हनुमन्तं जीवयित्वा ब्रह्मादिदेवैः तस्मै वरप्रदानं, तमादाय वायोः अञ्जनागृहे गमनम्, ऋषिशापाद् हनुमतः स्वबलस्य विस्मृतिः, श्रीरामेण स्वयज्ञे समागन्तुं प्रार्थ्यागस्त्य प्रभृतीनां विसर्जनम् -
|
ब्रह्मदेव आदि देवतांनी हनुमानास जिवंत करून नाना प्रकारचे वरदान देणे, आणि वायुचे त्यास घेऊन आञ्जनेच्या घरी जाणे, ऋषिंच्या शापाने हनुमानास आपल्या बळाची विस्मृति, श्रीरामांनी अगस्त्य आदि ऋषिंना आपल्या यज्ञात येण्यासंबंधी प्रस्ताव करून त्यांना निरोप देणे -
|
ततः पितामहं दृष्ट्वा वायुः पुत्रवधार्दितः । शिशुकं तं समादाय उत्तस्थौ धातुरग्रतः ॥ १ ॥
|
पुत्र मारला गेल्याने वायुदेव फार दुःखी झाले होते. ब्रह्मदेवांना पाहून ते त्या शिशुला घेऊनच त्यांच्या समोर उभे राहिले. ॥१॥
|
चलकुण्डलमौलिस्रक् तपनीयविभूषणः । पादयोर्न्यपतद् वायुः त्रिरुपस्थाय वेधसे ॥ २ ॥
|
त्यांच्या कानात कुंडले हलत होती, मस्तकावर मुकुट आणि कंठात हार शोभत होता आणि ते सोन्याच्या आभूषणांनी विभूषित होते. वायुदेव तीन वेळा उपस्थान करून ब्रह्मदेवांच्या चरणांवर कोसळले. ॥२॥
|
तं तु वेदविदा तेन लम्बाभरणशोभिना । वायुमुत्थाप्य हस्तेन शिशुं तं परिमृष्टवान् ॥ ३ ॥
|
वेदवेत्ता ब्रह्मदेवांनी आपल्या लांब पसरलेल्या आणि आभरण भूषित हातांनी वायुदेवांना उठवून उभे केले तसेच त्यांच्या त्या शिशुवरूनही हात फिरवला. ॥३॥
|
स्पृष्टमात्रस्ततः सोऽथ सलीलं पद्मजन्मना । जलसिक्तं यथा सस्यं पुनर्जीवितमाप्तवान् ॥ ४ ॥
|
जशी पाणी शिंपडल्याने सुकून चाललेली शेती हिरवीगार होऊन जाते त्याच प्रकारे कमलयोनी ब्रह्मदेवांच्या हाताचा लीलापूर्वक स्पर्श होताच शिशु हनुमान् पुनः जिवंत झाले. ॥४॥
|
प्राणवन्तमिमं दृष्ट्वा प्राणो गन्धवहो मुदा । चचार सर्वभूतेषु संनिरुद्धं यथा पुरा ॥ ५ ॥
|
हनुमान् जिवंत झालेले पाहून जगताचे प्राणस्वरूप गंधवाहन वायुदेव समस्त प्राण्यांमध्ये अवरुद्ध झालेल्या प्राण आदिंचे पूर्ववत् प्रसन्नतापूर्वक संचारण करू लागले. ॥५॥
|
मरुद्रोधाद् विनिर्मुक्ताः ताः प्रजा मुदिताऽभवन् । शीतदाहविनिर्मुक्ताः पद्मिन्य इव साम्बुजाः ॥ ६ ॥
|
वायुच्या अवरोधापासून सुटल्याने सारी प्रजा प्रसन्न झाली. जणु हिमयुक्त वायुच्या आघातापासून मुक्त होऊन फुललेल्या कमळांनी युक्त पुष्करिणीच सुशोभित होऊन राहिल्या होत्या. ॥६॥
|
ततस्त्रियुग्मस्त्रिककुत् त्रित्रधामा त्रिदशार्चितः । उवाच देवता ब्रह्मा मारुतप्रियकाम्यया ॥ ७ ॥
|
त्यानंतर तीन(*) युग्मांनी संपन्न, प्रधानतः तीन मूर्ती (**) धारण करणारे, त्रिलोकरूपी गृहात राहाणारे तसेच तीन दशांनी (***) युक्त देवतांच्या द्वारा पूजित ब्रह्मदेव वायुदेवांचे प्रिय करण्याच्या इच्छेने देवगणांना म्हणाले - ॥७॥
|
भो महेन्द्राग्निवरुणा महेश्वरधनेश्वराः । जानतामपि वः सर्वं वक्ष्यामि श्रूयतां हितम् ॥ ८ ॥
|
इंद्र, अग्नि, वरूण, महादेव आणि कुबेर आदि देवतांनो ! यद्यपि आपण सर्व लोक जाणत आहात तथापि मी आपणा सर्वांच्या हिताच्या सर्व गोष्टी सांगेन, ऐका. ॥८॥
|
अनेन शिशुना कार्यं कर्तव्यं वो भविष्यति । तद् ददध्वं वरान् सर्वे मारुतस्यास्य तुष्टये ॥ ९ ॥
|
या बालकाच्या द्वारा भविष्यात आपली सर्वांची बरीच कार्ये सिद्ध होतील, म्हणून वायुदेवाच्या प्रसन्नतेसाठी आपण सर्व लोक याला वर द्या. ॥९॥
|
ततः सहस्रनयनः प्रीतियुक्तः शुभाननः । कुशेशयमयीं मालां उत्क्षेप्येदं वचोऽब्रवीत् ॥ १० ॥
|
तेव्हा सुंदर मुख असणार्या सहस्त्र नेत्रधारी इंद्रांनी शिशु हनुमंताच्या गळ्यात अत्यंत प्रसन्नतेसह कमलाची माळा घातली आणि ही गोष्ट सांगितली - ॥१०॥
|
मत्करोत्सृष्टवज्रेण हनुरस्य यथा हतः । नाम्ना वै कपिशार्दूलो भविता हनुमानिति ॥ ११ ॥
|
माझ्या हातून सुटलेल्या वज्रद्वारा या बालकाची हनुवटी तुटून गेली होती, म्हणून या कपिश्रेष्ठाचे नाम हनुमान् होईल. ॥११॥
|
अहमस्य प्रदास्यामि परमं वरमद्भुतम् । इतः प्रभृति वज्रस्य ममावध्यो भविष्यति ॥ १२ ॥
|
याशिवाय मी याला दुसरा अद्भुत वर हा देत आहे की आजपासून हा माझ्या वज्राच्या द्वाराही मारला जाऊ शकणार नाही. ॥१२॥
|
मार्तण्डस्त्वब्रवीत् तत्र भगवान् तिमिरापहः । तेजसोऽस्य मदीयस्य ददामि शतिकां कलाम् ॥ १३ ॥
|
यानंतर तेथे अंधकारनाशक भगवान् सूर्यांनी म्हटले - मी याला आपल्या तेजाचा शंभरावा भाग देत आहे. ॥१३॥
|
यदा तु शास्त्राण्यध्येतुं शक्तिरस्य भविष्यति । तदास्य शास्त्रं दास्यामि येन वाग्मी भविष्यति । नचास्य भविता कश्चित् सदृशः शास्त्रदर्शने ॥ १४ ॥
|
याशिवाय जेव्हा याच्याठिकाणी शास्त्राध्ययन करण्याची शक्ति येईल, तेव्हा मीच याला शास्त्रांचे ज्ञान प्रदान करीन, ज्यायोगे हा उत्तम वक्ता होईल. शास्त्रज्ञानात कुणीही याची बरोबरी करणारा होणार नाही. ॥१४॥
|
वरुणश्च वरं प्रादाद् नास्य मृत्युर्भविष्यति । वर्षायुतशतेनापि मत्पाशादुदकादपि ॥ १५ ॥
|
त्यानंतर वरुणांनी वर देतांना म्हटले - दहा लाख वर्षांचे आयुष्य झाल्यावरही माझ्या पाशाने आणि जलाने या बालकाचा मृत्यु होणार नाही. ॥१५॥
|
यमो दण्डादवध्यत्वं अरोगत्वं च दत्तवान्शः । वरं ददामि सन्तुष्ट अविषादं च संयुगे ॥ १६ ॥ गदेयं मामिका नैनं संयुगेषु वधिष्यति । इत्येवं वरदः प्राह तदा ह्येकाक्षिपिङ्गलः ॥ १७ ॥
|
नंतर यमाने वर दिला - हा माझ्या दण्डाने अवध्य आणि निरोगी होईल. त्यानंतर पिंगळवर्णाच्या एक डोळा असलेल्या कुबेराने म्हटले - मी संतुष्ट होऊन हा वर देत आहे की युद्धामध्ये याला कधी विषाद होणार नाही तसेच माझी ही गदा संग्रामात याचा वध करू शकणार नाही. ॥१६-१७॥
|
मत्तो मदायुधानां च न वध्योऽयं भविष्यति । इत्येवं शङ्करेणापि दत्तोऽस्य परमो वरः ॥ १८ ॥
|
यानंतर भगवान् शंकरांनी हा उत्तम वर दिला की हा माझ्याकडून आणि माझ्या आयुधांच्या द्वाराही अवध्य होईल. ॥१८॥
|
विश्वकर्मा च दृष्ट्वैनं बालसूर्योपमं शिशुम् । शिल्पिनां प्रवरः प्रादाद् वरमस्य महामतिः ॥ १९ ॥
|
शिल्पिंमध्ये श्रेष्ठ परम बुद्धिमान् विश्वकर्म्याने बालसूर्यासमान अरुण कान्तिच्या त्या शिशुला पाहून त्याला याप्रकारे वर दिला - ॥१९॥
|
मत्कृतानि च शस्त्राणि यानि दिव्यानि संयुगे । तैरवध्यत्वमापन्नः चिरजीवी भविष्यति ॥ २० ॥
|
मी बनविलेली जेवढी दिव्य अस्त्रे-शस्त्रे आहेत, त्यांच्यापासून अवध्य होऊन हा बालक चिरंजीवी होईल. ॥२०॥
|
दीर्घायुश्च महात्मा च इति ब्रह्माब्रवीद्वचः । सर्वेषां ब्रह्मदण्डानामवध्योऽयं भविष्यति ॥ २१ ॥
|
शेवटी ब्रह्मदेवांनी त्या बालकाला लक्ष्य करून म्हटले - हा दीर्घायु, महात्मा तसेच सर्व प्रकारच्या ब्रह्मदण्डांपासून अवध्य होईल. ॥२१॥
|
ततः सुराणां तु वरैः दृष्ट्वा ह्येनमलङ्कृतम् । चतुर्मुखस्तुष्टमना वायुमाह जगद्गुरुः ॥ २२ ॥
|
त्यानंतर हनुमानाला याप्रकारे देवतांच्या वरांनी अलंकृत पाहून चतुर्मुख जगद्गुरू ब्रह्मदेवांचे मन प्रसन्न झाले आणि ते वायुदेवास म्हणाले - ॥२२॥
|
अमित्राणां भयकरो मित्राणामभयङ्करः । अजेयो भविता पुत्रः तव मारुत मारुतिः ॥ २३ ॥
|
मारुत ! तुमचा हा पुत्र मारुति शत्रुसाठी भयंकर आणि मित्रांसाठी अभयदाता होईल. युद्धात कोणीही याला जिंकू शकणार नाही. ॥२३॥
|
कामरूपः कामचारी कामगः प्लवतां वरः । भवत्यव्याहतगतिः कीर्तिमांश्च भविष्यति ॥ २४ ॥
|
हा इच्छेनुसार रूप धारण करू शकेल, जेथे इच्छा असेल तेथे जाऊ शकेल, याची गति याची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तीव्र अथवा मंद होईल तसेच ती कुठेही अडणार नाही (अडविली जाऊ शकणार नाही.). हा कपिश्रेष्ठ अत्यंत यशस्वी होईल. ॥२४॥
|
रावणोत्सादनार्थानि रामप्रीतियकरणि च । रोमहर्षकराण्येव कर्ता कर्माणि संयुगे ॥ २५ ॥
|
हा युद्धस्थळी रावणाचा संहार आणि भगवान् श्रीरामचंद्रांची प्रसन्नता संपादन करण्यासाठी अनेक अद्भुत तसेच रोमांचकारी कर्मे करील. ॥२५॥
|
एवमुक्त्वा तमामन्त्र्य मारुतं त्वमरैः सह । यथागतं ययुः सर्वे पितामहपुरोगमाः ॥ २६ ॥
|
याप्रकारे हनुमंतांना वर देऊन वायुदेवतेची अनुमति घेऊन ब्रह्मदेवादि सर्व देवता जशा आल्या होत्या त्याचप्रकारे आपापल्या स्थानी निघून गेल्या. ॥२६॥
|
सोऽपि गन्धवहः पुत्रं प्रगृह्य गृहमानयत् । अञ्जनायास्तमाख्याय वरदत्तं विनिर्गतः ॥ २७ ॥
|
गंधवाहन वायुही पुत्राला घेऊन अञ्जनेच्या घरी आले आणि तिला देवतांनी दिलेल्या वरदानाची हकिगत सांगून निघून गेले. ॥२७॥
|
प्राप्य राम वरानेष वरदानसमन्वितः । बलेनात्मनि संस्थेन सोऽसौ पूर्ण इवार्णवः ॥ २८ ॥
|
रामा ! याप्रकारे हे हनुमान बरेचसे वर मिळून वरदानजनित शक्तिने संपन्न झाले आणि आपल्या ठिकाणी विद्यमान असलेल्या अनुपम वेगाने पूर्ण होऊन भरलेल्या महासागराप्रमाणे शोभू लागले. ॥२८॥
|
तरसा पूर्यमाणोऽपि तदा वानरपुङ्गवः । आश्रमेषु महर्षीणां अपराध्यति निर्भयः ॥ २९ ॥
|
त्या काळात वेगाने भरलेले हे वानरश्रेष्ठ हनुमान् निर्भय होऊन महर्षिंच्या आश्रमांत परत परत जाऊन उपद्रव करीत होते. ॥२९॥
|
स्रुग्भाण्डान्यग्निहोत्राणि वल्कलानां च सञ्चयान् । भग्नविच्छिन्नविध्वस्तान् संशान्तानां करोत्ययम् ॥ ३० ॥
|
हे शान्तचित्त महात्म्यांची यज्ञोपयोगी पात्रे फोडून टाकत असत, अग्निहोत्राचे साधनभूत स्त्रुक, स्त्रुवा आदि तोडून टाकीत आणि ढीगावर ठेवल्या गेलेल्या वल्कलांना चिरून -फाडून टाकीत असत. ॥३०॥
|
एवंविधानि कर्माणि प्रावर्तत महाबलः । सर्वेषां ब्रह्मदण्डानां अवध्यः शम्भुना कृतः ॥ ३१ ॥ जानन्त ऋषयः सर्वे सहन्ते तस्य शक्तितः ।
|
महाबली पवनकुमार या प्रकारचे उपद्रवपूर्ण कार्य करू लागले. कल्याणकारी भगवान् ब्रह्मदेवांनी यांना सर्व प्रकारच्या ब्रह्मदण्डांपासून अवध्य केलेले आहे - ही गोष्ट सर्व ऋषि जाणत होते, म्हणून त्यांच्या शक्तिने विवश होऊन ते यांचे सर्व अपराध गुपचुप सहन करीत असत. ॥३१ १/२॥
|
तथा केसरिणा त्वेष वायुना सोऽञ्जनीसुतः ॥ ३२ ॥ प्रतिषिद्धोऽपि मर्यादां लङ्घयत्येव वानरः ।
|
जरी केसरी तसेच वायुदेवांनी ही या अञ्जनीकुमाराला वारंवार मनाई केली होती तरीही हे वानरवीर मर्यादेचे उल्लंघन करीतच होते. ॥३२ १/२॥
|
ततो महर्षयः क्रुद्धा भृग्वङ्गिरसवंशजाः ॥ ३३ ॥ शेपुरेनं रघुश्रेष्ठ नातिक्रुद्धातिमन्यवः ।
|
यामुळे भृगु आणि अङ्गिरांच्या वंशात उत्पन्न झालेले महर्षि कुपित झाले. रघुश्रेष्ठा ! त्यांनी आपल्या हृदयात अधिक खेद अथवा दुःखाला स्थान न देता त्यांना शाप देतांना म्हटले - ॥३३ १/२॥
|
बाधसे यत् समाश्रित्य बलमस्मान् प्लवङ्गम ॥ ३४ ॥ तद्दीर्घकालं वेत्तासि नास्माकं शापमोहितः । यदा ते स्मार्यते कीर्तिः तदा ते वर्धते बलम् ॥ ३५ ॥
|
वानरवीरा ! तू ज्या बळाचा आश्रय घेऊन आम्हाला कष्ट देत आहेस त्याचा आमच्या शापाने मोहित होऊन तुला दीर्घकाळपर्यंत विसर पडेल तुला स्वतःच्या बळाचा पत्ताच लागणार नाही. जेव्हा कोणी तुला तुझ्या कीर्तीचे स्मरण करून देईल, तेव्हा तुझे बळ वाढेल. ॥३४-३५॥
|
ततस्तु हृततेजौजा महर्षिवचनौजसा । एषोश्रमाणि तान्येव मृदुभावं गतोऽचरत् ॥ ३६ ॥
|
याप्रकारे महर्षिंच्या त्या वचनांच्या प्रभावाने यांचे तेज आणि ओज कमी झाले नंतर हे त्याच आश्रमांतून मृदुल प्रकृतिचे होऊन विचरण करू लागले. ॥३६॥
|
अथर्क्षरजसो नाम वालिसुग्रीवयोः पिता । सर्ववानरराजाऽऽसीत् तेजसा इव भास्करः ॥ ३७ ॥
|
वालि आणि सुग्रीवाच्या पित्याचे नाव ऋक्षराज होते. ते सूर्यासमान तेजस्वी तसेच समस्त वानरांचे राजे होते. ॥३७॥
|
स तु राज्यं चिरं कृत्वा वानराणां महेश्वरः । ततस्तु ऋक्षरजा नाम कालधर्मेण योजितः ॥ ३८ ॥
|
ते वानरराज ऋक्षराज चिरकाळपर्यंत वानरांच्या राज्याचे शासन करून अंती कालधर्माला (मृत्युला) प्राप्त झाले. ॥३८॥
|
तस्मिन्नस्तमिते चाथ मन्त्रिभिर्मन्त्रकोविदैः । पित्र्ये पदे कृतो वाली सुग्रीवो वालिनः पदे ॥ ३९ ॥
|
त्यांचे देहावसान झाल्यावर मंत्रवेत्त्या मंत्र्यांनी पित्याच्या स्थानावर वालीला राजा आणि वालीच्या स्थानावर सुग्रीवाला युवराज बनविले. ॥३९॥
|
सुग्रीवेण समं त्वस्य अद्वैधं छिद्रवर्जितम् । आबाल्यं सख्यमभवद् अनिलस्याग्निना यथा ॥ ४० ॥
|
ज्याप्रमाणे अग्निबरोबर वायुची स्वाभाविक मैत्री असते त्याच प्रकारे सुग्रीवाशी वालिचा बालपणापासून सख्यभाव होता. त्या दोघांमध्ये परस्परात कुठल्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. त्यांच्यात अटूट प्रेम होते. ॥४०॥
|
एष शापवशादेव न वेद बलमात्मनः । वालिसुग्रीवयोर्वैरं यदा राम समुत्थितम् ॥ ४१ ॥ न ह्येष राम सुग्रीवो भ्राम्यमाणोऽपि वालिना । देव जानाति न ह्येष बलमात्मनि मारुतिः ॥ ४२ ॥
|
श्रीरामा ! नंतर ज्यावेळी वाली आणि सुग्रीवात वैर उत्पन्न झाले त्या समयी हे हनुमान् शापवश असल्याने आपले बळ जाणू शकले नाहीत. देवा ! वालीच्या भयाने भटकत राहूनही सुग्रीवालाही यांच्या बळाचे स्मरण झाले नाही आणि स्वतः हे पवनकुमारही आपल्या बळाचा पत्ता लावू शकले नाहीत. ॥४१-४२॥
|
ऋषिशापाहृतबलः तदैव कपिसत्तमः । सिंहः कुञ्जररुद्धो वा आस्थितः सहितो रणे ॥ ४३ ॥
|
सुग्रीवावर जेव्हा ही विपत्ति आली होती, त्या काळात ऋषिंच्या शापामुळे यांना आपल्या बळाच्या ज्ञानाचा विसर पडला होता, म्हणून जसे एखादा सिंह हत्तीद्वारा अवरूद्ध होऊन गुपचुप उभा राहतो त्याचप्रकारे हे वाली आणि सुग्रीवाच्या युद्धसमयी गुपचुप उभे राहून तमाशा बघत राहिले, काही करू शकले नाहीत. ॥४३॥
|
पराक्रमोत्साहमतिप्रताप सौशील्यमाधुर्यनयानयैश्च । गाम्भीर्यचातुर्यसुवीर्यधैर्यैः हनूमतः कोऽभ्यधिकोऽस्ति लोके ॥ ४४ ॥
|
संसारात असा कोण आहे जो पराक्रम, उत्साह, बुद्धि, प्रताप, सुशीलता, मधुरता, नीति-अनीतिचा विवेक, गंभीरता, चतुरता, उत्तम बळ आणि धैर्यामध्ये हनुमानाहून वरचढ असेल. ॥४४॥
|
असौ पुनर्व्याकरणं ग्रहीष्यन् सूर्योन्मुखः प्रष्टुमना कपीन्द्रः । उद्यद्गिरेरस्तगिरिं जगाम ग्रन्थं महद्धारयनप्रमेयः ॥ ४५ ॥
|
हे असीम शक्तिशाली कपिश्रेष्ठ हनुमान् व्याकरणाचे अध्ययन करण्यासाठी, शंका विचारण्याच्या इच्छेने सूर्याकडे मुख करून महान् ग्रंथ धारण करून त्यांच्या पुढे पुढे उदयाचलापासून अस्ताचलापर्यंत जात असत. ॥४५॥
|
ससूत्रवृत्त्यर्थपदं महार्थं ससङ्ग्रहं सिद्ध्यति वै कपीन्द्रः । नह्यस्य कश्चित् सदृशोऽस्ति शास्त्रे वैशारदे च्छन्दगतौ तथैव ॥ ४६ ॥
|
त्यांनी सूत्र, वृति, वार्तिक, महाभाष्य आणि संग्रह - या सर्वांचे उत्तम प्रकारे अध्ययन केले आहे. अन्यान्य शास्त्रांचे ज्ञान तसेच छंदःशास्त्राचे अध्ययनातही यांची बरोबरी करणारा दुसरा कोणी विद्वान् नाही आहे. ॥४६॥
|
सर्वासु विद्यासु तपोविधाने प्रस्पर्धतेऽयो हि गुरुं सुराणाम् । सोऽयं नवव्याकरणार्थवेत्ता ब्रह्मा भविष्यत्यपि ते प्रसादात् ॥ ४७ ॥
|
संपूर्ण विद्यांचे ज्ञान तसेच तपस्येच्या अनुष्ठानातही हे देवगुरू बृहस्पतिंची बरोबर करतात. नव व्याकरणाच्या सिद्धान्ताला जाणणारे हे हनुमान् आपल्या कृपेने साक्षात् ब्रह्मदेवांप्रमाणे आदरणीय होतील. ॥४७॥
|
प्रवीविवक्षोरिव सागरस्य लोकान् दिधक्षोरिव पावकस्य लोकक्षयेष्वेव यथान्तकस्य हनूमतः स्थास्यति कः पुरस्तात् ॥ ४८ ॥
|
प्रलयकाली भूतलाला आप्लावित करण्यासाठी भूमीमध्ये प्रवेश करण्याची इच्छा करणार्या महासागराप्रमाणे, संपूर्ण लोकांना दग्ध करण्यास उद्यत झालेल्या संवर्तक अग्निप्रमाणे तसेच लोकसंहारासाठी उद्यत झालेल्या काळाप्रमाणे प्रभावशाली या हनुमानांसमोर कोण टिकू शकणार आहे ? ॥४८॥
|
एषेव चान्ये च महाकपीन्द्राः सुग्रीवमैन्दद्विविदाः सनीलाः । सतारतारेयनलाः सरम्भाः तत्कारणाद् राम सुरैर्हि सृष्टाः ॥ ४९ ॥
|
रामा ! वास्तविक हे किंवा यांच्याच समान जे दुसरे अन्य सुग्रीव, मैंद, द्विविद, नील, तार. तारेय (अंगद) नल तसेच रंभ आदि महाकपिश्वर आहेत या सर्वांची सृष्टि (उत्पत्ति) देवतांनी आपल्या सहायतेसाठीच केली आहे. ॥४९॥
|
गजो गवाक्षो गवयः सुदंष्ट्रो मैन्दः प्रभो ज्योतिमुखो नलश्च । एते च ऋक्षाः सह वानरेन्द्रैः त्वत्कारणाद् राम सुरैर्हि सृष्टाः ॥ ५० ॥
|
श्रीरामा ! गज, गवाक्ष, गवय, सुदंष्ट्र, मैंद, प्रभ, ज्योतिमुख आणि नल - या सर्व वानरेश्वरांनी तसेच अस्वलांची सृष्टि देवतांनी आपल्याला सहयोग देण्यासाठीच केली आहे. ॥५०॥
|
तदेतत् कथितं सर्वं यन्मां त्वं परिपृच्छसि । हनूमतो बालभावे कर्मैतत् कथितं मया ॥ ५१ ॥
|
रघुनंदना ! आपण मला जे काही विचारले होते, ते सर्व मी ऐकविले आहे. हनुमंतांच्या बाल्यावस्थेच्या या चरित्राचेही वर्णन केले आहे. ॥५१॥
|
श्रुत्वागस्त्यस्य कथितं रामः सौमित्रिरेव च । विस्मयं परमं जग्मुर्वानरा राक्षसैः सह ॥ ५२ ॥
|
अगस्त्यांचे हे कथन ऐकून श्रीराम आणि लक्ष्मण फार विस्मित झाले. वानर आणि राक्षसांनाही फारच आश्चर्य वाटले. ॥५२॥
|
अगस्त्यस्त्वब्रवीद् रामं सर्वमेतछ्रुतं त्वया । दृष्टः सम्भाषितश्चासि राम गच्छामहे वयम् ॥ ५३ ॥
|
त्यानंतर अगस्त्यांनी रामांना म्हटले - योग्यांच्या हृदयात रमण करणार्या रामा ! आपण हा सर्व प्रसंग ऐकला आहात. आम्ही आपले दर्शन घेतले आणि आपल्याशी वार्तालापही केला आहे. म्हणून आता आम्ही जात आहोत. ॥५३॥
|
श्रुत्वैतद् राघवो वाक्यं अगस्त्यस्योग्रतेजसः । प्राञ्जलिः प्रणतश्चापि महर्षिमिदमब्रवीत् ॥ ५४ ॥
|
उग्र तेजस्वी अगस्त्यांचे हे वाक्य ऐकून राघव हात जोडून विनयपूर्वक या महर्षिंना याप्रमाणे बोलले - ॥५४॥
|
अद्य मे देवतास्तुष्टाः पितरः प्रपितामहाः । युष्माकं दर्शनादेव नित्यं तुष्टाः सबान्धवाः ॥ ५५ ॥
|
मुनीश्वर ! आज माझ्यावर देवता, पितर आणि पितामह आदि विशेषरूपाने संतुष्ट आहेत. बंधु-बांधवांसहित आम्हा लोकांना तर आपल्यासारख्या महात्म्यांच्या दर्शनाने सदाच संतोष वाटतो. ॥५५॥
|
विज्ञाप्यं तु ममैतद्धि यद् वदाम्यागतस्पृहः । तद् भवद्भिर्मम कृते कर्तव्यमनुकम्पया ॥ ५६ ॥
|
माझ्या मनात एका इच्छेचा उदय झाला आहे, म्हणून मी ही सूचित करण्यायोग्य गोष्ट आपल्या सेवेत निवेदन करत आहे. माझ्यावर अनुग्रह करून आपणाला माझे ते अभिष्ट कार्य पूरे करावे लागेल. ॥५६॥
|
पौरजानपदान् स्थाप्य स्वकार्येष्वहमागतः । क्रतूनहं करिष्यामि प्रभावाद् भवतां सताम् ॥ ५७ ॥
|
माझी इच्छा आहे की पुरवासी आणि देशवासी लोकांना आपापल्या कार्यामध्ये लावून मी आपणा सत्पुरुषांच्या प्रभावाने यज्ञाचे अनुष्ठान करावे. ॥५७॥
|
सदस्या मम यज्ञेषु भवन्तो नित्यमेव तत् । भविष्यथ महावीर्या ममानुग्रहकाङ्क्षिणः ॥ ५८ ॥
|
माझ्या त्या यज्ञांमध्ये आपण महान् शक्तिशाली महात्म्यांनी माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी नित्य सदस्य बनून राहावे. ॥५८॥
|
अहं युष्मान् समाश्रित्य तपोनिर्धूतकल्मषान् । अनुग्रहीतः पितृभिः भविष्यामि सुनिर्वृतः ॥ ५९ ॥
|
आपण तपस्येने निष्पाप होऊन चुकला आहात. मी आपणा लोकांचा आश्रय घेऊन सदा संतुष्ट आणि पितरांकडून अनुगृहित होईन. ॥५९॥
|
तदागन्तव्यमनिशं भवद्भिरिह संगतैः । अगस्त्याद्यास्तु तच्छ्रुत्वा ऋषयः संशितव्रताः ॥ ६० ॥ एवमस्त्विति तं प्रोच्य प्रयातुमुपचक्रमुः ।
|
यज्ञाच्या आरंभी सर्व लोक एकत्रित होऊन निरंतर येथे येत राहावेत. श्रीरामांचे हे वचन ऐकून कठोर व्रताचे पालन करणारे अगस्त्य आदि महर्षि त्यांना एवमस्तु (असेच होवो) म्हणून तेथून जाण्यास उद्यत झाले. ॥६० १/२॥
|
एवमुक्त्वा गताः सर्वे ऋषयस्ते यथागतम् ॥ ६१ ॥ राघवश्च तमेवार्थं चिन्तयामास विस्मितः ।
|
याप्रकारे बोलून सर्व ऋषि जसे आले होते तसेच निघून गेले. इकडे राघव विस्मित होऊन त्याच गोष्टीसंबंधी विचार करत राहिले. ॥६१ १/२॥
|
ततोऽस्तं भास्करे याते विसृज्य नृपवानरान् ॥ ६२ ॥ सन्ध्यामुपास्य विधिवत् तदा नरवरोत्तमः । प्रवृत्तायां रजन्यां तु सोऽन्तःपुरचरोऽभवत् ॥ ६३ ॥
|
त्यानंतर सूर्यास्त झाल्यावर राजांचा आणि वानरांचा निरोप घेऊन नरेशांमध्ये श्रेष्ठ श्रीरामांनी विधिपूर्वक संध्योपासना केली आणि रात्र झाल्यावर ते अंतःपुरात गेले. ॥६२-६३॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे षट्त्रिंशः सर्गः ॥ ३६ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा छत्तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३६॥
|