श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। अष्टमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

पुत्रकामस्य राज्ञोऽश्वमेधाय प्रस्तावो मन्त्रिभिर्ब्राह्मणैश्च तस्यानुमोदनम् - राजाचा पुत्रासाठी अश्वमेध यज्ञ करण्याचा प्रस्ताव आणि मंत्र्यांकडून आणि ब्राह्मणांच्या द्वारा त्याचे अनुमोदन -
तस्य चैवंप्रभावस्य धर्मज्ञस्य महात्मनः ।
सुतार्थं तप्यमानस्य नासीत् वंशकरः सुतः ॥ १ ॥
धर्माच्या सर्व अंगांची व्यवस्थित जाण असणारे महात्मा राजा दशरथ असे प्रभावशाली असूनही पुत्रासाठी सदा चिंतीत राहात असत. त्यांचा वंश चालविण्यासाठी त्यांना एकही पुत्र नव्हता. ॥ १ ॥
चिंतयानस्य तस्यैवं बुद्धिरासीन्महात्मनः ।
सुतार्थं वाजिमेधेन किमर्थं न यजाम्यहम् ॥ २ ॥
त्याविषयी चिंता करता करता एक दिवस त्या महामनस्वी नरेशाच्या मनात असा विचार आला की मी पुत्रप्राप्तिसाठी अश्वमेध यज्ञाचे अनुष्ठान का करू नये ? ॥ २ ॥
स निश्चितां मतिं कृत्वा यष्टव्यमिति बुद्धिमान् ।
मंत्रिभिः सह धर्मात्मा सर्वैरेव कृतात्मभिः ॥ ३ ॥

ततोऽब्रवीन्महातेजाः सुमंत्रं मंत्रिसत्तमम् ।
शीघ्रमानय मे सर्वान् गुरूंस्तान् सपुरोहितान् ॥ ४ ॥
आपल्या समस्त शुद्ध बुद्धी असणार्‍या मंत्र्यांशी परामर्शपूर्वक यज्ञ करण्याचाच विचार निश्चित करून त्या महातेजस्वी, बुद्धिमान, आणि धर्मात्मा राजाने सुमंत्र्यास म्हटले - "मंत्रीवर ! तुम्ही माझ्या समस्त गुरुजनांना आणि पुरोहितांना येथे शीघ्र बोलावून आणा. ॥ ३-४ ॥
ततः सुमंत्रस्त्वरितं गत्वा त्वरितविक्रमः ।
समानयत् स तान् सर्वान् समस्तान् वेदपारगान् ॥ ५ ॥
तेव्हा शीघ्रतापूर्वक पराक्रम प्रकट करणार्‍या सुमंत्राने ताबडतोब जाऊन त्या समस्त वेदविद्या पारंगत मुनिंना तेथे बोलावून आणले. ॥ ५ ॥
सुयज्ञं वामदेवं च जाबालिमथ काश्यपम् ।
पुरोहितं वसिष्ठं च ये चाप्यन्ये द्विजसत्तमाः ॥ ६ ॥

तान् पूजयित्वा धर्मात्मा राजा दशरथस्तदा ।
इदं धर्मार्थसहितं वाक्यं श्लक्ष्णं वचनमब्रवीत् ॥ ७ ॥
सुयज्ञ, वामदेव, जाबालि, काश्यप, कुलपुरोहित वसिष्ठ तसेच आणखीही जे श्रेष्ठ ब्राह्मण होते, त्या सर्वांची पूजा करून धर्मात्मा राजा दशरथ धर्म आणि अर्थाने युक्त असे मधुर वचन बोलले. ॥ ६-७ ॥
मम लालप्यमानस्य सुतार्थं नास्ति वै सुखम् ।
तदर्थं हयमेधेन यक्ष्यामीति मतिर्मम ॥ ८ ॥
'महर्षिंनो ! मी सदा पुत्रासाठी विलाप करत राहिलो आहे. पुत्राशिवाय हे एवढे राज्य असूनही मला सुख मिळत नाही. म्हणून मी हा निश्चय केला आहे की, मी पुत्र प्राप्तीसाठी अश्वमेधद्वारा भगवंताचे यजन करावे. ॥ ८ ॥
तदहं यष्टुमिच्छामि शास्त्रदृष्टेन कर्मणा ।
कथं प्राप्स्याम्यहं कामं बुद्धिरत्र विच्न्त्यताम् ॥ ९ ॥
माझी अशी इच्छा आहे - शास्त्रोक्त विधिने या यज्ञाचे अनुष्ठान करावे. म्हणून कुठल्या प्रकारे मनोवांछित वस्तु प्राप्त होईल, याचा विचार आपण सर्वांनी करावा. ॥ ९ ॥
ततः साध्विति तद्वाक्यं ब्राह्मणाः प्रत्यपूजयन् ।
वसिष्ठप्रमुखाः सर्वे पार्थिवस्य मुखेरितम् ॥ १० ॥
राजाने असे म्हटल्यावर वसिष्ठ आदि सर्व ब्राह्मणांनी 'साधु' 'साधु' (उत्तम, उत्तम) असे म्हणत एक मुखाने पूर्वी जे वचन (प्रस्ताव) उच्चारले होते त्याची प्रशंसा केली. ॥ १० ॥
ऊचुश्च परमप्रीताः सर्वे दशरथं वचः ।
सम्भाराः सम्भ्रियन्तां ते तुरगश्च विमुच्यताम् ॥ ११ ॥

सरय्वाश्चोत्तरे तीरे यज्ञभूमिर्विधीयताम् ।
सर्वथा प्राप्स्यसे पुत्रान् अभिप्रेतांश्च पार्थिव ॥ १२ ॥

यस्य ते धार्मिकी बुद्धिरियं पुत्रार्थमागता ।
नंतर अत्यंत प्रसन्न होऊन ते सर्व राजा दशरथास म्हणाले - "महाराज ! यज्ञ सामुग्रीचा संग्रह केला जावा. भूमण्डलावर भ्रमण करण्यासाठी यज्ञसंबंधी अश्व सोडला जावा आणि शरयूच्या उत्तर तटावर यज्ञभूमिची निर्मिती केली जावी. तुम्ही यज्ञद्वारा सर्वथा आपल्या इच्छेस अनुरूप पुत्र प्राप्त करा. कारण की पुत्रासाठी तुमच्या हृदयात अशा धार्मिक बुद्धीचा उदय झाला आहे." ॥ ११-१२ १/२ ॥
ततः प्रीतोऽभवद् राजा श्रुत्वैतद् द्विजभाषितम् ॥ १३ ॥

अमात्यानब्रवीद् राजा हर्षव्याकुललोचनः ।
सम्भाराः सम्भ्रियन्तां मे गुरूणां वचनादिह ॥ १४ ॥

समर्थाधिष्ठितश्चाश्वः सोपाध्यायो विमुच्यताम् ।
सरय्वाश्चोत्तरे तीरे यज्ञभूमिर्विधीयताम् ॥ १५ ॥

शांतयश्चापि वर्धन्तां यथाकल्पं यथाविधि ।
शक्यः प्राप्तुमयं यज्ञः सर्वेणापि महीक्षिता ॥ १६ ॥

नापराधो भवेत् कष्टो यद्यस्मिन् क्रतुसत्तमे ।
छिद्रं हि मृगयन्ते स्म विद्वांसो ब्रह्मराक्षसाः ॥ १७ ॥
ब्राह्मणांचे हे कथन ऐकून राजा खूप संतुष्ट झाला. हर्षाने त्याचे नेत्र चंचल बनले. ते आपल्या मंत्र्यांना म्हणाले - "गुरुजनांच्या आज्ञेस अनुसरून यज्ञाची सामग्री येथे एकत्रित केली जावी. शक्तिशाली वीरांच्या संरक्षणाखाली उपाध्यायासहित अश्वाला सोडले जावे. शरयूच्या उत्तर तटावर यज्ञभूमीची निर्मिती केली जावी. शास्त्रोक्त विधिला अनुसरून क्रमशः शान्तिकर्माचा विस्तार केला जावा, ज्यायोगे विघ्नांचे निवारण होईल. जर या यज्ञात कष्टप्रद अपराध घडण्याचे भय असेल तर सर्व राजे याचे संपादन करू शकतात, परंतु असे होणे कठीण आहे. कारण विद्वान ब्रह्मराक्षस यज्ञात विघ्न आणण्यासाठी छिद्र (दोष) शोधत असतात. ॥ १३-१७ ॥
विधिहीनस्य यज्ञस्य सद्यः कर्ता विनश्यति ।
तद्यथा विधिपूर्वं मे क्रतुरेष समाप्यते ॥ १८ ॥

तथा विधानं क्रियतां समर्थाः साधनेष्विति ।
विधिहीन यज्ञाचे अनुष्ठान करणारा यजमान तात्काळ नष्ट होऊन जातो. म्हणून माझा हा यज्ञ ज्या प्रकारे विधिपूर्वक संपन्न होऊ शकेल अशीच व्यवस्था केली जावी. तुम्ही सर्व लोक असे साधन प्रस्तुत करण्यास समर्थ आहात." ॥ १८ १/२ ॥
तथेति चाब्रुवन् सर्वे मंत्रिणः प्रतिपूजिताः ॥ १९ ॥

पार्थिवेन्द्रस्य तद्वाक्यं यथापूर्वं निशम्य ते ।
राजाच्या द्वारा सन्मानित झालेले सर्व मंत्री त्यांचे वरील वचन ऐकून म्हणाले, "फारच छान. असेच होईल." ॥ १९ १/२ ॥
तथा द्विजास्ते धर्मज्ञा वर्द्धयन्तो नृपोत्तमम् ॥ २० ॥

अनुज्ञाताः ततः सर्वे पुनर्जग्मुर्यथागतम् ।
या प्रकारे ते सर्व धर्मज्ञ ब्राह्मणही नृपश्रेष्ठ दशरथाचे अभिनंदन करून त्यांची आज्ञा घेऊन परत गेले. ॥ २० १/२ ॥
विसर्जयित्वा तान् विप्रान् सचिवानिदमब्रवीत् ॥ २१ ॥

ऋत्विग्भिरुपसंदिष्टो यथावत् क्रतुराप्यताम् ।
त्या ब्राह्मणांना निरोप देऊन राजांनी मंत्र्यांना म्हटले - "पुरोहितांच्या उपदेशानुसार या यज्ञाला विधिवत पूर्ण केले पाहिजे." ॥ २१ १/२ ॥
इत्युक्त्वा नृपशार्दूलः सचिवान् समुपस्थितान् ॥ २२ ॥

विसर्जयित्वा स्वं वेश्म प्रविवेश महामतिः ।
तेथे उपस्थित असलेल्या मंत्र्यांशी अशा प्रकारे विचार विनिमय करून परम बुद्धिमान नृपश्रेष्ठ दशरथ, त्यांनाही निरोप देऊन आपल्या महालात निघून गेले. २२ १/२ ॥
ततः स गत्वा ताः पत्‍नीर्नरेन्द्रो हृदयंगमाः ॥ २३ ॥

उवाच दीक्षां विशत यक्ष्येऽहं सुतकारणात् ।
महालात जाऊन नरेशांनी आपल्या प्रिय पत्‍नींना म्हटले - "देवींनो ! दीक्षा ग्रहण करा. मी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करणार आहे." ॥ २३ १/२ ॥
तासां तेनातिकान्तेन वचनेन सुवर्चसाम् ।
मुखपद्मान्यशोभन्त पद्मानीव हिमात्यये ॥ २४ ॥
ते मनोहर वचन ऐकून त्या सुंदर कांति असलेल्या राण्यांची मुखकमले वसंत ऋतूत विकसित होणार्‍या कमळाप्रमाणे प्रफुल्लित होऊन अत्यंत शोभून दिसू लागली. ॥ २४ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे अष्टमस्सर्गः ॥ ८ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा आठवा सर्ग समाप्त झाला. ॥ ८ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP