श्रीरामस्य मुनीन् प्रति लवणासुरस्य आहारविहारविषये प्रश्नः, शत्रुघ्नस्य रुचिं ज्ञात्वा तेन तस्य लवणवधे नियोजनं च -
|
श्रीरामांनी ऋषिंना लवणासुराच्या आहार-विहारा विषयी विचारणे आणि शत्रुघ्नाची रूचि जाणून त्यांना लवण-वधाच्या कार्यात नियुक्त करणे -
|
तथोक्ते तान् ऋषीन्रामः प्रत्युवाच कृताञ्जलिः । किमाहारः किमाचारो लवणः क्व च वर्तते ॥ १ ॥
|
ऋषिंनी या प्रकारे विचारल्यावर श्रीरामांनी हात जोडून त्यांना विचारले - लवणासुर काय खातो ? त्याचा आचार व्यवहार कसा आहे ? राहाण्याची वागण्याची रीत कशी आहे ? आणि तो कोठे रहातो ? ॥ १ ॥
|
राघवस्य वचः श्रुत्वा ऋषयः सर्व एव ते । ततो निवेदयामासुः लवणो ववृधे यथा ॥ २ ॥
|
राघवांचे हे वचन ऐकून त्या सर्व ऋषिनी ज्याप्रकारे लवणासुर लहानाचा मोठा झाला होता ते सर्व त्यांना ऐकविले. ॥२॥
|
आहारः सर्वसत्त्वानि विशेषेण च तापसाः । आचारो रौद्रता नित्यं वासो मधुवने तथा ॥ ३ ॥
|
ते म्हणाले -प्रभो ! त्याचा आहार तर सर्व प्राणी आहेत, परंतु विशेषतः तो तपस्वी मुनिंना खातो. त्याच्या आचार-व्यवहारात फार क्रूरता आणि भयानकता आहे आणि तो सदा मधुवनात निवास करतो. ॥३॥
|
हत्वा बहुसहस्राणि सिंहव्याघ्रमृगाण्डजान् । मानुषांश्चैव कुरुते नित्यमाहारमाह्निकम् ॥ ४ ॥
|
तो प्रतिदिन कित्येक हजार सिंह, व्याघ्र, मृग, पक्षी आणि मनुष्यांना मारून खाऊन टाकतो. ॥४॥
|
ततोऽन्तराणि सत्त्वानि खादते स महाबलः । संहारे समनुप्राप्ते व्यादितास्य इवान्तकः ॥ ५ ॥
|
संहारकाल आल्यावर तोंड पसरून उभे राहणार्या यमराजासमान तो महाबली असुर दुसर्या इतर जीवांनाही खात रहातो. ॥५॥
|
तच्छ्रुत्वा राघवो वाक्यं उवाच स महामुनीन् । घातयिष्यामि तद् रक्षो व्यपगच्छतु वो भयम् ॥ ६ ॥
|
त्यांचे हे कथन ऐकून राघवांनी त्या महामुनिंना म्हटले -महर्षिंनो ! मी त्या राक्षसाला मारवीन. आपले भय दूर झाले पाहिजे. ॥६॥
|
प्रतिज्ञाय तथा तेषां मुनीनां उग्रतेजसाम् । स भ्रातॄन् सहितान् सर्वाण् उनुवाच रघुनन्दनः ॥ ७ ॥
|
याप्रकारे त्या उग्र तेजस्वी मुनिंच्या समक्ष प्रतिज्ञा करून रघुनंदन श्रीरामांनी तेथे एकत्र जमलेल्या आपल्या सर्व भावांना विचारले- ॥७॥
|
को हन्ता लवणं वीरः कस्यांशः स विधीयताम् । भरतस्य महाबाहोः शत्रुघ्नस्य च धीमतः ॥ ८ ॥
|
बंधुनो ! लवणाला कोण मारेल ? त्याला कुणाच्या हिश्यात ठेवले जावे - महाबाहु भरतांच्या अथवा बुद्धिमान् शत्रुघ्नांच्या ? ॥८॥
|
राघवेणैवमुक्तस्तु भरतो वाक्यमब्रवीत् । अहमेनं वधिष्यामि ममांशः स विधीयताम् ॥ ९ ॥
|
राघवांनी याप्रकारे विचारल्यावर भरत म्हणाले - भाऊ ! मी या लवणासुराचा वध करीन. त्यासाठी मला नियुक्त केले जावे. ॥९॥
|
भरतस्य वचः श्रुत्वा धैर्यशौर्यसमन्वितम् । लक्ष्मणावरजस्तस्थौ हित्वा सौवर्णमासनम् ॥ १० ॥
शत्रुघ्नस्त्वब्रवीद् वाक्यं प्रणिपत्य नराधिपम् । कृतकर्मा महाबाहुः मध्यमो रघुनन्दनः ॥ ११ ॥
|
भरतांचे हे धीरता आणि वीरतापूर्ण वचन ऐकून शत्रुघ्न सोन्याचे सिंहासन सोडून उभे राहिले आणि महाराज श्रीरामांना प्रणाम करून बोलले - रघुनंदन ! महाबाहु मधले बंधु तर बरीचशी कार्ये करून चुकले आहेत. ॥१०-११॥
|
आर्येण हि पुरा शून्या त्वयोध्या परिपालिता । सन्तापं हृदये कृत्वा आर्यस्यागमनं प्रति ॥ १२ ॥
|
पूर्वी जेव्हा अयोध्यापुरी आपल्यावाचून शून्य झाली होती त्या समयी आपल्या आगमनापर्यंत हृदयात संताप धारण करून त्यांनी अयोध्यापुरीचे पालन केले होते. ॥१२॥
|
दुःखानि च बहूनीह अनुभूतानि पार्थिव । शयानो दुःखशय्यासु नन्दिग्रामे महायशाः ॥ १३ ॥
फलमूलाशनो भूत्वा जटी चीरधरस्तथा ।
|
पृथ्वीनाथ ! महायशस्वी भरतांनी नंदिग्रामामध्ये दुःखद शय्येवर झोपून पहिल्याने खूपच दुःख भोगले आहे. हे फळे-मुळे खाऊन राहात होते आणि मस्तकावर जटा वाढवून चीर वस्त्र धारण करीत होते. ॥१३ १/२॥
|
अनुभूयेदृशं दुःखं एष राघवनन्दनः ॥ १४ ॥
प्रेष्ये मयि स्थिते राजन् न भूयः क्लेशमाप्नुयात् ।
|
महाराज ! याप्रकारची दुःखे भोगून हे राघवनंदन भरत, मी सेवक विद्यमान असतांना आता परत अधिक क्लेश न घेवोत. ॥१४ १/२॥
|
तथा ब्रुवति शत्रुघ्ने राघवः पुनरब्रवीत् ॥ १५ ॥
एवं भवतु काकुत्स्थ क्रियतां मम शासनम् । राज्ये त्वामभिषेक्ष्यामि मधोस्तु नगरे शुभे ॥ १६ ॥
|
शत्रुघ्नांनी असे म्हटल्यावर राघव परत बोलले - काकुत्स्थ ! तू जसे सांगत आहेस तसेच होवो. तूच माझ्या या आदेशाचे पालन कर. मी तुला मधुच्या सुंदर नगरात राजाच्या पदावर अभिषिक्त करीन. ॥१५-१६॥
|
निवेशय महाबाहो भरतं यद्यवेक्षसे । शूरस्त्वं कृतविद्यश्च समर्थश्च निवेशने ॥ १७ ॥
|
महाबाहो ! जर तू भरताला क्लेश देणे ठीक समजत नाहीस तर यांना येथेच राहू देत. तू शूरवीर आहेस, अस्त्रविद्येचा ज्ञाता आहेस तसेच तुझ्यात नूतन नगर निर्माण करण्याची शक्ति आहे. ॥१७॥
|
नगरं यमुनाजुष्टं थथा जनपदान् शुभान् । यो हि शत्रुं समुत्पाट्य पार्थिवस्य निवेशने ॥ १८ ॥
न विधत्ते नृपं तत्र नरकं स हि गच्छति ।
|
तू यमुनेच्या तटावर सुंदर नगर वसवू शकतोस आणि उत्तमोत्तम जनपदांची स्थापना करू शकतोस. जो कुणा राजाच्या वंशाचा उच्छेद करून त्याच्या राजधानीमध्ये दुसर्या राजाला स्थापित करत नाही, तो नरकात पडतो. ॥१८ १/२॥
|
स त्वं हत्वा मधुसुतं लवणं पापनिश्चयम् ॥ १९ ॥
राज्यं प्रशाधि धर्मेण वाक्यं मे यद्यवेक्षसे । उत्तरं च न वक्तव्यं शूर वाक्यान्तरे मम ॥ २० ॥
बालेन पूर्वजस्याज्ञा कर्तव्या नात्र संशयः । अभिषेकं च काकुत्स्थ प्रतीच्छस्व मयोद्यतम् । वसिष्ठप्रमुखैर्विप्रैः विधिमन्त्रपुरस्कृतम् ॥ २१ ॥
|
म्हणून तू मधुचा पुत्र पापात्मा लवणासुराला मारून धर्मपूर्वक तेथील राज्याचे शासन कर. शूरवीरा ! जर तू माझे वचन मानण्यायोग्य समजशील तर मी जे काही सांगतो आहे, त्याचा गुपचुप स्वीकार कर. मध्येच गोष्ट खोडून काढून काहीही उत्तर तू देता कामा नये. बालकांनी अवश्यच आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करावयास हवे. शत्रुघ्ना ! वसिष्ठ आदि मुख्य मुख्य ब्राह्मण, विधि आणि मंत्रोच्चारणासह तुझा अभिषेक करतील. माझ्या आज्ञेने प्राप्त झालेल्या या अभिषेकाचा तू स्वीकार कर. ॥१९-२१॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे द्विषष्टितमः सर्गः ॥ ६२ ॥॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा बासष्ठावा सर्ग पूरा झाला. ॥६२॥
|