सीता श्रीरामे स्वानुरागं संदर्श्य रावणं भर्त्सयामास रावणस्याज्ञया राक्षस्यस्तामशोकवाटिकां नीत्वा भीषयामासुः -
|
सीतेने श्रीरामाच्या प्रति आपला अनन्य अनुराग दाखवून रावणचा धिक्कार करणे तसेच रावणाच्या आज्ञेने राक्षसींनी तिला अशोक वाटिकेत घेऊन जाऊन घाबरविणे -
|
सा तथोक्ता तु वैदेही निर्भया शोककर्शितता ।
तृणमन्तरतः कृत्वा रावणं प्रत्यभाषत ॥ १ ॥
|
रावणाने असे म्हटल्यावर शोकामुळे कष्ट प्राप्त होत असलेली वैदेही सीता मध्ये गवताची काडी धरून त्या निशाचरास निर्भय होऊन म्हणाली - ॥१॥
|
राजा दशरथो नाम धर्मसेतुरिवाचलः ।
सत्यसन्धः परिज्ञातो यस्य पुत्रः स राघवः ॥ २ ॥
रामो नाम स धर्मात्मा त्रिषु लोकेषु विश्रुतः ।
दीर्घबाहुर्विशालाक्षो दैवतं हि पतिर्मम ॥ ३ ॥
|
महाराज दशरथ धर्माच्या अचल सेतुप्रमाणे होते. ते आपल्या सत्यप्रतिज्ञेसाठी सर्वत्र विख्यात होते. त्यांचे पुत्र जे राघव श्रीराम आहेत तेही आपल्या धर्मात्मापणामुळे तीन्ही लोकात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या भुजा लांब आहेत आणि डोळे मोठे मोठे आहेत. तेच माझे आराध्य दैवत आणि पति आहेत. ॥२-३॥
|
इक्ष्वाकूणां कुले जातः सिंहस्कन्धो महाद्युतिः ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा यस्ते प्राणान् वधिष्यति ॥ ४ ॥
|
त्यांच्या जन्म इक्ष्वाकु कुळात झालेला आहे. त्यांचे खांदे सिंहासमान आणि तेज महान् आहे. ते आपला भाऊ लक्ष्मण याच्यासह येऊन तुझ्या प्राणांचा विनाश करून टाकतील. ॥४॥
|
प्रत्यक्षं यद्यहं तस्य त्वया वै धर्षिता बलात् ।
शयिता त्वं हतः सङ्ख्ये जनस्थाने यथा खरः ॥ ५ ॥
|
जर तू त्यांच्या समोर बलपूर्वक माझे अपहरण केले असतेस तर आपला भाऊ खर याच्याप्रमाणे जनस्थानाच्या युद्धस्थळावरच तू मारला जाऊन कायमचा झोपी गेला असतास. ॥५॥
|
य एते राक्षसाः प्रोक्ता घोररूपा महाबलाः ।
राघवे निर्विषाः सर्वे सुपर्णे पन्नगा यथा ॥ ६ ॥
|
तू जी ह्या घोर रूपधारी महाबलाढ्य राक्षसांची चर्चा केली आहेस, श्रीरामांच्या जवळ जाताच या सर्वांचे विष उतरून जाईल. ज्याप्रमाणे गरूडाजवळ जाताच सर्व सर्प विषाच्या प्रभावारहित होऊन जातात, त्या प्रमाणेच. ॥६॥
|
तस्य ज्याविप्रमुक्तास्ते शराः काञ्चनभूषणाः ।
शरीरं विधमिष्यन्ति गङ्गा कूलमिवोर्मयः ॥ ७ ॥
|
ज्याप्रमाणे पूर आलेल्या गंगेच्या लाटा आपल्याच तटाला ढासळून टाकतात त्याच प्रमाणे श्रीरामांच्या धनुष्याच्या दोरीपासून सुटलेले सुवर्णभूषित बाण तुझ्या शरीरास छिन्न भिन्न करून टाकतील. ॥७॥
|
असुरैर्वा सुरैर्वा त्वं यद्यवध्योऽसि रावण ।
उत्पाद्य सुमहद् वैरं जीवंस्तस्य न मोक्ष्यसे ॥ ८ ॥
|
रावणा ! तू असुर अथवा देवतांना जरी अवध्य आहेस आणि संभव आहे की ते तुला मारू शकणार नाहीत, परंतु भगवान् श्रीरामांशी हे महान् वैर धरून तू कुठल्याही प्रकारे जिवंत सुटू शकत नाहींस. ॥८॥
|
स ते जीवितशेषस्य राघवोन्तकरो बली ।
पशोर्यूपगतस्येव जीवितं तव दुर्लभम् ॥ ९ ॥
|
राघव फार बलबान् आहेत. ते तुझ्या शेष जीवनाचा अंत करून टाकतील. यज्ञीय यूपाला बांधलेल्या पशु प्रमाणे तुझे जीवन दुर्लभ होईल. ॥९॥
|
यदि पश्येत् स रामस्त्वां रोषदीप्तेन चक्षुषा ।
रक्षस्त्वमद्य निर्दग्धो यथा रुद्रेण मन्मथः ॥ १० ॥
|
राक्षसा ! जर श्रीराम आपल्या रोषपूर्ण दृष्टीने तुझ्याकडे पहातील तर तू भगवान् शंकरांनी कामदेवाला भस्म करून टाकले होते त्याप्रमाणे आत्ताच जळून खाक होऊन जाशील. ॥१०॥
|
यश्चन्द्रं नभसो भूमौ पातयेन्नाशयेत वा ।
सागरं शोषयेद् वापि स सीतां मोचयेदिह ॥ ११ ॥
|
जे चंद्रम्याला आकाशातून पृथ्वीवर पाडण्याची अथवा नष्ट करण्याची शक्ती बाळगून आहेत किंवा जे समुद्रालाही शोषून टाकू शकतात ते भगवान् श्रीराम येथे पोहोचून सीतेलाही सोडवू शकतात. ॥११॥
|
गतासुस्त्वं गतश्रीको गतसत्त्वो गतेन्द्रियः ।
लङ्का वैधव्यसंयुक्ता त्वत्कृतेन भविष्यति ॥ १२ ॥
|
तू समजून घे की आता तुझे प्राण निघून गेले आहेत. तुझी राज्यलक्ष्मी नष्ट होऊन गेली आहे. तुझे बल आणि इंद्रियांचा ही नाश झालेला आहे तसेच तुझ्याच पापामुळे तुझी लंकाही आता विधवा होऊन जाईल. ॥१२॥
|
न ते पापमिदं कर्म सुखोदर्कं भविष्यति ।
याऽहं नीता विनाभावं पतिपार्श्वात् त्वया बलात् ॥ १३ ॥
|
तुझे हे पापकर्म तुला भविष्यात सुख भोगू देणार नाही; कारण की तू मला बलपूर्वक पतिपासून दूर केले आहेस. ॥१३॥
|
स हि देवरसंयुक्तो मम भर्ता महाद्युतिः ।
निर्भयो वीर्यमाश्रित्य शून्ये वसति दण्डके ॥ १४ ॥
|
माझे स्वामी महान् तेजस्वी आहेत आणि माझ्या दीरासह आपल्याच पराक्रमाचा भरवसा करून शून्य दण्डकारण्यात निर्भयतापूर्वक निवास करीत आहेत. ॥१४॥
|
स ते वीर्यं बलं दर्पं उत्सेकं च तथाविधम् ।
अपनेष्यति गात्रेभ्यः शरवर्षेण संयुगे ॥ १५ ॥
|
ते युद्धात बाणांची वृष्टी करून तुझ्या शरीरातून बळ, पराक्रम, घमेंड तसेच अशा उच्छृंखल आचरणाला ही बाहेर काढून टाकतील. ॥१५॥
|
यदा विनाशो भूतानां दृश्यते कालचोदितः ।
तदा कार्ये प्रमाद्यन्ति नराः कालवशं गताः ॥ १६ ॥
|
जेव्हा काळाच्या प्रेरणेने प्राण्यांचा विनाश जवळ येतो त्या समयी मृत्युच्या अधीन झालेले जीव प्रत्येक कार्यात प्रमाद करू लागतात. ॥१६॥
|
मां प्रधृष्य स ते कालः प्राप्तोऽयं राक्षसाधम ।
आत्मनो राक्षसानां च वधायान्तःपुरस्य च ॥ १७ ॥
|
अधम निशाचरा ! माझे अपहरण करण्यामुळे तुझ्यासाठीही तोच काळ येऊन पोहोचला आहे. तुझ्या स्वतःसाठी, सर्व राक्षसांसाठी तसेच या अंतःपुरासाठी ही विनाशाची वेळ निकट आलेली आहे. ॥१७॥
|
न शक्या यज्ञमध्यस्था वेदिः स्रुग्भाण्डमण्डिता ।
द्विजातिमन्त्रसम्पूता चण्डालेनावमर्दितुम् ॥ १८ ॥
|
यज्ञशाळेमधील वेदीवर, जी द्विजातीयांच्या मंत्रद्वारा पवित्र केली गेलेली असते तसेच जिला स्त्रुक्, स्त्रुवा आदि यज्ञपात्र सुशोभित करतात, त्यावर चाण्डाळ आपला पाय ठेवू शकत नाही. ॥१८॥
|
तथाहं धर्मनित्यस्य धर्मपत्नी दृढव्रता ।
त्वया स्प्रष्टुं न शक्याहं राक्षसाधम पापिना ॥ १९ ॥
|
त्याप्रकारे मी नित्य धर्मपरायण भगवान् श्रीरामांची धर्मपत्नी आहे, तसेच दृढतापूर्वक पतिव्रत्य धर्माचे पालन करीत आहे (म्हणून यज्ञवेदी समान् आहे) आणि राक्षसधमा ! तू महापापी आहेस (म्हणून चाण्डाळतुल्य आहेस) म्हणून मला स्पर्श करू शकत नाहीस. ॥१९॥
|
क्रीडन्ती राजहंसेन पद्मषण्डेषु नित्यदा ।
हंसी सा तृणमध्यस्थं कथं द्रक्ष्येत मद्गुकम् ॥ २० ॥
|
जी सदा कमलांच्या समूहात राजहंसाबरोबर क्रीडा करीत असते ती हंसी गवतात राहाणार्या जलकाकाकडे कशी दृष्टिपात करेल. ॥२०॥
|
इदं शरीरं निःसंज्ञं बन्ध वा घातयस्व वा ।
नेदं शरीरं रक्ष्यं मे जीवितं वापि राक्षस ॥ २१ ॥
|
राक्षसा ! तू या संज्ञाशून्य जडशरीरास बांधून ठेव अथवा कापून टाक. मी स्वतः ही या शरीराला आणि जीवनाला राखू इच्छित नाही. ॥२१॥
|
न तु शक्यमपक्रोशं पृथिव्यां दातुमात्मनः ।
एवमुक्त्वा तु वैदेही क्रोधात् सुपरुषं वचः ॥ २२ ॥
रावणं जानकी तत्र पुनर्नोवाच किञ्चन ।
|
मी या भूतलावर स्वतःसाठी निंदा अथवा कलंक देणारे कुठलेही कार्य करू शकत नाही. रावणाला क्रोधाने असे अत्यंत कठोर वचन बोलून वैदेही जानकी गप्प बसली, त्यानंतर ती तेथे काही ही बोलली नाही. ॥२२ १/२॥
|
सीताया वचनं शृत्वा परुषं रोमहर्षणम् ॥ २३ ॥
प्रत्युवाच ततः सीतां भयसंदर्शनं वचः ।
|
सीतेचे ते कठोर वचन अंगावर कांटे आणणारे होते. ते ऐकून रावणाने तिला भय दाखविण्यासाठी असे म्हटले- ॥२३ १/२॥
|
शृणु मैथिलि मद्वाक्यं मासान् द्वादश भामिनि ॥ २४ ॥
कालेनानेन नाभ्येषि यदि मां चारुहासिनि ।
ततस्त्वां प्रातराशार्थं सूदाश्छेत्स्यन्ति लेशशः ॥ २५ ॥
|
मनोहर हास्य असणार्या भामिनी ! मैथिली ! माझे म्हणणे ऐक. मी तुला बारा महिन्याचा समय देत आहे. इतक्या काळात जर तू स्वेच्छापूर्वक माझ्याजवळ आली नाहीस तर माझे आचारी सकाळची न्याहारी तयार करण्यासाठी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकतील. ॥२४-२५॥
|
इत्युक्त्वा परुषं वाक्यं रावणः शत्रुरावणः ।
राक्षसीश्च ततः क्रुद्ध इदं वचनमब्रवीत् ॥ २६ ॥
|
सीतेला असे कठोर वचन बोलून शत्रुंना रडविणारा रावण रागावून त्या राक्षसींना याप्रकारे म्हणाला- ॥२६॥
|
शीघ्रमेव हि राक्षस्यो विकृता घोरदर्शनाः ।
दर्पमस्यापनेष्यन्तु मांसशोणितभोजनाः ॥ २७ ॥
|
आपल्या विक्राळ रूपामुळे भयंकर दिसणार्या तसेच रक्त-मांसाचा आहार करणार्या राक्षसींनो ! तुम्ही शीघ्रच या सीतेचा अहंकार दूर करा. ॥२७॥
|
वचनादेव तास्तस्य सुघोरा घोरदर्शनाः ।
कृतप्राञ्जलयो भूत्वा मैथिलीं पर्यवारयन् ॥ २८ ॥
|
रावणाने इतके म्हटल्यावर त्या भयंकर दिसणार्या अत्यंत घोर राक्षसीणी हात जोडून मैथिलीला चारी बाजूनी घेरून उभ्या राहिल्या. ॥२८॥
|
स ताः प्रोवाच राजासौ रावणो घोरदर्शनाः ।
प्रचाल्य चरुणोत्कर्षैर्दारयन्निव मेदिनीम् ॥ २९ ॥
|
तेव्हा राजा रावण आपल्या पायाच्या आघातांनी पृथ्वीला विदीर्ण करीत दोन चार पावले चालून त्या भयानक राक्षसींना म्हणाला- ॥२९॥
|
अशोकवनिकामध्ये मैथिली नीयतामिति ।
तत्रेयं रक्ष्यतां गूढं युष्माभिः परिवारिता ॥ ३० ॥
|
निशाचरीनो ! तुम्ही सर्व मैथिली सीतेला अशोक वाटिकेत घेऊन जा आणि चारी बाजूनी घेरून तेथे गूढ भावाने तिचे रक्षण करीत राहा. ॥३०॥
|
तत्रैनां तर्जनैर्घोरैः पुनः सान्त्वैश्च मैथिलीम् ।
आनयध्वं वशं सर्वा वन्यां गजवधूमिव ॥ ३१ ॥
|
तेथे प्रथम तर भयंकर गर्जन तर्जन (आरडाओरडा) करुन तिला भीती दाखवा, नंतर गोड गोड वचनांनी तिला समजावून जंगलातील हत्तीणी प्रमाणे या मैथिलीला वश करून घेण्याचा तुम्ही सर्व जणी प्रयत्न करा. ॥३१॥
|
इति प्रतिसमादिष्टा राक्षस्यो रावणेन ताः ।
अशोकवनिकां जग्मुः मैथिलीं प्रतिगृह्य तु ॥ ३२ ॥
|
रावणाने या प्रकारे आदेश दिल्यावर त्या राक्षसीणी मैथिलीला घेऊन अशोक वाटिकेत निघून गेल्या. ॥३२॥
|
सर्वकामफलैर्वृक्षैर्नानापुष्पफलैर्वृताम् ।
सर्वकालमदैश्चापि द्विजैः समुपसेविताम् ॥ ३३ ॥
|
ती वाटिका समस्त कामनांना फलरूपात प्रदान करणार्या कल्पवृक्षांनी आणि तर्हेतर्हेच्या फळे-फुले असणार्या अनेक प्रकारच्या वृक्षांनी भरलेली होती तसेच नेहमी मदमत्त राहाणारे पक्षी तिच्यात निवास करीत होते. ॥३३॥
|
सा तु शोकपरीताङ्गी मैथिली जनकात्मजा ।
राक्षसीवशमापन्ना व्याघ्रीणां हरिणी यथा ॥ ३४ ॥
|
परंतु तेथे गेल्यावर मैथिली जानकीच्या अंगा अंगात शोक व्याप्त होऊन गेला. राक्षसीणींच्या ताब्यात सापडल्यावर तिची दशा वाघीणीनी मध्ये घेरुन ठेवलेल्या हरिणी प्रमाणे होऊन गेली. ॥३४॥
|
शोकेन महता ग्रस्ता मैथिली जनकात्मजा ।
न शर्म लभते भीरुः पाशबद्धा मृगी यथा ॥ ३५ ॥
|
महान् शोकाने ग्रस्त झालेली मैथिली जानकी जाळ्यात फसलेल्या मृगीप्रमाणे भयभीत होऊन क्षणभरासाठीही तिला चैन पडेनासे झाले. ॥३५॥
|
न विन्दते तत्र तु शर्म मैथिली
विरूपनेत्राभिरतीव तर्जिता ।
पतिं स्मरन्ती दयितं च देवरं
विचेतनाभूद् भयशोकपीडिता ॥ ३६ ॥
|
विक्राळ रूप आणि नेत्र असणार्या राक्षसीणींचे दटावणे आणि धमकावणे ऐकण्यामुळे मैथिली सीतेला तेथे शान्ती मिळाली नाही. ती भय आणि शोकाने पीडित होऊन प्रियतम पति आणि दीराचे स्मरण करीत निश्चेष्ट झाल्यासारखी होऊन गेली. ॥३६॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे षट्पञ्चाशः सर्गः ॥ ५६ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा छपन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५६ ॥
|