[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। पञ्चदशाधिकशततमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भरतेन नंदिग्राममुपेत्य श्रीरामपादुकयो राज्येऽभिषेकस्तदग्रे निवेदनपूर्वकं तेन समस्तराजकीय कार्याणां सम्पादनम् -
भरतांचे नंदिग्रामात जाऊन श्रीरामांच्या चरणपादुकांना राज्यावर अभिषिक्त करून त्यांना निवेदनपूर्वक राज्याचे सर्व कार्य करणे -
ततो निक्षिप्य मातॄस्ता अयोध्यायां दृढव्रतः ।
भरतः शोकसंतप्तो गुरूनिदमथाब्रवीत् ॥ १ ॥
त्यानंतर सर्व मातांना अयोध्येत ठेवून दृढप्रतिज्ञ भरतांनी शोकाने संतप्त होऊन गुरुजनांना या प्रकारे सांगितले - ॥ १ ॥
नन्दिग्रामं गमिष्यामि सर्वानामन्त्रयेऽत्र वः ।
तत्र दुःखमिदं सर्वं सहिष्ये राघवं विना ॥ २ ॥
आता मी नंदिग्रामात जाईन, यासाठी आपणा सर्व लोकांची आज्ञा इच्छितो. तेथे श्रीरामांच्या विना प्राप्त होणारे हे सारे दुःख सहन करीन. ॥ २ ॥
गतश्चाहो दिवं राजा वनस्थः स गुरुर्मम ।
रामं प्रतीक्षे राज्याय स हि राजा महायशाः ॥ ३ ॥
’अहो ! महाराज (माझे पूज्य पिता) तर स्वर्गात गेले आणि माझे गुरु (पूजनीय भ्राता) श्रीरामचंद्र वनात विराजत आहेत. मी या राज्यासाठी तेथे श्रीरामांची प्रतिक्षा करीत राहीन, कारण की ते महायशस्वी श्रीरामच आमचे राजे आहेत.’ ॥ ३ ॥
एतच्छ्रुत्वा शुभं वाक्यं भरतस्य महात्मनः ।
अब्रुवन् मन्त्रिणः सर्वे वसिष्ठश्च पुरोहितः ॥ ४ ॥
महात्मा भरतांचे हे शुभवचन ऐकून सर्व मंत्री आणि पुरोहित वसिष्ठ म्हणाले - ॥ ४ ॥
सुभृशं श्लाघनीयं च यदुक्तं भरत त्वया ।
वचनं भ्रातृवात्सल्यादनुरूपं तवैव तत् ॥ ५ ॥
भरत ! भ्रातृभक्तिने प्रेरित होऊन तुम्ही जी गोष्ट सांगितली आहे ती फारच प्रशंसनीय आहे. वास्तविक ती तुमच्याच योग्य आहे. ॥ ५ ॥
नित्यं ते बन्धुलुब्धस्य तिष्ठतो भ्रातृसौहृदे ।
मार्गमार्यं प्रपन्नस्य नानुमन्येत कः पुमान् ॥ ६ ॥
’तुम्ही आपल्या भावाच्या दर्शनासाठी सदा लालायित, उत्सुक राहता आणि भावाच्याच सौहार्दात (हितसाधनात) संलग्न आहात. त्या बरोबरच श्रेष्ठ मार्गावर स्थित आहात; म्हणून कोण पुरुष तुमच्या विचारांचे अनुमोदन करणार नाही ?’ ॥ ६ ॥
मंत्रिणां वचनं श्रुत्वा यथाभिलषितं प्रियम् ।
अब्रवीत् सारथिं वाक्यं रथो मे युज्यतामिति ॥ ७ ॥
मंत्र्यांचे आपल्या रुचिस अनुसरून प्रिय वचन ऐकून भरतांनी सारथ्यास म्हटले - ’माझा रथ जोडून तयार केला जावा.’॥ ७ ॥
प्रहृष्टवदनः सर्वा मातॄः समभिभाष्य च ।
आरुरोह रथं श्रीमान् शत्रुघ्नेन समन्वितः ॥ ८ ॥
नंतर त्यांनी प्रसन्नवदन होऊन सर्व मातांशी बोलून, जाण्यासाठी त्यांची आज्ञा घेतली. त्यानंतर शत्रुघ्नासहित श्रीमान् भरत रथावर आरूढ झाले. ॥ ८ ॥
आरुह्य च रथं क्षिप्रं शत्रुघ्नभरतावुभौ ।
ययतुः परमप्रीतौ वृतौ मन्त्रिपुरोहितैः ॥ ९ ॥
रथावर आरूढ होऊन परम प्रसन्न झालेले भरत आणि शत्रुघ्न दोघे भाऊ मंत्र्यांना आणि पुरोहितांनी घेरलेले शीघ्रतापूर्वक तेथून प्रस्थान करते झाले. ॥ ९ ॥
अग्रतो गुरवः सर्वे वसिष्ठप्रमुखा द्विजाः ।
प्रययुः प्राङ्‌मुखाः सर्वे नंदिग्रामो यतो भवेत् ॥ १० ॥
पुढे पुढे वसिष्ठ आदि गुरुजन तसेच ब्राह्मण चालले होते. त्या सर्व लोकांनी अयोध्येहून पूर्वाभिमुख होऊन यात्रा केली आणि जो मार्ग नंदिग्रामाला जात होता तो धरला. ॥ १० ॥
बलं च तदनाहूतं गजाश्वरथसङ्‌कुलम् ।
प्रययौ भरते याते सर्वे च पुरवासिनः ॥ ११ ॥
भरतांचे प्रस्थान झाल्यावर हत्ती, घोडे आणि रथांनी भरलेली सारी सेनाही न बोलावताच त्यांच्या मागोमाग चालू लागली आणि समस्त पुरवासीही त्यांच्या पाठोपाठ निघाले. ॥ ११ ॥
रथस्थः स तु धर्मात्मा भरतो भ्रातृवत्सलः ।
नन्दिग्रामं ययौ तूर्णं शिरस्याधाय पादुके ॥ १२ ॥
धर्मात्मा भातृवत्सल भरत आपल्या मस्तकावर भगवान् श्रीरामांच्या चरणपादुका घेऊन रथात बसून अत्यंत शीघ्रतेने नंदिग्रामाकडे निघाले. ॥ १२ ॥
भरतस्तु ततः क्षिप्रं नन्दिग्रामं प्रविश्य सः ।
अवतीर्य रथात् तूर्णं गुरूनिदमभाषत ॥ १३ ॥
लवकरच नंदिग्रामात पोहोचून भरत तात्काळ रथातून उतरले आणि गुरुजनांना याप्रकारे म्हणाले - ॥ १३ ॥
एतद् राज्यं मम भ्रात्रा दत्तं संन्यासमुत्तमम् ।
योगक्षेमवहे चेमे पादुके हेमभूषिते ॥ १४ ॥
माझ्या भावाने हे उत्तम राज्य मला ठेव (अमानत) म्हणून दिले आहे. त्यांच्या या सुवर्णभूषित चरणपादुकाच राज्याच्या योगक्षेमाचा निर्वाह करणार आहेत. ॥ १४ ॥
भरतः शिरसा कृत्वा संन्यासं पादुके ततः ।
अब्रवीद् दुःखसंतप्तः सर्वं प्रकृतिमण्डलम् ॥ १५ ॥
तत्‌पश्चात भरतांनी मस्तक नमवून त्या चरणपादुकांच्या प्रति त्या ठेवरूपी राज्याला समर्पित करून दुःखाने संतप्त होऊन समस्त प्रकृतिमण्डलास (मंत्री, सेनापति, प्रजा आदि) म्हटले - ॥ १५ ॥
छत्रं धारयत क्षिप्रं आर्यपादाविमौ मतौ ।
आभ्यां राज्ये स्थितो धर्मः पादुकाभ्यां गुरोर्मम ॥ १६ ॥
आपण सर्व लोक या चरणपादुकांवर छत्र धरावे. मी यांना आर्य रामचंद्रांचे साक्षात् चरणच मानतो. माझ्या गुरूंच्या या चरणपादुकांच्या योगेच या राज्यात धर्माची स्थापना होईल. ॥ १६ ॥
भ्रात्रा हि मयि संन्यासो निक्षिप्तः सौहृदादयम् ।
तमिमं पालयिष्यामि राघवागमनं प्रति ॥ १७ ॥
’माझ्या भावाने प्रेमामुळेच ही ठेव मला सोपविली आहे. म्हणून मी प्रभु येईपर्यंत हिचे उत्तम प्रकारे रक्षण करीन. ॥ १७ ॥
क्षिप्रं संयोजयित्वा तु राघवस्य पुनः स्वयम् ।
चरणौ तौ तु रामस्य द्रक्ष्यामि सहपादुकौ ॥ १८ ॥
’यानंतर मी स्वतः या पादुकांना पुन्हा शीघ्रच राघवांच्या चरणांशी संयुक्त करून या पादुकांनी सुशोभित श्रीरामांच्या त्या युगल चरणांचे दर्शन करीन. ॥ १८ ॥
ततो निक्षिप्तभारोऽहं राघवेण समागतः ।
निवेद्य गुरवे राज्यं भजिष्ये गुरुवर्तिताम् ॥ १९ ॥
’राघव परत आल्यावर त्यांना भेटताच मी आपल्या त्या गुरुदेवांना हे राज्य समर्पित करून त्यांच्या आज्ञेच्या अधीन होऊन, त्यांच्या सेवेत लागेन. राज्याचा हा भार त्यांच्यावर घालून मी भार मुक्त होऊन जाईन. ॥ १९ ॥
राघवाय च संन्यासं दत्त्वेमे वरपादुके ।
राज्यं चेदमयोध्यां च धूतपापो भवाम्यहम् ॥ २० ॥
माझ्याजवळ ठेव रूपाने ठेवलेल्या या राज्याला, अयोध्येला आणि या सर्वश्रेष्ठ पादुकांना श्रीरघुनाथांच्या सेवेत समर्पित करून मी सर्व प्रकारच्या पाप-तापांतून मुक्त होऊन जाईन. ॥ २० ॥
अभिषिक्ते तु काकुत्स्थे प्रहृष्टमुदिते जने ।
प्रीतिर्मम यशश्चैव भवेद् राज्याच्चतुर्गुणम् ॥ २१ ॥
’काकुत्स्थ श्रीरामांचा अयोध्येच्या राज्यावर अभिषेक झाल्यावर जेव्हां सर्व लोक हर्ष आणि आनंदात निमग्न होतील तेव्हां मला राज्य मिळण्याच्या प्रसन्नतेपेक्षा चौपट प्रसन्नता आणि चौपट यशाची प्राप्ति होईल.’ ॥ २१ ॥
एवं तु विलपन् दीनो भरतः स महायशाः ।
नन्दिग्रामेऽकरोद् राज्यं दुःखितो मन्त्रिभिः सह ॥ २२ ॥
या प्रकारे दीनभावाने विलाप करीत दुःखमग्न महायशस्वी भरत मंत्र्यांसह नंदिग्रामात राहून राज्याचे शासन करू लागले. ॥ २२ ॥
स वल्कलजटाधारी मुनिवेषधरः प्रभुः ।
नन्दिग्रामेऽवसद् धीरः ससैन्यो भरतस्तदा ॥ २३ ॥
सेनेसहित प्रभावशाली धीर वीर भरतांनी त्या समयी वल्कले आणि जटा धारण करून मुनिवेषधारी होऊन नंदिग्रामात निवास केला. ॥ २३ ॥
रामागमनमाकाङ्‌क्षन् भरतो भ्रातृवत्सलः ।
भ्रातुर्वचनकारी च प्रतिज्ञापारगस्तदा ।
पादुके त्वभिषिच्याथ नन्दिग्रामेऽवसत् तदा ॥ २४ ॥
भावाच्या आज्ञेचे पालन आणि प्रतिज्ञा पार पाडण्याची इच्छा धरणारे भ्रातृवत्सल भरत श्रीरामचंद्रांच्या आगमनाची आकांक्षा ठेवून त्यांच्या चरणपादुकांना राज्यावर अभिषिक्त करून त्या काळांत नंदिग्रामांतच राहू लागले. ॥ २४ ॥
सवालव्यजनं छत्रं धारयामास स स्वयम् ।
भरतः शासनं सर्वं पादुकाभ्यां न्यवेदयन् ॥ २५ ॥
भरत राज्य शासनाचे समस्त कार्य भगवान श्रीरामांच्या चरणपादुकांना निवेदन करून करीत होते; तसेच स्वतःही त्यांच्यावर छत्र धरीत होते आणि चवरी ढाळीत होते. ॥ २५ ॥
ततस्तु भरतः श्रीमानभिषिच्यार्यपादुके ।
तदधीनस्तदा राज्यं कारयामास सर्वदा ॥ २६ ॥
श्रीमान् भरत मोठ्या भावाच्या त्या चरणपादुकांना राज्यावर अभिषिक्त करून सदा त्यांच्या अधीन राहून राज्याचे सर्व कार्य, मंत्री आदिंच्या द्वारा करवीत होते. ॥ २६ ॥
तदा हि यत्कार्यमुपैति किञ्चि-
     दुपायनं चोपहृतं महार्हम् ।
स पादुकाभ्यां प्रथमं निवेद्य
     चकार पश्चाद् भरतो यथावत् ॥ २७ ॥
त्या समयी जे काही कार्य उपस्थित होत असे, तसेच ज्या बहुमूल्य भेटी येत ते सर्व प्रथम त्या पादुकांना निवेदन करून नंतर भरत त्यांचा यथावत् विनियोग करीत असत. ॥ २७ ॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे पञ्चदशाधिकशततमः सर्गः ॥ ११५ ॥
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे पंधरावा सर्ग पूरा झाला ॥ ११५ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP