सीतायाः सन्देशस्य स्वकर्तृकतन्निवारणस्य च वृत्तान्तस्य हनुमता वर्णनम् -
|
हनुमानांचे सीतेचा सन्देह आणि त्यांच्या द्वारा त्या सन्देहाचे निवारणाचा वृत्तान्त सांगणे -
|
अथाहमुत्तरं देव्या पुनरुक्तः ससम्भ्रमः ।
तव स्नेहान्नरव्याघ्र सौहार्दादनुमान्य वै ॥ १ ॥
|
'हे पुरुषसिंह रघुनन्दन ! आपल्या ठिकाणी अनुपम स्नेह आणि सौहार्द असल्यामुळे सीता देवीने माझा सत्कार करून तेथून जाण्यासाठी उतावीळ झालेल्या मला पुन्हा तिने ही उत्तम गोष्ट सांगितली— ॥ १ ॥
|
एवं बहुविधं वाच्यो रामो दाशरथिस्त्वया ।
यथा मां प्राप्नुयाच्छीघ्रं हत्वा रावणमाहवे ॥ २ ॥
|
'पवनकुमार ! दाशराथि रामाला विस्तारपूर्वक माझा निरोप तू अशा रीतीने सांग की ते समरांगणात शीघ्र रावणाचा वध करून मला प्राप्त करतील. ॥ २ ॥
|
यदि वा मन्यसे वीर वसैकाहमरिन्दम ।
कस्मिंश्चित् संवृते देशे विश्रान्तः श्वो गमिष्यसि ॥ ३ ॥
|
हे शत्रुदमना वीरा ! जर तुला योग्य वाटत असेल तर एखाद्या गुप्त ठिकाणी राहून तू एक दिवस विश्रान्ती घे आणि उद्या सकाळी येथून निघून जा. ॥ ३ ॥
|
मम चाप्यल्पभाग्यायाः सान्निध्यात् तव वानर ।
अस्य शोकविपाकस्य मुहूर्तं स्याद् विमोक्षणम् ॥ ४ ॥
|
हे वानरा ! असे केलेस तर तुझ्या सान्निध्यामुळे माझ्यासारख्या मन्दभागिनीचा शोक विपाकातून थोडया काळासाठी तरी भुक्तता होईल. ॥ ४ ॥
|
गते हि त्वयि विक्रान्ते पुनरागमनाय वै ।
प्राणानामपि सन्देहो मम स्यान्नात्र संशयः ॥ ५ ॥
|
''तू पराक्रमी वीर आहेस. ज्यावेळी पुन्हा परत येण्यासाठी तू येथून निघून जाशील तेव्हा माझ्या प्राणांच्या विषयी ही सन्देह उपस्थित होईल यात संशय नाही. (म्हणजे तुम्ही परत येईपर्यत माझे प्राण राहातील की नाही याचीच मला शंका आहे.) ॥ ५ ॥
|
तवादर्शनजः शोको भूयो मां परितापयेत् ।
दुःखाद् दुःखपराभूतां दुर्गतां दुःखभागिनीम् ॥ ६ ॥
|
हे वीरा ! तू दृष्टीआड झालास म्हणजे मी एका दु:खातून सुटून दुसर्या दु:खात पडेन आणि त्यामुळे दुर्गतित पडलेल्या मला दु:खभागिनीला होणारा शोक अधिकच सन्तापदायक होईल. (तू दृष्टीआड झाल्यामुळे जो शोक होईल तो असह्य ठरेल.) ॥ ६ ॥
|
अयं च वीर सन्देहस्तिष्ठतीव ममाग्रतः ।
सुमहांस्त्वत्सहायेषु हर्यृक्षेषु हरीश्वर ॥ ७ ॥
कथं नु खलु दुष्पारं तरिष्यन्ति महोदधिम् ।
तानि हर्यृक्षसैन्यानि तौ वा नरवरात्मजौ ॥ ८ ॥
|
हे वीरा ! हे वानरराजा ! माझ्या समोर एक फारच मोठा सन्देह उभा राहिला आहे की तू ज्यांचा सहाय्यकर्ता आहेस त्या वानर आणि अस्वलांची सैन्ये आणि ते दोन्ही राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण मार्गातील हा दुस्तर असा महासागर कसा पार करतील ?॥ ७-८ ॥
|
त्रयाणामेव भूतानां सागरस्यास्य लङ्घने ।
शक्तिः स्याद् वैनतेयस्य वायोर्वा तव चानघ ॥ ९ ॥
|
हे निष्पाप पवनकुमार ! विनतानन्दन गरुड, वायु आणि तू या तीनच भूतांमध्ये (प्राण्यांच्या ठिकाणी) या जगतात हा समुद्र उल्लंघन करण्याचे सामर्थ्य आहे.॥९॥
|
तदस्मिन् कार्यनिर्योगे वीरैवं दुरतिक्रमे ।
किं पश्यसि समाधानं ब्रूहि कार्यविदां वर ॥ १० ॥
|
म्हणून हे वीरा ! जर या प्रकारे या कार्याचे साधन दुष्कर झालेले आहे तर या दुस्तर कार्यान्तून पार पडून कार्यसिद्धि होण्यासाठी तुला काय उपाय दिसत आहे, ते तू मला सांग. कार्य सिद्धिचा उपाय जाणणारात तू श्रेष्ठ आहेस म्हणून माझे समाधान कर. मला उत्तर दे. ॥ १० ॥
|
काममस्य त्वमेवैकः कार्यस्य परिसाधने ।
पर्याप्तः परवीरघ्न यशस्यस्ते बलोदयः ॥ ११ ॥
|
'शत्रूपक्षीय वीरांचा नाश करणार्या कपिश्रेष्ठा ! यात जराही सन्देह नाही की या कार्यसिद्धिसाठी तू एकटाही पुरेसा आहेस. तथापि तुझ्या बलाचा हा उद्रेक केवळ तुझ्यासाठीच यशाची वृद्धि करणारा होईल.(श्रीरामांसाठी नाही.)॥ ११ ॥
|
बलैः समग्रैर्यदि मां हत्वा रावणमाहवे ।
विजयी स्वां पुरीं रामो नयेत् तत् स्याद् यशस्करम् ॥ १२ ॥
|
जर श्रीराम आपल्या संपूर्ण सैन्यासह येथे येऊन युद्धात रावणास ठार मारतील आणि विजयी होऊन मला आपल्या पुरीला घेऊन जातील तर ते त्यांच्या साठी यशाची वृद्धि करणारे होईल.॥१२॥
|
यथाऽहं तस्य वीरस्य वनादुपधिना हृता ।
रक्षसा तद्भयादेव तथा नार्हति राघवः ॥ १३ ॥
|
''ज्याप्रकारे राक्षस रावणाने वीरवर भगवान श्रीरामांच्या भयानेच त्यांच्या समोर न जाता छलपूर्वक वनातून माझे अपहरण केले होते त्या रीतीने राघवाने मला प्राप्त करतां कामा नये. त्यांनी रावणाला मारूनच मला येथून घेऊन जावे. ॥१३॥
|
बलैस्तु सङ्कुलां कृत्वा लङ्कां परबलार्दनः ।
मां नयेद् यदि काकुत्स्थस्तत् तस्य सदृशं भवेत् ॥ १४ ॥
|
शत्रू सैन्याचा संहार करणारे ककुत्स्थकुलभूषण श्रीराम जर आपल्या सैनिकांच्या द्वारे लंकेला पददलित करून मला आपल्या बरोबर घेऊन जातील तर तो त्यांच्या योग्यतेला साजेसा पराक्रम होईल.॥१४॥
|
तद् यथा तस्य विक्रान्तमनुरूपं महात्मनः ।
भवत्याहवशूरस्य तथा त्वमुपपादय ॥ १५ ॥
|
महात्मा श्रीराम संग्रामात शौर्य प्रकट करणारे आहेत. म्हणून ज्या ज्या प्रकारे त्यांना अनुरूप असा पराक्रम प्रकट होईल अशा सर्व प्रकारच्या उपायांची तू योजना कर. ॥ १५ ॥
|
तदर्थोपहितं वाक्यं प्रश्रितं हेतुसंहितम् ।
निशम्याहं ततः शेषं वाक्यमुत्तरमब्रुवम् ॥ १६ ॥
|
सीतादेवीची सहेतुक आणि विनयशील अशी साभिप्राय वचनं मी ऐकली. ॥ १६ ॥
|
देवि हर्यृक्षसैन्यानामीश्वरः प्लवतां वरः ।
सुग्रीवः सत्त्वसम्पन्नस्तवार्थे कृतनिश्चयः ॥ १७ ॥
|
मग मी तिची समजूत घालण्यासाठी तिला सांगितले, 'कपिश्रेष्ठ सुग्रीव स्वतः शक्तिशाली आहेच पण फार मोठ्या वानर व अस्वलांच्या सेनेचा स्वामी आहे. तुझा उद्धार करण्याचा त्याने दृढनिश्चय केलेला आहे. ॥ १७ ॥
|
तस्य विक्रमसम्पन्नाः सत्त्ववन्तो महाबलाः ।
मनःसङ्कल्पसदृशा निदेशे हरयः स्थिताः ॥ १८ ॥
येषां नोपरि नाधस्तान्न तिर्यक् सज्जते गतिः ।
न च कर्मसु सीदन्ति महत्स्वमिततेजसः ॥ १९ ॥
असकृत् तैर्महाभागैर्वानरैर्बलसंयुतैः ।
प्रदक्षिणीकृता भूमिर्वायुमार्गानुसारिभिः ॥ २० ॥
|
त्याच्या आज्ञेच्या अधीन असलेले महाबली वानर पराक्रमी व शक्तिशाली आहेत.त्यांच्या गमनाची गति मनाच्या संकल्पाप्रमाणे तीव्र आहे. त्यांच्या गतिला अष्टदिशा वा वर अथवा खाली असा कोणताच प्रत्यवाय नाही. ते सर्व अमिततेजस्वी वानर कितीही मोठं कार्य असलं तरी त्यामुळे दडपून जात नाहीत वा हताश होत नाहीत. वायुप्रमाणे गति असलेल्या त्या वानरांनी अनेकवेळा या पृथ्वीची प्रदक्षिणाही केली आहे. ॥ १८-२० ॥
|
मद्विशिष्टाश्च तुल्याश्च सन्ति तत्र वनौकसः ।
मत्तः प्रत्यवरः कश्चिन्नास्ति सुग्रीवसंनिधौ ॥ २१ ॥
अहं तावदिह प्राप्तः किं पुनस्ते महाबलाः ।
न हि प्रकृष्टाः प्रेष्यन्ते प्रेष्यन्ते हीतरे जनाः ॥ २२ ॥
|
सुग्रीवाच्या सैन्यान्तील सर्व वानर माझ्याइतकेच वा काही काही तर माझ्यापेक्षाही वरचढ शक्तिशाली वानर आहेत. असा कोणीही वानर नाही जो तुलनेत कोणत्याही प्रकारे माझ्यापेक्षा कमी दर्जाचा आहे. ज्याअर्थी मी इथे येऊ शकलो त्याअर्थी महाबली वानर येथे कसे येऊ शकतील असा सन्देह करण्याचे कारण काय ? तुला ठाऊकच आहे ना की कनिष्ठ श्रेणीच्या लोकांनाच दूत किंवा निरोप्या म्हणून पाठविले जाते. उच्च श्रेणीच्या बुद्धिमान व बलवान लोकांची अशा कामासाठी कधी योजना केली जात नाही. ॥ २१-२२ ॥
|
तदलं परितापेन देवि मन्युरपैतु ते ।
एकोत्पातेन वै लङ्कामेष्यन्ति हरियूथपाः ॥ २३ ॥
|
तेव्हां आता दुःख-शोक करणे बाजूला सार, कारण चिन्ता करण्याचे आता काहीएक कारण नाही. ते वानरयूथपती एका उड्डाणातच लंकेत येऊन पोहोंचतील. ॥ २३ ॥
|
मम पृष्ठगतौ तौ च चन्द्रसूर्याविवोदितौ ।
त्वत्सकाशं महाभागे नृसिंहावागमिष्यतः ॥ २४ ॥
|
हे महाभागे, उदयाचलावर उदित होणार्या चन्द्रसूर्याप्रमाणे पुरुषसिंह श्रीराम आणि लक्ष्मण माझ्या पाठीवर बसून शीघ्रच तुझ्यापाशी येतील. ॥ २४ ॥
|
अरिघ्नं सिंहसङ्काशं क्षिप्रं द्रक्ष्यसि राघवम् ।
लक्ष्मणं च धनुष्मन्तं लङ्काद्वारमुपस्थितम् ॥ २५ ॥
|
लवकरच तू पाहशील की, सिंहासमान पराक्रमी व शत्रुनाशक श्रीराम तसेच लक्ष्मण हातान्त घेऊन लंकेच्या द्वारापाशी पोहोंचले आहेत. ॥ २५ ॥
|
नखदंष्ट्रायुधान् वीरान् सिंहशार्दूलविक्रमान् ।
वानरान् वारणेन्द्राभान् क्षिप्रं द्रक्ष्यसि सङ्गतान् ॥ २६ ॥
|
नखे व दाढा हीच ज्यांची मुख्य आयुधे आहेत, ज्यांची आकृति मोठमोठ्या गजराजाप्रमाणे विशाल आहे, जे वाघसिंहाप्रमाणे अतुल पराक्रमी आहेत, असे वीर वानर शीघ्रच तू लंकेत जमा झालेले पाहशील. ॥ २६ ॥
|
शैलाम्बुदनिकाशानां लङ्कामलयसानुषु ।
नर्दतां कपिमुख्यानां नचिराच्छ्रोष्यसि स्वनम् ॥ २७ ॥
|
लंकेमधील मलय पर्वताच्या शिखरांवर मेघांसारखे विशालकाय प्रमुख प्रमुख वानर येऊन त्यांनी केलेल्या मोठमोठ्या गर्जना तू लवकरच ऐकशील. ॥ २७ ॥
|
निवृत्तवनवासं च त्वया सार्धमरिन्दमम् ।
अभिषिक्तमयोध्यायां क्षिप्रं द्रक्ष्यसि राघवम् ॥ २८ ॥
|
तुला लवकरच हे पाहण्याचं भाग्य लाभेल की, शत्रुचे दमन करणारे श्रीराम वनवासाचा कालावधी पुरा करून तुझ्यासह अयोध्येला परत गेले आहेत आणि त्यांचा राज्याभिषेक झाला आहे. ॥ २८ ॥
|
ततो मया वाग्भिरदीनभाषिणी
शिवाभिरिष्टाभिरभिप्रसादिता ।
उवाह शान्तिं मम मैथिलात्मजा
तवापि शोकेन तथाभिपीडिता ॥ २९ ॥
|
तुमच्या शोकाने पीडित झाल्यामुळी दीन अवस्थेतील मिथिलेशकुमारीला जेव्हां मी अशी प्रिय व मंगल वचने ऐकवून तिचे सान्त्वन केले तेव्हां तिचा मनाला काहीशी शान्तता लाभली. ॥ २९ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे श्रीमद् वाल्मीकीये आदिकाव्ये चतुर्विंशत्सहस्रिकायां संहितायां सुन्दरकाण्डे अष्टषष्टितमः सर्गः ॥ ६८ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा अडुसष्टावा सर्ग पूरा झाला.॥ ६८ ॥
|