श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। षष्ठः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राज्ञो दशरथस्य शासनकाले अयोध्यायास्तत्रत्यजनानां चोत्कृष्टस्थितेर्वर्णनम् - राजा दशरथाच्या शासन कालात अयोध्या आणि तेथील नागरीकांच्या उत्तम स्थितीचे वर्णन -
तस्यां पुर्यामयोध्यायां वेदवित् सर्वसङ्‍ग्रहः ।
दीर्घदर्शी महातेजाः पौरजानपदप्रियः ॥ १ ॥

इक्ष्वाकूणामतिरथो यज्वा धर्मरतो वशी ।
महर्षिकल्पो राजर्षित्रिषु लोकेषु विश्रुतः ॥ २ ॥

बलवान् निहतामित्रो मित्रवान् विजितेन्द्रियः ।
धनैश्च सन्चयैश्चान्यैः शक्रवैश्रवणोपमः ॥ ३ ॥

यथा मनुर्महातेजा लोकस्य परिरक्षिता ।
तथा दशरथो राजा लोकस्य परिरक्षिता ॥ ४ ॥
अयोध्यापुरीत राहून राजा दशरथ प्रजावर्गाचे उत्तम पालन करीत होते. ते दूरदर्शी आणि महान तेजस्वी होते. नगर आणि जनपदातील प्रजा त्यांच्यावर खूप प्रेम करीत असे. ते इक्ष्वाकु कुलाचे अतिरथी वीर होते. यज्ञ करणारे, धर्मपरायण आणि जितेंद्रिय होते. महर्षिंच्या प्रमाणे दिव्य गुण संपन्न राजर्षि होते. त्यांची तिन्ही लोकात ख्याति होती. ते बलवान, शत्रुरहित, मित्रांनी युक्त आणि इंद्रियविजयी होते. धन आणि अन्य वस्तूंच्या संचयाच्या दृष्टीने इंद्र आणि कुबेरासारखे वाटत होते. ज्या प्रमाणे महातेजस्वी प्रजापति मनु संपूर्ण जगताचे रक्षण करीत होते, त्याच प्रकारे महाराज दशरथही करत होते. ॥ १-४ ॥
तेन सत्याभिसन्धेन त्रिवर्गमनुतिष्ठता ।
पालिता सा पुरी श्रेष्ठा इन्द्रेणेवामरावती ॥ ५ ॥
धर्म, अर्थ, काम यांचे संपादन करणार्‍या कर्मांचे अनुष्ठान करत ते सत्यप्रतिज्ञ नरेश, इंद्र ज्याप्रमाणे अमरावतीचे पालन करतो त्याप्रमाणे त्या श्रेष्ठ अयोध्यापुरीचे पालन करीत होते. ॥ ५ ॥
तस्मिन् पुरवरे हृष्टा धर्मात्मानो बहुश्रुताः ।
नरास्तुष्टा धनैः स्वैः स्वैरलुब्धाः सत्यवादिनः ॥ ६ ॥
त्या उत्तम नगरात निवास करणारे सर्व लोक प्रसन्न, धर्मात्मे, बहुश्रुत, निर्लोभ, सत्यवादी आणि आपल्या आपल्या धनाने (कमाईने) संतुष्ट राहणारे होते. ॥ ६ ॥
नाल्पसन्निचयः कश्चिदासीत् तस्मिन् पुरोत्तमे ।
कुटुम्बी यो ह्यसिद्धार्थोऽगवाश्वधनधान्यवान् ॥ ७ ॥
या श्रेष्ठ पुरीत असा कोणीही कुटुंबीय नव्हता की ज्याच्याजवळ उत्कृष्ट वस्तुंचा संग्रह मोठ्या प्रमाणात नव्हता, वा ज्यांचे धर्म, अर्थ, आणि काममय पुरुषार्थ सिद्ध झालेले नव्ह्ते, की ज्यांच्याजवळ गाय, बैल, घोडे, धनधान्य आदिंचा अभाव होता. ॥ ७ ॥
कामी वा न कदर्यो वा नृशंसः पुरुषः क्वचित् ।
द्रष्टुं शक्यमयोध्यायां नाविद्वान् न च नास्तिकः ॥ ८ ॥
अयोध्येत कोठेही कोणी कामी, कृपण, क्रूर, मूर्ख आणि नास्तिक मनुष्य बघण्यास सुद्धा मिळत नव्हता. ॥ ८ ॥
सर्वे नराश्च नार्यश्च धर्मशीलाः सुसंयताः ।
उदिताः शीलवृत्ताभ्यां महर्षय इवामलाः ॥ ९ ॥
तेथील सर्व स्त्री-पुरुष धर्मशील, संयमी, सदा प्रसन्न राहणारे, आणि शील आणि सदाचाराच्या दृष्टीने महर्षिंच्या प्रमाणे निर्मल होते. ॥ ९ ॥
नाकुण्डली नामुकुटी नास्रग्वी नाल्पभोगवान् ।
नामृष्टो नानुलिप्ताङ्‍गो नासुगन्धश्च विद्यते ॥ १० ॥
तेथे कोणीही कुण्डल, मुकुट वा पुष्पहार रहित नव्हता. कुणाजवळही भोग सामुग्रीची कमतरता नव्हती. कुणीही असा नव्हता की जो स्नान करून शुचिर्भूत झालेला नाही, की ज्यांच्या अंगांना चंदनाचा लेप लावलेला नाही अथवा जो सुगंधापासून वंचित राहिला आहे. ॥ १० ॥
नामृष्टभोजी नादाता नाप्यनङ्‍गदनिष्कधृक् ।
नाहस्ताभरणो वापि दृश्यते नाप्यनात्मवान् ॥ ११ ॥
अपवित्र अन्नाचे भोजन करणारा, दान न देणारा आणि मनाला काबूत न ठेवणारा असा कुणीही मनुष्य तेथे दिसून येत नसे. एकही मनुष्य असा आढळत नसे की ज्याने बाजूबंद, निष्क (सोन्याचे पदक अथवा मोहोर) आणि हातातील आभूषणे (कडे इत्यादि) धारण केली नाहीत. ॥ ११ ॥
नानाहिताग्निर्नायज्वा न क्षुद्रो वा न तस्करः ।
कश्चिदासीदयोध्यायां न चार्वृत्तो न सङ्‍करः ॥ १२ ॥
अयोध्येत असा कुणीही नव्हता की जो अग्निहोत्र आणि यज्ञ करीत नाही, अथवा जो क्षुद्र, चोर, सदाचारशून्य अथवा वर्णसंकरयुक्त आहे. ॥ १२ ॥
स्वकर्मनिरता नित्यं ब्राह्मणा विजितेन्द्रियाः ।
दानाध्ययनशीलाश्च संयताश्च प्रतिग्रहे ॥ १३ ॥
तेथे निवास करणारे ब्राह्मण सदा आपल्या कर्मांत तत्पर असत. इंद्रियांना ताब्यात ठेवत, आणि दान अथवा स्वाध्याय करत राहून प्रतिग्रहापासून दूर राहात असत. ॥ १३ ॥
नास्तिको नानृती वापि न कश्चिदबहुश्रुतः ।
नासूयको न चाशक्तो नाविद्वान् विद्यते क्वचित् ॥ १४ ॥
तेथे कोणी एकही द्विज असा नव्हता की जो नास्तिक, असत्यवादी, अनेक शास्त्रांच्या ज्ञानापासून वंचित, दुसर्‍यांचे दोष शोधून काढणारा, सहन करण्यास असमर्थ आणि विद्याहीन असेल. ॥ १४ ॥
नाषडङ्‍गविदत्रास्ति नाव्रतो नासहस्रदः ।
न दीनः क्षिप्तचित्तो वा व्यथितो वापि कश्चन ॥ १५ ॥
त्या पुरीत, वेदांच्या सहा अंगांना न जाणणारा, व्रतहीन, सहस्राहून कमी दान देणारा, दीन, विक्षिप्तचित्त अथवा दुःखी असा एकही माणूस नव्हता. ॥ १५ ॥
कश्चिन्नरो वा नारी वा नाश्रीमान् नाप्यरूपवान् ।
द्रष्टुं शक्यमयोध्यायां नापि राजन्यभक्तिमान् ॥ १६ ॥
अयोध्येत श्रीहीन, रूपरहित तसेच राजभक्ति शून्य असा एकही पुरुष अथवा स्त्री दिसून येत नव्हती. ॥ १६ ॥
वर्णेष्वग्र्यचतुर्थेषु देवतातिथिपूजकाः ।
कृतज्ञाश्च वदान्याश्च शूरा विक्रमसंयुताः ॥ १७ ॥
ब्राह्मण आदि चारी वर्णांचे पुरुष देवता आणि अतिथींचे पूजक, कृतज्ञ, उदार, शूरवीर आणि पराक्रमी होते. ॥ १७ ॥
दीर्घायुषो नराः सर्वे धर्मं सत्यं च संश्रिताः ।
सहिताः पुत्रपौत्रैश्च नित्यं स्त्रीभिः पुरोत्तमे ॥ १८ ॥
त्या श्रेष्ठ नगरीत निवास करणारी सर्व माणसे दीर्घायु, तसेच धर्म आणि सत्याचा आश्रय करणारी होती. ते सर्व लोक स्त्री, पुत्र आणि पौत्र आदि परिवारासह सुखात राहात होती. ॥ १८ ॥
क्षत्रं ब्रह्ममुखं चासीद् वैश्याः क्षत्रमनुव्रताः ।
शूद्राः स्वकर्मनिरतास्त्रीन् वर्णानुपचारिणः ॥ १९ ॥
क्षत्रीय ब्राह्मण वर्गाच्या कलाने वागत असत, वैश्य क्षत्रियांच्या आज्ञेचे पालन करीत असत आणि शूद्र आपल्या कर्तव्याचे पालन करीत उपर्युक्त तिन्ही वर्णांच्या सेवेत संलग्न रहात असत. ॥ १९ ॥
सा तेनेक्ष्वाकुनाथेन पुरी सुपरिरक्षिता ।
यथा पुरस्तान्मनुना मानवेन्द्रेण धीमता ॥ २० ॥
बुद्धिमान महाराज मनुने पूर्वकाली जसे अयोध्येचे रक्षण केले होते त्याप्रमाणेच इक्ष्वाकु कुलाचे स्वामी राजा दशरथ अयोध्यापुरीचे रक्षण करीत होते. ॥ २० ॥
योधानामग्निकल्पानां पेशलानाममर्षिणाम् ।
संपूर्णा कृतविद्यानां गुहा केसरिणामिव ॥ २१ ॥
पर्वतावरील गुफा ज्याप्रमाने सिंहांच्या कळपांनी व्याप्त असतात त्याप्रमाणे शौर्याच्या अधिकतेमुळे अग्निसमान दुर्धर्ष, कुटिलतारहित, अपमान सहन न करू शकणार्‍या, आणि अस्त्र-शस्त्रांचे ज्ञाते असलेल्या योध्यांच्या समुदायाने ती पुरी परिपूर्ण होती. ॥ २१ ॥
काम्बोजविषये जातैर्बाह्लीकैश्च हयोत्तमैः ।
वनायुजैर्नदीजैश्च पूर्णा हरिहयोत्तमैः ॥ २२ ॥
कांबोज आणि बाह्लिक देशात उत्पन्न झालेल्या उत्तम घोड्यांनी, वनायु देशातील अश्वांनी आणि सिंधु नदीच्या निकट पैदास होणार्‍या दर्याद्र घोड्यांनी, जे इंद्राच्या उच्चैःश्रवा अश्वासमान श्रेष्ठ होते, अयोध्यापुरी भरलेली होती. ॥ २२ ॥
विन्ध्यपर्वतजैर्मत्तैः पूर्णा हैमवतैरपि ।
मदान्वितैरतिबलैर्मातङ्‍गैः पर्वतोपमैः ॥ २३ ॥
विंध्य आणि हिमालय पर्वतात उत्पन्न होणा‍र्‍या अत्यंत बलशाली पर्वताकार मदमत्त गजराजांनी ती नगरी परिपूर्ण होती. ॥ २३ ॥
ऐरावतकुलीनैश्च महापद्मकुलैस्तथा ।
अञ्जनादपि निष्क्रान्तैर्वामनादपि च द्विपैः ॥ २४ ॥
ऐरावत कुलात उत्पन्न, महापद्माच्या वंशात पैदा झालेल्या आणि अञ्जन आणि वामन नामक दिग्गजांपासून प्रकट झालेल्या हत्तींनी पुरीच्या पूर्णतेत भर टाकली होती. ॥ २४ ॥
भद्रैर्मंद्रैर्मृगैश्चैव भद्रमन्द्रमृगैस्तथा ।
भद्रमन्द्रैर्भद्रमृगैर्मृगमन्द्रैश्च सा पुरी ॥ २५ ॥

नित्यमत्तैः सदा पूर्णा नागैरचलसन्निभैः ।
सा योजने च द्वे भूयः सत्यनामा प्रकाशते ।
यस्यां दशरथो राजा वसञ्जगदपालयत् ॥ २६ ॥
हिमालय पर्वतावर उत्पन्न झालेले भद्रजातिचे, विंध्य पर्वतावर उत्पन्न झालेले भरजातिचे आणि सह्यपर्वतावर पैदा झालेले मृगजातिचे हत्ती तेथे विपुल प्रमाणात होते. भद्र, मंद्र आणि मृग या तिन्हींच्या मिसळण्याने उत्पन्न झालेले संकरजातिचे, आणि भद्र व मृग जातिच्या संयोगाने उत्पन्न झालेले संकरजातिचे, तथा मृग व मंद्र या दोन जातिच्या संमिश्रणाने पैदा झालेले पर्वताकार गजराजही, जे सदा मदोन्मत्त राहात असत, त्या पुरीत भरलेले होते. (तीन योजनेचा विस्तार असणार्‍या अयोध्येत) दोन योजनांची भूमि तर अशी होती की जेथे पोचून कुणाबरोबर युद्ध करणे असंभव होते. म्हणून ती पुरी 'अयोध्या'या सत्य आणि सार्थक नामाने प्रकाशित होत होती. अशा नगरीत राहून राजा दशरथ या जगताचे (आपल्या राज्याचे) पालन करीत होता. ॥ २५-२६ ॥
तां पुरीं स महातेजा राजा दशरथो महान् ।
शशास शमितामित्रो नक्षत्राणीव चन्द्रमाः ॥ २७ ॥
जसे चंद्रमा नक्षत्रांचे पालन करतो, त्याप्रकारे महातेजस्वी महाराज दशरथ अयोध्यापुरीचे शासन करीत होते. त्यांनी आपल्या समस्त शत्रूंना नष्ट करून टाकले होते. ॥ २७ ॥
तां सत्यनामां दृढतोरणार्गलां
     गृहैर्विचित्रैरुपशोभितां शिवाम् ।
पुरीमयोध्यां नृसहस्रसङ्‍कुलां
     शशास वै शक्रसमो महीपतिः ॥ २८ ॥
जिचे अयोध्या हे नाम सत्य आणि सार्थक होते, जिचे दरवाजे आणि अर्गला सुदृढ होत्या, जी विचित्र गृहांनी सदा सुशोभित होत असे, जिच्यात हजारो पुरुष निवास करीत होते, त्या कल्याणमयी पुरीचे इंद्रतुल्य तेजस्वी राजा दशरथ न्यायपूर्वक शासन करीत होते. ॥ २८ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा सहावा सर्ग समाप्त झाला. ॥ ६ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP