामनस्वी महानुभाव हनुमानांचे मन वेगपूर्वक झेप मारण्याच्या (उड्डाण करण्याच्या) योजनेत लागून राहिले होते. त्यांनी चित्ताला एकाग्र करून मनातल्या मनात लंकेचे स्मरण केले. ॥४९॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये चतुर्विंशत्सहस्रिकायां संहितायां किष्किंधाकाण्डे
सप्तषष्टितमः सर्गः ॥ ६७ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा सदुसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६७॥
॥ इति किष्किंधाकाण्डः समाप्तः ॥
॥ किष्किंधाकाण्डं संपूर्णम् ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP