कौसल्याया विलापः सुमन्त्रेण तस्या आश्वासनं च -
|
कौसल्येचा विलाप आणि सारथि सुमंत्रांनी तिला समजावणे -
|
ततो भूतोपसृष्टेव वेपमाना पुनः पुनः ।
धरण्यां गतसत्त्वेव कौसल्या सूतमब्रवीत् ॥ १ ॥
|
त्यानंतर जणु काही तिच्यामध्ये भूताचा संचार झालेला असावा त्याप्रकारे कौसल्या देवी वारंवार थरथर कापू लागली आणि निश्चेष्ट होऊन जमिनीवर पडली. त्याच अवस्थेत ती सुमंत्रास म्हणाली- ॥ १ ॥
|
नय मां यत्र काकुत्स्थः सीता यत्र च लक्ष्मणः ।
तान् विना क्षणमप्यद्य जीवितुं नोत्सहे ह्यहम् ॥ २ ॥
|
’सुमंत्र ! जेथे काकुत्स्थ (राम), जेथे सीता आणि लक्ष्मण आहेत तेथे मला पोहोचवा. त्यांच्या शिवाय आता मी एक क्षणही जिवंत राहू शकत नाहीं. ॥२॥
|
निवर्तय रथं शीघ्रं दण्डकान् नय मामपि ।
अथ तान् नानुगच्छामि गमिष्यामि यमक्षयम् ॥ ३ ॥
|
तात्काळ रथ परत आणा आणि मलाही दण्डकारण्यात घेऊन चला. जर मी त्यांच्या जवळ जाऊ शकले नाही तर मी यमलोकाची यात्रा करीन.’ ॥३॥
|
बाष्पवेगोपहतया स वाचा सज्जमानया ।
इदमाश्वासयन् देवीं सूतः प्राञ्जलिरब्रवीत् ॥ ४ ॥
|
देवी कौसल्येचे बोलणे ऐकून सारथि सुमंत्रांनी हात जोडून तिला समजावित अश्रुनी अवरूद्ध झालेल्या गदगद वाणी मध्ये म्हटले- ॥४॥
|
त्यज शोकं मोहं च संभ्रमं दुःखजं तथा ।
व्यवधूय च संतापं वने वत्स्यति राघवः ॥ ५ ॥
|
’महाराणी ! हा शोक, मोह आणि दुःखजनित व्याकुळता सोडून द्या. या समयी सर्व संताप विसरून राघव वनात निवास करीत आहेत. ॥५॥
|
लक्ष्मणश्चापि रामस्य पादौ परिचरन् वने ।
आराधयति धर्मज्ञः परलोकं जितेन्द्रियः ॥ ६ ॥
|
’धर्मज्ञ आणि जितेन्द्रिय लक्ष्मणही त्या वनात रामांच्या चरणांची सेवा करीत आपले पारलौकिक कल्याण साधत आहेत. ॥६॥
|
विजनेऽपि वने सीता वासं प्राप्य गृहेष्विव ।
विस्रम्भं लभतेऽभीता रामे विन्यस्तमानसा ॥ ७ ॥
|
’सीतेचे मन भगवान श्रीरामांच्या ठिकाणी जडलेले आहे म्हणून निर्जन वनांत राहात असतांही तिला घरच्याप्रमाणे प्रेम आणि प्रसन्नता प्राप्त होत आहे आणि ती निर्भय राहात आहे. ॥७॥
|
नास्या दैन्यं कृतं किञ्चित् सुसूक्ष्ममपि लक्ष्यते ।
उचितेव प्रवासानां वैदेही प्रतिभाति मे ॥ ८ ॥
|
’वनात राहाण्यामुळे तिच्या मनांत जरा सुद्धा दुःख झालेले दिसून येत नाही. मला तर असे वाटत आहे की वैदेहीला परदेश राहण्याचा अभ्यास पूर्वी पासूनच आहे की काय ? ॥८॥
|
नगरोपवनं गत्वा यथा स्म रमते पुरा ।
तथैव रमते सीता निर्जनेषु वनेष्वपि ॥ ९ ॥
|
’ज्याप्रमाणे येथे नगरांतील उपवनात जाऊन ती पूर्वी हिंडत असे, त्याच प्रकारे निर्जन वनांतही सीता आनंदाने हिंडत आहे. ॥९॥
|
बालेव रमते सीता बालचन्द्रनिभानना ।
रामारामे ह्यदीनात्मा विजनेऽपि वने सती ॥ १० ॥
|
’पूर्णचंद्राप्रमाणे मनोहर मुख असणारी रमणी- शिरोमणी उदार हृदय असणारी सती-साध्वी सीता त्या निर्जन वनांत ही श्रीरामांच्या जवळ बालिकेप्रमाणे खेळत आहे आणि प्रसन्न राहात आहे. ॥१०॥
|
तद्गतं हृदयं यस्यास्तदधीनं च जीवितम् ।
अयोध्यापि भवेदस्या रामहीना तथा वनम् ॥ ११ ॥
|
’तिचे हृदय श्रीरामाच्या ठिकाणी जडलेले आहे. तिचे जीवनही रामांच्या अधीन आहे म्हणून रामाशिवाय अयोध्याही तिला वनाप्रमाणे होईल (आणि रामा बरोबर राहिली असताही ती अयोध्ये प्रमाणे सुखाचा अनुभव करेल.) ॥११॥
|
परिपृच्छति वैदेही ग्रामांश्च नगराणि च ।
गतिं दृष्ट्वा नदीनां च पादपान् विविधानपि ॥ १२ ॥
|
’वाटेत लागणार्या गावांसंबंधी, नगरांसंबंधी, नद्यांच्या प्रवाहासंबंधी आणि नाना वृक्षासंबंधी वैदेही त्यांचा परिचय करून देण्यास सांगत आहे. ॥१२॥
|
रामं वा लक्ष्मणं वापि पृष्ट्वा जानाति जानकी ।
अयोध्या क्रोशमात्रे तु विहारमिव साश्रिता ॥ १३ ॥
|
’राम आणि लक्ष्मण यांना आपल्याजवळ पाहून जानकीला आपण अयोध्येपासून एक कोस अंतरावर जणु काय हिंडायला- फिरायला आलो आहे असेच वाटत आहे. ॥१३॥
|
इदमेव स्मराम्यस्याः सहसैवोपजल्पितम् ।
कैकेयीसंश्रितं जल्पं नेदानीं प्रतिभाति माम् ॥ १४ ॥
|
’सीतेसंबंधी एवढ्याच गोष्टी मला आठवत आहेत. तिने कैकेयीला उद्देशून एकाएकी काही बोललेले या समयी मला ते मुळीच आठवत नाही आहे.’ ॥१४॥
|
ध्वंसयित्वा तु तद् वाक्यं प्रमादात् पर्युपस्थितम् ।
ह्लादनं वचनं सूतो देव्या मधुरमब्रवीत् ॥ १५ ॥
|
याप्रमाणे चुकून कैकेयीविषयक तोंडात आलेले वचन पालटून सारथि सुमंत्रांनी देवी कौसल्येच्या हृदयाला आल्हाद प्रदान करणारे मधुर वचन सांगितले- ॥१५॥
|
अध्वना वातवेगेन सम्भ्रमेणातपेन च ।
न विगच्छति वैदेह्याश्चन्द्रांशुसदृशी प्रभा ॥ १६ ॥
|
’मार्गात चालण्याने येणारा थकवा, वार्याचा वेग, भयदायक वस्तु दिसल्याने वाटणारी भीति आणि ऊन यांनीही वैदेहीची चंद्रकिरणांप्रमाणे कमनीय कान्ती तिच्यापासून दूर होत नाही. ॥१६॥
|
सदृशं शतपत्रस्य पूर्णचन्द्रोपमप्रभम् ।
वदनं तद् वदान्याया वैदेह्या न विकम्पते ॥ १७ ॥
|
’उदार हृदयी सीतेचे विकसित कमलाप्रमाणे सुंदर आणि पूर्ण चंद्रम्याप्रमाणे आनंददायक कांतिने युक्त मुख कधी मलीन होत नाही. ॥१७॥
|
अलक्तरसरक्ताभावलक्तरसवर्जितौ ।
अद्यापि चरणौ तस्याः पद्मकोशसमप्रभौ ॥ १८ ॥
|
’ज्यांना अळित्याच्या रंग लागत नाही आहे ते सीतेचे दोन्ही चरण आजही अळित्या प्रमाणेच लाल आणि कमलकोशाप्रमाणे कान्तिमान आहेत. ॥१८॥
|
नूपुरोत्कृष्टलीलेव खेलं गच्छति भामिनी ।
इदानीमपि वैदेही तद्रागान्यस्तभूषणा ॥ १९ ॥
|
’श्रीरामांच्या प्रति अनुरागामुळे, त्यांच्या प्रसन्नतेसाठी जिने आभूषणांचा त्याग केलेला नाही, ती वैदेही, भामिनी सीता या समयीही आपल्या नूपुरांच्या झंकाराने हंसांच्या कलरवांचा जणु तिरस्कार करीत लीलाविलास युक्त गतिने चालत आहे. ॥१९॥
|
गजं वा वीक्ष्य सिंहं वा व्याघ्रं वा वनमाश्रिता ।
नाहारयति संत्रासं बाहू रामस्य संश्रिता ॥ २० ॥
|
’ती श्रीरामांच्या बाहुबलाचा भरवसा धरून वनात राहात आहे आणि हत्ती, वाघ अथवा सिंहांना पाहूनही कधी भयभीत होत नाही. ॥२०॥
|
न शोच्यास्ते न चात्मा ते शोच्यो नापि जनाधिपः ।
इदं हि चरितं लोके प्रतिष्ठास्यति शाश्वतम् ॥ २१ ॥
|
’म्हणून आपण श्रीराम, लक्ष्मण अथवा सीतेसाठी शोक करू नका आणि आपली आणि महाराजांची ही चिंता सोडून द्या. श्रीरामांचे हे पावन चरित्र संसारात सदाच स्थिर राहिल. ॥२१॥
|
विधूय शोकं परिहृष्टमानसा
महर्षियाते पथि सुव्यवस्थिताः ।
वने रता वन्यफलाशनाः पितुः
शुभां प्रतिज्ञां परिपालयन्ति ते ॥ २२ ॥
|
’ती तिघेही शोक सोडून प्रसन्नचित्त होऊन महर्षिंच्या मार्गावर दृढतापूर्वक स्थित आहेत आणि वनात राहून फलमूलांचे भोजन करीत पित्याच्या उत्तम प्रतिज्ञेचे पालन करीत आहेत.’ ॥२२॥
|
तथापि सूतेन सुयुक्तवादिना
निवार्यमाणा सुतशोककर्शिता ।
न चैव देवी विरराम कूजितात्
प्रियेति पुत्रेति च राघवेति च ॥ २३ ॥
|
याप्रकारे युक्ति युक्त वचन बोलून सारथि सुमंत्रांनी पुत्र शोकाने पीडीत झालेल्या कौसल्येला चिंता करण्यापासून आणि रडण्यापासून रोखले, तरीही देवी कौसल्या विलाप करण्यापासून विरत झाली नाही. ती ’हा प्रिय पुत्रा !’ आणि ’हा राघव !’ याचा घोष करीत करुण क्रंदन करीतच रहिली. ॥२३॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे षष्टितमः सर्गः ॥ ६० ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा साठावा सर्ग पूरा झाला. ॥६०॥
|