सीतायाः सदुःख वचनं, श्रीरामं प्रति तस्याः संदेशो, लक्ष्मणस्य गमनं, सीताया विलापश्च -
|
सीतेचे दुःखपूर्ण वचन, श्रीरामांसाठी तिचा संदेश, लक्ष्मणांचे जाणे आणि सीतेचे रूदन -
|
लक्ष्मणस्य वचः श्रुत्वा दारुणं जनकात्मजा । परं विषादमागम्य वैदेही निपपात ह ॥ १ ॥
|
लक्ष्मणांचे हे कठोर वचन ऐकून जनकात्मजा सीतेला फार दुःख झाले. ती मूर्छित होऊन पृथ्वीवर पडली. ॥१॥
|
सा मुहूर्तमिवासञ्ज्ञा बाष्पपर्याकुलेक्षणा । लक्ष्मणं दीनया वाचा उवाच जनकात्मजा ॥ २ ॥
|
एक मुहूर्तपर्यंत ती भानावर आली नाही. तिच्या नेत्रातून अश्रुंची अजस्त्र धार वहात होती. नंतर शुद्धिवर आल्यावर जनकात्मजा दीनवाणीने लक्ष्मणांना म्हणाली - ॥२॥
|
मामिकेयं तनुर्नूनं सृष्टा दुःखाय लक्ष्मण । धात्रा यस्यास्तथा मेऽद्य दुःखमूर्तिः प्रदृश्यते ॥ ३ ॥
|
लक्ष्मणा ! निश्चितच विधात्याने माझ्या शरीराला केवळ दुःख भोगण्यासाठीच रचले आहे. म्हणूनच आज सार्या दुःखांचा समूहच मूर्तिमंत होऊन मला दर्शन देत आहे. ॥३॥
|
किं नु पापं कृतं पूर्वं को वा दारैर्वियोजितः । याऽहं शुद्धसमाचारा त्यक्ता नृपतिना सती ॥ ४ ॥
|
माझ्या पूर्वजन्मात मी कोणते असे पाप केले होते अथवा कुणाचा स्त्रीपासून विरह घडवून आणला होता, ज्यामुळे शुद्ध आचरणाची असूनही महाराजांनी माझा त्याग केला आहे. ॥४॥
|
पुराऽहमाश्रमे वासं रामपादानुवर्तिनी । अनुरुध्यापि सौमित्रे दुःखे च परिवर्तिनी ॥ ५ ॥
|
सौमित्रा ! प्रथम मी वनवासाच्या दुःखात पडूनही ते सहन करून श्रीरामांच्या चरणांचे अनुसरण करीत आश्रमात राहाणे पसंत केले होते. ॥५॥
|
सा कथं ह्याश्रमे सौम्य वत्स्यामि विजनीकृता । आख्यास्यामि च कस्याहं दुःखं दुःखपरायणा ॥ ६ ॥
|
परंतु सौम्या ! आता मी एकटी प्रियजनांविरहित होऊन कशा प्रकारे आश्रमात निवास करूं ? आणि दुःखात पडल्यावर कुणाला आपले दुःख सांगू ? ॥६॥
|
किं नु वक्ष्यामि मुनिषु कर्म चासत्कृतं प्रभो । कस्मिंश्चित् कारणे त्यक्ता राघवेण महात्मना ॥ ७ ॥
|
प्रभो ! जर मुनिजनांनी विचारले की महात्मा राघवांनी कुठल्या अपराधामुळे तुझा त्याग केला आहे तर मी त्यांना आपला कोणता अपराध सांगू ? ॥७॥
|
न खल्वद्यैव सौमित्रे जीवितं जाह्नवीजले । त्यजेयं राजवंशस्तु भर्तुर्मे परिहास्यते ॥ ८ ॥
|
सौमित्र ! मी आपले जीवन आत्ताच गंगेच्या जलामध्ये विसर्जन केले असते, परंतु या समयी असे मी करू शकणार नाही कारण की असे करण्याने माझ्या पतिदेवांचा राजवंश नष्ट होऊन जाईल. ॥८॥
|
यथाज्ञं कुरु सोमित्रे त्यज मां दुःखभागिनीम् । निदेशे स्थीयतां राज्ञः शृणु चेदं वचो मम ॥ ९ ॥
|
परंतु सौमित्र ! तू तर तेच कर की जशी महाराजांनी तुला आज्ञा दिली आहे. तू मला दुःखितेला येथे सोडून महाराजांच्या आज्ञेचे पालन करण्यात स्थिर रहा आणि माझे हे वचन ऐक - ॥९॥
|
श्वश्रूणामविशेषेण प्राञ्जलिप्रग्रहेण च । शिरसा वन्द्य चरणौ कुशलं ब्रूहि पार्थिवम् ॥ १० ॥
|
माझ्या सर्व सासवांना समानरूपाने हात जोडून माझ्या वतीने त्यांच्या चरणी प्रणाम करावा. तसेच महाराजांच्याही चरणी मस्तक नमवून माझ्या वतीने त्यांचे कुशल विचारावे. ॥१०॥
|
शिरसाऽभिनतो ब्रूयाः सर्वासामेव लक्ष्मण । वक्तव्यश्चापि नृपतिः धर्मेषु सुसमाहितः ॥ ११ ॥
|
लक्ष्मणा ! तू अंतःपुरातील सर्व वंदनीय स्त्रियांना माझ्या वतीने प्रणाम करून माझा समाचार त्यांना ऐकवावा. तसेच जे सदा धर्मपालनात सावधान राहातात त्या महाराजांनाही माझा हा संदेश ऐकवावा. ॥११॥
|
जानासि च यथा शुद्धा सीता तत्त्वेन राघव । भक्त्या च परया युक्ता हिता च तव नित्यशः ॥ १२ ॥
|
राघवा ! वास्तविक तर आपण जाणत आहात की सीता शुद्धचरित्रा आहे. सर्वदाच आपल्या हितामध्ये तत्पर रहात असते आणि आपल्या प्रति परम प्रेमभक्ति बाळगणारी आहे. ॥१२॥
|
अहं त्यक्ता च ते वीर अयशोभीरुणा जने । यच्च ते वचनीयं स्याद् अपवादः समुत्थितम् ॥ १३ ॥
मया च परिहर्तव्यं त्वं हि मे परमा गतिः ।
|
वीरा ! आपण अपयशास घाबरूनच माझा त्याग केला आहे, म्हणून लोकांमध्ये आपली जी निन्दा होत आहे अथवा माझ्यामुळे जो अपवाद पसरत आहे त्याला दूर करणे माझेही कर्तव्य आहे कारण की माझे परम आश्रय आपणच आहात. ॥१३ १/२॥
|
वक्तव्यश्चेति नृपतिः धमेण सुसमाहितः ॥ १४ ॥ यथा भ्रातृषु वर्तेथाः तथा पौरेषु नित्यदा । परमो ह्येष धर्मस्ते तस्मात् कीर्तिरनुत्तमा ॥ १५ ॥
|
लक्ष्मणा ! तू महाराजांना सांग की आपण धर्मपूर्वक अत्यंत सावधान राहून पुरवासी लोकांबरोबर तसेच आचरण करावे जसे आपल्या भावांबरोबर करत असता. हाच आपला परम धर्म आहे आणि यामुळेच आपल्याला परम उत्तम यशाची प्राप्ति होऊ शकते. ॥१४-१५॥
|
यत्तु पौरजनो राजन् धर्मेण समवाप्नुयात् । अहं तु नानुशोचामि स्वशरीरं नरर्षभ ॥ १६ ॥
|
राजन् ! पुरवासींच्या प्रति धर्मानुकूल आचरण करण्याने जे पुण्य प्राप्त होईल तेच आपल्यासाठी उत्तम धर्म आणि कीर्ती आहे. पुरूषोत्तम ! मला माझ्या शरीराची काहीही चिंता नाही आहे. ॥१६॥
|
यथापवादं पौराणां तथैव रघुनन्दन । पतिर्हि देवता नार्याः पतिर्बन्धुः पतिर्गुरुः ॥ १७ ॥ प्राणैरपि प्रियं तस्माद् भर्तुः कार्यं विशेषतः ।
|
रघुनंदना ! ज्या प्रकारे पुरवासी लोकांच्या अपवादापासून वाचून राहू शकाल त्याप्रकारे आपण राहावे. स्त्रीसाठी तर पतिच देवता आहे, पतिच बंधु आहे, पतिच गुरू आहे. म्हणून तिने प्राण समर्पण करूनही विशेषरूपाने पतिचे प्रिय केले पाहिजे. ॥१७ १/२॥
|
इति मद्वचनाद् रामो वक्तव्यो मम सङ्ग्रहः ॥ १८ ॥ निरीक्ष्य माऽद्य गच्छ त्वं ऋतुकालातिवर्तिनीम् ।
|
माझ्या वतीने या सर्व गोष्टी तू श्रीरामांना सांग आणि आज तू सुद्धा मला पाहून जा . मी यासमयी ऋतुकालाचे उल्लंघन करून गर्भवती होऊन चुकले आहे. ॥१८ १/२॥
|
एवं ब्रुवन्त्यां सीतायां लक्ष्मणो दीनचेतनः ॥ १९ ॥ शिरसा वन्द्य धरणीं व्याहर्तुं न शशाक ह ।
|
सीतेने याप्रकारे म्हटल्यावर लक्ष्मणाचे मन अत्यंत दुःखी झाले. त्याने जमिनीवर मस्तक टेकवून प्रणाम केला. त्या समयी त्यांच्या मुखांतून काहीही गोष्ट बाहेर निघू शकली नाही. ॥१९ १/२॥
|
प्रदक्षिणं च तां कृत्वा रुदन्नेव महास्वनः ॥ २० ॥ ध्यात्वा मुहूर्तं तामाह किं मां वक्ष्यसि शोभने ।
|
त्याने मोठमोठ्याने रडतच सीता मातेची परिक्रमा केली आणि एक मुहूर्तपर्यंत विचार करून तिला म्हटले - शोभने ! आपण मला हे काय सांगत आहा ? ॥२० १/२॥
|
दृष्टपूर्वं न ते रूपं पादौ दृष्टौ तवानघे ॥ २१ ॥ कथमत्र हि पश्यामि रामेण रहितां वने ।
|
निष्पाप पतिव्रते ! मी पूर्वीही आपले संपूर्ण रूप कधी पाहिलेले नाही. केवळ आपल्या चरणांचेच दर्शन केलेले आहे. मग आज येथे वनामध्ये श्रीरामचंद्रांच्या अनुपस्थितीमध्ये मी आपल्याकडे कसे पाहू शकेन ? ॥२१ १/२॥
|
इत्युक्त्वा तां नमस्कृत्य पुनर्नावमुपारुहत् ॥ २२ ॥ आरुह्य च पुनर्नावं नाविकं चाभ्यचोदयत् ।
|
असे म्हणून त्यांनी सीतेला पुन्हा प्रणाम केला आणि नंतर ते नावेवर चढून गेले. नावेवर चढून त्यांनी नाविकास तिला चालविण्याची आज्ञा दिली. ॥२२ १/२॥
|
स गत्वा चोत्तरं तीरं शोकभारसमन्वितः ॥ २३ ॥ सम्मूढ इव दुःखेन रथमध्यारुहद् द्रुतम् ।
|
शोकाच्या भाराने दबलेले लक्ष्मण गंगेच्या उत्तरेकडील तटावर पोहोचून दुःखाने अचेतसे झाले आणि त्याच अवस्थेत घाईने रथावर चढले. ॥२३ १/२॥
|
मुहुर्मुहुः परावृत्य दृष्ट्वा सीतामनाथवत् ॥ २४ ॥ चेष्टन्तीं परतीरस्थां लक्ष्मणः प्रययावथ ।
|
सीता गंगेच्या दुसर्या तटावर अनाथाप्रमाणे रडत धरतीवर लोळत पडली होती. लक्ष्मण वारंवार तोंड वळवून तिच्याकडे पहात निघून गेले. ॥२४ १/२॥
|
दूरस्थं रथमालोक्य लक्ष्मणं च मुहूर्मुहुः । निरीक्षमाणां तूद्विग्नां सीतां शोकः समाविशत् ॥ २५ ॥
|
रथ आणि लक्ष्मण क्रमशः दूर निघून गेले. सीता त्यांच्याकडे वारंवार पहात उद्विग्न झाली. ते अदृश्य होतांच तिच्यावर शोकाची गडद छाया पसरली. ॥२५॥
|
सा दुःखभारावनता यशस्विनी यशोधना नाथमपश्यती सती । रुरोद सा बर्हिणनादिते वने महास्वनं दुःखपरायणा सती ॥ २६ ॥
|
आता तिलाही कोणी आपला रक्षक दिसून येईना. म्हणून यश धारण करणारी ती यशस्विनी सती सीता दुःखाच्या भारी भाराने दबून चिंतामग्न होऊन मयूरांच्या कलनादाने गुंजणार्या त्या वनात जोरजोराने रडू लागली. ॥२६॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डेऽष्टचत्वारिंशः सर्गः ॥ ४८ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा अठ्ठेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४८॥
|